इंग्रजी भाषेला ज्याप्रमाणे जलद लिहिण्याची स्वतंत्र लिपी आहे, ज्याला आपण 'कर्सिव्ह' म्हणतो त्या प्रमाणेच मराठीलादेखील देवनागरीशिवाय मोडी ही एक स्वतंत्र लिपी आहे.
मोडी लिपीला सुमारे ८०० वर्षांचा इतिहास आहे. यादवांचा प्रधान हेमाडपंत ह्याच्या काळात या लिपीचा उगम झाला असा एक सर्वसाधारण ठोकताळा आहे, पण मोडीलिपी त्याहीपेक्षा जुनी असण्याचा संभव नाकारता येत नाही. परंतु हेमाडपंतांच्या काळापासून म्हणजेच यादवांच्या राजवटीत मोडीलिपीचा वापर सरकारी दप्तरात होऊ लागला. हळूहळू सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातसुध्दा मोडी आली.देवनागरी म्हणजेच बाळबोध पेक्षा मोडीत भराभर लिहीता येते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वाअप्रुन कमीतकमी ओळीत/वाक्यात सारांश लिहिला जातो. जसे
देIIख = देशमुख,
पII = परगणे / पाटील.
अश्या अनेक शब्दांच्या लघुरुपांची जंत्री वानगीदाखल देता येईल.
सुंदर मोडी लिहिणे जे जसे कौशल्याचे काम आहे, त्याचप्रमाणे अचूक मोडी वाचणे हे देखील कौशल्याचे आणि अभ्यासाचे काम आहे. मोडीतील दस्ताऐवज वाचताना वाक्यातील पुर्णविराम, स्वल्पविराम हे समजुन वाचावे लागतात, कारण मोडी लिहिताना विरामचिन्हे देण्याची पध्दतच नाही. त्यामुळे शब्द / वाक्य कुठे तोडायचे हे सरावाने आणि तत्कालीन भाषेच्या अभ्यासाने कळू लागते. नविनच मोडी वाचणार्यांच्या संदर्भात एक विनोद नेहमी सांगितला जातो. "रस्त्यातनाचतमासेचाललेहोते" हे वाक्य नवशिका हमखास "रस्त्यात नाचत मासे चालले होते" असे वाचतो. मुळात ह्या वाक्याचा अर्थ "रस्त्यात नाच, तमासे चालले होते" असा असतो. अर्थात सरावाने ह्या गोष्टी जमू लागतात.
इतिहाससंशोधनासाठी मोडी वाचता येणे हे अगदी महत्वाचे आहे. स्वातंत्रपुर्व काळापर्यंत मोडी ही शालेय अभ्यासक्रमात होती, पण नंतर मात्र वगळण्यात आली. त्यामुळे आज उत्तम मोडी लिहू-वाचू शकणार्या लोकांची संख्या फारच कमी आहे.
यादवकाळात चालू झालेली मोडी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती. पेशवे दप्तरातील पत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, अत्यंत शुध्दलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवकाळ ते उत्तर पेशवाई ह्या काळातील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे, बदल लक्षात येतात. मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.
भाषेच्या स्थित्यंतराच्या अभ्यासाच्या दृष्टीने वानगीदाखल दोन पत्रांच तर्जुमा पाहू:
१.शिवाजी महाराजांनी त्यांच्या हवालदार व जुमलेदारांना लिहिलेल्या पत्रातील भाग -
"रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही, साहेबी खजानातून वाटणिया पदरी घातलिया आहेती............
...............
वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, कोण्हावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोणास कलागती करावयाची गरज नाही....
हा रोखा तपशिले ऐकणे आणिक हुश्शार राहणे. "२.उत्तर पेशवाई काळातील (दुसरा बाजीरावाचे काळात)पत्रः दुसरे बाजीरावाचे दौलतराव शिंदे (ग्वाल्हेर) यांना लिहिलेल्या पत्रातील भाग -
"मौजे वडगाव पोI (पोI= प्रांत) खर्डे हा गाव राजेश्री रामराव जीवाजी चिटणीस यांजकडे आहे, तेथे तुम्ही रोख केला म्हणोन हुजुर विदीत जहाले, त्याजवरुन हे पत्र लिहिले असे तेथे रोखा केला असेल तो मना करुन दर येक मीसी गावास उपद्रव न लगे ते करणे. "
मोडी एकदा वाचायला येऊ लागली की आप्ल्यापुढें ५००-६०० वर्षांचा इतिहासच उघड होतो. मग त्याकाळचे समाजजीवन, रुढी, परंपरा इत्यादीचीही माहिती मिळते. सामाजिक स्थित्यंतरे अभ्यासता येतात.
मग, कधी वळताय परत मोडीकडे?
प्रतिक्रिया
1 Mar 2011 - 4:26 pm | पैसा
मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तकं उपलब्ध आहेत. ती साधारण मॅजेस्टिकच्या पुस्तक प्रदर्शनात असतातच. मी घेतली आहेत, पण अजून नीट पाहिली नाहीत. आता नक्की बघेन.
1 Mar 2011 - 4:48 pm | स्पंदना
अभ्यास पुर्ण लेख, उगा खायची बाब नव्हे मोडी बद्दल लिहिण म्हणजे. अभिनंदन जिप्सी!
माझ्या माहेरी आहेत मोडी तली काही पुस्तके. मी तर बसुन एकदा ती अंकलपी शिकले होते अन मग काही कागद पत्रे वाचायचा खटाटोप केला होता. छान दिसते मोडी देवनागरी पेक्षा अस माझ वैयक्तीक मत आहे. एक धडा वाचायचे मी त्या पुस्तकातला.
बाकी जिप्सी खुप दिवसांनी दर्शन झाल . बर वाटल भेटुन .
1 Mar 2011 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते
अॅट लास्ट! :)
छान लेख.
1 Mar 2011 - 5:35 pm | ५० फक्त
जिप्सि बाबा, ब-याच दिवसांनी आलात. खुप माहितीपुर्ण लेख घेउन आला आहात त्याबद्दल धन्यवाद.
असेच येत रहा, लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
हर्षद.
1 Mar 2011 - 5:44 pm | पप्पू
माझा एक मित्र मिलिंद जोशी मोडी फार छान वाचतो. कोणाला शिकायचे असेल तर मी पत्ता देतो.
1 Mar 2011 - 6:42 pm | धमाल मुलगा
मोडीलिपी आमची एकदम आवडती. :)
माझ्या आजोबांची सही मोडीत असायची. बँकेचे चेक, शेअर्सचे डिलिव्हरी चलन वगैरेंवरही मोडीतच सही असायची. त्यांच्याकडून माझी सही तयार करुन घेतली होती खरी. पण आता मात्र विसरलो ते विसरलोच.
मोडीतला मला आवडणारा प्रकार म्हणजे आधी एक लांबलंचक रेघ ओढायची आणि नंतर एकेक लफ्फेदार, झोकदार अक्षर बोरु/शाईपेन न उचलता कागदावर उतरवताना बघायचं! कोणी जाणकार मोडी लिहिताना पाहणं हे सुध्दा एक झकास अनुभव देतं.
वर पैसाताईनं ढवळे प्रकाशनच्या १ ते५ भाग असलेल्या अंकलिपी आणि पुस्तकांबद्दल सांगितलं आहेच.
त्याशिवाय 'डायमंड पब्लिकेशन'चं 'तुम्हीच मोडी शिका' नावाचं पुस्तक गेल्या २ महिन्यांखाली अगदी अपघातानंच सापडलं.ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे निरनिराळे मोडी दस्ताऐवज छापलेले आहेत. एकदा मोडीतली अक्षरं लागायला लागली, की ह्या पुस्तकातलं एकेक पत्र वाचून पाहण्यात आणि अर्थ लावण्यात मस्त वेळ जातो. :)
मिष्टर जिप्सी, मोडीच्या माहितीबद्दल मंडळ आपलं आभारी आहे. :)
6 Mar 2011 - 1:17 am | चिंतामणी
ह्या लेखाबद्दल आणि.............................................................................................................................................................................................................................................................................................
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
तुझ्या साध्या आणि निर्मळ प्रतिक्रीयेबद्दल.
7 Mar 2011 - 6:51 pm | मालोजीराव
माझ्यापण....आजोबा,पणजोबा पाटील होते...त्यामुळे त्यांच्याकडची कागदपत्र बघितलेली,कळत काई नव्हतं पण बघायला छान वाटायचं.
तशी पुणेकर मिपाकरांना चांगली संधी आहे मोडी शिकायची....भारत इतिहास संशोधक मंडळात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मोडी वर्ग आहेत...जमेल त्यांनी लाभ घ्या.
मोडी लिपीचा नमुना - हे पत्र सवाई माधवराव पेशवे यांनी सेनापती महादजी शिंदे यांस ३०-१२-१७८४ रोजी लिहिले होते
(पत्र साभार- wikipedia)
1 Mar 2011 - 6:45 pm | अवलिया
मोडी लिपी इथे पहा - http://www.omniglot.com/writing/modi.htm
1 Mar 2011 - 6:45 pm | यशोधरा
धन्यवाद, पण लेख विस्तारुन लिहायचा होता ना. :)
खूप संक्षिप्त वाटला. मोडीबद्दल अजूनही लिहा, ही विनंती.
6 Mar 2011 - 3:44 am | निनाद मुक्काम प...
सहमत ( भाषेबद्दल अधिक माहिती हवीच
1 Mar 2011 - 8:01 pm | कलंत्री
उन्हाळ्यात अनेक शिबिरे होत असतात, त्यामध्ये मोडी शिकण्याचा वर्ग घेता येऊ शकतो. उत्साही कार्यकर्त्यांनी याबाबत विचार करावा.
2 Mar 2011 - 1:53 am | पुष्करिणी
माहितीपूर्ण लेख.
मोडी ही शॉर्टहँड लिपी आहे, एका ओळीत लिहिताना कमीत कमी वेळा हात उचलावा लागतो.
एकच वेलांटी आणि उकार, मोडीतली अक्षरं चक्रकार ( circular ) असतात, काना खालून वर देतात (म्हणजे पुढचं अक्षर पटकन लिहायला सोपं ), प्रत्येक अक्षराची सुरूवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते ..सध्या इतकंच आठवतय.
6 Mar 2011 - 1:53 am | पंगा
यावरून आठवले.
मोडीत 'लो' आणि 'के' ही अक्षरे म्हणे एकसारखी लिहिली जातात. (ऐकीव माहिती. पडताळून पाहिलेली नाही.) तर कोणत्याशा बखरीत कोणत्याशा लढाईच्या संदर्भात कोणत्याशा सरदाराने '५०० लोकांचा फडशा पाडला' हे वाक्य एका हौशी इतिहासतज्ज्ञाने '५०० केकांचा फडशा पाडला' असे वाचून, त्यावरून 'त्या काळातसुद्धा केक खाण्याची पद्धत होती' असे अनुमान काढल्याबद्दलची किंवदंता ऐकण्यात आलेली आहे.
(प्रस्तुत सरदाराने मारी आंत्वानेतच्या विधानातून स्फूर्ती घेतली असावी अथवा ते विधान फारच गंभीरपणे घेतले असावे अथवा यांपैकी कोणतेही एक अथवा दोन्ही, अशी आमची अटकळ आहे. चूभूद्याघ्या.)
6 Mar 2011 - 10:23 pm | आनंदयात्री
छान. भाषेची ओळख अत्यंत आवडली. तुम्ही पण प्रीत मोहर सारखे मोडीचे क्लासेस सुरु करावे असे म्हणतो :)
6 Mar 2011 - 11:29 pm | मनिम्याऊ
महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाद्वारे मोडीलिपी प्रशिक्षणाच्या ८ ते १५ दिवसीय कार्यशाळा दरवर्षी उन्हाळ्यात राबवण्यात येतात. या कार्यशाळांमध्ये मोडीलिपी लेखन-वाचन तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पदधतीची माहिती (कागद पत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक संदर्भ) देण्यात येते. तसेच शेवटी परीक्षा असुन प्रमाणपत्र देखील देण्यात येते. एच्छुकांनी जरुर या योजनेचा लाभ घ्यावा.
मोडीलिपीचा एक नमुना खाली देत आहे.
7 Mar 2011 - 12:10 am | नितिन थत्ते
यातील ई व ज ही अक्षरे तंतोतंत सध्या गुजरातीत वापरली जाणार्या अक्षरांसारखीच आहेत.
बरीच अक्षरे मराठीतल्या सध्याच्या (देवनागरी) अक्षरांपेक्षा इतकी वेगळी दिसतात की ही मराठीची कर्सिव्ह लिपी आहे की दुसर्याच भाषेची लिपी आहे असा प्रश्न पडावा. (इंग्रजी कर्सिव्ह लिपी जवळजवळ रोमन लिपीसारखीच असते).
यावरून मनात आलेला प्रश्न: सध्या ज्या मराठेतर भाषा देवनागरी लिपी वापरतात त्यांपैकी कुठली भाषा मोडी लिपी वापरून लिहिली जाते का?
7 Mar 2011 - 3:40 am | पंगा
भाषा आणि लिपी यांचा काही अन्योन्यसंबंध असावा किंवा असायलाच हवा असे वाटत नाही. एकच कोंकणी भाषा (किंवा तिची प्रादेशिक रूपे) ही देवनागरी, रोमन, कन्नड आणि बहुधा मलयाळी लिपीसुद्धा वापरून लिहिली जाते, एकच सिंधी भाषा ही देवनागरी आणि अरबी लिपी वापरून लिहिली जाते, आणि एकच पंजाबी भाषा ही गुरुमुखी, देवनागरी आणि उर्दू लिपी वापरून लिहिली जाते, यावरून हे लक्षात यावे.
(बहुधा पूर्व युरोप, भूतपूर्व सोविएत संघाचे काही भाग आणि मंगोलिया येथील काही भाषांचीही अशीच काहीशी परिस्थिती आहे असे वाटते. फार कशाला, माझ्या कॉलेजच्या दिवसांतील एक पिढ्यानपिढ्या तमिळनाडूस्थित मित्र आपल्या घरी 'मराठी' म्हणवली जाणारी परंतु कोणाही महाराष्ट्रवासीयास न समजण्यासारखी एक अगम्य भाषा - ही बहुधा तंजावर मराठी असावी असा कयास आहे - बोलत असे, तो घरी पत्रे लिहिताना या मराठीत परंतु तमिळ लिपी वापरून लिहीत असे, असे आठवते.)
त्यामुळे, केवळ 'देवनागरी अक्षरांपेक्षा मोडीची अक्षरे दिसावयास वेगळी आहेत' या कारणास्तव मोडी ही मराठीकरिता कर्सिव लिपी म्हणून कोणे एके काळी आयुक्त होण्यास काहीही प्रत्यवाय दिसत नाही. बहुसंख्य तत्कालीन मराठी लेखकांनी 'एक सोय' या कारणास्तव तीस स्वीकृती देणे आणि तीस अंगीकारणे एवढेच त्याकरिता पुरेसे आहे.
(तसेही, मोडीचा अपवाद वगळता मराठी ही नेहमी देवनागरीतच लिहिली जात होती किंवा कसे, याबद्दलही निश्चित कल्पना नाही.)
7 Mar 2011 - 3:14 am | पंगा
'इ' आणि 'उ'करिता र्हस्व आणि दीर्घ अशी दोन वेगळी चिन्हे दिसली नाहीत.
7 Mar 2011 - 10:09 am | नितिन थत्ते
इ आणि ई सध्याच्या गुजरातीत पण नाहीत.
व्यंजनांसह येणार्या ई या स्वरांत र्हस्व आणि दीर्घ असतात. उदा. विजय, तेवीस (उच्चार त्रेवी)
परंतु नुसता स्वर म्हणून येणार्या अक्षरांत एकच स्वर असतो. उदा. इदडा व मुंबई या दोन्हीत एकच ई असते. उच्चार मात्र र्हस्व आणिदीर्घ असतात.
[अवांतर शंका : दासबोधात देवनागरी (बाळबोध) लेखन करण्याची भलामण आहे का?]
7 Mar 2011 - 5:50 pm | पंगा
कृपया येथे पहावे.
धन्यवाद.
7 Mar 2011 - 6:06 pm | आजानुकर्ण
श्री. थत्ते यांना ऊंझा जोडणी अभिप्रेत असावी.
http://www.marathiabhyasparishad.com/bhaji/diwali2007/shuddhalekhan/unza...
7 Mar 2011 - 6:10 pm | नितिन थत्ते
असं दिसतंय खरं.
माझ्या हा फरक लक्षात आला नव्हता.
9 Mar 2011 - 10:21 am | पंगा
याबद्दल निश्चित कल्पना नाही. मात्र तशी ती असल्यास, 'बाळबोध लिप्या या क्लिष्ट काव्यग्रंथादि प्रगल्भ रचनांकरिता सर्वस्वी असमर्थ' हे काही आधुनिक तज्ज्ञांचे मत वाचनात आलेले आहे, ते लक्षात घेता, याचा दोन दृष्टिकोनांतून विचार करता येईल.
क्लिष्ट काव्यग्रंथादि रचना या ऐकायलावाचायला जरी कितीही भारदस्त वाटत असल्या, तरी त्या जर मुळात कोणाला कळल्या नाहीत, तर त्यांचा खरोखर काही उपयोग असतो काय? 'इट्स लाइक शेक्स्पियर. साउंड्ज़ ग्रेट, बट डज़ नॉट मीन अ थिंग.' ही उपमा पी.जी वुडहाउस यांनी ठिकठिकाणी वापरली आहे. (शेक्स्पियर बहुधा कर्सिव - आणि तेही अतिशय घाणेरड्या हस्ताक्षरात - लिहीत असावा, अशी आमची अटकळ आहे. अन्यथा, रोमन ही तशी बर्यापैकी बाळबोध लिपी आहे, असे वाटते. सबब, एवढी क्लिष्ट रचना त्या लिपीत होऊ नये.)
निदान मराठी काव्यग्रंथादि रचनांबद्दल तरी पुढेमागे कोणी असे म्हणू नये, या उदात्त हेतूनेच समर्थांनी तशी सुचवण केली असू शकेल काय? मुळात लिपीच जर बाळबोध वापरली, तर कवीने किंवा ग्रंथकर्त्याने कितीही म्हटले, तरी तो क्लिष्ट रचना कशी काय करू शकणार? जे आडातच नाही, ते पोहर्यात येणे नाही. किंवा, वंशच खुंटला, तर वेणुवादनावरील निर्बंध हे आपोआप सुनिश्चित.
त्यामुळे, समर्थांची ही दूरदृष्टी आणि पुढील पिढ्यानपिढ्यांतील मराठी रसिकांबद्दलची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे, हे मान्य करावेच लागेल.
उलटपक्षी, दुसर्या बाजूने विचार करावयाचा झाल्यास, रचनेची क्लिष्टता आणि प्रगल्भता यांचा अन्योन्यसंबंध विसरून चालणार नाही. रचना जितकी क्लिष्ट, तितकी ती दुर्बोध, आणि जितक्या कमी लोकांना ती कळते, तितका तिचा वाचकवर्ग हा अधिक विरळ (किंवा, आजमितीस प्रचलित असलेल्या मराठीत व्यक्त करावयाचे झाल्यास, अधिक एक्स्क्लूज़िव), पर्यायाने रचना तितकी अधिक प्रगल्भ, हे समीकरण सर्वपरिचित असावे. तेव्हा, बाळबोध लिपीच्या समर्थनातून मराठी वाङ्मयाच्या क्लिष्टतेचे पंख छाटून तिची प्रगल्भतेकडे होणारी गरुडभरारी मुळातच रोखण्याच्या पापाचे समर्थ हे गुन्हेगार ठरतात. समर्थांच्या समर्थनामुळे मराठी आपल्या प्रगल्भतेची अपेक्षित उंची कदाचित कधीच गाठू शकणार नाही. मराठीप्रेमींच्या पिढ्या समर्थांना याबद्दल कधीही क्षमा करू शकणार नाहीत. (रचना नुसत्याच समजून काय चाटावयाच्या आहेत? त्यांवर प्रगल्भतेचे शिक्कामोर्तब झाल्याशिवाय काय उपयोग?)
अतिअवांतर: जगात चिनी लिपी हीच काय ती सर्व क्लिष्ट, गहन, वैचारिक, प्रगल्भ एवंगुणविशिष्ट रचनांसाठी एकमेव समर्थ लिपी आहे, असे आजकाल आमचे प्रांजळ मत झाले आहे. बाकीच्या सर्व (तुलनेने खूपच बाळबोध) लिप्या या फार फार तर 'लहान माझी बाहुली' किंवा 'बा बा ब्ल्याक शीप' (किंवा फारच झाले तर 'फ्रेरऽ ज्याकऽ') इतपत रचनांसाठी ठीक.
7 Mar 2011 - 7:13 pm | धमाल मुलगा
मोडीलिपीमध्ये र्हस्व दिर्घाचा फरक केला जात नसे/नाही.
तसेच, मोडीमध्ये वाक्य सलग लिहिले जाते. कुठे तोडायचे ते वाचणाराने अंदाजाने/अभ्यासाने ठरवायचे.
7 Mar 2011 - 7:14 pm | अवलिया
धमालमुलगाशिसहमतआहेमोडिमधेर्हस्वदिर्घनाहि.
7 Mar 2011 - 12:24 am | शिल्पा ब
छान लेख अन प्रतिसादातुन सुद्धा छान माहीती मिळाली...ही लिपी अवघड वाटते खरी
7 Mar 2011 - 5:54 am | चित्रा
माहिती आणि प्रतिसादही उत्तम आहेत. धन्यवाद.
ही लिपी काही अक्षरांबाबतीत अगदी सध्याच्या अक्षरांशी जुळते. मोडी लिपी का मागे पडली असावी असा प्रश्न पडला. हे ब्रिटिशांनी केले का हळूहळू मराठीसाठी देवनागरी लिपीच प्रमाण झाली? किंबहुना एखादी लिपी का मागे पडत असावी?
7 Mar 2011 - 7:57 am | पंगा
ब्रिटिशांनी बहुधा केले नसावे. कारण ब्रिटिश जमान्यात वाढलेल्या पिढीस पावकी, निमकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि अकरकीप्रमाणेच मोडी लेखनवाचन (किमान कित्ता गिरवण्याइतपत परिचयापुरतेतरी) हेदेखील प्राथमिक अभ्यासक्रमात असावे, असे वाटते. (खात्री नाही.)
हे सगळे प्रकार बहुधा स्वातंत्र्योत्तर काळात बंद झाले असावेत, अशी शंका आहे.
(लहानपणी पुण्यात - आणि नक्की आठवत नाही, पण बहुधा मुंबईत गिरगांवात किंवा दादरलासुद्धा - एखादी अपवादात्मक का होईना, पण मोडी लिपीतली दुकानावरची पाटी पाहिल्याचे आठवते. बहुधा जुन्या पिढीतला उरलासुरला दुकानदार असावा. 'फेमस राजापुरी पंचे' अशी काहीतरी पाटी होती. मला अर्थातच वाचता येण्याचा प्रश्न नव्हता, पण विचारणा केल्यावर आईने वाचून दाखवली होती, असे आठवते.)
(अतिअवांतर: 'दुकानाच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत'च्या राज्यात मोडी लिपीतील पाट्या चालून जाव्यात काय?)
7 Mar 2011 - 7:27 pm | धमाल मुलगा
माझ्या ऐकिव माहितीनुसार १९६०सालानंतर मोडी अभ्यासक्रमातून हद्दपार झाली.
7 Mar 2011 - 8:31 pm | पैसा
मी आंजावर वाचलेलं/आई आजीकडून ऐकलेलं दोन्हीची सरमिसळ करून काही लिहितेय इथे. पूर्वी देवनागरीला "बालबोध" असं नाव महाराष्ट्रात होतं. म्हणजेच मोडी शिकणं हे बहुतेक काही कौशल्याचं काम समजलं जात होतं.
नागरी लिपी हा मोडी आणि गुजराती दोन्ही लिप्यांचा उगम असल्यामुळे त्यांच्यात् साम्य दिसतं का? देवनागरी हे नागरी लिपीचं उत्क्रांत स्वरूप आहे असं विकीवर वाचलं होतं. देवनागरी वापरात येण्यापूर्वीच बहुतेक मोडी वापरात असावी. त्यामुळे मोडी ही देवनागरी लिपीची रनिंग लिपी एवढ्याच अर्थाने असावी की कागदावर लिहायला हात टेकला की वाक्य संपेपर्यंत उचलावा लागत नाही.
वर उल्लेख केलेले पावकी, निमकी, पाउणकी, अडीचकी वगैरे पाढे आमच्या अंकलिपीत सुद्धा होते. अगदी १९७२ साली. पण मोडी त्याच्या आधीच वापरातून हद्दपार झाली. याचं कारण बहुधा छापील लिखाणात वाढ हे असावं. म्हणजे असं की शिळाप्रेसच्या काळात मोडीचा ब्लॉक करणं शक्य होतं. पण नंतर खिळे जुळवणीच्या छापखान्यांमधे मोडी खिळे वापरणं शक्य नव्हतं, ते त्याच्या स्वर-व्यंजन आणि जोडाक्षर जोडणीमुळे. मोडीत वेगेवेगळ्या अक्षरांसाठी या जोडण्या वेगेवेगळ्या प्रकारे येतात असं दिसतंय. आंजावर उपलब्ध मोडी फॉण्ट च्या कर्त्याने सुद्धा या फॉण्टच्या वापराला मर्यादा आहेत असं लिहिलेलं आठवतंय.
पण ऊर्दू, गुजराती यांचे फॉण्ट्स जसे उपलब्ध आहेत तसे कोणीतरी मोडीचे निर्दोष फॉण्ट्स तयार करू शकेल का? त्यामुळे निदान काही लोक तरी मोडी परत शिकतील!
7 Mar 2011 - 8:52 pm | धनंजय
छान!
केशव भिकाजी ढवळे यांच्या पुस्तकमालेतील पहिली तीन नुकतीच वाचायला मिळाली. आवडली.
काही अक्षरांचे गुजरातीशी साम्य आहे खरे. यापैकी काही समांतर उत्क्रांतीसुद्धा असावी. उदाहरणार्थ अक्षरांची दांडी वरून-खाली ऐवजी खालून वर नेण्याचा निर्णय केला, की "ज" आणि "न" यांची रूपे तयार होतातच. मात्र यांच्यापैकी "ज"चा हा आकार गुजरातीमध्ये दिसतो, "न"चा नाही.
मोडीत एकदा का "खालून-वर-दांडी" वगैरे नियम केला, तर जितक्या अक्षरांना लागू होईल, तितक्यांना लागू होतो.
("भ"ला लागू नाही, कारण त्याची दांडी खालून वर नेली तर "ना"सारखा दिसतो. असे अपवाद सोडून.)
हेमाडपंतांनी मोडी लिपी बनवली, असे म्हणतात. त्या काळात बाळबोध लिपी कशी दिसत असे? आजच्या देवनागरीसारखी नसणार. आजच्या देवनागरी आणि गुजरातीची ती जी काय पूर्वज लिपी होती, ती यादवांच्या शिलालेखांत सापडू शकेल.
7 Mar 2011 - 9:53 pm | नितिन थत्ते
मोडी लिपीची ओळख करून दिल्याबद्दल जिप्सी यांचे आभार.
मोडी लिपी जुन्या कागदपत्रांच्या अभ्यासासाठी शिकणे गरजेचे आहे. तसा अभ्यास ज्यांना करायचा आहे ते शिकतीलच.
उगाच आपले सगळ्यांनी मोडी शिकावी आणि वापरावी याला काही अर्थ नाही. संस्कृत टिकवण्याच्या प्रयत्नांसारखाच जुनं आहे ते टिकलं पाहिजे असा प्रकार आहे. मग ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी का नाही शिकायची? बरेच शिलालेख ब्राह्मी लिपीत असावेत.
@पैसा >>कोणीतरी मोडीचे निर्दोष फॉण्ट्स तयार करू शकेल का? त्यामुळे निदान काही लोक तरी मोडी परत शिकतील!
हे वाक्य मोडीच्या मूळ उद्देशाशी विसंगत नाही का? म्हणजे हाताने भराभर लिहिणे. संगणकावर मोडीमधून कशाला लिहायचे?
[स्वगत : गारगोटीवर गारगोटी आपटून विस्तव कसा पेटवावा याचे क्लास काढावे का? नाहीतरी तोही आपला मानवजातीचा जुना ठेवा आहे.]
8 Mar 2011 - 8:25 am | अवलिया
अपेक्षित प्रतिसाद.
विशेषतः संस्कृतवरची टिपण्णी अगदी जशी अपेक्षित होती तशीच.
9 Mar 2011 - 11:04 am | नितिन थत्ते
येताय का गारगोटीने विस्तव कसा पेटवावा हे शिकायला?
ज्योक्स अपार्ट....
जुन्या कागदपत्रांच्या अभ्यासाखेरीज आज मोडी लिपी सर्वांनी का शिकायची हे कळले तर बरे होईल.
केवळ जुन्याचे प्रेम याखेरीज सर्वांनी मोडी शिकावी असे म्हणण्यास किंवा आज लोक मोडी शिकत नाहीत म्हणून दु:ख करण्यास काहीही कारण दिसत नाही.
9 Mar 2011 - 12:11 pm | अवलिया
धागा मोडीचा असतांना संस्कृत मधे आणले त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मोडी ही एक लिपी आहे. आणि जबरदस्तीने तिला १९५० पासुन बंद पाडले. तत्पुर्वी मोडीलिपीच्या विशिष्ट अशा र्हस्व दिर्घ विरहित (उकार आणि इकार) स्वरुपामुळे मराठी लेखनात केवळ वेलांटी आणि उकार वेगळे आहेत म्हणून लेखन गौण मानले जात नव्हते. जो प्रकार हल्ली हल्ली अनेक स्वयंघोषित वैयाकरणी करत असतात. तो टाळण्यासाठी मोडी सारखी लिपी प्रचलित असती तर अनेकांना मराठी विषयात शाळेत अधिक गुण मिळाले असते आणि मराठीची गोडी वाढली असती. विषय मोठा आहे, माझी मती सामान्य आहे. असो.
9 Mar 2011 - 1:07 pm | नितिन थत्ते
>>जबरदस्तीने तिला १९५० पासुन बंद पाडले
ठीक आहे त्याने काही तोटा होण्याची शक्यता वाटत नाही.
>>तत्पुर्वी मोडीलिपीच्या विशिष्ट अशा र्हस्व दिर्घ विरहित (उकार आणि इकार) स्वरुपामुळे मराठी लेखनात केवळ वेलांटी आणि उकार वेगळे आहेत म्हणून लेखन गौण मानले जात नव्हते.
तसे र्हस्व दीर्घाबाबत सैल असलेले नियम देवनागरीतही अंमलात आणले जाऊ शकतात.
>>जो प्रकार हल्ली हल्ली अनेक स्वयंघोषित वैयाकरणी करत असतात.
त्यांचा निषेध. :) *
>>तो टाळण्यासाठी मोडी सारखी लिपी प्रचलित असती तर अनेकांना मराठी विषयात शाळेत अधिक गुण मिळाले असते आणि मराठीची गोडी वाढली असती.
असहमत. माझे लेखन वैयाकरण लोकांच्या दृष्टीने शुद्धच असे. पण त्याच्या जोरावर मला चांगले गुण कधीही मिळाले नाहीत. :( मराठीच्या पेपरात गुण मिळवण्यासाठी एक किंवा तीन ओळीत लिहिता येणारे उत्तर २० ते २५ ओळींएवढे लिहिण्याचे कौशल्य लागते. :( ते ज्यांना जमते त्यांना जास्त गुण मिळतात. (येथे तसे गिगाबायटी लिहू शकणारी अनेक मंडळी आहेत) ;)
शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही.
*शुद्ध (प्रमाणरूपात) लिहिले जावे** असे माझे मत आहे आणि मी स्वतः शक्य तितके शुद्ध (प्रमाणरूपात) लिहितो.
** पानी हे पाणीपेक्षा शुद्ध आहे आणि "म्या केले" हे "मी केले" यापेक्षा शुद्ध आहे असे माझे मत आहे.
9 Mar 2011 - 1:51 pm | अवलिया
>>>>ठीक आहे त्याने काही तोटा होण्याची शक्यता वाटत नाही.
तुमच्या मताचा आदर आहेच.
>>>तसे र्हस्व दीर्घाबाबत सैल असलेले नियम देवनागरीतही अंमलात आणले जाऊ शकतात.
तसे होतांना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस हे असेच लिहा ते तसेच लिहा असे शुद्धलेखन नियमावलींची बाडे मराठीच्या संवर्धनासाठी या गोंडस नावाखाली आदळली जात आहेत.
>>>शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही.
तुमच्या मताचा आदर आहेच.
3 Aug 2011 - 9:28 pm | पंगा
'मराठीच्या पेपरात गुण मिळवण्यासाठी एक किंवा तीन ओळीत लिहिता येणारे उत्तर २० ते २५ ओळींएवढे लिहिण्याचे कौशल्य लागते' या भागाशी सहमत आहे. मात्र, त्याच संदर्भात 'शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही' याबाबत साशंक आहे.
मराठीच्या पेपरात गिगाबायटी उत्तरे वाक्यावाक्यागणीक शुद्धलेखनाच्या धडधडीत चुकांसहित लिहून पहावीत. पेपरतपासनिसास मराठीत ज्याला 'कॉन्शन्स' म्हणतात ते ('सदसद्विवेकबुद्धी' हा शब्द येथे चपखल बसेलच, याबद्दल खात्री नाही. 'कॉन्शन्स' हा शब्द येथे 'मनाला खाणारी एक वस्तू' अशा अर्थी घ्यावा.) आणि मराठी शुद्धलेखनाबद्दलचे ज्ञान, या दोन्ही गोष्टी असल्यास गुण तरीही - आणि भरपूर प्रमाणात - कापले जावेत, असे वाटते. (निदान मी शाळेत असताना आमच्या मास्तरमंडळींनी तरी कापले असते, असे वाटते. अर्थात, शुद्धलेखनाबद्दलच्या वाढत्या अनास्थेच्या - आणि (बहुधा) टेंप्लेटवार तपासणीच्या - आजच्या काळात वरील दोन्ही गोष्टी तपासनिसाठायी सापडणे उत्तरोत्तर अधिकाधिक दुरापास्त वाटते, सबब आजच्या काळात आपल्या म्हणण्यात तथ्य असू शकेलही. चूभूद्याघ्या.)
9 Mar 2011 - 11:10 am | इन्द्र्राज पवार
"....[स्वगत : गारगोटीवर गारगोटी आपटून विस्तव कसा पेटवावा याचे क्लास काढावे का? नाहीतरी तोही आपला मानवजातीचा जुना ठेवा आहे.]..."
~ झटक्यात "कडेमणी कम्पाऊंड, माळमड्डी रोख, धारवाड' येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य केलेले 'स्वामी' आठवले. त्यानी एक ठिकाणी म्हटले होते.....त्यांच्या एका विद्यार्थिनीने आयत्या वेळी स्पेशलला 'मराठी' हा विषय न घेता अन्य घेतल्याचे समजल्यावरून त्या ग्रुपला स्टाफ रूममध्ये बोलाविले होते. मराठी सोडून तो दुसरा 'किराणा-भुसारी' विषय निवडण्याचे कारण विचारल्यावर त्या मुलीने सांगितले, "तो विषय स्कोरिंगला चांगला आहे...". ते ऐकून जी.ए. सात्विक संतापाने उद्गारले, "व्वा ! म्हणजे उद्या विद्यापीठाने कोंबडीची पिसे मोजण्याचा विषय ठेवला तर तो स्कोरिंगला चांगला म्हणून निवडणार की काय?"
गारगोटी....ग्रेट
इन्द्रा
9 Aug 2011 - 1:41 am | पंगा
इतिहासाच्या अभ्यासाबद्दल असेच म्हणता येईल का?
बसू देत ज्यांना आपटायचेय त्यांना गारगोटीवर गारगोटी आपटत नि विस्तव पेटवत...
8 Mar 2011 - 9:58 am | विलासराव
लेख आवडला.
मोडीबद्दल प्रतिसादातुनही छान माहिती आली आहे.
8 Mar 2011 - 6:22 pm | पंगा
एक रोचक लेख आणि त्यावरील चर्चा - तुलनेसाठी. (दुवा)
3 Aug 2011 - 1:29 am | rajeshkhilari
मोडी लिपी विषयी ताज्या घडामोडींकरीता या समूहास नियमीत भेट द्या - https://www.facebook.com/groups/123786634305930/?ap=1
3 Aug 2011 - 4:55 pm | सुशान्त
मोडी लिपीचा वापर हा प्रामुख्याने प्रशासकीय व्यवहारात होत असलेला आढळतो. हिशोब लिहिणे, करारपत्रं, आज्ञापत्रं, अशा औपचारिक व्यवहारासाठी ही लिपी महाराष्ट्रात वापरण्यात येत होती. मोडीचा शोध हेमाडपंत ह्या यादवराजांच्या प्रधानाने लावला असं सांगण्यात येत असलं तरी यादवकाळात मोडी लिपीचा वापर किती होता ह्याविषयी शंका आहे. यादवकाळातच महानुभाव संप्रदायाचं विपुल साहित्य लिहिलं गेलं. ते पंथीयांपुरतं मर्यादित ठेवण्यासाठी त्यांनी काही कूट लिप्या तयार केल्या. त्या लिप्या देवनागरी चिन्हांनाच वेगळे उच्चारसंकेत देऊन रचल्या होत्या. उदा. द = क ह्याप्रमाणे.
मोडी लिपीचा वापर यादवकाळानंतरच खऱ्या अर्थी वाढलेला आढळतो. मोडीतला शिवकालापूर्वीचा शिलालेख उपलब्ध आहे का हे माहीत नाही. रायगडावर 'सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटलकर' असा लेख जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीत कोरलेला आढळतो. पण इतर काही शिलालेख आहेत का हे मला माहीत नाही. शिवकालातही काव्यरचनेसाठी मोडी लिपीचा वापर होत नसावा.
"मराठा प्रांतात व्यावसायाशी संबंधित लेखनात मोडी लिपीचा सर्वत्र वापर होतो पण विद्वानांत (umong men of learning) देवनागरी सर्वात प्रसिद्ध आहे" असं विल्यम केरीने आपल्या इंग्रजीतून लिहिलेल्या मराठी व्याकरणाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे. (केरी, विल्यम; ग्रामर ऑफ द मराठा लॅंग्वेज; श्रीरामपूर; १८०५).
सध्या मोडी लिपी शिकणाऱ्यांपैकी बरेचजण उत्पन्नाचं एक साधन म्हणूनही मोडी लिपी शिकतात असं आढळतं. इंग्रजांच्या काळातही बरीचशी कागदपत्रं (विशेषतः मालमत्तेसंबंधीची कागदपत्रं) ही मोडी लिपीतून लिहिलेली आहेत. त्यामुळे मालमत्तेसंबंधी काही वाद उद्भवल्यास पुरावा म्हणून ह्या कागदांचा वापर होतो. त्यासाठी मोडीतला मजकूर मराठीत लिप्यंतरणारे लोक लागतात. ते त्यासाठी घसघशीत पैसे आकारतात. पण हे कौशल्य कमावण्यासाठी अर्थातच कष्टही तितकेच आहेत. शिवकालीन मोडी वाचण्यासाठी त्या काळातील भाषेचा, त्यातही परिभाषेचा (विशिष्ट संकेतांचा), संज्ञांचा चांगला परिचय असावा लागतो. कारण मोडी लिपीत पदं सलग लिहिलेली असल्याने पद कुठे तोडायचं हे कळत नाही. तसंच लिहिण्यातली वेगवेगळी वळणं (उदा. लपेटी) परिचयाची असावी लागतात. वर संक्षेपांचा उल्लेख आला आहेच. ते संक्षेप संदर्भाने उलगड़ावे लागतात. हीच गोष्ट वेगवेगळ्या काळातील मजकुरासंबंधी आहे.
मोडी लिपीचा टंक निर्माण व्हावा ही इच्छा मोडीच्या मूळ उद्देशाशी विसंगत का वाटावी? तसं पाहता सर्वच लिप्या ह्या हाताने लिहिण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. मग त्यांचे टंकही मूळ उद्देशाशी विसंगत मानायचे का? इंग्रजीसाठीही कर्सिव्ह वळणाच्या अक्षरांचे टंक आहेत. मोडीसाठी टंक उपलब्ध असेल तर मोडी शिकण्या-शिकवण्याचा उद्देश असणाऱ्यांची सोयच होणार आहे.
देवनागरीतील ऱ्हस्वदीर्घाला कंटाळलेल्या लोकांना मोडी बरी वाटते. अलीकडे श्री. शुभानन गांगल हे मोडी लिपीची बरीच भलावण करताना आढळतात ह्याचं मुख्य कारण मोडी लिपीत (इकार-उकारांच्या) ऱ्हस्व आणि दीर्घ ह्या भेदासाठी वेगवेगळी चिन्हं नाहीत हेच आहे. मराठी लिहिताना देवनागरीत अशी वेगवेगळी चिन्हं असू नयेत असं मत जुनंच आहे. वि. भि. कोलते, सदाशिव आठवले ह्या मंडळींनी अशा सूचना केलेल्या आहेत. शुद्धलेखनाचे शून्य नियम सांगणाऱ्या गांगलांनीही सगळे इकार दीर्घ आणि सगळे उकार ऱ्हस्व लिहावेत असा प्रस्ताव मांड़ला आहे. पण मग वृत्तबद्ध कवितांत येणाऱ्या ऱ्हस्व-दीर्घ इकार-उकारांसाठी वेगळी लिपिचिन्हं वापरायची का? लिपीतील काही संकेतांचा भाग हा काही लोकांना सोयीचा तर काहींना गैर सोयीचा वाटतच राहतो.
4 Aug 2011 - 10:44 am | सुनील
चांगली माहिती.
अवांतर - रायगडावर 'सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटलकर' असा लेख जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीत कोरलेला आढळतो
अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या दाराशी 'सेवेचे ठाई तत्पर पाटील प्रभाकर', असा देवनागरी लिपीतील बोर्ड काही वर्षांपूर्वीपर्यंत होता. आता आहे किंवा नाही हे ठाऊक नाही. (अति अवांतर - प्रभाकर पाटील हे रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष होते!).