'पीपली लाईव्ह'बद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. चित्रपट खूप आवडल्याचं सांगणारे अनेक भेटले म्हणून अखेर तो पाहिला.
चित्रपटाचं थोडक्यात सूत्र असं सांगता येईलः शेतकर्यांच्या आत्महत्या हा गंभीर आणि करुण प्रश्न आहे, पण आपली माध्यमं, राज्यकर्ते वगैरे तो प्रश्न अतिशय उथळपणे आणि क्रूरपणे हाताळतात; आपल्या स्वार्थापुरता त्याचा वापर करून घेतात. त्यामुळे प्रश्न अधिकच चिघळतो आणि अधिकच गंभीर आणि करुण बनतो. एक विचार म्हणून हा पटण्यासारखाच आहे. त्यामुळे चित्रपटाद्वारे मांडलेल्या विचारसरणीशी माझे मतभेद नाहीत.
चित्रपटाची मांडणी उपहासात्मक आहे. यातले शेतकरी-गावकरी सालस, निरागस वगैरे नाहीत. द.मा. मिरासदार किंवा शंकर पाटलांच्या कथांमधून दिसणार्या गावकर्यांसारखे इरसाल आहेत. ते खोटं बोलतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा, स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात, मर्त्य, स्खलनशील, विकारी अशा सर्वसामान्य माणसांची सर्व लक्षणं त्यांच्यात दिसतात. अशा माणसांचं चित्रणही त्यांच्याविषयी जिव्हाळा/कणव उत्पन्न होईल अशा प्रकारे करता येतं. त्यामुळे असं दाखवण्यात काही गैर आहे असं वाटत नाही.
चित्रपटात अनेक गुणी अभिनेते आहेत. रघुवीर यादवसारख्या ओळखीच्या चेहेर्यांपासून ते हबीब तन्वीर यांच्या 'नया थिएटर'मधे घडलेल्या पण आपल्याला परिचित नसलेल्या कलाकारांपर्यंत अनेक कसलेले नट, उत्तर भारतीय गावात शोभतील असे रोचक चेहेरे चित्रपटात दिसतात. ते आपापल्या जागी शोभतात आणि अभिनयही चित्रपटाच्या शैलीला अनुसरून करतात.
तरीही चित्रपट पाहून फारच अपेक्षाभंग झाला. त्यामागची कारणं अशी सांगता येतील:
तपशिलांमध्ये रंग भरण्यात चित्रपट कमी पडतो असं वाटतं. उदा: 'लगान'मध्ये ज्याप्रमाणे विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून गाव उभा राहतो, तसं इथे होत नाही. आत्महत्या करु इच्छिणारा नत्था, त्याचा भाऊ, पत्नी, आई यांच्या व्यक्तिरेखा सुरुवातीला थोड्या दिसू लागतात तोच माध्यमं, राजकारणी यांच्या गदारोळात पटकथेला त्यांचा विसर पडतो. या गदारोळात ही माणसं हरवून जातात किंवा त्यांचं माणूसपण बेदखल होतं असं खरं तर दाखवायचं आहे. पण ते प्रेक्षकाला जाणवण्यासाठी मुळात त्यांचा या गदारोळातला वावर हवा तेवढा ठळक, करुण होत नाही. हीच बाब पत्रकार, राजकारणी वगैरेंच्या बाबतीत घडते. या व्यक्तिरेखा केवळ एकरंगी, ढोबळ अशा उभ्या राहतात.
थोड्या काळात पुष्कळ गोष्टी दाखवण्याचा हव्यास चित्रपटाच्या आशयाला मारक ठरतो. प्रसंग रंगण्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो, तेवढा दिलाच जात नाही. हे कसं करावं याचं अशाच उपहासात्मक शैलीतलं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलाल शुक्ल यांच्या 'राग दरबारी' या कादंबरीकडे निर्देश करावासा वाटतो. विविध प्रसंगांद्वारे लेखकानं यातल्या व्यक्तिरेखांना विलक्षण परिणामकारक पध्दतीनं जिवंत केलेलं आहे. तसं 'पीपली'मध्ये होत नाही.
माध्यमं टी.आर.पी. साठी वाटेल त्या थराला जातात, राजकारणी स्वार्थापोटी सर्वसामान्यांना कस्पटाप्रमाणे वागवतात, या गोष्टी तर आता शेंबडं पोरही सांगू शकतं. त्याहून वेगळं किंवा जास्त गुंतागुंतीचं यात काहीही दाखवलं जात नाही. जे दिसतं तेही अगदीच वरवरचं आणि शाळकरी आहे. त्यासाठी वापरलेले विनोदी प्रसंगही पटापट उरकून घेतलेले आहेत.
'लालबहादूर', 'इंदिरा', नेहरू' वगैरे नावांचा वापर करून केलेले विनोद चांगले आहेत. त्यात राजकारण्यांचा बेगडीपणा आणि सरकारी योजनांचा फोलपणा दिसतो. हे चित्रपटाच्या आशयाला पूरक असलेले घटक आहेत म्हणून ते विनोद अस्थानी होत नाहीत, तर परिणामकारक होतात.
अशी कल्पकता इतरत्र मात्र फारशी दिसत नाही. नत्था गावच्या पुढार्याकडे मदत मागायला जातो या प्रसंगात पुढार्यांच्या समोर ठेवलेल्या अंड्यांवर कॅमेरा ज्या प्रकारे भिरभिरतो त्यावरून आता पुढच्या प्रसंगात नत्थाचा डांबिसपणा दाखवण्यासाठी अंड्यांचा वापर केला जाणार हे उघड होतं. नंतर पुन्हा त्याच प्रसंगाचा आधार घेऊन एक गावकरी आपली आणि नत्थाची कशी जवळीक होती ते सांगतो तेव्हा तर अगदी शिळ्या कढीला उत आणल्यासारखं वाटतं.
शिवाय, जर नत्था इतपत डांबिस असेल तर तो भावाच्या 'मी आत्महत्या करतो; नको? मग तू कर'च्या जाळ्यात सहजासहजी फसतो ते तेवढंसं पटत नाही. इतका गांजलेला असतानाही ज्याची जीवनेच्छा इतकी जिवंत असते तो आत्महत्येसारख्या गोष्टीला मूक संमती देईल असं वाटत नाही.
'गां* फ* रही है', 'मा****'' वगैरे शब्द/वाक्यं वापरली की प्रेक्षक हसणार म्हणून त्यांचा फैलाव आहे. मलमूत्रासारख्या क्रियांशी संबंधित प्रसंग दाखवले की त्याला प्रेक्षकांची प्रतिक्रिया येणार म्हणून तेही आहे. शौचाचा प्रसंग येतो तोवर माध्यमांच्या नावानं पुष्कळ टी.आर.पी. खेचून झालेला असतो. त्यामुळे त्या प्रसंगात चकटफू हशे कमावण्याची शाळकरी हौसच दिसते. चित्रपटाच्या गाभ्याशी असल्या विनोदांचा संबंध लागत नाही ('लालबहादूर'चा तसा लागतो). त्यातून परिणामकारक अर्कचित्र उभं राहात नाही.
अर्कचित्र परिणामकारक वठण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. चॅप्लिन जेव्हा 'ग्रेट डिक्टेटर'मध्ये हिटलरचा बुटबैंगणपणा, वचावचा भाषण करण्याची त्याची शैली यांचा वापर करतो तेव्हा तो हिटलरचं अर्कचित्रच उभं करत असतो. पण त्यामागचे कष्ट (आणि बुध्दीही) जाणवतात. जर्मन भाषेतले ध्वनी, हिटलरची वक्तृत्वशैली यांचा अभ्यास करून त्यांतलं विनोदमूल्य चॅप्लिन हेरतो. पृथ्वीगोलाबरोबरच्या नृत्याच्या प्रसंगात हिटलरच्या आवडत्या वॅग्नरच्या संगीताचा चॅप्लिन वापर करतो. कलेविषयीच्या नाझींच्या मूर्खासारख्या मतांचा चॅप्लिन विनोदनिर्मितीसाठी वापर करतो. ज्याचं अर्कचित्र काढायचं त्याच्यातल्या 'अर्क' घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी बुध्दी लागते; त्यांचा वापर करून प्रसंग घडवण्यासाठी कल्पकता लागते. 'पीपली'मध्ये दोन्हींचा अभाव जाणवतो.
सर्व हास्यास्पद गोष्टी संपवून चित्रपट जेव्हा शेवटाकडे जातो तेव्हा फारच उरकून टाकल्यासारखा वाटतो. प्रेक्षक अंतर्मुख होण्यासाठी करुण प्रसंगांतलं कारुण्य अधिक उठावदार व्हायला हवं होतं. त्यासाठी करुण प्रसंगांची लय धीमी हवी होती. पण तसं होत नाही. दोन एस्.एम्.एस्.च्या दरम्यान जमलं तर चित्रपटाचा आस्वाद घेणार्या तरुण प्रेक्षकांना कंटाळा येईल अशी भीती त्यामागे असावी की काय अशी शंका मनाला चाटून जाते.
एकंदरीत, मूळ विचार पटण्याजोगा असूनही, शैली रोचक असूनही, दमदार अभिनय असूनही ढोबळ पटकथा आणि तिचं ढिसाळ चित्रण यांमुळे चित्रपट योग्य उंची गाठू शकत नाही. चांगल्या विषयाला हात घालण्याचा एक वाया गेलेला प्रयत्न एवढंच अखेर हाती उरतं.
प्रतिक्रिया
20 Aug 2010 - 3:11 pm | मदनबाण
इतरांच्या प्रतिक्रिया वाचावयास उत्सुक आहे... बाकी तुम्ही केलेले परिक्षण आवडले. :)
20 Aug 2010 - 3:22 pm | अनाम
परिक्षण आवडल.
पण अजुन चित्रपट पाहिला नाही त्यामुळे माझ मत मांडता येणार नाही.
20 Aug 2010 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुंदर व संयमी परिक्षण. धन्यवाद साहेब.
तसेही हिंदी पिक्चर पैसे आणि बँडविडथ खर्च करुन पाहणे फार पुर्वीच थांबवलेले आहे. तेंव्हा आता २/३ महिन्यात शिणीमा सोनीवर आला की पाहिनच.
20 Aug 2010 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते
अफलातून... आज पर्यंत वाचलेल्यापैकी एक उत्कृष्ट परिक्षण. वस्तुपाठच म्हणा. तरी बघणार हा चित्रपट.
20 Aug 2010 - 7:07 pm | धनंजय
+१
मात्र वास्तुपाठ नीट कळावा म्हणून चित्रपट बघायची इच्छा होत आहे.
(हेसुद्धा उत्तम : लेखामध्ये "चित्रपट बघू नका" असे पुष्कळदा अध्याहृत असते. असा कुठला अनाहूत सल्ला चुकूनही कोणाच्या मनात ध्वनित होऊ नये, याची काळजी श्री. चिंतातुर जंतु यांनी घेतलेली आहे. हासुद्धा वास्तुपाठच.)
20 Aug 2010 - 7:14 pm | सहज
+१
मात्र वास्तुपाठ नीट कळावा म्हणून चित्रपट बघायची इच्छा होत आहे
अगदी हेच म्हणतो. पीपली लाइव्ह बघायची अशी काही इच्छा नाही आहे पण चिंतातूर जंतू यांच्या लेखाशी संबधीत पूरक अभ्यास म्हणुन... :-)
20 Aug 2010 - 7:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी! चांगलं परिक्षण कसं असावं हे शिकण्यासाठीतरी 'पीपली लाईव्ह' बघण्याची इच्छा आहे.
20 Aug 2010 - 11:18 pm | आळश्यांचा राजा
वरील सर्वांसारखेच म्हणतो!
20 Aug 2010 - 7:18 pm | प्रदीप
असेच म्हणतो. अत्यंत माहितीपूर्ण आणि संयत परिक्षण.
20 Aug 2010 - 5:48 pm | मीनल
अगदी खरेच लिहिले आहे. तरी पण मला आवडला. इतरांना जरूर पहा असा सल्ला देईन. ( न विचारता)!
ही ही ही ही ही ही ( स्मायली कुठे गेल्या रे??????????????)
20 Aug 2010 - 5:58 pm | वेताळ
चित्रपट बघताना डोक घरात ठेवुन जावे म्हणतात.चित्रपट बघताना इतक्या गोष्टीचा जर विचार करावा लागत असेल तर तुम्ही कसे काय चित्रपट बघता हो?पैसे खर्च करुन डोकेदुखी किंवा दु:ख विकत घ्यायला कोण सांगते.चार घटका करमणुक जर होत असेल तर तो चित्रपट मस्त आहे असे सिंपल गणित आम्ही मांडतो.
बाकी डोक घरात ठेवुन जर डोक्याला ताप होत असेल तर वेगळी गोष्ट आहे.
20 Aug 2010 - 7:15 pm | संदीप चित्रे
य्ये हुई ना बात !
चला निदान समविचारी कुणीतरी भेटला हे समाधान आहे नाहीतर सध्या सगळीकडे 'पीपली लाईव्ह' म्हटल्यावर आपण पुढे फक्त जयजयकार करायचा अशी हवा आहे.
मला तरी असं वाटतं की 'आमीर खान' हे एकच नाव 'पीपली लाईव्ह'शी कुठेही संबंधित नसतं तर कदाचित 'पीपली...'बद्दल लोकांचं मत वेगळं दिसलं असतं.
अर्थात ज्याने त्याने सिनेमा बघावा आणि स्वत:पुरतं मत बनवावं :)
('शोले' ठीकठाक सिनेमा होता म्हणणारे लोकही भेटले आहेत ;) )
20 Aug 2010 - 9:43 pm | प्रियाली
चित्रपट पाहिला नाही अद्याप पण पाहताना हे परीक्षण आठवेल हे खास.
एक 'ढिसाळ' सूचना:
हे परीक्षण इतरत्र कोठे प्रकाशित करत असाल तर चॅप्लिन आणि हिटलरवरील परिच्छेद थोडा कमी करावा किंवा थोडक्यात टाकावा. तो वाचताना "पीपली" विसरून गेले आणि परिच्छेद संपल्यावर "आता पुन्हा पीपलीवर" :( असे वाटले.
20 Aug 2010 - 10:13 pm | जिज्ञासु जिज्ञासा
पिपली लाईव्ह नंतर मी वेल डन अब्बा पहिला. तो जास्ती आवडला. कारण त्यात नुसती समस्या दाखवली नाही तर त्यावर उपाय देखील सुचवला आहे. बोमन इराणी यांनी फार छान काम केले आहे. हा चित्रपट यु ट्यूब वर उपलब्ध आहे. जरूर बघा.
20 Aug 2010 - 10:23 pm | मुक्तसुनीत
परीक्षण जंतु यांच्या लौकिकाला साजेसे. अर्थात चित्रपट पाहाताना याची आठवण येईलच.
सर्व हास्यास्पद गोष्टी संपवून चित्रपट जेव्हा शेवटाकडे जातो तेव्हा फारच उरकून टाकल्यासारखा वाटतो. प्रेक्षक अंतर्मुख होण्यासाठी करुण प्रसंगांतलं कारुण्य अधिक उठावदार व्हायला हवं होतं. त्यासाठी करुण प्रसंगांची लय धीमी हवी होती. पण तसं होत नाही. दोन एस्.एम्.एस्.च्या दरम्यान जमलं तर चित्रपटाचा आस्वाद घेणार्या तरुण प्रेक्षकांना कंटाळा येईल अशी भीती त्यामागे असावी की काय अशी शंका मनाला चाटून जाते.
उपरोक्त भाष्य चित्रपटाच्या शेवटाइतकेच प्रेक्षकांच्या "अटेंशन स्पॅन" बद्दल , "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" बद्दलही आहे असे वाटले.
20 Aug 2010 - 10:27 pm | चतुरंग
काय आवडले आणि काय नाही ह्याबद्दल नेमकेपणाने सांगितले आहे आणि तरीही (किंबहुना त्यामुळेच) चित्रपट बघायची उत्सुकता टिकून राहिली आहे, ह्यातच परीक्षणाचे यश आहे!
21 Aug 2010 - 12:52 am | नंदन
--- सहमत आहे. उत्तम परीक्षण!
21 Aug 2010 - 5:25 am | सन्जोप राव
सामान्यतः अशा चित्रपटांबद्द्ल मत व्यक्त करताना लोक सावध असतात. रविवारपर्यंत थांबावे, टाईम्स किती स्टार देतो ते पहावे आणि मग काय ते बोलावे असा धोपटमार्ग असतो. 'पीला' ढोबळ, ढिसाळ आहे हे सांगण्याचे धाडस आवडले. परीक्षणही आवडले.
आता कुणीतरी 'हिंदू' भिकार आहे असे धाडसाने म्हणण्याची वाट पहात आहे. दिवाळी अंकांत अनिल अवचटांनी लिहिणे थांबवावे असे म्हणण्याचीही.
21 Aug 2010 - 5:26 am | अशक्त
चित्रपटाच्या सुरुवातीला नत्था शेणावरुन घसरुन पडतो, तेव्हाच लक्षात आल कि पुढे असेच विनोद असणार.
चित्रपट ठिक ठाक आहे.
21 Aug 2010 - 8:37 am | राजेश घासकडवी
चित्रपट न पाहाताच त्याच्या बाजूने, विरोधी, विरोध म्हणून विरोधी, तक्रारी.. अशा दिलेल्या अनेक प्रतिक्रिया वाचून चित्रपट कलेकडे अत्यंत कोत्या दृष्टीकोनातूनच (संदेश काय आहे, काय जातकुळीचा आहे, तो मुळात समजला आहे की नाही) बघण्याची पद्धत आहे का असं वाटत होतं. सुदैवाने तुमच्यासारखे, खरोखरच संदेशाचं सादरीकरण परिणामकारक झालं आहे की नाही हे डोळसपणे बघणारं व इतरांना सांगणारं कोणीतरी आहे हे पाहून बरं वाटलं. मी चित्रपट पाहिलेला नसला तरीही परीक्षण भावलं. व एकाच वेळी फारसा चांगला नसलेला चित्रपट बघावा की केवळ तुमचं परीक्षण पुन्हा अनुभवण्यासाठी तो बघावा अशा द्विधा अवस्थेत आहे.
राजेश
22 Aug 2010 - 9:42 pm | KHADADBHAU
चित्रपट बघायची उत्सुकता आहे
"पैसे खर्च करुन डोकेदुखी किंवा दु:ख विकत घ्यायला कोण सांगते.चार घटका करमणुक जर होत असेल तर तो चित्रपट मस्त आहे असे सिंपल गणित आम्ही मांडतो."
I AGREE WITH THIS .
OTHERWISE FARMERS FROM VIDARBHA ARE CLAIMING THIS AS INSENSITIVE HANDLING OF SENSITIVE ISSUE !
FINALLY OPINION IS LIKE AN A**HOLE ,EVERYBODY IS HAVING ONE !
MARATHI KASE TYPE KARAVE ? , NAVIN MEMBER AAHE !
समजले ! प्रयत् न करुन थिक लिहिल .
23 Aug 2010 - 10:11 am | मी_ओंकार
जंतूंचे लिखाण नेहमीच वाचनीय असते. हेही त्याला अपवाद नाही. परीक्षणातील नेमकेपणा आवडला. कलेच्या विश्वात काम केलेल्या व्यक्तीचे परीक्षण वाचताना जाणवणारी माध्यमाची ओळख आणि पकड दोन्ही लेखात जाणवते.
जंतू यांना विनंती की त्यांनी अशीच चित्रपट परीक्षणाची मालिका लिहावी ज्यात त्यांना उत्कॄष्ट वाटलेल्या चित्रपटांबद्दल लिहावे. त्यामुळे कोणते चित्रपट पहावेत आणि ते पाहताना त्यात काय पहावे हे कळेल. अर्थात मिसळपाववर आणि इतर आंतरजालावर चांगली चित्रपट परीक्षणे आलेली आहेत पण त्यांचे स्वरूप 'रसिकांच्या नजरेतून' असे होते.
पुन्हा एकदा लेखाबद्दल धन्यवाद.
- ओंकार,
26 Aug 2010 - 11:23 am | विसोबा खेचर
अजुन चित्रपट पाहिला नाही त्यामुळे परिक्षणाबाबत मत मांडता येणार नाही.
तरीही परिक्षणाबद्दल धन्यवाद..
तात्या.
26 Aug 2010 - 12:16 pm | स्वतन्त्र
आपल्याला काय त्यो शिनेमा आवडला नाही बा !
शेतकऱ्यांचे इषय हातालाय्चेत तर "गोष्ट डोंगराएवढी " शिनिमा झ्हाक व्हता.पिईपली लीवे मध्ये न धड इनोद होता न धड मांडणी.पांचट इनोदांचा आणि प्रसंगांचा ढीग.
अशे सिनिमे अमीर खानच्या नावाने खपवून त्ये आपलाच नाव खराब करत हायेत.
26 Aug 2010 - 3:38 pm | नीधप
अगदी हेच वाटलं मला पण फिल्म बघून.
ओढूनताणून डार्क ह्युमरचा फसलेला प्रयत्न.
26 Aug 2010 - 5:01 pm | यशोधरा
हा सिनेमा पहायचा आहे. ह्या सिनेमाबद्दल एका मराठी संस्थळावर भरपूर शाब्दीक लढाया झालेल्याही वाचल्या आहेत.
कधी पहायचा योग येतोय पाहूया.
हे परिक्षण संयत शब्दांत लिहिलेले, म्हणून अधिक आवडले.
27 Aug 2010 - 11:06 am | चिंतातुर जंतू
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार. एका मित्रानं नुकतीच 'पीपली'बद्दलची एक रोचक गोष्ट लक्षात आणून दिली. ती अशी:
पीपलीचा शेवट हा 'नो मॅन्स लँड' नावाच्या एका परदेशी चित्रपटावरून बेतलेला आहे. ज्यांनी 'पीपली' पाहिलेला नाही अशांना शेवटाबद्दल फार सांगून त्यांचं कुतुहल न मारता एवढंच सांगतो की गाडीची काच वर करून निघून जाणं, खड्ड्यात पडलेल्या भीषण सत्याला न शिवताच कोरडं माघारी जाणं असा तो संदर्भ आहे. आमीरचा 'लगान' जेव्हा ऑस्करच्या स्पर्धेत होता तेव्हा परकीय चित्रपटाचं ऑस्कर 'नो मॅन्स लँड'ला मिळालेलं होतं हेही विशेष. थोडक्यात, नक्कल ही स्तुती करण्याची एक पध्दत असते असंच म्हणावं लागेल.