लग्न लवकर जमण्यासाठी थोडे इंग्रजी आलेच पाहिजे....

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
9 May 2008 - 7:34 pm
गाभा: 

(प्रस्तावना : लग्न ही एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. त्यात कळत नकळतच काही आशय निर्माण होत जातात. या सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाषा हा कसा प्रभावशाली भाग बनत आहे यासाठी अनुभवजन्य प्रसंगातून घेतलेला हा मागोवा.)

ही गोष्ट अंदाजे २५/३० वर्षांपूर्वीची घडलेली आहे. आमच्या मामा आणि मावश्यांचे एक बरे मोठे असे कुटुंब होते. ( त्यातले बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ) तर अश्याच एका सुट्टीमध्ये माझी सर्व भावंडे, मी आणि माझी आई माझ्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलो होतो. मामा आणि माझ्या ५ मावश्या अश्याच गप्पागोष्टी करत होते. अनेक विषयावर चर्चा होत असताना आम्ही लहान मुले अवतींभोवती खेळत होतो आणि अधेमध्ये मोठ्यांच्या गप्पाही ऐकत होतो.

अनेक विषयाच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्यातच मामाच्या मुलीच्या वरसंशोधनाचा विषय निघाला. मामाने सध्या काय अडचणी आहेत आणि तुमचे लग्न कसे लवकर जमले इत्यादी इत्यादी सांगितले. बोलता बोलता मामा म्हटला, की आता मुलाकडचे लोकं पूर्वीसारखे फक्त घरदारच बघत नाही. सध्या मुली बघण्याचे वेड चालू आहेना! आपल्या रंजनाला मी सांगितले आहे की मुलाकडचे काही प्रश्न विचारतात ना, तेव्हा एखादा इंग्रजी शब्द नक्कीच वापरत जा. इंग्रजी शब्द वापरला ना, की मुलगी एकदम शिकल्यासारखी वाटते. ते वाक्य ऐकून सर्व मावश्यांनी आणि आईने मान डोलावली आणि खरेच सांगतो आहे हा असा आविर्भाव व्यक्त केला.मी तर लहानच होतो पण माझे आईकडे लक्ष गेले. आईनेही मान डोलावली आणि माझे लक्ष नकळतच तिच्या डोळ्याकडे गेले त्यात मी एक काहीतरी पराभवाची, न्यूनगंडांची आणि कसल्यातरी भीतीची भावना बघितल्यासारखी जाणीव मला झाली. इतक्या वर्षानतरही मला माझ्या आईचे ते डोळे आठवतात.

आजपर्यंत मला कधी कधी मामाचा राग यायचा पण आज हा लेख लिहिताना मला मामाचे खरेच कौतुक वाटते. मामा खरेच द्रष्टा होता हे निर्विवाद पणे मान्य करावेसे वाटते. कालाच्या ओघात काय बदल होणार आहे आणि त्याचा आपल्या लाभासाठी कसा जास्तीत जास्त फायदा उचलायचा यात वाईट ते काय? शेवटी आपल्या मुलांचे भले व्हावे असे कोणत्या पालकांना वाटणार नाही? लग्न ही खरोखरच आपला स्तर बदलवण्याची सूवर्णसंधीच आहे असे समजा हवे तर.

माझ्या मामाला ३०/३५ वर्षापूर्वी एखाद्याला अल्पभेटीत परकीय भाषेचे साह्य घेऊन कसे प्रभावित करायचे हे समजले होते.

आज मी बघत असतो अनेक मराठी भाषक इंग्रजीमध्ये लग्नपत्रिका घेऊन येतात. अनेक लग्नामध्ये अमुक अमुक वेडस् अमुक अमुक असे फुलांनी सजवलेलेच असते, लग्नाच्या गाडीवर सर्रास बदामाचे चित्र आणि लोव्ह असे लिहिले असते.

भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना?

पुढच्या महिन्यात मी मामाला ( वय ८३) भेटणार आणि त्याच्या द्रष्टत्वाबद्दल कौतुक किंवा काय असेल त्या माझ्या भावनाही सांगणार आहे. शेवटी तो काळाच्या खरेच पुढे होता हे मान्य करायला काय हरकत आहे?

प्रतिक्रिया

मन's picture

9 May 2008 - 7:40 pm | मन

ह्ये असेल तुमचे मत.
आम्हाला पटत नाही.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 May 2008 - 9:15 pm | llपुण्याचे पेशवेll

माझेही मन हे मानायला तयार नाही पण कलंत्री साहेब म्हणतात ते काहीसे खरे आहे. शेवटी 'कालाय तस्मै नमः ' हेच खरे. जोपर्यंत मने बदलत नाहीत तोपर्यंत कोण काय करणार.
मी पाहील्या आहेत अशा मुली ज्या अगदी मराठी वातावरणात वाढल्या आहेत पण आता अगदी स्वतःला कॉस्मोपॉलिटन म्हणवून घेण्यात धन्य मानतात. मी अगदीच हट्टी आहे मराठीशिवाय इतर भाषेत मी ढीम्म काही बोलत नाही म्हणून उपकार केल्यासारखे माझ्याशी मराठीत बोलतात.
असो पण मी तरीही माझा ठेका सोडला नाहीये. मी मराठीतच बोलणार.

(हट्टी)
पुण्याचे पेशवे

यशोधरा's picture

9 May 2008 - 7:43 pm | यशोधरा

नाही हे काही मला. केवळ काही इंग्लिश शब्द येतात म्हणून एखादी व्यक्ती शिकल्यासारखी वाटते, असे कसे म्हणता येईल?

स्वयंभू's picture

9 May 2008 - 8:04 pm | स्वयंभू (not verified)

मलाबी हे झेपेश नाय झालं

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन's picture

9 May 2008 - 8:25 pm | मन

असाच एक आग्रह माझ्यामाहितीतील एका ताईचा होता.
काय , तर म्हणे मुलगा केवळ आय टी वाला हवा.
बाकी कुठलाही(अगदी बँक किंवा इतर ठिकाणी मानाचे काम असले तरी नको.)

पुढे काय झाले कसे झाले माहित नाही.पण तिचे मत बदलले.
इतके, की आय टी वाला नकोच असे म्हणु लागली.
(बहुदा माझ्या सारखाच एखादा रिकाम्चोट आणि निरुद्योगी प्राणी तिच्या
पाहण्यात आला असावा.)
सांगायचे एवढेच, की हे वर वर असलेल्या माहिती मुळे,गैर समजामुळे
अशी मागणी होत असावी.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

गृहिणि's picture

9 May 2008 - 9:06 pm | गृहिणि

मला वाटतय कि हा प्रश्न सुशिक्षित असण्याचा नसुन भासवण्याचा आहे. म्हणजे नोकरि साठि मुलाखत देताना विशेषतः पहिल्या दुसर्या नोकरिच्या वेळि (जेंव्हा अनुभव कमि असतो), तेन्व्हा एखाद्या फारशि माहिति नसलेल्या विषयाबद्दल प्रश्न विचारले तर अगदिच 'हे' वाटु नये म्हणुन कश्याप्रकारे उत्तर द्यायचि याचा विचार आपण करतो ना. तसच काहिस आहे हे. कंलत्रि ३०-३५ वर्षांपुर्विचि गोष्ट सांगतायत. त्याकाळि लग्न ह्या प्रकारात मुलाकडच्यांचा किति वरचष्मा असायचा हे वेगळ सांगायला नको. मग एखाद्या वधुपित्याने असा सल्ला दिला तर आश्चर्य वाटयाला नको. शिवाय या उपायानेच त्या मुलिच लग्न जमल अस नाहि. फक्त आपल्याकडुन प्रयत्नात कुठल्याहि प्रकारचि कमतरता रहायला नको असा विचार त्या मागे असावा. 'मरता क्या न करता' अश्या प्रकारच्या मनःस्थितित दिलेला सल्ला वाटतो.

मला हा सल्ला अजिबात खटकला नाहि उलट ३०-३५ वर्षांपुर्वि हा विचार सुचावा ह्याच अप्रुप वाटल. मला स्वतःला अश्याच प्रकारचा अनुभव आल्यामुळे मला ह्या विचारातलि व्यवहार्यता एकदम पटलि. माझा अनुभव खालि देतेय.

१०-१२ वर्षांपुर्वि (मी १२ वित असताना), मला दाढ्दुखिचा त्रास झाला. Govt. Medical College (नागपुरातल) माझ्या शिकवणिच्या वाटेवर असल्यामुळे मी तिथे गेले. पैसे भरणे, X Ray, अजुन काय काय अश्या ५-७ वेगवेगळ्या रांगामध्ये उभे राहिल्यावर शेवटि एकदाच Doctor च दर्शन झाल. माझ्या उपचारासाठि आवश्यक असणार एक उपकरण त्यांच्याकडे नव्हत म्हणुन त्यांनि मला(च!) दुसर्याएका विभागात ते आणायला पाठवल. तिथे incharge असलेलि Doctor अगदिच पोरगेलिशि होति, पण माझ्या एकंदरित अवताराकडे पाहुन (तेल लावुन केसांचि घट्ट वेणि, सुति सलवार कुडता इत्यादि परत त्यात ३-४ तास घालवल्यानंतर आलेल desparation) मला राग द्यायला सुरुवात केलि कि असच कस काय देवु, त्यांनि तुला का पाठवल इत्यादि. ति हिंदित बोलत होति आणि माझ हिंदि काहि फारस चांगल नव्हत म्हणुन मी तिला म्हंटल, " Actually the instrument wasn't available there. Dr. XYZ said it will be better for her if I'll get it so she can check some other patient during that time." इंग्रजिच्या वापराने डाक्तरिण्बाइंच माझ्याबद्दलच मतपरिवर्तन मी त्यांच्या चेहर्यावरच्या झरझर बदलणार्या भावांतुन टिपल. त्यांनिहि मग अजिबात खळखळ न करता ते उपकरण लगेच मला दिल!

लहानपणीचा अनुभव. आईच्या डोळ्यांतील वाचलेले भाव. कलंत्रीसाहेब खरोखरच स्तुत्य.
अनेक लोक आजही केवळ आपला प्रभाव इतरांवर पडावा यासाठी इंग्रजी शब्दांचा वापर करताना आढळुन येतात.
अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात.
तुमच्या मामांना तर त्यांच्या मुलीसाठी वरसंशोधन करावयाचे होते. तेही ३०-३५ वर्षांपुर्वी. अशा वेळी वधूपित्याची मानसिक अवस्था निश्चितच अतिशय प्रवाही (मला Volatile म्हणायचेय) असते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केले ते त्यांचे दृढ मत होते असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. त्यांनी समाजात पसरत असलेल्या अयोग्य चालीकडे सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले असेच म्हणावे लागेल. मला वाटते ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वीही झाले. त्यावेळी हजर असणाय्रा एका व्यक्तीला ते आवडले नाही आणि तिच्या मुलाने आजन्म मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे व्रत स्विकारले. यासाठी तुम्ही मामांचे आभार मानावेत ही विनंती.
सावरकरांइतका प्रखर आग्रह आणि अभिमान आपल्याला पेलवणे अंमळ कठीणच दिसते. मात्र शक्य तेवढे आपल्या परीने जपायला हवे असे वाटते.
मराठीचा (सार्थ) अभिमानी भ्रमर

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 9:32 am | प्रभाकर पेठकर

अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात

अशा लोकांपेक्षा आपल्या समाजातच ही न्यूनगंडाची भावना अधिक असते. इंग्रजी भाषेचा वापर अशा लोकांसमोर फार उपयोगी पडतो. भाडणात जर तुम्ही खणखणीत शब्दात प्रवाही इंग्रजीचा वापर केला तर समोरचा अर्धा नरमतो. (कारण त्याचा न्यूनगंड).
मुंबई विमानतळावर मी वेटींग लिस्टवर सर्वात वरच्या क्रमांकावर असताना मला डावलून एका एअरलाईन्स कर्मचार्‍याच्या फॅमिलीला सीट दिली आणि मला नकार दिला तेंव्हा मी प्रचंड आरडाओरडा (अर्थात इंग्रजीत) केला. सगळ्या काउंटरवरचे काम थांबून सर्वजण माझा काय प्रॉब्लेम आहे हे पाहू लागले. स्टेशन सुपरिंटेंडन्ट धावत आला. मला शांत करून इकॉनॉमी क्लास मधून फर्स्ट क्लासला प्रमोट करून मला त्याच विमानात जागा मिळवून दिली.

मुक्तसुनीत's picture

9 May 2008 - 11:54 pm | मुक्तसुनीत

एका साध्या संभाषणामधे अनेक स्तर असू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

मुलीचे लग्न "सुस्थळी" व्हावे असे वाटणारा पिता, मग सुस्थळ म्हणजे नक्की काय , ठरविलेल्या लग्नात आधुनिकतेची प्रतिमा निर्माण करणे , एखाद्या इंग्रजी शब्दामुळे कुणी आधुनिक ठरू/दिसू शकेल काय , ठरवून दिलेले लग्न हाच मुळी मनामनांच्या संयोगापेक्षा एक ठरवून दिलेला व्यवहार असतो की काय असे अनेकानेक प्रश्न एका प्रसंगामुळे निर्माण होतात. प्रसंगलेखकाने या सार्‍या गोष्टींच्या मुळाचा , त्यांच्या एकमेकामधे गुंतलेले असण्याचा पुरता छडा लावण्याचा प्रयत्न केला नाही असे मला वाटले. आपल्या मामांबद्दल त्याना वाटणारा स्नेह मी समजू शकतो; पण त्यांना जो द्रष्टेपणा वाटतो , त्यालाच , एका मोठ्या अवकाशामधे संकुचितपणा म्हणावे लागेल का याचा विचार लेखकाने पुरेसा केलेला नाही.

कलंत्री यांच्या आईंच्या मनाला नकळत झालेली वेदना आणि केवळ डोळ्यातील भावांवरून त्यांनी वाचलेला मनीचा भाव या गोष्टी हृद्य आहेत, चटका लावणार्‍या आहेत.

कलंत्री's picture

10 May 2008 - 7:18 pm | कलंत्री

मला माझा मुद्दा आणि त्यामागचा विचार नेमका मांडता आला नाही असे वाटते.

लग्नासारख्या विषयात एक प्रचंड प्रकारची अनिश्चितीतता असतेच असते. कोणा एकाशी सामान्य असताना लग्न करावे आणि काही वर्षात त्याने प्रचंड सुबत्ता मिळवावी ( "मराठी शिकलेला नवरा नको गं बाई" यात चांगले उदाहरण दिले आहेच.) किंवा आपण सामान्यपेक्षा चांगले असताना काही वर्षानंतर आपला जोडीदार विशेषतः आपला नवरा सामान्य असावा , आपल्या मैत्रिणी याबाबतीत कितीतरी पूढे आहेत असे घडताना आपण पाहत असालच. हा मुद्दा अधोरेखीत आहेच.

दुसरा म्हणजे ३०/३५ वर्षापूर्वी मुलगा पसंत असेलच तर मुलाला मुली बघण्याचे निमंत्रण दिले जात असे. आता काय परिस्थिती आहे हे माहित नाही.

अश्या वेळेस आपली मुलगी एखादा इंग्रजी शब्द वापरत आहे आणि त्याचा प्रभाव अथवा चांगले मत बनत आहे ही कल्पनाच करणे आणि ती प्रत्यक्ष मांडणे, त्याला सर्वांची स्विकृती मिळवणे याचे मला अप्रुप वाटते. त्यासाठी इंग्रजीच्या शिडीचा वापर करणे मला त्याज्य वाटत होते आणि वाटते, असा विचार करणारा आमचा मातृकुलप्रमुख का असेना!

आता दुसरा भाग म्हणजे आपण अनेक लग्नपत्रिका क्षमा करा कार्डस् घेत असतो, लग्नामध्ये भाग घेत असतो त्यात अश्या पाट्या, शब्दात इंग्रजीचा वापर करतो अथवा ऐकत असतो. ( बुफे, रिसेप्शन, मॅरेज, हनीमुन, पार्टी, डेट इत्यादी इत्यादी) अश्या इंग्रजीचा सौम्य अथवा तीव्र निषेध करत रहावा अशी माझी अपेक्षा आहे.

बाकी काही प्रतिसादांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

भ्रमर : अश्या अनेक घटनानी मला मराठीचा पुरस्कार करण्यास शिकविले. माझ्या मते भाषा आणि आपण याचे आई आणि मुलाचे नाते आहे.

मुक्तसुनित : एखाद्या गोष्टीचे महत्व वाढणार आहे हे जाणणारा म्हणजे द्रष्टा.

बाकी सर्वांचे विशेष आभार. लग्नासारख्या ठिकाणी म्हणजे मुलीचे लग्न करण्याचा विचार करण्यापासून ते घरात एक बाळ येई पर्यंत मराठीभाषेचाच वापर करा. ही कळकळीची विनंती.

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 11:58 am | विसोबा खेचर

भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना?

हम्म! खरं आहे...!

तात्या.

ऋचा's picture

13 May 2008 - 12:10 pm | ऋचा

:$

कलंत्री's picture

13 May 2008 - 12:42 pm | कलंत्री

ऋचा,

थोडे जास्त आणि आपल्या मत, विचार आणि भावना शब्दात अचूक आणि समर्पक पणे व्यक्त करता यायला हवे.

नेमके काय पटले नाही, आपला काही अनुकुल / प्रतिकुल अनुभव आणि शेवटी आपले आयुष्य कसे समृध्द होईल असे लिखाणाची अपेक्षा आहे.

सर्वात महत्वाचे आपले एकमत कधी अशक्य असेल पण संवाद तर शक्य आहेना....

आपला,

कलंत्री

धमाल मुलगा's picture

13 May 2008 - 1:41 pm | धमाल मुलगा

कलंत्रीसाहेब,
शिर्षकात 'इंग्रजी आलेच पाहिजे' ऐवजी 'इंग्रजी आल्याचे भासवता आले पाहिजे' असं हवं होतं काहो?
आपल्याला नसलं पटत, तरीही दुर्दैवानं हे असंच घडतं आहे.

शिक्षित म्हणजे इंग्रजी आलंच पाहिजे, किंबहुना, ते आलं तरच शिक्षित, इंप्रेस करण्याचं साधन इ.इ. मुळे हे असं घडत असावा असा माझा कयास आहे.
बरेच सन्माननिय अपवाद असतीलही, पण बहुतांश ठिकाणी असं घडत हे मात्र खरं.