नाही.. नाही.. रस्ता नाही चुकला. अहो मी ही स्वयंपाक करतेच की घरी..! असो..
डिस्क्लेमर : ही ऑथेंटीक पा कृ नाही. अशीच सांगोवांगी आणि थोडीफार जयश्री देशपांडे यांच्या कृपेने जे काही घरात होतं ते वापरून केलेली आहे. प्राजु श्टाईल म्हणा हवं तर!! ऑथेंटीक पाकृ साठी सुगरणींची आणि बल्लवाचार्यांची मदत घ्यावी. काही चुकले-माखल्यास मी जबाबदार नाही. ऑल द बेस्ट!
" alt="" />
चेरी टोमॅटोने डोकोरेशन करण्याचा केविलवाणा प्रयत्न.. :)
चला करा सुरूवात ...
वाढणी : साधारण पणे ३ लोकांसाठी .
सामग्री :
१. हरभरा डाळ - १.५ वाटी
२. मोठे कांदे - २ (१.५ +० .५)
३. तीळ - २ टीस्पून
४. टोमॅटो - १ मध्यम आकाराचा (ऑप्शनल. मला आवडतो म्हणून मी घालते)
५. लाल सुक्या मिरच्या - ऐपतीप्रमाणे. मी २ घेतल्या.
६. कढीपत्ता - मूठभर
७. कोथिंबीर - मूठ्भर (माझ्याकडे अजिबात नव्हती ;))
८. तमाल पत्र - ३-४
९. गरम मसाला /सांबार मसाला/गोडा मसाला - या पैकी कोणताही मसाला २-३ टीस्पून. काय करायचे आहे त्यावर मसाला वापरावा. सांबार करायचे असल्यास सांबार मसाला, विंग्रजी कर्री करायची झाल्यास गरम मसाला, आणि टिप्पीकल ब्राह्मणी आमटी करायची झाल्यास गोडा मसाला वापरावा.
१०. गूळ - आवडीप्रमाणे. (मी अजिबात नाही घेतला.) :)
११. आमसूल : ३-४
१२. आलं, ३-४ हिरव्या मिरच्या, लसूण २-३ पाकळ्या
१३. मीठ
१४. तळणीसाठी तेल.
कृती :
१. हरभरा डाळ ५-६ तास भिजत घालावी. नंतर त्यातले पाणी पूर्णपणे काढून टाकून ती जाडसर (वाटल्या डाळीसाठी असते तशी) वाटून घ्यावी. वाटताना त्यात आलं, हिरव्या मिरच्या, मीठ घालून घ्यावे.
२. आता कढईमध्ये तेल तापत ठेवून, या वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात अगदी थोडा बारीक चिरलेला कांदा घालावा, थोडी हळद आणि २-३ कढीपत्त्याची पाने चिरून घालावीत. असल्यास कोथिंबीर सुद्धा घालावी.
३. तेल तापले की, या वाटणाचे हाताने गोळे करून तेलात सोडावेत. ते गोळे तेलात हसू लागले(म्हणजे डाळीचे कण अगदिच सुट्टे सुट्टे होऊ लागले) तर सगळ्या कढईभर वाटलेली डाळ पसरेल. असे झाल्यास त्याला बांधून ठेवण्यासाठी चमचा भर बेसन घालवे आणि मग त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तळून घ्यावेत. (१-२ खायलाही हरकत नाही).
सांबार्/आमटी साठी -
१. साधारण दिड कांदा मोठा चिरून तो तेलावर अगदी छान गुलाबी ट्रान्स्परंट होईपर्यंत परतावा. त्यातच लाल मिरच्या, आलं, लसूण परतून घ्यावे.
२. कांदा बाजूला काढून जे काही शिल्लक तेल असेल त्यावर तीळ परतून घ्यावेत.
३. आता हा लाल मिरच्या, कांदा, तीळ, आलं लसूण मिक्सरमध्ये अगदी पेस्ट करून घ्यावे.
४. कढईमध्ये डावभर तेल तापत घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, तमाल पत्र, उरलेला बारीक चिरलेला कांदा, हवा असल्यास मोठा चिरून टोमॅटो घालावा आणि थोडे परतून घ्यावे. यामध्ये आता मिक्सरमध्ये केलेली कांद्याची पेस्ट घालून आणखी थोडावेळ परतून घ्यावे. त्यात वरील पैकी कोणताही मसाला घालावा आणि आणखी २-३ मिनिटे परतून घ्यावे. आता यात ठीकसे पाणी (दाट्-पातळ आवडीप्रमाणे) घालून त्यात मीठ, गूळ, आमसूले घालवीत.
आमटीला उकळी आली की हे तळलेले गोळे त्यात सोडावेत आणि ४-५ मिनिटे झाकण ठेवून मस्त उकळू द्यावे.
५. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी आणि पोळी, भात, भाकरी, पुरी .. अगदी स्वाद/दीप च्या परठ्यांसोबतही खावे.
टिप :
१. ज्यांना हरभरा डाळ मानवत नाही त्यांनी मूग डाळ आणि उडीद डाळ घ्यायला हरकत नाही. मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करता येते. याला पंजाबी भाजी करायची असल्यास ग्रेव्हीमध्ये कांद्यासोबत काजूही घालवेत.. गोडसर कोफ्ताकरी तयार होईल. गोळे जास्ती झाल्यास नुसते खाल्ले तरी छान लागतात, अथवा दुसर्या दिवशी कढी करावी आणि त्यात घालून कढी गोळे नावाचा प्रकार करावा.
२. काही ठीकाणी हे गोळे न तळता उकळणार्या आमटीमध्ये तसेच घालतात आणि ते त्यातच शिजतात (म्हणे!!). पण स्वयंपाक करताना मी कधी रिस्क घेत नाही ;)
शुभेच्छा!!
- प्राजु
प्रतिक्रिया
5 Oct 2010 - 7:24 am | Pain
डावीकडचा फोटो दिसत नाहीये!
पदार्थ आवडला... नेहमीप्रमाणे नुसता तो पाहणेच नशिबात असल्याने जळजळही झाली :(
5 Oct 2010 - 8:42 am | कौशी
माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ.....
5 Oct 2010 - 8:57 am | सहज
हेच म्हणतो.
माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ.....
5 Oct 2010 - 9:38 am | स्पंदना
चला रेवतीच्या इडल्या पचल्या आता प्राजुच्या गोळ्यांचा प्रयोग.
सर्वांना ओपन आमंत्रण!!
5 Oct 2010 - 9:42 am | दत्ता काळे
माझ्याही आवडीचा पदार्थ. हेच गोळे दाटसर केलेल्या गुजराथी कढीमध्ये टाकले कि सुद्धा मस्तं लागतात.
5 Oct 2010 - 10:25 am | अवलिया
मस्त !
5 Oct 2010 - 10:30 am | sneharani
मस्त आहे रेसिपी!
फोटो सुध्दा मस्त!!
5 Oct 2010 - 11:18 am | प्रभो
झकास!!
5 Oct 2010 - 11:19 am | विसोबा खेचर
हम्म..जगूअण्णांबद्दल काळजी वाटते.. अलिकडे वाळलेत बापडे!.. :)
पाकृ बाकी छान..! :)
तात्या.
--
मिथुनदा अंमळ चिंताग्रस्त वाटताहेत, पण मुनमुन मात्र सुखाने विसावली आहे त्यांच्यावर! :)
5 Oct 2010 - 12:49 pm | गणपा
डाळवड्यांची आमटी मस्त ग प्राजुताई. :)
5 Oct 2010 - 1:08 pm | मितान
अहाहा !
किती वर्षं झाली अशी आमटी खाऊन.. तोंडाला पाणी सुटले. आता करावीच लागेल :)
माझी आजी - आई या गोळ्यांसाठी मसूर आणि मूग डाळ समप्रमाणात घेतात.
5 Oct 2010 - 1:12 pm | सूड
काही ठीकाणी हे गोळे न तळता उकळणार्या आमटीमध्ये तसेच घालतात आणि ते त्यातच शिजतात (म्हणे!!). पण स्वयंपाक करताना मी कधी रिस्क घेत नाही
हो, हे न तळतासुद्धा छान शिजतात. सोप्पै, उकळत्या आमटीत गोळे सोडायचे शिजले की ते वर येतात. आणि फोडणी फक्त कडीपत्ता,राईजिर्याची कांदा-लसूण नाही, करून पहा छान होते.
मला पण सवड काढून गोळे तळून आमटी करुन पहायलाच हवी.
5 Oct 2010 - 1:53 pm | प्राजक्ता पवार
माझी आवडती पाकृ :)
गोळ्याचे सांबार वा कढीगोळे करतांना उकळी आल्यावर गोळे सोडले तरी ते शिजतात.
5 Oct 2010 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार
वाह ! वास पण छान येतोय ;)
5 Oct 2010 - 3:52 pm | स्वाती२
मस्त! माझा आवडता पदार्थ.
5 Oct 2010 - 4:43 pm | रेवती
गोळ्याची आमटी आवडली.
मी यात मेथीची पाने चिरून घालते.
5 Oct 2010 - 7:07 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार.
हा माझा मोडका तोडका पदार्थ गोड्/तिखट मानून प्रतिक्रिया दिल्यात.. धन्यवाद. :)
5 Oct 2010 - 8:04 pm | स्पंदना
नुसती प्रतिक्रिया?
प्राजु, केली, खाल्ल्ली, अन अजुन जिवंत आहे.
हलके घे हो!
चपाती बरोबर छान लागली पण भाता बरोबर अगदी प्रत्येक जण पहिल्या घासाला 'हम्म' अस बोलला. अप्रतीम.
6 Oct 2010 - 1:47 am | प्राजु
धन्स अपर्णा!! :)
5 Oct 2010 - 10:15 pm | निवेदिता-ताई
मस्तच.....माझी आई खुप छान बनवायची.
13 Oct 2010 - 2:42 am | खादाड_बोका
पण ही मी तात्यांनी दिलेली रेसीपी आहे त्या प्रमाणे बनवितो. फार सुटसटीत आहे ती बनवायला.
http://www.misalpav.com/node/2039
प्राजुताई...मी तुमच्या प्रकारेही बनवुन पाहील.