दिपालीताईने परवा दुधीचे पराठ्याची पा़कृ टाकली, आमचं तोंड खवळलं...
आता असं नाही की मला दुधीचे पराठे आवडतात..आवडतो दुधीचा हलवा. तर पेश करतो आहे दुधी हलवा.
साहित्य :
१. १ दुधी - धुवून आणी साल काढून.
२. २५० ग्रॅम खवा किंवा २ मोठे ग्लास दुध
३. ३-४ चमचे साजूक तूप
४. ८-१० मोठे चमचे साखर
५. सजावटीसाठी काजू, बदाम, बेदाणे.
कृती:
सर्वप्रथम साल काढलेला दुधी किसून घ्या.
एका नॉन स्टीक पातेल्यात अथवा लोखंडी कढईत ३-४ चमचे साजूक तूप घ्या.
तूप गरम झालं कि त्यावर दुधीचा किस टाका.
दुधीचं सगळं पाणी अटेपर्यंत हालवत रहा.
पाणी अटल्यावरही २ मिनिटे दुधी खरपूस होईपर्यंत भाजा.
आता त्यात खवा हाताने चुरून टाका. खवा नसल्यास २ मोठे ग्लास दुध टाका.
हे मिश्रण मध्यम आचेंवर हालवत अटवा.
दुध पुर्णपणे अटल्यावर त्यात साखर घाला.
सगळं मिश्रण एकजीव होऊ द्या. थोडा वेळ अटवा.
थंड झाले की वरून काजू-बदाम-बेदाण्यानी सजवून खा.
(हा हलवा गरम गरम खायलाही मस्त लागतो.)
बनवण्यासाठी वेळ : एक ते सव्वा तास.
प्रतिक्रिया
28 Mar 2010 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुधी हलवा भारी दिसतोय...!
-दिलीप बिरुटे
28 Mar 2010 - 1:04 pm | पिंगू
मग कधी बोलावताय चव चाखायला!!!!!!
28 Mar 2010 - 2:28 pm | अनुप्रिया
यम्मी दिसतोय ! सहज आठवला म्हणून एक विनोद ------
एका प्रदर्शनात २५ पैशात पोटभर दुधी हलवा अशी पाटी लावली होती, खूप गर्दी जमलअताजो कोणी आत जाई हसत बाहेर येत असे पण का ते कोणीच एकमेकाना सांगत नव्हते कारण "आतमध्ये एका दोरीला दुधी लटकवला होता"...........हलवा हवा तेव्हढा.
पण तुम्ही पाहुणचार खायच्या दुधी हलव्याने करणार ना ?
28 Mar 2010 - 5:05 pm | गणपा
माताय मनसोक्त सुका मेवा टाकलाय.
जबरा दिसतोय.
28 Mar 2010 - 5:10 pm | चिरोटा
मस्त बनवलाय. थंड हलवा गरम पोळीबरोबर पण चांगला लागतो.
भेंडी
P = NP
28 Mar 2010 - 7:24 pm | दिपाली पाटिल
एकदम खल्लास दिसतोय हलवा...मला दुधी आणि गाजर हलवा खुप आवडतो पण आई कधीच बनवायची नाही आणि आता मला येतच नाही..एक-दोनदा बनवला होता तेव्हा फारच पाणचट झाला होता....आता अमेरिकेत गेल्यावर नक्कि नक्कि बनवेन...
वाचनखुण साठवल्या गेलेली आहे...
दिपाली :)
28 Mar 2010 - 7:56 pm | चित्रा
पाककृती आणि चित्र छानच! पण एवढे काजू-बेदाणे?!
हलव्यात नुसते बदामाचे कापही छान लागतात.
28 Mar 2010 - 9:05 pm | चतुरंग
अरे काय रे हे, दुधी हलवा का सुकामेलवा?!! :D
जबरा!!
(खुद के साथ बातां : टाकतो म्हणला पाकृ आणि खरंच टाकली की रे, मला वाटलं बोलाचाच दुधी आणि ४ आण्याचा हलवा की काय! :?)
चतुरंग
29 Mar 2010 - 6:24 am | प्रभो
सर्वांचे धन्यवाद.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
29 Mar 2010 - 11:14 am | स्वाती दिनेश
दुधीहलवा मस्त झालेला दिसतो आहे, पण सुका मेवा सढळ हाताने 'ओतला ' आहेस की रे.,:)
स्वाती
29 Mar 2010 - 7:13 pm | रेवती
हलवा मस्त दिसतोय!:)
प्रभो हा छुपा 'गणपा' आहे.;)
रेवती