करंजीचे पुरण

जागु's picture
जागु in पाककृती
27 Oct 2010 - 11:56 am

लागणारे साहित्य:
गरजेनुसार किंवा २ सुक्या खोबर्‍याच्या वाट्या
मुगाचे पिठ १ वाटी
रवा अर्धी वाटी
कणीक अर्धी वाटी
२ चमचे खसखस
चारोळी
बेदाणे
आवडते ड्रायफ्रुट्स
वेलची पावडर
तुप
पिठी साखर

क्रमवार पाककृती:

तुम्हाला जर घरी भरपुर वेळ असेल, टाईमपास काही नसेल, कष्ट करायची खुप हौस असेल तर खालील प्रमाणे खोबर्‍याच्या वाटीच्या पाठीवरचे काळे स्क्रॅपरने खरवडून काढा.

आता ह्या टकलू झालेल्या वाट्या किसुन घ्या. मग असे अगदी पांढरे शुभ्र म्हातार्‍यांच्या केसांसाखा त्यांचा किस पडतो. मला तर हा मधुन मधुन जवळाही वाटतो.

आता किसलेल कोरड खरपुस भाजून घ्या. गॅस मंद ठेवा नाहीतर परत केस काळे होतील.

भाजलेले खोबरे हाताने कुस्करुन घ्या. मस्त खमंग वास येतो हे कुस्करताना. मग मुगाचे पिठ, कणीक, रवा, खसखस वेगवेगळे तुपावर खरपुस भाजून घ्या. खुप पेशन्स लागतात हे करताना. कोणतही पिठ कच्च राहुन चालत नाही. गॅस मंद किंवा त्यापेक्षा थोडा मिडीयम ठेवायचा. खमंग वास येईपर्यंत सगळे भाजायचे. नंतर सगळे एकत्र करुन त्यात चारोळी, बेदाणे, ड्रायफ्रुट्स, वेलची पुड टाकायची.

आता जेवढे जिन्नस तयार झाले असेल तेवढीच पिठी साखर घालुन सगळे एकजीव करुन थंड होऊ द्या.

हे थंड झालेले पुरण हवाबंद डब्यात घट्ट दाबून भरून ठेवा. सारखे सारखे उघडू नका . मी डबा बंद केल्यावर आठवण आली फोटो काढायचा आहे ते. मग म्हटल नाही. आता डबा उघडायचा नाही.

अधिक टिपा:
तुम्ही ह्यात तुमच्या अंदाजाने प्रमाण कमी जास्त करु शकता.
कणीक न घालता त्यात नुसते मुगाचे पिठ घातले तरी छान लागते.
मी वेलचीपुड बरोबर जायफळ पुडही घातली होती.
तुप जर साजुक असेल तर उत्तमच.

प्रतिक्रिया

कुसुमिता१२३'s picture

27 Oct 2010 - 8:13 pm | कुसुमिता१२३

साजुक तुप आणि साधे तुप वेग-वेगळे असते का? साजुक तुप म्हणजे नेमके काय? मला खरच फरक माहीत नाहीये..

साजुक म्हणजे गाईचं का? का कणीदार? मलाही माहीत नाही.

डालडा.. म्हणजे वनस्पती तूप म्हणजेच साधं. आणि घरी करतो ते/लोण्यापासून बनवतात ते साजूक... बहुतेक. :)

प्राजु म्हणते तसच. साईपासुन किंवा लोण्यापासुन बनवलेले तुप म्हणजे साजुक तुप. घरचे साजुक तुप तर उत्तमच. साय जमा करुन ती पाण्यात घुसळून लोणी काढायचे आणि ते लोणी कढवायचे. कढवताना त्यात एक दोन तुळशिची पाने टाकायची म्हणजे चांगले रवाळ तुप येते. बाजारातले मी सागर घी आणले आहे. ते चांगले वाटते मला.

स्वाती२'s picture

28 Oct 2010 - 8:04 pm | स्वाती२

मला हे पुरण नुसतच येता जाता खायला आवडतं, खिरापतीसारखं!

छान रेसिपी.
आम्ही ह्याला सारण म्हणतो. पुरण म्हटले की पुरणपोळ्या आठवतात.

प्रियाली's picture

29 Oct 2010 - 12:11 am | प्रियाली

मला तर हा मधुन मधुन जवळाही वाटतो.

किती गोड खावं माणसाने? त्यापेक्षा जवळ्याच्याच करंज्या करायच्या ना! ;)

प्रियाली आयडीया चांगली आहे.
स्वाती धन्स.
पक्या करंज्यांच्या लाटलेल्या पारीला पदर येण्यासाठी जे कॉर्नफ्लॉवरच मिश्रण लावतात त्याला आम्ही सारण म्हणतो आणि करंजीत भरण्यासाठी जे मिश्रण करतो त्याला पुरण म्हणतो.