कलि...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in काथ्याकूट
7 May 2010 - 12:36 pm
गाभा: 

एकदाचे विशेष कोर्टाने निकाल दिला…!

अ‍ॅड. उज्वल निकमांच्या कारकिर्दीत अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला.

कृरकर्मा अजमल ‘कसाब’ ला फ़ाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. एकुण चार गुन्ह्यांसाठी मरेपर्यंत फाशी आणि पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप.

फाशी : १६६ निरपराधांची हत्या व हत्येचा कट, हत्येसाठी मदत करणे, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, दहशतवादी कृत्य इ. गुन्ह्यांसाठी फ़ाशी.
जन्मठेप : हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान व स्फोटकेविषयक कायदा याच्याशी संबंधीत पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप.

शिक्षा ऐकली आणि त्या तीन दिवसात मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवणार्‍या पत्थरदील कसाबचा घसाच कोरडा पडला. सुनावणीच्या दरम्यान खाली मान घालून बसलेला ‘कसाब’ शिक्षेची कल्पना आल्यावर चक्क रडायला लागला. शिक्षा सुनावण्यात आल्यावर त्याने पाणी मागितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायमुर्तींनी कंदाहार प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये म्हणुन लवकरात लवकर कसाबला फाशी देण्याची शिफारसही केली….!

आता येणारे काही आठवडे पुढच्या प्रक्रिया चालू राहतील. विशेष कोर्टाच्या या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्का मोर्तब होणे अत्यावश्यक आहे. कसाबने अपील केले नाही तरी त्याच्याविरुद्धचे पुरावे तपासून फाशीच्या योग्यायोग्यतेची तपासणी हायकोर्टाला करावी लागेल. त्याच्याही नंतर कसाबला सुप्रीम कोर्ट आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज असे पर्याय असतीलच. तेव्हा प्रत्यक्ष शिक्षेच्या अंमलबजावणीला अजुन किती वाट पाहावी लागेल? फाशीची शिक्षा प्रत्यक्षात येइल का? असे अनेक प्रश्न सद्ध्यातरी अनुत्तरीतच राहणार आहेत.

पण या सर्व घडामोडीत एक विचार मनात आल्यावाचून राहवत नाही…

गंमत वाटली, शेकडो लोकांना हसत हसत मृत्युमुखी धाडणारा, सहजपणे लहान मुले, वृद्ध, स्त्री, पुरुष कसलाही विचार न करता सरसकट सगळ्यांवर निर्विकारपणे गोळीबार करणारा कसाब, केसची सुनावणी चालु असताना निर्लज्जपणे हसणारा कसाब… स्वतःचा मृत्यु समोर दिसायला लागल्यावर मात्र चक्क रडला. मग नक्की कुठला कसाब खरा? निर्विकारपणे शेकडो निरपराधांची हत्या करणार क्रुर ‘कसाब’ किं स्वतःचा मृत्यु समोर दिसल्यावर रडणारा, मृत्युला भिणारा एक भित्रा माणूस (?)

कुठलीही व्यक्ती इतक्या थराला कशी काय जावू शकते? ‘कसाब’ किंवा कुणीही अतिरेकी इतक्या कृरपणे आपल्याच सारख्या इतर मानवांची हत्या कशी काय करू शकतात? प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या आईच्या पोटातून जन्म घेतलेला असतो. प्रत्येकामध्ये कुठेतरी मानवी अंश असतोच असतो. पण मग ही माणसे आपले माणुसपण का विसरतात?

“नैनं छिंदंती शस्त्राणी……..” हे कितीही मान्य केलं तरी त्या आत्म्याला जोपर्यंत कुडीची साथ असते तोपर्यंत त्याला काहीतरी अस्तित्व असतं. ओळख असते. ती ओळख, ते अस्तित्व मिटवण्याचा अधिकार माणसाला कोण देतं? आपल्याच सारख्या माणसांवर शस्त्र उगारताना, त्याचं रक्त सांडताना काहीच भावना निर्माण होत नाहीत का मनात? देवाची, गेलाबाजार पोलीसांची भीती एकवेळ नाही वाटत असे म्हणता येइल्…पण तुमची सद सद विवेक बुद्धी ? तिचे काय? काल ऑफीसमध्ये रागाच्या भरात एका सहकार्‍याला “तु गप बे भें….!” म्हणून शिवी दिली. तर काल रात्री बराच वेळ झोप नाही आली मला. आम्हा दोघांच्या भांडणात त्याच्या किंवा कुणाच्याच बहिणीला आणण्याचा काय नैतिक अधिकार होता मला? मला खरेच झोप आली नाही. कितीतरी वेळ या अंगावरचे त्या अंगावर होत राहीलो. शेवटी त्या सहकार्‍याला रात्री २.३० वाजता “सॉरी यार!” म्हणून समस केला. त्यानंतर कुठे डोळा लागला.

मग माझ्याच सारखा एक माणूस इतक्या निर्विकारपणे शेकडो जणांच्या हत्या कशा काय करू शकतो? बरं.. या हत्या करताना त्याच्या चेहर्‍यावर कुठलीही अपराधीपणाची भावना नसते. अनेक कारणे असु शकतात याची, धर्मांधता, एखादा पुर्वग्रह, दुराग्रह, ब्रेन वॉशिंग मला त्याच्या मुळाशी जायचे नाहीय. माझा प्रश्न असाय की मुळात परमेश्वर अशी शक्यताच कशी निर्माण करू शकतो? (जर तो असेल तर.) त्यानेच निर्माण केलेले एक अस्तित्व दुसर्‍या अस्तित्वाच्या मुळावर उठलेय की कल्पना त्याला सहनच कशी होते? (अर्थात परमेशराने सृष्टीच्या बाबतीत निर्माण केलेले जिवन चक्र हा वेगळा विषय आहे.) क्षणात माणसाचा राक्षस का होतो?

कलि .. कलि म्हणतात तो हाच का?

विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया

कलि हा विष्णुचा अवतार मानला जातो.
उगाच घोड्याची शेपुट गाढवाला जोडु नका.

वेताळ

अमोल नागपूरकर's picture

7 May 2010 - 1:39 pm | अमोल नागपूरकर

कल्की हा विष्णुचा दहावा अवतार मानला गेला आहे, कली नव्हे. कली तर अधर्म आणि अनाचाराचे प्रतीक आहे.

विशाल कुलकर्णी's picture

7 May 2010 - 1:40 pm | विशाल कुलकर्णी

उगाच घोड्याची शेपुट गाढवाला जोडु नका.>>>>

माणुस जेव्हा वाईट वागतो तेव्हा त्याच्या अंगात कलि शिरला असे म्हणण्याची पद्धत आहे. आजचे युग दिवसेंदिवस विनाशाच्या, अधर्माच्या मार्गावर चालते आहे म्हणुन याला कलियुग म्हणले जाते. त्या पार्श्वभुमीवर मी कलि हा शब्द वापरला आहे. कलि हा शब्द 'कसाब' साठी नव्हे तर माणसाच्या मनात असणार्‍या 'कसाब' वृत्तीवर आहे.

बाय द वे माझ्या माहितीप्रमाणे विष्णुचा अवतार कल्कि आहे , कलियुगात मानवाची रक्षा करण्यासाठी भगवान विष्णू जो अवतार घेतील तो कल्की असेल.
< की कलिलाच कल्कि म्हणतात. सुज्ञ मिपाकर सांगतीलच.

Hindus believe that human civilization degenerates spiritually during the Kali Yuga,[5] which is referred to as the Dark Age because in it people are as far removed as possible from God. Hinduism often symbolically represents morality (dharma) as a bull. In Satya Yuga, the first stage of development, the bull has four legs, but in each age morality is reduced by one quarter. By the age of Kali, morality is reduced to only a quarter of that of the golden age, so that the bull of Dharma has only one leg.[6][7]

Kali Yuga is associated with the apocalyptic demon Kali, not to be confused with the goddess Kālī (these are unrelated words in the Sanskrit language). The "Kali" of Kali Yuga means "strife, discord, quarrel, or contention."

मुळ दुवा : http://en.wikipedia.org/wiki/Kali_Yuga

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अरुण मनोहर's picture

7 May 2010 - 3:40 pm | अरुण मनोहर

माझे दोन पैशांचे मत असे आहे-->

प्रत्येक माणसात सत आणि असत (ईश्वर आणि कलि म्हणा हवे तर) अशा दोन प्रवृत्ती असतात. आपण केलेली सगळी कृत्ये ही ह्या दोन तत्वांच्या मिसळीतून जो एकत्रित परिणाम येतो, त्यानुसार ड्राईव्ह केली जातात. टोकाची उदाहरणे द्यायची तर एखादे कृत्य पुर्णपणे सत भावनेने केले असेल (०% कलि + १००% ईश्वर), किंवा एखादे पूर्ण सैतानी कृत्य असेल. (१००% कलि + ०% ईश्वर).

प्रत्येक माणूस हा वेळोवेळी ० ते १०० च्या स्केल वर एकत्रित परिणाम येणारे कृत्य करीत असतो. त्याची आजवरच्या आयुष्यातील सरासरी जर पाहीली, तर त्यावरून, आजवर तो एक सज्जन किंवा दुर्ज्रन माणुस आहे असे म्हणता येते. पण हे फक्त आजवरच. कारण परिस्थितीमुळे किंवा आत्मनिर्धारामुळे भविष्यात तो वेगळाही बनू शकतो.

>>>क्षणात माणसाचा राक्षस का होतो?<<<
मला नाही असे वाटत. एकदम वेडाचा झटका आल्याचे उदाहरण सोडले, (किंवा टीव्ही सिरीयल मधले किरदार सोडले ;)) , तर स्वभावात बदल असा क्षणात होत नसतो. त्याला एकूण योजनाबद्ध, किंवा दूरगामी परिस्थितीजन्य ईतिहास कारणीभूत होतो.

कसाबच्या बाबतीत कदाचित योजनाबद्ध नियोजन (पक्षी ब्रेनवॉशींग) हे कारण असेल.

हर्षद आनंदी's picture

7 May 2010 - 4:20 pm | हर्षद आनंदी

नको करुस.. आणि ह परमेश्वर वगैरे कोणी करत नाही.. करतो तो माणुस..
त्याला आधीपासुनच जगदनियंता व्हायची खाज आहे.. ती प्रत्येकाच्या खाली खाजवत असते.. ज्याच्या नशिबात ताकद \ सत्ता मिळते तो सत्तेचा वापर ही खाज शमवायला करतो..
सत्तेची धुंदी डोळ्यावरअसली काही केले जाते घौरी, मुघल, हबशी, ईंग्रज, पोर्तुगीज.. नाझी सगळीकडे तेच आहे रे..

निसर्गाने दिलेली बुध्दीमत्ता, विचार करण्याची शक्ती हीचा गैरवापर करणे हीच माणसाची सवय आहे.. अनादी काळा पासुनची ..

गोळी घालुन दुसर्‍याला मारणे सोपे आहे, अरे किती मोठे वीर, राजे, महाराजे होऊन गेले पण मृत्युला कवटाळणारे अगदी थोडे.. आणि हा तर साला धर्मांध, कुणीतरी भडकावुन दिल्याने माणसे मारत सुटलेला सैतान.. हा मरणारच होता त्यालाही माहीती होते, पण उसने अवसान आणुन बसला होता, भारतीय न्याय(??) प्रक्रीयेत किमान 10-12 वर्षे आरामात जगु असे त्याला वाटत असणार.. हा रडला तर विचार करण्यासारखे काय??

so just chill.. let him cry ..he deserve it..

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

अमोल केळकर's picture

7 May 2010 - 4:39 pm | अमोल केळकर

फारच गहन , मोठा विषय आहे.
मान्यवरांचे प्रतिसाद वाचायला आवडतील

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अविनाशकुलकर्णी's picture

7 May 2010 - 9:15 pm | अविनाशकुलकर्णी

शिक्षेची अंमल बजावणी व्हायला..खुप वेळ आहे..कसाबचा नंबर ५८ आहे..तो पर्यंत तो सरकारी जावै बनुन बिर्याणी चापत राहिल...मग माझ्याच सारखा एक माणूस...हे विधान पट्ले नाहि..दोन हात व पाय तुमच्या सारखे आहेत म्हणुन तो तुम्च्या सारखा होत नाहि..मनाचा विचार करा ते तुम्च्या इतके सरळ नसुन क्रुर आहे..असे वाटते...
तरीपण चु.भु.दे.घे.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

8 May 2010 - 9:44 am | डॉ.श्रीराम दिवटे

कसाब सारख्या कलि व्रुत्तीच्या लोकांची-खरे तर बदमाशांची फाशीसाठी भलीमोठी रांग लागलेली असतांना कसाबचा फाशी हिसाब होईल्से वाटत नाही...