जीवनातील प्रत्येक वस्तूचे मोल हे पैशात करण्याची जी प्रवृत्ती माणसाच्या मनी वसत असते तिला अनेक कंगोरे असतात; त्यापैकी एक म्हणजे त्याची बौद्धिक कमजोरता. आपण पैसे फेकले म्हणजे झाले, ती वस्तू काय होती, कशी होती, जिची आहे/होती त्याच्या मनात त्या वस्तूबद्दल काय कोमल हळव्या भावना आहेत, त्याने ती वस्तू कशा प्रकारे ती पैदा केली होती, कशी जपली होती, या व अन्य बाबींचे अजिबात सोयरसुतक अशा गुर्मीत वाढलेल्या इसमाच्या गावी नसते. अशा प्रसंगी "हतबलता" म्हणजे नेमकी कोणत्या प्रकारची "डिश" आहे हे उमगते आणि संबंधित व्यक्ती खिन्नपणे समोरच्या घडामोडीकडे पाहत राहते. कारण त्याला हे ठाऊक असते की वस्तूचे मोल "रुपयात" करणार्याकडे इतकी अक्कल असणे शक्य नाही कि काही गोष्टींची किंमत पैशात कदापीही होऊ शकत नसते.
माझ्या मामांची (जी पर्यायाने माझी स्वत:चीदेखील...) छानपैकी वैयक्तिक लायब्ररी आहे. ते ज्या ज्या ठिकाणी लेखा परीक्षणासाठी जात असतात त्या त्या गावाची आठवण म्हणून फावल्या वेळेत तेथील स्थानिक पुस्तक विक्री केंद्रांना भेट देतात व प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या पुस्तकांची (किरकोळ का होईना..) खरेदी करीत असतात. त्यामुळे घरी नव्या जुन्या पुस्तकांचा गंध कायम दरवळत असतो. ते स्वत: जरी लेखक नसले तरी साहित्य क्षेत्राशी या ना त्या संबंधाने संपर्कात असतात आणि साहजिकच काही लेखकासमवेत अगदी "अरे तुरे" पर्यंतचे संबध होते/असावेत. त्यांच्या संग्रहात अनेक लेखकांपैकी श्री. पु. शि. रेगे यांची बहुतांशी पुस्तके आहेत. या पैकी रेगेंच्या "सावित्री" या कादंबरीवर त्यांचा फार जीव. कारण त्यांच्याकडील प्रत हे खुद्द श्री. पु. शि. रेगे यांनी स्वाक्षरी करून "एका करवीरकरास सप्रेम..." असे लिहून दिली असल्याने त्यांच्या या छोटेखानी कादंबरीबद्दल विशेष हळव्या भावना आहेत (आता "होत्या" म्हणावे लागेल.... कारण ती प्रत आता "कै." झाली...).
एकदा ते आपल्या टीमसमवेत रत्नागिरीला ऑडिटला गेले होते; आणि त्याच संध्याकाळी त्यांचे शासनाच्या "इरिगेशन" खात्यात काम करणारे त्यांच्याच वयाचे एक मित्र आमच्या घरी आले आणि त्यांना त्यांच्या मुलीसाठी (जी मराठी विषयात बहि:स्थ एम. ए. करीत होती...) पु. शि. रेगे यांची "मातृका" नावाची कादंबरी हवी होती, जी आमच्याकडे, अर्थातच, होती. मामा पुस्तके देण्याबद्दल तसे कडक असल्याने मी पुस्तक त्या गृहस्थाला देणे शक्यच नव्हते. पण त्यांनी त्याक्षणीच मामांना मोबाईल लावला, फोनवर जे काय बोलायचे ते बोलले व माझ्या हाती फोन दिला. मामांचा आवाज तसा नाराजीचाच होता, (कारण इरिगेशनच्या त्या इसमाचे वाचन काय असणार यांची कल्पना त्यांना होतीच.....) पण त्या मुलीच्या अभ्यासासाठी ते पुस्तक मागत असल्याने नाईलाजाने का होईना पण त्यांनी मला "मातृका" देण्यास सांगितले. मी पुस्तक कपाटात शोधत असतानाच त्या मुलीचा सेल त्या इसमास आला, दोघे काहीतरी बोलले व त्यांनी तो फोन मला दिला. ती मुलगी सांगू लागली की, "प्लीज, असल्यास 'सावित्री' पण दिली तर बरे होईल....". आता परत सावित्रीबद्दल मामांची परवानगी घ्या असे सांगणे मला त्याक्षणी तरी बरे वाटले नाही... कारण वयाचा फरक, आणि आविर्भावावरून ते गृहस्थ असे दिसत होते कि मामा त्यांना "मान" देत असणार. त्यानंतर विशेष असे काही बोलणे झाले नाही, कारण थोड्याच वेळात "मातृका" आणि "सावित्री" दोन्ही पुस्तके मला मिळाली व ती ते घेऊन ते गृहस्थ आभार मानून निघून गेले.
या दोन्ही कादंबर्या कांही आमच्या नित्याच्या वाचनातील नसल्यामुळे आमच्या एरव्हीच्या जीवनात काही फरक पडला नाही. मात्र हेही तितकेच खरे की, घरी परतल्यानंतर ज्यावेळी मामांना समजले की, मी "सावित्री" देखील त्या इसमास दिली आहे, त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर चिंता दिसली, कारण "पु.शि. रेग्यांची सही" असलेली ती प्रत होती, जिचे महत्व त्यांनाच ठाऊक असणार. तथापि त्यांनी मला तीबद्दल काही दोष दिला नाही. दिवस चालूच होते. साधारणत: एक महिन्याच्या कालावधीनंतर एका रविवारी ते गृहस्थ आमच्या घरी आले. साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही सर्वच घरी होतो. आणलेल्या पिशवीतून त्यांनी एक पुस्तक काढले आणि मला म्हटले,
"अरे इंद्र, हे ठेव... "मातृका" झाली अभ्यासून...". पुस्तक घेतले.
मामांनी विचारले. "अरे, पण त्याबरोबर याने तुला "सावित्री" देखील दिली होती ना? ती कुठे आहे?"
"होय, ती कुठली ती सावित्री नेली होती, मुलीने वाचून ठेवली बाजूला, कारण तीला या मातृकाची गरज होती, आणि तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीने तो पर्यंत ती सावित्री नेली रे !" अगदी सहजपणे ते सांगते झाले.
मामांचा चेहरा संतापाने फुलत गेलेला मी पाहू लागलो....तरीही त्यांनी तो न दाखवता शांतपणे त्या इसमास सांगितले..
"जगदाळे, हे तुम्ही मला काय सांगत आहात (मामा चिडले की "अहो जाहो" बोलतात...) हे तुम्हाला कळते काय? काय संबध तुमचा तुम्हाला दिलेले पुस्तक तुम्ही तिसर्यास देता?"
"त्यात काय झाले? शेवटी पुस्तक वाचण्यासाठीच असते ना?"
"असेल, पण ते तुमच्याकडील असले तर.... मला आज संध्याकाळपर्यंत "सावित्री" आणून देण्याची प्लीज व्यवस्था करा.... आणि याच्यावर वाद घालू नका."
"काय तुम्ही तरी पाटील ! अहो एका पुस्तकाची ती बाब काय आणि तुम्ही मला काय वादाच्या गोष्टी सांगत बसलात. आणून देतो संध्याकाळी तुमची सावित्री."
ताड ताड ते गृहस्थ जीना उतरून गेले....आणि आम्हा सर्वांचा रविवार या वादामुळे पुरा नसून गेला.
रविवारची संध्याकाळ गेली....सोमवार, मंगळवारच्या देखील आल्या, गेल्या. पण "सावित्री" काय इकडे नांदायला यायला तयार होईना. मी स्वत: त्या इसमाच्या घरी गेलो. वर्किंग डे असल्याने साहजिकच ते घरी नव्हते, मात्र घरातील अन्य मंडळी (त्या मुलीसह....) भेटले. मुलीला पुस्तकाबद्दल विचारले, तर तिनेही जणू काय मी असे विचारून त्या "महान" घराण्याचा अपमान करीत आहे कि काय असा पवित्र घेतला. "माझ्या मैत्रिणीने ते पुस्तक (नाव देखील तिने घेतले नाही...) कुठेतरी हरवले आहे असे वाटते, पण आज परत एकदा तिला पाहण्यास सांगते व तुम्हास फोन करते." संपला विषय.
परत दोन दिवस गेले. मामाचा व त्या इसमाचे तीन चार फोन झाले, आणि पुढील शनिवारी एकदाचे ते महाशय पुन्हा आमच्या घरी आले.
"पाटीलसाहेब, मुलीच्या त्या मूर्ख मैत्रिणीने तुमची ती "सावित्री" कुठे हरविली बाबा...." ~~ (म्हणजे "ती" मैत्रीण मूर्ख.... बेफिकीरपणे दुसर्याचे पुस्तक तिसरीला देणारी यांची मुलगी "शहाणी...")
"अहो जगदाळे, तुम्ही काय बोलता याची तुम्हाला कल्पना येत्ये काय? तुम्हाला माहित आहे का माझा त्या पुस्तकावर किती जीव आहे ते?"
"कमाल आहे, पुस्तकावर जीव आहे म्हणजे काय? पुस्तकासारखे पुस्तक, हरवत नाहीत का पुस्तके? नवीन आणून घेऊ या."
"धन्य आहे तुमच्या विचारसरणीची... तुमच्या दृष्टीने त्या पुस्तकाची छापील किंमत हीच किंमत होत असणार.... छापील किंमत तीन रुपये आहे "सावित्री" ची... म्हणून मी तिची किंमत तीन रुपयात करू काय आता?"
"हात्तेच्या.... काय गेला आठवडाभर तुम्ही व तुमचा हा भाचा दंगा घालत बसलाय त्या सावित्री अन तिच्या सत्यवानाबाबत...! मला वाटले पुस्तक कुठे शे-पाचशेचे आहे कि काय..."
"वा !! म्हणजे जगदाळे.... किमात शे-पाचशे असली तरच पुस्तकाचे महत्व काय? आणि तीन चार रुपले असले कि कचरा...?
"नाही तर काय.... तीन रुपयाच्या फाटक्या पुस्तकासाठी गेला आठवडा तुम्ही माझे डोके खाल्ले...."
"काय ?? मी डोके खाल्ले तुमचे...?"
"आता ओरडू नका, किती म्हटला पुस्तकाची किंमत ? तीन रुपये ? हे घ्या..."
आणि ते अक्कलशून्य गृहस्थ आपल्या पाकिटातून पैसे काढू लागले.
"थांबा जगदाळे.... आभारी आहे. तुमचे पैसे मला मिळाले, तुमच्या बोलण्यातून.....नमस्कार.."
आणि मामा त्या खोलीतून आतल्या बाजूस गेले....त्यांची खिन्नता दूर होण्यास बराच कालावधी जाणार होता हे दिसतच होते. या प्रसंगाचा मी केवळ एक साक्षीदारच नव्हतो तर "सावित्री" घालविण्यास मी देखील काही अंशी (कि बर्याच....!) जबाबदार होतो. माझी अक्कलदेखील त्यावेळी कुठे गवत चरायला गेली होती कुणास ठाऊक की त्या "स्वाक्षरी प्रती"ची "खरी किंमत" मामाच्या दृष्टीने काय आहे ते समजून घेता आले नाही. (आणि हेही तितकेच खरे आहे की, निव्वळ त्या प्रतीवर श्री. पु. शि. रेगे यांची सही होती म्हणून मामांना ती हरविल्याचे दु:ख झाले नव्हते तर आता ती प्रत "ऑउट ऑफ प्रिंट" होती, आणि परत विकत घेतो म्हटले तरी शक्य बाब नव्हती...)
चीड येते त्या या गोष्टीची कि, लोक अशा बाबींची किंमत पैशात करू लागतात ते पाहून. काही पुस्तके किंमतीच्या पलीकडे किती असतात ते समजण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शिक्षण देता येत नाही.... ती बाब उपजतच असली पाहिजे या मताचा मी झालो आहे.
आपणास अशा प्रकारचा "कटू" अनुभव आला असेल तर जरून लिहा.
प्रतिक्रिया
11 May 2010 - 2:53 pm | नाना बेरके
माझ्या वडीलांना पुस्तके वाचायचा विलक्षण नाद. त्यामुळे घरात खूप पुस्तके. एका मोठ्या जुन्या गोदरेजच्या कपाटाचे तीन कप्पे भरून पुस्तके होती. त्यामुळे आम्हा सर्व भावंडानासुध्दा वाचनाची खूप आवड. मी माझ्या कुटुंबात सगळ्यांच्या वाढदिवसाला पुस्तकेच भेट देत असतो, तसेच ते ही मला. मी माझ्या मित्रांना आवडलेली पुस्तके सांगत असतो, ते ही मला वाचण्यासाठी पुस्तके आणून देण्याची विनंती करतात. मी तसे नेहमी करत आलो आहे , अजूनही करतो .. पण
दिलेली पुस्तके ते प्रामाणिकपणे परत करत नाहीत, ती पुस्तके हस्ते-परहस्ते जातात. त्यातून वाईट ह्याचे वाटते कि, दिलेले पुस्तक वाचले आहे किंवा नाही हे सुध्दा हि मंडळी सांगत नाहीत.
अश्या गेलेल्या पुस्तकांच्या यादी मध्ये खाली नमूद केलली काही चांगली पुस्तके आहेत.
१. मिरासदारी
२. तोत्तोचान
३. चिपर बाय द डझन - (मराठी )
४. द अल्केमिस्ट - (मराठी )
५. माणसे आरभाट आणि निस्सळ
६. अवघड अफगाणिस्तान
७. जेरुसलेम
८. गांवगाडा
९. ओसाडवाडीचे देव
१०. माणसं
११. छंदाविषयी
१२. द दा विंची कोड - ( मराठी )
१३. खोगीरभरती
अजून कितीतरी . . . पण गेलेल्या पुस्तकांचा हिशोब मी करत नाही , कारण त्याचा उपयोग नसतो, फक्त एखाद्या पुस्तकाचा विषय निघाला हळहळ अशी वाटते हे पुस्तक आपल्याकडे होते, पण आता नाही.
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
11 May 2010 - 9:43 pm | इन्द्र्राज पवार
"....पुस्तकाचा विषय निघाला हळहळ अशी वाटते हे पुस्तक आपल्याकडे होते, पण आता नाही....."
खरंय.... या जखमेची कळ ज्याचे "जळते" त्यालाच कळते अशा स्वरुपाची असते. त्यातही तुमच्या "गेलेल्या" यादीत "गावगाडा" अन् "ओसाडवाडीचे देव" होते म्हणजे मी तुमची ह्ळहळ लाख मोलाची आहे असे मी मानतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
13 May 2010 - 5:15 am | नेत्रेश
"ईथे बसुन वाच हवे तेवढा वेळ. पाहीजे तेवढ्या वेळा चहा मीळेल पुस्तक वाचताना. पण घेउन जायचे नाव काढु नको"
- पुस्तकाची पाने दुमडायची नाहीत.
- पेन / पेन्सिल ने खुणा / टिपा लिहायच्या नाहीत
- पुस्तक उलटे "opne and face down" ठेवायचे नाही.
- पुस्तक वाचताना हाताने (तेलकट पदार्थ) खायचे नाहीत.
------------------
पण या नीयमांमुळे अगदी खरी गरज / तळमळ असलेलाच पुस्तक वाचायला येतो.
13 May 2010 - 10:20 am | इन्द्र्राज पवार
"पुस्तकाची पाने दुमडायची नाहीत.... अन पेन्सिलने खुणा करायच्या नाहीत..."
या वरून एक प्रसंग आठवतो. आमच्याच सोसायटीमध्ये राहणारे तसेच स्थानिक कामगार चळवळीशी निगडीत असलेले एक कार्यकर्ते एकदा आमच्या सदनिकेत आले आणि त्यांनी एक दिवसासाठी श्री. बाबा आढाव लिखित "एक गाव एक पाणवठा" हे पुस्तक वाचण्यास नेले.... कारण त्याच संध्याकाळी त्यांचे अशाच एका विषयावर कामगार चाळीत भाषण होते. दोन तीन दिवसानंतर ते पुस्तक त्यांनी (आपल्या मुलामार्फत..) पाठवून दिले. पुस्तक घेतले आणि एक दोन ठिकाणी पाने दुमडली गेली असल्याचे जाणवले म्हणून सहज ती पाने सरळ करून ठेवावीत म्हणून पुस्तक उघडले.... तो काय!!! जवळ जवळ ३०-३५ पानावर पेन्सिलच्या अथपासून तिथपर्यंत (काळ्या+लाल) खुणाच खुणा....! मी संतापून त्यांना फोन केला, आणि या खुणांचा अर्थ विचारला, तर ते बेरकी हसून उदगारले, "अरे अरे, इंदर, भाषणासाठी काही मुद्धे पाहत होतो रे त्या पुस्तकात आणि लक्षात राहावे म्हणून ओळीवर खुणा करीत गेलो.... असू दे, बाबुकडून पुस्तक परत पाठव... खोडून देतो....!"
काय बोलायचे यावर ?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 May 2010 - 1:24 pm | प्रकाश घाटपांडे
कधी कधी अशा पेन्सिलने केलेल्या खुणा वाचन अभ्यास पुर्ण बनवतात. हा परस्परातील सामंजस्याचा मुद्दा असतो. मी माझी पुस्तके रिसबुडांच्याकडे द्यायचो त्यावेळी अशा खुणा असाव्यात असा माझा आग्रह असे. त्यामुळे मुद्दे झटकन एका दृष्टीक्षेपात नजरेस येतात.
पाने दुमडणे मात्र मला आवडत नाही त्याऐवजी बुकमार्क वापरावेत ,एखादी साधी चिठोरी ठेवावी. दुमडल्याने नंतर पानाचे कोपरे फाटतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
20 May 2010 - 11:45 pm | अन्या दातार
उत्तम व उद्दाम उपाय.
हमखास मात्रा गुण आला नाही तर पैसे परत!!!! ;)
11 May 2010 - 3:54 pm | भडकमकर मास्तर
आणि ते अक्कलाशून्य गृहस्थ आपल्या पाकिटातून पैसे काढू लागले.
अगायायाया..
मला वाटलं आता मारामारीच होते की काय....
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
13 May 2010 - 9:44 pm | इन्द्र्राज पवार
"...मला वाटलं आता मारामारीच होते की काय...."
नाही नाही.... ती नौबत येणे शक्यच नव्हते. कारण आमच्या मामांचा "पडेल" स्वभाव ! शिवाय ज्याला दुर्मिळ पुस्तकांचे महत्वच माहित नाही अशा माणसाबरोबर कशा प्रकारची मारामारी करायची ?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
11 May 2010 - 3:54 pm | पांथस्थ
मी माझी पुस्तके कोणासही देत नाहि ते ह्याच कारणांसाठी. असो.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
11 May 2010 - 5:57 pm | मेघना भुस्कुटे
संपूर्ण सहमत.
13 May 2010 - 12:37 pm | इन्द्र्राज पवार
खरंय... पण काही वेळा "ज्येष्ठ" म्हणविणारी बाहेरील वा नात्यातील मंडळी येतात आणि अगदी रोजचे वर्तमानपत्र मागीतल्याच्या थाटात कपाटातील पुस्तक उचलतात आणि अगदी सहज सांगतात, "अरे मामाला सांग हे पुस्तक घेतले आहे, वाचुन झाल्यावर आणून देतो..." काय बोलणार आणि कसे अडविणार अशाना?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 May 2010 - 2:47 am | नेत्रेश
चेष्टा नाही. खरच गंभीर पणे सांगत आहे.
३ Digit चे Combination lock लावा. ज्याला खरोखर गरज आहे तो १००० Combinations try करुन पुस्तक नेइल.
ज्याला टाईम पास म्हणुन पुस्तक हवे आहे ते आपोआप टळतील.
21 May 2010 - 1:02 pm | इन्द्र्राज पवार
सूचना खरंच छान आहे.... जरूर अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
14 May 2010 - 3:52 pm | प्रदीप
मीही करतो. अनुभवांवरूनच शिकलोय. आपल्याला आपण घेतलेल्या पुस्तकांची किंमत असते ती मागणार्यांना असतेच असे नाही, बरेचदा ती तशी नसतेच. तेव्हा मी अलिकडे माझी पुस्तके घरी येणार्या पाहुण्यांच्या नजरेस पडणार नाहीत अशा तर्हेने ठेवली आहेत. तसेच कुणाबरोबर चर्चेच्या दरम्यान मजजवळ असलेल्या एखाद्या पुस्तकाचा उल्लेख आलाच, तर ते मी पूर्वी वाचले होते इतकेच म्हणतो. पूर्वी मी उत्साहाने 'माझ्याकडे आहे' वगैरे सांगत असे, समोरील व्यक्तिने वाचून आनंद घ्यावा हा हेतू त्यात असे. आता हे लक्षात आले की ह्या आनंदापेक्षा नंतर ते पुस्तक नीट हाताळून परत करण्याच्या संदर्भात जे अक्षम्य उद्धट वर्तन काही जणांकडून घडू शकते (अनुभव आहे, इन्द्रसारखाच) त्यामुळे होणारे दु:ख जास्त आहे.
11 May 2010 - 4:34 pm | निखिल देशपांडे
असे तर्हवाइक माणसे नेहमीच भेटतात..
पुस्तक विकत घेण्यासोबत ते टिकवुन ठेवणेही महत्वाचे आहे. पण काही वेळा जेव्हा आपण एखाद्याला पुस्तक देतो आणि तो त्याचा वाचुन योग्य उपयोग करतो.. किंवा योग्य व्यक्ती कडे आपण घेतलेले पुस्तक आहे ह्याचे समाधानही वेगळेच असते.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
11 May 2010 - 4:00 pm | झकासराव
माझ्याकडच वपुंच पार्टनर आणि सखी ही दोन पुस्तक अशीच लंपास झाली आहेत.
बर ही आउट ऑफ प्रिंट नाहियेत. पण ज्यांच्यामुळे गेली त्याना दुसरी विकत आणुन द्यावीत ही अक्क्कल नाही सुचलेली. पाच वर्ष होउन गेलीत.
त्यामुळे कोणाला पुस्तक वाचायला द्यायच म्हणल की मला भ्या वाटत बॉ...
12 May 2010 - 11:19 am | आनंदयात्री
पार्टनर !!
हवे तर माझे घेउन जा .. मला जड झालेय ;-)
11 May 2010 - 4:35 pm | प्रकाश घाटपांडे
जगदाळे लबाड होते. त्यांना हे नक्की माहित होत कि तीन रुपयात बाहेर हे पुस्तक मिळत नाही.
दुसर्याची चुक लपवण्यासाठी त्यांनी हा अशिक्षितपणाचा आव आणला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
11 May 2010 - 8:10 pm | इंटरनेटस्नेही
असेच म्हणतो.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
11 May 2010 - 5:24 pm | सुखदा राव
काही गोश्ति किमतिपलिकदे असतात हे १००% बरोबर. मी पन वाचनवेदी असल्याने माझ्याबाबतितही हे अनेकदा घदुन गेलय. लग्नाआधी मी भान्दुनही मिलवलीत काही पुस्तक परत. पन लग्नानन्तर सासूसाईन्च्या मैन्त्रिनीनेच पुस्तक हरवल्यावर तेही करता येत नाही. पन यावर इलाज आहे- कोनालाही पुस्तक दिल्यावर पुस्तकाचे, लेखकाचे अन प्रकाशकाचे नाव, दिल्याची तारिख अन त्या मानसाचा फोन नम्बर ही माहिती लिहुन थेवावी. म्हनजे पुस्तक परत मिलवायचा त्रास थोदा तरी कमी होतो. (अनुभवाचे बोल आहेत.)
12 May 2010 - 12:01 pm | इन्द्र्राज पवार
"...पुस्तक परत मिळवायचा त्रास थोडा तरी कमी होतो...."
बरोबर आहे.... पण पुस्तक नेणार्याने "माझ्याकडून नेलेले तुमचे पुस्तक हरवले.." असे सांगितल्यावर हतबुद्ध होऊन गप्प राहण्याशिवाय आपण काय करू शकतो?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
11 May 2010 - 6:07 pm | शुचि
जगदाळे दीड्शहाणा होता.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
11 May 2010 - 6:25 pm | विकास
माझ्या एका मित्राकडे एक वैचारीक अभारतीय लेखक दुसर्यांदा भेटीला आला होता. माझ्या मित्राच्या स्टडीमधे अनेक पुस्तकाने भरलेली कपाटे आहेत. त्याचे वाचन आणि संग्रह पण छानच आहे. तर हा लेखक ती पुस्तके एखाद्या मुझियममधून जावे तसे बघत जात होता.
माझ्या मित्राच्या बायकोने (नवर्याबद्दल) कौतुक वाटत या लेखकाला सांगितले की आमच्याकडे खूप विविध विषयांवर पुस्तके आहेत, वगैरे... हे महाभाग उत्तरले, "आय डोन्ट केअर, आय अॅम लुकींग फॉर जस्ट वन बूक, दॅट हॉ बॉरोड फ्रॉम मी इन माय लास्ट विझिट!" नंतर आमची ह.ह.पु.वा. स्थिती झाली.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
11 May 2010 - 7:44 pm | शुचि
अभारतीय लोक परखड असतात खरे.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
12 May 2010 - 3:37 pm | इन्द्र्राज पवार
"..."आय डोन्ट केअर, आय अॅम लुकींग फॉर जस्ट वन बूक, दॅट हॉ बॉरोड फ्रॉम मी इन माय लास्ट विझिट!"..."
यावरुन इंग्लिशमधील एक कोटेशन आठवले, ते असे :
"....Never lend books, for no one ever returns them; the only books I have in my library are books that other folks have lent me." ...
आहे खरा पुस्तकप्रेमी हा इसम !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
12 May 2010 - 10:25 pm | विकास
"....Never lend books, for no one ever returns them; the only books I have in my library are books that other folks have lent me." ...
मस्त!
आता तर मी प्रिन्सिपल केले आहे, "नातेवाईक अथवा मित्र, कुणालाही पुस्तकेपण उधार देयची नाहीत" ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
14 May 2010 - 1:14 pm | विशाल कुलकर्णी
मी पण तेच ठरवून टाकलेय. कुणी काही म्हणा, शिव्या घाला पण पुस्तके कुणाला द्यायची नाहीत. नातेवाईकांकडे गेलेली पुस्तके तर परत येतच नाहीत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कुणी मागितलेच तर हात जोडून सांगतो, बाबारे तु इथे बसुन वाच. तुझं पुस्तक वाचुन होइपर्यंत जेवण-खाण, चहा-पाणी पुरवतो तुला, पण इथुन पुस्तक काही बाहेर जाणार नाही. जवळ जवळ १८ अतिशय दुर्मीळ पुस्तके अशी गेली ती परत आलीच नाहीत.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
11 May 2010 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरी, तुमच्या मामांनी फार संयमानं घेतलं. :)
मी पुस्तकं कोणालाच देत नाही. जरा वेळ राग येतो. पण तेवढा क्षण गेला की,मग नकार देण्याचं काही वाटत नाही. मला तर एका विद्यार्थ्यानेच चुना लावला. विद्यार्थीप्रियतेच्या नादात पोरांमधे मिसळून असायचो. एकदा पोरांची काही तरी शर्यत लागली. साठ षटकांचे वनडेवर की काही तरी असे. भरपूर खलबते झाली. 'सर, तुम्ही सांगा बरं. मी म्हटलं आहे माझ्याकडे पुस्तक त्याच्यात पाहू या. 'गिनिज बूक रेकॉर्डची मराठी आवृत्ती होती' दुसर्या दिवशी पोरांची शर्यत संपली. एका आघव पोरानं सर आजच्या दिवस पुस्तक वाचायला द्याचा धोशा लावला. मी त्याला पुस्तक दिलं. पुढे ते कार्ट आज देतो. उद्या देतो. असा टाइमपास करायचा. असे करता करता एक दिवस 'सर, माझ्याकडून पुस्तक हरवलं' मी तुम्हाला दुसरं घेऊन देतो म्हणाला. पुढे पोरानं काही पुस्तक आणून दिलं नाही. तेव्हापासून आजतागायत मी पोरांना पुस्तक देत नाही. मात्र पुस्तक विकत कुठे मिळेल. वगैरे माहिती जरुर देतो. फारच आवश्यक असते तेव्हा झेरॉक्सच्या दुकानापर्यंत जाऊन झेरॉक्स काढूनही दिले आहे. मात्र पुस्तक ना बाबा ना...!:)
-दिलीप बिरुटे
11 May 2010 - 11:50 pm | इन्द्र्राज पवार
"...मात्र पुस्तक विकत कुठे मिळेल. वगैरे माहिती जरुर देतो. ..."
होय. आताशी मला हे कळू लागलं आहे की, अशा परिस्थितीत पुस्तकांसंबंधी आवश्यक ती तांत्रिक माहिती शांतपणे देणे अन् आपल्यापुरता तो विषय "फाईल" करून टाकणे.
"तरी, तुमच्या मामांनी फार संयमानं घेतलं..."
नक्कीच. पण मला वाटतं एकेक व्यक्तिचा तसा स्वभावच असतो. कदाचित त्यांना असेही वाटले असेल की, "जगदाळे" यांना पुस्तकाचे महत्व सांगणे म्हणजे भिंतीला टकरा मारण्यासारखे होईल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
12 May 2010 - 4:00 pm | समंजस
अश्या लोकांच्या शर्टाच्या बटनांना तोडावे आणि मग म्हणावे, कशाला एवढं ओरडताय? हे घ्या पैसे नवे बसवून घ्या :)
(मला तरी वाटतेय की ते पुस्तक हरवलं नाही तर ते लंपास करण्यात आले) :?
13 May 2010 - 12:40 am | इन्द्र्राज पवार
"...(मला तरी वाटतेय की ते पुस्तक हरवलं नाही तर ते लंपास करण्यात आले)..
नाही इतकी "चांगली अभिरुची" त्यांची असेल असे वाटत नाही. कारण त्या मुलीला केवळ पेपरचा एक १५-२० गुणांचा भाग इतपतच "इंटरेस्ट" असणार. बरं लंपास करुन तरी ती त्या कादंबरीचं काय करणार !! बेदरकार वृत्ती... दुसरं काही नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
11 May 2010 - 7:34 pm | प्रमेय
माझे ही अशीच हालत लागली होती!
शाळेत असतांना ब्रम्हांड हे मोहन आपटेंच पुस्तक भांडून मिळवले होते.
~२५० किंमत होती त्याची,
काही काळातच विज्ञान परिषदेने मोहन आपटेंचे व्याख्यान लावले आणि त्यांची स्वाक्षरी सकट मला ते पुस्तक जपता आले.
पुढे engg कॉलेजला असतांना seniors ने वाचायला म्हणून घेतले ते कधी परत केलेच नाही! विचारल्यावर घरी राहिले, बहीण वाचते आहे इ. कारणे सांगून लांबवले.
परत कधीच बघायला पण मिळाले नाही...
11 May 2010 - 7:53 pm | बिपिन कार्यकर्ते
पुस्तकप्रेमींनाच कळेल की हा किती हृदयद्रावक प्रसंग आहे ते... खूप लागून राहतं असं काही.
अवांतर: मी ढापलेली पुस्तकं....
०१. तिढा - लेखक: श्रावण मोडक.
०२. दोन कवितासंग्रह - त्यातला एक सौमित्रचा.
पण मी ही पुस्तकं लवकरच परत देणार आहे, ;)
बिपिन कार्यकर्ते
11 May 2010 - 10:36 pm | प्राजु
पुस्तकप्रेमींनाच कळेल की हा किती हृदयद्रावक प्रसंग आहे ते... खूप लागून राहतं असं काही.
सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
12 May 2010 - 10:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कार्यकर्ते, एक नाव सुटलं आहे बघा यादीतून! ;-)
माझीही काही पुस्तकं अशी लोकांनी लाटलेली आहेत, आणि काही घरात शिरलेल्या पावसाच्या पाण्याने! तरीही लोकांना पुस्तकं देण्याची सवय सुटलेली नाही! :-(
अदिती
13 May 2010 - 12:47 am | इन्द्र्राज पवार
"....तरीही लोकांना पुस्तकं देण्याची सवय सुटलेली नाही! ...
चांगला स्वभाव आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
11 May 2010 - 10:25 pm | शिल्पा ब
बऱ्याच लोकांना पुस्तकाची किंमत कळत नाही......दुसर्याचे पुस्तक तिसर्याला देताना काही लोकांना आपण काही चुकीच करतोय हे वाटतच नाही...पुस्तकाचे महत्त्व त्याच्या किमतीवरच ठरवतात...वर अजून हरवलेय सांगतात...त्यात काही शरमही नाही...काय बोलणार.
असो..बाकी लेख छान.
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 12:33 am | भारद्वाज
माझाही अनुभव सांगावासा वाटतो.
'पाच पूर्णांक कोणीतरी' नावाचं पुस्तक बाजारात नवीनच आले होते. इंग्रजी पुस्तक वाचण्याची पहिलीच वेळ होती (इंग्रजीची भीती मात्र नव्हती). त्या वयात पुस्तक तुफान म्हणजे अगदी तुफान आवडले. मित्रांमधे, इकडे-तिकडे त्या पुस्तकाचीच चर्चा. ५ व्या सेमच्या सुट्टीत वाचायला आमच्या ग्रुपमधल्या मित्राने ते माझ्याकडे मागितले.
मी दिले.
पुस्तक व्यवस्थित वापरायची माझी सवय. त्यामुळे त्यालाही नीट काळजी घेण्यास मैत्रीच्या खास शब्दात बजावले. आता या मित्राला स्वतःच्या वहीत इकडे-तिकडे स्वतःच्या गावाचे नाव लिहिण्याची हौस! नाव लिहून त्याखाली समुद्राच्या लाटांसारखे डबल अंडरलाइन करणे वगैरे. झालं... त्याने तोच प्रकार पुस्तकातसुद्धा केला. सुट्टीत फोनवर पुस्तक कसे वाटले विचारले तर याचं म्हणणं काय तर पुस्तकातलं इंग्रजी डोक्यावरुन जातंय. म्हटलं धन्य आहे तुझी!!! साहजिकच त्याने पुस्तक वाचले नाही. पुस्तक परत घेताना त्याचा वर उल्लेखलेला पराक्रम कळल्यावर तळपायाची आग मैत्रीच्या अतिखास शब्दात त्याच्यावर बरसवली. आपलाच मित्र असल्यामुळे तात्काळ आगपाखड करणे शक्य झाले. इतर कुणावर असे बरसणे कदाचित शक्य झाले नसते. मित्राला चूक उमगली आणि आपली सवय त्याने हळूहळू कमी करत शेवटी पूर्णपणे बंद केली.
मात्र आपल्या मामांच्या मनाची अवस्था त्यावेळी कशी झाली असेल हे कल्पनेनेच अनुभवण्याचा प्रयत्न केल्यावरही मन दु:खी होतेय.
एक पुस्तकवेडा
12 May 2010 - 12:00 am | पिंगू
माझा ह्याबाबतीत अनुभव वर नमुद केल्याप्रमाणेच आहे. पण मी शांत स्वभावाचा असूनही एका पुस्तकापायी कचाकचा भांडलो आहे...
(पुस्तकप्रेमी) पिंगू
14 May 2010 - 1:21 pm | विशाल कुलकर्णी
सहमत, पुस्तकाच्या बाबतीत मी पण मुळ स्वभाव सोडून देतो. एक तर पुस्तके देतच नाही कुणाला. त्यातुनही अपवाद करुन एखाद्याला दिलं आणि असं काही झालं की मग माझा तोल सुटतो. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 May 2010 - 10:14 am | वेताळ
तसेच घरी लहान मुले असतील तर पुस्तके नीट संभाळुन ठेवावी लागतात. माझ्या कडील पुस्तके मी जितका वेळ जमतील तितकी त्याची पारायणे करतो. कारण कुणी मित्राने ते जर वाचायला नेले तर परत मिळण्याची हमी नसते.
जर त्यातुन ते परत आले तर सरळ आमच्या वाचनालयाला देवुन टाकतो.
वेताळ
12 May 2010 - 11:21 am | नितिन थत्ते
ह्म्म्म.
जव्हार येथील यशवंत वाचनालयाच्या एका सभासदाच्या हातून १९८८ मध्ये आइनस्टाईनचे नवे विश्व - ले. वा ज खेर हे पुस्तक 'गहाळ' झाल्याची आठवण झाली. ;)
नितिन थत्ते
12 May 2010 - 12:09 pm | Pain
तुमच्या दु:खात सहभागी आहे.
एक सुभाषित आठवले (उत्तरार्ध)-
मुर्खहस्ते न दातव्यम
एवं वदति पुस्तक् म* |
12 May 2010 - 2:54 pm | कानडाऊ योगेशु
तैलात रक्षेत,जलात रक्षेत,रक्षेत शिथिलबंधनात!
मूर्खं हस्ते न दातव्यम् एवं वदति पुस्तकम्||
माझ्या आठवणीप्रमाणे आठवी अर्धे संस्कृत मध्ये हे सुभाषित होते..
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
14 May 2010 - 2:07 pm | Pain
हो बरोबर.
आणि
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे ....
मी तर माझ्याच खरडवहीत लिहु शकत नाही !
12 May 2010 - 4:19 pm | स्वाती२
माझ्याकडे कुणि पुस्तक मागितलं तर मला नाही म्हणायला जमत नाही. मग ते पुस्तक परत मिळे पर्यंत डोक्याला भुंगा. बरे नेणार्याला आठवण करुन दिली की बरेचदा मी काय पळून जात नाहिये पुस्तक घेऊन वगैरे ऐकवले जाते. सुदैवाने आत्तापर्यंत सगळी पुस्तके उशिराने का होईना परत आली.
12 May 2010 - 10:14 pm | मुत्सद्दि
पुस्तके मागून नेणारी व परत न करणारी/हरवणारि आणखी एक जमात म्हणजे "नातेवाईक".
हे फारच अवघड जागेचे दुखणे असते. काहीच बोलता येत नाही.
मी माझ्या एका चुलत भावाला वाचायला दिलेले पुस्तक त्याच्याकडून हरवले असे कळाले.माझी चिडचिड झाली. सहा महिन्यांनी तेच पुस्तक माझ्या आतेबहिणीकडे सापडले. आता बोला.परंतु तोपर्यंत ते पुस्तक मी परत खरेदी केले होते. उगाच मनस्ताप झाला.
12 May 2010 - 10:31 pm | shaileh vasudeo...
पुस्तक वाचन हे एकमेव मला व्यसन आहे.(आता असे व्यसन लागणे नव जनरेशला अवघड वाटते.)बरयाच लोकांकडे असा अमुल्य ठेवा असतो, ज्याचे मुल्य त्यांना नसते अश्यांकडून मी पण पुस्तके चोरली आहेत.
शैलु
13 May 2010 - 11:08 pm | मिहिर
आता असे व्यसन लागणे नव जनरेशला अवघड वाटते
असे का हो म्हणता? मला आणि माझ्या अनेक मित्रांना आहे.
12 May 2010 - 11:01 pm | श्रावण मोडक
विचारात पडलो. मग आठवले की माझ्याकडे अशीच सहा (आत्ता आठवलेली संख्या ;)) पुस्तके आहेत. जी परत करायची राहून गेली आहेत. गेल्या वर्षभरातील. त्यात 'पारधी' आहे. वपुंचे एक आहे. झाडाझडती आहे. ही पुस्तकं आता परत केलीच पाहिजेत. एक पुस्तक असं आहे की, ते ज्याचं होतं, तो मित्रच मधल्या काळात निवर्तला. ते परत करणं शक्य नाही. त्याची आठवण राहिली.
माझ्याकडची गेलेली पुस्तकं - काही खास आठवतात. 'रारंग ढांग' सहा-सात वेळा खरेदी केलं. व्यक्ती आणि वल्लीचं असंच झालं, संख्या कमी. सिंहासन, स्फोट यांचंही तेच झालं. एक पुस्तक गमावल्याचं दुःख खूप आहे. त्र्यं. वि. सरदेशमुखांचं - 'प्रदेश साकल्याचा'. आणखी एक गमावलं - नावही विसरलो, बहुदा संधीकाल. फ्रिट्जॉफ काप्रा यांच्या बहुदा टर्निंग पॉईंट या पुस्तकाचा अनुवाद. प्रदेश साकल्याचा जिथं गेलं आहे ते समजू शकतो. कारण त्या व्यक्तीला समीक्षा वाचण्याचा थोडा सोस होताच. पण काप्राचं पुस्तक कुठं गेलं हे मात्र आठवूनही आठवत नाही. कारण ते किंवा त्या पठडीतील पुस्तक हवं असणारे कोणी भेटलेलेही आठवत नाही.
काही पुस्तकं मी सांगून उचलतो. रेड सन हे अलीकडचं एक. पण अशावेळी मी त्या पुस्तकाचा मालकी हक्कच हस्तांतरित करून माझ्याकडे घेत असतो. त्याचे मूल्य चुकवतो, तेव्हाच किंवा नंतरही. हा परस्पर नात्यातील मामला असतो.
मित्रही असे असतात, की त्याची नोंद केलीच पाहिजे. परदेशातून येताना विचारतात, काय आणू तुझ्यासाठी? मी पुस्तकांची यादी देतो. मला ठाऊक आहे की हे काम कटकटीचं असतं - प्रवासातील वजन वगैरे अर्थाने. पण माझे बहुतेक मित्र हे काम आवडीनं करतात. माझ्याकडून या पुस्तकाचे पैसेही घेत नाहीत. ती त्यांची भेट म्हणूनच माझ्याकडे राहते. मी पैसे देण्याचा आग्रह केला तर रोष ओढवून घेतला हे नक्की.
12 May 2010 - 11:32 pm | आळश्यांचा राजा
मार्क ट्वेनच्या My Lost Dollar ची आठवण झाली.
माझी पण बरीच पुस्तके अशी गहाळ झाली आहेत. पण मी देखील काही जणांची पुस्तके ढापली आहेत! परत करायची असतात, पण काही कारणांनी विसरतो म्हणा, विचार बाजूला पडतो म्हणा. माझी पुस्तके नेलेल्या लोकांचेही असेच होत असेल.
मूर्ख माणसाने (माझ्या मते) एखादे पुस्तक मागितलं तर मात्र सरळ `नाही' म्हणतो. नंतर होणारी अंगाची आग रोखण्याचा एकमेव उपाय!
आळश्यांचा राजा
14 May 2010 - 4:08 pm | बिपिन कार्यकर्ते
श्रावणशी सहमत... काही ठिकाणी अशी असतात की जिथे पुस्तकं दिली घेतली वगैरे टोचत नाही.
बिपिन कार्यकर्ते
21 May 2010 - 8:27 pm | राघव
मी पुस्तक मागितले कुणी तर शक्यतो नाही म्हणत नाही.
अर्थात् काही पुस्तकं ही केवळ संदर्भासाठी म्हणूनच ठेवलेली आहेत. ती मी कुणालाही घेऊन जाऊ देत नाही. इथे बसा अन् वाचा.
जी पुस्तके बाजारात सहज उपलब्ध आहेत (आणि ज्यांत काही भावनिक गुंतवणूक नाही) ती देण्यास मी मागेपुढे पाहत नाही. परत येणार नाही अशीच समजूत करून देतो. परत आले तर बोनस. आपली ईच्छा झाली ते पुस्तक वाचायची तर सरळ विकत घेऊन येतो. टेन्शन नाय!
राघव