नमस्कार मंडळी,
गेले काही दिवस एका विचित्र प्रश्न कम समस्येने आम्हाला भयंकर छळले आहे. ह्या विषयात आमचे ज्ञान जरा कमीच आहे, पण ह्यामुळे लफडा असा होतो की कुठे काय पॉलिटिकल करेक्ट मतप्रदर्शन करावे ह्यासंबंधी आमचा फार घोळ होऊ लागला व आम्हाला लोकांचे 'तुला चित्रपटातले काय कळते, मुर्ख आहेस, तु चित्रपट पाहुच नकोस' वगैरे टोमणे ऐकावे लागत आहेत.
आम्ही माठ आहोत व आम्हाला कशातलेच काही कळत नाही हे मान्य आहे, पण आता चारचौघात निदान चित्रपटांविषयी मतप्रदर्शन करताना आपली झाकली मुठ सव्वा लाखाची कशी असावी ह्यासंबंधी मिपाकरांकडुन मार्गदर्शन हवे आहे.
चित्रपट 'चांगला' असतो म्हणजे नक्की काय आणि चित्रपट 'वाईट, फालतु, भिकार, थर्डक्लास' असतो म्हणजे नक्की काय ह्यावर मला इथे साधकबाधक चर्चा करायची आहे. तसेच कुठल्या चित्रपटाला चांगले का म्हणावे किंवा त्या चित्रपटाला वाईट का ठरवावे ह्यासंबंधी काही सर्वसाधारण समज असतील तर त्याचीही चर्चा इथे व्हावी अशी विनंती.
गेले काही वर्ष मला समजणारा चित्रपट आणि मिडिया, मित्र, संबधित ह्यांना कळणारा चित्रपट व आम्ही दोघांनी केलेले त्यांची मुल्यांकन ह्यात जमिन-आस्मानाचा फरक पडत आहे, तर आपण आज त्यासाठी एक साधारण नियमावली तयार करु.
एकेक उदाहरणातुन आपण पुढे सरकत जाऊ.
१. बर्याच लोकांनी नाके मुरडलेला आणि 'अब्राम्हण्यम' ठरवलेला 'दबंग' हा चित्रपट वाईट कसा असु शकतो तेच मला कळत नाही. चित्रपट बनवताना त्यांनी डिफाईन केलेली कक्षा आणि तो बघायला जाताना माझ्या असणार्या काही 'किमान अपेक्षा'ह्यांचे समिकरण व्यवस्थित जुळत असेल आणि तो चित्रपट जर मला पुरेपुर आनंद देत असेल तर त्याचा 'फालतुपणा' मी कुठल्या खात्यावर मोजायचा ?
मनोरंजन ही किमान अपेक्षा ठेऊन जर मी दबंग पहात असेन आणि त्यात मी पुर्ण समाधानी असेन तर त्यामध्ये 'प्रकाश झा, सत्यजीत रे, (आजकाल ) आमीर खान, अमोल पालेकर ( ही मंडळी एका पंक्तीत बसवल्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या सतील तर क्षमस्व हो बाबांनो )' ह्यांच्या चित्रपटात असलेले तथाकथित 'मुल्य' घेऊन मी त्याची तुलना दबंगशी का करावी ?
भली त्यातली गाणी रेहमानच्या सुरेल गाण्यासारखी सफाईदार नसतील पण म्हणुन का ती फालतु गाणी होतात ?
दबंगमध्ये मख्ख चेहर्याचे अभिनेते, काही केल्या घंटा कळत नाही असा त्यांचा अभिनय व त्याचा अर्थ, जडबंबाळ संवाद, अगम्य कॅमेरा अँगल्स आणि प्रकाशयोजना वगैरे नाहीत म्हणुन त्याला 'फालतु' ठरवावे का ?
पण बहुतेकांच्या मते 'दबंग' हा तद्दन टुकार, फालतु सिनेमा आहे व त्याच्याशी आम्ही साफ 'असहमत' आहोत.
२. आजकालचा भरमसाट चर्चा झालेला 'उडान' ... मला नाही आवडला.
इनफॅक्ट मला बोअर आणि बर्यापैकी कंटाळवाणा वाटला. त्यातली जमली म्हणावी अशी पात्रनिवड आणि त्यांनी केलेला निखळ अभिनय सोडला तर त्या चित्रपटात काय आहे ते मला अजिबात समजले नाही. १० मिनिटाची स्टुरी उगाच २ तास आणि ७ मिनिटे लांबवली आहे, त्यासाठी अगदीच अनावश्यक, रटाळ, बाळबोध आणि बर्यापैकी पुनरावृत्ती होणारे सिन्स घुसडले आहेत. काही पात्रांची उगाच युसलेस एंन्ट्री आणि समावेश. शेवटचा एक दणका सीन सोडला आणि १-२ गाण्यातली काही कडवी सोडली तर ह्या चित्रपटाचा 'महानपणा' मी कोणत्या खात्यावर मांडायचा ?
अभिनय चांगला मान्य !
अहो पण नुस्ता अभिनय जर तुम्हाला २ तास एका ठिकाणी बसवुन ठेऊ शकत नसेल, स्टोरी आणि पटकथेचे एकमेकांशी जुळत नसेल, पात्रे एकमेकांशी अगम्य व्यवहार करत असतील, तेच तेच (रटाळ) सीन्स पुन्हापुन्हा येत असतील तर मी हा चित्रपट उगाच का 'आवडुन घ्यावा' ?
असो, पण पण बहुतेकांच्या मते 'उडान' हा अत्यंत सुंदर, सफाईदार, क्लासिक आणि उच्च निर्मीतिमुल्य असलेला सिनेमा आहे व त्याच्याशी आम्ही साफ 'असहमत' आहोत.
ही केवळ उदाहरणे झाली, पण असेच काहीसे सर्वच बाबतीत आढळते.
मग चांगल्या चित्रपटाची व्याख्या काय आणि एखादा चित्रपट वाईट आहे असे मत कोणत्या चाचणीनंतर बनवावे ?
१. केवळ चांगली ( पक्षी : फेमस, स्टारडम असलेली ) स्टारकास्ट, एखादा मोठ्ठा बॅनर, गाजलेला नामवंत संगीतकार, दिग्गज दिग्दर्शक वगैरेंनी बनलेला सिनेमा इन जनरल 'चांगलाच' असतो का ?
२. अचाट स्टोरीलाईन , अगम्य कॅमरा अँगल्स, रटाळ आणि अगम्य संवाद, साबणछाप अभिनेते व त्यांचा तसलाच अभिनय आणि सोबत 'समांतर सिनेमा'च्या नावाखाली उच्चभ्रु आणि मिडियाने ओढुनताणुन चालवलेला उदोउदो ह्यामुळे तो तद्दन टाकावु सिनेमा 'चांगला' कसा ठरतो ?
३. दे दणादण मारामारी, मस्तपैकी अॅक्शनदृष्ये, खुसखुषीत ( पण कमी साहित्यमुल्य असलेली टपोरी म्हणता येईल अशी ) डायलॉकबाजी, मस्त मस्त लोकेशन्स आणि डान्स वगैरे, त्या वेळेपुरती खुष करुन टाकणारी उडत्या चालीची गाणी ( क्वचित आयटम साँग ) आणि ह्यासोबत इतर प्रेक्षकांचा जल्लोश, हिरोच्या एंट्रीला पडणार्या कचकचीत शिट्ट्या, एखाद्या कमेंटनंतर प्रेक्षकांचे खळखळुन हसणे, गाण्याच्यावेळी आरोळ्या / शिट्ट्यांचा गदारोळ आदी बाबी मला मस्तपैकी मनोरंजन देत असतील तर तो चित्रपट 'फालतु' कसा होतो ?
४. 'गरम मसाला' सारख्या सिनेमात असलेला मस्त सावळागोंधळ, पळापळ, टायमिंगवाले डायलॉक्स, छान छान हिरॉईन्स,माफक कॉमेडी, १-२ गरमागरम आयटम साँग्स, काही फारिन लोकेशन्स आदी मला २ तास मस्त करमणुक देत असतील तर त्यांचा 'फालतुपणा' मी कोणत्या खात्यात मांडायचा ?
असो, अशी अनेक उदाहरणे देता येतील ...
माझा एकच प्रश्न आहे, एखादा चित्रपट चांगला का असतो किंवा तो वाईट का असतो व ते कसे किंवा कोणत्या चाचण्यांच्या आधारे ठरवावे ?
येऊद्यात तुमची मते ...
अवांतर :
आजकाल अत्यंत हेटाळणीच्या सुरात खिजवण्यासाठी "पिटातले प्रेक्षक" हा शब्दप्रयोग करणार्यांचेही मला आजकाल ज्याम आश्चर्य वाटते. बाय द वे, एकुण व्यवसायापैकी किमान ७०% व्यवसाय ह्याच पिटातल्या प्रेक्षकांकडुन होतो व बहुतेक सिनेमे त्यांच्यासाठीच निघतात असा माझा अंदाज आहे.
बाकी तथाकथित समांतर, उच्च अभिरुचीमुल्य असणारे, कलात्मक सिनेमांना किती प्रेक्षक असतात हे ज्यांचे त्यांना पहावे, कमी प्रेक्षक असण्याला मी कमीपणा मानत नाही पण जे हा चित्रपट पहात नाही किंवा ज्यांना असे चित्रपट कळत नाहीत असा तद्दन खोटा प्रचार चालवणार्या सिनेमातील उच्चभ्रुंचे मला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते. त्यांनी असे चित्रपट जरुर कौतुकाने आपापला कंपु जमवुन व शक्य तितके आंबट तोंड करुन पहावेत, आमचे अजिबात लुस्कान नाही, मात्र ह्या चित्रपटांचे कौतुक करताना बिचार्या त्या 'पिटातल्या प्रेक्षकां'ना हिणवुन त्यांच्या नसलेल्या कमीपणाच्या जोरावर स्वतःचा नसलेला महानपणा सिद्ध करणार्या पातक करु नकात एवढेच आमचे मत आहे.
दोन्हीहा गटांचे क्लास वेगळे आहेत, वेगळेच रहावेत ह्यात शहाणपण आहे. जो तो आपापल्या जागी ग्रेट आहे !
बाकी जसे चर्चा पुढे सरकेल तसे ...
धन्यवाद :)
प्रतिक्रिया
7 Feb 2011 - 12:43 pm | अवलिया
उत्तम काथ्याकुट. चर्चा वाचत आहे.
जमेल तशी भर घालेल...
अवांतर - बच गया स्साल्ला !!
7 Feb 2011 - 12:44 pm | पियुशा
"एखादा चित्रपट चांगला का असतो किंवा तो वाईट का असतो व ते कसे किंवा कोणत्या चाचण्यांच्या आधारे ठरवावे ?"
चित्रपट चान्गला कि वाइट आपानच थरवायचे
आपल्याला कितपत आवड्ला पैसे आनि खर्चि घातलेला वेळ फुल टू वसुल झाले ह्याचे सामाधान वाट्तेय का? हाच निकश ....
बाकि दुनिया को मारो गोलि वो क्या बोलति हे !
ज्याचि त्याचि चोइस अस्ते भो
काहिनि गुजारिश फ्लोप थरवला पन त्यातला विशय आनि अभिनयच्या अन्गाने जाल तर तो ह्रितिक आनि ऐशवर्या चा अप्रतिम अभिनय अस्लेला चित्रपट आहे !
7 Feb 2011 - 12:46 pm | लॉरी टांगटूंगकर
फारसा विचार न करता हेच टोमणे(आम्हाला लोकांचे 'तुला चित्रपटातले काय कळते, मुर्ख आहेस, तु चित्रपट पाहुच नकोस' वगैरे.) जास्त आक्रमकपणे समोरच्या लोकाना मारावेत.
एखादा चित्रपट चांगला का असतो किंवा तो वाईट का असतो व ते कसे किंवा कोणत्या चाचण्यांच्या आधारे ठरवावे ?
ते समोरच्यावर ठरवावे जर का ठिक्क जीन्स मधला असला तर मग त्याच्या समोर दाबंग ला चांगले म्हणून धोबी घाट(फ़क्त उदा. साठी घेतलय नाव) ला शिव्या द्याव्यात .जर का समोरचा आठवड्यातून ४ पेक्ष्ह जास्त वेळा टाय घालणारा असला तर मग कोणत्याहि बऱ्या शिनेमाला भारी(wenesday kinva friday जो कोणता होता तो) म्हणावे आणि पूर्वीसारखे शिनेमे येत नाहीत असे ६ वेळा म्हणावे .जर का समोरचा औडी वागीरे मधून फिरानारा असला तर मग जरा विकी पिडिया वागीरे वाचून कोणाला हि (मंजे सामान्यलोकांना )माहिती नसलेले सिनेमांची नावे शोधावीत ,
हे सगळे करण्या पेक्षा टोमणे जास्त आक्रमकपणे समोरच्या लोकाना मारावेत –हे सोपे
7 Feb 2011 - 12:51 pm | पक्या
चांगला चर्चाविषय .
>> आजकालचा भरमसाट चर्चा झालेला 'उडान' ... मला नाही आवडला.
+१ ,
मलाही अजिबात नाही आवडला.
7 Feb 2011 - 4:27 pm | स्वतन्त्र
मला देखील अज्जिबात आवडला नाही !!!
7 Feb 2011 - 12:56 pm | आत्मशून्य
माहीत नाही ते मिपावार मिळ्णार हे पाहून अंमळ आनंद झालाय.
एकदम खरं बोललात, वीशेषतः मराठी चीत्रपट स्रूष्टीच्या बाबतीत तर १००००००००००००००% खर. कलात्मक चीत्रपट(च) कूरवाळायची मराठी चीत्रपटस्रूष्टीला लागलेली कीड केव्हां मरणार देवच जाणे.
7 Feb 2011 - 1:18 pm | मुलूखावेगळी
चित्रपट चान्गला का वाइट हा शेवटी वैयक्तिक चॉइस आहे.
मुळात रीव्यु न वाचता टाकित जाउन सिनेमा बघु नका हा तुम्हला सल्ला.
मला शक्यतो चांगली कॉमेडी असलेले उदा- हेराफेरी, चान्गला सन्देश देनारा (तारे झमीन पर),
सत्याच्या जवळ जानारे (अ वेनसडे), हलका फुलका लो बजेट मूव्हीज सध्याचा लेटेस्ट ट्रेन्ड(फस गया रे ओबामा, दो दूनि चार, उडान, भेजा फ्राय ) असे मुव्हीज आवडतात/सुसह्य बघनेबल असतात
आनि तुम्हाला काल न आव्डलेला मुव्ही मला बघन्यासाठी रेकमेंड करन्यात आलाय.
मी जास्त करुन शक्यतो माझ्या भावाने सजेस्ट केलेलेच मुव्ही बघ्ते
कारन त्याचा चॉइस टू गूड आहे आनि आमची आवड मॅच होते ह्याबाबतीत तरी.
परवाच १२७ अवर्स बघितला रोमहर्षक आहे.
बाकि काही लोकाना टाकित शिनेमा पहिला कि आवडलाच म्ह्नुन समजा.
नाही उदा- मोहब्बते , ब्रेक के बाद पैसे घालवुन पाहिला न डोक फुटायची वेळ आलि.
ते जोहर्,चोप्रा वाले मला आवडत नाहीत.
उदा- रीटा, अल्लह के बन्दे फार लोकाना नाही आवडला. ओये लकि, देव डी तर डोक्यावरुन गेला
उच्च पन नस्तो
पन चलता है कॅटेगरीत येतात.
उद्द- वॉन्टेड, दबंग
१ टाइम घरी बसुन बघनेबल
7 Feb 2011 - 2:01 pm | छोटा डॉन
>>मुळात रीव्यु न वाचता टाकित जाउन सिनेमा बघु नका हा तुम्हला सल्ला.
साफ असहमत, रिव्ह्यु आणि सिनेमा आणि आपले मत ह्या ३ गोष्टींचा अजिबात संबंध नाही.
जनरली १-२ मिनिटांचे "ट्रेलर्स" पाहुन मी सिनेमा थेट्रात पहावा का नाही हा निर्णय घेत असतो, काही वेळा हेच ट्रेलर "सिनेमा नाहीच पाहिला तरी हरकत नाही" असा कौल देतात व तो बहुतांशी बरोबर असतो.
बाकी माझा इन जनरलच घरी ( टीव्ही, डिव्हिडी किंवा लॅपटॉप आदींवर ) चित्रपट बघण्यापेक्षा थेट्रात जाऊन पाहण्याकडे जास्त कल आहे, तिकडे मज्जा जास्त येते असे वाटते.
मात्र काही क्लासिक इंग्रजी सिनेमे हे घरातले सगळेजण झोपल्यावर साधारणता रात्री १ नंतर लाईट वगैरे बंद करुन, लॅपटॉपवर कानाला हेडफोन्सवगैरे लाऊन पुर्ण 'आयसोलेट' होऊन पाहण्यासारखे असतात असे मला वाटते, पब्लिक व्ह्युव्हिंग साफ नामंजुर.........
- छोटा डॉन
7 Feb 2011 - 2:15 pm | कानडाऊ योगेशु
ह्याबरोबरच लहानपणी चित्रपटाचे नाव आणि पोस्टर्स पाहुनही चित्रपट पाहायची इच्छा होत असे.
ऐंशीच्या दशकाच्या शेवटी शेवटी "क्रिकेटर" नावाचा चित्रपट आला होता.चित्रपटाचे नाव आणि पोस्टरवरची रवी शास्त्री,कपिलदेव इ. मंडळी पाहुन वडलांच्या मागे लागुन हट्ट करुन तो सिनेमा दाखवायला लावला होता.मी,माझे वडिल आणि माझा लहान भाऊ असे त्रिकुट चित्रपट पाहायला गेलो होतो.थिएटरवर सगळेच बाळगोपाळ.आणि चित्रपटातला पहीलाच सीन बलात्काराचा..अगागागा..चित्रपट एकदम भिकार..आणि रवी शास्त्री/कपिलदेवचा सहभाग केवळ काही सेंकदांपुरताच..
त्यानंतर पुढे वडिलांना कुठलाच चित्रपट दाखवायला नेण्यासाठी हट्ट केला नाही.
7 Feb 2011 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त रे डान्या, चांगल्या चर्चेला हात घातला आहेस.
ह्या प्रश्नाला उत्तर म्हणुन, मला आजवर सगळ्यात जास्ती पटलेले उत्तर आमचे मित्र मृत्युंजय ह्यांनी माझ्या 'दबंग' ह्या चित्रपटाच्या परिक्षणावरच दिलेले आहे. तेच उत्तर +१ म्हणत इथे देत आहे.
मृत्युंजय म्हणतो :-
7 Feb 2011 - 1:33 pm | टारझन
तंतोतंत असेच म्हणतो . :)
डाणबा ने पेनावरची धुळ झटकली :) नाही तर तिडीक जायलाच लागली होती त्याची :)
7 Feb 2011 - 1:32 pm | स्वाती दिनेश
चर्चेचा विषय चांगला आहे डान्या, प्रतिसाद वाचते आहेच, त्याचबरोबर कोणते चित्रपट आवडतात याचा विचारही करत आहे, नंतर भर घालेन..
(अवलियांनी जे 'अवांतर' लिहिले आहे तेच लेख वाचताना माझ्याही मनात आले,;) किती मोठ्या गॅपने लिहिले आहेस डान्या..)
स्वाती
7 Feb 2011 - 5:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वातीताई, 'लागा चुनरी मे दाग'चं काय झालं गं पुढे?
(खाल्ल्या केकला न जागणारी)
7 Feb 2011 - 1:32 pm | शेखर काळे
माझ्या मते चित्रपटाची गोष्ट पुरेशी उत्कंठावर्धक असेल व ती अडीच-तीन तासांत आमच्यापर्यंत नीट (डोक्याला त्रास न होता) पोचत असेल, तर त्या चित्रपटाला चांगले समजावे.
मी दबन्ग बद्दल सहमत आहे. बाकी जे असेल ते असो, आम्हाला २-३तास त्या चित्रपटाने आनंद दिला - पैसे वसूल.
या यादीत गोल्माल-३, नॉक आउट, नो प्रॉब्लेम।. .. हे ही चित्रपट नमूद करू इछितो.
7 Feb 2011 - 1:36 pm | कानडाऊ योगेशु
चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जाऊन बरेच दिवस झाले.
घरबसल्या फुकटात जितके चित्रपट पाहता येतील तितके पाहायचा प्रयत्न करतो. ह्याचा फायदा असा होतो कि चित्रपटातला जरूरीपुरताच प्रसंग/गाणी पाहीली जातात आणि इतर वेळेला दुसरीकडे तोंड खुपसता येते.
त्यामुळे चांगला/वाईटचे निकष माझ्या दृष्टीने चित्रपट गृहात चित्रपट बघत असताना असणार्या निकषांपेक्षा अगदीच वेगळेच आहेत.
-माय नेम इज खान आणि रावण अगदी टीव्हीवरही पाहवले नाहीत.
(हेच चित्रपट पाहायला चित्रपटगृहात गेलो असतो तर केवळ लोकानुनयामुळे (वाचा शुचितैंच कन्फर्मिटी धागा) मारूतीची बेंबी किती गार म्हणत स्तुति करत बाहेर पडलो असतो.)
- काईट्सही तसाच.
- डबंग फक्त मारामारी आणि गाणी ह्यासाठी पाहीला.बाकीचा चित्रपट फास्ट फॉरवर्ड.१५-२० मिनिटांत पूर्ण चित्रपटचा फडशा पाडला.
- फक्त ३ इडियट्स मात्र पूर्ण पाहीला.ते ही दोनदा आणि तो ही टिव्हीवर.
लहानपणी जो चित्रपट पाहत असे तो चांगलाच वाटायचा. कॉलेजमध्ये असताना /नंतर नोकरीला लागल्यावर चार मित्र एकत्र आले कि एखादा चित्रपट पाहणे हा हमखास आवडीचा एक टाईमपास असे.
आज चित्रपट पाहणे हा प्रकार अगदीच नाईलाज झाला म्हणुन..ह्या सदरात टाकला आहे.
7 Feb 2011 - 2:58 pm | सहज
आरागॉर्न यांचा एक लेख आठवला.
7 Feb 2011 - 3:47 pm | सारा आलम
मुळात चित्रपट केवल चांगला किंवा वाईट या दोनच कॅटॅगरीत अजिबात मोडत नाही. चित्रपट आपल्याला आवडलेला आहे किंवा नाही हे सगळयात जास्त महत्वाचे आणि चित्रपट आवडण्यासारखा आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी किमान तो एकदा तरी बघणे, तेही स्वतः , फार गरजेचे आहे. तेव्हा आपल्याला आवडला की आवडला आणि आपल्याला नाही आवडला कि नाही आवडला हेच फक्त खरं. आणि बाकीच्या लोकांचे म्हणाल तर हाच अनुभव मला स्वतःलाही आलेला असल्याने मी या बाबतीत एकच गोष्ट करते ते म्हणजे समोरच्याच्या बोलण्याला सहमती दर्शवणे किंवा असहमती दर्शवत स्पष्टीकरण देणे दोन्हीही गोष्टी टाळते त्यामुळे आपली मते आपल्याजवळ आणि आपला आनंदही. काय ?
7 Feb 2011 - 4:38 pm | विनायक प्रभू
आपण तर बॉ पिटातले प्रेक्षक
7 Feb 2011 - 6:16 pm | चिंतातुर जंतू
डान्राव आम्ही तुमच्याशी या मुद्द्याबाबतीत १००% सहमत आहोत. आम्ही २५ रुपयांचं तिकीट काढून पिटात बसून दबन्ग्ग खो खो हसत येन्जॉय केला. बर्याच दिवसांत असा पिच्चर पाहिला नव्हता म्हणून चार मित्रांना 'हायली रेकमेन्डेड' म्हणून तो पाहायला 'पिटा'ळलं आणि अशा रीतीनं थोडं समाजकार्य सुद्धा केलं.
अजिबात होत नाही. असा चित्रपट 'टाईमपास' असतो. आणि टाईमपासची मनुष्याला नितांत गरज असते.
आमच्या मते पिटातले प्रेक्षक आदरणीय असतात. त्यामुळे त्यांची हेटाळणी आमच्या हस्ते झाली असे वाटले असल्यास क्षमस्व!
अवांतरः आता काहींच्या मते हाही एक ' विचारजंतीपणा' असू शकतो पण आम्हाला त्याची पर्वा नाही. दबन्ग्ग ग्रेट आहे.
7 Feb 2011 - 6:52 pm | छोटा डॉन
>>त्यामुळे त्यांची हेटाळणी आमच्या हस्ते झाली असे वाटले असल्यास क्षमस्व!
छे छे छे, अंमळ गैरसमज होतो आहे मालक.
असा आरोप आम्ही अजिबात करत नाही, तुमच्यावर तर नाहीच नाही, पण 'पिटातल्या प्रेक्षक' ह्या क्लासला जे इन जनरल क्रिटिसाईझ केले जाते त्यावर आम्ही लिहले.
मनात अजिबात किन्तु नसावा, तुमच्यावर टिका करण्याएवढा आमचा अभ्यास नाही ( आणि अभ्यास झाल्यावरही आम्ही टिका करुच असे अजिबात नाही ;) )
बाकी ह्यावर तुमच्याकडुन अजुन एक दणदणीत प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
मी तुर्तास गडबडीत आहे, जंतुसाहेबांचा गैरसमज मिटावा म्हनुन ही धावपळीतली प्रतिक्रिया, बाकी सविस्तर खरडेनच अजुन :)
- छोटा डॉन
7 Feb 2011 - 7:05 pm | रेवती
दबंगबद्दल बरीच सहमत.
मी हा सिनेमा एवढ्या १० १२ दिवसात पाहिला.
"पाहू नकोस ग बै" असं प्रत्येकानं १७६० वेळा म्हणून झालं.
शेवटी धीर गोळा करून पाहिला. अपेक्षा शून्य ठेवली.
त्यामुळे बरा वाटला.;) सगळी गाणी फास्ट फॉरवर्ड केली म्हणून लवकर संपला.
बाकी लेख आवडला डॉनसाहेब.
7 Feb 2011 - 7:57 pm | चिगो
चांगला चित्रपट कुठला? जो तुम्हाला पहायला आवडतो तो.. दुसर्यानी टुकार म्हणला म्हणून आपणही पाहु नये असं काय नसतं.. मला काही फ्लॉप झालेले (उदा. अकेले हम अकेले तूम, १९४२ अ लव स्टोरी वगैरे) बरेच आवडले. "दिदुलेजा" अज्याबात न आवडलेला.. रजनीकांतचे दे मार पिच्चरही लै आवडतात.
आपल्याला आवडला/आवडली नाही, तर कुठल्याही "मुल्यवान" गोष्टीची किंमत शुन्य.. लोकांना काय आवडतं आणि काय वाटतं, ह्याचा विचार करत जगायला टैम नाही राव...
7 Feb 2011 - 8:25 pm | jaydip.kulkarni
एखाद्या चित्रपटाला चांगला किंवा वाईट म्हणणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे , पण जी मूळ चित्रपट मूल्य आहेत ती जपणारे सिनेमे हे बहुतेक चांगले म्हटले जातात . चर्चेतला विषय , सामाजिक आशय , विनोद , उत्तम अभिनय कौशल्य , संगीत हे सर्व वापरून विषयाची उत्तम मांडणी केलेले चित्रपट बहुतेक करून चालतात ..
तसं पाहिलं तर रामसे बंधूंचे सिनेमे पण काही लोकांना आवडतात आणि त्या काळी चालले होते म्हणतात , पण दर्जा चा विचार केल्यास हे चित्रपट खूप खालच्या दर्जाचे आहेत ..
आज काळ मी तर डिरेक्टर बघूनच चित्रपट बघायला जातो , फसण्याची शक्यता कमी असते
काही हटके सिनेमे म्हणजे अ वेन्सडे , ओय लकी लकी ओय , खोसला का घोसला , किंवा आत्ताचा फस गये ओबामा ....... असे चित्रपट बघायला आवडतात ....
मराठी मध्ये पण खूप चांगले सिनेमे येतायत ...पन हे खर आहे कि प्रचंड गंभीर सिनेमे बनवण्याची विचित्र हौस आपल्या कलाकारांना आहे ... कधी अगदी विनोदी तर कधी गंभीर असा काहीसा प्रकार पूर्वी होता ....पण आता वेगळी मांडणी असलेले चित्रपट येत आहेत ..... तरी हे प्रमाण फार जास्त नाही ....
इथे बंगळूर मध्ये मला हिंदी चित्रपटांचे साधे पोस्टर सुद्धा दिसत नाहीत , फार कमी लागतात सगळे कानडी नाहीतर तेलगु .....असं महाराष्ट्रात कधी होणार ?
जाऊ दे विषयांतर नको .................................
" तीन तास अंधारात बसून कंटाळा आणत नाही तो चित्रपट चांगला "...... मग भले तो महेश भट चा असो व महेश कोठारे चा , ... करीना असो व कतरिना काहीही फरक पडत नाही ...
7 Feb 2011 - 9:59 pm | प्राजु
गोलमाल ३ सारखा सिनेमा मी पुन्हा पाहू शकेन. मला तो आवडला होता. उडान.. नाही आवडला हे खरंच आहे.
तेच धोबीघाट बद्दल. चित्रपटाची कथा मूल्ये असतील सुद्धा.. किंवा माझ्याकडे तो दृष्टीकोन नसेल, पण धोबी घाट पुन्हा एकदा बघावा अस नाहीच वाटलं. आणि कोणाला जरूर बघा असं सांगावं असंही नाही वाटलं.
शेवटी तुम्हाला आनंद कोणत्या गोष्टीत मिळतो हे महत्वाचं. दिवसभराच्या कामातून एखादा तास करमणूक करायची म्हणून चित्रपट पहायचा असेल तर मी हलका फुलकाच चित्रपट बघणे पसंत करेन.
मग त्या लिस्ट मध्ये हेराफेरी, हंगामा, आलू चाट, गोलमाल २/३ असे चित्रपट येतील.
7 Feb 2011 - 11:27 pm | धनंजय
सध्या मुद्देसूद चर्चा करायला वेळ नाही. नरहर कुरुंदकरांची एक टिप्पणी माझ्या शब्दात येथे देतो आहे. चर्चाप्रस्तावक विचारतात :
कुरुंदकरांचे असे म्हणणे आहे (आणि अन्य कित्येक लोकांचे असेच म्हणणे आहे, त्यांत प्राध्यपक अशोक केळकरही)... सौंदर्याची किंवा कलात्मकतेची जी तत्त्वचर्चा असते, त्यातून "चांगले-वाईट ठरवायचे निकष" सांगितले जात नाहीत. कला भावली की नाही,याबद्दल आस्वादक आधीच निष्कर्षाप्रत पोचलेला असतो. मात्र "आपल्याला ही कलाकृती कशी काय भावली" याबद्दल कुतूहलही असते, आणि एकमेकांना सांगायची इच्छाही असते. ही सौंदर्यचर्चा (किंवा केळकरांच्या परिभाषेत "आस्वादमीमांसा")
- - -
दोन आस्वादकांत कलाकृतीबद्दल "मला आवडली" विरुद्ध "मला नावडली" असा मतभेद असतो, तेव्हा सुद्धा चर्चा होते. मग "माझ्या नजरेतून अमुक तपशील मला छान वाटला - तूसुद्धा त्या दृष्टीने बघ, तुलाही कलाकृती आवडेल" असे एक म्हणतो, तर "माझ्या नजरेतून अमुक तपशील रसभंग करणारा वाटला - तूसुद्धा त्या दृष्टीने बघ, तुलाही कलाकृती नावडेल", अशा प्रकारची चर्चा होते.
यातील आवडलेले किंवा नावडलेले तपशील "निकष" नसतात. कलाकृतीचे वेगवेगळे पैलू मिळून एकसंध अशी ती आवडते-नावडते, त्यांच्यापैकी "हासुद्धा पैलू बघ!" असे आपण एकमेकांना सांगत असतो.
उदाहरणार्थ "हृद्य विनोदाला कारुण्याची झालर असते" असे आपण म्हणतो. पण हा निकष नसतो. कुठल्याच्या कंटाळवाण्या पाणचट विनोदात करुण झालर उसनवारी ठिगळवली म्हणून तो विनोद चुटकीसरशी हृद्य होत नाही. म्हणजे "कारुण्याची झालर" हा निकष नाही. पण निकष नसला, तरी एकमेकांना सांगण्यासारखे वर्णन आहे ना?
मिसळपावावर आपणा सर्वांना आवडणार्या पु. ल. देशपांडे यांच्या बहुतेक व्यक्तिचित्रणांत विनोदाबरोबर काहीतरी करुण असते. (उदा : मनमुराद गमतीदार शिव्या देणार्या रावसाहेबांच्या मांडीवर नातू खेळू नये ; न-पेलणारी भांगेची गोळी लावून हास्यास्पद झिंगणार्या पात्रांच्या विनोदी प्रसंगातही न-पेलणार्या आध्यात्मिक गोळ्यांनी ज्या लोकांची ससेहोलपट होते त्यांच्याबद्दल खरीखुरी करुणा व्यक्त होणे - तुझे आहे तुजपाशी). "विनोदात करुणा" हा निकष नसला, तरी "या उदाहरणांत विनोदातले कारुण्य फार भावले" हे म्हणणे काय खोटे आहे? नव्हे, खरे आहे.
बाकी चर्चाप्रस्तावाचा शेवटचा परिच्छेद बघता, येथील हेतू "एकमेकांना हिणवणारे कंपूबाज" या विषयाबद्दल हलकीफुलकी आणि गंमतशीर चर्चा करणे असू शकते. तो चर्चेचा हेतू असल्यास माझा हा प्रतिसाद अनाठायी आणि विरस करणारा असू शकेल. त्या मुद्द्याबद्दल माझे मत असे :
लोकांना हिणवू नये, आणि लोकांनी सदैव कोणीतरी आपल्याला हिणवते आहे असे समजून भांडणे करू नयेत... तारतम्य=>... एकमेकांची चेष्टा असलेले (या चर्चेसारखे मजेशीर) टोलेबाजीचे वादविवाद जरूर करावेत. कुस्करी व्हायची सीमा ओलांडली नाही, म्हणजे छानच.
8 Feb 2011 - 4:11 am | Nile
सहमत आहे इतकेच म्हणतो.
(त्याशिवाय, 'जे आवडे सर्वांना', ते अगदीच सामान्य असते असे बरेचदा जाणवते, अर्थात थोडे सन्माननीय अपवाद आहेत असेही दिसते)
8 Feb 2011 - 12:02 am | चन्द्रशेखर सातव
कुठेतरी वाचले होते कि आपल्या इथे चित्रपट बघणाऱ्या सामान्य (Masses) प्रेक्षकाचे सरासरी बौद्धिक वय १२ वर्षे आहे.१२ वर्षे वयाची व्यक्ती ज्या गोष्टींनी दुखी वा उत्साहित होते तितपतच समज आपल्याकडे आहे.आता कोण कोणत्या वर्गात मोडतो हे ज्याचे त्याने ठरवायचे.
8 Feb 2011 - 12:29 am | प्रियाली
एक गृहितक घेऊ. ते खरे असायलाच हवे असे नाही पण तरीही -
धोबीघाटला उच्च मानणारे दबंगला कमी मानत असतात.
दबंगला उच्च मानणारे "हमार प्यारी भौजी"ला कमी मानत असतात आणि
"हमार प्यारी भौजी"ला उच्च मानणारे आणखी कशाला तरी कमी मानत असतात.
आपल्यापेक्षा कमी कुणीतरी आहे हे मनाला आनंद देते आणि आपल्यापेक्षा वरचढ कुणीतरी आहे हे अहं दुखावते. चित्रपट केवळ निमित्त आहेत. असो.
8 Feb 2011 - 1:23 pm | आत्मशून्य
मी स्वतः हेच नीक्षून सांगेन की दबंग एकदम वाइट, बकवास चीत्रपट होता, अजूनही आहे.
पण त्याने माझे मनोरंजन केले नाही असे मी म्हणूच शकत नाही. म्हणूनच तो मी पून्हा पून्हा बघेन(कंटाळा येत नाही तो पर्यंत).
हाच नीयम धोबी घाट, रंगदे बसंती, शोले, ट्रॉय, कसीनो रोयाल, काइट्स अथवा एखाद्या बी अथवा सी ग्रेड चीत्रपट बघताना आपोआप लागू होते. चांगला अथवा वाईट या मूद्यावर चीत्रपटाचे करमणूक मूल्यांकन (entertainment value) ठरत नसल्याने अवलंबून नसल्याने, चांगला चित्रपट वाईट चित्रपट या चर्चेतून काय नीश्पन्न करायचे आहे याबाबत मी ठार अंधारात आहे. हा आता कोणी करमणूक करणारे व न करणारे चीत्रपट असा वीशय काढला तर मग चर्चा बरीच रंजक, माहीतीपूर्ण, अभ्यासात्मक, उद्भोदक्,रसाळ, कल्पनांचे धूमारे फोडणारी, वास्तवाकडे न्हेणारी, सातवे आकाश दाखवणारी तसेच मौल्यवान ठरु शकेल असा एक कयास आहे. बाकी जाणकार प्रकाश फेकतातच.
8 Feb 2011 - 6:45 am | निमिष ध.
कुठलाही चित्रपट चांगला की वाईट हे मी तरी एका गोष्टी वरून ठरवतो - तो चित्रपट बघताना कुठेही दुसरा कुठला विचार आला किवा जांभई आली म्हणजे आपले लक्ष पडद्याकडून दुसरीकडे गेले तर तो चित्रपट वाईट. कारण शेवटी चित्रपट हा काही फक्त दिग्दर्शक या एका माणसासाठी नसतो - तो असतो प्रेक्षकांसाठी. मग तो चित्रपट कितीही गल्लाभरू असो किवा कितीही गंभीर असो - जर का तुम्हाला शेवट पर्यंत खिळवून ठेवू शकला तर चांगला !
8 Feb 2011 - 8:17 am | पंगा
याबद्दलचे मतप्रदर्शन पोलिटिकली करेक्ट असण्याची मुळात गरज काय? प्रत्येकाची आवड निराळी असू शकते. आणि नाही पटले कोणाला, फार फार तर काय मूर्ख म्हणतील. आपण त्यांना उलट मूर्ख म्हणून मोकळे व्हायचे. शेवटी मूर्खपणासुद्धा लाइज़ इन द आय ऑफ द बिहोल्डर, नाही का?
आपला तर अनुभव आहे. एक तर आपण पिच्चर फारसे पाहत नाही. त्यात पाहिलाच एखादा चुकून, तर "समीक्षकां"चे आणि आपले मत नेमके उलटे पडते. दोनदा अनुभव घेतलाय. (बहुतेक इथेच) 'जोधा अकबर'चे 'अत्यंत भिकार' म्हणून परीक्षण वाचले होते. (खरे तर वरवर चाळले होते. चित्रपट परीक्षणे वगैरे तपशिलात जाऊन वाचण्याचे कष्ट सहसा घेत नाही.) पुढे कधीतरी तो पिच्चर पाहण्याचा योग आला. हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्यासारख्या (माझ्या लेखी) प्रातःतिरस्करणीय नट-(आणि नटी-)केसेस त्यात असूनसुद्धा आपल्याला बुवा पिच्चर आवडला. (एरवी ऐश्वर्या राय - खास करून 'हम दिल दे चुके सनम' पाहिल्यापासून - आपल्याला बकवास वाटते - एक कानफटात ठेवून देण्याची इच्छा होते - हे जाहीरपणे सांगायला आपण घाबरत नाही. मग कोणीही काहीही म्हणो.) तीच गत 'थ्री ईडियट्स'ची. पुन्हा (बहुधा त्याच समीक्षकाचे) समीक्षण वाचले. 'कैच्या कै पिच्चर' म्हणून. तोपण जाम आवडला. आता आपली टेस्ट अशी त्याला काय करणार?
आता आपण ठरवलेय. पिच्चरचे परीक्षण वाचायचे. 'बेक्कार आहे' म्हणून म्हटलेले असले, की बेधडक पाहायचा. 'चांगला आहे' (असे सहसा समीक्षणात लिहिण्याची फारशी पद्धत नसावी बहुधा!) म्हटले असले की मुळीच वाटेला जायचे नाही.
अर्थात हे समीक्षकासमीक्षकावर पण अवलंबून असावे म्हणा. म्हणजे, उदाहरणच घ्यायचे झाले, तर हे परीक्षण वाचून कदाचित हा पिच्चर मी पाहीनसुद्धा. 'पाहण्यालायक आहे' असे परीक्षणात म्हटलेले असूनही. आवडेलच असे सांगता येत नाही, आवडेल की आवडणार नाही हे पिच्चर पाहिल्यावरच कळेल, पण हे परीक्षण वाचून संधी मिळाली तर पाहण्याचा निदान प्रयत्न तरी करेन. कारण हे परीक्षण वाचून कुठेतरी त्यातला प्रामाणिकपणा जाणवतो. (निदान मला तरी.) हा काही वाचकाला 'आपणच कसे शहाणे' हे दाखवण्याचा प्रयत्न नाही, जे काही आवडले ते आपली अशी टेस्ट आहे म्हणून आवडले, दुसर्याला तसे वाटलेच पाहिजे असे नाही, असा कुठेतरी मोकळेपणा आहे, हे लक्षात येते. त्यामुळे अशा परीक्षणात "पाहण्यालायक आहे" म्हटलेले असताना पाहण्याचा प्रयत्न तरी करावा असे वाटून जाते. पाहिल्यानंतर पिच्चर आवडला, तर उत्तम. नाही आवडला, तरी हरकत नाही. ज्याचीत्याची आवड. उलटपक्षी, याच परीक्षणात "पिच्चर बेक्कार आहे" असे म्हटले असते, तर पिच्चर पाहिला नसताच, असे नाही, पण निदान "हा का बरे बेक्कार म्हणत असेल" हे तरी समजून घ्यायचा प्रयत्न करावासा वाटला असता. पटले असतेच असे नाही (आणि नसते पटले तर पिच्चर पुढेमागे तरीही कधी जमला तर पाहिला असताच - किंवा नसताही पाहिला), पण निदान एक इनपुट म्हणून कुठेतरी नोंद तरी घेतली असती. पण अनेक परीक्षणांबद्दल - आणि समीक्षकांबद्दल - असे नाही म्हणावेसे वाटत, हेही खरे.
8 Feb 2011 - 10:17 am | छोटा डॉन
ओके, मी माझे वाक्य थोडेसे सुधारुन घेतो, इथे मला 'पॉलिटिकल करेक्ट' मत द्यायचा आग्रह नसुन मी जे माझे मत आग्रहाने मांडतो आहे तेच अधिक सुस्पष्ट आणि मुद्देसुदपणे समोरच्यापर्यंत पोहचवायचे आहे.
एकाच चित्रपटाबद्दल 'अ' आणि 'ब' ह्यांची मते भिन्न किंवा अगदी टोकाची असु शकतात हे जरी मान्य असले तरी 'अ' ला समजा एखादी गोष्ट आवडत नसेल आणि त्याची तो व्यवस्थित कारणमिमांसा करु शकत असेल तर ते सर्व 'ब' च्या लेखी फालतु असते व तो 'अ ला अजिबात चित्रपट कळत नाही' ह्या म्हणण्यावर ठाम असतो.
एखाद्या परिक्षणाचा, मित्राने किंवा इतर कुणी त्रयस्थाने दिलेल्या मताचा आणि त्यावरुन मी एखाद्या चित्रपटाची किंमत ठरवण्याचा प्रश्नच नाही, माझी कक्षा मी स्वतःपुरती आखुन घेतो व त्यात कक्षेत राहुन मी चित्रपट पाहतो, (जमलेच तर) एंजॉय करतो आणि त्यानंतर त्याबद्दल भले-बुरे मत बनवुन ते आग्रहाने मांडतो, बहुतेकजणांना पटणे-न पटणे हे सर्वथा त्या त्या चित्रपटावर किंवा त्या चित्रपटाशी संबंधित अन्य बाबींवर अवलंबुन असते.
असो, हा विषय संपुर्ण वेगळा आहे.
माझा ह्या काथ्याकुटामागचा मुख्य असा आहे की एखादी कलाकृती ( इथे चित्रपट ) 'उत्तम ( आणि क्वचित श्रेष्ठ)' असण्यासाठी सर्वसाधारण निकष काय असावेत ?
इथे मी जाणुनबुजुन 'सर्वसाधारण' हा शब्द वापरत असल्याने माझ्या प्रश्नाची व्याप्ती आपोआप स्पष्ट होते आहे. इथे एखाद्याला आवडणे आणि दुसर्याला न आवडणे ह्या बाबी अध्याहृत आहेत, पण आपण चर्चा करतो आहे ती 'सर्वसाधारण' निकषांची.
इथे असलेल्या 'धनंजय' यांच्या प्रतिसादात त्यांनी शेवटच्या परिच्छेदात केलेले भाष्य ह्यावर मी इथेच उत्तर देतो.
इथे कुठल्या एखाद्या ठराविक कंपुला टार्गेट करण्याच्या उद्देशाने चर्चा सुरु नाही, माझा तसा हेतु नाही आणि मला त्या प्रकारात रुची नाही. मात्र एखाद्याच्या एखाद्या गोष्टीसंदर्भात 'आकलनक्षमते'वरुन त्याचा "शहाणपणा" ठरवणे व त्या अनुषंगाने स्वतःची पाठ थोपटुन घेणे व समोरच्याला हीन अभिरुचीचे ठरवणे ह्या बाबी सर्वच कलाक्षेत्रात अगदी पावलोपावली दिसतात. मला त्यांना हेच सांगायचे होते ही दोघेही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, त्यात कमी-जास्त होऊ शकत नाही.
( म्हणजे माझ्या मते इथे 'उडान / धोबी-घाट' एखाद्याच्या नजरेत श्रेष्ठ असतील तसेच दुसर्याला 'दबंग / रोबोट' सुद्धा तितकेच उच्च वाटु शकत असतील. मात्र असे असताना उगाच त्यात अनावश्यक तांत्रिक बाबी व अगम्य पैलु जोखुन दुसर्या कलाक्रुतीला नावे ठेवण्यात अर्थ नाही हा माझा आग्रह आहे.)
त्यातल्या त्यात एखादा सर्वसाधारण सुवर्णमध्य निघाला तर उत्तम हाच माझ्या चर्चाचा हेतु आहे.
इथे काही पटतील असे प्रतिसाद आले आहेत, त्यावर भाष्य मी लवकरच करेन.
- छोटा डॉन
8 Feb 2011 - 3:12 pm | अवलिया
>>>इथे काही पटतील असे प्रतिसाद आले आहेत, त्यावर भाष्य मी लवकरच करेन.
२०१२ लागायच्या आत कराल का?
8 Feb 2011 - 9:38 am | इन्द्र्राज पवार
"....माझा एकच प्रश्न आहे, एखादा चित्रपट चांगला का असतो किंवा तो वाईट का असतो व ते कसे किंवा कोणत्या चाचण्यांच्या आधारे ठरवावे ?...."
~ श्री.डॉन यानी प्रस्तुत केलेला विषय वाचल्यानंतर त्याना अन्य कोणत्याही मुद्द्यापेक्षा अर्थात वरील प्रश्नाचेच उत्तर अपेक्षित आहे ...त्याला अनुसरून ही प्रतिक्रिया :
सर्वप्रथम प्रेक्षकाचा चित्रपट पाहण्याचा हेतू जाणून घेतला पाहिजे, म्हणजे त्याला निव्वळ दोनतीन तासांचे निखळ मनोरंजन हवे आहे की तो कुठल्याशा कलात्मक ओढीपोटी एक विशिष्ट चित्रपट पाहण्यासाठी थिएटरकडे वळला आहे. दोन भिन्न विचारसरणीचे मित्र एकत्र चित्रपट पाहायला गेले तर 'अ' ला 'दबंग' आवडेल तर 'ब' काय म्हणून शंभर रुपये वाया घालविले असा चेहरा करेल. मात्र हेच दोन मित्र पुढे केव्हा तरी 'उडान' पाहतील तर बरोबर उलट्या प्रतिक्रिया नोंदविल्या जातील. त्यामुळे आवडनिवड ही पूर्णपणे वैयक्तिक पातळीवरच मर्यादित राहते. मला पसंद असलेला चित्रपट त्याला का आवडला नाही, तर त्याची आवड माझी का होत नाही अशा पध्दतीच्या प्रश्नांना चित्रपट रसग्रहणात स्थान नसते.
चित्रपटांचा इतिहास सांगतोच की, आजचे असफल चित्रपट उद्याच्या अभिजात, श्रेष्ठ कलाकृती ठरतात. काही उदाहरणे ~ गुरुदत्त यांचे 'कागज के फूल' आणि 'प्यासा' जेव्हा प्रथम पडद्यावर आले त्यावेळी मूठभर प्रेक्षक सोडता सर्वांनी त्याकडे पाठ फिरविली होती (अगदी दिलीपकुमार यानीही 'प्यासा' पाहिल्यानंतर आपण त्यामधील नायकाची भूमिका नाकारली याबद्दल समाधान व्यक्त केले होते म्हणे, असे वाचनात आले आहे). अर्थात त्या काळात ~ १९५० ते १९७० ~ प्रेक्षकाची भूख केवळ 'मनोरंजन' एवढीच माफक होती. म्हणजे एक गुलछबू, खिशात दमडी नसलेला नायक, तितकीच सतत डोळ्याच्या पापण्या पिटपिटविणारी गोरीगोमटी नायिका...तिचा कोट्याधिश पण तद्दन मूर्ख बाप, एक खास मुशीत घडविलेला खलनायक, नायकनायिकेचे काश्मिरमधील झाडाझुडपाच्या आगमागे गिरक्या घेत गाणी, गावात कुठलेही काम नसलेल्या पाचपन्नास पोरी त्यांच्या संगतीला कोरसमध्ये....नायकाचा एक बावळट म्हणून विनोदी मित्र....मग थोडेसे गैरसमज....शेवटची कड्यावरची फायटिंग....खलनायकाचा अर्थातच खातमा....आणि 'मेरी जान...' म्हणत या दोन ठोंब्याच्या मिठ्या....बस्स....मायबाप प्रेक्षकाला दोन घटका करमणूक मिळाली....पैसा वसूल. असे असले तरी जसजसे प्रेक्षकाची चित्रपट पाहाण्याची दृष्टी बदलत गेली, तो प्रगल्भ होत गेला तसतसे त्याला 'कागज के फूल', 'प्यासा', 'दो बिघा जमीन', 'भूवन शोम', 'सारा आकाश', 'गर्म हवा', 'तिसरी कसम', 'निशांत' अशा चित्रपटांचे कलात्मक महत्व किती अपार आहे हे समजू लागले आणि त्यामुळे प्रायोगिक चित्रपट निर्मिती करणार्यांनाही हुरूप आला असा इतिहास आहे.
म्हणजेच, अन्य कला क्षेत्राप्रमाणे 'चित्रपटमाध्यम' हेदेखील कलाविष्काराचे एक प्रभावी माध्यम असून 'कलात्मक' किंवा 'प्रायोगिकता' (Avante Garde) हळुहळू येणे क्रमप्राप्त होतेच. या गटातील निर्मात्याला वा दिग्दर्शकाला ही जाणीव असतेच असते की आपला निर्मिती ही 'गल्लाभरू' गटातील कदापिही समजली जाणार नाही. पण कलेच्या क्षेत्रात असा लेखाजोखा करून आविष्कार सादर केला जात नाही. त्यामुळे कलात्मक चित्रपट निर्मितीमध्ये दिग्गज मानले गेलेल्या सत्यजित रे, ऋत्विक घटक, मणी कौल, ऋषिकेश मुखर्जी, श्याम बेनेगल आदींचे चित्रपट यांच्या चित्रपटाकडे जाणार्या प्रेक्षकाची केवळ 'मनोरंजना'साठी जाणे असे संभवत नसे. पण त्याचवेळी नासिर हुसेन, मनमोहन देसाई, सुबोध मुखर्जी, राज कपूर, देव आनंद आदी निर्माते दिग्दर्शक यांची चित्रपटातून 'पैसा पुरेपूर वसूल" अशी प्रतिक्रिया व्यक्त करतच प्रेक्षक टॉकिजमधून बाहेर पडत....[इथे 'पिटातील प्रेक्षक' वगैरे संबोधन लागू होत नाही, कारण पन्नासपन्नास आठवडे यांचे चित्रपट हाऊस फुल्ल जात असत म्हणजे बाल्कनीतील प्रेक्षकही यात अंतर्भूत असतातच].
त्यामुळे "...एखादा चित्रपट चांगला का असतो किंवा तो वाईट का असतो व ते कसे किंवा कोणत्या चाचण्यांच्या आधारे ठरवावे ?..." असा प्रश्न ज्यावेळी नजरेसमोर येतो त्यावेळी संबंधित प्रेक्षकाने तो चित्रपट आपण का पाहायला जात आहोत याचे कारण प्रथम मनी नोंदविले पाहिजे. 'मला माझा वैताग विसरायचा आहे...' हा हेतू असेल तर त्याला मग 'दबंग' च काय, पण 'ओम शांती ओम...', 'गोलमाल १,२', 'धूम १,२....' बेहद्द आवडणारच, कारण तीन तास, पॉप कॉर्न चघळत, तो स्वप्नरंजनात मस्तपैकी घालवू शकतो....बाहेर आल्यावर त्याला जर 'फ्रेशनेस' जाणवला तर त्याचा चित्रपट पाहाण्याचा हेतू १००% सफल झाल्यामुळे त्याच्या दृष्टीने तो चित्रपट 'चांगला' च ठरला. पण त्याऐवजी त्याचवेळी तो कळतनकळत जर एखाद्या फिल्म सोसायटीतर्फे दाखविण्यात येणार्या 'राशोमोन' पाहायला गेला तर? तास-दीड तास चालणारा हा चित्रपट केव्हा एकदा संपेल असे त्याला होऊन जाईल आणि 'जगात असेही चित्रपट कसे काय बनतात?" असा प्रश्न स्वतःशीच विचारत त्याच्याविषयी एकदम 'वाईट' प्रतिक्रिया मनी उमटवत, मूळच्याच वैतागात आणखीन किलोभर वैताग वाढवित, स्वतःलाच शिव्या घालत तो सोसायटीच्या छोटेखानी चित्रगृहातून बाहेर पडेल. पण त्याचवेळी त्याच्या मनी हे कदापिही येणार नाही की, जगभरातील प्रायोगिक चित्रपट निर्मितीमधील सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि शेकड्यांनी अॅवॉर्डस मिळविलेली 'राशोमोन' ही एक अभिजात कलाकृती आहे.
आवडनिवड तपासून घेण्याची दुसरी एक चाचणी आहेच. म्हणजे तुम्हाला मित्रानी सुचविलेला आणि सर्वत्र चर्चा होत असलेला "लगान" वा "स्वदेश" पाहायला जाणे आवडेल, पण लगानमधील क्रिकेट मॅच आणि त्यामुळे ब्रिटिशांनी गावकर्यांची वसुली थांबवून ते गावच सोडून जाणे व्यावहारिक पातळीवर जरी पटले नाही, तरी एकूणच प्रभावी सादरीकरणामुळे तुम्हाला तो चित्रपट काही मर्यादेपर्यंत 'चांगला' वाटेलच. तीच गोष्ट मोहनने 'नासा' सोडून खेडेगावात राहायला येणे हे कदाचित 'अशक्य' वाटेल, पण तिथेही कथेच्या ओढीने आणि एकूणच कलात्मक हाताळणीमुळे तुम्हाला मोहनचा निर्णय आपलासा वाटतो आणि अशक्य वाटणारी संकल्पना 'चांगली'च वाटते.....ही काही प्रमाणातील 'तडजोड' देखील चित्रपट चांगला ठरण्याचा निकष ठरते. पण 'इन टोटो' वाईट वाटण्याचीही उदाहरणे आहेतच. म्हणजे विविध कारणास्तव सर्वत्र गाजावाजा होत असलेला एखादा खास शाहरूखी "माय नेम इज खान" बघायला जावे आणि 'मी खान आहे, म्हणून मला गुन्हेगार ठरवू नका' हा आक्रोश पाहण्यासाठी तब्बल तीन तासाचा वैताग सहन करणे म्हणजेच चित्रपट किती वाईट आहे हे आपसूकच सिद्ध होत असते.
तात्पर्य काय..., चित्रपट पाहायला जाताना मला आणि केवळ मलाच काय अपेक्षित आहे असे प्रेक्षकाने समजूनच जावे. इतरांनी सांगितलेले ऐकून काही संभ्रमित ग्रह करून घेऊन त्याने अमुक एका चित्रपटाच्या आशयासंदर्भात भलते तर्कवितर्क लढवीत चित्रपटगृहात प्रवेशही करू नये आणि त्याच तर्काच्या घोळात थिएटरबाहेरही पडू नये. असे झाले तरच चित्रपट चांगला की वाईट याची चाळणी आपसूकच लावली जाईल....वैयक्तिक पातळीवर !
इन्द्रा
8 Feb 2011 - 7:11 pm | भारी समर्थ
.
9 Feb 2011 - 11:07 am | टारझन
समरी उपलब्ध करुन द्या समर्थ :)
- खारी बटर्थ
प्रत्येकाच्या घोड्याला ठोकता येते असे नाही.
8 Feb 2011 - 1:44 pm | नितिन थत्ते
काही प्रतिसाद शुचितैंनी सांगितलेल्या कन्फर्मिटी तत्त्वामुळे आल्यासारखे वाटले.
8 Feb 2011 - 2:51 pm | अवलिया
तुम्हाला कन्फर्मिटी तत्वाला छेद देत प्रतिसाद द्यायला कुणी परावृत्त केले असेल असे वाटत नाही.
8 Feb 2011 - 3:40 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ
असो.
8 Feb 2011 - 4:00 pm | कलंत्री
मला आवडलेली गोष्ट सर्वांनाच आवडलेली पाहिजे अन्यथा ते बुर्झ्वा असे मत चांगले नाही. व्यक्ति तितक्या प्रकृती या न्यायाने आवड निवड ठरायला हवी.
तुला चित्रपटातले काय समजते हा शेरा अयोग्य असा आहे.
8 Feb 2011 - 7:08 pm | भारी समर्थ
'हम करे सो कायदा' या उक्तीच्या जमान्यात आपल्याला असला प्रश्न पडावा याचे सखेद आश्चर्य वाटते. दुसर्यांच्या व्हॅलिड तथा इनव्हॅलिड मतांना (आ ळ्या च्या) फाट्यावर मारण्याच्या जमान्यात तुम्ही प्रत्येकाच्या फाट्यावर जाऊन मत विचारणारा धागा काढला, त्यावरूनच तुमचे मन किती संवेदनशील व समाज प्रतिक्रियेसाठी आसुसलेले (की हपापलेले? असो, जे अॅप्लिकेबल असेल ते घ्या) आहे याचा चाणाक्ष वाचकांस अंदाज आला असेलच.
बाकी, कॉलेजमधे असताना मला मिथूनदा आवडायचा याचे सगळयांना आश्चर्य वाटायचे. आजकाल मला राखी सावंत आवडते/तो (जे अॅप्लिकेबल असेल ते घ्या). पण 'दुनिया माने बुरा तो फाटे पे मारो यार!'
भारी समर्थ
8 Feb 2011 - 7:39 pm | इन्द्र्राज पवार
"....कॉलेजमधे असताना मला मिथूनदा आवडायचा याचे सगळयांना आश्चर्य वाटायचे. ...."
~ हिंदी चित्रपटसृष्टीत 'आपला' असा काळ गाजविणार्यामध्ये मिथुन चक्रवर्तीचे नाव घ्यावेच लागेल. एकीकडे बिग बी अमिताभ जोरात असतानाच, दुसरीकडे 'गरिबोंका अमित' म्हणून गौरविल्या गेलेल्या मिथुनचे या देशात कोट्यावधी चाहते होते. [मला वाटते कुठल्याशा भूमिकेबद्दल त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता...]
डिस्को डान्सची लोकप्रियता वाढविणे, धमाल अॅक्शन्स, ठेका धरायला लावणारे संगीत (बप्पी लाहिरीना खरे तर मिथुनच्याच चित्रपटांनी हिंदीत नाव मिळवून दिले असे म्हटले पाहिजे...) आदी बाबीमुळे मिथुन लोकप्रियतेत इतकी भर पडत गेल्याचे दिसते की पुढे तर खुद्द अमिताभ बच्चन यांच्याबरोबरीने त्याने कामे केले आहे.
त्यामुळे श्री.समर्थ यांच्याप्रमाणेच मिथुन 'आपला' वाटणारे कोट्यावधी होते/असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.....'मिथुन मॅजिक' होतेच होते.
(आता राखीताईविषयी असे म्हणता येईल की नाही हा अलग मुद्दा आहे...पण ज्याला किंवा ज्याना ती आवडते त्याबद्दल भुवई वक्र करून चालणार नाही....ब्रिटनच्या महाराणीला ड्रॅक्युलाची भूमिका साकारणारा ख्रिस्तोफर ली का आवडायचा हेही विचारू नये....शेवटी "वो मेरा मामला है |" हेच खरे.)
इन्द्रा
9 Feb 2011 - 5:05 pm | भडकमकर मास्तर
. [मला वाटते कुठल्याशा भूमिकेबद्दल त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता...]
त्या सिनेमाचे नाव " मृगया"
9 Feb 2011 - 11:53 pm | इन्द्र्राज पवार
थॅन्क्स सर....
~ गंमत म्हणजे नेमका हाच चित्रपट आम्हाला पाहायला मिळालेला नाही. [नावावरून तरी 'आर्ट कॅटेगरी'तील दिसत्योय !]. दूरदर्शनने खरेतर असे आडबाजुला गेलेले चित्रपट दाखविणे गरजेचे आहे, पण तिथेही जाहिरातीच्या नावाखाली असल्या चित्रपटाना प्रायोजक मिळण्याची मारामार असणारच.
इन्द्रा
10 Feb 2011 - 12:29 am | धनंजय
"मृगया" पूर्वी दूरदर्शनवर बघितला होता. (त्या काळात रविवार दुपारी असे ऑफबीट चित्रपट दाखवत असत.)
मला आवडला होता चित्रपट.
10 Feb 2011 - 7:40 am | नितिन थत्ते
मृगया पाहिलेला नाही. पण दूरदर्शन त्याकाळी असे चित्रपट बर्याचदा दाखवत असे.
लोकांना ते त्याही काळी नकोसे वाटत. काय बोअर मारतायत असे वाटे.
10 Feb 2011 - 11:10 am | मी_ओंकार
अग्निपथ साठी मिथुनला सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्याचा आणि जल्लाद साठी खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे.
- ओंकार.
9 Feb 2011 - 11:20 am | चावटमेला
सोप्पं गणित आहे..अमिताभ बच्चनचा चित्रपट चांगला आणि त्यांचे चिरंजीव असले तर चित्रपट पूर्ण होण्याआधीच तो फालतू, भिकार इ. असणार हे स्पष्टच आहे.. ;)
10 Feb 2011 - 12:38 am | निनाद मुक्काम प...
समाजात विविध स्तरातील विविध मानसिकतेची लोक राहतात .भारत तर एकाच वेळी अनेक शतकात वावरतो .
अश्यावेळी
चांगला कि वाईट ह्या सिनेमाबद्दल संकल्पना माझ्या मते व्यक्ती सापेक्ष असतात .
माझ्या मते जो सिनेमा पाहून वेळ सार्थकी लागला (पैसा वाया गेला नाही ) असे वाटते .
तो सिनेमा त्या व्यक्तीसाठी नक्कीच चांगला असतो .
लंडन मध्ये भारतीय उपखंडातील लोकांनी हिमेशच्या जलाशाला रेकोर्ड ब्रेक गर्दी केली .(त्याचा सिनेमा देखील २ ते ३ वेळा पहिला ) म्हणून नवल वाटले नाही
आखिर पसंद अपनी अपनी .
हेच खरे .
10 Feb 2011 - 10:17 am | राजेश घासकडवी
मूळ चर्चाप्रस्ताव चित्रपटांबाबत असला तरी मला तो अधिक व्यापक वाटतो. चांगलं म्हणजे काय, व ते वाईटापासून वेगळं काढता येतं का? आणि हे वेगळं करण्यासाठी काही वस्तुनिष्ठ निकष असतात का? हा खरा प्रश्न आहे. आणि हे निकष ठरवण्यासाठी मुळात जवळपास सर्व लोक मान्यता देतील अशा चांगल्या व वाईटाच्या संकल्पना अस्तित्वात आहेत का?
खायला अन्न, प्यायला पाणी मिळणं, श्वास घ्यायला हवा मिळणं चांगलं, याउलट उपाशीपोटी राहाणं, तहानेने व्याकूळ होणं, गुदमरणं वाईट याबाबत सर्वांचंच एकमत व्हावं. चित्रपटांच्या बाबतीत मात्र या भुका व तहाना सारख्या नसतात. आपल्याला जी भूक आहे ती भागणं, चित्रपटाकडून विशिष्ट अपेक्षा पूर्ण होणं, तो पाहून झाल्यानंतर एक प्रकारची तृप्ती, समाधान वाटणं हे व्यक्तिनिरपेक्ष नाही. त्यामुळे चांगलं व वाईट हे शब्द व्यक्तिनिरपेक्षपणे वापरता येत नाहीत.
थोडक्यात - आपल्याला आवडेल तो चित्रपट चांगला - धनंजयने म्हटल्याप्रमाणे फारतर 'मला हे आवडलं, तुलाही आवडेल कदाचित' एवढंच म्हणता येत.
10 Feb 2011 - 10:51 am | इन्द्र्राज पवार
"...थोडक्यात - आपल्याला आवडेल तो चित्रपट चांगला ...."
~ हेच शेवटी खरं ! पण, या न्यायाने असेही म्हणता येईल की, ज्याला "अनुभव....." भावतो त्याने दुसर्याला "तुला अमर-अकबर-अॅन्थोनी कसा बुवा आवडतो?" असाही टोमणा लगावू नये....शेवटी या दुसर्यालाही त्याची स्वतःची अशी टेस्ट असणार, त्यामुळे हे त्याचे स्वातंत्र्य आपण मान्य करणे केव्हाही चांगले.
श्री.शिरिष कणेकर यांच्या एका पुस्तकात शंकर-जयकिशन या जोडीतील जयकिशनविषयी एक किस्सा आहे. त्याना एकदा श्री.कणेकर यानी 'तुम्हाला स्वतःला लता मंगेशकर यांचे कुठले गाणे सर्वाधिक आवडते?" हा प्रश्न विचारला....आणि आता लताने त्यांच्यासाठी गायलेल्या हजारो गाण्यातील बहुधा नर्गिस वा मधुबाला वा नूतन यांच्यावर चित्रित झालेल्या एखाद्या गाण्याची जयकिशन आठवण काढणार असे वाटत असतानाच जयकिशन यानी झटकन "आज मै जवान हूं गयी हूं....ओ मिठ्ठूमियाँ..." हे लीना चंदावरकर यांच्यावर चित्रीत झालेले मै सुंदर हूं या चित्रपटातील गाणे" मी सर्वाधिक पसंत करतो...." असे सांगितल्यावर कणेकर हतबुद्धच झाले. पण...काय करणार? शेवटी जयकिशन हे संगीतकार आणि त्याना काय आवडावे हे दुसरे कसे सांगणार?
श्री.धनंजय म्हणतात तो विचार ["'मला हे आवडलं, तुलाही आवडेल कदाचित'"] एक मध्यम मार्ग म्हणून स्वीकारण्यासारखा आहे.
इन्द्रा
10 Feb 2011 - 11:21 am | पंगा
खायला अन्न कुठल्या प्रकारचं (शाकाहारी की मांसाहारी, कोंबडी की डुक्कर की गाय, उडपी, पंजाबी की मेक्सिकन) आणि कसं (ताजं की शिळं, गरम बटाटावडा आणि थंड आइस्क्रीम की वाइसे वर्सा), प्यायला पाणी कुठलं (विहिरीतलं, नळाचं की बिस्लेरीच्या बाटलीतलं - समुद्राच्या पाण्याचं तूर्तास नाव काढत नाही.) आणि श्वास घ्यायला हवा कुठली आणि कशी (डोंगरावरची स्वच्छ आणि आल्हाददायक, की तुमच्या मुंबईतल्या चेंबूरमधली प्रदूषित, की चर्चगेटच्या दिशेने जाणारी प्रत्येक लोकल वांद्रे आणि माहीम यांच्यामध्ये खाडीपाशी जिथे सिग्नलसाठी हमखास थांबतेच थांबते - जिथे ब्याकग्राउणमध्ये त्या पोलिसांच्या रंगीबेरंगी चाळी आहेत - त्या ठिकाणची, मुंबईतली सर्वाधिक दुर्गंधी मारणारी) यांवरून यातसुद्धा चांगल्यावाइटाची संकल्पना व्यक्तिसापेक्षतः वेगवेगळी असू शकतेशी वाटते.
कोणास ठाऊक, हे सर्व आवडणारे मॅसॉखिस्ट (उच्चार?) असतीलही जगात! किंवा कदाचित चेंबूरकरांना किंवा माहीमच्या 'त्या' चाळींत राहणार्यांना डोंगरावरच्या स्वच्छ हवेत गेल्यावर (कोण म्हणाला रे तो, "आल्टिट्यूड सिकनेस" म्हणून?) गुदमरायला होतही असेल, कोणी सांगावं?
तेव्हा, जगात "अॅब्सोल्यूट" असं काहीही नसतं (तेवढी त्या नावाची ती एक वोडका सोडून), सर्व काही सापेक्ष असतं, हेच काय ते एक खरं.
10 Feb 2011 - 10:52 pm | शाहरुख
दुसर्यांची परिक्षणं वाचून पिच्चर बघायचा का नाही हे ठरवणं म्हणजे आम्हाला स्वतःच्या बुद्धिमत्ता आणि कलात्मकता या गुणांच्या संगमातून तयार होणार्या गुणाचा अपमान केल्यासारखा वाटतो..
धागा वरवर चाळला !
10 Feb 2011 - 11:10 pm | धनंजय
अन्यत्र मी या विषयाबद्दल मते मांडलेली आहेत :
"सवंग लोकप्रियता" - एक सवंग लोकप्रिय टीका
त्यातील सारांश असा :