आज महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन.
गांधीजी, अहींसा आणि त्याला अनुलक्षून स्वातंत्र्य म्हणल्यावर निघणारे वाद (आणि तेच इतर देशभक्त, स्वातंत्र्य सैनीक/सेनानींच्या बाबतीत) चावून चावून चोथा झालेले आहेत. त्यामुळे कृपया करून या धाग्याचा उपयोग त्यासाठी करू नये ही विनंती.
वास्तवीक "गंगेमधे गगन वितळले" हे अंबरीश मिश्र यांचे गांधीजींवरील पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली. (त्या संदर्भात शोधताना माझी आणि भोचक यांचा येथील हा संवाद देखील मिळाला...)
मात्र त्या पुस्तकातील एक मुद्दा माझ्या कायम डोक्यात घोळत राहीला. तो म्हणजे आत्ताच्या भाषेत जर बोलायचे झाले तर गांधीजींनी, "जस्ट डू इट" असे म्हणत अंग झोकून दिले. तत्कालीन काँग्रेस चळवळ* आणि काँग्रेस नेतृत्वाला ते मान्य होते अशातला भाग नाही पण नंतर एकदा का सगळी जनता मागे जात आहे, हे लक्षात आले, तेंव्हा पर्यायच राहीला नाही आणि काँग्रेस चळवळ देखील गांधीजींच्या मागे गेली.
आता हा श्री. मिश्र यांचा मुद्दा बरोबर का चू़क ह्यावर चर्चा होऊ शकते. पण त्याहूनही अधिक चर्चा मला या संबंधात "नेतृत्व" तयार कसे होते यावर कराविशी वाटत आहे. गांधीजींच्या आधी एक टिळक होते ज्यांना "असंतोषाचे जनक" हे चिरोलने एखाद्या शिवीसारखे म्हणले पण ती त्यांची जनतेच्या दृष्टीने मानाची उपाधीच झाली.
टिळक ज्या काळात आले त्या काळात काँग्रेसचे नेतृत्व हे एका विशिष्ठ अंगाने देशभक्ती करत होते. त्या मवाळगिरीस टिळकांच्या जहाल विचार पद्धतीने एका अर्थी "आउट ऑफ बॉक्स" असा विचार दिला आणि कधी अध्यक्ष नसताना देखील जनतेचे नेतृत्व केले. गांधीजी आले तेंव्हा देखील टिळक गेल्याने "जहाल मतवादी राजकारणी नेतॄत्व" उरले नव्हते आणि काँग्रेस नेतृत्व हे परत त्यांच्या "टेक इट इझी" पद्धतीने इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. यात या काँग्रेसी नेतृत्वास कमी करायचा प्रश्न नाही आणि उद्देशही नाही... मात्र गांधीजी आले परत एकदा "आउट ऑफ बॉक्स" विचार करत केवळ काँग्रेस चळवळीसच नाही तर सार्या जनतेस हलवले आणि शस्त्र हातात धरता आले नाही तरी लढा देता येऊ शकतो असे दाखवत नेतृत्व दिले.
अशी अनेक नेतृत्वाची उदाहरणे देता येतील. पण राजकीय नेतृत्वाची उदाहरणे त्यामानाने कमीच मिळतील...
तात्पर्य, "आउट ऑफ बॉक्स" विचार हा केवळ उद्योगधंद्यातच लागत नाही तर मरगळलेल्या समाजमनास परत जागे करण्यासाठी आणि जनतेला या ना त्या रूपाने भरडवणार्या राजकारण्यांना खर्या अर्थाने विरोध करण्यसाठी म्हणून देखील करावा लागतो. तो करणारे आणि "जस्ट डू इट" म्हणत पुढे नेणारे नेतॄत्व जनतेला मिळाले तर त्यातून ती चळवळ, त्यातील गुणदोषांसकट यशस्वी होण्याची शक्यता असते. तेच मार्टीन ल्यूथर किंगने केले आणि मंडेलांनी केले.
मात्र जर हेच नेतृत्वहीन पद्धतीने झाले तर एखादी उल्का तात्पुरती आकाशात चमकून लक्ष वेधते, तितकेच काहीसे दुर्दैवाने अशा अपयशी चळवळींचे भाग्य ठरते. तिआनमेन च्या बाबतीत हेच झाले. अफगाणिस्तानात /इराकमधे चळवळ ही बाहेरच्यांच्या स्पूनफिडींगने झाली तर ते शक्य होऊ शकत नाही... आत इजिप्तच्या बाबतीत काय होईल ते समजेलच.
बाकी अजून एक प्रश्न आज सतत भेडसावत आहे, जर आज गांधीजी असते तर त्यांनी नक्की आजच्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आवाज उठवताना, कशा प्रकारे, "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असता? आवाज उठवला असता हे देखील नक्की, अहींसात्मकच राहीले असते हे देखील नक्की, पण गांधींजींच्या व्यक्तीमत्वाचा विचार केल्यास त्यांनी वापर करताना वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले असते असेच वाटत राहते. पण कसे याचे उत्तर मला मिळत नाही आहे, तुम्हाला ते उत्तर माहीत आहे का अथवा ते उत्तर वापरणारा गांधी कुठे आहे ते माहीत आहे का?
-----------------------------
* काँग्रेस हा राजकीय पक्ष म्हणून नंतर त्यातूनच जरी उदयास आला असला तरी, काँग्रेस चळवळ म्हणूनच स्वातंत्र्याच्या पहाटे पर्यंत अस्तित्वात होती. थोडक्यात नंतरच्या काँग्रेसींवर शक्यतो चर्चा नसावी असे वाटते.
प्रतिक्रिया
30 Jan 2011 - 9:08 pm | पैसा
आपण म्हणताय ते बरोबर आहे. रुळलेल्या वाटेपेक्षा वेगळी वाट दाखवणारा नेता सामान्य जनतेला नेहमीच भावतो. नंतरच्या काळात हे जयप्रकाशजींच्या बाबतीत सुद्धा दिसून आलं होतं.
आताच्या काळात गांधीजी असते तर त्यानी सत्याग्रहाचाच रस्ता धरला असता असं वाटतं. कारण त्यानी जन्मभर अहिंसा आणि सत्य याचाच पाठपुरावा केला होता. त्यात ते कदाचित थोडेफार यशस्वी झाले असते कारण ते गांधीजी होते. पण दुसर्या कोणी लहान माणसाने या मार्गांचा अवलंब केला तर त्याची नामोनिशाणी सुद्धा उरणार नाही. आपल्या दुर्दैवाने भारतात तरी सगळी व्यवस्था हलवू शकेल असा कोणी नेता सध्या तरी दिसत नाही....
स्वातंत्र्य मिळताच काँग्रेस विसर्जित करून टाका असंही या महात्म्याने सांगितलं होतं. म्हणजेच त्याना आताच्या पद्धतीची पक्षीय लोकशाही भारतासाठी योग्य नाही असं कदाचित वाटलं असावं.
पण प्रत्यक्षात झालं ते भलतंच. त्यामुळे गांधीजीना आपण फक्त भिंतीवरच्या तसबिरीत बंदिस्त करून ठेवलं. त्यांच्या जयंती पुण्यतिथीला त्यांच्या तसबिरीला हार घातले की बाकी ३६३ दिवस वाटेल ते करायला आपण आणि आपण निवडून दिलेले पुढारी (मी त्याना नेते म्हणणार नाही..) मोकळे झालो....
30 Jan 2011 - 9:13 pm | स्पा
यानिमित्ताने गांधीवादी यांची आठवण येऊन अमळ डोळे पाणावले
30 Jan 2011 - 9:16 pm | धनंजय
गांधींचा लोकसंग्रह अफाट आणि कार्य मोठे आहे.
मोठ्या प्रमाणात बदलाशिवाय लोकसंग्रहाशिवाय पर्याय नाही. ज्यांचे स्वतःशी आणि एकमेकांशी पटत नाही, अशा लोकांना एकमेकांसह काम करण्यात गोवणे हे येर्याबबाळ्याचे काम नव्हे. गांधी हे त्या काळात झालेल्या घडामोडींचे एक अपरिहार्य कारण होते.
30 Jan 2011 - 11:13 pm | निनाद मुक्काम प...
आज सुका दिवस
कितीतरी तळीरामांनी काल रात्रीस स्टोक आणून ठेवला असेन .सरकारी कर्मचार्यांनी रविवारी पुण्यतिथी आली म्हणून हक्काची रजा गेली म्हणून आपला राग घोबी घाट पाहून शांत केला असेल .
पंचात्रांकित हॉटेलात गुपचूप मदिरा प्रश्न चालत असेन .
ह्या एका दिवसात राजकीय संताचे आदर्श त्यांचे अनुयायी /राजकारी व त्यांची प्रजा कशी काय स्मरण करणार ?
उरलेले वर्षभर राजकारणी व प्रशासकीय अधिकारी / विविध शेत्रातले माफिया कितपत पाळणार.?
हा एक दिवसाचा सुका देखावा करून अनेक लोकांची रोजगार मारल्या गेला .
पण मला आशा आहे .आज दारूबंदी केल्यामुळे महारष्ट्र प्रगत राज्ये बनणार आहे .
जय हिंद
जय महारष्ट्र
31 Jan 2011 - 12:23 am | सुनील
गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन.
आवाज उठवला असता हे देखील नक्की, अहींसात्मकच राहीले असते हे देखील नक्की
सहमत.
पण गांधींजींच्या व्यक्तीमत्वाचा विचार केल्यास त्यांनी वापर करताना वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले असते असेच वाटत राहते
असे वाटण्याचे कारण काय?
मला वाटते, अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात "माहितीच्या अधिकाराचा कायदा" आणण्यासाठी जशा प्रकारचे आंदोलन केले तशाच प्रकारचे आंदोलन त्यांनी केले असते, असे म्हणण्यास वाव आहे.
असहकार नक्कीच केला असता पण कायदेभंग कदाचित केला नसता. उपोषणाचा मार्ग नक्कीच चोखाळला असता.
कदाचित, स्वतंत्र भारताने बनवलेले कायदे अभ्यासून, त्यांचाच उपयोग अधिक परिणामकाराक रीतीने सत्ताधार्यांविरुद्ध केला असता, असे म्हणता येईल.
शेवटी हा जर-तरचा प्रश्न आहे. कल्पनाविलास करावा तेवढा कमी!
31 Jan 2011 - 2:02 am | शुचि
सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार गांधीजींनी आजन्म केलाच पण त्याबरोबरच - साधी रहाणी आणि मितव्ययता ही दोन तत्वे देखील त्यांनी अंगीकारली आणि आपल्या आचरणातून त्यांचा पाठ घालून दिला. भ्रष्टाचाराचा आणि पैशाचा जो भस्म्या रोग समाजात पसरला आहे त्यावर उपाय हाच.
पैशाची आणि आपले खूप क्लिष्ट असे मानसिक नाते असते. बरेचदा "ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्हली" आपण पैसा गोळा करत असतो या भस्म्या रोगाला समाजात प्रतिष्ठा देखील मिळत असते. "सोल ऑफ मनी" या पुस्तकात या संदर्भातील काही मिथ्सचा उहापोह लेखिकेने अतिशय उत्तम रीतीने केला आहे.
मला वाटतं आज जर गांधीजींच्या कोणत्या तत्वांची खरी गरज समाजाला असेल तर ती आहे - साधी रहाणी आणि मितव्ययता.
बाकी गांधीजींनी काय पद्धत वापरली असती - कल्पना नाही करता येत.
31 Jan 2011 - 5:54 am | गुंडोपंत
"जस्ट डू इट" असे म्हणत अंग झोकून दिले. तत्कालीन काँग्रेस चळवळ* आणि काँग्रेस नेतृत्वाला ते मान्य होते अशातला भाग नाही पण नंतर एकदा का सगळी जनता मागे जात आहे, हे लक्षात आले, तेंव्हा पर्यायच राहीला नाही आणि काँग्रेस चळवळ देखील गांधीजींच्या मागे गेली.
एकटा माणूस काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण! समयोचित लेख. धन्यवाद!
31 Jan 2011 - 8:40 pm | अप्पा जोगळेकर
खूपच छान लिहिले आहे. तळागाळातल्या लोकांचा, तेल्यातांबोळ्यांचा पुढारी म्हणून सर्वप्रथम पुढे आलेल्या पुढार्यांमध्ये लोकमान्य टिळक हे अग्रणी होत. त्यांचाच वारसा महात्मा गांधिंनी पुढे चालवला. जरी ते अहिंसात्मक राजकारण होते तरी त्याचा बाज जहाल राजकारणाचाच होता. ते अर्ज विनंत्यांचे राजकारण नव्हते. गांधीजींच्या चळवळीची इंग्रजांना दहशत वाटत होती. चरखा फिरवून कोणाला स्वराज्य मिळवता येते का असं म्हणणारे चार भिंतींमध्ये तावातावाने चर्चा करत बसले आणि गांधीजींना हसत राहिले. ( स्वा. सावरकर हा सन्माननीय अपवाद. त्यांनी खरोखरंच त्यांना जो मार्ग रास्त वाटला त्यासाठी खस्ता खाल्या. आणि आयुष्यभर गांधींशी अयशस्वी झुंज घेतली.) चरखा फिरवून स्वराज्य मिळत नसते हे खरेच आहे. एका माणसाच्या आदेशावरुन एका वेळेला एक लाख माणसे चरखा फिरवतात म्हणून स्वराज्य मिळत असते असे नरहर कुरुंदकर म्हणायचे.
31 Jan 2011 - 11:04 pm | इन्द्र्राज पवार
श्री.विकास यांच्या धाग्यातील प्रमुख मुद्दा "नेतृत्व" तयार कसे होते हा असल्याने या प्रतिसादात टिळक आणि गांधी यांच्या नेतृत्वशैलीवरच प्रामुख्याने चर्चा त्याना अपेक्षित असणार हे उघडच आहे. दोन्ही महान नेते देशाच्या गळ्यातील ताईत होते होते आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या दोन नावानंतरच तिसरे नाव येईल. चिरोलचा उल्लेख श्री.विकास यानी केला आहे पण खरे सांगायचे तर चिरोलनेच टिळकांचे अचूक वर्णन केले आहे असे म्हणावे लागेल; कारण १८५७ चा उठाव शमल्यानंतर सुखनैव राणीचे राज्य येथे चालू असताना त्या राज्याविरूद्ध भारतात दोनवेळचे खाऊन झोपी गेलेल्या जनतेच्या मनात जर प्रथम असंतोष कुणी उत्पन्न केला असेल तर तो टिळकांनीच. त्या अंतोषाचे जनकत्व जसे त्यांच्याकडे जाते तद्वतच त्यामुळे जनतेचे नेतृत्वही आपोआपच त्यांच्याकडे चालत आले. गांधीजी इंग्रजांना बुद्धिमान आणि कर्तबगार मानत, तसे टिळकही मानत पण त्याचबरोबर 'साहेब' दुष्ट, ढोंगी आणि कपटी आहे याबद्दल टिळक ठाम होते. गांधीजींकडे ज्यावेळी देशाचे नेतृत्व चालून आले त्यावेळीही इंग्रजांना त्यांच्याविषयी कधी असूया वा तिरस्कार वाटला नाही कारण ते टिळकांना आपले मित्र मानत नसत पण त्याना गांधीजी आपले मित्र वाटत. टिळकांना इंग्लंडमध्ये असताना कुठल्या इंग्रजाचे घरचे निमंत्रण आले नव्हते मात्र गांधीजींचे रस्त्याच्या दुतर्फा उभारून इंग्रजी जनतेने स्वागत केले इतकेच नव्हे तर राजवाड्यावरसुद्धा थेट बादशहासमवेत त्याना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले. तिथेही पंचा नेसून स्वतःचे अन्न घेऊन गांधीनी आपले वेगळेपण जपले....ही बाब 'नेतृत्व' पक्के होण्यास फार उपयुक्त ठरली.
टिळक कायद्याला फार मानत आणि हेही चांगले जाणून होते की, इंग्रजाची "प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही मूलभूत हक्क आहेत आणि ते त्याला मिळालेच पाहिजे" या तत्वावर असलेली श्रद्धा. हक्क आणि कायदा हे इंग्रजांचे श्वास आणि नि:श्वास असल्याने "मी माझ्या हक्कासाठी लढतो आहे' असे टिळक कायद्याच्या चौकटीत राहूनच म्हणत असत. त्यामुळे त्याना जरी राजद्रोहाखाली शिक्षा झाली तरी त्यानी 'मी राजद्रोहाचा गुन्हा केलेला नसल्याने निरपराधी आहे...' असे म्हटले होते, पण अस्तित्वात असलेल्या कायद्याचे धिंडवडे त्यानी काढल्याचा इतिहासात दाखला नाही. या उलट 'मी राजद्रोहाचा गुन्हा केला आहे त्यामुळे त्याच कायद्याच्या आधारे मी गुन्हेगार असल्याने मला जास्तीतजास्त शिक्षा मिळावी.." असे गांधीजी म्हणाले. दोघांच्या या अदभुत गुणांमुळे इंग्रज त्याना मानत आणि सबब त्यामुळे त्यांच्या अशा अलौकिक नेतृत्वगुणांमुळे सर्वसामान्य जनताही.
स्वातंत्र्याचा लढा हा बंदुकीच्या मार्गाने चालावा असे 'जहाल' टिळकांनी कधीही मानले नाही आणि 'मवाळ' गांधीजींचा तर तो प्रांतच नव्हता. कायदेभंग तर करायचाच पण तोही सांगूनसवरून, लपाछपीने नव्हे. दुसर्या शब्दात 'या बागेतील फुले तोडू नका...' हा आदेश धुडकावून लावून गुलाब तर तोडायचेच पण त्याचबरोबर त्याची किंमतही तेथील माळ्याकडे सुपूर्द करायची, असली विलक्षण नीती दोघांच्या नेतृत्वामध्ये असल्याने त्या त्या काळात दोघांनाही कधीही अनुयायांची कमतरता भासली नाही.
"...आउट ऑफ बॉक्स" विचार मरगळलेल्या समाजमनास परत जागे करण्यासाठी आणि जनतेला या ना त्या रूपाने भरडवणार्या राजकारण्यांना खर्या अर्थाने विरोध करण्यसाठी म्हणून देखील करावा लागतो..."
~ खरंय....स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सूज आलेल्या समाजास हलवून जागे करण्याचे काम काही प्रमाणात जयप्रकाश नारायण यानी केले होते हे मानलेच पाहिजे. पण तो एक सणसणीत अपवाद ठरला. थोड्याच कालावधीत जेपीना हयातीतच त्यानी उभा केलेला वड कोसळल्याचे पाहायला लागले आणि त्यानंतर विनातक्रार एखाद्याच्या मागे जावे असे नेतृत्व भारतात तयार झालेले नाही....आणि आता तर ती शक्यताही उरलेली नाही. प्रादेशिक पातळीवर काही प्रमाणात श्री. विकास म्हणतात त्याप्रमाणे एखाददुसरी 'उल्का' चमकते, पण तीसुद्धा नियमाला अपवाद असतो हे सिद्ध करण्यापुरतेच.
"...जर आज गांधीजी असते तर त्यांनी नक्की आजच्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आवाज उठवताना, कशा प्रकारे, "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असता?..."
~ उघड आहे की हा प्रश्न 'हायली हायपोथेटिकल' आहे; पण जर उत्तर द्यायचेच असेल तर इतकेच म्हटले पाहिजे की, आजच्या राजकर्त्यांनी मुळात गांधीना आवाज काढूच दिला नसता आणि त्यातूनही त्या महात्म्याने खास "गांधीगिरी" थाटात आवाज काढलाच असता तर ह्या नादान मंडळीनी त्या आवाजाला हसवून उडवून लावले असते. आजच्या राजकारणात फक्त गुरासारखे मतदान केन्द्राकडे येणार्या जनतेला "गांधी आडनावाची मोहिनी" हवी, 'गांधी नेतृत्वगुण" कुणालाही नको आहेत.
इन्द्रा
31 Jan 2011 - 11:31 pm | विकास
येथे आलेल्या प्रतिसादांना एकत्रीत उत्तर देयचे होते/आहे. त्या आधी सर्व वाचक-प्रतिसादकांना धन्यवाद.
श्री. इन्द्रराज पवार यांचा नेहमीच्या पद्धतीत खूप माहितीपूर्ण प्रतिसादतर मस्तच!
काही खुलासे:
श्री.विकास यांच्या धाग्यातील प्रमुख मुद्दा "नेतृत्व" तयार कसे होते हा असल्याने या प्रतिसादात टिळक आणि गांधी यांच्या नेतृत्वशैलीवरच प्रामुख्याने चर्चा त्याना अपेक्षित असणार हे उघडच आहे.
वास्तवीक तसा उद्देश नव्हता. मात्र, "दोन्ही महान नेते देशाच्या गळ्यातील ताईत होते होते आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या दोन नावानंतरच तिसरे नाव येईल." हा विचार असल्याने आणि दोघांकडे काँग्रेसचे औपचारीक नेतृत्व (अध्यक्षपद) नसताना देखील स्वांतसुखाय नेतृत्वास "बिझनेस अॅज युज्वल" अशा वृत्तीतून बाहेर ओढून आणले इतकेच म्हणायचे होते.
तरी देखील आपण दिलेली माहीती नक्कीच महत्वाची आणि या चर्चेत शोभणारी आहे. त्यासंदर्भात जाता जाता:
स्वातंत्र्याचा लढा हा बंदुकीच्या मार्गाने चालावा असे 'जहाल' टिळकांनी कधीही मानले नाही
खरे आहे. वासुदेव बळवंत फडके हे त्यांच्या क्रांतीकार्याच्या वेळेस तत्कालीन विशीतील टिळकांना भेटले होते. मात्र टिळ्कांचे आणि त्यांचे पद्धतीवरून मतभेद झाले होते. फडक्यांनी तलवारच हातात ठेवली आणि टिळकांनी लेखणी + लोकसंग्रह.
"जर आज गांधीजी असते तर .." उघड आहे की हा प्रश्न 'हायली हायपोथेटिकल' आहे;
मला वाटते येथे माझा लेखनदोष अथवा मर्यादा समजावीत. हा प्रश्न जरी "जर-तर"च्या रुपात दिसत असला तरी उद्देश गांधीजी कसे वागले असते वगैरे नसून आत्ताच्या भारतात जे काही सर्वपक्षियांनी आणि राजकारण्यांनी तळ गाठला आहे आणि जनतेचा त्रास हा वाढतच चालला आहे त्या वेळेस नक्की कसे वागावे ह्या संबंधातील मुद्दा होता. म्हणून "गांधी पुण्यतिथीनिमित्ताने..." असे म्हणले. जर गांधीजी असे वागले असते (अथवा गांधीजींच्या ऐवजी, इतर कुठल्याही लाडक्या/पटणार्या नेत्याचे नाव घालता येईल) वगैरे म्हणत तसेच वागून आपण पुढे जाऊ शकणार आहोत का? नाहीतर समाजातील वाढणारी दरी, चिडचिड यातून वेगळ्या पद्धतीने इजिप्तची लाट येऊ शकते का आणि आल्यास त्या लाटेला दिशा देणारा लायकीचा लोकनायक नसणे हा मुद्दा आहे.
असो...
1 Feb 2011 - 6:36 am | Pain
दुसर्या शब्दात 'या बागेतील फुले तोडू नका...' हा आदेश धुडकावून लावून गुलाब तर तोडायचेच पण त्याचबरोबर त्याची किंमतही तेथील माळ्याकडे सुपूर्द करायची,
जमीन माफियांची कार्यपद्धती अशीच असते (थोडी अजून वाईट). हे तर साफ चूक आहे
1 Feb 2011 - 9:18 am | इन्द्र्राज पवार
"....जमीन माफियांची कार्यपद्धती अशीच असते..."
श्री.Pain यानी केलेली 'गुलाब' उदाहरणाची तुलना अलिकडील काही अप्रिय घटनांशी संबंधित दिसते म्हणजे माझ्या उदाहरणातील गुलाबाला विचित्र वास येतोय हे नक्की झाले. वास्तविक ती तुलना त्या दोघांच्या मनोवृत्तीशी निगडित होती जिची नोंद ब्रिटिश सरकार घेत होतेच.
'मामनुस्मर युद्ध च' या तत्वावर टिळक आणि गांधी या दोघांचाही गाढा विश्वास होता व त्यांच्या प्रत्येक कृतीत याच तत्वाचा त्यानी अंगीकार केल्याचे दिसते. तत्व सांगते "परमेश्वराला स्मरून युध्द कर", यात अहिंसा सुचित होतेच. कारण परमेश्वराला स्मरून जो लढतो तो काही दुसर्याच्या प्राणाचे, संपत्तीचे आणि देशाचे अपहरण करण्याच्या बुद्धीने लढत नाही. दुष्टास साधूपणाने जिंकण्यासाठी वेळप्रसंगी कायदा तर तोडावा लागतोच पण त्यामुळे जर त्याच कायद्यानुसार जर काही नुकसान [इथे 'गुलाब' तोडला म्हणून बागेची झालेली क्षिती] झाले तर स्वःताच त्याची नुकसानभरपाईही द्यायची, हे तत्वज्ञान 'नेतृत्व' गुणांची झलक दाखविणारीच सिद्ध होते अंतीमतः
श्री.Pain यानी उल्लेखिलेली तुलना त्यामुळेच अप्रस्तुत आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते, ती कशी याचा खुलासा करणे म्हणजे त्या माफियाचा जमिनीचा मोबदला देण्यामागील हेतू आणि त्यासाठी करावी लागणारी कृष्णकृत्ये चर्चेला घ्यावी लागेल, आणि "गांधी पुण्यतिथी' निमित्ताने सादर केलेल्या श्री.विकास यांच्या या धाग्याचा तो उपमर्द ठरेल....इतकेच.
इन्द्रा
1 Feb 2011 - 2:32 pm | प्रसन्न केसकर
पण...
माझ्या मनात वेगळा विचार येतो. टिळक जहाल गटाचे नेतृत्व करीत हे तर खरेच पण तो जहाल गट वेगळ्या उद्देशाने कार्यरत होता.
तेव्हाचे जहाल आणि मवाळ गट होते ते तत्कालिन काँग्रेसमधे. वेळोवेळी भारतीय राजकीय आकांक्षा जसजश्या वाढत गेल्या तसतसे काँग्रेसचे नेतृत्व, कार्य, मागण्या सर्वच बदलत गेले. काँग्रेसचे मुळ अॅलन ह्युम, बेझंटबाई इत्यादींमधे. हे सर्व इंग्रज आणि ह्युम तर परकी साम्राज्याचे नोकरशहा. स्थापनेच्या वेळी साहजिकच काँग्रेसचे उद्दिष्ट स्वातंत्र्य नसणार. किंबहुना स्वातंत्र्याच्या इतद्देशीयांच्या आकांक्षेस आळा घालणे, अश्या खटाटोपांपासुन जनतेला दुर ठेवणे हेच काँग्रेसच्या स्थापनेचे इंगित असावे.
भारतात कंपनी सरकारचा एकछत्री अंमल सुरु झाला १८२० पासुन. पण लगेचच त्याला स्थानिकांकडुन आव्हान देखील मिळु लागले होते. पेशव्यांचा पराभव होऊन त्यांना महाराष्ट्राबाहेर तडीपार झाल्यावर लगेचच शनिवारवाड्यावरचा युनियन जॅक जाळण्यात आला होता. तत्कालिन काहीमाजी पेशवाई सैनिकांनी गारद्यांशी हातमिळवणी करुन इंग्रजी सत्तेविरोधी कारवाया देखील सुरु केल्या होत्या. (हा काळ म्हणजे लहुजी वस्ताद साळवे, त्यांचे शिष्य उमाजी नाईक यांचा.) या कारवायांचीच परिणिती वासुदेव बळवंत फडकेंच्या बंडात (किंवा क्रांतीत) झाली. या सर्वांमधे इंग्रजी सत्ता उलथवुन लावणे हाच हेतु होता. अश्याच कारवाया अन्यत्र देखील सुरु असाव्यात. आणि त्यांचा समग्र परिणाम १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात झाला असावा. १८५७ मधेच कंपनी राज्य संपले आणि राणीचा अंमल व उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. अश्या वेळी एतद्देशीयांच्या आकांक्षाना वेगळी दिशा देण्याची गरज ओळखुन ह्युम प्रभृतींनी काँग्रेसची स्थापना केली असावी. याचा अर्थ असा की मुळ काँग्रेस स्वातंत्र्याकरता नव्हती तर एतद्देशीयांच्या असंतोषास वाट देणारा एक फोरम म्हणुन होती. (काँग्रेसचा उगमच होम रुल लीग मधुन आहे.)
टिळकांपुढे व तत्कालिन नेतृत्वापुढे अर्थातच स्वातंत्र्यासाठी बंड किंवा सनदशीर मार्गाने काँग्रेसच्या माध्यमातुन राजकीय सुधारणांसाठी (स्वराज्य किंवा होम रुल) प्रयत्न करणे हे पर्याय तेव्हा होते. हे प्रयत्न कितपत आक्रमकतेने करायचे याबाबत मतभेद असु शकतील पण उद्दीष्टांमधे नसावेत. (टिळकांनी स्वातंत्र पेक्षा स्वराज्य या शब्दाचाच अधिक वापर केलेला दिसतो.)
पण १९३५ मधे प्रांतिक सरकारे आली आणि स्वराज्य ही मागणी बरीचशी साध्य झाली. अश्या परिस्थितीत स्वातंत्र्य ही पुढची मागणी होणे साहजिक होते आणि तेच गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने केले. असा विचार केला तर ह्युम, फिरोजशहा मेहता-न्या. रानडे इ, टिळक्-बिपिनचंद्र पाल- लाला लजपतराय इ. व त्यानंतर ना. गोखले-गांधी ही साहजिक प्रोग्रेशन ठरते. व टिळक आणि गांधी परस्परविरोधी न ठरता परस्परपुरक ठरतात.
2 Feb 2011 - 10:40 am | इन्द्र्राज पवार
"....स्थापनेच्या वेळी साहजिकच काँग्रेसचे उद्दिष्ट स्वातंत्र्य नसणार...."
~ अर्थातच. किंबहुना त्यामुळेच वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र क्रांती मार्गे ब्रिटिशांपासून देश मुक्त करण्याच्या प्रयत्नाला मूठभर स्थानिकांचा (त्यातही त्यावेळी अशिक्षित समजल्या जाणार्या रामोशी, कोळी, धनगर आदी बहुजन समाजातील युवक) पाठिंबा सोडता कोणत्याही राज्य पातळीवरील नेत्याने त्या प्रयत्नाला आशीर्वाद दिल्याचा दाखला नाही. राष्ट्रपातळीवरील पुढार्यांचा तर प्रश्नच नव्हता....कारण देशात त्या काळी...१८५७ नंतर...महाराष्ट्र आणि बंगाल सोडले तर इंग्रज राजवटीविरूध्द काही वेगळा विचार चालू होता असे बिलकुल नव्हते. राजेरजवाडे आणि त्यांची रयत 'खाओ पियो...' अशा मनोवृत्तीचीच होती.
कॉन्ग्रेस स्थापनेच्या काळात तर नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या दिग्गजांनी इंग्रजी राज्य हे या देशावरचे संकट आहे हे कधीच मानलेले दिसत नाही. लोकहितवादी देशमुखांसारखे समाजसुदारक तर आपल्याच देशबांधवांना लेखातून सुनावत की, "तुमचे राज्य गेले ते योग्यच झाले. तुमच्यासारखे मूर्ख आणि अज्ञानी लोक जगाच्या पाठीवर नाहीत !" न्या.रानडे यानी तर "इंग्रजांचे येथे राज्य या देशात आले हे परमेश्वराच्या इच्छेनुसारस झाले असल्याने प्रथम इंग्रजांकडून शहाणपणा शिका अन् मग त्यांच्याकडून राज्य मागा." गोखले तर रानडे यांचेच शिष्य, त्यामुळे गुरूंसारखेच त्यांचेही मत असणे हे काही वेगळे नव्हते. जरी अगदी मरेपर्यंत त्यानी राजकीय चळवळीत भाग घेतला, तरी टिळकांप्रमाणे त्यानी अगदी तीव्रतेने इंग्रजाचे राज्य या देशातून गेल्यावाचून जनतेचा उद्धार होणार नाही असे कधीही म्ह्टलेले नाही.
त्यामुळे खर्या अर्थाने स्वातंत्र्याची मागणी (श्री.केसकर वर आपल्या प्रतिसादात म्हणतात त्याप्रमाने खरे तर "स्वराज्य") केली ती लोकमान्य टिळकांनीच, जी पुढे महात्मा गांधी यानी "छोडो भारत" पर्यंत पुढे नेली.
टिळकांपुढे व तत्कालिन नेतृत्वापुढे अर्थातच स्वातंत्र्यासाठी बंड किंवा सनदशीर मार्गाने काँग्रेसच्या माध्यमातुन राजकीय सुधारणांसाठी (स्वराज्य किंवा होम रुल) प्रयत्न करणे हे पर्याय तेव्हा होते. हे प्रयत्न कितपत आक्रमकतेने करायचे याबाबत मतभेद असु शकतील पण उद्दीष्टांमधे नसावेत.
~ 'स्वातंत्र्यासाठी बंड' ही संकल्पना टिळकांना कधीच पचनी पडली नाही. 'सनदशीर मार्ग' यावर त्यांचा गाढा विश्वास होता. इंग्रजी राज्यातील काही कायदे वाईट, अन्यायी आहेत हे जरी टिळकांनी माहीत होते, पण म्हणून इंग्रजांच्या कायद्यावर माझा विश्वास नाही किंवा तो मी पाळणार नाही अशी भाषा त्यांनी कधी उच्चारली असे कागदपत्रात आढळत नाही. एका अर्थाने ते 'घटनावादी' होते हे मान्य करावे लागेल. त्यामुळे राजकीय सुधारणा जरी अत्यावश्यक बाबीत मोडत असल्या तरी त्यासाठी बंदूक हाती घेऊन त्या केल्या पाहिजेत असे लोकमान्यांनी कधी मानले नाही, उलट साहेबांशी लढायचे तर कायद्याच्या भाषेतूनच...हा उद्देश्य त्यानी पाळल्याचे दिसून येते.
"...टिळक आणि गांधी परस्परविरोधी न ठरता परस्परपुरक ठरतात...."
~ हेही मान्य आहेच. पण टिळकांचा 'तेजस्वीपणा' आणि गांधींचा 'साधेपणा' ही दोन ठळक वैशिष्ट्ये या देशाने कायम मानली आहेत. गांधींना "फॉलो" करणे म्हणजे अंगावर खादीचे कपडे चढवले आणि डोक्यावर ती प्रसिद्ध गांधीटोपी घातली की कोणत्याही गण्यागंप्याला 'देशभक्त' चे बिरूद मिळत असे असा गांधींचा प्रभाव झाला, मात्र टिळकांच्या 'पगडी आणि पेहरावा'ची नक्कल करून 'मीच पुढचा बळवंतराव...' अशी उगाच प्रौढी कुणी मारण्याची धमक दाखवली नाही, याला कारणही टिळकांच्या सावलीत येण्यासाठीही किमान तेवढे तेज अंगी असणे आवश्यक होते, ते त्यांच्या निधनानंतर कायमचे लुप्त झाले.
जरी टिळक आणि गांधी यांच्या तात्विक दृष्टीकोणात काही भेद असले तरी देशाचे स्वराज्य आणि जनतेचे कल्याण व्हावे हे दोघांचेही समानच उद्दिष्ट होते, तसेच रक्तबंबाळ क्रांती दोघांनाही कधीच अभिप्रेत नव्हती असाच इतिहास सांगतो. त्यामुळे या दोन महान विभूतींच्या कार्याचा आढावा घेताना वा तुलना करताना 'हा कमी आणि तो श्रेष्ठ' किंवा 'याच्यापेक्षा त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले' असे म्हणणेही अपरिपक्वतेचे लक्षण मानावे लागेल.
असो.....थॅन्क्स टु बोथ श्री.विकास आणि श्री.प्रसन्न केसकर....तुम्हा दोघांमुळे आणखी थोडा अभ्यास करायला मिळाला.
इन्द्रा
2 Feb 2011 - 3:44 pm | प्रसन्न केसकर
तेव्हा पर्याय कोणता असणार होता?
सगळी परिस्थिती विचारात घेतली तर लोकमान्य टिळक काँग्रेसमधे सामील झाले १८९० च्या सुमाराला, म्हणजे १८५७ नंतर तीस वर्षात. १८५७ हा इंग्रजांना मोठा धक्का होता. तत्कालिन परिस्थिती पाहिली तर इंग्रजांनी उच्चकुलीन मुस्लीम व हिंदुंमधील नेतृत्व सांभाळणार्या उच्चवर्णियांना १९व्या शतकाच्या सुरुवातीसच एकटे पाडले होते. (अगदी महाराष्ट्रापुरता विचार केला तरी दलितांमधील, बहुजन समाजातील अनेकजण पेशवाईच्या पराभवाआधीच इंग्रजांना सामील झालेले होते. अर्थातच त्यात केवळ इंग्रजांचे कौशल्य नाही तर तत्कालीन इतद्देशीय नेतृत्वातील स्वार्थीपणा, जातीपातींमुळे आलेली विषमता यांचाही तो परिपाक होता.) अश्या परिस्थितीत इंग्रजांचा भक्कम सपोर्ट बेस १८२० नंतर केवळ ३०-४० वर्षातच कोलमडला व इंग्रजांविरोधात अनेक जाती धर्माचे लोक एकजिनसी नेतृत्व नसतानाही मोठ्या भुभागात एकत्र येऊन लढले, ते बंड अमानुष क्रौर्य दाखवुन चिरडावे लागले आणि तरीही कंपनी राज्य त्यामुळे मोडीत गेले. या इतिहासाच्या पार्श्वभुमीवर इंग्रज इतद्देशीयांबाबत संशयी असणे साहजीकच होते. १८५७ च्या अपयशाने खचलेले लोक देखील निराश, उदासीन असणार होते. हे लक्षात घेता तातडीने कोणतीच इंग्रजविरोधी कारवाई करणे शक्य नव्हते. त्यामुळे सुसरीबाई तुझी पाठ मऊ असा दृष्टीकोण अपरिहार्य होताच. तो स्वीकारला नसता तर राजकीय चळवळीसाठी जनता एकत्र आलीच नसती कदाचित.
हाच प्रश्न जाती-धर्माबाबतही होता. आधीच पिचलेल्या, संशयी आणि आधी एतद्देशीय आणि नंतर इंग्रज अत्याचारांनी खचलेल्या बहुजन व दलित समाजातुन फारसे काही साध्य होणे कदाचित तत्कालिन नेतृत्वाला शक्य वाटले नसेल. त्यामुळे एकेकाळी सत्तेचा लाभ मिळालेल्या व इंग्रज राज्यात महत्व कमी झालेल्या समाजघटकांमधुन पाठिंबा मिळवणे हे प्राधान्याचे झाले असेल. कदाचित त्या कंपल्शन्समुळे वेदोक्त प्रकरणासारख्या प्रसंगी टोकाची भुमिका घेणे घडु शकते.
सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत बोलायचे तर मुळात त्यामागे धार्मिक भाग कमी आणि सामाजिक्-राजकीय भाग अधिक होता असे मला वाटते. मुळ गणेश संप्रदायाचा उत्कर्ष झाला पेशवे काळात, आणि त्यात बरीच कर्मठता होती. परंतु सार्वजनिक स्वरुपात गणपतीची पुजा सुरु झाली ती बडोद्याला. (बडोद्यातले सुधारक वातावरण याबाबत फारसा उहापोह गरजेचा नसावा.) तेथुन ती आली पुण्यात. ती देखील दारुवाला पुलावर झालेल्या धार्मिक दंगलींच्या पार्श्वभुमीवर. त्याआधीच मुस्लीम्-इंग्रज हनिमुन सुरु झाला होता. अर्थातच तिचे स्वरुप अधिक व्यापक सामाजिक असणे अपेक्षित असणार. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात सोवळे ओवळे नाकारणे, देव सार्वजनिक करणे ही तत्कालीन समाजाला क्रांतीकारक घटना वाटलेली असणारच. पण त्याही काळात एकदा रमजान व गणेशोत्सव एकत्र आले तेव्हा एकाच मांडवात ताबुत व गणपती बसवले असे उल्लेख आहेत. हे त्यातील धार्मिकतेला छेद देते.
शिवजयंती तर सरळ सरळ ब्राम्हण्-अब्राम्हणांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने सुरु झाली होती. तीच गोष्ट फॅमिन अॅक्ट चळवळीचीही.
या सर्वातुन हळुहळु काँग्रेसचा मास बेस तयार होत गेलेला असावा. त्याचा परिणाम स्वराज्याची मागणी आधी टिळकांनी (स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...) व त्यानंतर गांधीजींनी करण्यात होणे सहज शक्य झाले. १९४२ पर्यंत स्वराज्य हीच काँग्रेसची मागणी होती.
आणि तत्कालिन परिस्थितीत काँग्रेस कितपत सर्वसमावेशक होती हे देखील तपासावे लागेल. मुस्लीमांनी काँग्रेसला फारसा प्रतिसाद उत्स्फुर्तपणे दिलेला दिसत नाही. मौ. आझादांसारखे हाताच्या बोटावर मोजण्याएव्हढेच (कि आझाद एकटेच) मुस्लीम नेते काँग्रेसमधे सामील झाले. अश्या परिस्थितीत काँग्रेस फक्त हिंदुंची संघटना नाही, ती सर्व इतद्देशीयांचे प्रतिनिधित्व करते हे दर्शवण्यासाठी गांधीजींना देखील लीग सारख्या पक्ष व मौलाना अहमद अली, शौकत अली सारख्या नेत्यांना बरोबर घेण्याचे कंपल्शन असावे.
दुसर्या बाजुला जहाल गट (त्यातले प्रमुख सावरकर असे समजु) देखील अश्याच धर्मसंकटात असणार. हाती पडेल ते आधी ताब्यात घेण्याचे कंपल्शन त्यांनाही असणार. कदाचित त्यामुळेच हिंदु महासभेने सिंध, बंगालच्या प्रांतिक सरकारांमधे लीगबरोबर समझोता केलेला असु शकेल.
असा विचार केला तर तत्कालिन परिस्थितीतील काँग्रेसला मुस्लीम अनुनयाचा दोष देणे अवघड होईल आणि सावरकरांवरही मुस्लीम द्वेषाचा आरोप करता येणार नाही.
2 Feb 2011 - 11:18 am | सहज
धागा आवडलाच. प्रतिसादही वाचनीय विशेषता प्रसन्नदा व इंद्रा.
गांधीजींनी पुन्हा सुरवात आम आदमीला समोर ठेवूनच केली असती, तडजोड करु नका असा आग्रह केला असता. "चलता है' ह्या टिपीकल भारतीय प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवला असता असे वाटते. प्रशासनात पारदर्शकता तसेच मतदान हा अधिकार कसा वापरावा, देशाचे सरकार, स्थानीक संस्था, राज्य संस्था निवडताना काय निकष ठेवावे याबद्दल जनजागृती केली असती असे वाटते. अजुन सामाजीक सुधारणा, राष्ट्रीय एकात्मता याबाबत काम केले असते असे वाटते. अश्या जनमानसाचा विचार करणारे पक्ष कदाचित अजुन जबाबदारीने वागले असते. शिस्तबद्द, प्रगतीशील, जागरुक समाजात शासन बर्यापैकी कल्याणकारी असते असे दिसते. भले भ्रष्टाचाराचा नायनाट झाला नसला तरी, भ्रष्टाचाराचे प्रस्थ, स्तोम माजत नाही.
>ते उत्तर वापरणारा गांधी कुठे आहे ते माहीत आहे का?
आज हे असे करणारा 'गांधी' कुठे आहे हे पाहीले तर आपल्या आसपास अशी एखादी व्यक्ती दिसेलच. १००% परफेक्ट रोल मॉडेल मिळणे हे आज देव सापडण्यासारखे आहे तरी जे जे योग्य दिसते त्याचे अनुकरण करणे हे तर आपल्या हातात आहे. आजही प्रत्येकाने आपल्याला मदत करायला, मार्ग दाखवायला, नेतृत्च दायला कोणी येणार नाही व आपल्याच हे काम करायचे आहे ठरवून आचरण केले तरी परिस्थिती बरीच सुधारेल.
3 Feb 2011 - 2:30 pm | कलंत्री
गांधी जर असते तर त्यांनी स्वभाषा, पर्यावरण, भ्रष्टाचार, रोजगार आणि शिक्षणावर काम करणे पसंत केले असते.
आज इंग्रज गेले आणि इंग्रजीच्या आपण जवळजवळ पूर्णपणे आहारी गेलो आहोत हे मला वाटते गांधी आणि त्यांना मानणार्यांचा पराभव असे समजायला हवे आणि त्यावर मार्ग काढायला हवा.
4 Feb 2011 - 12:39 pm | वाहीदा
Have we Fail to understand Gandhi and his Value System??
Indians have the habit of looking at great people as divine incarnations and worshiping them, and this habit has prevented us from understanding Gandhi's value in the post-Gandhi period.
Now we have to rediscover him and understand his relevance to our present-day social needs. India is still today a country with vast social problems. Even our political and economic problems need a social approach for their solutions, and it has been tragic that we have addressed those problems with merely political and economic remedies.
To downplay these important ideas of Gandhi's and to project him instead through public prayers and through soft talk will not invite the attention of today's youth. Mahatma Gandhi was socially a universal human and a revolutionary, and today he is beyond freedom of India, beyond religion, beyond the traditions he inherited and the fads he cherished.
Gandhi's readiness to be secular in order to achieve goals of social equality has not been properly appreciated. Even though Vinoba from 1955 throughout the rest of his life adopted silent contemplation of truth, non-violence and compassion as his only form of public prayer, many Gandhians have preferred to present Bapu more through Ramdhun (singing formulaic prayers) than through his concept of constructive work and satyagraha (non-violent struggle).
But I think Manibhai Desai was indeed an exceptional Gandhian than the rest of the others.
Though I belong to Army family background I appreciate Gandhi and his non-violent struggle.
9 Mar 2011 - 10:29 am | अँग्री बर्ड
हे महामानव मला जास्त नाही पटले .ते किती बरोबर होते त्यापेक्षा किती चुकले याचे परीक्षण करा
9 Mar 2011 - 10:36 am | शिल्पा ब
आम्हाला टिळकांचा आणि सावरकरांचा जाज्वल्य अभिमान आहे.
9 Mar 2011 - 10:48 am | विकास
@रोहित भिडे: हे महामानव मला जास्त नाही पटले .ते किती बरोबर होते त्यापेक्षा किती चुकले याचे परीक्षण करा
@शिल्पा बः आम्हाला टिळकांचा आणि सावरकरांचा जाज्वल्य अभिमान आहे.
ह्या चर्चेचा मुद्दा कोण ग्रेट आहे नाही, चूक किती आणि बरोबर किती हा नाही आहे. "जर आज गांधीजी असते तर त्यांनी नक्की आजच्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आवाज उठवताना, कशा प्रकारे, "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असता? आवाज उठवला असता हे देखील नक्की, अहींसात्मकच राहीले असते हे देखील नक्की, पण गांधींजींच्या व्यक्तीमत्वाचा विचार केल्यास त्यांनी वापर करताना वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले असते असेच वाटत राहते. पण कसे याचे उत्तर मला मिळत नाही आहे, तुम्हाला ते उत्तर माहीत आहे का अथवा ते उत्तर वापरणारा गांधी कुठे आहे ते माहीत आहे का?" हा आहे.