लागणारे साहित्य:
जवळा एक किंवा दोन वाटे,
बेसन १ ते दिड वाटी
१ कांदा बारीक चिरुन
आल लसुण, पेस्ट
२-३ मिरच्या बारीक कापुन किंवा २ चमचे मसाला
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल
पाककृती:
जवळा निवडून धुवुन घ्यावा. निवडायचा म्हणजे कधी कधी ह्यात दुसरे बारीक मासे, छोट्या चिंबोर्या असु शकतात ते काढायचे.
तेल वगळून वरील सगळे जिन्नस एकत्र करावे. पाणि घालु नये. मग चपट्या वड्या करुन तव्यावर शॅलो फ्राय करायच्या.
ह्या तयार वड्या :
अधिक टिपा:
ह्यात तुम्ही आवडीनुसार गरम मसाला घालू शकता.
लसूण कापुन घातल तर अजुन चांगल्या लागतात.
प्रतिक्रिया
30 Jul 2010 - 3:23 pm | खादाड
मस्त करुन बघीन वीकांताला!
एक शंका : पण गोड्या पाण्याच्या झींग्यानी काही फरक पडेल का ?
30 Jul 2010 - 3:40 pm | जागु
खादाड, हे मोठे झिंगे नाही झिंग्यांची छोटी बाळे म्हणजे जवळा.
30 Jul 2010 - 3:48 pm | गणपा
वाह!!!!!!
गरमागरम चहा बरोबर संध्याकळी नाश्त्याला हे मिळाल तर काय बहार येईल :)
30 Jul 2010 - 4:10 pm | जागु
*पहिला कोलीम किंवा रेफा ह्यात अगदी बारिक बारिक नुकतीच जन्मलेली पिल्ले वाटा पाहिल्यार कोलंबीचा आकारही ह्या पिल्लांना दिसत नाही. हा सुका करतात कांद्यावर भाकरीबरोबर एकदम टेस्टी लागतो.
ह्यातील सुका प्रकार म्हणजे कोलिमाच्या वड्या. ह्याच्या पापडाच्या आकाराच्या वड्या करुन सुकवतात ह्या वड्या भाजुन भाकरीबरोबर खातात.
* नंतर जवळा म्हणजे जरा कोलंबीचा आकार दिसायला लागलेली कोलंबीची पिल्ले. साधना म्हणते त्या प्रमाणे ह्यात कधी कधी प्लास्टीक येते आढळून ते काधून टाकायचे.
ह्याचा सुकवलेला प्रकार म्हणजे सुका जवला हा बर्याच जणांना माहीत असेल.
* नंतर येते करंदी किंवा अंबाड थोडी गुटगुटीत बाळ झालेली कोलंबी.
हिच सुकवल्यावर सुकी करंदी किंवा सुकी आंबाड होते.
*नंतर येते कोलंबी ही तर सगळ्यांना माहीत आहे.
हिचा सुकवलेला प्रकार म्हणजे कोलंबीचे सुके सोडे हे खुप महाग असतात.
* ह्यानंतर करपाली चांगल्या जाड्या जुड्या फुगलेल्या काळ्या कोलंब्या
हे सुकवले की कोलंबीचे मोठे सोडे तयार होतात.
31 Jul 2010 - 12:57 am | स्वाती२
व्वा! काय छान महिती दिलीत जागूताई. इतकी वर्षे खाऊनही रेफा म्हणजे पिल्लू कोलंबी हे मला माहितच नव्हते.
30 Jul 2010 - 6:17 pm | चिंतातुर जंतू
कित्येक वर्षांत जवळा खाल्लेला नाही. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
30 Jul 2010 - 7:02 pm | प्रियाली
जागुताई तुम्हाला पाप लागणार.
आई इथे येताना म्हणत होती की घरात पांढरा शुभ्र जवळा आहे. नीट पॅक करून आणते. मी नको सांगितले. :-( किती वर्षे झाली, जवळा खाल्ला नाही.
असो. पुढली फर्माईश : सोडे.
30 Jul 2010 - 11:17 pm | जागु
पाप का प्रियाली ?
30 Jul 2010 - 11:19 pm | प्रियाली
असे पदार्थ दाखवून तुम्ही माझे तळतळाट घेताय. ;)
मस्करी करते आहे. खरे मानू नका. जवळा म्हणजे जीव का प्राण पण खाणे झालेले नाही इतक्यात.
30 Jul 2010 - 11:25 pm | जागु
आहो माहीत आहे मस्करी ते पण मला त्यात दोन अर्थ सापडले एक म्हणजे मी वरती डिटेल्स दिले आहेत त्यात बाळे वगैरे म्हटले आहे त्या अर्थाने एक आणि दुसरा आत्ता तुम्ही सांगितलात तो अर्थ. आता समजले.
पण मी तुमचा अजुन तळतळाट करणार आहे. अश्या रेसिपिज टाकुन.
31 Jul 2010 - 12:07 am | आशिष सुर्वे
व्वा!!!!!!!!!!!!!!
गावी आजी जवळा-भाकरी करून द्यायची.. अधाशासारखा दोन-अडीच भाकर्या न्ह्यायरीलाच हाणायचो!!
सोबत कच्चा कांदा!!
जागुताई, तुमच्या प्रत्येक पाकॄबरोबर अगदी हाताला धरून आम्हाला गावात नेताय हो!!
धन्यवाद ताई..
31 Jul 2010 - 3:08 am | धनंजय
तळतळाट.
मात्र या वडा/भजी-सदृश वड्या कोलंबी चिरूनही/कुस्करून सुद्धा करता येतील असे (उगाचच) समाधान मानून घेतो.
31 Jul 2010 - 10:47 am | दिपाली पाटिल
मस्त आहे पाकृ... इकडे जवळा मिळणार नाही बहुधा पण कोलबीचे वडे करून पाहीन...
31 Jul 2010 - 6:31 pm | चित्रा
तोंडाला पाणी सुटले. (बर्याच दिवसांत स्वैपाकच केला नाही आहे, आयटीतील नसून सुद्धा! :) )
31 Jul 2010 - 9:46 pm | जागु
धनंजय, दिपाली कोलंबीजी भजी करता येते. काही दिवसांत रेसिपी देईन.
आशिष, चित्रा, चिंतातुर, स्वाती२ धन्यवाद.