अजुन एक "स्वयंपाक आणि तु-तु-मी-मी"

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in काथ्याकूट
8 Aug 2010 - 4:49 pm
गाभा: 

काल संध्याकाळी बाहेर गेलो होतो. नेहमीचे घरी लागणारे सामान आणायचे होते. आम्ही दोघं नवरा बायको आणि माझी एक मित्र मैत्रिण जोडपं असे मिळुन गेलो होतो. बाहेर पडायला जवळ जवळ ७ वाजले होते. लीस्ट प्रमाणे एकेक वस्तु ट्रॉली मध्ये टाकत टाकत सगळी खरेदी निवांत चालु होती. तेवढ्यात नवर्‍याचा फोन वाजला .आणि असे कळले कि कि त्याला एक अर्जंट कॉन्फरन्स कॉल जॉईन करावा लागणार आहे. तो म्हणाला कि मी घरी जातो आणि काम करतो..तुमच झालं कि तुम्ही या. त्याप्रमाणे तो घरी गेला. आमची खरेदी संपायला जवळ जवळ ३ तास लागले नन्तर बिलींग च्या रांगेत २०-२५ मिनिटे.आधीच विकान्त ...त्यात हा वीकेंड म्हणजे इथली गटारी होती (रमादान चालु होइल ना....बाहेर खाणे -पिणे सगळे महिनभरासाठी बंद) त्यामुळे आख्खी दुबई काल बाहेर होती..पोरं,बायका,म्हातरी-तरणी ताठी सगळी यथेच्छ हादडुन घेत होती. मॅक डी, कें.फ्रा.चि.,पिझ्झा झोपडी सग्ळं सग्ळ्ं अ़क्षरशः ओसंडुन वाहत होतं. तिथे खायला मिळे पर्यंत खुप वेळ झाला असता. त्यामुळे घरी जाउन काहीतरी बनवावे असा विचार आला. म्हणुन घरी आलो.
रात्रीचे पावणेबारा तरी झाले होते.फिरुन फिरुन पाय थकले होते.आता जाउन काय स्वयंपाक करावा या विचारात दार उघडले.दार उघडतात एक मस्त ,खमंग वास नाकात शिरला. आत आलो तर पाहिले कि डाइनिंग टेबल वर व्यवस्थित प्लेट्स्,वाट्या,पाण्याचा जार्,ग्लासेस मांडुन ठेवलंय. त्याबरोबर एका ट्रे मध्ये मीठ्,तुपाचे भांडे,लिंबाचे आणि कैरीचे लोणचे ठेवलेले आहे. दोन भांडी झाकुन ठेवलेली आहेत. पुढे होउन एकेक उघडुन पाहिले .एका मध्ये मस्त वाफा येणारी गर्रम गर्रम मुगाची खिचडी आहे.अगदी व्यवस्थित हं.. म्हणजे वर अगदी खोबरं-कोथिंबीर पेरलेलं. आणि दुसर्‍यामध्ये मस्त कढी!
आणि दार उघडल्याबरोबर जो खमंग वास नाकात शिरला ना तो पापडाचा होता. किचन मधे जाउन पाहिले तर साहेब पापड भाजत होते. म्हणाला "जा पटकन चेंज करुन या...जाम भूक लागलिये.जेवून घेऊ."
त्या क्षणाला इतकं बरं वाटलं...आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. चेंज करुन त्यानी प्रेमाने वेळ आणि जीव ओतुन बनवलेले साधेच पण अप्रतिम चवीचे जेवण खाताना जे पोट आणि मन तृप्त झालं ना त्याला तोड नाही..!
हं पण..त्याने हे केलं म्हणून आश्चर्य नाही वाटलं कारण हे काही त्याने पहिल्यांदा नव्हतं केलं. अनेक वेळा कधी त्याचा मूड आहे म्हणुन्...कधी मला विश्रांती द्यावी म्हणुन्,तर कधी मी बाहेरून थकून आले असेन म्हणून अनेकदा तो स्वयंपाक करतो.आणि हे कधीहि त्याला मी किंवा अन्य कोणी सांगितले आहे म्हणुन करतो असं नाहिए.स्वतः जाणुन करतो. तुमच्यापैकी अनेक जणांना वाटेल की मी अतिशयोक्ती करते आहे.काहिंना असेही वाटेल कि हॅ काय्....पुरुष असुन स्वयपाक! काहींना तर वाटेल कि मी फारसा बरा स्वयपाक करत नसावी आणि सोयीसाठी बिच्चारा नवरा शिकला असावा स्वयंपाक! तर त्यावर मी इतकंच म्हणेन कि तो फक्त जाण ठेवतो.. माझी,मी रोज त्याच्यासाठी प्रेमान बनवलेल्या चार घासांची..त्याच्या कायम जपलेल्या आवडीनिवडींची! आणि मुख्य म्हणजे त्याला स्वतः ला खाणं बनवायची आवडही तितकीच आहे. काही काही पदार्थ तर मी बनवायचेच नसतात्.जसे कि कढी.अप्रतिम बनवतो. माझ्या घरी कढी बनते ती त्याच्याच हातची.शुक्रवारी किंवा सुट्टी असेल त्यादिवशी चहा,तर कधी कधी नाष्ता ही बनवतो.
हे सारं करण्यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही किंवा पुरुषी अहं त्याच्या आड येत नाही. सुरुवातीला मला कधी कधी खुप अवघडल्यासारखं व्हायचं.कि काय म्हणतील कोणी पाहिलं तर नावं तर ठेवतीलच पण त्याआधी माझ्यावर शंका. कि बायको काही करते कि नाही (तुम्हालाही वाटलं असेल ना..किंवा असंही वाटलं असेल कि बायको आय टी तली आहे की काय)
मागच्या काही आठवड्यांपासुन मि.पा.वर जो काही सावळा गोंधळ चालु आहे ना या विषयावर्..त्यांच्यामुळे अक्षरशः डोकं बधिर व्हायची वेळ आली आहे. बायको आणि स्वयंपाक काय्.. नवरा बायको आणि स्वयंपाक काय्,आय टी तली बायको ..तम्क्यातली बायको आणि स्वयंपाक काय्.कट इट यार!
भोजन्,खाणं.. अन्नग्रहण ही एक इतकी तृप्त करणारे क्रिया आहे. आपला आत्मा तृप्त होउन जातो. पोटात भूक्,विचार आणि कामाच्या श्रमाने थकलेलं शरीर घेउन घरी आलं आणि साधा वरणभात जरी मिळाला तरी आत्मा तृप्त होउन जातो. आणि ते जेवण बनविण्यात कसला आला आहे कमी पणा...कसला स्त्री-पुरुष भेद्..कसला इगो?
सार्‍याचे नवरे किंवा समस्त पुरुष जात अगदी माझ्या नवर्‍यासारखी व्हावी हा भाव नाहीये हे लिहिण्याचा. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. सगळे पुरुष सारखे नसतात. पण त्या मागची त्याची जी मानसिकता आहे ना तिचा थोडाबहुत विचार जरी सार्‍यानी केला तरी खूप आहे.
बायको जॉब करणारी असो किंवा नसो. घरकाम्,मुलांना सांभाळणे,त्यांच्या ट्युशन्स्/ क्लासेस यांमागे पळताना तिचीही कसरत होतेच ना.तरीही ती आपल्या परीने झटत असते. मग कधी तरी जर या सार्‍यामुळे कधी स्वयंपाकामध्ये किंवा चवीमध्ये कमी जास्त झाले तर काय बिघडलं? तिला कधीतरी थोडेशी मदत केली तर काय मोठा लॉस होणार आहे?.
आणि जर जॉब करणारी असेल..७-८ तास घराबाहेर राहुन तुमच्या बरोबरीने,तुम्ही करता तेच काम ती करत असेल तर कधी तिला आवडतो म्हणुन्..तिचा थकवा जाणुन तिला थोडासा हलकेपणा द्यावा म्हणुन एखादे दिवशी काय हरकत आहे एखादा पदार्थ करायला? तिचाही विचार करा ना..कुठल्या कुठे शहराच्या एका टोकाला असलेल्या ऑफिसमधुन्,घरापर्यंत ट्रॅफिक मधुन गजबजाटतुन घरी येते.वाटलं तिला कि आज घेउया विश्रांतील्/जाऊया काहीतरी खायला बाहेर तर काय मोठे नुकसान होणार आहे?
इतके सारे दमून भागुन घरी येताना ती सामान घेउन येते.या विचाराने कि आज त्याला काहितरी वेगळे,नविन खायला घालावे. कोणत्यातरी पुस्तकातुन किंवा गूगल वरुन रेसिपी शोधते आणि त्याप्रमाणे करते.यात चर्चा होण्यासारखं काय आहे बरे. तिला त्याच्यासाठी काहीतरी छान करायची इच्छा का लक्षात घेत नाही कोणी? काय तर म्हणे गूगल वर का शोधतात रेसिपी? इतका वेळ ,मेहनत करुन जर तिनं विचारलं जेवताना कि कसं झालंय? तर त्यात काय चुकतं तिचं? कोणीही विचारेल्.आपण जे बनवलय ते त्याला आवडलं आहे की नाही हे नाही का जाणवसं वाट्णार? दुसरी कॉमन वादाची गोष्ट्."माझ्या आईच्या हातची किंवा ताईसारखी किंवा वहिनी सारखं नाही जमत तिला.!" हे एक वाक्य कोणाच्याही बाबतीत ऐकलं ना कि डोकं फिरतं माझं. अरे ती एक पुर्ण वेगळी व्यक्ती आहे.पाची बोटं सारखी असतिल का.तिच्या हाताला देखिल तिची अशी वेगळी चव असेल्. काही पदार्थ बनव्ण्यात तिची ही खासियत असेल्.आणि जरी नसेल तर येइल्..बनवून सवयीने येइल तिच्या पण हाताला तुम्हाला आवडेल अशी चव्.तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या आई ला पाहिलय करताना तिच्या हातचे खाल्लं आहे. तिनं तिच्या आईच्या हातच्! तिच्या लक्षात तिच्या आईने बनवलेले.शिकवलेले पदार्थ असतिल ना! व्यक्तिपरत्वे बदलतात या गोष्टी.करा ना हे डाय़जेस्ट..!
कधी तिच्या बरोबरीने हसत..मजा करत बनवून पहा एखादा पदार्थ् त्याची चव कायम जिभेवर आणि मनात रेंगाळत राहील..दोघांच्याही.मग ते साधं मॅगी जरी पोट्भर बनवलं तरी मस्त लागतं.साधं खाणं तर आहे. त्यात तु तु-मी-मी करुन काय आहेत ते क्षण वादात घालवायचे? जे क्षण आत्त आपण महत्वाची बोलण्यात किंवा काहीतरी आनंद देणारे ठरवू शकतो ते या जेवणावरच्या वादात वाया घालवाय्चे? अशा वादानंतर ,तिला दुखवून तुम्हाला अगदी सुन्दर जेवण मिळालं तर चवीच वाटेल का ते?
जेवण ,खाण्,इगो यापेक्षा खुप काही सुंदर आणि महत्वाच्या गोष्टी आहेत आयुष्यात चर्चा करण्यासाठी! याचा थोडा विचार जरी प्रत्येक पुरुषाने स्त्री ने केला आणि त्यांची मानसिकता किंचित बदलवली तर दोघांचही जेवण आणि अनुषंगाने जीवन सुखकर होइल. जेवण हे निव्वळ उदरभरण न राहता एक सहज आणि आनंददायी नित्य नियम होउन जाईल. नाही का?

प्रतिक्रिया

मस्त लिहिलंयस जाई :)
अगदी माझाच अनुभव आणि माझेच विचार :)

लवंगी's picture

8 Aug 2010 - 5:03 pm | लवंगी

अगदि मनातले विचार.

स्वाती२'s picture

8 Aug 2010 - 6:48 pm | स्वाती२

+१

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2010 - 6:20 pm | बिपिन कार्यकर्ते

क्या बात है!!! लेख आवडलाच.

- (एक्स दुबैकर)

शेम २ शेम असच बोल्तो..अगदी कंसा सकट :)

भारतीय's picture

8 Aug 2010 - 6:33 pm | भारतीय

मस्त लिहिले आहे.. विचारही पुर्णपणे पटले.. पण आता हा स्वयंपाक्/ आय टी बायको / नवर्‍याने स्वयंपाक करावा कि नाही ई ई ई..... वाचून वाचून कंटाळा आलाय.. याबाबतीत जे सुखी असतील (जसे कि तुम्ही) ते सूखी राहु देत व जे सुखी नाहीत (भापकरासारखे) ते लवकर सुखी होवोत हि सदिच्छा! पण आता हे धागे नकोत बुवा..

(आता माझ्या या प्रतिसादावर रण माजू नये ही ईच्छा)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

8 Aug 2010 - 6:53 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

माझंहि थेच झालं होत्.म्हणुन विचार केला कि सारखं सारखं तेच तु मी दळण दळण्यापेक्षा थोडं ग्यान द्यावं.कि "खाणं" याशिवाय करता येण्यासारखं खुप आहे आणि त्यामध्ये तु / मी करत फालतू वेळ घालवण्यापेक्षा कोणीहि करा..पण त्यातला आनंद घ्या. हे सांगण्याचा प्रयत्न केला होता.
पण आप्ली मंडळी यातुन काय घेतील हे सांगता येत नाहि बाबा...

(बा...........स...
लई झालं भातुकली खेळणं!)

पण मिपावरच्या या धाग्यांनी माझे चांगलेच ब्रेन वॉश झाले आहे.. फक्त 'कोरा चहा' (दूध किती टाकावं हे माहीत नसल्याने) बनवता येत असणारा मी आता प्रतिज्ञाच करणार आहे कि लग्न झाल्यावर बायकोला स्वयंपाकात शक्य ती मदत करेन!! (अजून प्रतिज्ञा करायची आहे!)

सुनील's picture

8 Aug 2010 - 7:05 pm | सुनील

छान लिहिलय!

अप्पा जोगळेकर's picture

8 Aug 2010 - 7:07 pm | अप्पा जोगळेकर

जाई ताई, लेक खरच चान्गला आहे. तुमचं म्हन्न पटलं. दादल्या लोकान्नी पन थोडा मनाचा मोटेपना दाकवला पायजेल. घरवालीला सुद्दा कदी कदी आराम नको का ? पन सुजय दादा आनि प्रविन्भपकर सायबान्ना हे कोन सान्गनार ?
पन तरीसुद्दा मी प्रविन्भपकर सायबान्चा फ्यान आहे.

भारतीय, रन माजनारच ना? तुम्मी काडी टाकलीत.

अहो पण "प्रविन्भपकर" उडाले की.. प्रोफाईल्..लेख काहीच दिसत नाही त्यांचे.

तो डु. आयडी होता मुद्दाम आग लावण्यासाठी तयार केलेला असा माझा संशय पक्का होत चाललाय.

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2010 - 7:15 pm | स्वाती दिनेश

छान लिहिले आहेस,
स्वाती

प्राजक्ताचि फुले's picture

8 Aug 2010 - 7:46 pm | प्राजक्ताचि फुले

मस्तच आहे !!!

:) असाच नवरा मिळायला हवा बुवा !!! ;)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

8 Aug 2010 - 7:57 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मिळेल गं...आणि तरीहि प्रीकॉशन म्हणुन लग्न ठरलं कि त्याला हे "आय टी बायको/आय्टी नवरा+ स्वयंपाक +नवरा बायको+तुपण स्वैपाक + मी पण स्वयपाकतो" इ.इ. तम्माम धागे आणि त्यावर्ची सगळी सुतं ((मुक्ताफळं) वाचायला दे.
आणि तु ही वाच
कारण बायकोनेही तितक्याच समर्थपणे आणि जबाबदारी + भरपूर प्रेमाने पेलुन एकमेकांच्या जिव्हेवर राज्य केलं पाहिजे.
नाहितर अजुन काही माहिन्यात तुझा नवरा धागे सोडायला चालु करायचा!
पुन्हा तेच दळण चालु...स्वयपाक एके नवरा,स्वयपाक दोनी बायको, स्वयपाक त्रिक आयटी........च्यायला.
मतितार्थ कळला का प्राजक्ताबै?

मिसळभोक्ता's picture

10 Aug 2010 - 1:46 pm | मिसळभोक्ता

कारण बायकोनेही तितक्याच समर्थपणे आणि जबाबदारी + भरपूर प्रेमाने पेलुन एकमेकांच्या जिव्हेवर राज्य केलं पाहिजे.
नाहितर अजुन काही माहिन्यात तुझा नवरा धागे सोडायला चालु करायचा!

इति लेखनसीमा ||

रेवती's picture

8 Aug 2010 - 8:21 pm | रेवती

वा!!
छान लिहिलय्स जाई!

बहुगुणी's picture

8 Aug 2010 - 9:06 pm | बहुगुणी

मस्त लेख, आणि वेळेवर आला!

'मिसळपाव' वर येणं बंद करावं की काय असं वाटावं इतका वीट आणला होता काही फालतू चर्चांनी आणि भल्या-थोरांच्या त्यांना 'अनुल्लेखाने न मारणार्‍या प्रतिक्रियांनीही'. तो सगळा गाळ निचरून नेहेमीसारखं चांगलं वाचायला मिळेल ही आशा आहे.

जाई: तुमच्या पतिराजांना आम्हा सर्वांतर्फे कौतूक कळवा!
(आणि त्यांची 'कढी'ची रेसिपी येउ द्यात फोटोसकट.)

ईन्टरफेल's picture

8 Aug 2010 - 9:50 pm | ईन्टरफेल

नवरा बायकोच्या भांडनात तीसर्‍याची गरज नसते !

शिल्पा ब's picture

8 Aug 2010 - 10:10 pm | शिल्पा ब

छान लिहिलंय..तरीही लोक घरी दारी काय वाटेल तो दंगा करणाच... त्यांनापण आयुष्य शांततेने घालविण्यासाठी शुभेच्छा.

चतुरंग's picture

8 Aug 2010 - 10:15 pm | चतुरंग

आवडला लेख!

(कधीकधी मुगाची खिचडी बनवणारा)चतुरंग

हुप्प्या's picture

9 Aug 2010 - 12:16 am | हुप्प्या

हृदयस्पर्शी लेख.

सोम्यागोम्या's picture

9 Aug 2010 - 10:15 am | सोम्यागोम्या

+१

पारुबाई's picture

9 Aug 2010 - 2:58 am | पारुबाई

लिहिले आहे.

लेखा मधील किती तरी वाक्ये 'उल्लेखनिय' अहेत्.जसे की
कधी तिच्या बरोबरीने हसत..मजा करत बनवून पहा एखादा पदार्थ् त्याची चव कायम जिभेवर आणि मनात रेंगाळत राहील

जेवण ,खाण्,इगो यापेक्षा खुप काही सुंदर आणि महत्वाच्या गोष्टी आहेत आयुष्यात चर्चा करण्यासाठी

लाख मोलाचे बोललात तुम्ही.

जाता जाता सहज सान्गायला हरकत नाही की माझा पण नवरा अशीच जाण ठेवतो आणि मला बरेचदा स्वयंपाक घरात मदत करतो.

sandeepn's picture

9 Aug 2010 - 11:27 am | sandeepn

लै भारी लिहले आहे. जाम आवडला आपल्याला.

अरुंधती's picture

9 Aug 2010 - 12:23 pm | अरुंधती

वाचायला खरंच मजा आली! असा विचार करणारे स्त्री-पुरुष खरोखरी आपल्या आयुष्यात सुखी होत असणार हे नक्की! :)

कवितानागेश's picture

9 Aug 2010 - 1:17 pm | कवितानागेश

मी अगदी हीच गोष्ट माझ्या आईकडून आजी-आजोबांबद्दल ऐकली होती.
....१९५०-६० मधली कधितरी... त्यावेळेस स्त्रीमुक्ती वगरै भानगडी नव्हत्या..
आजी घरातले सगळे, ७ मुलांचे, आल्यागेल्याचे वगरै बघायची...
तिला प्रचंड उरक होता.
पण एकदा कधितरी सातही मुलाना घेउन बाजारात गेली होती... यायला उशीर झाला.....
घर गावाबाहेर.
आजोबांनी अख्खे अख्खे कांदे घालून खिचडी करुन ठेवली.
ती इतकी चविष्ट होती कि स्वतः आजी- अजोबा झालेले माझे मामा-मावशी अजूनही आठवण काढतात.
...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

9 Aug 2010 - 2:15 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

१९५० /६० मध्ये झालेल्या अशा गोष्टी ऐकायला मिळणं खरोखर आश्चर्य आहे..
नाहीतर आपले हे........ abcdefghijklmnopqrstuvwx :)

माझा पण नवरा असेच मला उशीर झाला की मी यायच्या आधी स्वयंपाक करून ठेवतो कधी कधी, अगदी घडीच्या पोळ्यांसकट!

त्याने असे सगळे तयार ठेवलेय हे बघूनच इतके बरे वाटते ना!!!

अगदी खरे सांगायचे तर्..लग्न झाल्या झाल्या माझ्या पोळ्यांपेक्षा त्याच्या पोळ्या कितीतरी सुंदर आणि मऊसूत असायच्या. आता दिड-दोन वर्ष जवळ जवळ दररोज पोळ्या करून मी गेलेय त्या बाबतीत त्याच्या पुढे..पण पोळ्या सुद्धा इतक्या छान येणारा निदान माझ्या माहितीतला तो एकमेव मुलगा आहे!!!

अगदी मनतले विचार मांडले आहेत.

मी कोल्हपुरी........करशीला नाद तर होशीला बाद's picture

18 Aug 2010 - 7:13 pm | मी कोल्हपुरी......

मस्त लिहिलय जाइ...........

मी कोल्हपुरी........करशीला नाद तर होशीला बाद's picture

18 Aug 2010 - 7:13 pm | मी कोल्हपुरी......

मस्त लिहिलय जाइ...........