पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.
पोपटी करण्यासाठी लागणार्या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.
पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.
पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.
हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.
त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.
आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते. मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.
प्रतिक्रिया
23 Nov 2010 - 4:39 pm | गवि
आहा..
ताबडतोब अनुभव घ्यायला पाहिजे.
मला वाटते कोलाड्च्या कोण्या रि़झॉर्टमधे टुरिस्टसाठी ऑन डिमांड कँपफायर वर पोपटी बनवायला शिकवतात..
घाटावरच्या हुरड्यासारखीच झाली की.
कोकणात आहे का ओरिजिन ?
23 Nov 2010 - 4:46 pm | इरसाल
भन्नाट
23 Nov 2010 - 5:02 pm | योगप्रभू
सकाळी पेज आणि पोह्याचा पापड, दुपारच्या जेवणात जिताडा आणि तांदळाची भाकरी आणि संध्याकाळी पोपटी
एकच दिवस असा सुखात जावा... :)
23 Nov 2010 - 5:08 pm | गवि
ओके..जिताडे, पोह्याचे पापड...म्हणजे एकूण रायगड पट्ट्यातला आहे प्रकार.
पर्यायाने कोकणातला..
धन्यवाद.
24 Nov 2010 - 1:27 am | मेघवेडा
म्हणजे एकूण रायगड पट्ट्यातला आहे प्रकार
+ १ तिथलाच असावा. मीही एकदा महाडलाच खाल्ली होती.
24 Nov 2010 - 10:14 am | गवि
काहीही कोकणातलें आहें म्हटलें की आम्हांस बरें वाटतें..!!
24 Nov 2010 - 1:00 am | नंदन
आमेन! :)
23 Nov 2010 - 5:04 pm | स्वाती२
जागूतै, तुझी सचित्र पाकृ वाचताना मन कधी आजोळी पोहोचले कळलेच नाही.
23 Nov 2010 - 5:04 pm | पर्नल नेने मराठे
'भटकंती' प्रोग मधे मिलिन्द गुणाजीने माहिति दिलि होती.
23 Nov 2010 - 6:38 pm | प्रियाली
हे भांबुर्डे प्रकरण मला डँडेलायनसारखे का दिसते आहे? दोन्ही एकच आहेत का? कुणीतरी खुलासा करा.
बाकी, पाककृती चांगली असली तरी भांबुर्डे प्रकाराने माझी जरा चलबिचल होत आहे.
23 Nov 2010 - 6:53 pm | रेवती
जागु, तुझे धागे नेहमी स्पेशल असतात.
छान माहिती आहे.
चवदार प्रकरण असणार यात शंका नाही.
प्रियालीतै, डँडीलायन म्हणजे आपल्याकडची करडई असावी.
जागुने चित्रात दाखवलेला भांबुर्डा वेगळा. डँडीलायनची भाजी आपल्याकडे परतून करतात.
हिरव्या देशात मिळणारे कधीकधी कडू असतात. कडू नसल्यास ही भाजी धूवून चिरून कुकरमध्ये शिजवून घेणे नंतर भरपूर लसणाच्या फोडणीवर किंचित डाळीचे पीठ लावून परतणे. छान होते.
24 Nov 2010 - 4:38 am | बहुगुणी
करडई म्हणजे safflower (संदर्भः http://www.uni-graz.at/~katzer/engl/Cart_tin.html), त्याच्या बियांतून तेल काढतात.
डँडेलायन ही जवळपासची (related) वनस्पती आहे: दुवा
डँडेलायन
Kingdom: Plantae
Angiosperms
Eudicots
Asterids
Order: Asterales
Family: Asteraceae
Tribe: Cichorieae
Genus: Taraxacum
करडई
Kingdom: Plantae
Angiosperms
Eudicots
Asterids
Order: Asterales
Family: Asteraceae
Tribe: Cynareae
Genus: Carthamus
Species: C. tinctorius
Taxonomically, 'Family' पर्यंत दोन्ही वनस्पती एकाच प्रकारात मोडतात,
करडईच्या भाजीची मिपावरचीच पाककृती इथे मिळेल.
25 Nov 2010 - 2:04 am | रेवती
नवीन माहितीबद्दल धन्यवाद, बहुगुणी!
23 Nov 2010 - 6:56 pm | निवेदिता-ताई
जागु..............क्या बात है..........मस्त मस्त...
आस्वाद घेण्यास सगळ्यांना आमंत्रण आहे का???????????
23 Nov 2010 - 6:59 pm | पांथस्थ
ऑफिस मधुन घरी आलो आणि भुक लागलेली असतांना हे पाहिले.
जबरी जळजळ झाली आहे.
23 Nov 2010 - 7:00 pm | निवेदिता-ताई
रेवती..बरोबर आहे तुझे..डँडीलायन म्हणजे आपल्याकडची करडई असावी,
करडईची गोळा भाजी (लसणाची खमंग फ़ोडणी घालून) छानच लागते, जोडीला बाजरीची भाकरी, लसणाची चटणी असेल तर ?????????
23 Nov 2010 - 7:09 pm | सुनील
तसाही मातीच्या भांड्यात शिजवलेल्या पदार्थांचा स्वाद काही वेगळाच. त्यात उघड्यावरील वातावरण आणि मित्रमंडळींचा सहवास असल्यावर आणि काय पाहिजे, नै का?
जागुतै अजून येउद्यात!
अवांतर - मिपावर यापूर्वीही कुणीतरी पोपटीची पाकृ टाकली होती, असे आठवते.
24 Nov 2010 - 12:58 am | चित्रा
छानच वर्णन आणि पाककृती, जागु.
याआधी बहुरंगी यांनी दिली होती. गणपा यांनीही दिली होती का? आठवत नाही.
बहुरंगी यांची पाककृती http://www.misalpav.com/node/557
23 Nov 2010 - 7:39 pm | मदनबाण
जागु तायची परत एक हटके पाकॄ... :)
23 Nov 2010 - 7:53 pm | प्रभो
मस्तच गं जागू ताई....
थर्ड ईयर ला असताना गाडीवरून रायगड किल्ला व अलिबाग केले होते तेंव्हा पोपटी खाल्ली होती.......आहाहा!!!!
23 Nov 2010 - 8:10 pm | वेताळ
पण मस्त लागत असणार. आवडली आपल्याला..शेतातले जेवण एक वेगळीच चव असते त्याला.
23 Nov 2010 - 8:47 pm | संदीप चित्रे
पुढच्या कँपिंगची सोय करून दिल्याबद्दल धन्स जागुतै !!
23 Nov 2010 - 8:55 pm | अनामिक
वाह... जबरा प्रकार आहे.
23 Nov 2010 - 9:08 pm | प्राजु
खत्तरनाक!!!!! काय जबरी आहेत सगळे फोटो. :)
23 Nov 2010 - 10:04 pm | निवेदिता-ताई
ही पोपटी नुसतीच खातात का?????का काही भाकरी वगैरे बरोबर.
24 Nov 2010 - 1:13 am | राजेश घासकडवी
कृती बघून उंधियोची आठवण झाली. त्यात साधारण घटक असेच असतात.
मात्र अर्ध्या पाऊण तासात हे सगळं शिजतं का? उंधियोच्या कृतीत रात्रभर खड्ड्यात निखारे घालून ठेवतात असं ऐकलं होतं. (चुभूद्याघ्या)
24 Nov 2010 - 2:06 am | स्वाती दिनेश
जागु,मस्त फोटो आणि पाकृ..
राजेश, उंदियो मध्ये तेलाचा सढळ हस्ते वापर असतो ,पोपटीत तसे नसते, पण घटक पदार्थ बरेचसे सारखेच असतात,
स्वाती
24 Nov 2010 - 11:48 am | जागु
निवेदिता ताई पोपटी नुसतीच खातात. आहो जशा आपण शेंगा उकडून खातो तश्याच ह्या मडक्यात भाजुन खातो.
गगनविहारी, इरसाल, मेघवेडा, नंदन, स्वाती, मराठे, रेवती, बहुगुणी, पांथस्त, सुनिल, चित्रा, मदनबाण, प्रभो, वेताळ, सिंदिप, अनामिक, प्राजु, स्वाती, धन्यवाद.
प्रियाली भांबुर्ड्याचे दुसरे नाव मलाही माहीत नाही. पण ह्याला एक विषिष्ट प्रकारचा वास असतो. अगदी पान तोडल किंवा झाडावर पाय जरी पडला तरी ह्याचा वास जाणवतो. नुसता वास उग्र असतो पण पोपटीतला वास काही वेगळाच चांगला येतो.
राजेश आरामात शिजत सगळ. आहो लाखडांची धगच एक्वढी जबरदस्त असते की कधी कधी शेंगा करपतातही.
24 Nov 2010 - 11:54 am | पंगा
शक्य आहे. खूप पूर्वी पुण्यातल्या भांबुर्ड्याचे नाव बदलून 'शिवाजीनगर' केल्याबद्दल ऐकलेले आहे.* (पिनकोड मुख्यतः ४११ ००५.)
असो. हा पोपटी प्रकार एकंदरीत इंटरेष्टिंग वाटतोय खरा, पण त्या भांबुर्ड्यांमुळे (शिवाजीनगर ऑर अदरवाइज़) थोडी भीती वाटते. निदान जोपर्यंत खाल्लेले नाहीत तोपर्यंत तरी. कदाचित वाईट नसतीलही - कदाचित पूर्वग्रह-पूर्वसंकेतांमुळे मलाच तसे वाटत असेल. (फोटोंवरून तरी मला माझ्या [आधीच दुर्लक्षित] लॉनातल्या एकदोन विशेषकरून अनाकर्षक विडांची आठवण झाली.) एकदा खाऊन पाहिल्यावर बहुधा काहीही वाटणार नाही.
किंवा कदाचित, मश्रुमे (अर्थात अळंब्या किंवा भूछत्रे) छान लागतात हे माहीत असले (आणि अळंब्या आवडतही असल्या), तरी म्हणून सर्वप्रथम दिसेल ती जमिनीवर उगवलेली अळंबी उचलून ती शिजवून खाण्यास अळंब्यांच्या निवडीच्या विषयातील अनभिज्ञ (परंतु अळंब्यांच्या काही जाती महाभयानक विषारी असू शकतात याची कल्पना असणारा) मनुष्य धजावणार नाही, तसे काहीसे या ठिकाणी होत असावे काय?
भांबुर्डे म्हणजे डँडेलायॉन किंवा कसे, याबाबत मला खात्रीलायक कल्पना नाही. माझ्या लॉनात वारंवार उगवणार्या अनेक प्रकारच्या अनाकर्षक विडांपैकी कोणत्यातरी एकास 'डँडेलायॉन' असे म्हणतात, एवढेच माझे ऐकीव सामान्याज्ञान. त्या सगळ्याच विडांना समान तिरस्काराची वागणूक देत असल्याने (आणि नंतर 'जगा आणि जगू द्या' या तत्त्वास अनुसरून - आणि मुख्यतः आळसापोटी - त्यांच्याबद्दल - पुन्हा तितक्याच सारखेपणाने - काहीही करत नसल्यामुळे**) त्यांच्यात भेदभाव करण्याचा आजवर कधी प्रश्न आला नाही, आणि म्हणूनच नेमक्या कोणाचे नाव नक्की काय, याचा ताळेबंद ठेवण्याच्या फंदात आजवर पडलो नाही. पण तरीही त्यातल्या एका उंच प्रकाराचे नाव 'डँडेलायॉन' असावे अशी (उगीचच) समजूत होती. (कदाचित चुकीचीही असेल. असली तरी मला फरक पडत नाही.) पण भांबुर्डे म्हणजे जर डँडेलायॉन असतीलच, तर ते खाण्याबाबत भीतीचे कारण नसावे असे दिसते. विकीवरील माहितीनुसार डँडेलायॉनच्या जगातील सर्व जाती या खाण्यालायक आहेत***, एवढेच नव्हे, तर त्यांत औषधी गुणधर्मही आहेत****, असे कळते.
तळटीपा:
* नक्की खात्री नाही, पण बहुधा आचार्य अत्र्यांच्या पुढाकाराने. चूभूद्याघ्या.
** माझ्या लॉनात कधीमधी चित्रविचित्र - आणि बीभत्स - मश्रुमेसुद्धा उगवतात. त्यांना मात्र समान न्याय नाही. दिसली की चिरडून टाकतो साल्यांना. (माझी मर्जी!) मश्रुमे चिरडल्यानंतरचे दृश्य विशेष किळसवाणे असते. (बूट खराब होतात ते वेगळेच!)
***,**** १. यांपैकी कोणताही दावा मी स्वतः पडताळून पाहिलेला नाही, २. यांपैकी कोणताही दावा योग्य आहे अथवा अयोग्य याबाबत कोणतीही माहिती माझ्याजवळ नाही, ३. या दाव्यांस पुष्टी देणे, त्यांचा प्रचार, प्रसार अथवा विरोध यांपैकी काहीही करण्याचा उद्देश या विधानामागे नाही, ४. केवळ 'असे दावे कोणीतरी कोठेतरी केलेले आहेत' एवढ्याच मर्यादित अर्थाने, 'जसे-आहे-जिथे-आहे'/'घेणार्याची-जबाबदारी' तत्त्वांवरचे हे उद्धरण आहे, आणि ५. यांपैकी कोणत्याही दाव्याबद्दल माझी वैयक्तिक श्रद्धा/विश्वास अथवा अविश्वास यांपैकी काहीही नाही, ६. सबब अंधश्रद्धा प्रचार-प्रसार वगैरे नित्याच्या चर्वणविषयांच्या कार्यकक्षेबाहेरील ही बाब असून, याबाबत येणार्या कोणत्याही तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल घेतली न जाता तीस पद्धतशीरपणे फाट्यावर मारण्यात येईल, याची गरजूंनी कृपया नोंद घ्यावी.
24 Nov 2010 - 12:14 pm | जागु
पंगा ही भांबुर्डा पोपटीत टाकण्याची प्रथा पुर्वीपासुन चालत आली आहे. आणि भांबुर्डयाचा पाला पोपटीतुन आपण खात नाही. तो टाकायचा असतो. फक्त त्याची वाफ पोपटीत जाते.
24 Nov 2010 - 3:40 pm | रत्नागिरीकर१
काय मस्त आहे ग .... अशा पार्टीचा अनुभव आयुश्यात एकदा तरी मला घेता यावा...
24 Nov 2010 - 10:02 pm | डावखुरा
जागु तै पाकृती सोबत तिचा आस्वाद कसा घ्यायचा हे पण सांगितले....
आता कंपु जमवुन जायला काही हरकत नाहीये...
थंडीही नुकतीच चालु झालीये...
ठांकु ठांकु जागुतै
27 Nov 2010 - 11:04 am | प्राची
सुपरलाईक.... :)
असा नवीन प्रकारचा,एकदम हटके मिपा कट्टा करायला काहीच हरकत नाही....लई मज्जा येईल.....!!
25 Nov 2010 - 11:13 am | जागु
धन्यवाद रत्नागिरीकर, लालसा.
26 Nov 2010 - 11:21 am | शिल्पा ब
मस्त...किती दिवस नकोच ते म्हणून धागा उघडला नाही...पण धीर धरवेना म्हणून पहिले...तोंडाला पाणी सुटले..
29 Nov 2010 - 6:59 pm | सुधीर१३७
मस्तच आहे......................................
पण यापूर्वीही पोपटी मिसळ्पाववर आलेली आहे, पण बिन फोटोची....
लिंक : http://www.misalpav.com/node/557
10 Dec 2010 - 7:02 am | निनाद मुक्काम प...
मस्तच गोर्यांना हा आपला प्रकार दिसला.
तर तेल नाही अरबट चरबट नाही त्यामुळे प्रचंड आवडून जाईन.
आजचा माझ्या सौ आणि सासूला हा प्रकार दाखवला सचित्र
जाम खुश इंडिया
इज ग्रे८