परवाच एका मॉल मध्ये फिरताना फुड्कोर्ट्मध्ये एक माणुस डोसा बनवताना दिसला. मुळातच इकडे भारतीय हॉटेलस मोजुन ३-४. एकजात सगळी सारखीच उत्तरेकडची चव असलेली. त्यामुळे तो डोसे काढणारा पाहुन बर वाटलं. पण वर नाव वाचल तर 'ईटालियन क्रेपे'. म्हटलं हा काय प्रकार आहे. त्याच्या काउंटरवर गेलो. एक क्रेपे ऑर्डर केला. थोडास गोडुस लागला. दिसायला तर एकदम डोश्या सारखा होता. मग घरी आल्यावर नेट वर धुंडाळलं. तेव्हा क्रेपे हा न्यहारीसाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी चालुन जाणारा , एक युरोपियन डोश्याचा प्रकार आहे अस कळलं. आणि थोडे फेर फार करत हा प्रयोग कराण्यासाठी हात शीवशीऊ लागले. ;)
साहित्यः
३/४ बाऊल मैदा/गव्हाच पीठ.
१ अंड.
१/२ कप दुध.
सोडा (पिण्याचा. तोच जो मोठी माणस कसल्याश्या रंगीत द्रव्यात टाकुन घेतात तो.)
मीठ चवीनुसार.
१ चमचा साखर्/पीठी साखर
येवढ्या प्रमाणात ५-६ क्रेपे तयार होतात.
नॉन्व्हेज स्ट्फिंगसाठी : चिकन
व्हेज स्ट्फिंगसाठी : मश्रुम (वा तुम्हाला आडतील त्या भाज्या.)
गोड स्ट्फिंगसाठी : फळांचा जॅम, मुरंबा.
बाकी तुमच्या तेब्येतीला मानवत असल्यास चीज् ,बटर.
कृती:
एका भांड्यात अंडे फेटुन घावे. त्यात मैदा, मीठ, साखर घालुन एकजीव करुन घ्यावं.
नंतर त्यात सोडा टाकुन साधारण डोश्याच्या पीठा पेक्षा थोड पातळ मिश्रण तयार करावं.
किमन १०-१५ मिनिटे बाजुला ठेउन द्यावं
ते मिश्रण आराम करतय तो वर स्टफिंगची तयारी करावी.
१ चमचा तेलावर, मश्रुम आणि बोनलेस चिकनचे छोटे तुकडे करुन त्यांना मीठ, मसाला, हळद, हिरव वाटणं लावुन मधम आचेवर १० मिनिटं परतुन घावे.
कडकडीत तापलेल्या तव्यावर एक डाव पीठ ओतुन तवा सगळ्या बाजुंनी फिरवुन घ्यावा जेणे करुन मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरेल. आच मध्यम करुन १-२ मिनिटे शिजु द्यावं
कडा सुटायला लागल्या की उलथण्याने उलटुन दुसरी बाजू पण १-२ मिनिटे शिजु द्यावी.
ज्याच्या त्याच्या आवडी नुसार त्यात हवं ते स्टफिंग टाकुन रोल करावे.
गोड आवडणार्यांनी बटर लावुन जॅम, मुरांब्याचा थर द्यावा.
नॉन्व्हेज प्रेमींनी मॅगी चा भुना मसाला / झण्झणीत चटणी चा कोट करुन त्यावर चिकन्/भाज्या टाकुन रोल करावा.
हा पदार्थ गरमागरम खाण्यातच मजा आहे. :)
प्रतिक्रिया
29 Dec 2010 - 8:06 pm | प्राजु
अरे व्वा!! मस्त आहे हा प्रकार.
दिसतो तरी डोश्यासारखाच. यामध्ये चटणी पूडी आणि बटाट्याची भाजी घातली की झाला मसाला डोसा तयार. :)
29 Dec 2010 - 8:13 pm | पुष्करिणी
चॉकलेट पसरवून पण मस्त, मला फार आवडतो
29 Dec 2010 - 8:16 pm | रेवती
छानच दिसतोय पदार्थ!
ऑक्टोपस कश्यापासून तयार केलाय रे?
29 Dec 2010 - 8:23 pm | प्राजु
सॉसेजिस आहेत ते.. ! तुम्ही नका बघू त्याकडे रेवतीताई. ;)
29 Dec 2010 - 8:25 pm | रेवती
अच्छा!
मग आम्ही लांबच!;)
29 Dec 2010 - 8:33 pm | कवितानागेश
धन्यु.
हा डोसा म्हणजे पोळीला चांगला पर्याय आहे.
- आळशी माउ
29 Dec 2010 - 8:39 pm | प्रियाली
पॅनकेकचे रेडी पीठ वापरले तरी क्रेपे होतात. फक्त पातळ करून डोशाप्रमाणे काढायचे.
29 Dec 2010 - 9:33 pm | टारझन
एकंच नंबर रे गणपुले !! जियो मेरे गणा !!
- पेताड रमता
29 Dec 2010 - 9:52 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
...आणि हा सेव्हरी क्रेप आहे....
तसाच स्वीट पण अप्रतिम लागतो!..
त्याला काहिहि घालु शकतो आपण.... chocolate spread...
किंवा मध आणि बारीक कापलेली फळे!...
अॅपल + दालचिनी + मध्...आणि जर्राशी कॅस्टर शुगर....... आह्ह्हाआ!
गणपा....... ट्राय माडी!
30 Dec 2010 - 12:06 am | मितान
+१ असेच म्हणते..
कितीतरी कॉम्बिनेशन्स मस्त लागतात.
यात केळ्याचे काप आणि चॉकलेत स्प्रेड एकत्र भरायचे !
पालक + थोडास्सा लसूण + मश्रूम्स
देशी चव पाहिजे असेल तर चक्क कांदा लसूण मसाला घालून चिरलेला कांदा परतायचा. वर थोडे टोमॅटो सॉस !!!!
माझी लेक तर नुसताच कोणत्याही सूप मध्ये कुस्करून खाते !
चला चला आजच करूया !
29 Dec 2010 - 9:54 pm | धमाल मुलगा
आयला!
हा मनुक्ष पेटलाय. इतके दिवस ब्रेक घेतला होता, त्याचं उट्टं काढतोय.
30 Dec 2010 - 9:19 am | नंदन
सहमत :)
29 Dec 2010 - 10:02 pm | प्रभो
झ का स!!!!!
(तिखटापेक्षा गोड क्रेप्स जास्त आवडणारा) प्रभो
30 Dec 2010 - 3:23 pm | मेघवेडा
ऐसाच बोल्ताय! चॉकलेट/मेपल सीरप वगैरे फासून तर लै लै भारी!
29 Dec 2010 - 10:21 pm | संजय अभ्यंकर
माणसाला जळवण्याचा असुरि आनंद कशासाठी?
फोटू टाकल्या बद्दलही निषेध (चुकलो णीषेध!)
29 Dec 2010 - 10:43 pm | पिंगू
सहीये.... डोसा नको मज क्रेप हवा...
- पिंगू
29 Dec 2010 - 10:49 pm | कच्ची कैरी
वा मस्त !तुम्हाला तर आधीच ओस्कर घोषित केलेला आहे तेव्हा आमच्यासारख्या पामरांनी आणखी काय लिहावे?
30 Dec 2010 - 12:25 am | स्वाती दिनेश
आमच्या फ्रांकफुर्ट च्या स्टेशनात क्रेपंचा स्टॉल लागलेला असतो आणि अॅपलमूस + दालचिनीचा मस्त गोडुस दरवळ सुटलेला असतो. मग कॅलरी,शुगरचा विचार न करता पाय तिकडे आपोआप वळतात..
गणपा, मस्त दिसत आहेत क्रेपं,
स्वाती
29 Dec 2010 - 11:04 pm | निनाद मुक्काम प...
क्रेपे हा माझा अत्यंत आवडता प्रकार हा जर्मनीत खूप लोकप्रिय आहे त्याची पाककृती दिल्याबद्दल आभार दारू टाकून सुध्धा
हे क्रेपे बनविले जातात किमान २० प्रकारचे पदार्थ ह्या क्रेपे मध्ये टाकले जातात . .त्या बद्दल माहिती मी माझ्या आख्यानात देईनच
तूर्त फ्रंक फ्रुट मधील सेली ब्रेती शेफच्या दुकानातील क्रेपे चे फोटो देत आहे .
29 Dec 2010 - 11:12 pm | डावखुरा
मस्तच पण आम्ही फक्त झाड्पाला वाले...
30 Dec 2010 - 7:50 am | मदनबाण
अरे वा... वाचावे ते नवलच !!! चला नविन खाद्य पदार्थ कळाला. :)
व्हेज स्ट्फिंगसाठी : मश्रुम (वा तुम्हाला आडतील त्या भाज्या.)
मला तर मश्रुमच आवडेल... ;)
बाकी ऑक्टोपस मस्त बसलाय तंगड्या टाकुन !!! ;) बहुधा ३ क्रेपेंच भविष्य एकदमच सांगण्याचा त्याचा इचार असावा. ;)
30 Dec 2010 - 9:02 am | ऋषिकेश
वाह! पहिल्यांदाच ऐकला पदार्थ.. विकांताला इथेही प्रयोग होणार अशी लक्षणे आहेत.. नीट जमल्यास फोटु टाकेनच!
30 Dec 2010 - 9:31 am | पियुशा
जियो गनपा जियो !
30 Dec 2010 - 9:31 am | सहज
क्रेप खाल्लेल्या बर्याच जणांनी गोड क्रेपलाच पसंती दिली आहे.
चिकन क्रेप पेक्षा आपली पसंती चिकन बरीटो!
यावरुन आठवले तिखटमिठाच्या पुर्या व लसणाची चटणी बरेच दिवसात केले नाही आहे.
30 Dec 2010 - 10:17 am | sneharani
मस्त.
एक नविन प्रकार कळला.
अवांतर : ब्लॉगपण मस्तच झालाय.
30 Dec 2010 - 10:57 am | खादाड अमिता
न्युटेला, क्रीम चीज आणि चोकलेट चे स्टफिंग पण भारी लागते. मस्त!
30 Dec 2010 - 11:06 am | गवि
मला यासम प्रकार कोणीसा मिल्कमेड कंडेन्स्ड मिल्क सोबत खाऊ घातला होता..
अहा.
30 Dec 2010 - 11:22 am | परिकथेतील राजकुमार
गणपा अरे किती त्रास देशील रे मेल्या ?
30 Dec 2010 - 11:40 am | जागु
गणपा मस्तच. खिमाही चांगला लागेल ह्यात. पावभाजीची भाजीही चांगली लागेल.
30 Dec 2010 - 12:14 pm | शिल्पा ब
ह्म्म..मला गोड क्रेप अजिबात आवडत नाहीत...त्यापेक्षा मसाला डोसा हजार पटीनी छान..
प्रत्येकाची आवड निराळी म्हणा!!
30 Dec 2010 - 12:15 pm | यशोधरा
मस्त दिसत आहेत.
30 Dec 2010 - 6:08 pm | प्रदीप
गोड क्रेप जपानमध्येही अत्यंत पॉप्युलर आहेत.
मलाही गोड क्रेप आवडत नाहीत. मसाल्या डोश्यांची सर त्याला नाही.
क्रेपपेक्षा सहजरावांनी म्हटल्याप्रमाणे बुरिटो चांगले. किंवा सरळ चिकनचे स्टफिंग घालून टॉर्टियाचे रॅप्स!!
30 Dec 2010 - 8:46 pm | मीली
सोपी आहे रेसिपी आणि डोसा पण भारी दिसतोय.
मी वरील मिश्रणात कांदे ,टमाटे,मिरची घालून उत्तपा करते.
सोड्याच्या ऐवजी बेकिंग सोडा टाकला तर चालेल का?
30 Dec 2010 - 8:57 pm | सुनील
क्रेप खावा तो गोडच!
बाकी सहजराव आणि प्रदीप म्हणतात तश्या बरिटो किंवा टोर्टोया रॅपपेक्षा माझी पसंती पिटा ब्रेडातील जायरोला!
31 Dec 2010 - 1:26 am | निनाद मुक्काम प...
माझ्या मते क्रेपे हे गोड पदार्थाबरोबर चांगले असते .
बाकी घाटकोपर पूर्व येथे स्टेशन जवळ खाऊ गल्ली जम फेमस तेथे डोसे वाला डोसा मध्ये पावभाजी /मश्रूम /चायनीज नुडल/आणि बरेच काही घालतो नि त्याचा तुफान धंदा होतो डोसा मध्ये चिकन मासे वैगेरे आदी गोष्टी सुध्धा चांगल्या लागतात .माझ्या ह्या मते डोश्याला पर्याय नाही .
मात्र मध /सिनमान/ मार्मालेड/ह्या गोष्टींना क्रेपे शिवाय पर्या नाही आणि किमान २०ते ३० विविधता आहे .पूर्ण चोकलेट किसून किंवा छोटे तुकडे करून टाकता येते .क्रेनबेरी किंवा इतर जॅम सुद्धा चांगल पर्याय आहे .
केरेमेल तर झकास
31 Dec 2010 - 2:20 pm | चिंतातुर जंतू
क्रेप हा फ्रान्समधला अतिशय लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. लहान मुलांना गंमत/हौस म्हणून स्वयंपाक करायचा असेल तर त्यांना क्रेप करायला शिकवतात. पारंपरिक कृतीमध्ये सोडा घालत नाहीत. साधारण पाव किलो पिठासाठी तीन-चार अंडी वापरतात. पिठावर अंडी फोडून टाकतात, आणि दूध ओतता ओतता अंडी चांगली फेटतात. फेटलेल्या अंड्यांत अडकलेल्या हवेमुळे क्रेप खुसखुशीत आणि हलके होतात (म्हणून सोड्याची गरज भासत नाही). क्रेपच्या तयार पिठात खायचा सोडा असतो, पण अर्थातच अंड्यामुळे खुसखुशीत खमंगपणा येतो तो वेगळा असतो. वितळलेलं लोणी पिठात मिसळल्यासही खुसखुशीतपणा येतो. नमकीन/तिखट क्रेपसाठी पिठात चक्क बिअरही घालता येते. अर्थात स्वाद वेगळाच येतो :-)
जाळीदार, कुरळे किंवा वळ्यावळ्यांचे असा क्रेपचा मूळ अर्थ आहे. त्यामुळे कागद किंवा झिरझिरीत लेसच्या कापडासाठीही 'क्रेप' हा शब्द वापरला जातो.
गोड क्रेप लोण्यावर केले जातात. आवडत असल्यास पीठ भिजवताना पिठात व्हॅनिला किंवा संत्र्याचा अर्क, दालचिनी पूड, रम, अॅपल सायडर असे पदार्थ घालता येतील. तिखट क्रेप साध्या किंवा ऑलिव्ह तेलावर केले जातात. आवडीनुसार रोकफोर, ब्ल्यू, एमेंटाल, ग्रूयेर, कॅमोंबेर, कोम्ते, शेव्र अशी चीजं घातली जातात.
31 Dec 2010 - 2:32 pm | गणपा
धन्यवाद जंतू चांगली माहिती दिलीत. :)
1 Jan 2011 - 6:20 pm | आत्मशून्य
.........
2 Jan 2011 - 8:59 pm | विलासराव
व्वाह क्रेप !!!!!!!!!!!!!
व्वाह गणपा!!!!!!!!!!!!