निवेदन : या ही लेखाचा हेतु सहज गम्मत-जम्मत असाच आहे. कोणाचाही अनादर करण्याचा कोणताही हेतु नाही. प्रत्येक जमातीत अपवाद असतात हे लेखकास मान्य आहे. धन्यवाद
मनस्कार मित्र हो , आमच्या मागील भागावरील....आय मीन.....मागील लेखावरील वाचकांचे व प्रतिसादकांचे धन्यवाद !!
आज आपण करणार आहोत काही आणखी ज'माती'
बुंगारी (या शब्दा बद्दल श्री. शंकर पाटील यांचे शतश: धन्यवाद !!)
भिडणे !! हा शब्द पुणेकरांस व इतर सामान्य जनतेस ;) ठावुक असेलच, शिवाय या शब्दाचा वेग-वेगळ्या अर्थाने वापर ही करता येतो. एक म्हणजे वाद घालताना भिडणे. दुसरा म्हणजे पोरीला भिडणे. (काय चवदार शब्द होता/आहे राव आणि काय चवदार शब्द होते ते. भिडणे, लटकणे, पटणे, झटाकणे, फिरविणे, चंद्र दाखविणे, गळ्यात पडणे, मंगळसुत्राचा खर्च लागणे,सोय होणे. आजकालच्या सोबर 'पॅच-अप, ब्रेक-अप, हुक-अप, हँग-आउट, नाइट-आउट, स्लेप्ट, अॅडमायर्ड,लिव्ह इन ' सारख्या भाषेनी, शंब्दाची तर शब्दांची , त्या मागच्या भावनांची पण गोची करुन टाकली आहे. असो..)
तिसरा वापर म्हणजे फुटबॉल खेळताना भिडणे, ज्याला काही पदकंदुकतज्ञ, रात्रभर टिव्हीचा मुका घेत, ई.पी. एल. नावाचा आंग्ल खेळप्रकार बघत, 'ड्रिबलिंग' असे संबोधित करतात आणि दिवस-रात्र ,अॅस्टन व्हिला, आर्सनल, चेल्सी किंवा मग दोग्ब्रा, बॅकहम वगैरै, जशी काय ही मैदाने/क्लब्ज त्या झगेवाल्या बाईनी याच्यांच नावे केली आहेत, अश्या रितीने नावे घेत असतात.(अरे त्यो कोण तो डोग्र्बा का कोण? त्याला म्हणावं, जरा आमच्या इथ ये आणि कोसळत्या पावसात, पायात काही न घालता, जरा चिखलात खेळुन दाखव म्हणुन, नाय स्साला विशीष्ट अवयवाला घाम येवुन, ढंढाळ्या लागल्या तर बघ म्हणाव. .....तरीही.. पुन्हा...असोच .)
चौथा आणि खळबळजनक वापर म्हणजे सार्वजनिक समारंभामध्ये, (रिक्षा-स्टँडचा वर्षोत्सव, लग्नाची वरात, गणपती मिरवणुक ई.) जिव्हा बाहेर काढत, आपले नृत्य-कौशल्य दाखविताना समोरच्या नाचणार्याला भिडणे. तसे सार्वजनिक ठिकाणच्या नृत्य-कौशल्यात अनेक प्रकार आहेत उदा. पंतगबाजी - म्हण़जे एकाने मांजा ओढल्यासारखा करायचा आणि दुसर्याने ढील दिल्यासारखे करायचे, नागिण डान्स - एकाने नागिणी सारखे लोळुन वगैरे घ्यायचे आणि दुसर्याने त्याची पुंगी टाईट होईपर्यंत पुंगी वाजवल्यासारखे करायचे.
तिसरा भुषणावह प्रकार म्हणजे थरथरी - या थरथरीची थेअरी सोप्पी असली तरी प्रॅक्टिकल अतिशय अवघड आहे. असे नाचणे म्हणजे एकमेकांसमोर आपली छाती आणुन पार छातीला छाती भिडेपर्यंत थरथरवणे. यात जो मागे हटला तो हरला. अधिक जानकारीके लिये- गोविंदा (याला अभिनेता म्हणावे का किंवा का म्हणावे ?) चा 'कुली नं. १' या चित्रपटातील ' मैं तो रस्ते से जा रहा था' या गाण्यातील अंतिम काही क्षण (स्वता च्या जबाबदारीवर !) निरखुन पहावेत.
अश्याच एखाद्या समारंभात एखादा कुठल्याश्या कोपर्यात,या चारी सुप्रसिध्द नृत्यकलेच अजब मिश्रण करीत, मद्य-धुंद अवस्थेत, सहसा पैजामा-कुर्ता वा मळवटलेला कुठलाही ड्रेस घालुन ,आपल्याच मस्तीत नाचणारा ईसम दिसला ( या माणसाला सहसा कोणीही भिडत नाही, आणि भिडलाच तर त्याची खैर नसते.) की समजुन जावे की हेच ते ' बुंगारी ' !! तरीही समजा अजुन पाहिले नसतील तर एखाद्या रस्तेच्या कडेला , जगाची,रणरणत्या उन्हाची, थंडीची, शेजारच्या गटाराची पर्वा न करता झोपी गेलेला पाहिलात का ? नाही , मग कोणीतरी रस्त्यावर/पार्टीत ' तुSमाSSSSझाSभाSSSS उSहायSSSSकाSSनाSय ? " असे डुलत डुलत विचारताना पाहिलाय ? किंवा मग एखाद्या पार्टीत अश्याच स्वरुपाचा प्रश्न दहा वेळा विचारुन एखाद्यानी भंडावुन सोडले आहे काय ? नाही !! मग मात्र नशीबवान आहात.
काही जुणी-जाणती मंडळी या जमातीला' देशबंधु' असे ही संबोधतात. देशी दारु/भट्ट्यांची दुकाने सकाळी सहा-सात वाजता उघडतात ते यांच्या कृपेमुळे . यांच्याच कृपेमुळे 'शेर-पावशेर' ची भाषा अजुन ही जिवंत आहे. मी काही उत्साही मंडळींना पहाटे सहा वाजता, डोक्याला गंध(अगदी घरातुन आंघोळ करून, पुजा ऊरकुन) लावुन दुकानात शिरताना पाहिले आहे. काहींचे एकदा दिवस मावळला की हात-पाय थरथर कापु लागतात, दिवसातुन एकदा तरी तो लाल किंवा हिरव्या रंगाचा 'मग' आणि चहा पिण्याचा ग्लास पाहिल्याशिवाय यां धन्य व्यक्तीमत्वांना चैन पडत नाही.
शनिवार ! हा या मंडळीकरिता पर्वणीचा दिवस असतो. संध्याकाळी एकदा का 'मजुरी'चे पैसै हातात पडले की उत्साही 'पाउले चालीती पंढरीची वाट, पण शनीवारी फक्त मात्रेचा फरक असतो. आजही माजी आमदार-नगरसेवकांची घरे यांच्या मुळे चालतात. संत्री, मोसंबी , नारंगी , पहिल्या धारेची, माल , माल काय बरोबर नाय ?, टांगा पलटी घोडे फरार, मस्त रहो मस्ती मैं अन आग लगे बस्ती मै, असे शब्द आणि शब्द-प्रयोग जिवंत आहेत ते यांच्या कृपेमुळे. गावकुसाबाहेर (जर पायात वहाणा नसतील तर) पायात काचा घुसतात ते या जमातीमुळे.रस्ता हा चालण्यासाठी नसुन खो-खो, आट्या-पाट्या खेळण्यासाठी आहे असे या जमातीचे ठाम मत आहे.
दारु हा संथ गतीने पिण्याचा प्रकार आहे, एक-एका घोटाचा आस्वाद घेत ती पिली पाहिजे, असले फालतुचे गैरसमज या जमातीत नसतात. मला चेन्नईला असताना 'टासमॅक' मध्ये भेटलेला बुंगारी तर कमालीचा होता. शुक्रवारची संध्याकाळ , मी आपला शांतपणे विजय मल्ल्याचा बँक-बॅलन्स(त्याच्या पांढर्या-फटक दाढीच्या वेगाने) वाढवित होतो. कानात हेडसेट, अरुण दाते मला 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' शिकवताहेत. त्याच सुमारास एक लुंगी-बनियान माझ्या समोर आलं. हातात द्वि-क्वार्टर्स्य-कुपी ,आत पांढरफटक द्रव्य,कुपी वर मोसबींच लालचुटुक चित्र.
चेहर्यावर येड्या बाभळीसारखी खुंट वाढलेली, डोकं आणि घमेलं यात कमालीच साम्य, त्याने माझ्याकडे पाहुन एका दिशेने इशारा केला. काय म्हणतोय ते समजुन घ्यायचा प्रश्नच नव्हता. इशारा पाण्याच्या अर्धवट बाटली कडे होता. एकतर ती बाटली माझी नव्हती आणि विशेष म्हणजे पाण्याची होती, मी नकार द्यायचा प्रश्नच नव्हता.मी नुसता होकारार्थी मान हलवायचा अवकाश , त्याने ती बाटली उचलली, कुपी उघडली, कुपीतले द्रव्य त्या बाटलीत ओतले, माझ्या डोळ्यांची उघड-झाप होईपर्यंत ती बाटली रिकामी झालेली होती. त्याने माझ्या चकण्याच्या प्लेटमधुन एक शेंगदाणा उचलला आणि गेला पण (हे 'गेला पण' त्या बाळाराम मार्केटच्या जाहिरातीत ' अय्या ! गेला पण ' च्या चालीवर.) म्हणजे, तो आला..त्याने पाहिले आणि....
असो पण या सर्वात मला चीड आणणार लक्षण म्हणजे घरकाम करणार्या मोलकरणी, मजुर स्रिया यांचे चेहरे सुजलेले दिसणे ..पुन्हा असो..
फिल्मी :
या जमातीबद्दल आम्हाला विषेश आपुलकी आहे. आपण छानपैंकी एखादं गाण/चित्रपट पहात असतो.चान-चान सीन चाललेला असतो. मध्येच कोणीतरी .." ए S, तुला माहीत आहे. (या) नायकाचे खरे नाव हे आहे आणि (हा )त्याचा पंचेचाळीसावा पिक्चर आहे, त्याला आधी (हे)नाव घ्यायचे होते , पण (हा) दिग्दर्शक म्हणाला की तु (हे) नाव घेऊ नकोस,(हे ) नाव घे, त्याची आधीची बायको, (ही)ने पण त्याला (हेच) नाव घ्यायला सांगीतले होते. या पिक्चरमध्ये त्याने जो रोल केलाय ना, असाच रोल त्याने (या) पिक्चरमध्ये केला होता, या चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे ना त्यानेच (या)नायकाला लॉन्च केले होते ,ढॅSण्ण ढॅSण्ण ढॅSण्ण ढॅSण्ण...समोरचा सीन संपतो, पण याची कॅसेट संपत नाही. याला म्हणतात फिल्मी.
ही मंडळी नायक नायकिणीला नावाने पुकारत नाहीत, गोविंदाला चीची, करिश्माला लोलो, करिनाला बेबो, अमिताभला बिग बी, अभिषेक ला ज्यु. बिग बी, अक्षयला अक्की, ऐश्वर्या ला अॅश, कटरिना ला कॅट, सलमानला सल्लु, शाहरुखला किंग खान, सुश्मिताला सुश , जणु काही ही त्यांची घरची मंडळी आहेत .आणि अश्या प्रकारे नाव घेताना, चेहर्यावर,असा भाव आणतात की ती जणु काही देव-देवतांची नावे आहेत. वर्तमानपत्रातील बॉलीवुडची गॉसिपिंग कॉलम्स चालतात ते या महानुभावांमुळे.'अरे पता है, करिना-शाहिदका ब्रेक-अप हो गया ' (आधी पॅच-अप कधी झाला ते सांग, स्साल मला या आधी ते , दोहोंची आडनावे कपुर असल्याने ते भाउ-बहीण वाटत असत.) असे सांगताना या जमातीच्या डोळ्यात विशेष चमक जाणवेल.
काही हौशी मंडळी , भारतीय तर भारतीय (यात सर्व भाषा आल्या, माग त्यातल घंटा काही कळल नाही तरी चालेल.)परभाषेतील चित्रपट पहातात(आणि आंजावर कुट कुट काथ्या कुटत असतात.), ' मला हा सीन फार आवडला, आणि मला हा सीन आवडला नाही . येथवर सर्व काही ठीक वाटत.पण त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करताना पाहिले की मला झीट येते . आमचे एक ('मेरे काबील दोस्त 'च्या चालीवर) महाविद्यालयीन मित्र ' प्यार किया तो डरना क्या' मधील 'अरबाज खानच्या ' भुमिकेने प्रंचड ईम्प्रेस झाले होते.( खरे तर त्या आडव्या-तिडव्या अरबाज समोर हे म्हणजे खली समोर आजचा देवानंद !) आणि त्याच्याच चालीवर 'अSय्य्य ! झाल का ?' अस विचारत सुटायचे, एक दिवस असेच आमच्या एका खवचट मित्राला असे विचारले त्यावर त्याने ' नाही,अजुन धुवायचे बाकी आहे '. ;) ..पुन्हा असो ...
या जमातीत शुक्रवार हा वाट पहाण्याचा दिवस असतो. ' अरे , फर्स्ट डे-फर्स्ट शो पाहिला '(काय मोट्टा तीर मारला). ' झुम' नावाचे टिव्ही चॅनेल हा या जमातीचा जीव की प्राण. चित्रपटाचा आधी येणारे ' मेकिंग ऑफ ..' देखील ही मंडळी टिव्ही ला डोळे लावुन बघतात. आमचे एक प्रिय मित्र(पुन्हा ' मेरे काबील दोस्त ' च्या चालीवर) 'मेकिंग ऑफ कभी खुशी कशी गम' बघता होते. त्यात यश जोहर आपल्या लेकराबद्दल कौतुकाने सांगत होते " उसने टाईटल कितना अच्छा दिया है." its all about loving your parents " . हे एकुन चित्रपट बघावयास गेले आणि जया भादुरी चा एक प्रसंग पाहुन 'अग ए रडके ' असे भर थियेटरात जोरात ओरडुन बाहेर पडले. पुन्हा असो ..
पुढील भागात : पुस्तकबाज आणि मी,मी,मी आणि मी
प्रतिक्रिया
4 Mar 2011 - 3:54 pm | आत्मशून्य
.
4 Mar 2011 - 4:16 pm | llपुण्याचे पेशवेll
तिसरा वापर म्हणजे फुटबॉल खेळताना भिडणे, ज्याला काही पदकंदुकतज्ञ, रात्रभर टिव्हीचा मुका घेत, ई.पी. एल. नावाचा आंग्ल खेळप्रकार बघत, 'ड्रिबलिंग' असे संबोधित करतात आणि दिवस-रात्र ,अॅस्टन व्हिला, आर्सनल, चेल्सी किंवा मग दोग्ब्रा, बॅकहम वगैरै, जशी काय ही मैदाने/क्लब्ज त्या झगेवाल्या बाईनी याच्यांच नावे केली आहेत, अश्या रितीने नावे घेत असतात.(अरे त्यो कोण तो डोग्र्बा का कोण? त्याला म्हणावं, जरा आमच्या इथ ये आणि कोसळत्या पावसात, पायात काही न घालता, जरा चिखलात खेळुन दाखव म्हणुन, नाय स्साला विशीष्ट अवयवाला घाम येवुन, ढंढाळ्या लागल्या तर बघ म्हणाव. .....तरीही.. पुन्हा...असोच .)
हे वाचून एका जालमित्राची आठवण झाली. :) छान.. असो लेख छानच आहे.
4 Mar 2011 - 4:22 pm | असुर
यागाग्गो!! भीड त्येजायला!!!! :D
खल्लास्स!!! संपूर्ण लेख खुसखुशीत, फक्त चकण्यातला एक दाणा खौट लागला, किंवा अगदीच सिंगल माल्ट व्हिस्कीमध्ये नारळाचं पाणी घातल्यासारखं वाटलं! पण त्यामागल्या भावनांशी सहमत!!
--असुर
4 Mar 2011 - 4:57 pm | sneharani
मस्त मजेशीर!
बराच मोठा ब्रेक घेऊ नका लेखनात!
:)
4 Mar 2011 - 5:21 pm | प्रसन्न केसकर
मेंढीपे मटका लगा. (मेंढीका मटका बैठा म्हणलास तरी हरकत नाही.)
एकदम कड्डक! धरण फुट्लं असेल बघ!
बुंगारी बरोबरच अजुन एक जमात असते, नाचपावली म्हणतात तिला. बुंगारी मस्त मौला असतो. शेवटी बुंगारीच तो. कधीही नाचायला तय्यार. असे दोन्-चार बुंगारी नाचायला लागले ना, की मग नाचपाऊलीची भीड मोडते. नाचपाऊलीच ती शेवटी. डान्स करायला येत नसते, पण हौस भारी असते आणि आपली लायकी ठाऊक असल्याने सुरुवात करायची पण भीती असते. दोन चार जण नाचायला लागले की मग हे पण आपली हौस भागवुन घेतात हात पाय वेडेवाकडे झटकवुन. त्यांच्या झटक्यांचा प्रसाद मिळण्याच्या भीतीने त्यांच्या आजुबाजुला कुणी फिरकत पण नाही. असले हे नाचपावली वेगवेगळ्या स्वरुपात सगळीकडे दिसतात आणि वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जरा त्यांच्यावर पण टाकायची होती ना तुझी पारखी नजर!
4 Mar 2011 - 5:58 pm | परिकथेतील राजकुमार
भिड रे बुंगार्या ;)
क ड क !
4 Mar 2011 - 6:02 pm | अवलिया
मस्त रे बुंगार्या !!!
कडक माल !! येवु दे अशीच पैल्या धारेची !!
4 Mar 2011 - 6:08 pm | वपाडाव
बुंगारी : आत्तापर्यंत फक्त चवथा अर्थ माहीत होता. व्यासंग वाढविल्याबद्दल धन्स.
फिल्मी : आम्चं क्यारॅक्टर थोडंफार जवळ जातंय. पण पकविणे जमत नाय.
असो. लेख आवडला.
पु. अ. वा. ब. आ.
4 Mar 2011 - 7:10 pm | सहज
वाचतोय, आधीच्या भागांचे दुवे जरुर देणे.
4 Mar 2011 - 7:34 pm | पैसा
खास सुहास इष्टायलीत लिहिलायस. आवडला. फक्त आश्वासन दिल्यानंतर किती दिवसानी लिहिलास रे?
5 Mar 2011 - 5:40 am | जाई अस्सल कोल्हापुरी
...मस्त...... तिसर्यांदा वाचतिये रे!
....wallaah!
(तस्मात ... आपण सातत्याने लिहिणेचे करावे..खंड न पाडावा...)
:)
5 Mar 2011 - 7:05 am | ५० फक्त
सुहास, एवढं चांगलं लिहितोस तर नेहमी का लिहित नाहीस ? तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
5 Mar 2011 - 9:34 am | मुलूखावेगळी
भारी १ नंबर
बुंगारी म्हन्जे बांगी असा पन अर्थ आहे ना?
5 Mar 2011 - 10:00 am | प्यारे१
मुलींनी लक्ष घालू नये असल्या गोष्टींमध्ये, मू.वे.कुठली.
आमच्याकडे असं एक फिल्मी आहे. 'किंग खान'च्या वाढदिवसाला स्वतःचे ५००-७०० रु. घालवून स्वतःच जेवून आलं.
कोई उसके बारे में कुछ बोले ना तो कसम से एखाद खून कर जाऊंगा म्हणणारं.
बुंगारी कधी कधी आम्हीही असतो. (न पिताच)
5 Mar 2011 - 11:46 am | हरिप्रिया_
:) सह्ही...
आधीच्या भागांचे दुवे देणे
5 Mar 2011 - 11:50 am | टारझन
कालंच वाचला होता .. मस्त लेखन ... आणि स्वाष्या स्टाईल चिमटे :)
आवडेश रे भो !!
5 Mar 2011 - 1:09 pm | प्रास
सुहास भाऊ, लय म्हणजे लय भारी लिवलयत बगा..... आता फार्फार येळ वाट बगाया लावू नका म्हंजे झालं.
आनि हो, ते मागल्या लिखानाचे दुवे बी द्येन्याचे करावे बर्का......
इन्तेजार कर्ररयेले हय अग्ले लेख का....
7 Mar 2011 - 8:23 am | स्पंदना
खुप दिवसांनी पण कडक!!
वर्णन तर अशी की जणु डोळ्यासमोर घडते आहे.
मस्त सुहास राव!
7 Mar 2011 - 8:36 am | शिल्पा ब
आवडेश!!
7 Mar 2011 - 9:09 am | प्रीत-मोहर
मस्त
वरच्या सर्वांशी सहमत!!!