राम राम मंडळी !
काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला!
इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का?
चला, सुरुवात मी करतो.
इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता.
साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो. ऐटीत ऑर्डर सोडली..."दत्तु, दोन चहा...कप विसळून" सहज म्हणून खिशात हात घातला तर काय, शिल्लक फक्त १.५०/- . पिट्याला, माझ्या मित्राला विचारल॑, "पिट्या, लेका दिडच रुपाया शिल्लक आहे. काय करायच॑?" पिट्या म्हणाला माझ्याकड॑ २.५० रु. उरलेत. म्हणल॑ चला, चहाच॑ बिल तर निघाल॑, पुढच॑ पुढे बघू.
दत्त्यान॑ चहा आणून ठेवला. कपात डोकावल॑ तर चहा नेहमीपेक्षा जास्त गोरा दिसला! पिट्या म्हणाला, "च्यायला, दत्त्यान॑ स्पेशल दिला काय?"
आता आम्ही दोघ॑ही जरा टरकलो. नविनच होतो कॉलेजात. कँटीनचा मालकही ओळखीचा झाला नव्हता. "आता बहुतेक कपबश्या विसळून पैसे फेडावे लागणार" असे दात काढत विनोदाला "कारुण्याच॑ झालर" लावत तो चहा स॑पवला.
दोघेही घाबरतच काउ॑टरपाशी गेलो. आम्हाला बघून दत्त्या ओरडला..."दोन कट्टींग्ग...च्यार रुपै" जे काय हुश्श्य झाल॑ म्हणून सा॑गतो!
त्या आनंदात एकमेका॑च्या खा॑द्यावर हात टाकून...अगदी गळ्यात गळे स्टाईल..जोरजोरात स्वतःच्या दोन मिनिटा॑च्या अवस्थेवर खळाळून हसत निघालो. कँटीनच्या दाराशी पोहोचलो खरं, पण ह पिट्या लेकाचा निव्वळ वेंधळा, येड॑ सरळ चालत जाऊन पायर्या उतरायच्या सोडून आधीच डावीकड॑ वळाल॑. गळ्यात गळे असल्याने आमचीही वरात त्याच्याबरोबर. पायर्या बियर्या सगळे मिथ्य असल्याच्या आविर्भावात दोघ॑ही २ सेक॑द हवेत तरंगलो आणि शेवटी धाप्पकन तोंडावर पडलो...पड्लो ते पडलो, हात अजुनही एकमेका॑च्या गळ्यातच. झटक्यात उठलो आणि सगळ्यात पहिल॑ काम केल॑ ते...चुकलात, तुम्हाला काय वाटल॑ कुठ॑ लागल॑ ते पाहिल॑...छट..कुठच्या मुलीन॑ नाही ना पाहिली ही फजिती हे पाहिल॑. त्यान॑तर जे काही हसत सुटलो...अग्ग्ग्ग्ग..आजही आठवल॑ तरी हसु येत॑.
================================
चला, आता कोण लावत॑य न॑बर?
सा॑गा सा॑गा...आम्हाला पण हसु द्या, कसे ग॑डलात ते सा॑गा !!!!
प्रतिक्रिया
8 Apr 2008 - 5:50 pm | नारदाचार्य
धमाल्याच्या स्टाईलमधली काही फजिती वाचायला मिळेल म्हणून आलो आणि फजिती झाली.
8 Apr 2008 - 6:28 pm | धमाल मुलगा
नारदाचार्य,
आम्ही सतत ग॑डतच असतो. मी वरचा किस्सा केवळ सुरुवात म्हणून दिलाय. जरा इतरा॑चे झालेले पोपट कळूदे, मग आम्ही पण आमचा झालेला सप्तर॑गी पोपट सा॑गतो की :-)))
घ्या तिच्याआयला, मोठ्या हौसेन॑ धागा चालू केला आणि पहिलीच प्रतिक्रिया आमच्या बोका॑डी बसणारी आली...घ्या आमची अजुन एक फजिती !! :-))))
बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-))
- (ग॑डलेला) ध मा ल.
8 Apr 2008 - 5:58 pm | नारदाचार्य
वाटलं होतं, धमाल्या आता छान माप काढेल. त्याऐवजी त्यानं,
असं लिहून पुन्हा गंडवलं. मानलं रे. तुझ्याच भाषेत सांगायचं तर फुटलो...
8 Apr 2008 - 6:20 pm | विजुभाऊ
मी आणि माझे ३ चुलत असे चौघे भाऊ सांगलीला निघलो होतो. वाटेत एक शेतकरी गाडीत माक्याची कणसे भरताना दिसला.
आम्ही आमची गाडी थांबवली.षेतकरी दादाला काही कणसे देता का अशी विचारणा केली.
त्या शेतकर्याने चांगली पोतेभरुन कणसे आमच्या गाडीत टाकली.
माझ्या भावाने त्या शेतकर्याला कणासाचे पैसे किती म्हणुन विचारले....शेतकरी दादा पैसे घ्यायला नको म्हणाले...
मी त्याना मोठ्या उदार पणे म्हंटले की पैसे घ्याना तुमचे नुकसान का करुन घेताय..
शेतकरी त्यावर सहज म्हणाला "काय राव उगाच नुकसानाचं बोलताय्..त्यात नुकसान कसलं..ते तुमच्या पोटात तरी जाइल अहो डुकरं ईतके नुकसान करतात्.....चार डुकरे जास्त लागली म्हणुन समजू.....
आम्ही एकमेकांकडे पाहीले........एकुण चौघेजण होतो ना.........
.......एक (गाढव ) रान डुक्कर ठरलेला विजुभाऊ
19 Nov 2016 - 10:32 am | भम्पक
.......
8 Apr 2008 - 7:42 pm | प्राजु
११वीत असताना, बाबांनी मला स्कूटी घेऊन दिली. थाटात ती स्कूटी घेऊन मी निघाले होते. कॉलेज जवळ एका मैत्रिणीच्या बाबांचे ऑफिस होते. तिथे ती मैत्रिण थांबत असे. तिथुन तिला घेऊन कॉलेजला जाणे हा नित्याचा क्रम. अशिच एकेदिवशी ऑफिसच्या खाली जाऊन, तिथून तिला जोरात हाक मारली. तिने बाल्कनीतून ५ मिन्टे थांब असे सांगितले. मी तशीच स्कूटिवर बसून रहिले होते... इतक्यात...गुडघ्यापर्यंत नऊवारी साडी नेसलेली म्हातरी बाई आली. तिच्या डोक्यावर बुट्टी होती कसली तरी. ती एका हाताने सावरत ती माझ्या जवळ आली. काही काळ मला नुसतीच बघत उभी राहिली. मी लक्ष दिले नाही. मग ती जवळ आली, म्हणाली, " दुरड्या पोचल्यात की ग तिकडं.." मी पुन्हा दुर्लक्ष केलं...
ती : पोरी, अगं दुरड्या पोच्ल्यात की थितं....
मी :( निर्विकार पणे) पोचूदेत कि मग, मी काय करू?
ती : समदी जमली हायेत तिथं.. आन् तू हितचं...
मला आता थोडासा राग आला.
मी : तुमच्या त्या दुरड्या म्हणजे काय मला माहिती नाही आणि तुम्हीही जावा जिथं सगळी जमली आहेत तिथं..
ती : (प्रेमाने) असं करू नये पोरी, चल माज्या संगट चल.. मी न्हेते तुला..
माझ्या रागाचा पारा चढायला लागला. तरिही जास्तीत जास्त संयमाने मी तिला म्हणाले..
"बाई, हे बघा.. तुम्ही निघा आता.. मलाही कामं आहेत.." इतक्यात माझी मैत्रिण खाली आली .
ती बाई : " म्या तुजं काय बी ऐकनार नाही, तुला घेउनच जानार आहे...." असं म्हणत माझा हात धरला तिने..
मी आता एकदमच भडकले..
मी : ओ बाई, सोडा ना... काय हा मुर्खपणा आहे..?
माझी मैत्रिणही तिला ओरडू लागली.
ती बाई : मला माहित हाय.. लग्नाच्या मांडवातून तू पळून आली हायेस्...म्या तुला घेऊनच जानार..
तिचं हे वाक्य ऐकून मी ब्लास्ट का काय म्हणतात तेच झाले..
"ओ बाई... उगिच काहीही बडबडू नका... जावा बरं.. .." आणखी काही बोलणार इतक्यात त्या बिल्डिंग मधले एक दुकानदार अमचा गोंधळ ऐकून बाहेर आले.. आणि त्यांनी त्या बाईला हाकलून लावले. मला म्हणाले.. त्या बाईच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला असावा.
आम्ही तिथून निघालो..पण राग मात्र शांत झाला नव्हता माझा. हळू हळू शांत झाला. कॉलेज मध्ये येईपर्यंत दोघीही एकमेकीशी काहिच बोललो नाही.... कॉलेज मध्ये स्कूटी पार्क करताना मी नी मैत्रिणीने एकमेकीकडे बघितले आणि दोघिना एकदमच जोरात हसू आले...झालेल्या प्रकारचे.
(सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2008 - 11:58 pm | भाग्यश्री
माझ्या लग्नाच्या ३-४ दिवस आधीची गोष्ट.. (होणारा) नवरा अगदी आयत्यावेळेलाच लग्नाला आल्यामुळे त्याच सगळं शॉपिंग बाकी होतं..
मग आम्ही आमच्या घराजवळच्या जयहींदमधे गेलो.. २ शेरवानी आवडल्या.. पण आई-बाबा नव्हते बरोबर, म्हणून संध्याकाळी त्यांना बरोबर घेऊन शॉपिंग उरकून टाकावी असा विचार केला.. पण एक शेरवानी बुक करून ठेवावी म्हणून आम्ही काऊंटरपाशी आलो.. नवर्याने ५०० रू. देऊन शेरवानी बुक करून काउंटरपाशी ठेवली आणि निघाला... तेवढ्यात मी माझं अती-बावळट डोकं चालवलं, आणि त्या माणसाला म्हणाले "अहो, शेरवानी द्या की.. तिथे कुठे ठेवताय!! " :)))) आणि नवर्याकडे असं पाहीलं जसं काही तो पण विसरत होता आणि मी किती हुशार!! (४-५ हजारांची शेरवानी कुणी ५०० ला देईल का अशी!! ) तिकडे नवर्याला , आता हात जोडू की पाया पडू असं झालं होतं... तेवढ्यात मला माझा यडपटपणा कळला..आणि हसत आम्ही निघालो ! काउंटर वरच्या माणसाचा चेहरा पाहण्यालायक झाला होता!! :)
9 Apr 2008 - 12:31 am | चतुरंग
त्यावेळी बहुदा माझे अभियांत्रिकीचे तिसरे वर्ष होते. मी मावशीकडे रहात होतो.
एरवी बसने जात असलो तरी परीक्षेच्या काळात वेळ वाचावा म्हणून मी काकांची जुनी स्कूटर घेऊन जात असे.
त्याप्रमाणे मी आणि माझा वर्गमित्र स्कूटवरुन परीक्षेला चाललेलो.
नेहेमीप्रमाणेच अभ्यास 'नीट' झालेला असल्यामुळे, तो मागे बसून मोठ्याने नोट्स वाचत होता आणि मी गाडी चालवत ऐकत होतो!
जून महिन्यातला पहिलाच आठवडा होता. पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या होत्या. रस्ते किंचित ओलसरच होते.
आमच्या कॉलेजकडे जाणार्या रस्त्याला दोन - तीन अतीशय झोकदार वळणे होती. त्यातल्याच एका वळणावर आमची गाडी पोचली.
तिथे बहुदा ऑइल सांडलेले होते, त्यावर पावसाचे पाणी, मग काय विचारता एकदम ऑईल-स्केटिंगच!
आमची गाडी अलगद घसरली, स्पीड अत्यंत कमी होता कारण लक्ष नोट्स ऐकण्याकडे होते, हलकेच घसरलेल्या स्कूटरवरुन मी बुद्कन खाली रस्त्यावर कधी आलो ते मलाच समजले नाही. त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!!
काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. मी पोट धरुन रस्त्यावर पडल्या पडल्याच हसत होतो आणी पलीकडे माझा मित्र हसत होता! (नंतर नीट बघितले तेव्हा स्कूटरचे मागचे टायर पूर्ण गोटा होते असे दिसले;))
अजूनही आम्ही भेटलो की त्या आठवणीवरुन घसरतोच!
चतुरंग
15 Oct 2014 - 5:01 pm | चिगो
=))
:D
9 Apr 2008 - 12:38 am | प्राजु
त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!!
काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला.
अहो तुम्हीच काय.. हे वाचून मी सुद्धा पोट धरून हसले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Apr 2008 - 10:07 am | मदनबाण
शाळेतल्या दिवसांनमधील गोष्ट आहे, बहुतेक मी ८ वी मधे होतो, वार्षिक परि़क्षेचे वेळापत्रक एका नोटिस बोर्ड वर लावले होते.
ते लिहुन घेण्यासाठी मुलांची गर्दी जमा झाली होती.मी सुद्धा त्या गर्दी मधे उभा राहुन वेळापत्रक लिहुन घेतले.
सरते शेवटी परिक्षेचा दिवस उजाडला, एक एक पेपर होत गेले आणि आता फक्त २/३ पेपरच बाकी होते.
इतिहासाच्या पेपर ची माझी पूर्ण तयारी झाली होती आणि आज तो पेपर होता,मी वर्गात जाऊन बसलो आणि परिक्षक पेपर वाटण्याची वाट पाहु लागलो.....
शेवटी पेपर माझ्या हाती लागला आणि तो मी आधी पुर्ण वाचुन मग सोडवण्यास घेणार होतो,,,,,पण हे काय?इतिहासाच्या जागी भुगोलाचा पेपर? मला तर काहीच कळेनाच मी माझ्या पुढील मुलास विचारले काय रे आज इतिहासाचा पेपर आहे ना? तो म्हणाला नाही भुगोलाचा.....(याचा अर्थ इतिहासाचा पेपेर दोन दिवसानंतर आहे.)
एका क्षणात माझ्या लक्षात आले गर्दी मधे उभे राहुन वेळापत्रक लिहुन घेण्यात माझ्या कडुन एक छोटी चुक झाली होती,,,,,,(छोटी?)
त्या क्षणी वर्गातली सगळी बाकडी माझ्या भोवती गरागरा फिरतायत असे वाटायला लागले,इतिहासातील अतिरथी महारथी जाऊन आता बिनमोसमी वादळी वारे वाहायला लागले होते..... शेवटी मी माझ्या डोक्यातील होकायंत्राप्रमाणे भरकटलेल्या विचारांना आवरायचे ठरवले.....
आणि पेपर लिहावयास घेतला,,,,, मी फक्त लिहीत गेलो.....
निकालाचा दिवस उजाडला:----- मला इतिहासापेक्षा भुगोलात जास्त मार्क मिळाले होते!!!!!
( धमालजी आपला मि.पा वरील छोटा मदन दा)
मदनबाण
9 Apr 2008 - 8:44 pm | प्रभाकर पेठकर
अगदी अशीच फजिती माझी बी.कॉम्. ला झाली.
स्टॅटीस्टीक्सच्या पेपरला मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करून गेलो होतो. हातात पेपर आला आणि मेंदूत काळोख पसरला.......
अर्धातास आढ्याकडे नजर लावून बसल्यावर स्टॅटचे एक- एक फॉर्म्युले आठवायला लागले.
वर्ष फुकट गेले नाही. नशीब.
13 Apr 2008 - 10:24 pm | लंबूटांग
७वी च्या स्कॉलरशिप च्या परिक्षेच्या वेळेस बुद्धिमत्ता चाचणी चा पेपर समजून आत गेलो. सर्व पेपर सोडवून संपत आला आणि शेवटी ग्राफ बघितल्यावर शंका आली बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपर मधे ग्राफ्स कसे आणि तेव्हा पेटली की हा गणिताचा पेपर आहे. आणि सगळ्यात जास्ती मार्क्स गणितातच मिळाले.
15 Apr 2008 - 6:12 pm | नीलकांत
अंतीम वर्षाच्या परिक्षेच्यावेळी असाच अनुभव गाठीशी आहे. माझ्या जवळ वेगळी पुस्तके आणि इतरांजवळ इतर, आता परिक्षेच्या वेळी पुस्तके म्हणजे... अहो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढतो. ( सुरुवात कधी करतो ते विचारू नका)
पण पेपर छान गेला व निकाल सुध्दा उत्तम.
नीलकांत
9 Apr 2008 - 10:19 am | भाग्यश्री
ही फजिती नाही म्हणता येणार.. नवर्याचा आगाऊपणा म्हणा.. किंवा शिक्षकांची फजिती!! :)
तो शाळेत असताना त्याने पेपर मधे असंख्य तारे तोडलेत.. त्यातले १-२..
म्हणी पूर्ण करा असा प्रश्न होता.. बळी तो ----- आणि याने लिहीलं, "बळी तो राजाचा माळी !"
आणि इंग्रजी च्या पेपर मधे काहीतरी गोपाल आणि सीता वर ४-५ ओळी दिल्या होत्या, आणि खाली प्रश्न होता..
who is gopal ? his answer was....
gopal is seeta !! :D
मला त्या शिक्षकांचे एक्स्प्रेशन्स पाहायला आवडलं असतं!! :))
9 Apr 2008 - 10:40 am | आनंदयात्री
सगळ्यात मोठी फजिती काही डिश्टींग्युइश करता येत नाय भो, दर २-४ दिवसाला आमचा कुठे न कुठे पोपट होतच असतो. आत्ता काल परवाचीच गोष्ट हाय, आम्ही गेल्तु पोरगी पहायला, पहायला म्हणजे तिला हाटेलित भेटायला हो. मोठ्या श्टायलीत मोठ्ठ्या मोठ्ठ्या आर्डरी सोडल्या अन जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आले की पाकिट आम्ही हापिसातल्या आमच्या कप्प्यातच विसरलो. अस्सा गोरामोरा झालो मी ! माझे खर्रकन उतरलेले तोंड पाहुन हुशार पोरगी काय समजायचे ते समजली अन पैसे देउन मोकळी झाली !
9 Apr 2008 - 10:57 am | शरुबाबा
चार डुकरे जास्त लागली म्हणुन समजू.....
बहोत खुब
9 Apr 2008 - 3:29 pm | स्वाती राजेश
धमाल मुला, मस्त विषय सुरु केलास..
सगळे किस्से एकदम सही आहेत..
ह. ह. पु. वा.:))))))
9 Apr 2008 - 4:10 pm | मनस्वी
शनिवार, वेळ अंदाजे सकाळचे ११-१२.
मी आणि माझी मैत्रीण एन् सी सी ची परेड संपून स्कूटीवरून सुसाट घरी चाललो होतो. मी चालवत होते आणि मैत्रिण मागे.
आमच्या समोरची रिक्षा तुफान वेगात होती आणि आमची स्कूटीपण त्याच वेगात..
काही सेकंदात अचानक रिक्षेने डावीकडे टर्न घेतला...... आणि आम्ही झूपकन समोरच्या उंच डिव्हायडरच्या वर!
गाडीला खाडकन ब्रेक लावला.. त्या उंच डिव्हायडरवर ती स्कूटी आणि स्कूटीवर आम्ही दोघी ते पण एन् सी सी च्या ड्रेसमध्ये असे दृष्य.
काही सेकंदातच काय झाले ते लक्षात आले.
तेवढ्यात शेजारील मोटारसायकलवरचे २ तरुण आले.. त्यांनी आमची गाडी खाली काढून दिली आणि आम्ही तिथून धूम ठोकली :)
आणि घरी आल्यावर जे हसत सुटलो...
9 Apr 2008 - 7:12 pm | वरदा
मज्जा आली वाचून...
मी इथे अमेरीकेत आल्यावर पहिल्यांदा बर्फ साफ करायला घेतला.. नवरा सांगत होता नको जाऊस तरी म्हटलं मी जाऊन दुसरं शॉवेल आणते...आणि बोलत बोलत चाल्ले होते... नवर्याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:))) असली भयंकर आपटले साष्टांग नमस्कार घातला आणि नेमकी शेजारची बाई तेव्हा बर्फाचे फोटो काढत होती तिच्या कॅमेराने अगदी बरोब्बर माझाच फोटो काढला...सगळ्या बिल्डींगला करमणूक झाली...मी शेकली गेले त्याचं काय :))))))
13 Apr 2008 - 10:27 pm | लंबूटांग
हा हा हा..
9 Apr 2008 - 10:24 pm | शितल
माझी फजीती हे सदर छान आहे. मला ही फजीती आठवते पण दुसर्याची पाहिलेली.
9 Apr 2008 - 11:03 pm | अनिकेत
अगदी २ दिवसापूर्वीची गोष्ट...
मी सध्या दिल्लीला आलो आहे.
२ दिवसांपूर्वी कनॉट प्लेस मधे एका जुना लूक असलेल्या रेस्टॉरंटात गेलो..
तिथल्या आगाऊ वेटरने मला वय विचारले...मी म्हटले २४...
त्याने मला पाटी दाखवली...दारू २५ च्या वरच्यांना देणार......असला पोपट झालाय...
असला कसला कायदा दिल्लीत?
मुंबई/केरळात असे नसते हो.....
:(
अनिकेत
ता.क.: काल मी वय २६ सांगितले.... :)
13 Apr 2008 - 10:15 pm | देवदत्त
दारू २५ च्या वरच्यांना देणार......
२५ वर्षांपर्यंत का नाही हो? आता २१ आहे ना कमीत कमी वय?
भारतात नाही का ते? :)
9 Apr 2008 - 11:12 pm | देवदत्त
छान मजा चालली आहे एकमेकांच्या फजित्या वाचत ;)
चालू द्या... जमल्यास (काही असल्यास) मीही लिहिन.
13 Apr 2008 - 3:59 am | शितल
आम्ही ५ ते ६ मैत्रिणी बसने कॉलेजला जात असु, इ॑जिनिअरि॑गची ही मुले बसला असायची, बसला गर्दी असल्यामुळे कधी कधीच बसायला जागा मिळे, एके दिवशी एकदम पुढे जागा मिळाली, मी व माझी मैत्रिण बसलो, आमच्या समोरच्या सीट (ड्रायव्हरच्या पाठी मागच्या बाजुला असलेली) मुले बसली होती, समोर मुले असल्यामुळे आम्ही दोघी ही खिड्कीतुन बाहेर पहात होतो, इतक्यात जोराच ब्रेक लागला, आणि आम्ही समोरच्या॑चा अ॑गावर कोसळ्लो, आणि बसची सीट उचकुन आमच्या पाठीवर पडली, उभे असलेल्या काही मुला॑नी मग बसची सीट उचलली, मग आम्ही दोघी उभे राहिलो, समोर पाहतो ते काय, आम्ही ज्या॑च्या अ॑गावर कोसळ्लो त्या पैकी एका मुला॑ने डोळे ब॑द केलेले, एक ओशाळ्लेला आणि एक हसत, उभ्या असलेल्या मैत्रिणी आणि सीन पाहिलेले हसत होते, आमच्या ओठी हसु, पडल्यामुळे लाज, आणि पाठीला लागल्यामुळे डोळ्यातुन पाणी. मग, उभे असलेल्या २ मुला॑नी बसची सीट पाठुन हाता॑नी धरली, आणि समोर बसलेल्या॑नी पायानी आणि आमचा प्रवास चालु.
न॑तर ८ दिवस बसमध्ये बसायला जागा मिळाली की बसची सीट उचकते का ते पाहुनच बसत होतो.
13 Apr 2008 - 9:36 pm | डॉ.प्रसाद दाढे
(सन २००३) आम्ही सगळे विद्यार्थीमित्र पुण्यातच दुसर्या कॉलेजमध्ये एक व्याख्यान ऐकण्यास आलो होतो. ग्रूपमधल्या एकाचे नुकतेच लग्न ठरले होते व त्याची वाग्दत्त वधू त्याला मोबाईलवर दर तासाला एक फोन करीत असे. व्याख्यान सुरू होऊन दीड तास झाला तरी त्याला तिचा फोन काही आला नाही (त्याचे लक्ष तिथेच होते) म्हणून तो अस्वस्थ होता. शेवटी व्याख्यान स॑पल्यावर ऑडिटोरीयममधले दिवे लागल्यावर त्याने खिशातून मोबाईल काढला.. बघतो तो त्याने मोबाईल समजून टिव्हीचा रिमोटच बरोबर आणला होता..!! तो एकदम खजील झाला आणि 'तिच्या' रोषाच्या भीतीने घरी पळत सुटला..
15 Apr 2008 - 2:35 pm | मनस्वी
जबरदस्त!
28 May 2008 - 6:22 pm | वैभव
अरे घराजवल्ल एक चोरी झाली........
चोराने CD Player चोरून नेला.
घरात काकु चोराला लाखोली वाहत होती. काकुला म्ह्ट्ले "झाले ते झाले ......काय दु:ख करत बसलाय"
काकु ने म्ह्ट्ले "कप्पाळ माझे...........चोराने सोबत T.V चे रिमोट नेले"
ग्राऊन्ड वर आमची हसुन हसुन पुरेवाट झाली.
19 Nov 2016 - 10:37 am | भम्पक
......
14 Apr 2008 - 5:02 pm | तात्या विंचू
मी दुसरीत असतानाची ही गोष्ट. नुकताच कांजिण्यांच्या आजारातून उठलो होतो. महिनाभर शाळा चुकल्याने घरच्यांनी झालेला अभ्यास
भरुन काढायला जवळच एका क्लासला नाव घातले होते. कांजिण्यांच्या फोडांचे वण पुर्णपणे जाण्यासाठी सारखे औषध लावावे लागत असल्याने स्वारी उघडीच पुर्ण घरभर फिरत असायची.
त्या दिवशी दुपारी क्लास होता.घरी बाबा थांबणार होते.आई बाहेर गेली होती.पटकन आवरुन मी क्लासला जायला निघालो. साधारण निम्मे अंतर गेलो असेन. समोरुन एक मुलगी आली आणि माझ्याकडे बघुन खुदकन हसली. मला काही तरी विचित्र वाटले. मनात विचार आला...बहुतेक पँटची चेन लावायची राहिली....म्हणुन खाली बघतो तर काय...मी खाली पँटच घातली नव्हती....म्हणजे अंडर्वेअर घालुन मी क्लासला जायला निघालो होतो....तसाच पळत पळत मी परत घरी आलो.. दार उघडताच बाबांना कळुन चुकले..मी कसा पॅंट न घालता क्लासला गेलो होतो..ते पण मला बघुन हसायला लागले...शेवटी पॅंट घालुन परत व्यवस्थितपणे क्लासला गेलो...
15 Apr 2008 - 2:42 pm | आनंदयात्री
झाले साहेब तुम्ही दुसरीत होतात. :) नायतर खरच "तो मी नव्हेच" करावे लागले असते तुम्हाला !
15 Apr 2008 - 5:37 pm | धमाल मुलगा
गेल्या रविवारी, एका मित्राचं 'गुपचुप शुभमंगल' उरकून घरी आलो. उन्हामुळे पार वेड लागायची वेळ आली होती...जरा पंखा चालू करुन बहिणाबाईंशी गप्पा मारत बसलो, हातात घराची किल्ली होती, तिच्याशी चाळा चालू होता. एक दहा मिनिटांत भगिनीदेवी मैत्रिणीकडे गेल्या. म्हणलं चला जरा खाली जाऊन मस्त कोकम सरबत घेऊ, आणि परत येऊन देऊ ताणून...
कसलं काय? घराची किल्लीच सापडायला तयार नाही.
आख्खं घर पालथं घातलं...नो किल्ली सापडिंग ! म्हणलं च्यायला, ही काय भुताटकी आहे?
शेजारच्या काकूंचं दार वाजवलं, भर शनवारातल्या इमारतीतलं शेजारच्या घराचं दार वाजवायचं तेही टळटळीत दुपारी...आणि रविवारच्या म्हणजे....
तरीही हिम्मत करुन दार वाजवलं. अपेक्षेप्रमाणे झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा पुढे आला.
म्हणालो, "काकू, माझी घराची किल्ली सापडत नाहीय्ये! तुमच्याकडे ठेवलेली स्पेअर किल्ली देता का जरा?"
तर ह्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक काकू माझ्याकडे बघून फिस्सकन हसल्या...आणि मग फिदीफिदी...खुदुखुदु...शेवटी खो खो हसायला लागल्या. म्हणलं 'बाई गंडली बहुतेक. दुपारचं जागरण सोसवलं नसेल'.............
तर ह्या आमच्या काकूंनी माझ्या कानाशी हात नेला, आणि मी खेळता-खेळता कानावर अडकवलेली किल्ली काढून हातात दिली.
.......आणि संध्याकाळपर्यंत आख्ख्या सोसायटीत ही बातमी 'सबसे तेज' पोहोचवली.आता मला येता जाता कानकोंड्यासारखं होतं ना राव...जो उठतो तो चेष्टा करतो :-(
16 Apr 2008 - 12:12 am | नंदन
झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा -- वा! भडकमकर क्लासेसच्या नाट्यसमीक्षकी भाषेत बोलायचे तर चित्रदर्शी आणि चपखल शब्दयोजना :)
बाकी कानाला किल्ली लावल्याने 'कान'कोंड्यासारखं होणं, हेही बेष्ट धमुराव :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Apr 2008 - 1:41 pm | धमाल मुलगा
थ्यांक्यू थ्यांक्यू हां !
हेही बेष्ट धमुराव :)
धमु नका ना म्हणू...असं म्हणून कळवळलो !!!!
:-)
आपला,
(कळवळ्या) ध मा ल.
16 Apr 2008 - 1:50 pm | आनंदयात्री
आंटी मत कहो ना च्या श्टाईल मधे धम्या "धमु नका ना म्हणू" असे म्हणतांना डोळ्यासमोर आला !
(आंटी वरुन काहीही गैरसमज नसावा, सदरहु आंटी ही "हम पांच" या मालिकेतली खरीखरी आंटी (काकु या अर्थाने) आहे.)
16 Apr 2008 - 1:53 pm | धमाल मुलगा
आशेंsss ? बरां बरां...
बरां झाला तू सांगितलांन
आचरट मेला..एकदम करपटला कालिज !!!!!
15 Apr 2008 - 8:11 pm | वरदा
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?
16 Apr 2008 - 1:44 pm | धमाल मुलगा
ह्या: खुंटी समजलो असतो तर सदरा, पायजमा नसता का टांगला?
आयला, बरं झालो खुंटी नाही समजलो....कानाला पायजमा टांगून शेजारच्या काकूंचं दार वाजवायला गेलो असतो तर? बरं दिसतं का ते?
- (मती 'खुंट'लेला ) ध मा ल.
16 Apr 2008 - 1:52 pm | आनंदयात्री
>>बरं दिसतं का ते?
काय रे ते ?? ;-)
-(दाढीचे 'खुंट' वाढलेला) आंद्या
16 Apr 2008 - 1:08 am | llपुण्याचे पेशवेll
माझ्या दादाने पहीलीला शाळेत पेपरात लिहीले होते
प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे?
उ. राजा गोसावी
प्र. वाक्यातील कर्ता व कर्म यांचे स्त्रिलिंगी रुप करून योग्य क्रियापद वापरा.
वाक्य 'शंकर मोरावर बसला'
माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली'
खीखीखी....
पुण्याचे पेशवे
16 Apr 2008 - 1:48 pm | धमाल मुलगा
भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी !
आता काय बोलायचं ह्याच्यावर?
एकच प्रतिक्रिया चपखल बसतेय...खीखीखी....खुखुखु...खोखोखो....ख्याख्याख्या...
16 Apr 2008 - 2:21 pm | भडकमकर मास्तर
भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी !
परांजपे??
17 Apr 2008 - 7:43 am | बगाराम
हा हा हा
सही
-बगाराम
19 Nov 2016 - 10:40 am | भम्पक
'पार्वती मोरीवर बसली'
17 Apr 2008 - 1:15 am | वरदा
वाक्य 'शंकर मोरावर बसला'
माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली'
झक्कासच..प्रतिक्रीया सुचतच नाही.....
मती 'खुंट'लेला ध मा ल माझीच खुंटली आता मती....:))))))
17 Apr 2008 - 1:21 am | वरदा
लिहिलेला निबंध...विषय दिवाळी..
मला दिवाळी खूप आवडते कारण शाळेला सुट्टी असते. दिवाळीत आम्हा लहान मुलांची मजा असते. आई बाबा मला नवीन कपडे आणतात. फटाकेही आणतात. आम्ही घरी चकल्या, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे बनवतो. आकाशकंदील लावतो. किल्ला बनवतो. रांगोळी काढतो.
मला ह्या वर्षीची दिवाळी आवडली. मी नविन कपडे घातले. मी चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि अनारसे खाल्ले. मी आकाशकंदील लावला. मी किल्ला बनवला. मी रांगोळी काढली. मला दिवाळी आवडली.
सगळ्या वर्गात अशी लाज काढली होती बाईंनी, अगं वर्तमान आणि भूतकाळातले दोन पॅरा लिहून निबंध होत नाही म्हणून...
27 Apr 2008 - 9:18 pm | वेदश्री
४थीमध्ये होते तेव्हाची गोष्ट. इतिहासाच्या करकरेबाई इत्तक्या वेगाने वर्गपाठासाठीचे प्रश्न सांगायच्या की त्या वेगाने लिहायला मला जमायचेच नाही.. इतरांचे माहिती नाही काय करायचे ते. सुरूवात केली तेव्हा मी तिसरा प्रश्न सांगून संपायची वेळ आली तेव्हा पहिला प्रश्न लिहून संपवला होता.. दुसर्या प्रश्नापासून परत सांगा असं ओरडले मी. बाईंनी त्रासिक नजरेने माझ्याकडे पाहिले.. दुसर्या प्रश्नापासून परत सुरू झाली राजधानी एक्प्रेस. :( २-३दा मी परतपरत सांगायला सांगितले आणि बाईंनी पाठीत धपाटा घालून पटापट लिही सांगितले. मला रागच आला. मग कानावर पडेल तो शब्द मी शॉर्टकट करायला सुरूवात केली.. शिवाजीमहाराजांचा जन्म कधी झाला? असे त्या म्हणाल्या की मी शिमचाजकझा? असे लिहून काढत गेले.. वेग मॅच होत होता. मी स्वतःच्या हुशारीवर खुश झाले. बाईंनी १००+ प्रश्न सांगितले होते ( प्रत्येक वाक्यावर त्यांनी एक प्रश्न बनवला होता जेणेकरून अख्खा धडा वाचून होईल म्हणे ! ) आणि उद्या उत्तरे लिहून आणा म्हणाल्या !
घरी गेल्यावर प्रश्नांचा अर्थ लावायचा प्रयत्न करायला लागले तर त्या शब्दजंजाळाचा अर्थ लागेल तर शप्पथ ! उद्या वर्गात वाट लागणार या विचाराने मी तोंड उतरवून बसले होते तर आई आली म्हणे की कोणत्या प्रश्नाला अडली आहेस? मी सांगते उत्तर.. आणि मी म्हणाले की.. शिमचाजकझा?!!!
~~~~
गोसावीबाई मराठी शिकवायला होत्या ३रीला. एकदा त्यांनी एक कविता पाठ करून यायला सांगितली होती, पाठ करून गेले होते. ती कविता वहीत लिहून काढ आणि आण तपासायला २० मिनिटात म्हणाल्या. मी १० मिनिटात लिहून काढली आणि नेली वही तपासायला.. बाईंनी माझ्याकडे रागाने पाहिले, पाठीत धपाटा घातला. हकनाक अन्याय सहन करणे रक्तातच नाही माझ्या..
माझा सरळ सवाल - का मारलं मला? काय चुकलंय कवितेत? एक्कत्तरी शुद्धलेखनाची चूक आहे का? की शब्द चुकलेत सांगा.
यावर बाई म्हणाल्या की - मी तुला कविता लिहायला सांगितली होती, धडा नाही. कवितेसारखी लिहून आण !
~~~~
काळजात ( कॉलेजमध्ये ) असताना एकदा सॉफ्टवेअर इंजिनिअरींगच्या क्लासटेस्टच्या वेळी मला पाठांतरातला एक शब्द आठवायला तयार नाही. पाठांतरात माझा बेडा नेहमीच गर्क असल्याने मी एक युक्ती केली होती.. प्रत्येक प्रश्न त्याच्या उत्तरासकट एका चित्रपटगीताशी लिंक केला होता. ते गाणे लावून बसून मी ते उत्तर पाठ करायचे. गाणे आणि उत्तर दोन्ही सायमल्टेनिअसली पाठ व्हायचे.. वांदा असायचा ते गाणे योग्यवेळी सुचण्याचा ! क्लासटेस्टच्या दिवशी नेमके सकाळी मी - जब कोई बात बिगड जाए - गाणे ऐकलेले रेडिओवर आणि तेच माझ्या तोंडून सारखे गुणगुणले जात होते. दुसरे गाणे आठवेल तर शप्पथ ! त्याचेच लिरिक्स लिहून काढले मी उत्तरपत्रिकेत शेवटी आणि माझा त्या टेस्टमध्ये हायेस्ट होता वर्गात !
22 May 2008 - 5:09 pm | निरंजन मालशे
चला माझी ओळख माझ्या फजितीने करून देतो
मी कॉलेजात असतानाचा हा माझा धावण्याचा (रनिन्ग चा व्यायाम) किस्सा १
नुकतीच व्यायामशाळा जॉईन केली होती. तिथे लंगोट वापरण कंपल्सरी होत. त्याच महत्व मनावर ठसवल्याने मग मी धावतानाही तोच वापरला.
एकदा रस्त्यावरून धावताना अचानक खुप हलक हलक वाटू लागल. आणि....
इथे माझा तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम
22 May 2008 - 5:28 pm | आनंदयात्री
गाठ सुटली म्हणायची पावण्यांची =)) ...
नक्की गाठ सुटली का मागचे लोक घसरुन पड्ले ??
22 May 2008 - 5:39 pm | चतुरंग
हाप प्यांटित व्हता का फुलप्यांटित?
न्हाई म्हनजे हाप आसल तर लोकांना माग पिसारा सुटल्यावानि देखनं दिसनार आनि फुल आसल तर बावचळल्यावानि येडंवाकडं पळत सुटनार, म्हनून इच्चारलं! ;)
चतुरंग
22 May 2008 - 6:08 pm | धमाल मुलगा
हाप काय आन् फुल्ल काय, प्यांट असली म्हंजी बरं....
नायतर .....
आगाबाबो......दिगंबरा...दिगंबरा =))
22 May 2008 - 6:08 pm | ऋचा
एकदा मी आणि माझा मित्र रार्ती क्लास करुन घरी येत होतो.
ह्कुप अंधार होता आणि वीज गायब होती.
रस्त्यावरचे दीवे नेहमीप्रमाणे बंद.
आम्ही जोरात बोलत येत होतो कारण कोणीच नव्हत रस्त्यावर
आणि अचानक मित्राचा आवाज येईना मी जाम टरकले... :S
रस्त्यावर कोणी नाही आणि ह्याचा आवाज अचानक बंद.
मग त्याने एकदम हाक मारली मला (आधी बर वाटल चला तो आहे)
पण कुठेच चाहुल लागेना..
आणि गेलेले दीवे एकदम आले. आणि माझी हसुन ह्सुन वाट लागली.
माझा मित्र १ म्हशीवरुन पडला आणि तो बोलत नव्हता कारण त्याला कळलं नाही की तो पडला कसा? =))
आणि ती म्हैस शांतपणे त्याच्याकडे पाहुन दात विचकत रवंथ करत होती.
आम्ही जाम हसत घरी
हे कारण आम्हाला पुढे खुप दीवस पुरलं हसण्यासठी.
22 May 2008 - 6:45 pm | निरंजन मालशे
वाचकहो!!!!
मी हाफ प्यान्टीतच होतो.
अजुन एक किस्सा आहे धावण्याचा पण ब्रेक के बाद
23 May 2008 - 4:37 pm | निरंजन मालशे
तर अता दुसरा किस्सा
साधारण ९२ सालातली गोष्ट इयत्ता १२ वी त गेलो होतो.
मी आमच्या कल्याणातल्या जेल जवळ सकाळी धावायला जायचो. अर्थात जेल ही त्या काळी गावाबाहेर होती. तिथून सुर्योदय फार छान दिसायचा. मी पहाटेच निघायचो.
माझा अवतार म्हणजे ढगळ पांढरा टी शर्ट आणि त्यातून घातलेय अस वाटेल इतपत डोकावणारी चड्डी आणि शूज
रस्ता स्मशानावरून जायचा. त्यादिवशी रस्त्यावर नेहमीचे चेहरे दिसेनात. मी धास्तावलो. तेव्हढ्यात माझ्या लक्षात आल की शुजची लेस सुटलेय. मी स्मशाना पर्यंत पोचलो होतो आणि समोरची आधारवाडी मिट्ट काळोखात होती. तरीही मी ठरवल की घाबरायच नाही थोड्या वेळात सकाळ होईलच...
लेस बांधायला थांबलो इतक्यात शेजारून एक सायकल गेली. मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला.
मला पाहून हा का घाबरला असेल ... थोडी गम्मत वाटली पण लगेच लक्षात आल की असचा प्रसंग आपल्याही बाबतीत घडला तर.....
लगेच मागल्या पावली पळात सुटलो. घरी आलो तर अजुन जाग दिसत नव्हती.
बाथरूम मधे हात पाय धुत असताना घड्याळात लक्ष गेल (हो आमच्या सुज्ञ भगीनीने तिथे एक घड्याळ लावल होत आमच्यासाठी).
नुकतेच साडेतीन होत होते.....
9 Oct 2014 - 9:23 pm | एस
अक्षरशः पोट धरधरून हसलो. बाप रे! अशीच आमचीही एक फजिती आठवली... :-D
19 Nov 2016 - 10:43 am | भम्पक
मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला.
23 May 2008 - 5:12 pm | ऋचा
अरे यार काय रे क्रमशः @)
वाचायला मुड आला तर ह्याच क्रमशः
24 May 2008 - 4:44 am | विसोबा खेचर
वा! सगळ्यांच्या फजित्या वाचल्या. मौज वाटली! :)
आपला,
(अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!) तात्या.
29 May 2008 - 12:15 am | वरदा
कशी फजिती झाली हेही सांगा की नुसतं काय अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!
9 Oct 2014 - 9:07 pm | उगा काहितरीच
कालातीत धागा.. मजा आली वाचताना . :-D :-D :-D धन्यवाद सुहास .
10 Oct 2014 - 3:24 pm | भिंगरी
एक स्त्री असल्याने माझी फजिती लिहू की नको असे वाटत होते.पण बाकिच्यांच्या फजित्या वाचून धैर्य आले.
मी ६ वीत असतानाचा प्रसंग.
शारिरीक शिक्षण या तासाला आम्हाला कवायतीसाठी मैदानात नेले.
कवायतीला सुरुवात झाली आणि काही वेळातच माझी वेगळीच कवायत चालू झाली.
झाले असे की त्या वेळी सरसकट सगळे नाडीच्या चड्ड्या वापरत असत.
कवायत करता करता चड्डीची नाडी खेचल्या गेल्याने सैल झाली.
आता सरांनी म्हटले लेफ्ट की मी डावा हात पुढे करून उजव्या हाताने स्कर्टच्यावरून चड्डी धरून ठेवी,आणि सरांने म्हटले राईट की मी उजवा हात पुढे करून डाव्या हाताने चड्डी धरून ठेवी.असे काही काळ चालले होते थोड्यावेळाने सरांच्या लक्षात आले.आणि किंचित हसत त्यांनी खुणेनेच मला जायला सांगितले.बापरे अजुनही मला अंगावर शहारा येतो की जर सरांच्या लक्षात नसते आले तर?
10 Oct 2014 - 3:28 pm | सुहास..
:(
10 Oct 2014 - 3:36 pm | विजुभाऊ
मजा आली पुन्हा हा धागा वाचून.......
@ मदनबाणः हे माझे उत्खनन नव्हे. उगाच चारीत्र्य हनन करू नये
10 Oct 2014 - 3:41 pm | सुहास..
@ मदनबाणः हे माझे उत्खनन नव्हे. उगाच चारीत्र्य हनन करू नये >>
ओ विजुभाउ, म्हणजे ज्याचे आहे त्याचे करावे का ;)
@ मदनबाणः हे माझे उत्खनन आहे. आपण दोघेही मनन करु यात.
10 Oct 2014 - 4:40 pm | सखी
उत्खननासाठी धन्यवाद सुहास.भारी किस्से आहेत एक-एक, शिमचाजकझा वाचुन हहपुवा.
10 Oct 2014 - 4:46 pm | सुहास..
अरे , बाकीच्यांचे पण सांगा की ...मी ही टकंतोच आहे माझी ( आले का लग्गेच पळत ;) )
10 Oct 2014 - 6:39 pm | रेवती
एका दिवसात एकच भाषा बोलणारे आपल्यात आता कोणी फारसे नसतील. त्यामुळे एका भाषेतील शब्द दुसर्या भाषेत वापरले जाणे, काही शब्द दुसरे वापरतायत म्हणून वापरणे यातून वेगळे अर्थ निघू शकतात. रोज मराठी, विंग्रजी आणि हिंदी या ३ भाषा आपल्याकडून मुख्यत्वे वापरल्या जातात. कालच एका हिंदी भाषिक फ्यामिलीला जेवणाचे आमंत्रण देताना मी काय बोलले की तुम्ही माझ्याकडे या ऐवजी आम्ही तुमच्याकडे येतो असा अर्थ झाला. माझे काहीतरी चुकले हे समजले पण सुधारेपर्यंत तिची हसून पुरेवाट झाली. मग दुसर्या हिंदीवाल्यांना फोन केला. एरवी मैत्रिणी सारखी वागणारी मी तिच्याशी बातम्या देताना हिंदी बोलावे तसे बोलत होते. ती हसायला लागली. उदा. "आप हमारे घर खानेपे आओगे तो हमे बडी खुशी होगी" असले काही ऐकू ती चक्रावली .
11 Oct 2014 - 1:49 pm | माझीही शॅम्पेन
अगदी कहर धागा आहे हा , लंगोटी , चावी , पर्वती , मोरी .. हसून वशाड मेलो (सौजन्य मीपा )
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कॉलेजात असताना कुठलासा धुमकेतू आला होता म्हणून खगोल कॅंप होता , रात्री बराच वेळ धुमकेतू दर्शन घेतल आणि मध्य रात्री साधारण २:०० च्या सुमारास हॉस्टेल वर परत येत होतो , मित्रानी लुना एकदम फास्ट मारली होती , एका क्षणात आमच्या डोळ्या पुढे धूमकेतू चमकला , डोळे विस्फरुन परत बघितल तर डोळ्या समोर खरच आकाशातील धूमकेतू दिसत होता , नंतर दोस्तानी संगितल की लुनाच्या दोन्ही चाकाच्या मध्ये डुककर घुसल होतो आणि लुना रस्त्यावर उलटली होती आणि आम्ही दोघ रस्त्यावर पार उताणे पडलो होतो ... :) एकदम टांगा (लुना) पालटी घोडे फरार
15 Oct 2014 - 8:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लुना फास्ट? लुनावाले ब्रम्हे तुमच्या कॉलेजला होते? =))
15 Oct 2014 - 8:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मा़झ्या १०वी नंतर १-२ वर्षांची गोष्ट आहे (२००३-२००४). त्या वेळी माझ्या लंगोटी मित्राच्या ताईसाठी मॅट्रिमोनी साईट्स वर रजिस्ट्रेशन वगैरे चं का चाललं होतं. ह्या भ्**ला माझा ई-मेल चा पासवर्ड त्याला माहीत होता. ह्यानी परस्पर माझं अकाऊंट रजिस्टर आणि व्हेरिफाय केलं. वरती घरचा लँडलाईन नंबर देऊन ठेवला. जेमतेम ७-८ दिवसांनी नेमके पिताश्री घरी असताना फोन आला. ते संभाषण असं होतं साधारणं.
पिताश्री : नमस्कार, दातार बोलतोय.
वधुबंधु वर्तक : नमस्कार. मी अमुक अमुक वर्तक बोलतोय. तुमचा मुलगा लग्नाचा आहे असं कळलय. आमच्या अपेक्षांमधे तुमचा मुलगा बसतोय.
पिताश्री (आमरिश पुरींचे वटारलेले डोळे करुन अस्सल सानुनासिक स्वरामधे) : कोणी सांगीतलं आपल्याला?
वधुबंधु वर्तक (बहुतेक चपापलेल्या आवाजात) : अहो, अमुक अमुल वेबसाईटवरुन माहिती मिळाली म्हणुन फोन केलाय.
पिताश्री : आमचा बैल आत्ता हाप पँटीतुन फुल पँटीत आलाय. बालविवाह मान्य असेल तर भेटु. तुम्हाला चुकीची माहिती मिळालिये हो. आत्ताशिक कार्टं कॉलेजात जायला लागलाय.
फोन कट केल्यावर नंतर भलं मोठ रामायण घडलय. अस्सल को.ब्रां.ची जीभ किती तिरकी वळु शकते त्याचा ह्याची देही अनुभव घेतलाय. अकाऊंट डी-अॅक्टीव्हेट करेपर्यंत अजुन ३-४ फोन येउन गेले वेगवेगळे. शिवाय हे नक्की कसं झालं ते ऑलमोस्ट ६-७ महिन्यानी समजलं. =))
15 Oct 2014 - 8:54 pm | सुहास..
हा हा हा हा हा हा हा !!
6 Nov 2014 - 9:05 pm | Pradip kale
Khupch majeshir , hasun hasun damlo rav .
baki eng. Lihalyabaddal sorry , mobile varun Mipa vaprat asalyane marathi lihita yet nahi.
7 Nov 2014 - 12:02 am | एस
मी तर मोबाईलवरून आक्ख्या लेखांचे मुद्रितशोधन करतो! ;-) सोप्पंय मोबाईलवरून मिपावर मराठी टंकन करणं. इथेच उजवीकडे मदत आहे की.
http://www.misalpav.com/node/1312
प्रयत्न करा.
7 Nov 2014 - 2:55 pm | पिलीयन रायडर
परवा मॉल मध्ये गेलो होतो तर बायका आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन आत सोडत होते.. मी बायकांच्या लाईन मधुन पुढे आले आणि शेजारुन नवरा पुरुषांच्या लाइन मधुन.. मी पुढे येऊन गडबडीने नवर्याचा हात धरायला गेलेच की तो हात एकदम दचकला... तिरप्या नजरेतुन पाहीलं.. मागे नवरा दिसला आणि मी जो हात पकडायला निघाले होते त्याचा मुळ मालक हात छातीशी घेऊन घाबरुन माझ्याकडे पहात होता... नवरा भयानक पेटला होता हे वेगळं सांगायला नको!!!
बरं ह्यातुन काही बोध घेऊन जरा ताळ्यावर राहुन जगात वावरावं ना...
२ च दिवसानी ऑफिसमध्ये तरातरा वॉशरुम मध्ये घुसले.. समोर एक पुरुष बेसीनसमोर गोठुन आरशातुन माझ्याकडे पहात होता.. "सॉरी..सॉरी.." म्हणत धुम ठोकली...
(ह्यात टेक्निकली माझी चुक नव्हती.. आमच्या नव्या हापिसात सगळे फ्लोअर्स अगदी डिट्टो सेम आहेत.. पण स्त्री-पुरुषांचे वॉशरुम मात्र आलटुन पालटुन डावीकडे - उजवीकडे आहेत..हे मला माहित नव्हतं.. मी माझ्या फ्लोअरच्या सवयीने डावीकडे घुसले..!! )
7 Nov 2014 - 3:48 pm | आदूबाळ
हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड माझ्या हातूनही होत असे. लेडीजसाठी डच शब्द आहे dames आणि जेंटलमेनसाठी शब्द आहे heren. चिन्हं असतील तर प्रॉब्लेम नसायचा. पण नुसते शब्द लिहिलेले असतील तर गोंधळ - dames हा शब्दही स्त्री-निदर्शक (उदा. Dame Judy Dench) आणि heren ही (his and her मधलं her). मग काय, देवाचं नाव घेऊन घुसायचं कुठेतरी!
7 Nov 2014 - 4:34 pm | टवाळ कार्टा
damsel in distress म्हाईत नै का ;)
7 Nov 2014 - 6:57 pm | शिद
स्विडीशमध्ये पण हिच बोंब आहे. 'herr' म्हणजे 'Mr'.
सुरुवातीला कळायचंच नाही. कोणी दुसरा माणूस ज्या दरवाजानं जात असेल तर त्याच्या मागोमाग जायचं, असं करावं लागे.
7 Nov 2014 - 4:34 pm | टवाळ कार्टा
=))
7 Nov 2014 - 6:51 pm | रेवती
हा हा हा. डोळ्यासमोर पिराने दुसर्या मनुक्षाचा हात धरलाय हे दृष्य आलं आणि फिस्सकन हसले.
वॉशरूम बाबत मी अजूनतरी असे काही केले नाहीये पण मुलगा साधारण मोठा झाल्यावर माझ्याबरोबर मॉलमध्ये महिलांच्या रेस्टरुमला येत नसे. त्याचे त्याला पुरुष विभागाकडे जायचे असे. बरे, आपले काम उरकून यावे तर तसे नाही. उगीच याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ असे करत वेळ काढत असे, तर कधी खरेच गर्दी असे. नवरा बरोबर नसला तर पंचाईत! मी वाट बघून नको नको ते सगळे विचार, काळज्या करून झाल्यावर एकदा बाहेरूनच जोरजोरात हाक मारू लागले. सुदैवाने सगळे बाप्ये समजूतदार होते. कोणी हरकत घेतली नाही.
8 Nov 2014 - 11:43 am | कविता१९७८
हसुन हसुन बेजार झाले. आजचा दिवस नक्की छान जाईल.
10 Nov 2014 - 9:26 pm | पिशी अबोली
मी आजच चांगली फजिती करून घेतलीये. माझं डेटा पॅक संपत आलं होतं हे मला माहीत होतं. पण काल रात्री तर डेटा चांगलाच शिल्लक होता आणि सकाळपासून मात्र मेन बॅलन्स मधून पैसे जात होते. मी नेहमीप्रमाणे चिडले, आयडियाला शिव्या घातल्या, आणि संध्याकाळी फुल भांडायच्या इराद्याने कस्टमर केअर ला फोन लावला. कधी नव्हे तो कुणीतरी नीट बोलता येणारा माणूस होता. त्याने मागचा रिचार्ज वगैरे माहिती नीट शोधून काढली. वॅलिडिटी सांगताना तो म्हणाला, 'आज १० तारीख आहे'. मी अगदी तोर्यात उत्तर दिलं-'आज ९ तारीख आहे, आणि माझी डेटा वॅलिडिटी ९ तारखेपर्यंत होती हे मला चांगलंच माहीत आहे.' तो शांतपणे म्हणाला, 'आज १० तारीख आहे मॅम'. मग माझ्या लक्षात आलं, आज खरोखरच १० तारीख आहे.. ;)
त्याला कितीतरी वेळा सॉरी म्हणून मी फोन ठेवला.. आता 'काय काय नमुने फोन करतात' असं तो सगळ्यांना सांगत असेल.. =))
19 Nov 2016 - 8:20 am | अभिजीत अवलिया
मस्त धागा.
19 Nov 2016 - 10:47 am | भम्पक
एकदम कहर धागा...धन्स..
20 Nov 2016 - 2:21 pm | पियुशा
अरे कुनी काढलाय हा धागा वर ? माझे लै लै आशिर्वाद आहे त्याला ;)
लय लय हशिवल = ))))))))