भरलेले पडवळ

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
17 Mar 2010 - 5:05 pm

सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.

तसं पाहता पडवळाला नाकं मुरडणारेच जास्त दिसतील पण ही खास माझ्या सासूबाईंची भरलेल्या पडवळाची पाककृती...एकदा तरी करून पाहाच ... आवडणार नाही अस्सं होणारच नाही... सोबतीला सायीचं दही असेल तर काय सांगूच नका.

या पाकृसाठी अगदी लहान लहान नाजूक पडवळ निवडावेत...भारतातले अगदी मस्त असतात...अमेरिकेत बर्‍याचदा कडू निघाले होते तेव्हा जरा बघून घ्यावेत ...जर लहान पडवळ असतील तर पडवळ उकडून घेतले नाहीत तरी चालेल पण जरा जून किंवा जाड साल असलेल्या पडवळ साफ करून २-२ इंचाचे तुकडे करावे आणि पडवळांना फोर्कने २-३दा टोचून घ्यावे. आता या पडवळांना थोडं मीठ घालून उकडून घ्यावे, नंतर १०-१५ मिनिटे चाळणीत निथळत ठेवावे. अर्धा किलो पडवळ ४-५ लोकांना पुरतं.

यासाठीचं सारण दोन प्रकारे बनतं एक असतं बेसनाचं आणि दुसरं दाण्याच्या कुटाचं...पण आता मी तुम्हाला बेसनाचे सारण भरून केलेल्या पडवळाचे फोटो आणि पाककृती सांगणार आहे. पुढे कधीतरी दाण्याच्या कुटाच्या पडवळाचा फोटो आणि पाककृती टाकेन.

तर या बेसनाचं सारण बनवायचं कसं???

अर्धा किलो पडवळासाठी १ ते दीड वाटी बेसन घ्यावे, त्यात चवीनुसार तिखट (अंदाजे २ चमचे),गरम मसाला (१ चमचा) आणि मीठ घालावे. या मिश्रणात एक लहान चमचा हळद, १ टेबलस्पून धणे-जिरे पावडर आणि २ चमचे तेल घालावे...आवडत असल्यास १ चिमूट ओवा+ १ चिमूट जिरे घालावे... आता हे मिश्रण हाताने सारखे करून घ्यावे आणि याचे अंदाजे पडवळाच्या तुकड्यांएवढे गोळे करून घ्यावेत...बेसनाचे सारण तय्यार आहे.

पडवळाच्या तुकड्यांमध्ये हे बेसनाचे सारण भरून घ्यावे...पण एखाद्-दोन चमचे सारण बाजूला काढून ठेवावे, सगळेच वापरू नये.

आता १ चमचा तेलात जिरे-मोहरी-हिंगाची फोडणी द्यावी आणि त्यात हे सारण भरलेले पडवळ सोडावे आणि छान खरपूस परतून घ्यावे...पडवळ झाल्यानंतर त्यात बाजूला ठेवलेले सारण घालावे आणि ५-७ मिनिटे परतावे...तसा पडवळाला खरपूस होण्यास जरा वेळ लागतो...अंदाजे ३०-३५ मिनिटे...

कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Mar 2010 - 5:36 pm | विसोबा खेचर

दिपाली, जियो..!

फोटू लै म्हणजे लैच भारी.. :)

तात्या.

गणपा's picture

17 Mar 2010 - 5:40 pm | गणपा

पडवळाला बाप जन्मात कधी तोंड लावल नाही.
पण भरलेल्या प्रकारांत भोपळी मिरची, भेंडी, वांगी, साधी मिरची, कारली, अंडी, पापलेट =P~ , बांगडा =P~ =P~ इत्यादी प्रकार खाल्लेत.
आता हा नवा प्रकारही करुन पहायला हवा एकदा.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Mar 2010 - 5:51 pm | बिपिन कार्यकर्ते

गणप्या... लेका एकदा खाऊन बघच... जबरी लागतं हे...

दिपाली, एकदम आवडता प्रकार आहे हा... फोटो पण छानच.

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

17 Mar 2010 - 5:42 pm | रेवती

मस्त पाकृ व फोटो!
शंका: पाण्याचा हबका मारावा लागत नाही का?

रेवती

दिपाली पाटिल's picture

17 Mar 2010 - 5:49 pm | दिपाली पाटिल

शंका: पाण्याचा हबका मारावा लागत नाही का?
नाही...कोवळ्या पडवळाला पाण्याची गरज पडत नाही आणि जून पडवळ असंही उकडून्च घेतलेलं असतं...

दिपाली :)

टारझन's picture

17 Mar 2010 - 7:38 pm | टारझन

कधी बोलावताय दिपाली तै ? आहो त्या कोंबड्या मुक्ती साठी वाट पाहात आहेत ! :)

मदनबाण's picture

17 Mar 2010 - 6:44 pm | मदनबाण

फोटो पाहुनच पाकृ वाचायचे सोडुन दिले,च्यामारी पडवळ इतक्या भारी पद्धतीने मांडलेला पाहुन मस्त वाटलं !!! :) एकतर हा पडवळ फडवळ आपल्याला काय आवडत नाय...पण ताटात आलेली ही भाजी नाखुशीनेका होईना मी माझ्या पोटोबात ढकलतो.फोटो पाहुन मला पहिल्यांदी भरलेले कारले वाटले,खोबरं दाण्याच कुट आणि चिंचेच्या चवीने भरलेल कांद्याच सारण...
आता फोटुच एव्हढा भारी हाय तर भाज्जी नक्कीच स्वालिट्ट्ट असणार... :)

अवांतर :--- आमच्या इथे एका बागेत एक जाड जुड हिरवा साप येऊन पडला होता...लोक तिथे जाण्यास घाबरत होते,काहींनी दगड सुद्धा मारुन पाहिला...साप बहुधा मेलेला असावा असा अंदाज करुन एक जण त्याच्या जवळ गेला तर पाहतो तर काय त्या सापाला डोकेच नव्हते,कसे असेल? तो तर पडवळ होता...कोणी तरी पोरानं टारगटपणा करुन तो लांब लचक पडवळ तिथे टाकुन ठेवला होता...लोकांची टरकवण्यासाठी !!! ;)

(कडु कारलेसुद्धा गोड मानुन खाणारा)
मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2010 - 7:01 pm | स्वाती दिनेश

पाकृ आणि फटू दोन्ही मस्त...
स्वाती

शुचि's picture

17 Mar 2010 - 8:26 pm | शुचि

सुरेख छायाचित्रे आणि पाककृती. दिपाली आपण अतिशय सुग्रण दिसता. कधी रगडा पॅटीस तर कधी भरले पडवळ. : )

प्राजु's picture

17 Mar 2010 - 8:58 pm | प्राजु

जबरदस्त!!
पडवळ की वळवळ... नाहीच आवडत. पण फोटो बघून करेनच एकदातरी.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

पक्या's picture

17 Mar 2010 - 10:04 pm | पक्या

फोटोवरून छान वाटतेय रेसिपी.
आमच्या भागात मला कधी दिसला नाही पडवळ. इंग्लीश मध्ये काय म्हणतात ह्या भाजीला? नाव कळल्यास शोधायला सोपे जाईल.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

चतुरंग's picture

17 Mar 2010 - 10:23 pm | चतुरंग

स्नेकगोर्ड

(दोडका)चतुरंग

सुमीत भातखंडे's picture

17 Mar 2010 - 10:35 pm | सुमीत भातखंडे

वॉव. मस्त फोटू.

बहुगुणी's picture

17 Mar 2010 - 10:36 pm | बहुगुणी

चित्रादेव's picture

18 Mar 2010 - 4:00 am | चित्रादेव

अग दिपाली, ते बेसन असे शिजते? कच्चे नाही रहात? तू कच्चे बेसन आत भरतेस ना? व पाणी ही नाही घालत ना ग्रेवी साठी?

मला पडवळ व वालाची उपवासाची भाजी आवडते. पण इकडचे कसले राठ पडवळ असतात.. घेवत नाहीत.

दिपाली पाटिल's picture

18 Mar 2010 - 9:05 pm | दिपाली पाटिल

अगं चित्रा एक-दोनदा झाकण ठेवावं पण तेल असतं ना या बेसनात त्याने शिजतं ते पडवळ बरोबर...अमेरिकेतले पडवळ राठ तर असतातच पण कडूही निघतात म्हणून घ्यावेसे वाटत नाही हे ही खरे...

दिपाली :)

शार्दुल's picture

18 Mar 2010 - 9:17 pm | शार्दुल

दिपाली,,,,,,मस्त पाकृ व फोटो,,, नक्की करुन पाह ते! :)

नेहा

हरकाम्या's picture

24 Mar 2010 - 12:02 pm | हरकाम्या

पडवळाचा मी पण चाहता आहे. पण ही " रेसिपी " प्रथमच पाहिली.
" झकासच "

अम्रुताविश्वेश's picture

25 Mar 2010 - 7:43 pm | अम्रुताविश्वेश

मी हा प्रकार केलेला आहे. खूपच छान लागतात.

:)