(मिपावरील एका सदस्येचे "रिक्षावाल्या" बरोबर रिक्षा भाड्याबाबत आलेल्या अनुभवाचा धागा वाचला. तिथे माझीही अशाच धर्तीची प्रतिक्रिया लिहायला गेलो, तर असे आढळू लागले की, मूळ लेखापेक्षा माझी प्रतिक्रिया खूपच लांबलचक होऊ लागली आहे, तेव्हा ती तिथे न देता म्हटले चला या बाबीचा आपला असा एक स्वतंत्र धागा करू या... तो असा >>)
आम्ही कोल्हापूरकर मटण, मासे, चिकन (खाण्यामध्ये विशेषत:...) मध्ये भलतेच "हुशार", पण आमची ही हुशारी फक्त खाण्यात. खरेदीमधील खाचखळग्यात मला शून्य ज्ञान. मटण म्हणजे दुकानदार जे देतो ते मटण, मग ते बोकडाचे आहे की, मेंढ्याचे, की पालव्याचे इ. सूक्ष्मबाबींचे माझे अगाध अज्ञान. मासा म्हणजे जो "पोहतो तो" इतपतच माझी व्याख्या व उडी.... त्यात सुरमयी, पापलेट, मरळ, नदीतला, खार्या पाण्यातला आदी कायबाय पोट प्रकार असतात हे फक्त जाणकाराला माहिती. तीच गोष्ट कोंबडीची.... जिला पंख ती कोंबडी (..... तसेच तिचा कोंबडा नावाचा ऐतखाऊ असा एक नवरा असतो)... इतपतच माहिती. एकदा आमचा नेहमीचा (या बाबतीत मास्टर असलेला...) नोकर न आल्याने मामीने मला विचारल्यावरून मार्केटमध्ये मी "चिकन" आणण्यास गेलो. बाहेर दरफलक होता "ब्रॉयलर चिकन = रुपये १०० किलो."
ठीक आहे, इतपत मलाही माहिती होतीच. एक किलो सांगितले.... आणि दुकानातील ती "खाटखाट" कारागीरी न पाहता, बाहेर वाट पाहत, रस्त्यावरील नित्याची रहदारी पहात उभारलो. तितक्यात मध्येच कोयता माझ्याकडे उगारत त्या खाटक्याने मला विचारले, "ओ भाऊ, स्कीन काढू का...?" मी घाबरलो, मनात म्हटले, च्यामारी हा कुणाची स्कीन काढायचे विचारतोय? त्याच्याकडे पाहिल्यावर तो म्हणाला, "कोंबडीची स्कीन काढून देऊ की तसेच पीस करू?" हे प्रकरण मला काही कळले नाही, पण काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून म्हटले, "हं.. काढा स्कीन...", त्याप्रमाणे त्याने त्याच कोयत्याने काहीतरी हालचाल केली व थोड्यावेळाने चिकन बांधून समोर ठेवली. मी दर पत्रकाप्रमाणे द्यायचे म्हणून १०० ची नोट दिली.... ती त्याने घेतली व म्हणाला...
"अजून २० रुपये..!"
"२०? पण दर तर १०० रुपये आहे ना?"
"व्हय... पण स्कीन काढली की.."
"कुणाची?"
"कुणाची म्हणजे? अहो कोंबडीची...तुम्हीच सांगितले की स्कीन काढा म्हणून..."
"अहो मी कुठे सांगितले, तुम्ही विचारले की स्कीन काढू का, मी म्हटले काढा.... मग त्यावेळी तुम्ही सांगायला हवे होते नां.... की त्या स्कीन काढणीचे २० रुपये पडतील...."
"सांगायला कशाला पाहिजे... हे तर सगळ्यांनाच माहित असते की..."
"असेल, पण म्हणजे मलाही ते माहित आहे हे तुम्ही कसे काय समजून घेतले. परत लावा ती स्कीन त्या कोंबडीला.... आणि करा मला एकदाचे मोकळे बघू.." मी वैतागलो होतो.
"ख्ख्या ख्ख्या... काय बोलता तरी भाऊ तुमी पण..... परत स्कीन लावायला कोंबडीची बाडी म्हणजे काय पतंग हाय व्हय, फाटला तर लावली खळ आणि केला परत नवा !"
"तुम्ही हसा हो... पण मी २० रुपये काय देणार नाही. आता ती लाडकी स्किनलेस चिकन ठेवा तुमच्याजवळच अन् मला दुसरी स्कीनसकटची कोंबडी द्या... १०० तर दिलेले आहेतच..."
आता आजूबाजूचे कोल्हापुरकरदेखील या संभाषणात उतरले....(यांची कमतरता कुठेच असत नाही... अगदी स्मशानभूमीतदेखील हवे/नको असलेले सल्ले देण्यास हे तत्पर असतात.) त्यातील तीन दिवसात दाढी न केलेला एक :
"अरे बाबा, दुकानदाराचे म्हणणे बरोबर आहे, स्कीन काढण्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतातच..."
"असेल ना.. मी कुठे नाही म्हणतोय? प्रश्न असा आहे की, "स्किन काढणी चार्जेस अमुक अमुक" असा बोर्ड दुकानात नको का लावायला?"
"आता तो तरी काय काय लावणार.... दे त्याला १० रुपये.... आणि बास झाला आता वाद.... कोंबडी आतापर्यंत शिजली असेल त्या डब्यातच तुमच्या दोघांच्या आरडाओरडीने..."
"खी खी खी....खी..." आजूबाजूचे सगळे... आपआपल्या थोबाडांची इकड्ची स्कीन तिकडे अन् तिकडची इकडे करुन सरसकट हसत होते.
शेवटी हा स्कीन संग्राम दहा रुपयात मिटला.....
मी काय शिकलो? ~~ हेच की, व्यवहार करताना आधी सगळ्या बाजू समजून उमजुन घायच्या मगच स्कीनची काळजी करायची.
(रात्री जेवताना ज्यावेळी ती बिचारी चिकन शिजून समोर आली, त्या वेळी मला हे कळेना की, स्कीन काढली म्हणून चिकनच्या चवीत काय फरक पडला असेल?)
प्रतिक्रिया
13 May 2010 - 5:42 pm | शुचि
>>यांची कमतरता कुठेच असत नाही... अगदी स्मशानभूमीतदेखील हवे/नको असलेले सल्ले देण्यास हे तत्पर असतात >> =)) =))
अहो स्किन मधे कोलेस्ट्रॉल असतं :)
लेख फार मस्त :)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
13 May 2010 - 7:35 pm | पांथस्थ
हे खरे आहे पण स्कीन मुळे रस्सा एकदम झक्कास होतो बुवा :)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
14 May 2010 - 12:02 pm | टारझन
१. चवीत काही फरक पडत नसला तरी , तुमच्या आहारात मेद बर्याच प्रमाणात कमी होतो. स्किन मधे फॅट्स खुप असतात, असं ऐकून आहे , खरं खोटं कोंबडीला माहित :)
२. ही स्किन चायनिज वाल्यांना विकली जाते , चिकनवाला वजन करताना स्किन सकट वजन करतो , म्हणजे त्या स्किन चे त्याने दोन्ही कडून पैसे घेतो.
३. आमच्या इकडं चिकनवाला आपल्याकडुन तरी कधी स्किन काढण्याचे पैसे घेत नाही ,उलट एखाद लेग पिस जास्त टाकतो :)
असो, स्किन काढण्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात , हे वाचुन करमणुक झाली.
तुम्ही कोल्हापुरच्या एखाद्या दादा ला घेऊन जा बरं त्या चिकन वाल्याकडे :)
14 May 2010 - 1:36 pm | इन्द्र्राज पवार
"....तुम्ही कोल्हापुरच्या एखाद्या दादा ला घेऊन जा बरं त्या चिकन वाल्याकडे ..."
झालं मग >> त्या दादाने त्या चिकनवाल्याची स्किन काढल्यावर तो देखील "स्किन काढणी"चे चार्जेस माझ्याकडून घेईल ना? मला निदान त्या खाटक्याबरोबर दहा मिनिटे का होईना भांडता तरी आले.... आता त्या दादाबरोबर मी कसे भांडू? मी "टारझन" थोडाच आहे? त्यातही इथे मला "साने गुरुजींचा श्याम" असेही म्हणतात.... आता लाबो !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
15 May 2010 - 1:15 am | पांथस्थ
चिकन खाणारा श्याम ...देवा देवा देवा....कलियुग आले हो :)
ह.घ्या.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
15 May 2010 - 12:01 pm | इन्द्र्राज पवार
"....चिकन खाणारा श्याम ...देवा देवा देवा....कलियुग आले हो..."
नाही हो... हा "श्याम" नेहमीच चिकन खात नाही... तसा समजुतदार आहे... आणि ज्या दिवशी खातो त्याही दिवशीही तो श्यामच असतो, त्याचा "श्यामराव" होत नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
13 May 2010 - 5:59 pm | वेताळ
आपल्या इकडे स्किन न म्हणता भाता काढुन पाहिजे का तशीच असा वाक्यप्रयोग करतात.कोबंडी कापल्यावर तिला सरळ गरम उकळलेल्या पाण्यात घालुन तिची पिसे साफ करतात.त्यामुळे तिचा भाता/स्किन तशीच राहते. त्याबरोबर चरबी खुप असते व वजन ही चांगले होते.ही सोपी पध्दत सर्रास सगळीकडे वापरतात.पण ज्यावेळी कोंबडी कापली जाते तेव्हा सरळ तिच्या पंखापासुन तिला सोलली कि तिचा भाता/स्किन निघुन जे चिकन तयार होते त्याला वेगळीच चव असते.त्यात चरबीचे प्रमाण देखिल खुप कमी असते.त्यामुळे बहुधा तिचा दर ज्यादा असावा. आमच्या भागात सर्रास भाता/स्किन कढुनच चिकन दिले जाते.
जर शेतात कोंबडीचे जेवण असेल तर कोंबडी कापल्या नंतर तिची पखे काढुन तिला विस्तवावर भाजली जाते. त्यात तिचा भाता/स्किन भाजुन निघते व तिच्या मटणाची चव एकदम झक्कास होते.भाजलेल्या कोंबडीच रस्सा एकदम मस्त लागतो.
वेताळ
13 May 2010 - 7:03 pm | jaypal
नुसती चर्चा नको लवकर कोंबडी भाजा आणि बोलवा मला. गणापच्या रेशीपी बघताना जेवढा त्रास होतो तेवढा तुमचा प्रतीसाद वाचताना होतो आहे . लेख आवडला =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
13 May 2010 - 8:25 pm | इन्द्र्राज पवार
"....त्यामुळे बहुधा तिचा दर ज्यादा असावा..."
असेल.... दराबद्दल माझी तक्रार असायचे काय कारण नव्हते... प्रश्न हा होता की, चिकन विक्रेत्याने तसा उल्लेख दरफलकात करायला हवा की नको. हाऊ कम सेलर्स टेक सम थिंग्ज अॅज ग्रान्टेड ?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
13 May 2010 - 6:16 pm | चिरोटा
मस्त शिजलाय लेख्!.बाकी तयार कापलेली कोंबडी(स्टोर्स मधली) घेतली तरी त्यात स्कीनवाली/स्कीन काढलेली असा प्रकार असतो.स्कीन काढलेली महाग असते.
भेंडी
P = NP
13 May 2010 - 6:56 pm | अनिल हटेला
=))
=)) =))
=))
कमाल असते नाही काही गोष्टीत !!
असो...
ह्या बाबतीत आपण आमच्याही दोन पावले पूढे आहात..:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
13 May 2010 - 9:00 pm | इन्द्र्राज पवार
"...ह्या बाबतीत आपण आमच्याही दोन पावले पूढे आहात...."
कुठल्या ? दुकानदाराबरोबर झालेल्या वादात की चिकन चवीत ?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
13 May 2010 - 10:57 pm | अनिल हटेला
कुठल्या ? दुकानदाराबरोबर झालेल्या वादात की चिकन चवीत ?
--->>अगदी दोन्हीतही !! ;)
कधीतरी वादावादीकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
13 May 2010 - 8:06 pm | स्वाती२
मला एकदा असेच मासे साफ करुन देऊ का म्हणून विचारले होते. नंतर त्याचे वेगळे पैसे घेतले होते.
13 May 2010 - 8:08 pm | शुचि
बोंबील साफ करणं अवघड काम असतं. :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
13 May 2010 - 8:16 pm | इन्द्र्राज पवार
"...बोंबील साफ करणं अवघड काम असतं...."
झालं तर.... आता जर उद्या मिपा सदस्यांसाठी तुमच्याकडून बोंबील खाण्यासाठी निमन्त्रण आले तर तुम्ही त्यांना ते साफ करुन द्या असे रोखठोक सांगणार ! असे झाले तर त्या जुन्या म्हणीप्रमाणे यातील कोण तरी ओरडेल, "ओ मॅडम, बोंबील नको पण ती सफाई आवरा....!"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
13 May 2010 - 8:24 pm | स्वाती२
अगं त्याने नुसतं डोकं उडवलं. दोन मिनिटाचं काम. तसही मी खुषीने टीप दिलिच असती. पण आधी दर न सांगता नंतर कटकट करतात ते नाही आवडत.
13 May 2010 - 8:29 pm | शुचि
हे मोठे बोंबील काहीतरी अर्ध गिळून जाळ्यात काय अडकतात आणि ते गिळलेलं ओढून काय काढावं लागतं ..... देवा .... पण बोंबील कालवण काय चविष्ट लागतं....आमसूल किंवा चिंचेचा कोळ घतलेलं. नारळाचं दूध.
मी विसरले बाजार आई (सासूबाईंबरोबर) करायचे मुंबईत असताना.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
13 May 2010 - 9:28 pm | टिउ
चिकन १०० रुपये किलो? अवघड आहे!
आणि पालवा काय असतं?
14 May 2010 - 12:05 am | इन्द्र्राज पवार
"....आणि पालवा काय असतं?...."
"पालवा".... हा देखील बकर्याचा/बोकडाचा एक प्रकार ~ पण "यंग फ्रेश फेलो... देअरफर मच इन डीमांड अँड रादर कॉस्ट्ली, नॅचरली.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
14 May 2010 - 7:26 am | पांथस्थ
म्हणजे थोडक्यात लँब मीट!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
13 May 2010 - 9:42 pm | शिल्पा ब
परत लावा ती स्कीन त्या कोंबडीला :)) :)) :))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 May 2010 - 10:21 am | समंजस
लई भारी..... :D
माझी पण परिस्थिती अशीच आहे चिकन/मासे विकत आणण्याबाबत. त्यामुळे मी खरेदीला जाणे शक्यतोवर टाळतो 8}
14 May 2010 - 10:51 am | इन्द्र्राज पवार
"....मी खरेदीला जाणे शक्यतोवर टाळतो ....
ठीक आहे.... पण कोंबडी खाता ना? तसे असेल तर मग पर्वा ईल्ला !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
14 May 2010 - 10:36 am | आनंदयात्री
आयला भडभडुन आले ..
(धागा उघडण्याचा दोष माझाच आहे हे मान्य करतो)
-
आंद्या शाकाहारी
14 May 2010 - 6:28 pm | तिमा
सॉलीड करमणुक झाली, लेख तर मजेदार आहेच पण प्रतिक्रिया तर फारच खमंग! तसेच ज्ञानातही भर पडली. स्कीन प्रकरण माहीतच नव्हतं. कुणीतरी कोलेस्टेरॉल बद्दल लिहिलंय, पण असं खाल्लेलं कोलेस्टेरॉल रक्तात जाऊन साठतं का ? कोणीतरी मार्गदर्शन करावे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
14 May 2010 - 9:54 pm | इन्द्र्राज पवार
"...पण असं खाल्लेलं कोलेस्टेरॉल रक्तात जाऊन साठतं का ? कोणीतरी मार्गदर्शन करावे....
राईट.... हे कोलेस्टेरॉल पिल्लू मलाही येथील काही प्रतिक्रिया वाचल्यानंतर उमगले. आता कुमारी चिकन एकदा का पोटात गेली की, कोण विचार करतोय टेक्निकॅलिटीचा !!!! (तरीदेखील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खुलासेवार माहिती वाचायला मिळाली तर हवीच आहे...)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
14 May 2010 - 10:52 pm | शिल्पा ब
कुठलंच कोलेस्ट्रोल रक्तात साठत नाही...ते रक्तवाहिन्यांच्या surface ला जमते...असा खूप थर साचला कि रक्ताभिसरणाला अडथला येतो...स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका अश्या गोष्टीना सामोरे जावे लागते...म्हणून शक्यतो चरबीयुक्त पदार्थ खूप खाऊ नयेत ...उदा. कोंबडीची स्कीन...मांसाहारींसाठी बाजारात बोनेलेस skinless चिकन मिळते..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/