ईश्वर के संभावित अस्तित्व का ख़ौफ़
इतना लद जाता है मन पर
कि सर पत्थर तक जा गिरता है ।
........................राजर्षि अरूण
या ओळी आज हिंदी कविताकोष या स्थळावर वाचल्या आणि मनात प्रश्नचिन्ह उमटल्याशिवाय राहीलं नाही.
देवाची भक्ती आपण नीस्सीम प्रेमातून करतो की खौफ अर्थात भीतीतून? नक्की तिचा उगम काय?
"दुसर्याचं वाईट आपण चिंतत नाही" हे आपल्यामधून वहाणार्या मूळ चांगुलपणातून की स्वर्ग-नरक यांच्या भीतीतून?
कारण घरोघरी मातीच्या चूली या म्हणीप्रमाणे षड्रिपुंचं थैमान हे तर प्रत्येकाच्या मनात असणार मग त्याला आवर घालण्याकरता केवळ स्वर्ग आणि नरक या कपोलकल्पित गोष्टींची नीर्मीती झाली आहे का?
आणि तसं असेल तर ज्यानी कोणी ही शक्कल प्रथम लढवली तो जिनीयस म्हणायला हवा, who could sell his idea to the whole world for good so many ages.
असं काय आहे पापपुण्य, स्वर्ग-नरक या कल्पनांमधे की या कल्पनांचा आपल्यावरील पगडा अजूनही सुटायला तयार नाही?
आणि जर कोणी या कल्पना बाष्कळ मानत असेल तर मग नक्की कोणती आदिम प्रेरणा त्यांना दुसर्याचं वाईट करण्यापासून परावृत्त करते?
मिपावरील मान्यवरांचे विचार ऐकण्यास उत्सुक.
प्रतिक्रिया
9 Sep 2010 - 10:53 pm | पक्या
पाप पुण्याचं माहित नाही. पण एखाद्याशी चुकून अथवा मुद्दाम वाईट वागले गेले तर मात्र तशा वागणूकीची टोचणी मात्र मनाला लागून रहाते. अरेरे , असं नको होतं वागायला..चुकलच माझं असा विचार मनात येत असतो त्यावेळी.
9 Sep 2010 - 11:00 pm | बेसनलाडू
देवाची भक्ती आपण नीस्सीम प्रेमातून करतो की खौफ अर्थात भीतीतून?
श्रद्धा/देव या संकल्पनेवरील प्रेम यापोटी
नक्की तिचा उगम काय?
नक्की माहीत नाही
"दुसर्याचं वाईट आपण चिंतत नाही" हे आपल्यामधून वहाणार्या मूळ चांगुलपणातून की स्वर्ग-नरक यांच्या भीतीतून?
आपल्यातल्या मूळ चांगुलपणातून
कारण घरोघरी मातीच्या चूली या म्हणीप्रमाणे षड्रिपुंचं थैमान हे तर प्रत्येकाच्या मनात असणार मग त्याला आवर घालण्याकरता केवळ स्वर्ग आणि नरक या कपोलकल्पित गोष्टींची नीर्मीती झाली आहे का?
होय; तसे वाटते खरे!
असं काय आहे पापपुण्य, स्वर्ग-नरक या कल्पनांमधे की या कल्पनांचा आपल्यावरील पगडा अजूनही सुटायला तयार नाही?
बरेच काही - ग्लॅमर, या संकल्पनांशी जोडल्या गेलेल्या कपोलकल्पित पुराणकथांवरील प्रेम, विविध कलामाध्यमांमधून (नाट्य, नृत्य, चित्र इ.) या संकल्पनांचा झालेला प्रसार इत्यादी
आणि जर कोणी या कल्पना बाष्कळ मानत असेल तर मग नक्की कोणती आदिम प्रेरणा त्यांना दुसर्याचं वाईट करण्यापासून परावृत्त करते?
आत्मभान, मूळ चांगुलपणा, वॉट गोज अराउन्ड कम्ज अराउन्ड ची जाणीव व पूर्वानुभव (याला मी भीती म्हटलेले नाही)
(विचारवंत)बेसनलाडू
9 Sep 2010 - 11:01 pm | शुचि
एखाद्या वेळेस खूप, अतोनात संताप येतो एखाद्या व्यक्तीचा, तिच्या कृत्याचा आणि मनात शाप निघतात पण दुसर्या क्षणी मनात येतं "नको. हेच शाप आपल्या कुटुंबियांवर उलटले तर." आणि मी राग गिळून टाकते. इथे कुठेतरी पाप्-पुण्य, स्वर्ग-नरक या कल्पनांशी मानसीक गुलामी जाणवते. की रागही नीट व्यक्त करता येऊ नये का तर तेच आपल्यावर उलटण्याची भीती.
10 Sep 2010 - 12:08 am | कवितानागेश
मला वाटते, मनात कुठलीही नकारात्मक भावना असणे हा नरक,
( या भावना आपल्यालच आतल्या आत सतत जाळतात... हीच 'ती' नरकातली आग असावी)
होकारात्मक भावना,विचार, क्रुती.... हा स्वर्ग!
'पाप' या शब्दाचा शब्दशः अर्थ 'निगेटिव्हिटी' हाच आहे.
....मला वाटते, भीतीसुद्धा 'पाप'च आहे!
10 Sep 2010 - 12:16 am | शुचि
सिन या शब्दाचा अर्थ केवळ टू मिस द मार्क इतकाच आहे. मग आपण त्याचं एवढं अवडंबर कधी माजवलं?
10 Sep 2010 - 12:14 am | सुनील
मिपावरील मान्यवरांचे विचार ऐकण्यास उत्सुक
हम्म. तूर्तास झाडावर (मान्यवरांचे विचार ऐकायला!)
10 Sep 2010 - 1:55 am | विकास
हम्म. तूर्तास झाडावर
कसले झाड ते पाहून बसा. नाहीतर सफरचंदाचे असायचे आणि पॉपकॉर्न खाण्याऐवजी चुकून सफरचंदच खाल! ;)
10 Sep 2010 - 12:23 am | विलासराव
मला वाटते, आपल्या सदसदविवेकबुध्हीला अनुसरुन आपण जी कृती करतो तेच पॉझीटीव्ह विचार ( स्वर्गाचा रस्ता म्हणा हव तर).
आनी जर सदसदविवेकबुध्हीला अनुसरुन आपण क्रुती केली नाही तर तिच नकारात्मक भावना (नरकात पाय पडलाच असे म्हणा हवे तर).
पुढे चालुन मी तर असे म्हनेन की हे जे कोणीतरी आपल्याला आतुन सुचवत असते कि काय बरोबर अन काय चुक तेच देवाच अस्तित्व मानवी देहात.
10 Sep 2010 - 1:00 am | शुचि
मला तरी "चांगलं -वाईट", "चूक्-बरोबर", "पाप्-पुण्य", "स्वर्ग-नरक" हे द्वैत अतिशय गहन , सर्वात गहन आणि उकलण्यास कठीण वाटत आलेलं आहे. आणि मी वेळोवेळी मला जे शहाणे लोक वाटले त्यांना हे विचारलं देखील आहे.
चांगल्या संस्कारांमुळे , शिक्षणामुळे कदाचित माझी सद्सद्विवेकबुद्धी म्हणा नीरक्षीरविवेक म्हणा इतका प्रगल्भ असेल की मी समजू शकेन "वैष्णव जन तो तेने कहीये रे पीड पराई जाने रे"
पण एखादा गुन्हेगार ज्याला फक्त अब्युसीव्ह वागणूक मिळत गेलेली आहे आणि ज्याच्या मनःपटलावर फक्त द्वेष, वैर, दु:ख याचीच नोंद उमटली आहे , ज्याला सुसंस्कारांपासूनच काय मूलभूत माणुसकीपासून वंचित ठेवलं गेलय तो कुठून सदसदविवेक आणि शुभ विचार आणणार? मग त्याने कोणता मार्ग स्वीकारायचा? त्याची तर बुद्धी त्याला जगावर सूड घे हेच सांगणार. मग अशा लोकांना मार्ग दाखविण्यासाठी तर या कल्पना अस्तित्वात आल्या नाहीत ना? बरं अशा लोकांना मार्ग दाखवण्यासाठी जर या भ्रामक कल्पना अस्तित्वात आल्या तर यांना अन्य लोकांनी थारा का दिला?
11 Sep 2010 - 2:15 am | अर्धवटराव
शुचिताई,
कोणाची प्रतीक्रिया कुठल्या प्रसंगी काय असावी हे सर्वस्वी त्याच्या त्याक्षणीच्या मानसिकतेवर अवलंबुन असतं. आणि कुणीही आपली मानसिकता स्वतः घडवत नाहि, निदान तिचा बेस तरी. मग हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कि अश्या लादलेल्या मानसिकतेतुन झालेल्या कर्माचे फळ कोणि का भोगावे ? याला उत्तर एकच.. ते म्हणजे प्राक्तन. हि मानसीकता लाभण्याचे कारण त्या व्यक्तीचे पुर्वकर्म, बस्स्स्स... अशे कर्म कि जे त्याला आता आठवणार देखील नाहि. हे पुराव्यानि सिद्ध करणं कठीण (कि अशक्य ????) आहे, पण या उपपत्तीशिवाय दुसरा पर्याय नाहि, दुसरं लॉजीक नाहि. जीवन = कर्म आणि कर्म = जीवन हे समिकरण, हा कार्य-कारण भाव एकदा समजला (कि स्विकारला???) कि मग पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-मरण, बंधन-मोक्ष... या सर्व पसार्याची उपपत्ती "कर्म आणि फल - व ते भोगताना पुन्हा कर्म" या स्पायरल सिद्धांतावर लावता येते/समजुन घेता येते.
एक निश्चित... या भाकडकथा खचितच नाहित, तर मानवी विचारंचे प्रतीबींब आहेत
(अनुत्तीर्ण) अर्धवटराव
10 Sep 2010 - 1:54 am | विलासराव
पण एखादा गुन्हेगार ज्याला फक्त अब्युसीव्ह वागणूक मिळत गेलेली आहे आणि ज्याच्या मनःपटलावर फक्त द्वेष, वैर, दु:ख याचीच नोंद उमटली आहे , ज्याला सुसंस्कारांपासूनच काय मूलभूत माणुसकीपासून वंचित ठेवलं गेलय तो कुठून सदसदविवेक आणि शुभ विचार आणणार?
अहो तो सुड घेईलही. पन तरीही त्याला खोल अंतर्मनात ही जाणीव होतच असणार की काहीतरी चुकतय. भले सुडाचा विचार तो अमलात आणेल. पन १००% विचार फक्त सुडाचाच येईल, मन जराही कचरणार नाही असे मला वाटत नाही.
सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे आतला आवाज असे मला म्हणायचे आहे.
चांगल्या संस्कारांमुळे , शिक्षणामुळे कदाचित माझी सद्सद्विवेकबुद्धी म्हणा नीरक्षीरविवेक म्हणा इतका प्रगल्भ असेल की मी समजू शकेन "वैष्णव जन तो तेने कहीये रे पीड पराई जाने रे
फक्त चांगल्या संस्कारांमुळे , शिक्षणामुळे जर सद्सद्विवेकबुद्धी प्रगल्भ होत असेल तर आज २१ व्या शतकात फारच वेगळे चित्र असायला हवे होते. अहो खुप शिकलेले लोकच सद्सद्विवेकबुद्धी गहान ठेवुन कसे वागत असतात हे आपल्याला मिडियामधुन
समजतच असते रोजच्या रोज. मला असे वाट्ते की आतला आवाज हे तत्व उपजतच असते.
उलट शिकलेले लोक तर जास्त सफाईने गुन्हे/कपट करतात.मला कदाचित जे म्हनायचे आहे ते शब्दात व्यवस्थित मांडता आलेले नाही. असो. चुकभुल माफ असावी.
11 Sep 2010 - 1:56 am | अर्धवटराव
आपल्या भावना पोचल्या आणि विचारही पटले.
अर्धवटराव
10 Sep 2010 - 2:04 am | इन्द्र्राज पवार
"दुसर्याचं वाईट आपण चिंतत नाही" हे आपल्यामधून वहाणार्या मूळ चांगुलपणातून की स्वर्ग-नरक यांच्या भीतीतून?
तुम्ही जसे हे गृहितक मांडता की चांगुलपणा हा मानवात जन्मजातच आहे ('मूळ' शब्दामुळे म्हणत आहे...) मग तद्वतच 'जेनेटिकली' वाईटपणाचे सिम्प्टम्स त्याच्या रक्तात जन्मजात असणार कारण एक्स सापडतो म्हणजे वाय कुठेतरी तरंगत असतोच. स्वर्ग-नरकाचे अस्तित्व आणि त्या दोन जागांविषयी अनुक्रमे असणारे आकर्षण आणि भीती ही अगदी 'मी देवबिव काही मानत नाही' असे ठामपणे म्हणणार्याच्या मनातदेखील असतेच असते. षड्रिपुंची वस्ती (मी "थैमान" म्हणत नाही) हा मानवी शरीराचा एक बॉयॉलॉजिकल अॅस्पेक्ट आहे आणि त्यापासून कुणाची सुटका नाही. [काही तत्वज्ञानात तर त्या विकारांना 'रिपु' मानतही नाहीत, ते भोग आहेत आणि मानवाला ते भोगणे आणि त्याच्या परिणामाला सामोरे जाणे हे अटळ असते.] त्यापासून निर्माण होणार्या उजव्या वा डाव्या पक्षांना तोंड देतादेताच अंतीमतः आपला देह स्वर्गात वा नरकात जाणार याचे काही आडाखे एकतर ती व्यक्ती बांधते वा त्याचे सगेसोयरे त्याच्या गळी उतरवितात. प्रथम शक्कल कुणी लढविली हे आता तितके महत्वाचे नाही, का तर ती कबर आता खणण्याचे प्रयोजनच उरलेले नाही, इतक्या प्रखरतेने स्वर्गनरकाच्या संकल्पना मानवाच्या मनी घट्ट वसल्या आहेत.
असं काय आहे पापपुण्य, स्वर्ग-नरक या कल्पनांमधे की या कल्पनांचा आपल्यावरील पगडा अजूनही सुटायला तयार नाही?
हिंदू मन (ख्रिश्चनांतही हेल-हेवन कंसेप्टची रिजिडीटी हेवीच आहे) 'स्वर्ग-नरक' कल्पनेला चिकटून आहे याला कारण त्या कल्पनेची मोहकता विलक्षण गारुड घालणारी आहे. अॅडम आणि ईव्हसाठी दंडापोटी ठरलेला "पॅरॉडॉईज लॉस्ट" हा विचारच मानवी मनाला इतका भयावह आहे की त्याचे "पॅराडॉईज रीगेन" मध्ये रूपांतर करण्यासाठी काय केले पाहिजे याच विचारात तो गुरफटला गेला. मानवी देह मिळाला म्हणजे सुखदु:ख, राग, चीड, लोभ, मोह, पापपुण्य, मत्सर, तिरस्कार आदी विकारांच्या संगतीनेच नाव वल्हविणे हे ठरलेलेच असते. नीता अंबानीच्या नवर्याची इस्टेट सव्वा लाख हजार कोटी झाली म्हणून टीना अंबानीला आपल्या नवर्याची इस्टेट अजून 'फक्त' एक लाख हजार कोटीच आहे म्हणुन जळफळ होते, तर तिची ही वर्तणुक ती एक "मानवी' स्त्री आहे आणि तिलाही अगदी झोपडपट्टीत जीवन कंठणार्या स्त्रीसारख्याच भावना आणि विकार आहे ही बाब अधोरेखीत होते. हे विकारच पाप आणि पुण्याच्या गाठोडी आपल्या शिरावर ठेवीत असतात आणि मग जिवंतपणी देवाने हे ओझे आपल्याला दिले तर आता निदान मृत्युनंतर तरी सुखाचे जीवन दे, अशी त्या नियत्यासमोर प्रार्थना. ही प्रार्थना म्हणजेच "स्वर्गाचे दार उघड" ही विनवणी. अर्थात या मानवी वर्तनाचा संबंध मानवाला बद्ध करणार्या श्रद्धामूल्यांशी आहे हे नाकारून चालत नाही. देव आणि धर्माची चौकट मानली आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या तारा नादमाधुर्यतेने आपण झंकारत ठेवल्या तरच स्वर्गप्राप्ती होईल, नाहीतर भयावह असा नरक आपल्याला पोटात घ्यायला चोवीस तास तयार आहेच, ही भीतीच मानवाची नाळ कर्मविकापाला जोडण्याचे काम करते...म्हणजेच "तुझे कर्म हेच तुझे फळ....जो बोओगे वो पाओगे !" आपल्या कृत्याकडे त्या "ईश्वरा"चे सदोदित लक्ष असते ही कल्पनाच स्वर्गनरकाची दिशा दाखविण्यासाठी आणि पापपुण्याचा लेखाजोखा करण्यासाठी समाजात दृढ झाली आहे; आणि जर चुकूनमाकून त्या कृत्यात काही चूक राहिलीच तर मग त्याच्या माफीसाठी यज्ञ, दानधर्म, अभिषेक, तप, पूजाअर्चा, अनुष्ठान, दानधर्म या त्या कल्पनेला पूरक अशा संकल्पना कृतिप्रवण होत गेल्याचे दिसून येतेच.
असो. फार लिहिता येईल या विषयावर. तूर्तास इतकेच. (छान विषय आहे लिखाणासाठी...)
इन्द्रा
10 Sep 2010 - 2:39 am | शुचि
कुठेतरी वाचलं होतं की आपल्या मेंदूची जितकी क्षमता असते तिच्या फक्त १०% का कितीतरी आपण वापरतो. एवढ्या क्षमतेवर आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का की स्वर्ग्-नरक या खरोखर कपोलकल्पित बाबी आहेत?
तर हो.
का तर अजून विज्ञानाला शोध लागला नाही.
___
पण मुक्तानंदांच्या "चितशक्तीविलास" या पुस्तकात अशा अनेक लोकांचा उल्लेख आहे जे लोक - दैवी आहेत तर काही अतिशय अभद्र, अमंगळ आहेत. अशा लोकांची सविस्तर वर्णनं केलेली आहेत ज्यांचं दर्शन त्यांना समाधी अवस्थेत झालं.
वेळोवेळी त्यांच्यासारख्या ज्या लोकांनी "स्पिरीच्युअल लीडरशीप" अर्थात अध्यात्मिक नेतृत्व केलं अर्थात या लोकांच्यात नेत्याचा मुख्य गुण "इंटेग्रीटी (मराठी शब्द)?" तर असेल त्यांनी सर्वांनी मिळून सामांन्यांची भलावण केली असेल असं नाही वाटत. थोडक्यात - स्वर्ग/नरक हे कपोल्कल्पित नसून खरच असावेत असं वाटतं.
10 Sep 2010 - 2:53 am | बेसनलाडू
अवांतर - हे वाचले :)
(दुवादार)बेसनलाडू
10 Sep 2010 - 2:56 am | शुचि
हो त्या आकड्याची खात्री नव्हती म्हणून म्हटलं १० का कितीतरी.
10 Sep 2010 - 2:43 am | शेखर
>> स्वर्ग्-नरक या खरोखर कपोलकल्पित बाबी आहेत?
मिपावरच्या बुद्धीवादी लोकांचे तर तसे म्हणणे आहे.
10 Sep 2010 - 2:58 am | मराठमोळा
देव/ईश्वर ही संकल्पनाच बहुदा "माणसाने कुणाला तरी घाबरावे" म्हणुन आली असेल कदाचित. म्हणजे माणुस काहीही वाईट (वाईटाची व्याख्या ज्या त्या व्यक्ती/समाज/धर्म सापेक्ष) करण्याआधी विचार नक्की करेल. :)
10 Sep 2010 - 10:53 am | यशवंतकुलकर्णी
10 Sep 2010 - 12:15 pm | चिंतामणराव
खरच असावेत असं वाटतं"
असावेत म्हणजे काय? कुठे ?
आणि तिथे जातात कसे ? कोण घेउन जातं ?
आपल्या वागण्या बोलण्यामुळे नव्हे तर मनातल्या मनात विचार करण्यानेही आपल्या आसमंतात, (Space around us) लहरी (waves) तयार होतात. आपल्या आयुष्यात घडणार्या घटनांवर या लहरींचा परिणाम होतो.
"स्वर्गिय सुख" किंवा "नरक यातना" यांचा अनुभव घेण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. "बुरी नजरवाले , तेरा मुँह काला" अस म्हणणारा स्वतःच्या तोंडाला काळं फासुन घेण्याची शक्यता निर्माण करतो आणि "सबका हो भला" लिहीणारा ट्र्कवाला सुखरुप घरी पोचुन मुला-बाळांना भेटण्याची शक्यता निर्माण करतो .
इथे "शक्यता" ह्या शब्दावर विचार करायला हवा.
10 Sep 2010 - 1:33 pm | विसोबा खेचर
छान चर्चा..
10 Sep 2010 - 11:46 pm | विदेश
कसलं पाप नि कसलं पुण्य!
कुठला स्वर्ग नि कुठला नरक?
कलियुगात ह्या-
पैसा मिळतोय, कामं उरक !
11 Sep 2010 - 3:47 am | चित्रा
आणि जर कोणी या कल्पना बाष्कळ मानत असेल तर मग नक्की कोणती आदिम प्रेरणा त्यांना दुसर्याचं वाईट करण्यापासून परावृत्त करते?
माणसांना मूलतः आनंद हवा असतो असे बौद्ध धर्माचे एक गुरू दलाई लामा सांगतात. सर्वांचा आनंद टिकावा असे माणसाला कुठेतरी वाटत असावे. म्हणून तो दुसर्याचे वाईट करत नसेल.
आनंदाची व्याख्या बदलली की कॉन्फ्लिक्ट. म्हणजे 'मला आनंद पैसे लुबाडून मिळतो' असे एखाद्याला वाटले की तो तसा आनंद मिळवायला दुसर्याला त्रास द्यायला प्रवॄत्त होत असावा.
स्वर्ग वगैरे जे काही आहे ते जमिनीवरच आणि आपल्या मनातच स्वर्ग/नरक असावेत. आनंद नसला की नरक, आणि आनंदी असलो की स्वर्गच.
11 Sep 2010 - 5:04 am | हुप्प्या
बहुतेक धर्म जुन्या काळात जन्मले आहेत. ज्या काळात माणूस हा अप्रगत होता. अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित गोष्टी कळत नसल्यामुळे देवाचा कोप आणि देवाची कृपा ह्या नावावर खपवल्या जात.
हे धर्म पाप केल्यावर नरक मिळतो पुण्य केल्यावर स्वर्ग असे अनुयायांच्या मनावर ठसवतात. त्यातल्या कित्येक पाप म्हणून समजल्या जाणार्या गोष्टी ह्या खरोखरच वाईट आहेत का असा प्रश्न पडू शकतो.
हिंदूंच्या मते गोमांस खाणे पाप. पण कोट्यावधी लोक ते खातात.
मुस्लिम व ज्यू लोकांच्या मते डुक्कर खाणे पाप. पण कोट्यावधी लोक खातात.
काही धर्माच्या मते अनेक देव मानणे, मूर्तीपूजा म्हणजे महापाप. पण कोट्यावधी लोक ते करतात आणि सुखाने जगतात.
काही धर्माच्या मते व्याज घेणे पाप. पण बहुतेक जगाची अर्थव्यवस्था व्याजावरच चालते.
नरक हा एक काल्पनिक बागुलबुवा आहे. अनेक धर्मात नरक म्हणजे काय ह्याची अनेक साग्रसंगीत वर्णने आहेत. तुमची तिथल्या आगीत तुमची त्वचा जळून जाते पण पुन्हा नवी त्वचा बनते आणि ती पुन्हा जाळली जाते वगैरे कल्पनाविलास ऐकले आहेत. कुणीही माईचा लाल नरक बघून आलेला नाही पण धर्ममार्तंड छातीठोकपणे अमके केले तर तुम्ही तिथे जाल आणि मग तिकडे अमुक होईल नि तमुक होईल असे सांगतात.
आंधळेपणाने असली माहिती स्वीकारणारे त्या धर्माचे सच्चे अनुयायी समजले जातात. असे अनुयायी मग नव्या पिढीला तसेच घाबरवायला तयार होतात.
दुसर्या बाजूला स्वर्गात काय काय सुखे मिळतात त्याची रसभरीत वर्णने. ज्या काळात ही लिहिली गेली त्याकाळच्या मानवाच्या सुखाच्या कल्पना काय होत्या हे त्यात दिसते. आजच्या काळात लिहिले असते तर स्वर्गात फुकट बिग स्क्रीन टीव्ही, गुळगुळीत रस्ते, टेनिस कोर्टे, आयपॉड, आयफोन, अनेक टेराबाईटच्या डिस्का, अफाट वेगात चालणारे इंटरनेट असे वर्णन वाचायला मिळाले असते. जुन्या काळात लिहिल्यामुळे दुधामधाच्या नद्या, फळे, सुंदर अप्सरा, त्यांचा नाच, गंधर्वांचे गाणे असे वाचायला मिळते.
माझ्या मते हे एक शुद्ध थोतांड आहे. त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही.
लबाडी, खोटेपणा हे टाळणे, दुसर्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे, थोरांचा आदर करणे हे सगळे धर्म न मानताही करता येते. मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. आणि हे सगळे गुण एक समाज म्हणून व एक व्यक्ती म्हणूनही टिकून रहाण्याकरता, सुखाने राहण्यासाठी आवश्यक आहेत. थोडी विचारशक्ती असेल तर हे लगेच लक्षात येईल की देव रागावतो म्हणून लबाडी करू नका असे मानण्याऐवजी सगळे लबाडी करू लागले तर समाजात अंदाधुंद माजेल. रोजचे व्यवहार करणे हे युद्ध करण्यासारखे त्रासाचे होईल म्हणून करु नका.
वडिलधार्यांचा आदर करायला शिकवताना बाप आणि आई हे देव आहेत असे शिकवण्याऐवजी, सगळे कधीतरी म्हातारे होणार आहेत. म्हातारे झाल्यावर सगळी इंद्रिये दुबळी, अधू होतात. आणि तेव्हा माणसाला आधार लागतो म्हणून त्यांना आदर, प्रेम हे द्यावे. कचर्यासारखे दूर सारू नये. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. असे लक्षात येऊ शकेल.
तस्मात स्वर्ग, नरक यांचा बागुलबुवा दाखवणे बंद करावे हेच हिताचे आहे.
11 Sep 2010 - 8:31 pm | जयंत कुलकर्णी
खरे साक्षात्कारी ? •जानेवारी 17, 2010 • १ प्रतिक्रिया (संपादन)
खय्याम म्हणतो -
मस्जीद, चर्च, मंदीर आणि सिनेगॉग येथे
नरकाला घाबरणार्या आणि स्वर्ग-इच्छुकांची आहे गर्दी.
ज्याला खरा साक्षात्कार झाला आहे तो,
असली बीजे ह्रदयांच्या ह्रदयात पेरत नाही.
मानव जेव्हा नैसर्गिक आपत्तींना घाबरायला लागला तेव्हा त्याला कुठल्यातरी आधाराची आवश्यकता वाटायला लागली. मग ज्याचे स्वरुप जास्त रौद्र, भीतीदायक त्याला तो देव/पिशाच्च मानायला लागला. उदा. पुरासाठी-पाणी, वादळासाठी-वारा, रात्रीसाठी-सूर्य, चंद्र इ.इ. लवकरच त्याला कळून चुकले, रात्रीला सूर्य घालवतो, सूर्याला रात्र, डोंगर वारा अडवतो, अग्नी डोंगरावरची जंगले पेटवतो आणि पाऊस ती आग विझवतो. सूर्याला ढग झाकाळून टाकू शकतात. सगळ्यात भयंकर प्रकार झाला, ज्या दिवशी दिवसाही अंधार पडला. बरोबर ओळखलेत तुम्ही. ग्रहणाच्या दिवशी. मला तर वाटते सर्व देवांच्या आणि राक्षस/पिशाच्यांचा जन्मदीन हाच असावा.
जेव्हा माणसाला पाहिजे तेव्हा देवाची पूजा कराविशी वाटू लागली तेव्हा त्यांच्या प्रतिकांचा जन्म झाला असावा. प्रतिके आली म्हणजे त्यांना रहायला जागा आलीच. मित्रांनो, देवळांचा जन्म हा असा झाला आणि मानवजातीचा घात झाला. मानवापेक्षा त्यांनीच तयार केलेल्या प्रतिकांचेच महत्व जास्त वाढले……प्रतिकांसाठी झालेल्या लढायांचा परामर्श घ्यायची ही जागा नाही आणि वेळही नाही. असो.
चांगल्या वाईटाचा विचार मानव करायला लागला आणि स्वर्ग आणि नरक या कल्पनांची उत्पत्ती झाली. ही कल्पना फार मजेशीर आहे बरंका मित्रांनो ! माणसाने माणसाला मारले तर ते पाप आणि मग नरक यात्रा ठरलेलीच. सैनिकाने शत्रूच्या सैनिकाला मारले तर मात्र ते दोघेही स्वर्गात जातात कारण स्वर्गात कोण जाणार हे राजकारणी आणि धर्मगुरु ठरवतात.
स्वर्गात आणि नरकात कोण जाणार हे धर्मगुरु ठरवायला लागल्यामुळे काय झाले हे मी आपणास सांगत नाही. आपण विचार करा, अवतीभोवती बघा, आपल्याला कळेल. आपण सूज्ञ आहात ! हे ठरवणारे म्हणे साक्षात्कारी असतात. असूदेत ! त्यांच्याविषयी खय्याम म्हणतो ......
जयंत कुलकर्णी.
11 Sep 2010 - 9:50 pm | विलासराव
+१००% सहमत.