दिशाहीन विरोधी पक्ष?

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
25 Jan 2011 - 9:52 am
गाभा: 

युपीए-२ आले आणि डाव्यांशिवाय बनलेले हे सरकार बरेच काही करेल अशी आशा जागृत झाली. मात्र प्रत्यक्षात एकच नव्हे तर अनेक आघाड्यांवर सत्ताधारी कोंडीत सापडले. खरं तर ते तसे सापडले असते. मात्र सध्या विरोधी पक्षाने एखादा मुद्दा हाती घ्यावा आणि तो पूर्णत्त्वास न नेताच दुसरीकडे वळावे असे चालले आहे.

गेल्या काहि दिवसांत भ्रष्टाचारासंबीधी अनेक प्रकरणे उजेडात येऊ लागली. राष्ट्रकूल घोटाळा, आदर्श घोटाळा वगैरेंबरोबरच ३जी घोटाळ्याने तर भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात पुढे आला. (प्रथेप्रमाणे) विरोधी पक्ष आक्रमक झाला. जेपीसी साठी रान माजवले पण पुढे? जेपीसी नाही मिळाली तर लोकांमधे जाऊन आंदोलन करणार अश्या घोषणा झाल्या पण कसले काय? भ्रष्टाचाराविरूद्ध रान माजवून सरकारला पळता भुई थोडी करायची सोडून विरोधी पक्षांनी आपणहूनच प्रश्न सोडून दिला.

बरं पुढे अचानक कांदे आणि त्यापाठोपाठ भाज्या आणि शेवटी पेट्रोलचे भाव वाढले आणि महागाई विरूद्ध विरोधक आक्रमक होताहेत असं वाटलं. आपले थोर कृषीमंत्री तर बिंदास भाववाढ अटळ आहे वगैरे वक्तव्य करत असताना विरोधक अचानक शांत झाले.
याशिवाय लवासा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, तेलंगाणा वगैरे अनेक अंगांनी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगण्याऐवजी आतापर्यंत विकासासाठी आक्रमक होतो आहे अशी अशा देणारा विरोधी पक्षाने पुन्हा एक'काश्मिरात झेंडा फडकवायचा' असे भावनात्मक आवाहन केले. अर्थातच महागाई, भ्रष्टाचार, शेतमालाला कमी भाव, चुकीची वितरण व्यवस्था वगैरेंवर सरकारचे आसन डळमळीत करू शकणारे प्रश्न सोडून विरोधी पक्षांचे काश्मिरातील झेंडे वगैरे भंपक आणि पोकळ भावनात्मक मुद्द्यांवर राजकारण सुरू करणे सरकारच्या पथ्यावरच पडते आहे.

तुम्हाला काय वाटते? विरोधी पक्ष दिशाहीन झाले आहेत का? का अजूनही विकासाचे राजकारण करू न इच्छिता ते मुद्दामहून भावनाप्रधान, पण दिवसअखेर काहिहि न मिळवून देणार्‍या हीन दिशेलाच जाऊ इच्छितात?

प्रतिक्रिया

पंगा's picture

25 Jan 2011 - 11:23 am | पंगा

विरोधी पक्ष दिशाहीन झाले आहेत का?

या प्रश्नामागे दडलेले 'विरोधी पक्षांना कधीकाळी दिशा होती' हे गृहीतक पुन्हा एकदा तपासून पाहणे इष्ट ठरेल, असे सुचवावेसे वाटते.

ऋषिकेश's picture

25 Jan 2011 - 11:36 am | ऋषिकेश

:)

दर पाच वर्षांनी जसे सरकार बदलते तसे विरोधी पक्षही बदलतात. तेव्हा दर नव्या टर्म मधे नव्या दमाने सुरूवात होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात बर्‍याच विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष म्हणून अशी योग्य दिशा धरून दाखवलेली आहे. काहि उदा:

१. जयप्रकाश नारायण इ. नी श्रीमती गांधींविरूद्ध असाच माहौल तयार केला होता. तेव्हा विरोधीपक्ष एका दिशेने गेले होते
२. काहि वर्षांपूर्वी उमा भारती यांनी मध्यप्रदेशात 'बिजली सडक पानी' हा मुद्दा घेऊन एकाच दिशेने प्रचाराची राळ उठवून जनमत बांधून सत्ता मिळवली होती.
३. नरेंद्र मोदी यांनी "गुजरात की अस्मिता" ह्या एकाच घोषणेवर मिळवलेली सत्ता.
४. बोफोर्स प्रकरणात विरोधी पक्षांनी नेटाने एकाच दिशेने लढवलेला किल्ला.
५. सध्याचे उदा. द्यायचे तर ममता बॅनर्जी यांनी डाव्यांचा विरोध ही एकच दिशा ठेवल्याने वाढता जनाधार

सध्याच्या विरोधी पक्षाला विकासाच्या राजकारणाची दिशा मिळत आहे असे वाटत होते. त्यात बिहार निकालांनीही हेच दाखवले की जनता विकासासाठी लढणार्‍याच्या बाजूनेच आहे. अश्या दिशेने राजकारण करताना घुमजाव करून काश्मिरमधील झेंडे सुरू झाल्याने मी हाच प्रश्न विचारेन की "विरोधी पक्ष दिशाहीन झाले आहेत का?" :)

पंगा's picture

25 Jan 2011 - 11:42 am | पंगा

सत्ता मिळाल्यावर त्यातून काही विधायक कार्य झाले का? की ही तथाकथित "दिशा" म्हणजे "दिशाभूल"च ठरली? (क्र. २बद्दल काहीच कल्पना नाही. क्र. १, ४ मध्ये पुढे सगळेच गडगडले असे आठवते. इतर मुद्द्यांच्या बाबतीत साशंक आहे.)

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jan 2011 - 11:31 am | llपुण्याचे पेशवेll

लेखातील विचारांशी सहमत आहे. विरोधी पक्षाने कांदारथ यात्रा काढावी असे विरोधी पक्षाला सुचवत आहे.
राहीला प्रश्न भावनिक आवाहनांचा तर जेवढी म्हणून काही मोठी आंदोलनं भारतात झाली त्यामागे भावानिक आवाहनच होते. उदा. 'करेंगे या मरेंगे' सारख्या घोषणा, संपूर्ण स्वराज्याची हाक इ.

ऋषिकेश's picture

25 Jan 2011 - 11:42 am | ऋषिकेश

राहीला प्रश्न भावनिक आवाहनांचा तर जेवढी म्हणून काही मोठी आंदोलनं भारतात झाली त्यामागे भावानिक आवाहनच होते. उदा. 'करेंगे या मरेंगे' सारख्या घोषणा, संपूर्ण स्वराज्याची हाक इ.

प्रश्न भावनिक मुद्दा मांडण्याचा नाही तर विकासपेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्राथमिकतेचा आहे. या जागोजागी ठेचकाळणार्‍या सरकारला कोंडीत पकडण्याऐवजी त्यांनाच सोपे जाईल असे मुद्दे अचानक सुरू करण्यात काय हशील?

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jan 2011 - 11:51 am | llपुण्याचे पेशवेll

ऋ,
प्राथमिकता ही राष्ट्राच्या एकसंधतेसच कायम असली पाहीजे. मूळ देहच राहीला नाही तर विकास कशाचा करणार? त्यामुळे काश्मिर प्रश्न गौण असे मला तरी वाटत नाही. कमीत कमी जर काश्मीर भारताचे होत नसेल तर भिजत घोंगडे ठेवण्यापेक्षा काश्मिरला त्यांच्या जबाबदारीवर स्वातंत्र्य द्यावे. पण मग पुढे हाच प्रश्न इतर राज्यांच्या (इशान्येकडील राज्यांमधे आताही आहेच) बाबतीत निर्माण होईल तेव्हा काय भूमिका घ्यावी?
आणि याच एकसंधतेच्या मुद्याचा वापर लगेच राज ठाकरेच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी केला जातो. पण त्यातल्या विकासाच्या असमतोलाची पर्वा कोण करत नाही.

बाकी ठेचकळणार्‍या सरकारला कोंडीत पकडण्याऐवजी असल्या गोष्टी विरोधक का करीत आहेत कळत नाही. महागाई विरोधात बंदला चांगलाच पाठींबा देशभरातून मिळाला होता हे मात्र खरे.

अवलिया's picture

25 Jan 2011 - 11:45 am | अवलिया

चिमुटभर मीठ, स्वदेशी वापरा, खादी, मेड इन इंडीया, मेरा भारत महान, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, चला गोवा मुक्त करु, सोमनाथ जिर्णोद्धार, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, चले जाव, सायमन गो बॅक, तुम मुझे खुन दो मै तुम्हे आजादी दुंगा, इत्यादी वगैरे

मृत्युन्जय's picture

25 Jan 2011 - 12:14 pm | मृत्युन्जय

चुक विरोधी पक्षाची नाही आहे. आघाडी सरकार एवढ्या आघाड्यांवर फेल गेले आहे की विरोधी पक्षाला कुठलाच मुद्द सोडता येत नाही आहे. सगळेच मुद्दे सरकार पाडण्याच्या लायकीचे आहेत. २जी घ्या किंवा राष्ट्रकुल घ्या घोटाळा आता लाखात किंवा कोटीत न राहता अब्जात गेला आहे. मेलेल्याच्या टाळुवरचे लोनी खाणे ही म्हण आपण फक्त ऐकुन होतो. पण सध्याच्या सरकारने सर्वच आघाड्यांवर एवढे "आदर्श"" घोटाळे केले आहेत की विरोधी पक्ष कन्फ्युज झाला आहे. केंद्र सरकार नका विचारु, राज्य सरकार नका विचारु, ग्रामपंचायती नका विचारु किंवा सरकारी संस्था नका विचारु. सगळीकडे घोटाळे, काळाबाजार, महागाई, अस्थिरता, असुरक्षितता, मनमानी कारभार यांचे अराजक माजले आहे.

घोटाळे केले म्हणुन मुख्यमंत्री बदलले तर त्यांना हळुच केंद्रात बसवायचे. एकाला काढेपर्यंत दुसर्‍याचा भ्रष्टाचार उघडकीस येतो. मग दोघांना परत दुसरीकडे विस्थापित करेपर्यंत युवराज काहीतरी येड्यासारखे बरळतात. विरोधी पक्षाला सुचत नाही की कुठला मुद्दा ताणुन धरावा. बर त्यात सरकार जाणून आहे की जेपीसी आली तर आपली बाजू अजूनच बिकट होणार त्यामुळे जेपीसीच्या न्य्याय्य मागणीला विरोध चालु आहे. भाजपाप्रणित सरकारने जेपीसी आणली होती तर कोंग्रेसची मग का एवढी जळजळ होते आहे. बुडाखालची जमीन सरकली आहे, जेपीसी आली तर खड्ड्यात पडु हे माहिती आहे म्हणुनच.

बरं या सगळ्या घोटाळ्यांपासुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी यांनी काय केले तर राज्यपालांचे बाहुले बनवले. जुनीच खोड म्हणा. नवीन काही नाही. यांनी राष्ट्रप्रतीचे सुद्धा बुजगावणे उभे करुन झाले आहे तर राज्यपालाची काय कथा?

पाव मिळत नाही तर केक खा या टाईपची विधाने पण यांच्या मंत्र्यांकडुन करुन झालेली आहेतई. एकाही अन्नपदार्थाचे भाव सामान्य माणसाच्या आवाक्यातले नाही आणि याला मुख्य कारण साठेमारी, काळाबाजारीच आहे हे तर सर्वशृत आहे. नेते गब्बर होत आहेत, शेतकरी गरीबच आहेत आणि सामान्य माणसाची अन्नान्न दशा होते आहे. लोक मरोत आम्हाला काय त्याचे हे प्रवृत्ती तर विकोपाला पोचली आहे. विरोधी पक्षाने तरी कुठल्या कुठल्या गोष्टीचा पाठपुरावा करावा?

आणि सरकार फोडाफोडीच राजकारण खेळण्यात तर पटाईतच आहे. सगळेच विरोधी पक्ष काही क्लीन नाहीत. बहुतेक सगळ्यांवर दावे दाखल आहेत. कायद्याच बडगा उभारुन किंवा दूर करुन सगळ्या विरोधी पक्षांमध्ये एकजूट होउ न देण्यात आघाडी वाकबगार आहेच. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्षाची कोंडी होते, तो एकटा पडतो की मग सरकार उन्मत्त चेहेर्‍याने विजयी झाल्याचा आव आणणार हे काही आम्हाला नवीन नाही. विरोधी पक्ष काय करु शकतो त्याला मर्यादा आहेत. पण यांच्या घोटाळ्यांना काही सीमाच उरलेली नाही.

एक सोडुन दुसरे मुद्दे सततच समोर येत आहेत आणि सरकार कोडगे झाले आहे. त्यांना कशाचाच फरक पडत नाही आहे. काश्मीर प्रश्न आणि काश्मीर मध्ये झेंडा फडकवणे हे आपल्यासमोरचे मुख्य मुद्दे नसले तरी तो राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे. आधीच सगळ्याच आघाड्यांवर कोलमडलेले सरकार भारतीय माणसाला भारतात झेंडा फडकवण्यासाठी पण सुरक्षा पुरवु शकत नाही. खेदाने म्हणावेसे वाटते पण सध्याचे सरकार पुर्णपणे अपयशी ठरलेले आहे तर मग विरोधी पक्ष किती दिशाहीन आहे त्याबद्दल उगाच चिडचिड करण्यात काय हशील आहे?

ऋषिकेश's picture

25 Jan 2011 - 2:21 pm | ऋषिकेश

सरकारच्या अपयशाचा चांगला धांदोळा आहे. :) त्यातील तथ्यांशी सहमत आहेच

खेदाने म्हणावेसे वाटते पण सध्याचे सरकार पुर्णपणे अपयशी ठरलेले आहे

आपल्याकडे किंवा खरेतर लोकशाहीत नुसते सरकार अपयशी होऊन / तुम्हा आम्हाला समजून काहि होत नसते. ते जनमानसांत रूजले पाहिजे. आणि हे अपयश प्रभावीपणे लोकांपूढे मांडण्याचे काम विरोधी पक्षांचे आहे.
जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांनी नेटाने सरकारच्या अपयशाला भांडवल केले आहे जनता त्यामागे उभी राहीली आहे. (वर पंगा यांनी म्हटल्याप्रमाणे पुढे सत्ता आल्यावर त्यांनी काहि वेगळे न केल्याने पुन्हा त्यांना विरोधात बसावे लागले आहे हा मुद्दा वेगळा) सध्या इतक्या आघाड्यांवर सरकार अपयशी असताना व त्याविरूद्ध केलेल्या आवाहनाला/आंदोलनाला/संपाला लोकांनी पाठिंबा दिला असतानाही हा भावनिक मुद्दा रेटायचे कारण समजले नाहि. 'काश्मिरात झेंडा फडकवणे' हा प्रश्न महत्त्वाचा नाही किंवा आहे हा वेगळाच मुद्दा आहे. मात्र तो या आत्ता घडीला इतका महत्त्वाचा आहे का, की सरकारचे अपयश विसरून किंवा बाजूला ठेऊन काश्मिरात झेंडे फडकावणे गरजेचे व्हावे?
असे भावनिक प्रश्न साधारणत: लोकांचे लक्ष अपयशापासून वळवण्यासाठी सरकारपक्षातर्फे आणले जातात. हे काम विरोधी पक्षच करून सरकारच्या चुकांची अपयशाची तीव्रता कमी करत आहेत असे मला वाटते.

'काँग्रेस हितचिंतक' थत्तेचाचा यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करत आहे ....

प्रसन्न केसकर's picture

25 Jan 2011 - 6:55 pm | प्रसन्न केसकर

आणि चर्चेचा एकुण सुरसुद्धा चांगला आहे.
विरोधी पक्ष एकुणच दिशाहीन झाल्यासारखे वाटतात खरे पण कदाचित तो परिस्थितीचा रेटा असु शकेल. मुळात गेली काही दशके भारतात ना सत्ताधारी पक्षाला बहुमत मिळते आहे, ना विरोधी पक्षाकडे सदनात दबाव राखण्याएव्हढी मते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही भाग विविध पक्षांची कडबोळी होत आहेत. अश्या परिस्थितीत एका दिशेने कोणी जाऊ शकेल काय हा प्रश्नच आहे.
दुसरा भाग म्हणजे एकुणच राज्यकारभाराला एक नियंत्रित दिशा आहे काय हाच मुळात प्रश्न आहे. ती दिशा असेल तर विरोधाला दिशा मिळणे शक्य होते. पुर्वी सत्ता राबविण्याला बजेट, पंचवार्षिक योजनांसारख्या गोष्टींमुळे दिशा असे व त्यांच्या अंमलबजावणीवरुन विरोधाची मुख्य दिशा ठरे. आता स्पेशल पॅकेजेस सारख्या गोष्टींमुळे बजेटचे महत्व कमी झाले आहे अन पंचवार्षिक योजना वगैरेंचे तर नावही कानावर येत नाही.
सत्ताधारी पक्षाकडुन विरोधकांना नामोहरम करण्याचे सातत्यपुर्ण प्रयत्न, अकार्यक्षमता, भ्रष्टाचार इ. सातत्याने होत असतील तर त्यामुळे जनतेत असंतोष होणे व अराजक सदृष परिस्थिती निर्माण होणे अनिवार्य होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी जनतेपर्यंत सर्व वस्तुस्थिती साकल्याने व सातत्याने होणे आवश्यक असते. सध्या दुर्दैवाने ते देखील होत नाही.
अश्या परिस्थितीत विरोधकांनी दिशाहीन होणे अपरिहार्य होतेच. शेवटी विरोधक राजकीय पक्ष आहेत, बहुमताच्या जोरावर सत्ता मिळवणे हे त्यांचे ध्येय असणारच आहे. हे बहुमत कोणत्या कारणाने सत्ताधारी पक्षाला मिळाले याची स्पष्ट कल्पना जर त्यांना येत नसेल तर ते वेगवेगळे मुद्दे घेऊन पहाणार. त्या मुद्यांवर संसदेमधे हवी त्या परिणामकारकरित्या चर्चा घडत नसेल, संसदेतील चर्चेत दिलेली आश्वासने पाळली जात नसतील तर ते अन्य मार्ग अवलंबणार. आणि विरोधी पक्षाला देशद्रोही असे ब्रँडिंग करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असतील, दडपले जात असेल तर तो कोणत्याही मार्गाने सत्ता उलथवण्याचे प्रयत्न देखील करणार. हे सर्व भारतात पुर्वी देखील घडले आहे. आणिबाणी हा शेवटी आपला राजकीय इतिहास आहेच की.

ऋषिकेश's picture

25 Jan 2011 - 8:01 pm | ऋषिकेश

बहुतांश मुद्यांशी सहमत.

एकुणच राज्यकारभाराला एक नियंत्रित दिशा आहे काय हाच मुळात प्रश्न आहे. ती दिशा असेल तर विरोधाला दिशा मिळणे शक्य होते.

माझ्या मते होय. राज्यकारभाराला नियंत्रीत दिशा आहे. एक प्रोसेस आहे. आणि त्याचा चांगला उपयोग यावेळी विरोधकांनी लोकसभेचे कामकाज रोखून केलाही. मात्र महागाई वाढली तेव्हा सरकारवरील हल्ला भ्रष्टाचार + महागाई असा दुप्पट करायचा सोडून विरोधकांनी जेपीसीचा मुद्दा बाजूला टाकला व महागाईच्या विरोधात नारे सुरू केले. खरंतर याच विषयावरचा बंदही यशस्वी झाला होताच. तिथेही अचानक काय झाले कोणास ठाऊक.. महागाईविरोधात विषेश अधिवेशन बोलवायला भाग पाडता आले असते.. इतक्या सगळ्या अपयशानंतर तर सरकारविरूद्ध निदान असंतोषाची खूण म्हणून तरी (यासाठी की प. बंगाल निवडणूकांपर्यंत सरकार पडणे कठीण वाटते) अविश्वास प्रस्ताव टाकायला काय हरकत होती? तेव्हा विरोधाचे मार्ग आताच्या राज्यकारभाराच्या प्रोसेसमधेही तसेच आहेत. त्याचा वापर जपून का केला जातोय?

सत्ताधारी पक्षाकडुन विरोधकांना नामोहरम करण्याचे सातत्यपुर्ण प्रयत्न, अकार्यक्षमता, भ्रष्टाचार इ. सातत्याने होत असतील तर त्यामुळे जनतेत असंतोष होणे व अराजक सदृष परिस्थिती निर्माण होणे अनिवार्य होऊ शकते.

असे होऊ शकते याच्याशी सहमत. इथे तर अकार्यक्षमता, भ्रष्टाचार वगैरें विरूद्ध जनतेत असंतोष दिसत असताना देखील - म्हणजेच जनाधार असूनही विरोधकांनी सरकारला सळो की पळो न करता अचानक हे मुद्दे बाजूला टाकून काश्मिरचे झेंडे (जे सरकारला हँडल करणे तुलनेने सोपे आहे) का हाती घ्यावेत समजले नाही.

अनेक आघाड्यांवर सरकार अपयशी आहेच मात्र एका वेळी एक मुद्दा मांडून हल्ल्याची धार मुद्दाम कमी राखली जातेय का? सगळ्या प्रश्नांना एकत्रितपणे मांडून सरकारला अवघड जागी का कोंडले जात नाही आहे हेच समजत नाहीये

प्रसन्न केसकर's picture

25 Jan 2011 - 9:21 pm | प्रसन्न केसकर

राज्यकारभाराला नियंत्रीत दिशा आहे हेच तर मला मान्य नाहीये. कोणत्याही पक्षाचा घ्या, गेल्या दहा-वीस वर्षात कुठे राज्यकारभाराला दिशा दिसली?
सर्वप्रथम राज्यकारभाराची दिशा ठरत असे ते फाईव्ह इयर प्लॅन्स आणि पॉईंटवाईज डेव्हलपमेंट अजेंडा यातुन. ते सगळे कधीच बंद झाले. त्यातुन झाले काय तर सगळी दिशा समजुन घ्यायची ती बजेट वरुन. बजेट हा गमतीदार प्रकार असतो. ते सगळे हवेतले इमले असतात. त्यामुळे ते इन्फ्लेट किंवा डिफ्लेट सहज होऊ शकते. सी बजेट, कॉम्पायन्स रिपोर्ट हे तर सामान्य जनते पर्यंत कधीच येत नव्हते त्यामुळे प्रत्यक्ष काय होते आहे/ झाले आहे/ व्हायला हवे याचा एकमेव क्रायटेरिया म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती.
देशाचा विचार केला तर समग्र परिस्थिती अशी कधीच समोर येत नाही. मग आडाखे बांधणं आलं. ते बांधणार कोण तर कुठलेसे जनतेशी कधीच काहीच संबंध नसलेले वाचापंडीत पुस्तकी एक्सपर्ट्स. बरे सत्ताधारी, विरोधी पक्ष, माध्यमं कुठच कुणाचाच जनतेशी संबंध नाही. त्यामुळं हे वाचापंडीत अमेरिका, वर्ल्ड बँक इत्यादिंकडुन उसने घेतलेल्या पोकळ शब्दांचे बूडबुडेच फक्त फुगवणार अन ते फुटले तरी त्यांचा आवज पण येणार नाही. सगळं कसं छान छान, गार गार. अगदी बचत गटांनी सगळ्या भारतातली गरीबी आधीच हटलीये अन आता सगळं जगच आपल्याकडुन कर्ज घेणार आहे असं चित्र.
बर हे सगळं इथच थांबलं असतं तरी बर होतं. पण आता तर बजेटला पण महत्व नाही उरलेलं. सगळा खेळ स्पेशल पॅकेजेसचा. सत्ताधारी उठतात अन करतात जाहीर स्पेशल पॅकेजेस. काही झालं की स्पेशल पॅकेज. पुर आला - स्पेशल पॅकेज, रस्ते हवेत - स्पेशल पॅकेज, भाजीत मीठ कमी झालय - स्पेशल पॅकेज, मुल होत नाही - स्पेशल पॅकेज.
या स्पेशल पॅकेजकरता पैसे येतात कुठून? ते काय आभाळातुन पडतात? ते येतात बजेटरी रिअ‍ॅलोकेशन्स मधुन. म्हणजे बजेट पण राहिले बाजुला. बरं ही स्पेशल पॅकेजेस तरी डिसबर्स होतात का? झाली तर किती डिसबर्समेंट झाली अन त्याचे अकौंटिंग काय हे सामान्य माणसाला कधीच कळत नाही. म्हणजे परत बोलाची कढी अन बोलाचा भात. एकुण राजकारणी त्यांच्या जगात मग्न, नोकरशहा त्यांचा अन माध्यमे त्यांच्या.
उरता उरतो प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांचा. तो अजुनच स्वतःतच गुरफटलेला. पुस्तकातलं सगळं पांडित्य असलेला पण व्यवस्थेबद्दल प्रचंड अज्ञान असलेला. मला सर्व मिळालं पाहिजे पण मी काहीच करणार नाही म्हणणारा. साधं कॉर्पोरेटरचं काम काय, आमदाराचं काम काय अन खासदाराचं काम काय ते माहिती नसलेला असा हा सामान्य माणुस एकतर मतदान करतच नाही. मतदानाच्या दिवशी मस्त पिकनिक करुन येतो. नाहीतर अमुक तरुण नेत्याच्या गालावर छान खळी पडते, तमुक नेता इंग्रजी बोलतो, तिसरी नेती सेक्सी दिसते म्हणुन मतं देतो नाहीतर पन्नास शंभर रुपये घेऊन मतपत्रिकांच्या गठ्ठ्यावर शिक्के मारतो अन मतदानकेंद्रातुन सरळ पव्वा मारायला जातो. कसली आलीये दिशा यात?
अन अशी सगळीच परिस्थिती असेल तर मग शेवटी विरोधी पक्ष दिशाहीन होणारच ना? केवळ महागाईच्या मुद्यावर आपण लक्ष दिलं अन निवडणुकांआधी दोन चार महिने एकदम स्वस्ताई आली तर सगळंच मुसळ केरात जाईल अशी भीती त्याला रहाणारच ना? अन त्याहीपलीकडं जर दहशतवाद राजकारणासाठी रंगीबेरंगी होऊ शकत असेल तर मग त्याला देशभक्तीचं नाटक अन झेंड्याचं राजकारण करायची हिम्मत होणारच ना?

ऋषिकेश's picture

26 Jan 2011 - 8:47 am | ऋषिकेश

वा! याला म्हणतात 'ग्राऊंड रियालिटी'. अर्थात तुमच्याकडूच अश्याच प्रतिसादाची अपेक्षा होती. प्रतिसाद आवडला हे.वे.सां.नको :)

केवळ महागाईच्या मुद्यावर आपण लक्ष दिलं अन निवडणुकांआधी दोन चार महिने एकदम स्वस्ताई आली तर सगळंच मुसळ केरात जाईल अशी भीती त्याला रहाणारच ना?

हे अगदी बरोबर. फक्त माझं म्हणणं केवळ महागाईवर लक्ष न देता सारे मुद्दे एकत्र करून एकाच वेळी परिणाम कारण हल्लाबोल करावा असे होते / आहे. इथे असं होतंय की दुसरा मुद्दा घेताना पहिला बाजूला टाकला जातोय / सोडून दिला जातोय. अर्थात अश्यावेळी खाली विकास यांचा प्रतिसादही पटतो (जो तुम्हीही वेगळ्या पद्धतीने या प्रतिसादात मांडला आहे) की समाजच इतक्या वेगात बदलतो आहे की त्यांच्यामधे अ‍ॅक्टीव्हीझम भिनवणे सगळ्याच राजकीय पक्षांना कठीण होत चालले आहे (फक्त बाई चांगली दिसते म्हणून मते दिली जातात अश्या वेळी राजकीय पक्ष काय करणार हा तुमचा सवाल याच पठडीतला)

विकास's picture

25 Jan 2011 - 9:07 pm | विकास

दिशाहीन पक्ष आणि दिशाहीन राजकारण? असे खरेतर म्हणायला हवे.

एनडीए च्या काळात देखील काँग्रेस पक्षाची विरोधक म्हणून तशीच अवस्था झाली होती. सोनीया गांधींना पण कितीतरी नावे माध्यमे ठेवत होती. अर्थात सत्ता मिळाल्यावर ते बदलले... यात कुणाला चांगले वाईट म्हणायचा हेतू नाही. पण आपण केवळ माध्यमे जितक्यावेळ लिहीतात तितक्यावेळ वाचतो, नंतर विसरतो मग अचानक आठवते असे काहीतरी होत रहाते. मधे असे वाटले की आता "आदर्श" मागे पडले पण आता ते कायदेशीर बाबींनी पुढे जात आहे अथवा अडकवले जाईल (वेळ विकत घेतला जाईल). तो पर्यंत त्या एका मुद्यावरून देशात चळवळ होणे शक्य नाही. आज जर प्रत्येकच जण कुठेना कुठे तरी लाच देत आहे - यात सरकारी, निमसरकारी, खाजगी क्षेत्रे ही सर्वच काही अपवाद वगळून सर्वच आले, तर कुणाला भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा वाटणार?

अहो भ्रष्टाचार दूर गेला २६/११ नंतरचे मेणबत्त्यावाले कुठे गेले? त्यांना देखील नावे ठेवत नाही आहे कारण त्यांना त्यांची दिनचर्या करत पोटापाण्याकडे बघावेच लागणार आहे. पण हे देखील वास्तव आहे.

लोकांना, ते ही नव्याने तरूण झालेल्या देशातील तरूण जनतेला सतत कसे आपल्यामधे इंटरेस्टेड ठेवायचे हे मोठे आव्हान आहे - विशेष करून आज इमेल, उद्या ऑर्कूट, परवा मायस्पेस, मग फेसबूक, मग ट्विटर - थोडक्यात दरोज नवीन कसे देयचे, हे आजही कालची, म्हणजे रफी-किशोर-लता-आशा-तलत मधेच गुंगलेल्या पिढीतील राजकारण्यांना कसे जमणार? (हे उदाहरण म्हणून आहे, हे समजले असेलच. :) )

हा प्रश्न एक धोरण म्हणून सर्वच राजकारण्यांना पडत असला तर आश्चर्य वाटायला नको. बरं जे तरूण मिळतील ते नुसतेच पताका घेऊन हिंडणारे मिळणार नाहीत तर ते देखील (चांगल्या अर्थाने) महत्वाकांक्षी आणि काहीतरी स्वतंत्र विचार करणारे झाले आहेत.

थोडक्यात चर्चेच्या मूळ प्रश्नाला उत्तर "हो" असेच जरी असले तरी माझ्या लेखी हेच उत्तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेला आहे. एकीकडे त्याचे कारण सतत वाढणारा मध्यमवर्ग आणि त्याची "हू केअर्स" ची वृत्ती आहे आणि हा मोठा सामाजिक बदल आहे. तो जो पचवू शकेल आणि त्यात योग्य पॅकेजिंग करू शकेल तो उद्या नेतृत्व देऊ शकेल. बाकी सगळे "अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना, आपुला अवगुण जाणवेना, काही केल्या" या कॅटॅगरीत चाचपडत राहतील...

हम्म्म प्रतिसाद आवडला.. सहमत आहे..

सहज's picture

26 Jan 2011 - 9:45 am | सहज

ऋ, अजुन एक उत्तम धागा.

ज्या वेगाने विविध घोटाळे, भ्रष्टाचार येत आहेत व माध्यमातुन इतके विषय पुढे येत आहेत की पक्षच नव्हे सगळेच आपण कुठल्या एका विषयावर म्हणावे तितके लक्ष देउ शकत नाही आहोत. कदाचित त्यामुळेच हे सगळे गोंधळात टाकणारे, दिशाहीन वाटत आहे.

लोकसभा, विधानसभेत नक्की किती वेळ कुठल्या चर्चेसाठी गेला हे कदाचित नोंदीमधे सापडेलही पण कोणता तरी घोटाळा व त्यावर दंगा यापेक्षा नियमीत कोणते काम या सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून व्ह्यायला हवे, आणी ते होते आहे किंवा होत नाही हे तरी कसे कळावे? प्रसन्नदाने यावर चांगला प्रकाश पाडला आहेच.

तूर्तास पब्लीक मेमरी इज शॉर्ट, लोकांचे वर्गीकरण करुन प्रत्येक वर्गाला गुंतवून ठेवेल असे पर्याय जसे टिव्ही, खेळ, इंटरनेट, लाईफस्टाईल चॉइसेस दिले की लोक त्यात गुंतुन रहातील व ज्यांना "सत्ता" राखण्यास इंटरेस्ट आहे व आपले काम करुन घ्यायचे आहे त्यांनी राज्यकारभार चालवावा असेच एकंदर चित्र भारत नव्हे तर जगात इतर देशातही दिसते आहे. ग्लोबलायझेशनचे हे एक रुप असावे.

सत्ताधारी पक्ष, अधिकारी वर्ग व मोठे उद्योगधंदे व त्यांची प्रसारमाध्यमे यांची वाढती भागीदारी पहाता यात सामान्य माणसाला नेतृत्व तितके नाही अनलेस तो सामान्य माणुस स्वताला एखाद्या पक्षाच्या मतपेटीला बांधून घेईल पण तरी यात तो सामान्य माणूस 'सामान्य माणूस' न रहाता विशिष्ट विचारसरणीला धरुन रहाणारा गटाचा भाग बनणार.

प्रसन्न केसकर's picture

27 Jan 2011 - 2:06 pm | प्रसन्न केसकर

सदनाच्या कामकाजाचा भाग म्हणुन पहाता येईल का?
दंगा होऊ नये हे तत्वता मान्य आहे. पण जर सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर हवी ती चर्चा हवी तशी घडवुन आणु शकेल आणि स्वतःची कृत्ये, निर्णय इ. रॅटीफाय करुन घेणार असेल तर? सभागृहाला दिलेली आश्वासने पाळली जात नसतील तर? अश्या परिस्थितीत दंगा करुन विरोधी पक्षांनी कामकाजच बंद पाडले तर ते गैर ठरेल काय?
मुळात विरोधी पक्षांकडुन सत्ताधारी पक्षाने सदनात सहकार्याची फारशी अपेक्षा ठेवु नये कारण सत्ताधारी पक्षाला विरोध करणे, त्याचे जमेल त्या प्रकारे बिंग फोडणे व त्याची विश्वासार्हता कमी करणे हेच विरोधकांचे काम आहे. ते जर त्यांनी केले नाही तर ती जनतेची फसवणुक ठरेल. त्यामुळे विरोधकांना सदनात उपस्थित करण्यासाठी मुद्देच मिळणार नाहीत याची दक्षता घेणे हे सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य ठरते, आधी असे मुद्दे निर्माण होऊ द्यायचे आणि मग विरोधक सहकार्य करत नाहीत असे म्हणायचे हा रडीचा डाव झाला.

तिमा's picture

26 Jan 2011 - 11:06 am | तिमा

चर्चा चांगली रंगत आहे. त्यांत मला एक भर अशी घालावीशी वाटते की विरोधी पक्ष हेही भ्रष्ट असल्यामुळे भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यास त्यांच्याकडे नैतिक बळ नाही जे गांधीजींकडे होते. आणि असे बळ असल्याशिवाय जनता तुम्हाला मनापासून साथ देत नाही. त्यांत राजकारण्यांनी आत्ताचा समाज कारस्थाने करुन एवढा दुभंगवला आहे की प्रत्येक जण फक्त स्वतःपुरते पहात आहे.
तरुण पिढीला फक्त 'कूल' गोष्टींमधेच स्वारस्य असल्यामुळे असले विषय काढले की त्यांना म्हणे 'बोअर' होते. उच्च मध्यमवर्गीय चंगळवादात मग्न आहेत तर गरीब लोक रोजीरोटी मिळवण्यात व्यस्त आहेत. श्रीमंतांना या वास्तवाशी संबंधच नसतो आणि व्यापार्‍यांना व दलालांना हे सुवर्णयुगच आहे.
तर अशा चळवळींना काही जनाधारच राहिलेला नाही.
यथा प्रजा तथा राजा.

सुनील's picture

26 Jan 2011 - 5:33 pm | सुनील

Patriotism is the last refuge of a scoundrel
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपची अवस्था सध्या अशी झाली आहे.

२-जी स्पेक्ट्रमचे धागेदोरे प्रमोद महाजनांपर्यंत पोहोचू शकतात हे ध्यान्यात आल्यावर, ते थंडावले. इतर भ्रष्ट्राचाराबाबत आंदोलन करायचे तर, येडियुरप्पानां कुठे झाकायचे हा प्रश्न!

त्यापेक्षा तिरंगा यात्रा बरी. सोपी (आणि सवंग)!

वास्तविक सध्याचे सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरत आहे पण त्याचा फायदा घेण्याची मनस्थिती आणि परिस्थिती विरोघी पक्षांत राहिलेली नाही, कारण त्यांचेही हात त्याच मातीने बरबटलेले आहेत.

सुधीर काळे's picture

26 Jan 2011 - 9:52 pm | सुधीर काळे

ऋषिकेश,
धाग्याचा विषय छान आणि समयोचित आहे. माझे दोन पैशाचे योगदान!
पहिली गोष्ट म्हणजे समाजाला जागृत करण्याची आणि जागृत ठेवण्याची जबाबदारी प्रिंट आणि दृश्य माध्यमांचीच. केसकरसाहेबांची आणि इतर माध्यमांशी संलग्न असलेल्यांची क्षमा मागून एवढेच मनापासून सांगतो कीं कुठलाही विषय नेट लावून माध्यमें तडीस नेत नाहींत. केसकरसाहेबांनीच २-३ उदाहरणे दिलेली आहेत. मलाही दोन-तीन उदाहरणे आठवतात.
एक म्हणजे मी १९९७-२००४ दरम्यान भारतात (गोव्यात) कामाला असताना सलमान खान याने आपल्या फोनवरून गुन्हेगारी विश्वातल्या 'भाई' लोकांशी केलेया संभाषणाची टेप पोलिसांकडे आहे अशी 'सणसणीखेज' बातमी अगदी पहिल्या पानावर आठ-कलमी स्तंभात मी वाचली आहे. पण त्या बातमीवर कुठलीच कारवाई केली गेली नाहीं किंवा ती न केली गेल्याचे सोयर-सुतक मध्यमांनी पाळले नाहीं.
तसेच संजय दत्त आणि सलमान खान यांना त्यांच्या-त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली. तुरुंगात ठेवले तर बहुतेक सर्व प्रिंट व दूरचित्रवाणी माध्यमांनी त्या दोन्ही गुन्ह्यांचा जणू गौरवच करायचाच (glorification) ठेवला होता. सलमानला भेटायला त्याची बिनलग्नाची मैत्रीण तुरुंगात काय जाते आणि तिची 'नागन जैसी चाल' अगदी तुरुंगाच्या फाटकापासून ते सलमानच्या मिठीपर्यंत दाखवायला माध्यमांना कांहींच वाटत नाहीं. एरवी कात्रीनाला दाखविणे वेगळे आणि एका शिक्षा झालेल्या गुन्हेगाराची बिनलग्नाची मैत्रीण म्हणून दाखवणे वेगळे. असे दाखवून त्यांचा गौरव करणे सपशेल चूक आहे.
थोडक्यात लोकांनी काय पहावे/वाचावे हे माध्यमांनी न ठरविता लोकांना आवडेल ते दाखवायलाच माध्यमे तयार झाली तर सामान्य लोकांना का दोष द्यायचा?
याच सलमानने फूटपाथवर झोपलेल्या ३-४ लोकांवरून त्याच्या संरक्षणासाठी दिलेल्या पोलिसाच्या समक्ष गाडी चालवून मारले तरी याच्यावर खटला का होत नाहीं व त्याला तुरुंगात कां टाकले जात नाहीं हे मला पडलेले एक कोडेच आहे. माध्यमेंही अशा पापांच्या बाबतीत मूग गिळून गप्प कां? माध्यमें या पापांना कां वाचा फोडेनाशी झाली आहेत?
आपले नेतृत्व हिणकस होण्यास सर्वात जास्त जबाबदार आहेत ही माध्यमेच. यांनी लोकांना शहाणे करण्याचा वसा टाकून दिला आहे.
माझे नशीब कीं कात्रीनाबाईंना पद्मश्री मिळाणार अशी वदंता होती ती वदंताच राहिली. काय 'रोल मॉडेल' आहे नवतरुणींना! पण काय सुबुद्धी सचली कुणास ठाऊक पण या बिनलग्नाच्या मैत्रीणीला हा 'सन्मान' मिळाला नाहीं, निदान या वर्षी तरी! सलमानलाही पद्मश्री द्यायचे घाटत आहे अशी एक बातमीही वाचनात आली होती. ती दिली गेल्यास सर्व पद्मश्रीविभूषित लोकांनी आपापली पदके परत करायची वेळ आली असती!
दुसरा आहे 'काळ-काम-वेगा'चा प्रकार. मला 'भाजपा'चे कांहींही सोयरसुतक नाहीं. पण काँग्रेससारखी एकछत्री सत्ता त्यांना कधीच मिळाली नाहीं. एक सलग पाच वर्षांचा काळ ते सत्तेवर आले ते अकाली, शिवसेना, ममतादीदी, जॉर्ज फर्नांडिस अशा नेत्यांच्या सहकार्याने (?). अशा परिस्थितीत पहिल्यानेच सत्तेवर आलेल्या भाजपाच्या कारभाराची तूलना काँग्रेसससारख्या५० वर्षांहून एकछत्री कारभार हाकलेल्या पक्षाशी करणे चूक आहे.
तिसरे म्हणजे काँग्रेसने जरी कांहीं चांगले पायंडे पाडले (लोकशाहीच्या रोपाची देखभाल नीट करण्याचे श्रेय नक्कीच काँग्रेसला वा त्यातही नेहरूंना द्यायलाच हवे). पण एरवी काँग्रेसने जी विषवल्ली पसरवली त्या पापाची फळे सर्वांना भोगावी लागत आहेत. अल्पसंख्यांकांचा अनुनय हे त्यातलेच एक विषारी रोप होय.
भाजपा हा एकच पक्ष original असावा. बाकीचे बरेच पक्ष काँग्रेसमधून फुटलेल्या नेत्यांनी गट करून बनविलेले आहेत. त्यामुळे कांहीं विषवल्लींची जोपासना हे नवे पक्षही जोमाने करत आहेत.
आताच आपण दारुल उलूम देवबंदचे उपकुलगुरु (Vice-chancellor) म्हणून नियुक्त झालेले गुलाम महंमद वास्तान्वी यांची खूप स्तुती केली. पण तेथील विद्यार्थ्यांच्या बंडाळीमुळे २ आठवड्यात त्यांची हकालपट्टी होत आहे! कारण काय तर त्यांनी मोदींची त्यांच्या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल स्तुती केली!
मला आज तरी विरोधी पक्षच नव्हे तर केसकरसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सरकारही दिशाहीन झालेले आहे.
सर्व राजकीय पक्षांना सरळ करण्याची जबाबदारी मतदारांची आणि माध्यमांची आहे. मतदारांनी आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींना पत्रे लिहून त्यांना 'लायनी'त ठेवले पाहिजे तर सवंगतेच्या मागे न लागणारे व "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय"च्या लो. टिळल्कांच्या पठडीतील पत्रकार उदयास यायला हवेत!
मी माझ्या परीने नेतृत्वाला पत्रे लिहीतच असतो. पण त्याची कुचेष्टाच होते. पण मला त्या कुचेष्टेचे कांहीं फारसे वाटत नाहीं. मला जे बरोबर वाटते ते मी करत राहीन व इतरांनाही माझे म्हणणे पटेल अशी आशा करत राहीन.
सर्व साधारणपणे माझी मते 'मिपा'करांतील 'बुद्धिवाद्यां'ना पटत नाहींत, पण राहवले नाहीं म्हणून लिहायचा हा प्रपंच केला. पहा पटते का!
पुन्हा एकदा हा धागा काढल्याबद्दल ऋषिकेशचे अभिनंदन व धन्यवाद.

प्रसन्न केसकर's picture

27 Jan 2011 - 2:41 pm | प्रसन्न केसकर

माध्यमांशी सध्या तरी माझा काहीच संबंध नाही. (आणि तसेही माझे माध्यमांबाबत मत फारसे चांगले राहिलेले नाही.) परंतु तुमच्या माध्यमांबाबतच्या मुद्यांबाबत काही स्पष्टीकरणे आवश्यक आहेत.
सर्वप्रथम मी हे स्पष्ट करु इच्छितो की जरी गेली वीस वर्षे मी मेनस्ट्रीम मीडीयामधे काम केले असले तरी मुळात अल्टरनेट मीडीयाकडे माझा कायम कल होता. मेनस्ट्रीम मीडीयामधे येण्याआधी त्या दृष्टीने मी स्वतः काही प्रयत्न केले होते आणि गेल्या काही वर्षात मी ते प्रयत्न पुन्हा सुरु केलेले आहेत देखील. त्यामुळे मेनस्ट्रीम व अल्टरनेट अश्या दोन्ही मीडीयांची मला थोडीफार समज आहे असे मी समजतो.
मेनस्ट्रीम मीडीया लोकांना हवे तेच देतो हे बरेचसे खरे आहे. मुळात मीडीयामधे पैसे कमावणे अत्यंत अवघडच नाही तर बहुतेकदा अशक्य आहे. फारतर मीडीयाच्या मालकीचा फायदा अन्य व्यवसायांमधुन अधिक पैसे कमाविण्यासाठी होऊ शकेल.
वाचक वृत्तपत्राची जी किंमत देतो (अन्य माध्यमांसाठी तो प्रत्यक्ष मुल्य देत नाही.) ती एकुण खर्चाच्या जेमतेम ३०-४० टक्के असु शकते. त्यामुळे जमाखर्चाची तोंडमिळवणी करणे मीडीयासाठी अत्यंत अवघड असते. ही तोंडमिळवणी करण्याचा प्रामाणिक मार्ग म्हणजे जाहीरातींचे उत्पन्न. परंतु हे उत्पन्न देखील वाचकसंख्येवरच अवलंबुन असते. थोडक्यात हे व्हिशिअय सायकल असते.
माध्यमांसाठी बहुतेक अन्य सर्व व्यवसायांपेक्षा अनेक पटींनी अधिक भांडवल लागते. शिवाय त्या व्यवसायात रिटर्नस आलेच तर त्यालाही अनेक वर्षे लागतात (किमान दहा वर्षांनंतर खर्चाची तोंडमिळवणी होऊ शकते. तोवर बराचसा पदरखर्च होत असतो.)
हे सर्व खरे असले तरी बहुतेकदा मोठ्या मीडीया मालकांचा प्रत्येक बाबीत हस्तक्षेप नसतो. बर्‍याचदा स्वतःच्याच हितसंबंधांविरोधात जाणार्‍या बातम्या प्रसिद्ध झाले तरी मालक ते सहन करतात. अगदीच अपवादात्मक परिस्थितीत ते हस्तक्षेप करतात. बहुतेकदा हस्तक्षेप होऊ शकतो तो जाहीरातीचे उत्पन्न बुडेल अशी भीती असलेल्या व्यवस्थापनाचा आणि त्याच्यावर समन्वयाने तोडगा काढणे अगदीच अशक्य नसते.
संपादकीय विभागावर सर्वात मोठा दबाव असतो तो वाचकाचा. वाचकसंख्या रोडावली तर... ही भीती सर्वच संपादकांना सतत असतेच.
अश्या परिस्थितीत वाचक सतत संतुष्ट हवा. परंतु तो तसा रहात नाही. वाचकाला बहुतेकदा माध्यमांच्या कंपल्शनबाबत माहिती नसते. मर्यादित वाचकसंख्या जिंकण्याकरता अमर्याद स्पर्धा असते, त्या स्पर्धेत असमानता असते हे वाचकाला माहिती नसते. त्याला अन्य प्रॉडक्टप्रमाणेच माध्यमे देखील स्वस्तात (जमलेच तर फुकट किंवा माध्यमांकडुनच वाचण्याकरता कोणत्या ना कोणत्या रुपात फायदे मिळाले तर अधिकच उत्तम.), सर्वच बाबतीत दर्जेदार हवी असतात. त्यातील मजकुरातुन माहिती, ज्ञान, शिक्षण, मनोरंजन सर्वच हवे असते. ते टेलरमेड देखील हवे असते. आणि माध्यम दिमाखदार देखील हवे असते.
यातील माहिती व ज्ञान संपादन करणे व माध्यमातुन वितरीत करणे हे बहुतेकदा वेळखाऊ, कष्टाचे आणि खर्चाचे असते. मनोरंजनाच्या संकल्पना व्यक्तीगणिक बदलतात. दिमाखदार स्वरुप तर अत्यंत खर्चिक असते. (मोठ्या आकाराच्या वृत्तपत्राच्या एका पानाचे फक्त डिझाईन करण्यासाठी काही हजारात खर्च येऊ शकतो.) त्याखेरीज ब्रँडिंग, मार्केटिंगसाठी लक्षावधी रुपयांचा वेगळा खर्च करावा लागतो तेव्हा कुठे वाचक्-जाहीरातदार मिळायला लागतात.
हे खर्च करणे आणि तरीही कमी किमतीत सेवा देणे मोठ्या कंपन्या, उद्योगांना शक्य असते परंतु छोटे-मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी ही डेडएंड येते. कितीही दर्जेदार मजकुर निर्माण केला तरीही पैसे कमी असल्याने ब्रँडिंग करता येत नाही किंवा दिमाखदार प्रॉडक्ट निर्माण करता येत नाही. वर जमा खर्चाच्या तोंडमिळवणुकीमुळे प्रॉडक्ट स्वस्तात देणेही शक्य नाही. त्यामुळे वाचक नाही. वाचक कमी असल्याने जाहीराती नाहीत आणि त्यामुळे पैसे नाहीत अशी परिस्थिती या गटांची असते. मग अश्या परिस्थितीत दर्जेदार माध्यमे चालणार तरी कशी?

केसकरसाहेब, धन्यवाद!
मला हे कांहींसे आपल्याबरोबरच्या टेलीफोन संभाषणावरून सामजले होते, मुख्यतः मालकांचा कमीत कमी हस्तक्षेपाबाबत.
अशा परिस्थितीत सलमानसारख्या गुन्हेगार आणि देशद्रोह्याविरुद्ध, संजय दत्तसारख्या गुन्हेगार आणि borderline देशद्रोह्याविरुद्ध आणि नवज्योतसिंग सिद्धूसारख्या गुन्हेगाराविरुद्ध माध्यमें हात धुवून का लागत नाहींत? या उलट त्यांच्या लुटपुटीच्या तुरुंगवासाचे glorification च होते. किती वर्षें हे गुन्हेगार असे जामीनावर मोकाट हिंडणार आहेत? या न्यायाच्या प्रक्रियेला कांहींच अर्थ राहिला नाहींय्.
माझ्यापुरता मी अशा देशद्रोह्यांचे सिनेमे कटाक्षाने पहात नाहीं ('दबंग'ही पाहिला नाहीं आणि पहाणारही नाहीं.)

प्रसन्न केसकर's picture

27 Jan 2011 - 4:55 pm | प्रसन्न केसकर

सातत्याने पाठपुरावा करण्यामधे.
सर्वप्रथम प्रश्न येतो तो एकुणच व्यवस्थेचा आणि कायद्याचा. भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य मर्यादित आहे. (एका अर्थाने ते चांगलेही आहे.) शोधपत्रकारिता करताना आपल्याकडुन बदनामी, न्यायालयाचा अवमान यासारखे गुन्हे घडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. झालेच तर ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट, मोक्का यांच्या कचाट्यात आपण येणार नाही याबाबत पण खबरदारी घ्यावी लागते. वर माहिती मिळवण्यासाठी त्याला सामान्य नागरिकापेक्षा अधिक असे कुठलेच कायदेशीर अधिकार नसतात.
दुसरा प्रश्न असतो तो सुरक्षेचा. ज्या पत्रकारांकडुन आपण सगळ्या अपेक्षा ठेवतो तो बहुतेकदा कंत्राटी कामगार असतो. कंत्राटाची मुदत असते जास्तीत जास्त तीन वर्षे. त्याचा पगार असतो केवळ काही हजार; त्यातले पाच एक हजार सोर्सिंग, नेटवर्किंग, कन्व्हेअन्स, वृत्तपत्रे-नियतकालिके-पुस्तके, फोन, सॅटेलाईट कनेक्टीव्हिटी (दुरचित्रवाणीच्या चॅनेल्सच्या अ‍ॅक्सेससाठी), नेट कनेक्टीव्हिटी इ. वरच खर्च होतात, कामाची वेळ २४ तास आणि कंत्राटी पद्धतीमुळे कोणत्याच लेबर लॉजचे संरक्षण नाही. त्यामुळे कधीही नोकरी जाऊ शकते. दुर्दैवाने जर तो काम करताना मेलाच तर अपवादात्मक परिस्थिती वगळता कुठलीच नुकसान भरपाई मिळणार नाही. जखमी झाला तर दवाखान्याचा खर्च संस्था करु शकेलच अशी परिस्थितीही नाही. अगदी काही न होता वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत नोकरी झालीच तर रिटायरमेंटनंतर बँक बॅलन्स (पीएफ वगळता) फारतर दोन पाच लाख असणार आणि पेंशन नसल्याने त्यात त्याला मरेपर्यंतचा खर्च भागवावा लागणार. अश्या परिस्थितीत तो कितीसा पुरा पडु शकेल या अपेक्षांना?
तिसरा प्रश्न असतो परिस्थितीचा. एखादा गैरव्यवहार पत्रकाराने उघड केलाच आणि त्यात कारवाई सुरु झालीच तर त्या कारवाईबाबत काही दिवस बातम्या येतील. आरोपींना अटक झालीच तर त्याबाबत जास्तीत जास्त पंधरा दिवस बातम्या येऊ शकतील. (अटक आरोपी जास्तीत जास्त पंधरा दिवस पोलिस कोठडीत ठेवुन तपास करता येतो.) अटकेनंतर जास्तीत जास्त ९० दिवस तपासातील प्रगतीच्या बातम्या देता येतील. पण अटकेनंतर जास्तीत जास्त ९० दिवसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल करावेच लागते आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने बातम्या देण्यावर मर्यादा येतात. त्यानंतर फारतर आरोपीला जामीन झाल्याच्या बातम्या येऊ शकतील.
केस हिअरिंगला आल्यावर बातम्या परत सुरु होऊ शकतील पण केसमधील साक्षी पुरावे तपासण्याचे काम महिनोनमहिने चालणार. त्यात नवीन अशी फारशी माहिती निघेलच असे नाही. तोवर बराच काळ लोटलेला असल्याने लोकांचा प्रकरणातील रस देखील कमी झालेला असतो. शिवाय वृत्तपत्रात जागा कमी असते, रेडीओ-टिव्हीवर बातमीपत्रांना वेळ मर्यादित असतो.
अन सर्वात महत्वाचे म्हणजे पत्रकार जर जुन्या प्रकरणांच्या पाठपुराव्यातच अडकुन पडला तर नवीन घटनांकडे तो कसे लक्ष देणार? वीस वर्षात मी स्वतः किमान पन्नास हजार केसेसच्या बातम्या दिल्या असतील. त्यातल्या पंधरा वीस केसेसचा तरी सतत पाठपुरावा करणे शक्य आहे? अन हे करायचेच झाले तर जी अवाढव्य आकाराची वृत्तपत्रे काढावी लागतील, जे मॅग्निमोनियस टाईम फ्रेमचे न्युज प्रोग्रामिंग करावे लागेत ते व्यवस्थापकीय दृष्ट्या तरी शक्य होईल? त्यासाठी जो स्टाफ लागेल त्याचे तरी काय?
अश्या अनेक मर्यादा माध्यमांना येतात. तरीदेखील माध्यमे अन माध्यमातील माणसे त्यांच्या परीने प्रयत्न करतातच. आज आपल्याला जी प्रकरणे आठवतात त्यांना वाचा फोडली तरी कुणी? माध्यमांनीच ना? बोफोर्स, सत्येंद्र दुबे खुन, आरुषी खुन, तेलगी अशी अनेक प्रकरणे माध्यमांनी वर्षानुवर्षे तडीला लावुन धरलेली आहेतच ना? फिर्यादीने काही दिवसांनी न्यायालयात केसला येणे बंद केले पण पत्रकार मात्र नेमाने प्रत्येक तारखेला उपस्थित राहिले अश्या अनेक केसेस मी स्वतः पाहिल्या आहेत.
दुसर्‍या बाजुला माध्यमांमधुन एव्हढे सगळे छापुन आले तरी त्याची परिणीती काय? वाचक काही दिवस एखाद्या प्रकरणाच्या बातम्या वाचतात आणि नंतर त्यांचा रस संपतो. अहो वाचक साधे पंधरा पैशाचे पोस्ट कार्ड पाठवत नाही कधी वृत्तपत्रांकडे स्वतःचे मत वाचकाच्या पत्रव्यवहारात छापुन यावे म्हणुन. उगीच नाही तीच ती नावे रोज सगळ्या वृत्तपत्रांच्या वाचकांच्या पत्रव्यवहारात छापुन येत.
आणि ते देखील जाऊ दे. वृत्तपत्रात काहीही छापुन आले तरी लोकांच्या दृष्टीकोणात कधी काही फरक पडतो? तुम्ही वर सलमान खानचे उदाहरण दिले ते किरकोळ आहे. मुंबई बाँबस्फोटातील आरोपींशी संबंध असल्याच्या आरोपात न्यायालयाने दोषी ठरवलेले लोक निवडणुका लढवतात, त्यांना गठ्ठ्यांनी मते देखील पडतात, त्यांचे चित्रपट पहायला कोट्यावधी लोक हौसेने जातात अन स्वतःला त्यांचे फॅन पण म्हणवुन घेतात.
जर संपुर्ण समाजच असा भरकटलेला, अस्थिर असेल तर अश्या परिस्थितीत त्याच समाजातुन आलेला आणि त्याच समाजाचा अविभाज्य भाग असलेला, त्याच समाजाच्या जीवावर पोट भरणारा मीडीया तरी वेगळा कसा असेल?

टारझन's picture

27 Jan 2011 - 4:58 pm | टारझन

बा प रे !! डें ज र !!

सहज's picture

27 Jan 2011 - 7:16 pm | सहज

खरच अवघड आहे.

वेगवेगळी प्रकरणे धसास लावून तडीस न्यायची हे वर्तमानपत्रांबरोबर, न्यायव्यवस्थेचीही मोठी जबाबदारी आहे हेच पुन्हा अधोरेखीत होते आहे.

सहजराव,
अलीकडे मी पहातोय् कीं सुप्रीम कोर्टाच्या 'बडग्या'मुळे अनेक ठिकाणी नाइलाज झाल्याने सरकारला अनेक चांगल्या कृती कराव्या लागत आहेत. (मागे दिल्ली सरकारलाही असाच सासुरवास झाला होता.)
स्विस बँकेतील पैशाबाबतही हा बडगा त्रास देतोच आहे व तो असाच मुद्द्याला धरून सरकारकडून कांहीं तरी सकारात्मक काम करवून घेईल अशी मला आशा वाटते! बघू भविष्यकाळात काय दडून बसले आहे!

क्लिंटन's picture

27 Jan 2011 - 7:07 pm | क्लिंटन

मी मिडियावर एक छोटेखानी इलेक्टिव्ह कोर्स मागच्या महिन्यात घेतला होता.तो शिकवायला आम्हाला परंजोय गुहा ठाकुरता हे columnist visiting professor म्हणून होते.त्यांनी बी-स्कूलमध्ये शिकवत असल्यामुळे त्यांनी आम्हाला मिडियाचा business perspective सांगितला. टाइम्स ग्रुपने काही बिझनेसमध्ये शेअर विकत घेतले आहेत.त्यात काही बिल्डरचे बिझनेसही आहेत.मागच्या वर्षी दिल्लीत एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना सामानाची वाहतूक करणारी लिफ्ट कोसळून त्याखाली दोन मजूरांचा मृत्यू झाला.इतर सगळ्या वर्तमानपत्रांनी या बातमीबरोबरच कोणत्या बिल्डरचे बांधकाम सुरू होते ते पण छापून आणले.पण टाइम्समध्ये मात्र ’एका बांधकाम साइटवर अपघात’ अशी बातमी होती पण ती कोणत्या बिल्डरची साइट याविषयी काहीही उल्लेख नव्हता.याचे कारण काय हे शोधणे फारसे कठिण नाही.याचे कारण त्याच बिझनेसमध्ये काही शेअर टाइम्स ग्रुपने घेतले होते.तेव्हा त्या बिल्डरचे नाव छापून दिले तर त्यांच्या investment ची किंमत (काही प्रमाणात तरी) कमी होण्यात स्वत:च हातभार लावला असे होईल.ते कोण कशाला करेल? तसेच जाहिराती हा वर्तमानपत्रांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो हे सर्वांनाच माहित आहे.एखादा उद्योग (समजा रिलायन्स) आपल्या जाहिराती त्या वर्तमानपत्रात देत असेल तर असे वर्तमानपत्र आपले जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न बुडेल या भितीने रिलायन्सविरूध्द फारसे काही लिहित नाही. तेव्हा मिडियाचे बातम्या देताना असेही हितसंबंध असतात.

प्रसन्न केसकर's picture

27 Jan 2011 - 7:21 pm | प्रसन्न केसकर

असे म्हणतात या साट्यालोट्याला. त्याबाबत वेळोवेळी बरेच वाद झालेत.
इथे टाइम्स ग्रुपचे नाव आले म्हणुन त्याबाबतचा माझा चांगला अनुभव देखील नमुद करतो. मी जवळपास तीन वर्षे टाईम्स ग्रुपमधील वृत्तपत्रात वरिष्ठ पदावर काम केले. त्या काळात माझ्या स्टाफने बड्या जाहिरातदार कंपन्यांविरुद्ध बातम्या दिल्या आणि त्या संबंधित कंपन्यांच्या नावांसकट छापुन देखील आल्या. बातम्या देतानाच त्या जाहिरातदारांच्या विरोधात आहेत हे माहिती होते. संबंधित कंपनीलाही बातमी छापण्याआधीच संपर्क साधुन कॉमेंट मागीतलेली असल्याने माहिती असेच. परंतु एकाही बातमीबाबत छापण्याआधी किंवा छापुन आल्यावर कोणत्याही वरिष्ठाकडुन प्रत्यक्ष हस्तक्षेप झाला नाही.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2011 - 8:33 pm | नितिन थत्ते

ऐशीच्या दशकात अरूण शौरी + एक्सप्रेस ग्रुपने रिलायन्स विरोधात मोठी मोहीम चालवली होती. त्या काळात अंबानींचे प्रतिस्पर्धी बॉम्बे डाईंगचे नस्ली वाडिया 'योगायोगाने' इंडिअन एक्सप्रेस गटाच्या संचालक मंडळात होते.

प्रसन्न केसकर's picture

28 Jan 2011 - 12:17 pm | प्रसन्न केसकर

माहिती आहे थत्तेचाचा!
असे योगायोग खास भर देऊन हायलाईट करताना तेव्हाची सगळी परिस्थिती एकत्र पहा की. तेव्हा लायसन्स राज होते आणि बरीचशी लायसन्सेस रिलायन्सने ताब्यात घेऊन ठेवलेली होती. हे बरेचसे साम्राज्य गैरव्यवहारांवर आधारित होते. तेव्हा जे झाले ते रिपोर्टस केवळ दोन व्यावसायिकांमधील वैमनस्य एव्हढ्यापुरते मर्यादित नव्हते तर त्यातील बरेचसे आरोप बरेच लेगवर्क करुन, पुरावे जमा करुन केलेले होते.
दुसरे म्हणजे तेव्हा इंडियन एक्सप्रेस शोधपत्रकारितेचा बादशहा होता. त्याची शोधपत्रकारिता केवळ रिलायन्सपुरती मर्यादित नव्हती. कमला केस, भागलपुर केस, कालाहंडी दुष्काळ, नेल्लोर हत्याकांड, चंबळ खोर्‍यातील दस्युराज, आसाममधील पेट्रोकेमिकल भ्रष्टाचार, प्रतिभा प्रतिष्ठान, सिमेंट घोटाळा अश्या एकामागुन एक सेरिज इंडियन एक्सप्रेसने त्याकाळात केल्या होत्या आणि त्यासाठी मोठी किंमतही मोजली होती.
असे असताना शौरी, गुरुमुर्ती इ. नी केलेली रिलायन्स शोधपत्रकारितेचे मोजमाप केवळ वाडिया-अंबानी संबंधांच्या आधारे करणे मला योग्य वाटत नाही.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2011 - 2:09 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

त्याला स्मरूनच आजतागायत रिलायन्सचे कोणतेही प्रॉडक्ट किंवा सर्विस वापरली नाही. पुढेही वापरावे लागणार नाही अशी आशा आहे.

मधल्या काळात सगळ्याच उद्योगांवर रिलायन्स कब्जा करील आणि रिलायन्सला शरण जावे लागेल अशी भीती निर्माण झाली होती. पण ती दूर झाली.

सर्वात गंमतीचा भाग म्हणजे याच एक्सप्रेस गटाने एकदा एक्स्प्रेस गटाच्या वृत्तपत्राची वर्गणी एक वर्ष भरली तर रिलायन्स मोबाईल देण्याची स्कीम काढली होती.
दुसरीकडे 'रिलायन्सने कायद्याची रेषा नेहमीच ओलांडली पण आता वाटते की ते कायदेच चुकीचे होते' असे विधान शौरींनी (निर्गुंतवणुक मंत्री असताना) केल्याचेही स्मरते. त्यामुळे अंबानी-वाडिया संघर्षाची कारणमीमांसा जास्तच पटू लागते.

नितिन थत्ते's picture

26 Jan 2011 - 11:04 pm | नितिन थत्ते

भाववाढीच्या मुद्द्यावर भाजप काही करीत नाही यासाठी मी त्यांना दोष देणार नाही.

वस्तूचे बाजारभाव सरकारने नियंत्रित करणे ही डावी विचारसरणी झाली. भाजप तर डाव्या विचारसरणीचा कट्टर विरोधक आहे. त्यानुसार* ते सरकारने भाव नियंत्रित करावे यासाठी आंदोलन करीत नाहीत यात ते त्यांच्या अधिकृत धोरणाशी प्रामाणिकच रहात आहेत असे मी म्हणेन.

*काही दुष्ट मंडळी भाजप आंदोलन करीत नाही कारण भाजप मुळात पूर्वीपासून व्यापार्‍यांचाच पक्ष होता असे म्हणतात तिकडे दुर्लक्ष करावे. :)

विजुभाऊ's picture

27 Jan 2011 - 11:21 am | विजुभाऊ

भाववाढीला काही प्रमाणात " कमोडीटी मार्केट" जबाबदार आहे. त्यामुळे साठीबाजीची शक्यता वाडली तसे ज्यांचा कमोडीटीशी सूतराम संबन्ध नाही अशी मंडळी सट्ट्या च्या निमित्ताने यात उतरली

आणखी एक मुद्दा इथे मांडावासा वाटतो. कलमाडींच्या घरावर धाड इतक्या उशीरा कां घातली? इथे जकार्तात तर चर्चा चालली होती कीं कलमाडींनी 'सीबीआय'ला हिरवा झेंडा दाखवला कीं आता मला गैरसोयीच्या ठरल्या असत्या त्या सर्व गोष्टी मी आता व्यवस्थितपणे लपवून ठेवल्या असून आता 'जरूर येणेचे करावे' असे जणू त्यांनी 'सीबीआय'ला आमंत्रणच दिले.
तसेच त्यांची CWG Working Group वरून केली गेलेली उचलबांगडीही इतक्या उशीरा काय म्हणून? अशोक चव्हाण, पूर्वी शिवराज पाटील आणि आबांना जसे तडकाफडकी घालवून दिले तशीच कारवाई कलमाडींच्याविरुद्ध का करण्यात आली नाहीं? या दरम्यान त्यांनी काय-काय उत्पात केले असतील कुणास ठाऊक!
अशा वेळी सर्व माध्यमांनी खूप बोभाटा करायला हवा!