क्रिमी मशरूम रीसोत्तो (risotto)

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
28 Feb 2011 - 12:50 pm

रीसोत्तो हा इटालियन भाताचा प्रकार आहे. हा भात अर्बोरिओ राईस वापरून करतात. भारतात आपल्याला अर्बोरिओ राईस बासमती च्या १० पट किमतीला मिळतो. म्हणून मी कधी हा राईस आणलेला नाही, कारण शेवटी तो तांदूळच! ह्या पाक्रु मधे मी घरात असलेला बासमती तांदूळ वापरला आहे. तुम्ही अर्बोरिओ तांदूळ पण वापरू शकता. बरं, रीसोत्तो ची खासियत काय? तांदूळाला आधी बटर, कांदा, हर्ब्स, भाज्या ह्याबरोबर परतून घेणे (आपण पूलावासाठी करतो तसेच) आणि मग त्यात एक एक डाव चिकन किंवा व्हेजिटेबल स्टोक घालणे आणि जरा सरबरीत भात शिजवणे. मी ह्या पाकृत मशरूम फ्लेवर आणण्यासाठी एक शोर्ट कट वापरला आहे. ते म्हणजे maggi ची क्रिमी मुश्रूम सूप पावडर. :) ह्या पाक्रुत खूप कमी बटर आणि चीज असल्याने हि एक चांगली डायेट रीसोत्तो रेसिपी आहे. शिवाय ह्यात मशरूम आणि मटार चे पौष्टिक गुण पण आहेत.

१ कप तांदूळ
४ कप पाणी (थोडं थोडं पाणी घालायचे असल्यामुळे, पाणी जरा जास्त लागते)
१ पाकीट maggi ची क्रिमी मुश्रूम सूप पावडर (दुसरी कुठली वापरली तरी चालेल)
१ छोटा पांढरा किंवा पातीचा कांदा (पात नाही)
१/२ कप मशरूम, चिरलेले (हवे असल्यास)
१/२ कप मटार
१ क्यूब चीज (५० ग)
१ छोटा चमचा बटर
१ चमचा हर्ब्स (हवे असल्यास)
१ चमचा तेल
२ पाकळ्या लसून, बारीक किसून
मीठ आणि मिरी चवीनुसार

कृती:

- एक नोन स्टिक भांड्यात बटर आणि तेल एकत्र गरम करून त्यात लसून, कांदा, मशरूम आणि मटार घालून थोडं मऊ होईपर्यंत परता. मग त्यात धुतलेला तांदूळ घालून तो जरा गुलाबी परता. आता ह्यात मीठ आणि मिरपूड घाला. आच कायम एकदम मंद ठेवा.
- दुसर्या एका भांड्यात सूप पावडर आणि पाणी नित मिसळा. आता हे मिश्रण त्या तांदुळात एक डाव घाला आणि निट मिक्स करा. सूप चे पाणी तांदुळात शोषले गेले कि मग अजून एक डाव पाणी घाला. असं एक एक डाव पाणी घालून तांदूळ शिजेपर्यंत करा. आता साधारण शिजलेला भात जरा ओलसर सरबरीत होईल असं सूप चे पाणी घाला. एक महत्वाची टीप म्हणजे, पाणी थोडं जास्त वाटलं तरी ते लवकरच शोषला जातं हे लक्षात ठेवून थोडं एक्स्ट्रा पाणी ठेवा. आता ह्या रीसोत्तो मधे किसलेले चीज घाला. हवे असल्यास थोडे वरून गार्निशिंग साठी वागला.
- क्रिमी मशरूम रीसोत्तो पेश करा!

प्रतिक्रिया

प्राजक्ता पवार's picture

28 Feb 2011 - 12:59 pm | प्राजक्ता पवार

पाकृ व फोटो दोन्ही छान .
सूप पावडर वापरण्याची आयडीयादेखील मस्तं.

वाह्..मस्तच अमिता. खूप दिवसांनी..

बादवे. कोणतीही सूप पावडर नको. मॅगीच.

इतर , उदा नॉर वगैरे बेकार असतात. (टेक्स्चर, टेस्ट सर्वच बाबतीत..)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

28 Feb 2011 - 1:32 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मस्त रेसीपियान्नो...
करावीच लागेल...

कच्ची कैरी's picture

28 Feb 2011 - 1:47 pm | कच्ची कैरी

मस्त अमिता !यात ब्रोकोली पण छान लागेल नाही ?

ब्रोकोली हा चबार चबार आवाज करत खाणार्‍या गाईला घालण्याच्या योग्यतेचा बेचव पदार्थ कशातही घातला तरी चव काय येणार बॉ?

असो हे माझे वैयक्तिक मत.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

28 Feb 2011 - 3:09 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

पण नंतर मी कशातही ब्रॉकोली घालताना थोडी शिजवून घेते.
म्हणजे जसं आपण गाजर, घेवडा वगैरे hard vegetables उकळत्या पाण्यात बोट्चेप्या होइपर्यंत शिजवतो तश्या.
म्हणजे ब्रॉकोलीचा रवंथ करावा लागत नाही. ती पदार्थात दिसते पण सुंदर आणि नीट शिजली असेल तर त्याचे texture मस्त लागतं तोंडात.
करुन पहा एकदा.
:)

गवि's picture

28 Feb 2011 - 3:17 pm | गवि

:) अजूनपर्यंत कच्च्या सॅलडच्या स्वरुपातच ब्रोकोली खाल्ल्याने तसे वाटत होते. आता असा प्रयोग करुन पाहतो. नाहीतरी गरज आहेच हिरव्या सलाडभाज्या खायची, तुन्दिलपणामुळे..

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

28 Feb 2011 - 8:45 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

तुंदील तणू...... बर्‍याच दिवसांनी ऐकला शब्द...!
हिहहह.

स्वाती२'s picture

28 Feb 2011 - 4:45 pm | स्वाती२

छान दिसतोय!

Mrunalini's picture

28 Feb 2011 - 4:48 pm | Mrunalini

मस्त आहे.. :)

विंजिनेर's picture

28 Feb 2011 - 6:58 pm | विंजिनेर

रिसोटो म्हंजे ते सूप्/ब्रॉथ पळी-पळीभर घालत आनी ढवळत बसायचं - लई कट्टाळवानं काम पघा...

सानिकास्वप्निल's picture

28 Feb 2011 - 7:00 pm | सानिकास्वप्निल

मस्त आहे
मला ईटालियन पाकृ खूप आवडतात...
रीसोत्तो पाकृ एकदम झकास दिसतेय..नक्की करुन पाहेन :)

प्राजु's picture

1 Mar 2011 - 1:27 am | प्राजु

करणारच.. मस्त दिसतेय! :)

अरे वा... नविनच पाकॄ वाचतोय ही. :)

खादाड अमिता's picture

1 Mar 2011 - 10:51 am | खादाड अमिता

जाई, सनिकास्वप्निल, प्राजु : नक्की करून बघा आणि मला कळवा कसा झाला ते!

@ विन्जीनेर: रीसोत्तो करताना जाड बुडाचे भांड घ्या, किंवा भांड्याखाली तवा ठेवा. मग थोडा भराभर ब्रोथ घातलं तरी चालतं आणि लवकर तयार होतं.

@ प्राजक्ता पवार, गवि, कच्ची कैरी, स्वाती२, मृणालिनी, मदनबाण : तुम्ही सगळे एवढं छान प्रोत्साहन देता म्हणूनच आणि नवीन नवीन पदार्थ करून बघायचा उत्साह येतो. धन्स!

@ प्राजक्ता पवार, गवि, कच्ची कैरी, स्वाती२, मृणालिनी, मदनबाण : तुम्ही सगळे एवढं छान प्रोत्साहन देता म्हणूनच आणि नवीन नवीन पदार्थ करून बघायचा उत्साह येतो. धन्स!

अच्छा , पण आपला आयडी पाहुन मला वाटलं की तुम्ही खादाड आहात म्हणुन नवे पदार्थ करण्याचा उत्साहं असावा. वरील लोकांमुळे ते केलेले पदार्थ इथे टाकण्याचा उत्साह येत असावा :) चु.भु.द्या.घ्या.
;)

बाकी फोटु पाहुन लाळ गळाली , टॉवेल पिळुन साफ करावे लागलेय अक्षरश: !

- कोदाड कवीता