फुन्सुक फडके

विकास's picture
विकास in काथ्याकूट
28 Apr 2010 - 6:35 pm
गाभा: 

कालच्या म.टा. मधे "फडकेंचा फुन्सुक" हा एक छोटासा लेख आला आहे. लेख दिनेश कानजी पण (त्यांच्या शेवटच्या वाक्यावरून) अरूणाचल प्रदेशातीलच दिसत आहेत. त्यातील काही वाक्ये (लेख कृपया तेथेच वाचा)

फुन्सुक हे नाव असू शकतं हे ' थ्री इडियट्स'मुळे कळलं. पण पडद्यावर न दिसलेला एक मातृभक्त फुन्सुकही आहे. मुंबईतल्या मराठी घरात तो मोठा झाला. सध्या अरुणाचलात असूनही महाराष्ट्रातल्या आईचं ऋण तो अद्याप विसरलेला नाही.
...
इथली काही मुलं तुम्ही मुंबईत घेऊन जा. त्यांना तिथे शिकवा, शहाणंसुरतं करा, असा सल्ला लाला यांनी दिला. मुंबईतून आलेल्या आचार्य आणि परांजपेंना ही कल्पना मनापासून आवडली. त्यांनी अरुणाचलातली १७ मुलं निवडली...फुन्सुकच्या आई-वडिलांची समजूत काढून ते त्याला मुंबईत घेऊन आले. त्यावेळी त्याचं वय होतं अवघं पाच वर्षं. १९६७ ते १९८५ या काळात हा मुलगा सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या घरी लहानाचा मोठा झाला आणि अरुणाचलात परतला. सध्या तो तावांगमध्ये जॉइण्ट डायरेक्टर को-ऑपरेटिव्ह या सरकारी पदावर काम करतो...
...नुकतेच श्रीधर फडके अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. याच काळात त्यांची आई आजारी पडली. दौरा रद्द करणं अशक्य होतं. फुन्सुकला हे कळलं आणि पंधरा दिवस सुट्टी टाकून त्याने थेट मुंबई गाठली. या काळात त्याने आईची सेवा केली. तिला बरं वाटल्यावरच तो परत गेला.

आपण बर्‍याचदा सध्याच्या भ्रष्टाचाराबद्दल, आधीच्या (नेतृत्वाच्या) चुकांबद्दल, सामान्य माणसाच्या (सामाजीक) निष्क्रीयतेबद्दल बोलत असतो, लिहीत असतो, तावातावाने चर्चा देखील करत असतो. पण ज्यांना काहीतरी करायचे असतात ते विविधांगाने कामे करत असतात. त्याची फळे कधी मिळतील कशी मिळतील आणि कुणाला, याचा विचार न करता...

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

28 Apr 2010 - 6:45 pm | नितिन थत्ते

छान माहिती.

फडके यांचे अभिनंदन.

नितिन थत्ते

चिरोटा's picture

28 Apr 2010 - 6:46 pm | चिरोटा

भेंडी
P = NP

संदीप चित्रे's picture

28 Apr 2010 - 6:49 pm | संदीप चित्रे

फुन्सुक बाबूजींच्या घरी इतकी वर्षे होते ह्याचा गाजावाजा बाबूजी किंवा त्यांच्या कुटुंबियांनीही कधी केला नाही !

कालच म.टा.मधे हा लेख वाचला होता. इथे धागा सुरू केल्याबद्दल धन्स विकास.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धमाल मुलगा's picture

28 Apr 2010 - 7:46 pm | धमाल मुलगा

व्वा!
क्या बात है!

फुकाच्या समाजसुधारणेच्या रिकाम्या गप्पा मारणार्‍यांसाठी हे एक खुप खुप मोठे उदाहरण ठरावे.
बाबूजी मोठे होतेच, आदरही होताच...आता तर ही बातमी समजुन तो आदर कैकपटीने वाढला!

धन्यवाद विकासराव.

चंबा मुतनाळ's picture

28 Apr 2010 - 8:27 pm | चंबा मुतनाळ

फडक्यांशी नाते असल्या कारणामुळे लहानपणी, दीपकशी (फुन्सूक) खेळल्याचे आठवते आहे.
ईतर वांड मुलांसारखाच हा पण वांड पोट्टा होता, त्यामुळे आमचे जमत असे.
आता मात्र कित्येक वर्षांमधे भेट नाही. मधे श्रीधरदादांकडे जायचा योग आला तेंव्हा दीपकची मुलगी भेटली होती.

- चंबा

विकास's picture

28 Apr 2010 - 9:55 pm | विकास

फडक्यांशी नाते असल्या कारणामुळे लहानपणी, दीपकशी (फुन्सूक) खेळल्याचे आठवते आहे.

अरे वा! हा लेख येथे टाकल्याचा फायदा झाला तर... नवीन माहीती समजली. अजूनही या संदर्भात आठवण असली तर अवश्य टाका येथे!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

रा स्व संघाचे ज्येष्ट प्रचारक कै. भैय्याजी काणे यांनी फार दूर चा विचार करुन पूर्वांचल विकासाचा प्रकल्प अक्षरशः एक हाती पेलला होता. त्याने आता व्यापक स्वरुप धारण केले असून महाराष्ट्रात सांगली, रत्नागिरि, संभाजी नगर सह अनेक ठिकाणी असे विद्यार्थी / विद्यार्थिनी राहात आहेत. दर महिन्यात एकदा त्यांचे माता - भोजन होते. समाजातील अनेक कुटुंबे / माता त्यांचे सोबत सह भोजन करतात.. या विद्यार्थ्यांचा सारा खर्च समाजाच्या देणगी वर चालतो. त्यांच्या वर राष्ट्रीय संस्कार होतात.. अर्थातच संघाचा (जनकल्याण समिती) प्रकल्प असल्याने सरकारी मदतीचा प्रश्नच नाही. आणी गरजही नाही आपला विराट समाज पुरुष असे प्रकल्प पेलायला समर्थ आहेच आणी इच्छुकही आहे.

राघव's picture

28 Apr 2010 - 11:57 pm | राघव

कितीतरी मोठ्या गोष्टी काही माणसं सहज करून जातात. खूप कौतुक वाटतं.
धन्यवाद विकास. :)

राघव