असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३

हैयो हैयैयो's picture
हैयो हैयैयो in काथ्याकूट
17 Jun 2010 - 11:29 am
गाभा: 

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३

वाचकमित्रहो,

वणक्कम!! असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १ आणि भाग २ ह्या स्फुटांस मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ आग्रहवजा विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे तिसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे!

ह्यापूर्वीच्या माझ्या स्फुटांत मी श्री. वैरमुत्तु ह्यांच्या एका कवितेविषयी लिहिले आहे. सदरील स्फुटांतदेखील त्यांच्याच दुसया एका कवितेविषयी लिहित असल्याने मूळ लेखनापूर्वी त्यांची एक औपचारिक ओळख करून देतो :- श्री. वैरमुत्तु हे तमिळभाषेमध्ये ’कविराज’ नामाभिधानाने मान्यताप्राप्त आहेत. अनेकविध पुरस्कार त्यांस प्राप्त आहेत. तमिळभाषेवर जिवापलिकडे प्रेम करणाया तमिळ जनतेच्या अभिमानांपैकी एक असे स्थान त्यांस प्राप्त आहे. मराठीभाषक वाचकांसाठी थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, श्री. वैरमुत्तु हे "तमिळनाडुचे लाडके व्यक्तिमत्त्व" होत. असो.

வைரமுத்து

ह्यापूर्वीच्या भाग २ मध्ये मी श्री. वैरमुत्तुंच्या चिन्न चिन्न आसै ह्या कवितेबद्दल लिहिले होते. त्या कवितेचे रसग्रहण मराठीभाषकांस सुलभ व्हावे ह्याकरिता तमिळभाषेतील "जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते" हा नियमही उलगडून सांगितला होता. आता ह्या स्फुटांतील वैशिष्ट्यपूर्ण कवितेकडे...

---

தமிழெழுத்தில் देवनागरीमध्ये लिप्यंतरीत मराठीभाषेमध्ये शब्दार्थ
யாக்கை திரி
காதல் சுடர் याक्कै तिरि
कादल् सुडर् देह वात
प्रेम ज्योत
ஜீவன் நதி
காதல் கடல் जीवऩ् नदि
कादल् कडल् जीवन नदी
प्रेम समुद्र
பிறவி பிழை
காதல் திருத்தம் पिऱवि पिऴै
कादल् तिरुत्तम् जन्म चूक
प्रेम शुद्धीपत्र
இருதயம் கல்
காதல் சிற்பம் इरुदयम् कल्
कादल् सिऱ्पम् हृदय दगड
प्रेम शिल्प
சென்மம் விதை
காதல் பழம் सॆऩ्मम् विदै
कादल् पऴम् जन्म बीज
प्रेम फळ
உலகம் துவைதம்
காதல் அத்வைதம் उलहम् तुवैदम्
कादल् अत्वैदम् विश्व द्वैत
प्रेम अद्वैत
சருவம் சூன்யம்
காதல் பிண்டம்सरुवम् सूऩ्यम्
कादल् पिण्डम्सर्व शून्य
प्रेम पिण्ड
மானுட மாயம்
காதல் அமரம் माऩुड मायम्
कादल् अमरम् मनुष्यजात माया
प्रेम अमर

---

व्याकरणशास्त्रीयदृष्ट्या ह्या कवितेत एकही वाक्य नाही. केवळ एकासमोर एक मांडलेले शब्द आहेत. प्रत्येक शब्द हा त्याच्या पुढल्यामागल्या शब्दांत असा काही गुंफला गेला आहे की तो संपल्यानंतरदेखील कवितेमध्ये त्याचा अर्थ संपत नाही; उर्वरीतच राहतो. ह्याकारणे, रसग्रहणात नुसता एकच शब्दार्थ लक्षात घेवून चालत नाही, तर त्या शब्दाचे मागीलपुढील शब्दांच्या अर्थाशी नाते जुळवावे लागते. हे झाले ढोबळ अर्थासाठी - तमिळभाषेत एका शब्दाचे अनेक सूक्ष्मार्थ असतात. ते सारे लक्षात घेवून जुळवाजुळवी करून कविता समजावून घेणे म्हणजे एक आनंददायी कसरतच असते. असो! वाचकांस लक्षात येईल, वरील कवितेत कमीत कमी शब्दांत ’प्रेम’ ह्या संकल्पनेची जास्तीत जास्त महती वर्णन करण्याची किमया श्री. वैरमुत्तु ह्यांनी साधली आहे. असे करतांना केवळ एकासमोर एक नामे उपयोजिली आहेत. [नाम:- प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांना ’नाम’ असे म्हणतात.]

अशा प्रकारच्या कवितांचा सरळसरळ अनुवाद न करता त्यांचा अर्थ (interpretation) करावा लागतो. हे विधान तमिळमधून मराठीमध्ये सांगण्यासाठी म्हणून नव्हे, तर तमिळमध्येदेखील अशी कविता समजावून घेण्याकरिता तिचा अर्थ करावा लागतो. हा अर्थ बहुतांशी अर्थकर्त्यावर अवलंबून असल्याने तो नानाविध प्रकारे होऊ शकतो. जितके अर्थकर्ते, तितके वेगळे अर्थ. आणि तरीही सारे अर्थ बरोबरच!

उदा:- एखादा तत्त्वचिंतक वरील कवितेतील पहिल्या ओळीचा अर्थ ’देह म्हणजे जगतात प्रकाश पसरविणाया दिव्याची वात होय.. प्रेम म्हणजे त्या दिव्याची ज्योत होय’ असा करू शकेल, तर त्याच ओळीचा अर्थ एखादा निराशाग्रस्त मनुष्य ’देह हा दिव्याच्या वातीप्रमाणे असतो.. प्रेम हे त्यास ज्योतीप्रमाणे जाळत संपविते..’ असाही करू शकेल.. असे नानाविध प्रकारे अर्थ केले जावू शकतात. त्यातील अमुक अर्थच बरोबर - तमुक चूक असे छातीठोकपणे म्हणतां येणार नाही; कारण कोणास कोणता अर्थ लागू करवून घ्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. गूढकाव्य जे म्हणतांत ते हेच काय?!

व्याकरणदृष्ट्या ही चमत्कृती भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उपयोजनामुळे झालेली आहे. एकासमोर एक मांडलेली शुद्ध नामे सोडता ह्या कवितेत व्याकरणदृष्ट्या इतर काहीही नाही, आणि तरीही केवढा अफाट अर्थ ही कविता सामावून जाते!

---

तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?

---

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

17 Jun 2010 - 12:01 pm | अरुंधती

सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! :-)
मराठीत असा काव्यप्रकार आहे/ नाही ह्याबद्दल माहिती नाही.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

सहज's picture

17 Jun 2010 - 6:20 pm | सहज

हेच म्हणतो.

कानडाऊ योगेशु's picture

17 Jun 2010 - 12:21 pm | कानडाऊ योगेशु

असाच काहीस प्रकार इथे पाहायला मिळेल.

तमिळमध्ये असा काव्यप्रकार सर्रास पाहायला मिळतो का? तसे नसल्यास वैरुमुत्तुंची कविता हा एक प्रयोग असावा.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

हैयो हैयैयो's picture

17 Jun 2010 - 10:21 pm | हैयो हैयैयो

सररास.

पुरातन तमिऴभाषेमध्ये असा काव्यप्रकार सररास पहावयास मिळतो. आधुनिक स्वरूपात ह्यास पुनर्प्रसिद्धी मिळवून देण्याचे श्रेय लेखात ओळख करून दिलेल्या श्री. वैरमुत्तु ह्यांस जाते. आपण दिलेल्या दुव्यावरील कविता थोडी निराळी असली तरी सुंदर आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

हैयो हैयैयो!

नील_गंधार's picture

17 Jun 2010 - 12:31 pm | नील_गंधार

प्रस्तुत लेखकाने तमिळ कविची व त्यांच्या कवितांची ओळख करून देणे हा एक चांगला उपक्रम होउ शकतो.
परंतु त्याची तुलना मराठी भाषेच्या सामर्थ्याविषयी करण्याचे प्रयोजन समजले नाही.असा प्रकार मराठीत असला काय अन नसला काय त्याने असे काय मोठे बिघडणार आहे?
अन मुळात लेखकाला असले बादरायण प्रश्न का पडतात?

अवांतर :
कविता व तिचे रसग्रहण छान.

नील.

कानडाऊ योगेशु's picture

17 Jun 2010 - 12:49 pm | कानडाऊ योगेशु

>>असा प्रकार मराठीत असला काय अन नसला काय त्याने असे काय मोठे बिघडणार आहे?

लेखक तमिळ-मराठी असा द्विभाषिक असल्याने त्याला पडलेला प्रश्न नक्कीच रास्त आहे.
सावरकरांनी इंग्रजी सॉनेट (सुनीत) हा काव्यप्रकार मराठीत आणला.
माधव जुलियनांनी उर्दू गझल मराठीत आणली (व नंतर सुरेश भटांनी तिला मराठीत यशस्वीरित्या रूळवली.)
शांता शेळक्यांनी जपानी हायकु मराठीत आणले.
शेवटी फायदा झाला तो मराठी भाषेलाच आणि मराठी काव्यरसिकांनाच!

बाकी तुमच्या इतर मतांशी सहमत!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

सुनील's picture

17 Jun 2010 - 6:03 pm | सुनील

सावरकरांनी इंग्रजी सॉनेट (सुनीत) हा काव्यप्रकार मराठीत आणला

हे खरे नाही. गझलेप्रमाणेच सुनीत हा काव्यप्रकारदेखिल माधव ज्युलियन यांनीच मराठीत प्रथम आणला.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गणपा's picture

17 Jun 2010 - 7:39 pm | गणपा

योगेशशी सहमत.

jaypal's picture

17 Jun 2010 - 8:07 pm | jaypal

भाग३ उशिराने का होईना पण आठवणिने सादर केलात त्या बद्दल धन्यवाद.
पहिल्या दोन भागा एवढाच हा देखिल आवडाला. =D> =D> =D>
निलजी या लेखाच्या शिर्षका मुळे आपला गैर समज होत असावा. लेखाकाने कुत्सितपणे हा प्रश्न विचारला नसुन तो उत्सुकते पोटी विचारला आहे अस मला वाटत. मराठी मधे असा काव्य प्रकार असल्यास तो इथेही येउ द्या आणि इतरांनाही त्याचा आनंद घेउद्या असच म्हणायच असेल त्यांना.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

हैयो हैयैयो's picture

17 Jun 2010 - 10:26 pm | हैयो हैयैयो

श्री. नील_गंधार,

नमस्कार.

मराठी-तमिऴ अशी भाषेच्या सामर्थ्याची तुलना करणे हा ह्या लेखमालिकेचा उद्देश खचितच नाही, ह्याची मी स्वतःही खात्री देतो. दोन्ही भाषांतील काव्यप्रकारांचा निखळ तथा पूर्वग्रहशून्य मनाने आनंद घेणारा मी एक भाषाभ्यासक आहे, तो आनंद इतरांत वाटण्याचा एक प्रयत्न करतो आहे. गोड मानून घ्यावा!

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

हैयो हैयैयो!

नील_गंधार's picture

18 Jun 2010 - 10:04 am | नील_गंधार

श्री.हैयो हैयैयो,
प्रथमदर्शनी ,शीर्षकावरून माझा असा गैरसमज झाला होता. आपल्या स्पष्टीकरणानंतर तो नाहिसा झाला.त्याबद्दल आपले आभार.
उपक्रम उत्तमच आहे.

नील.

शिल्पा ब's picture

17 Jun 2010 - 12:37 pm | शिल्पा ब

काही वाचायच्या आधीच तो फोटो बघितला आणि भ्याव वाटून धागा बंद केला...त्यामुळे काहीच सांगता येणार नाही..मग जरा धीर गोळा करून प्रतिक्रिया द्यायला (आधी डोळे बंद करून धागा खाली ओढून) लिहिले...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

तिमा's picture

17 Jun 2010 - 6:29 pm | तिमा

आवं, दिस्तं तसं नस्तं!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शशिकांत ओक's picture

17 Jun 2010 - 4:32 pm | शशिकांत ओक

श्रवण आनंद घ्यायला आवडेल.
मित्र हो,
हैयोंनी एका अत्यंत प्रतिभावान तमिळ कवीराजांची त्यांच्या काव्यातील बारकाव्यातून ओळख करून दिल्यामुळे त्यांचे धन्यवाद.
एका नव्या तऱ्हेच्या काव्याच्या रसग्रहणाचा आनंद करून दिला आहे. तो तमिळभाषेमधे आहे. मराठीत आहे का नाही हा भाग गौण. पण वैषम्य नाही. प्रत्येक भाषेचे आपले वैशिष्ठ्य असते. काव्य रचनेला आनंददाय़ी प्रत्यय आणण्याकरिता व्याकरण वा अन्य बंधने तमिळ भाषा घालत नाही हे फार प्रकर्षाने या ठिकणी व आधीच्या रसग्रहणातून जाणवते.
ही कविता संगीतबद्धकरून प्रसिद्ध केली असेल तर श्रवण आनंद घ्यायला आवडेल.

शशिकांत

हैयो हैयैयो's picture

18 Jun 2010 - 9:45 am | हैयो हैयैयो

श्रवणानंदासाठी

ही कविता संगीतबद्धकरून प्रसिद्ध केली असेल तर श्रवण आनंद घ्यायला आवडेल.

ही कविता 'आय्द एळुत्तु' नामक एका तमिळ चित्रपटासाठी संगीतबद्ध केली गेली आहे. मात्र चित्रपटात उपयोग करण्यासाठी काव्यामध्ये जे 'आवश्यक बदल' करावे लागतात, ते केले गेले. त्यामध्ये (संपूर्ण वाक्यांची) भरही घातली गेली.

யாக்கை திரி
காதல் சுடர்
அன்பே
ஜீவன் நதி
காதல் கடல்
நெஞ்சே
பிறவி பிழை
காதல் திருத்தம்
நெஞ்சே
இருதயம் கல்
காதல் சிற்பம்
அன்பே

(யாக்கை திரி)

தொடுவோம்
தொடர்வோம்
படர்வோம்
மறவோம்
துறவோம்

(தொடுவோம்)

ஜென்மம் விதை
காதல் பழம்
லோகம் துவைதம்
காதல் அத்வைதம்
சருவம் சூனியம்
காதல் பிண்டம்
மானுட மாயம்
காதம் அமரம்

உலகத்தின் காதல் எல்லாம்
ஒன்றே! ஒன்றே!!
அது உள்ளங்கள் மாறி மாறி பயணம் போகும்!

(யாக்கை திரி)
(தொடுவோம்)

-

हैयो हैयैयो!

मृगनयनी's picture

19 Jun 2010 - 10:36 am | मृगनयनी

हैय्या'जी!.. तुमचा व्यासंग खरोखर दांडगा आहे!

मुळात सर्व भारतीय भाषांमध्ये "तमीळ" भाषा सर्वांत कठीण वाटते!
आणि आपण तिच्यावर "वर्किन्ग" करत आहात!

ग्रेट्ट! .. बेस्ट ऑफ लक! :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jun 2010 - 6:15 pm | बिपिन कार्यकर्ते

सर्वप्रथम, तुम्ही या उपक्रमातील पुढचा लेख बर्‍याच काळाने का होईना पण टाकला याबद्दल कौतुक आणि आभार. नवनवीन माहिती मिळते आहे. असेच अजून येऊ द्या. पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ नाही शकणार. त्यासाठी मुक्तसुनीत, धनंजय वगैरेंची प्रतिक्षा करतो आहे. :)

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

17 Jun 2010 - 7:43 pm | घाटावरचे भट

सहमत.

या प्रांतातील डॉन लोकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहातो.

अश्या पध्दतीची एक कविता मी मराठीत पुर्वी वाचली होती. परंतु तिचा उगम काही सापडला नाही.
कविता खुपच छान आहे.

वेताळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2010 - 8:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठीत अशा रचनेसाठी एखादे वृत्त असेल असे, मला वाटत नाही.
आणि सलग अशाच रचना असलेला काव्यसंग्रह, जे काव्यसंग्रह चाळले आहेत त्यात पाहण्यात नाही.

मात्र असा प्रकार मराठी कवींनी हाताळलाच नसेल असे म्हणनेही धाडसाचेच आहे.
कारण मराठी कवितेत अनुकरण काही कमी नाही. तशी कविता शोधावी लागेल इतकेच.

तमिळनाडुचे लाडक्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या रचनेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु........!

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 Jun 2010 - 8:31 pm | अक्षय पुर्णपात्रे

तमिळनाडुचे लाडक्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या रचनेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु........!

+१

प्रभो's picture

17 Jun 2010 - 9:24 pm | प्रभो

सहमत!

सुंदर काव्य - अनेक उत्प्रेक्षांची माळा. कवीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

अशी कविता मराठीत असण्यास काही हरकत नाही.
(कवितेत जे दिसते ते वृत्त किंवा शब्दालंकार नव्हे, अर्थालंकार आहे.)

मराठीत किंवा संस्कृतात असे काव्य आठवल्यास आपण सर्वजण बघूया. अल्पाक्षरी ओळी, विशेषतः मराठी चित्रपटगीते मनात आणली पाहिजे. भक्तिगीते शोधायला पाहिजे - दुसरी ओळ विठ्ठलाबद्दल असू शकते - "जीवन सागर, विठ्ठल नौका"... वगैरे. बहिणाबाईंची अशी कुठली कविता असू शकेल.

(व्याकरणाबाबत टीप : मराठी, संस्कृत, तमिऴ वगैरे भाषांमध्ये "आहे, अस्ति, अदे" हे शब्द गाळता येतात, अध्याहृत असतात. तमिऴ व्याकरणाचे पुस्तक तपासून हे मी म्हणतो आहे.
मराठी : "हे माझे घर", तमिऴ : "अदु एऩ् वीडु".
मराठी : "मन वढाय" (याला आपण "सुटे शब्द" म्हणणार नाही. "मन वढाय आहे" असा संपूर्ण अर्थ मनात येतो. त्याच प्रमाणे : ஜீவன் நதி हे पूर्ण वाक्य आहे.
दिलेल्या कवितेत सुटे शब्द नसून वाक्ये आहेत, असे माझे मत आहे.)

हैयो हैयैयो's picture

17 Jun 2010 - 10:12 pm | हैयो हैयैयो

ஜீவன் நதி.

श्री. धनंजय, नमस्कार!

अध्याहृतांबाबतची आपली अभ्यासपूर्ण टीप वाचून आनंद होतो. 'मन वढाय' हे निव्वळ सुटे शब्द नाहीत, त्यास संपूर्ण वाक्य म्हणता येते हे बरोबरच आहे. मात्र तमिऴभाषेत 'ஜீவன் நதி' हे समोरासमोरील सुटे शब्द होत - ते पूर्ण वाक्य नव्हे. त्या शब्दांतून अर्थबोध होतच नाही असे नव्हे; तरीही व्याकरणदृष्ट्या 'ஜீவன் ஓர் நதி' असे म्हणणे सयुक्तिक होय. ह्यातील अंतर सांगण्यासाठी आंग्लभाषेचा उपयोग करतो.

जीवन नदी आहे = Life is river
ஜீவன் ஓர் நதி = Life(,) a river.

आंग्लभाषेतील a/an/the प्रमाणे तमिऴभाषेची स्वत:ची articles आहेत, ती कशी वापरायची त्याचे नियम आहेत. त्यांचा उपयोग वाक्याच्या पूर्णत्त्वासाठी करणे आवश्यक असते. दोन नामांने वाक्य सिद्ध करावयाचे असल्यास योग्य त्या ठिकाणी योग्य ते article असले पाहिजे असा नियम आहे.

श्री. वैरमुत्तुंचे वरील काव्य ह्या सार्‍या नियमांच्या पलिकडे आहे, त्यामुळेच तर ते वेधक आणि निराळे ठरते.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

हैयो हैयैयो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2010 - 10:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>कवितेत जे दिसते ते वृत्त किंवा शब्दालंकार नव्हे, अर्थालंकार आहे.

मान्य...!

रचनेच्या दृष्टीने अक्षरांचे, यमकाचे बंधन पाळणारी रचना आहे का, असे शोधत असल्यामुळे वृत्त म्हणत होतो. बाकी ती दोन-तीन अक्षरांची स्वतंत्र वाक्य आहेत. आणि वरील रचनेचा अर्थाच्या दृष्टीने संबंध 'देह म्हणजे वात आणि प्रेम म्हणजे ज्योत' असाच जोडायचा असेल तर उत्प्रेक्षा या अलंकाराच्या जवळ जाणारी रचना आहे, याच्याशीही सहमत.

अशी कविता मराठीत असेल फक्त शोधावे लागेल.

-दिलीप बिरुटे

प्रमोद देव's picture

17 Jun 2010 - 9:19 pm | प्रमोद देव

मात्र..अगदी असंच मराठी गीत/कविता नाही आठवत... ह्याक्षणी तरी.
हे गाणं ध्वनीमुद्रिकेच्या रुपात असल्यास ऐकायला नक्कीच आवडेल.

..अवांतर:श्री. वैरमुत्तु दिसायला वीरप्पनचे मोठे/धाकटे भाऊ शोभतील....

नितिन थत्ते's picture

17 Jun 2010 - 9:27 pm | नितिन थत्ते

>>अवांतर:श्री. वैरमुत्तु दिसायला वीरप्पनचे मोठे/धाकटे भाऊ शोभतील....

मला ते बापूंचे भाऊ वाटले.

नितिन थत्ते

प्रमोद देव's picture

17 Jun 2010 - 9:32 pm | प्रमोद देव

वीरप्पनचे भाऊ शोभतील. ;)
अ=ब
ब=क
म्हणून क=अ

अडगळ's picture

17 Jun 2010 - 9:19 pm | अडगळ

यात तर प्रत्येक ओळीत रुढार्थाने अर्थपूर्ण असा एकच शब्द आहे

माणसं बिणसं ,
जगतात बिगतात,
.
.
.
.
.
देव बिव
असतो बिसतो

आभाळात बिभाळात.

पाषाणभेद's picture

17 Jun 2010 - 10:59 pm | पाषाणभेद

प्रकार तर छानच आहे. असले कवितांमधले प्रयोग समजून घेण्यासाठी अन त्यातला भावार्थ समजण्यासाठी वाचकाचे मनही कविचेच असावे लागते यात शंका नाही.

देह वात
प्रेम ज्योत
असे नुसते गद्यात वाचता येते. बरे नुसते वाचून अर्थबोध होत नाही. आपल्याला त्यापुढच्या ओळीही वाचाव्या लागतात. नंतर पुन्हा मागील संदर्भ लक्षात ठेवावा लागतो. मागच्या ओळींकडे जावे लागते. नंतर पुढचा संदर्भ. नंतर काहीतरी संबंध आहे असे लक्षात येते.नंतर त्यातील अर्थाची अनुभूती येते. असला प्रकार बहूतेक काव्यप्रकारातच येतो. कोणतेही काव्य समजून घेतांना जो वाचक असतो त्याची समजण्याची पातळीही काव्यातील आनंद देण्याला कारणीभुत ठरते.

मुळ कविता खालील प्रकारेही लिहीता येवू शकते:

देह वात; प्रेम ज्योत
जीवन नदी; प्रेम समुद्र
जन्म चूक; प्रेम शुद्धीपत्र
.
.
.

खालील मराठीतील कविता (माझी नसलेली!) पहा:

'पिवळी पिवळी
जर्द दुपार
सुनी नभाची
गर्द कपार
आणि दुरवर
लावी हुरहुर
ठिपका होवून
एकच घार
एकच घार.....'

सामान्यता: कवितेत अक्षरांच्या, शब्दांच्या नादाचा उपयोग केला जातो. काव्यरचना गेय केली जाते. वरील दोन्ही कविता कडवी नसलेल्या सलग रचना आहेत. वरील दोन्ही कवितेत प्रतिमांचा वापर झालेला आहे.
म्हणजे: वात ही प्रतिमा आहे, ज्योत प्रतिमा आहे आदी.

तसेच पिवळी पिवळी जर्द प्रतिमा, सुनी, गर्द कपार (दुपारची) प्रतिमा आहे आदी.

अलीकडे अक्षरांच्या, शब्दांच्या लिखित अथवा मुद्रित रुपाचाही उपयोग होत असतांना आढळतो. अशी कविता 'मूर्त कविता' किंवा 'दृष्य कविता' म्हणून ओळखली जाते. वरील दोन्ही काव्ये त्याच प्रकारातील आहेत.

एक मात्र खरे की असला शब्दक्रिडेचा प्रकार कोणत्याही भाषेत होवू शकतो.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

नंदन's picture

17 Jun 2010 - 11:35 pm | नंदन

आपल्या उपक्रमातील हा तिसरा भागही आवडला. नवीन माहिती मिळते आहे. वाचल्यावर नामदेवांचा 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल' हा अभंग आठवला. मात्र शेवटच्या चरणात क्रियापद येत असल्याने अगदी काटेकोरपणे पाहिलं तर या निकषात तो बसणार नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

यशोधरा's picture

17 Jun 2010 - 11:42 pm | यशोधरा

वाचते आहे. सुरेख लेखमाला.

राजेश घासकडवी's picture

18 Jun 2010 - 12:11 am | राजेश घासकडवी

मिसळपाववर शुचि यांनी चांदणशब्द ही कविता लिहिली होती. ती आता केवळ विडंबन स्वरूपात उपलब्ध आहे.

बाकी उत्तम लेखमाला. मूळ तमिळ, देवनागरी उच्चार व मराठी अशा तीनही रूपांत सादर केल्यामुळे आस्वाद घ्यायला सोपं जातं. धन्यवाद.

राजेश

वाचक's picture

18 Jun 2010 - 3:18 am | वाचक

आहे हा आणि त्यातून पुरातन तमिळमधे हे सर्रास पहायला मिळते म्हणजे केवळच.

पुरुषोत्तम पाटील ह्यांनी अशा अल्पाक्षरी, नाम युक्त कवितांचा प्रयोग केल्याचे (वाचल्याचे) आठवते. त्यांच्या "तळ्यातल्या साउल्या" ह्या कवितासंग्रहात अशी एक कविता आहे (इतरही ह्याच्या बर्‍याच जवळ जाणार्‍या आहेत) ती देतो

गुंगीतली पहाट
आडावरचा रहाट
खड खड पव्हरा
झोपलेला नवरा
जडभार कळशी
जपून वळशी
शिंपून अंगण
भरुन रांजण
भिजलेले ओंचे
ओलवण कांचे
आडवरची पहाट
गुंगलेला रहाट

इथे बर्‍याच वाचायला मिळतील. "पुरुषोत्तम पाटील"

इन्द्र्राज पवार's picture

18 Jun 2010 - 10:04 am | इन्द्र्राज पवार

श्री. वैरमुत्तु यांच्या या प्रयोगशीलतेमुळे तमीळ वाचकांना नक्कीच प्रेरणा मिळाली असणार आणि ज्याअर्थी श्री.हैयोहैयेयो असे म्हणतात की, "ते तमीळनाडुचे लाडके व्यक्तिमत्व" आहेत त्याअर्थी त्यांच्या या प्रयोगाचे तिथे स्वागत झाले असणारच. ओळख करून देणार्‍याने अशा रचनेतील गूढ सोपे केले असल्याने किमानपक्षी ही कविता समजण्यास निश्चितच मदत झाली आहे. अर्थात श्री.वैरमुत्तु यांनी केवळ "याच" पध्द्तीचे लेखन केले आहे की अन्य प्रयोगही सादर केले आहेत का तेही पाहणे आनंदाचे ठरेल.

मराठीत असे प्रयोग खूप नसावेत, पण श्री.पु.शि.रेगे हे तुरळकपणे असे प्रयोग करीत असत असे त्यांच्या काही कवितावरून दिसते.... उदा.
१.
"एक हाय
एक हात
एक मूख
एक तूं
एक मी"

२.
गाठीभेटीत ताटातुटी
ताटातुटीत घट्ट मिठी

अर्थात वरील पध्दतीचे काव्य म्हणजेच पु.शि.रेगे नव्हेत... तो सर्वस्वी वेगळा विषय आहे. केवळ श्री.वैरमुत्तु यांच्याशी साधर्म्य सांगणारे वरील दोन नमुने आहेत.

आधुनिक कवीत इकडे श्री.अरुण कोलटकर असे प्रयोग करताना दिसतात. उदा.
१.
तू आग मी खाक
तू आज मी रोख
तू काल तू उद्या
तू आता तू मघा तू मग
तू गुल मी छडी
तू गंधक मी काडी

इत्यादी.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

आणखी एक उदाहरण - मिसळपावावरचे (दुवा)

अरुंधती's picture

19 Jun 2010 - 8:34 am | अरुंधती

ह्या काव्यप्रकाराने भजनांमधील नामावळीची आठवण मात्र होते!
उदा: गोपाला राधालोला, मुरलीलोला नंदलाला, जय मुरलीलोला नंदलाला |
केशवमाधव जनार्दना, वनबाला वृंदावनग्वाला....||
मला स्वतःला हे असे भजन भावना वगैरे व्यक्त करणार्‍या भजनांपेक्षा जास्त आवडते. त्यात कोणत्या मागण्या नसतात, अपेक्षा नसतात, दैवत्वाचे मानवीकरण नसते.... आणि त्यामुळे ही भजने म्हणताना मला मजा येते. उलटपक्षी अशी भजने अनेकांना बोअर होतात.... कारण त्यात काही उघड संदेश नसतो. फक्त ईश्वराची स्तुती असते. असो. आपण वर दिलेले काव्य प्रथमदर्शनी असेच निव्वळ विशेषणांची जंत्री वाटते. पण नंतर जेव्हा त्यातील मर्म उलगडते तेव्हा त्यातील गोडी कळते.

अशीच आणखी काव्ये माहीत असल्यास जरूर समोर आणावीत व उलगडवूनही सांगावीत! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

ऋषिकेश's picture

19 Jun 2010 - 11:54 am | ऋषिकेश

वा! फारच सुरेख लेख..
अजून येऊ द्यात.. तुर्तास अशी एखादी कविता आठवते का ते पाहतो

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.