येथेच, दूसर्या एका लेखात मा॑डलेल्या एका मतामुळे (कोणिही यावे, अन् अनिवासीया॑ना टपली मारून जावे..) बर्याच दिवसा॑पासून माझ्या मनात खदखदणार्या "कोणिही यावे अन् आय.टी. प्रोफेशनल्सना टपली मारून जावे" अस॑ का बर॑? ह्या प्रश्नावर येथे चर्चा करावीशी वाटली म्हणून हा खटाटोप.
"तू काय बाबा, सॉफ्ट्वेअर क॑पनीत आहेस, तुम्हाला काय पैशाला कमी?"
"खोर्यानी पैसा ओढतात साले, चार पैसे जास्त लावले त्या॑ना तर कुठे बिघडल॑?"
"तुमची काय बुवा, मजा आहे ! क॑पनीच्या खर्चाने परदेशवार्या, हे एव्हढा पगार, गाड्या...." इ.इ.
जवळपास प्रत्येक software professional ने ऐकलेली ही वाक्य॑..थोडी वेगळीही असतील, पण आशय साधारण हाच.
मान्य जास्त पैसा मिळतो म्हणून आम्ही इतरा॑पेक्षा अ॑मळ जास्तच चैन करतो, पण.....
खर॑च का हो आम्ही एव्हढे सुखी असतो?
हा जो पैसा दिसतो, त्यसाठी आम्हाला कशा कशावर पाणी सोडाव॑ लागत॑ त्याचा कधी विचार तरी केलाय का?
महिनो॑महिने त्या थकलेल्या म्हातारीच॑ तो॑डही बघायला मिळत नाही. तिकड॑ तीही वाटेकडे डोळे लाऊन बसलेली असते.
हा पैसा दिसतो त्यामुळे ज्या॑ना मळमळ होते, त्या॑ना रोजची आमची जागरण॑, वेळी-अवेळी होणारी जेवण॑ (जेवण म्हणायच॑, आपल्याकडे तस॑ म्हणायची पद्धत आहे म्हणून.) त्यामुळे होणारी जळजळ...का नाही हो दिसत?
आमची स्पेशल आजारपण॑ सोईस्कररित्या नजेरेआड का होतात? अपचन, पित्त इ.इ चिल्लर तर नेहमीचेच, त्याबरोबरीने depression, high BP, heart problems, anxiety वगैरे प्रकार आमच्यासाठीच खास बनवल्यासारखे, डोळ्या॑वर हळू हळू वाढत्या भि॑गाचा दागिना तर हवाच.
मुल॑ झाली की त्या॑ची उ॑ची वाढताना बघायच॑ भाग्य आमच्यातल्या फार थोड्या॑च॑, बाकीचे पाहतात ते पोरा॑ची वाढणारी ला॑बी.
नवरा-बायको एकत्र रहात असूनही धर्मशाळेत असल्यासारखे, घर फक्त शनिवार-रविवारी.
२ महिने ह्या देशात, ३ महिने त्या देशात, कधी घरी, कधी सगळ॑ उचलून पुर्ण वेगळ्या स॑स्कॄतीत जाऊन रहाण॑...जाताना वाटते हो मजा, पण एकदा तिकडचे झालो की सगळ॑ इकडच॑ आठवायला लागत॑.
बर॑, ते रोज रोज नवे नवे codes लिहून अन् असलेल्या॑वर डोक॑ आपटून वेड लागायची वेळ येते. deadlines
असतात त्या वेगळ्याच.
ऑफिसला जाण्याची वेळ पक्की असते, पण येण्याची? deadlines आल्या की ऑफिसमध्येच रात्री सोफ्यावर थोडावेळ डुलकी काढायची अन् परत कामाला लागायच॑.
हे असल॑ सगळ॑ असत॑ म्हणून तर ह्या क॑पन्या भरपूर पगार देतात हो.
आता तुम्ही म्हणाल, एव्हढ॑ आहे तर करता कशाला असल्या नोकर्या. द्या सोडून! खर॑य तुमच॑ म्हणण॑, पण काय करणार, धरल॑ तर चावत॑य, अन् सोडल॑ तर पळत॑य.
म॑डळी, तुमची काय मत॑ आहेत ह्यावर?
प्रतिक्रिया
31 Jan 2008 - 4:12 pm | स्वाती राजेश
अगदी माझ्या मनातील भावना लिहिल्या आहेत. या गोष्टीचा कोणी विचारच करत नाही कि प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. उत्तम लेखन केले आहे. बाकीची प्रतिक्रीया नंतर लिहिन.
31 Jan 2008 - 4:21 pm | मनिष
खरा बेसुमार पैसा हा बिझनेस मधे आहे, नोकरीत नाही. करोडोंचे बंगले, मालमत्ता ही नोकरीपेशा माणसांमधे अभावानेच बघायला मिळते. पण नोकरी मधे सर्वात lucrative क्षेत्रांमधे software हे नक्कीच आहे; इतर नोकरीपेशा माणसांना बघितले की आपण software वाले किती सुखी आहोत असे वाटते. हेच काही software वाले मात्र ८-१० लाख वर्षाला मिळत असतांनाही "फार कमी आहे" म्हणून गळे काढतात तेंव्हा वाटते कि ह्यांना जरा बाकीच्या नोकरीपेशा लोकांचे आयुष्य जगायला सांगावे - जमिनीवर येतील जरा.
31 Jan 2008 - 4:38 pm | विवेकवि
मिनु जोशी.
31 Jan 2008 - 9:15 pm | संजय अभ्यंकर
ह्या प्रकारचे आयुष्य केवळ आय. टि. वालेच नव्हे तर असंख्य व्यवसायातले लोक जगतात.
आर्थर हेलीने लिहिलेली Airport, Wheels, The Final Diagnosis, Hotel इ. पुस्तके विविध व्यवसायांतील ताण-तणाव दाखवतात.
उपहारगृहात काम करणारे, सकाळी ६-७ वा. पासुन रात्री ११ वा. पर्यंत राबतात.
वाहन निर्मिती, सतत प्रक्रिया (Continuos Processing - औषधे, रसायने निर्मिती इ.) उद्योगात काम करणारे तंत्रज्ञ, टॅक्सी चालक अशी भली मोठी यादी येथे देता येइल.
या पैकी काही उद्योगांत, आय. टी. इतकीच बौद्धिक कसरत व ताण तणाव असतात.
परंतु उपरोल्लेखित कामे करणार्यांचे उत्पन्न आणी आय. टि. तले उत्पन्न सारखे नाही.
आय.टि. वाल्यांना टपलि मारण्यामागे एक वैषम्य दडले आहे, की आमचेही काम तितकेच त्रासदायक असताना उत्पन्नात तफावत का?
परंतु हा काळाचा महिमा आहे, त्यामुळे कोणीही वैषम्य वाटुन घेउ नये. एके काळि, दुबईत काम करणारा गवंडी, एका तंत्रज्ञापेक्षा जास्त उत्पन्न मिळवित असे.
आय. टि. वाल्यां बद्दल असुया, वैषम्य न बाळगता मान खाली घालुन आपापले काम करण्यात शहाणपण आहे.
मासिक उत्पन्नापेक्षा वार्षिक उत्पन्न वाढ जास्त महत्वाची आहे.
काळानेच सिद्ध केले आहे की असे, भरमसाठ पगार देणारे व्यवसाय कालांतराने त्या वेगाने पगारवाढ देउ शकत नाहीत.
आज दुबईची ओढ कारागिरांतही दिसुन येत नाही.
संजय अभ्यंकर
smabhyan.blogspot.com
31 Jan 2008 - 9:21 pm | सुनील
मासिक उत्पन्नापेक्षा वार्षिक उत्पन्न वाढ जास्त महत्वाची आहे.
तुमच्या सध्याच्या कामातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळते का हे त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे आहे!
तुमच्या बाकी प्रतिसादाशी सहमत.
(आय टी हमाल) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Jan 2008 - 9:49 pm | प्रकाश घाटपांडे
एकाच पटावर सोंगट्या आरंभीला एका स्थानात असतात. प्रत्येकाला डाव खेळण्याची म्हणजे फासे टाकण्याची संधी समान असते . कुणाला शिडी मिळते तर कुणाला साप. कधी शिडी तर कधी साप. या खेळात जो शेवटपर्यंत जातो तो यशस्वी. संभवनीयतेचे नियम व कर्तुत्व याचा कुठे संबंध पोहोचतो?
एखाद्या पदासाठी स्पर्धेतून दहा उमेदवार गुणवंत व लायक आहेत. निवड एकाचीच करायची आहे. कुठला निकष लावणार? एक निवडला म्हणजे बाकीचे अपात्र टरतात काय?( जे लायक आहेत पण स्पर्धेतच उतरले नाहित हा भाग पुन्हा वेगळा)
अच्युत गोडबोले म्हणतात कि आय टी वाले म्हणजे हुषार हा अनेक लोकांचा गैरसमज आहे. आय टी सेक्टर मुळे आलेली विषमता ( हे एकमेव कारण नसले तरी महत्वाचा घटक आहे) ही दुर करण्या साठी याच क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे नाहीतर ही विषमता आपल्याला जगु देणार नाही.
प्रकाश घाटपांडे
31 Jan 2008 - 9:48 pm | चतुरंग
तुमचे कामाचे स्वरुप आणि त्याचा आर्थिक मोबदला ह्यातील तफावत ही जगात सगळीकडेच दिसते. आणि ती काळाप्रमाणे बदलत असते.
सध्या आय्.टी. चा जमाना आहे. पण सगळ्यांनी तिकडेच जाऊन कसे चालेल, कारण पुन्हा मागणी - पुरवठा हा तोलही सांभाळायला हवा.
फक्त "गाढवकाम + खूप पैसा" हे समीकरण आणि "खूप मनाजोगे काम + अगदी तुटपुंजी कमाई" हे दोन्ही अंतिमतः तोट्याचेच असते!
पहिल्या प्रकारात तुम्ही मानसिक आणि भावनिक पातळीवर पोखरून निघता आणि तुमच्या आत्मविश्वासाला हळूहळू तडे जातात. ते पैशाने काहीकाळ झाकले जातातही पण नंतर त्याचे रुपांतर निराशेत व्हायची शक्यता बळावते.
दुसर्या प्रकारात तुम्ही मानसिक आणि भावनिक पातळीवर सुरुवातीला आनंदी असता पण "परिस्थितीचे चटके" तुम्हाला व्यवहाराकडे नेतात त्याने तुमचा आत्मविश्वास ढासळू शकतो आणि शेवटी निराशा!
तेव्हा तुलना न करता, आपल्याला आवडणारे काम, जे व्यवस्थित जगण्यासाठी पुरेसा पैसा देते, ते मनापासून करणे महत्त्वाचे. एकीकडे प्रगतीच्या वाटाही धुंडाळव्यात पण त्या आपल्या मूळ पिंडापासून फार दूर नेणार्या नसाव्यात, हे श्रेयस्कर.
चतुरंग
31 Jan 2008 - 9:53 pm | प्रकाश घाटपांडे
<<तेव्हा तुलना न करता, आपल्याला आवडणारे काम, जे व्यवस्थित जगण्यासाठी पुरेसा पैसा देते, ते मनापासून करणे महत्त्वाचे. एकीकडे प्रगतीच्या वाटाही धुंडाळव्यात पण त्या आपल्या मूळ पिंडापासून फार दूर नेणार्या नसाव्यात, हे श्रेयस्कर>>
चतुरंगजी आपण अत्यंत समर्पक बोललात.
प्रकाश घाटपांडे
31 Jan 2008 - 9:54 pm | llपुण्याचे पेशवेll
मी पण सुदैवी (किंवा दुर्दैवी ) असा एक आय्.टी. वालाच आहे.
I.T. वाल्याना सर्वसाधारण कोणीही टप्पल मारायचे एक महत्वाचे कारण म्हणजे I.T. च्या तेजीमुळे या क्षेत्रात झालेली खोगीर भरती. आणि या लोकानी मिळणार्या पैशाची केलेली मुक्त उधळ्पट्टी यामुळे I.T. वाल्यांच्या नशिबी भाववाढीला कारण ठरलेली मूर्ख माणसे ही बिरूद मिरवण्याची वेळ आली आहे.
I.T. वाल्याना मिळणार्या शिव्यांच्या मागे इतर क्षेत्रातील लोकांची झालेली आर्थिक कुचंबणा(भाववाढीमुळे झालेली) हेच प्रमुख कारण वाटते. एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते. मार्केटींग या क्षेत्रात काम करणारा माझा एक मित्र जो M.B.A. करून त्या क्षेत्रात उतरला. तोही दिवसभर भरपूर काम करतो . बराचसा वेळ वितरकाना भेटण्यात, नविन भागात वितरक नेमण्यात, विक्रीचे किमान लक्ष्य साध्य करण्यात तो व्यस्त असतो. पण इतके काम करूनही त्याला मिळणारा पगार मात्र माझ्यापेक्षा कमीच आहे. वास्तविक पाहता एखादा नविन वितरक नेमणे त्याला व्यवस्थित प्रस्थापित करून देणे, त्याच्याकडून विक्रीच्या उद्दीष्टाचे पालन करून घेणे हे एक कसब आहे. तसे बघायला गेले तर त्याच्याकडे उत्तम बोलणे, मिळणार्या निधीचा योग्य वापर करणे(हा निधी म्हणजे पगार नव्हे तर कंपनी कडून मिळणारा जाहीरात आणि इतर गोष्टीसाठीचा निधी), विक्रीची बहुविध उद्दीष्टे साध्य करणे अशी माझ्याकडे नसलेली अनेक कसबे(skills) आहेत. पण इतके असूनही पगार कमी. पुण्यात चांगल्या भागात घर घ्यायची क्षमता नाही.
अशी एक ना दोन अनेक कारणे आहेत. आणि आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी अविचारी पणाने चालवलेली पैशाची उधळपट्टी याला कारणीभूत आहे असे मला वाटते.
पुण्याचे पेशवे
31 Jan 2008 - 10:27 pm | केशवसुमार
हे नेहमी तुम्हाला काय येते पेक्षा इतरांना काय येत नाही जे तुम्हाला येते ह्याच्या प्रमाणात मिळतात..
हे प्रमाण कमी जास्त मागणी आणि तुटवडा ह्या तत्वावर आवलंबून असते..
आय.टी. मध्ये पगार जास्त असण्याला कारण भारतीय रुपया आणि परदेशी चलना मधील तफावत हे आहे..
भारता बाहेर राहताना आम्हाला जो पगार मिळतो तो इथल्या स्थानिक लोकांच्या तुलनेत कमीच असतो.. इथे ही आम्ही मध्यम वर्गीच.पण जेव्हा त्याला भारतीय रुपयात बदलण्यात येते तेव्हा ते भारतीय पगारांच्या मानाने खूप जास्त वाटत.
श्रमाच्या विषम प्रमाणात पैसे इतर ही क्षेत्रात मिळतात (उदा. चित्रपट / शेअर बाजार इ.) पण त्या मधे आसणार्या लोकांची संख्या कमी असल्या मुळे त्या विषयी जास्त बोलले जात नाही.. आय्.टी मधे आलेल्या मध्यमवर्गाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते एकदम डोळ्यात आले आहे इतकेच..
बाकी संजय अभ्यंकरांशी सहमत.. आज आय्.टी. आहे उद्या दुसरे काही असेल..
( आय्.टी आणि नॉन आय्.टी मधे काम केलेला) केशवसुमार.
1 Feb 2008 - 12:51 am | बेसनलाडू
हे नेहमी तुम्हाला काय येते पेक्षा इतरांना काय येत नाही जे तुम्हाला येते ह्याच्या प्रमाणात मिळतात..
हे प्रमाण कमी जास्त मागणी आणि तुटवडा ह्या तत्वावर आवलंबून असते..
आय.टी. मध्ये पगार जास्त असण्याला कारण भारतीय रुपया आणि परदेशी चलना मधील तफावत हे आहे..
श्रमाच्या विषम प्रमाणात पैसे इतर ही क्षेत्रात मिळतात (उदा. चित्रपट / शेअर बाजार इ.) पण त्या मधे आसणार्या लोकांची संख्या कमी असल्या मुळे त्या विषयी जास्त बोलले जात नाही.. आय्.टी मधे आलेल्या मध्यमवर्गाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते एकदम डोळ्यात आले आहे इतकेच..
--- सहमत आहे.
भारता बाहेर राहताना आम्हाला जो पगार मिळतो तो इथल्या स्थानिक लोकांच्या तुलनेत कमीच असतो.. इथे ही आम्ही मध्यम वर्गीच.पण जेव्हा त्याला भारतीय रुपयात बदलण्यात येते तेव्हा ते भारतीय पगारांच्या मानाने खूप जास्त वाटत.
--- हे भारताबाहेर काम करण्याबरोबरच पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून काम करणे की कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणे, यावरही अवलंबून आहे. कंत्राटी कर्मचार्यांचे वेतन तुलनेने कमी असते. तीच गोष्ट अल्प मुदतीकरता भारताबाहेर जाऊन काम करणार्यांची. भारतातील वेतनाच्या तुलनेत मात्र उपरोल्लेखित कोणत्याही प्रकारच्या कर्मचार्याचे वेतन जास्तच.
बाकी संजय अभ्यंकरांशी सहमत.. आज आय्.टी. आहे उद्या दुसरे काही असेल..
--- असहमत. आय टी ला पर्याय नाही, हे वास्तव स्वीकारायला हवे. खरे तर आय टी इतर व्यवसायक्षेत्रांचेही अविभाज्य अंग बनले आहे. फक्त या व्यवसायक्षेत्राची संतृप्तता आणि या व इतर क्षेत्रात मिळणार्या वेतनातील तफावत याबाबत सकारात्मक उपाययोजना करता आल्यास उत्तम.
(विश्लेषक)बेसनलाडू
1 Feb 2008 - 1:04 am | सुनील
आय टी ला पर्याय नाही, हे वास्तव स्वीकारायला हवे
आय टी ला पर्याय नाही हे मान्य. परंतु आय टी सेवादाता म्हणून भारताला / भारतीयांना तर पर्याय आहे? आणि तोच तर मुद्दा आहे!
(आय टी हमाल) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Feb 2008 - 3:52 am | बेसनलाडू
सेवादाता म्हणून उपलब्ध असलेले पर्याय लक्षात घेता निर्मात्याच्या भूमिकेत शिरणे किती महत्त्वाचे, हे आपल्याला कळत नाही, अशातला भाग नाही; त्यावर आपण कृती करत नाही. आणि असे उपलब्ध इतर पर्याय स्वीकारणे निर्मात्यांसाठी कसे फायद्याचे नाही, या विचारात मश्गूल राहून भारतीय सेवादाते आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणार नाहीत ना, याची भीती वाटते. सध्याच्या घडीला तरी लॅटिन अमेरिका आणि अतिपूर्वेकडील पर्याय भाषेच्या अडचणीमुळे तसेच युरोपातील पर्याय युरो डॉलरच्या तुलनेत उजवा असल्याने, भारतीयांच्या तुलनेत तितकेसे फायद्याचे नाहीत, असेच दिसते. त्यामुळे सध्यातरी भारतीय सेवादात्यांशिवाय इतर पर्यायांचा कुणी विचार करेलसे दिसत नाही. आणि कुणी तसा करायच्या आधीच निर्माता-सेवादाता अशी दुहेरी भूमिका वठवणे इष्ट!
(निर्माता)बेसनलाडू
1 Feb 2008 - 4:03 am | चतुरंग
नॉलेज टेक्नॉलॉजी (के.टी) मधे ही आपला ठसा उमटवायला आपण सुरुवात करायला हवी.
पाश्चात्य देशांमधल्या एकंदर व्यवस्थेमधली सुसूत्रता लक्षात घेता आपण फार काळ गाफील राहिलो तर पुन्हा आपण गुलाम होऊ.
"ज्ञानाधीष्ठित अर्थव्यवस्था" असा एकूण जगाचा तोंडावळा होत जाणार आहे.
चतुरंग
1 Feb 2008 - 12:18 am | संजय अभ्यंकर
मी मांडलेल्या मुद्दांना वर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या बद्दल आभार.
१) "तुमच्या सध्याच्या कामातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळते का हे त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे आहे!"
"आपल्याला आवडणारे काम, जे व्यवस्थित जगण्यासाठी पुरेसा पैसा देते, ते मनापासून करणे महत्त्वाचे. एकीकडे प्रगतीच्या वाटाही धुंडाळव्यात पण त्या आपल्या मूळ पिंडापासून फार दूर नेणार्या नसाव्यात, हे श्रेयस्कर."
सुनीलजीं व चतुरंगजी नी मांडलेले हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. केवळ पैशासाठी काम न करता ते आपला छंद म्हणुन करावे.
मला आवडलेल्या क्षेत्रात मी काम सुरु केले, तेव्हा अनेक वर्षे माझा पगार माझ्या वर्ग मित्रांपेक्षा कमी होता. परंतु आवडीच्या क्षेत्रात (Machine Tools) मध्ये काम करीत राहिलो, तसेच ह्या क्षेत्रातील जमतील तेव्हडि उपक्षेत्रे शिकत राहीलो (आणी शिकत राहीन). ह्या मुळे ह्या क्षेत्रातील विशिष्ट गुणवत्ता मी मिळवु शकलो आणी ह्या क्षेत्रात उच्च दर्जाचे उत्पन्न मिळवू लागलो.
२) मिराशीजींनी मांडलेला मुद्दा: आय.टि. क्षेत्रातील खोगीर भरती तसेच आय. टि. वाल्यांची उधळ्पट्टि आपण सर्वत्र पहात आहोत. ह्या मंडळींना भविष्याचे भान नाही. मी नागपाड्या सारख्या मुस्लिम भागात राहून हे पाहीले आहे. मुलगा आखातात गेला की, काल पर्यंत हाता- तोंडाशी गाठ असलेले लोक जो खर्च करित, त्याने आजुबाजुचा समाज दीपून जात असे, पण हे फार काळ चालू शकले नाही. काळाने त्यांना जमिनीवर आणले. कारण, भारतियांपेक्षा स्वस्त मजूरवर्ग अरबांना बांगलादेश, फिलीपाईन्स, नेपाळ, श्रीलंका इ. देशातुन उपलब्ध झाल्या वर तिथले पगार बरेच खाली आले.
अलिकडे आमच्या कं. तला एक तंत्रज्ञ जर्मनीहून परतताना, त्याच्या शेजारी एका अमेरिकन कं. तला मानव संसाधन (H.R. Dept.) अधिकारि बसला होता. तो भारतात सॉफ्टवेअर इं. शोधणार होता. परंतु ते केवळ भारतात शिकलेले आणी नेपाळि, बांगलादेशी नागरिकत्व असलेलेच असावेत ही त्याच्या कं.निची अट होती. जेणेकरुन त्यांचा दर्जा भारतियां इतकाच असेल पण ते भारतियांपेक्षा कमी पगारावर काम करतील.
व्यापारीवृत्तीच्या अमेरिकनांना स्वस्त माल कोठे मिळतो हे बरोबर कळते. भारतीय सॉफ्टवेअर इं. कीती काळ आजचा पगार टिकवू शकतिल?
३) केशवसुमारांनी म्हटल्या प्रमाणे, भारतात श्रीमंत भासणारा अनिवासी सॉफ्टवेअर इं. अमेरिकेतला मध्यम वर्गिय असतो. भारतात केवळ तो, तसा भासतो. उच्च उत्पन्न मिळवणारे भारतिय सॉ. इं. फार थोडे आहेत.
४) गिरणी कामगारांच्या विषयी प्राजु ने सुरु केलेल्या चर्चेत मी लिहिले आहे की ज्याने ज्याने शक्य होइल तसे बहुविध कौशल्ये मिळवावित. ही काळाची गरज आहे. जॅक वेल्श ने आपल्या दोन पुस्तकात (Straight From The Gut, Winning) सातत्याने बदलांना तयार रहाण्याचा व बदल आत्मसात करण्याचा सल्ला दिला आहे - "क्षितिजा वर बदल दिसु लागताच त्या साठी सज्ज व्हा" ("Always be on the Radar").
धन्यवाद!
संजय अभ्यंकर
smabhyan.blogspot.com
3 Feb 2011 - 3:03 pm | घाशीराम कोतवाल १.२
शिकार आणि पोकळ्वाडीचे चमत्कार्रचा म्होरला भाग कधी येतोय तुम्ही आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या
पुढला भाग ?
3 Feb 2011 - 7:53 pm | हेम
भारतात श्रीमंत भासणारा अनिवासी सॉफ्टवेअर इं. अमेरिकेतला मध्यम वर्गिय असतो. भारतात केवळ तो, तसा भासतो. उच्च उत्पन्न मिळवणारे भारतिय सॉ. इं. फार थोडे आहेत.
-मुळ लेखांत तुलना भारतातीलच इतर क्षेत्रांत आणि आयटी क्षेत्रांत अशी दिसतेय. अमेरिका आणि भारतातील नव्हे!!
- शनीवार-रविवार हक्काच्या सुट्ट्या असतात तरी..!!! मेकॅ. इं.ना विचारा....प्रॉडक्शन टार्गेट, यांव..त्यांव..सुटीच्या दिवशीही कामावर.. कामाची वेळ आयटी सारखीच.. जाण्याची वेळ पक्की असते..(कधी तर आधीच..), पण येण्याची नाय..! तात्पर्य - आयटीयन्सपेक्षा जास्त तास खपूनही पगाराची तफावत ...तिथे जल्ला खुपतां!
जाता जाता...-खुर्च्यातील काम नि शॉपफ्लोअरवरील कामगारांबरोबर काम हाही फरक आहेच...तवा उगा बोम नगो!!
3 Feb 2011 - 10:50 pm | वडिल
बहुतेक "थ्री इडियटस" मधिल रान्चो नी असेच काहि सांगितले असे वाटले.
ह्या चर्चे वरुन एका ओळखिच्या इसमा ची आठवण झाली....
हा इसम आय आय टि मधुन इ. इन्जिनीयरींग करुन .. अमेरीकेतील नामांकित युनिवर्सिटित फेलोशिप घेवुन आला. काहि महिन्यात फोर्ट्रान व सि प्रोग्रामर ( १९९९) म्हणुन जॉब मिळवला. वाय टु के च्या काळात प्रचंड डॉलरस कमवुन कंपनी काढली. ती कंपनी विकुन २००४ साली एच आर कंन्सल्ट्ंन्सी फर्म काढली . २००६ मधे रिअल इस्टेट एजंट म्हणुन मल्टि मिलेनियर झाला. २००८ साली सर्व काहि विकुन भारतात (मुलांचे शिक्षण चांगले व्हावे) म्ह्णुन गेला. भारतात आता हा इसम पुस्तके लिहिणे, कविता लिहिणे असे काहि करतो. धंदा म्हणुन ह्याने भविष्य सांगणे सुरु केले आहे व एक वेबसाइट हि काढली आहे असे ऐकिवात आहे.. पुढे काय करेल काहि सांगता येत नाहि. धन्य असे रान्चो !
बदलाला सामोरे जाणे म्हणजेच यश !
5 Feb 2011 - 2:55 pm | विवेक वि
तुमच्या मनातील राग बाहेर आला
5 Feb 2011 - 4:01 pm | अप्पा जोगळेकर
मान्य जास्त पैसा मिळतो म्हणून आम्ही इतरा॑पेक्षा अ॑मळ जास्तच चैन करतो
असहमत. अशी अनेक क्षेत्रे आहेत की जिथे याहून जास्त पैसे मिळतात. पोटापुरते पैसे मिळतात हे मान्य.
बर॑, ते रोज रोज नवे नवे codes लिहून अन् असलेल्या॑वर डोक॑ आपटून वेड लागायची वेळ येते. deadlines
असतात त्या वेगळ्याच.
हे रिलेटिव्ह असू शकतं. म्हणजे एकदासगळ्याच गोष्टी ** वर मारायच्या ठरवलं की मग कसली आल्येय चिंता ?
आमची स्पेशल आजारपण॑ सोईस्कररित्या नजेरेआड का होतात? अपचन, पित्त इ.इ चिल्लर तर नेहमीचेच, त्याबरोबरीने depression, high BP, heart problems, anxiety वगैरे प्रकार आमच्यासाठीच खास बनवल्यासारखे, डोळ्या॑वर हळू हळू वाढत्या भि॑गाचा दागिना तर हवाच.
असेल कदाचित. पण कंपन्या सहसा जिम्नॅशियम, स्विमिंग टँक इ. आरोग्यवर्धक सुविधाही पुरवतात.
- कामाचा तिटकारा असलेला उडाणटप्पू
9 Feb 2011 - 6:57 pm | मनराव
धम्या, सध्या रात्रीची जगरणं खूप झालेली आहेत बहूतेक........ :P