शेवभाजी

शुभांगी कुलकर्णी's picture
शुभांगी कुलकर्णी in पाककृती
21 Jan 2011 - 11:10 am

नाशिक जळगाव भागाकडे अतिशय आवडीने खाल्ला जाणारा मसालेदार आणि झणझणीत पदार्थ
१)सुकं खोबरे किसुन भाजुन १ वाटी
२)कांदे २ मोठे (१ पातळ चिरुन भाजुन, दुसरा बारीक चिरुन)
३)एक लाल टोमॅटो चिरुन
४)धणे १ मोठा चमचा भाजुन
५)४ लवंगा, छोटा दालचिनिचा तुकडा भाजुन
६)लसुण पाकळ्या ८-१०
७)१ छोटा चमचा तीळ भाजुन
८)लाल तिखट १ +१/२ चमचा छोटा
९)गरम मसाला १ चमचा छोटा (कांदा लसुण मसालाही वापरु शकता खमंग हवेतर)
१०)१ छोटा चमचा हळद आवडत असेल तर मी टाकत नाही
११)मीठ चवीनुसार
१२)कोथिंबीर अर्धी वाटी धुवुन बारीक चिरुन
१३)फोडणीच साहित्य
१४)तेल २ चमचे
१५) गरम पाणी
आणि
१६)जाडी शेव (काका हलवाईची एकदम छान असते) फरसाणच्या दुकानात मिळते

क्रमवार पाककृती:
प्रथम धणे, तीळ, सुक खोबर, लवंग, दालचिनी मिक्सीवर बारीक वाटुन घ्या. त्यात भाजलेला कांदा, टोमॅटो घालुन परत फिरवा.
कढईत तेल तापल्यावर मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर बारिक चिरलेला कांदा गुलाबीसर परता त्यात चिमुट्भर साखर व लाल तिखट टाका (फोडणीत साखर व लाल तिखट टाकल्याने कटावर चांगला तवंग्/तर्री येते)
आता वाटलेला मसाला घालुन तेल सुटेपर्यंत परता.
मसाला चांगला परतल्यावर त्यात गरम मसाला, मीठ, हळद (ऑप्शनल) घालुन आधणाचे पाणी घाला. उकळी आल्यावर त्यात थोडी शेव घालुन झाकुन ठेवा.
वाढायच्या आधी कोथिंबीर टाकुन वाढा.

एकंदरीत पदार्थ असा दिसतो

आणि हे वाढल्यावर सोबत कांदा, लिंबु असेल तर मजाच न्यारी.

वाढणी/प्रमाण:
हवे तसे
अधिक टिपा:
एकदम शेव टाकु नये गचका होतो (पिठल होण्याची शक्यता जास्त)
शेव जाडीच वापरावी.

माहितीचा स्रोत:
ढाब्यावरच्या पदार्थाचे निरीक्षण आणि कितीतरी अयशस्वी प्रयोग

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Jan 2011 - 11:18 am | यशोधरा

स्लर्रप!! :)

इंटरनेटस्नेही's picture

25 Jan 2011 - 2:37 am | इंटरनेटस्नेही

.

गुंडोपंत's picture

21 Jan 2011 - 11:20 am | गुंडोपंत

काय झकास भाजी आहे हो. नेहमीची आवड... मस्त लाल रस्सा!
पाणी सुटले तोंडाला.

(स्वगतः असल्या पाककृती टाकतांना आम्हा म्हातार्‍यांचा विचार करत जा हो! हल्ली काहीही खाल्ले तरी पादायला होते फार. त्यामुळे भाजीपाल्यावर दिवस काढतो. त्यात ही ला 'जरा मसालेदार काही कर' म्हंटले तरी अंगावर येते ;) )

अवलिया's picture

21 Jan 2011 - 11:21 am | अवलिया

मेलो मेलो ठार मेलो

एकच शेवभाजी दाखवून किती वेळा मारणार आहात..

- (शेवभाजीप्रेमी) पिंगू

गवि's picture

21 Jan 2011 - 11:46 am | गवि

खास.

धुळ्याला गेलो की रेग्युलर रोजच्यारोज खातोच खातो ही शेवभाजी.

नाशिकच्या थोडे बाहेर भुजबळ सिटीजवळ एक काठेवाडी नावाचे ढाबा हॉटेल आहे. तिथे ही सर्वात छान मिळते.

हा ढाबा असाही आवर्जून जावा असं ठिकाण आहे. अगदी फॅमिलींसाठीही.

महेश काळे's picture

21 Jan 2011 - 11:51 am | महेश काळे

प्रचंड अवडता पदार्थ..

मस्त फोटु..

धन्यवाद

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2011 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार

हा पाककृती विभाग बंद करा रे महिनाभर !!

सकाळी सकाळी असले काही पाहिले की फार त्रास होतो जीवाला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Jan 2011 - 9:17 am | निनाद मुक्काम प...

अरे तुला भूक भागवण्याचे अनेक पर्याय आहे
आमची येथे वखवख वाढते नुसती
आता जळगावातील आजीकडची सर्व मंडळी पुण्यात स्थायिक झाली आहेत
तेव्हा अस्सल खानदेशी शेवभाजी होर्पायला पुण गाठावे लागणार

कच्ची कैरी's picture

21 Jan 2011 - 12:34 pm | कच्ची कैरी

पाककृती छान आहे पण भाजीचा रंग जरा फिकट वाटतोय.

गवि's picture

21 Jan 2011 - 12:42 pm | गवि

अगदी..सहमत.

लाल्भडक तर्रीऐवजी हा आमटीसारखा वाटतोय.

पण शेवभाजी हॉटेलातच नेहमी खाल्लेली असल्याने ती जरा जळजळीत असणारच आणि ही पाकृ हा त्याचाच होममेड अवतार असल्याने तो सौम्य असेल असं वाटतं.

स्मिता.'s picture

21 Jan 2011 - 12:48 pm | स्मिता.

हेच लिहिणार होते. शेवांच्या भाजीचा रस्सा लाल-तर्री असलेला असतो.
शेवांची भाजी मला फार आवडते पण हल्ली मिळतच नाही :(

टारझन's picture

21 Jan 2011 - 12:36 pm | टारझन

ह्हा ह्हा ह्हा .. दुसरी का तिसरी शेवभाजी आहे मिपा वरची ... तरीपण प्रथेप्रमाणे छाण :)

निवेदिता-ताई's picture

21 Jan 2011 - 1:57 pm | निवेदिता-ताई

शेवांची भाजी मला फार आवडते पण हल्ली मिळतच नाही,??????

मग कर ना घरात.......म्हणे मिळतच नाही..?????????

शुभांगी..........मस्त एकदम....आजच करते,

अन्या दातार's picture

22 Jan 2011 - 2:15 am | अन्या दातार

असलं काहीबाही बोलू नका. वाढत्या जीडीपीत घट होईल नाहीतर! आनि स्वयंपाक न येणार्‍या स्त्रिया म्हणजे अगदी मुक्त झालेल्यच हो! त्यांना परत जखडून ठेवण्याचे पातक करु नका!
बाकी पाकृ मस्तच.

प्राजु's picture

21 Jan 2011 - 8:11 pm | प्राजु

आहाहा मस्तच!! करावी का विकएंडला? हम्म!! करेनच बहुधा.

आमोद शिंदे's picture

25 Jan 2011 - 9:20 am | आमोद शिंदे

तुम्ही फक्त विकेंडलाच स्वयपाक करता की काय असे वाटते मला आजकाल ;)

अमोल केळकर's picture

22 Jan 2011 - 9:53 am | अमोल केळकर

छान पाककृती. धन्यवाद

अमोल केळकर

आमोद शिंदे's picture

25 Jan 2011 - 9:22 am | आमोद शिंदे

वा! 'शेवांची' (की शेवेची?)भाजी आवडली.
आता केसू पुढचे अंडे कधी घालतात ह्या प्रतिक्षेत. तो पर्यंत शेवेची भाजी...

ramjya's picture

25 Jan 2011 - 11:37 am | ramjya

शेव भाजी मस्त आहे