ऑरेंज केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
31 Jan 2011 - 1:22 pm

बिनामैद्याच्या ऑरेंज केकची कृती असहकार यांच्या मुलीसाठी दिली आणि लगेच ऑरेंज केक करावासा वाटू लागलाच, पण सहजरावांच्या म्हणण्याप्रमाणे एऽवढी बदाम पावडर...? मग जरा वाढत्या वजनाची आणि दिनेश आणि केसुंनी जाहीर केलेल्या( आणि सुरु न केलेल्या ) डायट प्रोग्रामची काळजी म्हणून जरा कमी कॅलरीवाला ऑरेंजकेक करायचे ठरले.

साहित्य- २०० ग्राम मैदा, १५० ग्राम बटर/तूप, १२५ ग्राम साखर, ४ अंडी, १.५ चमचा बेकिंग पावडर,चिमूटभर मीठ, १ चमचा ऑरेंज इसेन्स + १ चमचा संत्र्याची किसलेली सालं. ऑरेंज इसेन्स नसेल तर २ चमचे संत्र्याची किसलेली सालं, पाव कप ऑरेंज ज्यूस,टिनमधील संत्री २५०-३०० ग्राम- ही संत्री साखरेच्या पाकातली असल्यामुळे साखर कमी घाला. जर ही संत्री उपलब्ध नसतील तर फ्रेश संत्री सोलून घाला पण साखर १५० ग्राम घाला.
कृती-संत्री चाळणीवर घाला, जास्तीचा पाक निथळू दे. पण यातला पाक जरा घट्टच असतो, टिण्ड पाइनॅपल
इतका पातळ नसतो त्यामुळे सगळा पाक निथळला जात नाही.
बटर फेटून घ्या, साखर घालून फेटा. अंडी फोडून घाला ,संत्र्याची साले व इसेन्स घाला आणि फेटा. मैदा+ बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करा आणि ते थोडे थोडे वरील मिश्रणात घाला. मिश्रण एकसारखे झाले की त्यात संत्र्याचा रस घाला.
केक मोल्डला बटर लावून घ्या.त्यावर हे मिश्रण घाला, त्यावर संत्री घाला.
पाकातली संत्री जड असतात त्यामुळे ती वर न राहता केकच्या आत व तळाशी जातात.
प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से ला ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच- केक झाला की नाही ते केकमध्ये सुरी घालून पहा. जरी केक झाला असला तरी तो अवन मध्ये तसाच ५ मिनिटे राहू द्या. नंतर बाहेर काढून ठेवा व अजून पाच मिनिटांनी जाळीवर काढा , गार होऊ द्या, नंतर तुकडे करा.
वैधानिक इशारा- ऑरेंज केकच्या टेम्टिंग वासाने केक पूर्ण गार होण्याची वाट न पाहताच स्लाइस करुन खाण्याचा धोका आहे. :)

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jan 2011 - 1:28 pm | परिकथेतील राजकुमार

शॉल्लेट !
आता माँजिनीजवर धाड घालावीच लागणार.

बाकी ह्या स्वातीतैचे खाते काही दिवसांसाठी वाचनमात्र करता येणार नाही काय ?

कच्ची कैरी's picture

31 Jan 2011 - 1:28 pm | कच्ची कैरी

वाव्!!!!!!काय फोटो आहे ! एकदम ढिनच्याक ढिच्याक!!!

टारझन's picture

31 Jan 2011 - 1:40 pm | टारझन

चहा बरोबर ऑरेंज केक चं कॉम्बीनेशन म्हणजे आहाहा !! ऑरेंज केक हा आमच्या आहारात एक वेगळं स्थान राखुन आहे तो त्याच्यातल्या ऑरेंजेस मुळे !! मी कधी कधी तो मोसंबी ज्युस मधे बुडवुन पण खातो :)

खादाड अमिता's picture

31 Jan 2011 - 1:45 pm | खादाड अमिता

स्वाती ताई, ह्या केक ला पाय्नेपल अप्सायीड डाऊन केक सारखा करता येईल का?

स्वाती दिनेश's picture

31 Jan 2011 - 9:48 pm | स्वाती दिनेश

करु शकतो, पाकातली संत्री केकमोल्डच्या बेसला लावता येतील व अपसाइड डाउन केक करता येईल. पण मला ती खाताना अध्येमध्ये येतील अशीच आवडतात,:)
स्वाती

संत्र हा आपला वीक पॉईंट आहे.
तु मला फ्रँकफुटाची ट्रीप करायला लावणारच आहे अस दिसतय. :)
-(पुर्णपणे गार झालेला )गण्या

सहज's picture

31 Jan 2011 - 1:56 pm | सहज

स्वातीतै यांनी बहुदा प्राचार्य त्सेंटा आज्जींबरोबर केकशाला सुरु केली आहे व
त्यामुळे रोज एकतरी केक बनवला जातो व
कोण्या मैदा बनवणार्‍या कंपनीने हे लेख स्पॉंन्सर केले असावेत व तसेच
जर्मनीत पर्यटकांचा ओघ सुरु व्हावा म्हणून जर्मन पर्यटन विभागाने देखील या मैदाप्रकल्पात रस दाखवला असावा.

सध्या कायदा मंत्रालय कोण कोणत्या कायद्याच्या आधारे स्वातीतैंच्या लेखनस्वातंत्र्यावर स्थगीती आणता येईल याचा अभ्यास करत आहेत. क्लास अ‍ॅक्शन लॉसूट करता त्वरित संपर्क साधावा.

तूर्तास इनो घाउक प्रमाणावर खरेदी करता यावे म्हणून एक सहकारी पतसंस्था सुरु करायचा प्रस्ताव मांडत आहे.

पियुशा's picture

31 Jan 2011 - 2:47 pm | पियुशा

यम्म यम्म यम्मि !

सहजराव, मला सहकारीचा अनुभव आहे आणि इनोची गरज पण, आता पुढचा महिना आमच्याकडे कुणाचा वाढदिवस नाही आणि हे दुष्ट मिपाकर एकानंतर एक केक दाखवत आहेत.

मी पण जेवण झाल्यवर अलगद हे धागे उघडतो आणि पंचाईत करुन घेतो.

स्वातीतॅ, ते ओवन म्हणजे माय्क्रोव्हेव का साधं ते जरा सांगा की ? आणि हो तुमचा वॅधानिक इशारा मी लहानपणीच गरम बेसन खाउन उडवुन लावलेला आहे. आज पण तो वास, ति चव आणि ति किंकाळी सगळं आठवतं आहे.

महत्वाचे केक छानच, फक्त फोटोत त्यावर नजर लागु नये म्हणुन साखर टाकली आहे काय ?

हर्षद.

स्वाती दिनेश's picture

31 Jan 2011 - 3:47 pm | स्वाती दिनेश

मी नेहमी केक करताना साधा अवन वापरते , तुमच्या मा वे बद्दलच्या विचारणेचे उत्तर येथे दिले होते.
पिठीसाखर- केक कमी गोड करुन पिठीसाखर घालून गार्निशिंग केले की केक छान लागतो म्हणून बरेचदा मी तसे करते.:)
स्वाती

नंदन's picture

31 Jan 2011 - 2:51 pm | नंदन

भंपक मुलाखती, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणारे लोक, तेच तेच पुन्हा पुन्हा सांगत राहणारे तथाकथित न्यूज अँकर्स असल्या वाहिन्या सटासट बदलून मिपाटीव्हीवर ह्या धाग्यावर येऊन स्थिरावलो :). पाककृती आणि फोटू मस्तच. शिवाय लो कॅलरी असल्याने गिल्टलेस ह्या क्याटॅगरीतल्या खादाडीखाली टाकून यथेच्छ हादडता येईल ;)

अरे काय चाललंय हे? लाळसुद्धा संपली आता..

मस्तच! खाडी ओलांडावीच लागणार आता!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Jan 2011 - 4:34 pm | निनाद मुक्काम प...

यम यम

प्यारे१'s picture

31 Jan 2011 - 4:53 pm | प्यारे१

अरे बंद करा ह्या 'केका'वल्या!

काय छळ मांडलाय?

शुचि's picture

31 Jan 2011 - 8:29 pm | शुचि

हाहा

रेवती's picture

31 Jan 2011 - 7:06 pm | रेवती

हा केक मस्तच दिसतोय.
मी नुकताच पायनॅपल अपसाइड डाऊन केक करून पाहिला.
तू दिल्याच्या निम्म्या प्रमाणात.
छान झाला (होता). पॅनमधून काढताना जरा गडबड झाल्याचे फोटूत दिसेलच.;)

निवेदिता-ताई's picture

31 Jan 2011 - 7:31 pm | निवेदिता-ताई

स्वाती ............अंडी न वापरता करता येईल का हा केक????????????

स्वाती दिनेश's picture

31 Jan 2011 - 9:45 pm | स्वाती दिनेश

एगलेस केकची बेसिक केकृ दिली आहे मी मिपावर, ती वापरुन संत्रा केक करता येईल.
संत्राज्यूस न वापरता तीत ऑरेंज फँटा वापरता येईल.
स्वाती

स्वाती ताई नुसते फोटोवर नाही समाधान होत...
आता बेत जमवा..

स्वाती२'s picture

31 Jan 2011 - 8:04 pm | स्वाती२

मस्त!

अर्ध्या कापलेल्या केकच्या तुकड्यातून डोकावणार्‍या केशरी जर्द संत्र्यांच्या ओलसर फोडी....... आई ग!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

प्राजु's picture

31 Jan 2011 - 8:57 pm | प्राजु

आम्ही पाहिलाच नाही.. टुक्टुक!!

स्मिता.'s picture

31 Jan 2011 - 10:05 pm | स्मिता.

अहो स्वातीताई, का असा आम्हा गरीबांवर अत्याचार करता? इथे तुम्ही एका मागे एक धडाधड केकच्या पाकृ देता आणि आम्हाला ते काही केल्या जमत नाही. जीवाची किती चरफड होते हो माझ्या!! आता जरा आराम करा बरं का :)

आता तुमच्या पाकृंवर बहिष्कारच घालावा म्हणते... त्याने काय होणार म्हणा? मनाला आवर नसल्याने धागा उघडला जाणारच आणि आम्ही जळून राख होणारच :(

केशवसुमार's picture

1 Feb 2011 - 12:01 am | केशवसुमार

आमच्या डायेटबद्दल चुकीचे लिहिल्या बद्दल निषेध..
पण केक एकदम झेन्टामॅटीक झाला होता ह्यात वादच नाही.. पुन्हा कधी बनवताय????

स्वाती दिनेश's picture

1 Feb 2011 - 10:30 am | स्वाती दिनेश

खवय्यांनो , धन्यवाद
एकदा मी टिन्ड संत्री आणायला विसरले आणि रविवारी संत्राकेक करायचे ठरले, आमच्याकडे रविवारी 'भारत बंद ' सारखे वातावरण असते, काहीही मिळत नाही ,तेव्हा मी घरात असलेली संत्री सोलून घातली होती चक्क, पण ती पाकवून घातली तर जास्त छान लागेल.
संत्र्याची ओली सालच किसून घालते, पण वर्षभर संत्री उपलब्ध नसतात तेव्हा साल वाळवून ठेवली आणि मग त्याची पूड वापरली तरी चालेल,( अशा संत्र्याच्या साली वाळवून शिकेकाईत घालायची आणि त्या शिकेकाईने नहायचे अशी लहानपणची आठवण झाली,:) )
स्वाती

वहिनी's picture

1 Feb 2011 - 12:11 pm | वहिनी

छा न आ हे ?

आजानुकर्ण's picture

1 Feb 2011 - 12:13 pm | आजानुकर्ण

केक आवडला.

स्वातीताई, फोटो दिसत नाहीयेत. (ते एक बरं झालं म्हणा! ) :)
घरुन पाहते :)

प्राजक्ता पवार's picture

1 Feb 2011 - 3:19 pm | प्राजक्ता पवार

मस्तंच :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Feb 2011 - 8:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी स्वातीताईचे धागे उघडतच नाही.

काजुकतली's picture

1 Mar 2011 - 11:49 am | काजुकतली

काल रात्री केक करुन पाहिला. खुप छान झाला. मला त्याचे टेक्चर मिल्क केकसारखे वाटले. गरम असताना तर खुपच सॉफ्ट एकदम कापसासारखा लागत होता. अज सकाळीही अगदी बाजारातुन आणल्यासारखा वाटत होता.

माझ्याकडे फक्त दोनच लहान संत्री होती, म्हणुन सोलुन गर न घालता फक्त रस घातला. तरीही ब-यापैकी संत्र्याची चव आली होती.

पुढच्या वेळी गरासकट करेन. पण तसा केल्यास लगेच संपवावा लागेल काय? सध्या माझ्या घरी २०० ग्रॅम मैदा वापरुन जेवढा केक होतो तेवढा एकाच बैठकीत हादडणारी मंडळी नाहीयेत :) आणि मी केकमध्ये बटर आणि मैदा असल्याने जरा लांबच राहते त्यापासुन. (मी दोनच स्लाईस खाल्ले, उरलेला केक शेजा-यांना वाटला :) ) खरेतर काल कणिक वापरुन करणार होते पण आयत्या वेळी खायचा सोडा सापडेना. कणिक वापरली तर बे.पा. व खा.सो. दोन्ही वापरावे लागते ना? बटरच्या जागी हेल्दी ऑप्शन म्हणुन तेल वापरता येईल काय?

नेहमी ओवनच्या दोन्ही कॉइल्स सुरू ठेवून केक भाजायचे त्यामुळे केक लगेच फुगायचा आणि मग वरुन जळायला लागायचा. इथे मी मागे लिहिले होते माझ्या केककौशल्याबद्दल :) तेव्हा मिळालेल्या सुचनांप्रमाणे यावेळी आधी अवन सणसणीत तापवला आणि मग २०० डिग्रीवर ठेवुन फक्त खालची कॉईल चालू ठेऊन केक भाजला. केक वरुन अजीबात जळला नाही. आधी करायचे तेव्हा मध्ये फुगायचा आणि मग वरुन फाटायचा तसेही झाले नाही. आणि वरचा रंगही चांगला राहिला, मुळ मिश्रणासारखाच जवळपास पण थोडा पिवळसर राहिला. नेहमी जळकट रंग यायचा :)

मी केक करते तेव्हा तो अवनमध्ये भांडेभर फुगतो. पण बाहेर काढल्यावर थोडा बसतो. साधारण मिश्रण जेवढे असते तेवढ्याच उंचीचा केक होतो. तुम्ही करता तेव्हाही असाच बसतो का परत??? पण बसला तरी सॉफ्टनेस कमी होत नाही.
व्यवस्थित लागतो.

केक अगदी व्यवस्थित जमायला पाहिजे ही माझी जबरदस्त इच्छा आहे, म्हणुन इतके प्रश्न :)

स्वाती, इथे छान छान रेसिपी देतेस त्याबद्दल तुझे मनापासुन आभार..

साधना