असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २
वाचकमित्रहो,
नमस्कार! वणक्कम! वन्दनम! "असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १" ह्या स्फुटास मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे दुसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे.
तमिळ - जागतिक पातळीवर ’अभिजातभाषा’ म्हणून गौरविली गेलेली ही भाषा. मराठीभाषिकांच्या दृष्टीतून पाहावयाचे झाल्यास; मराठीभाषकांच्या समोर तमिऴभाषा ही संपूर्णत: अनाकलनीय आणि काहीशी चमत्कारिक अशी अवतीर्ण होते. तौलनिक भाषाभ्यास हा दोन्हीही भाषकांसाठी साहित्याचा परमानंद लुटता येण्याचे एक साधन होय. मराठीभाषकास ह्या भाषेच्या व्याकरणनियमांची / काव्यशास्त्रीय नियमांची थोडी तोंडओळख करून दिल्यास, ह्यातील चमत्कृती संपुष्टात येवून ती शिकण्यात गोडी वाटू लागू शकेल असे वाटते.
---
’उपक्रम दिवाळी अंक २००९ मध्ये लेख लिहाल काय’ अशी विचारणा करणारा व्यनि जेंव्हा आला, साधारण त्याचवेळी येथे मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर दिल हैं छोटासा ह्या गीताबद्दल लिहिले होते. ते असे -
अर्थपूर्ण आशय असलेलं एका वेगळ्याच परंतु तेवढ्याच फ्रेश ढंगातलं गाणं. एखाद्या फुलपाखरासारखं सुंदर आणि तेवढंच हलकंफुलकं! गाण्याचे शब्द, चाल आणि गायकी तर उत्तमच परंतु या गाण्याला १०० पैकी १०० मार्क जर कुठे द्यायचे झाले तर ते चित्रीकरणाला आणि वाद्यवृंद संयोजनाला. वाद्यवृंद संयोजन आणि त्यातले फिलर्स तर केवळ अफलातून! एरवी गाणं शुद्ध गंधाराधिष्ठित, कानांना शुद्ध गंधाराचं अगदी भरपूर सुख देणारं परंतु 'चांद-तारोको छुनेकी आशा' नंतरच्या 'आसमानोमे उडनेकी आशा..' या ओळीतला शुद्ध मध्यम केवळ आश्चर्यकारक, अद्भूत परंतु तेवढाच आनंददायी! गायलंयही अगदी अल्लडपणे. म्हटलं तर स्वच्छंदपणे स्वत:शीच संवाद साधणारं आणि म्हटलं तर एखाद्याला एखादी गोष्ट अगदी छान समजून सांगावी तसं!
बादलोकी मै ओढू चुनरिया, अपनी चोटी मे बांध लूं दुनीया!
क्या केहेने! सुंदरच लिहिलं आहे गाणं. आणि बांधलंयही तेवढंच छान. चांदतार्यांना छुणार्या आणि आसमानात स्वच्छंद उडणार्या या गाण्याबद्दल रेहमानला सलाम..!
कदाचित वाचकांस ही माहिती नसेल; की हे गीत हे मूळ काव्यरूपांत असून ते ७० च्या दशकात लिहिले गेले होते. श्री. एम एस विश्वनाथन ह्यांनी ते तमिळ दूरदर्शनसाठी संगीतबद्धही केले होते. श्री. मणिरत्नम ह्यांस त्यांच्या नायिकेच्या भावनांचे प्रकटीकरण करण्यास ही कविता उत्कृष्ट वाटली आणि ह्या कारणाने ह्या कवितेचे चित्रपटगीतांत रूपांतर झाले. असो! एका बाजूस ’उपक्रम दिवाळी अंक २००९ चा व्यनि वाचतांना दुसर्या बाजूस मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर सुंदरच लिहिलं आहे गाणं असे लिहिल्याचे पाहिले, आणि हिंदीत डब्ब केलेल्या रोजा चित्रपटातील चिन्न चिन्न आसै ह्या तमिळ गीताचा मराठी अर्थ आणि त्याचे काव्यात्मक रसग्रहण ह्या सार्यासंबंधी एकत्रितरीत्या लिहावे असा काहीसा विचार करून ह्याविषयी आतां लिहितो आहे...!
---
मूळ तमिऴ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत मराठीभाषेमध्ये भावार्थ
சின்ன சின்ன ஆசை चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै छोटी छोटी इच्छा
சிறகடிக்கும் ஆசை सिऱगडिक्कुम् आसै पंख फडफडविण्याची इच्छा
முத்து முத்து ஆசை मुत्तु मुत्तु आसै (मोत्यासारखी) छोटी छोटी इच्छा
முடிந்துவைத்த ஆசை मुडिन्दुवैत्त आसै (शिंपल्यात बंद मोत्यासारखी - आजवर) बंद करून ठेवलेली इच्छा
வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै शुभ्र चंद्रम्यास स्पर्शून त्याचा मुका घेण्याची इच्छा
என்னையிந்த பூமி சுற்றிவர ஆசை ऎऩ्ऩै इन्द बूमि चुऱ्ऱिवर आसै सारे हे विश्व फिरून पाहाण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]]... [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...
மல்லிகைப்பூவாய் மாறிவிட ஆசைमल्लिगैप्पूवाय् माऱिविड आसैमोगर्याच्या फुलामध्ये परावर्तित होण्याची इच्छा
தென்றலைக் கண்டு மாலையிட ஆசை तॆऩ्ऱलैक् कण्डु मालैयिड आसै हवेच्या झुळुकीस पाहून, (तिच्या गळ्यात) माळा घालण्याची इच्छा
மேகங்களை எல்லாம் தொட்டு விட ஆசை मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै सार्या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा
சோகங்களை எல்லாம் விட்டு விட ஆசைसोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै सार्या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा
கார்குழலில் உலகைக் கட்டி விட ஆசைकार्गुऴलिल् उलहैक् कट्टि विड आसैकेशरचनेमध्ये सार्या जगतास बांधून घेण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]] [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]...[[छोटी छोटी इच्छा]]...
சேற்று வயலாடி நாற்று நட ஆசைसेऱ्ऱु वयलाडि नाऱ्ऱु नड आसैचिखलामध्ये पायांचे ठसे उमटवित सोडत चालण्याची इच्छा
மீன் பிடித்து மீன்டும் ஆற்றில் விட ஆசை मीऩ् पिडित्तु मीण्डुम् आऱ्ऱिल् विड आसै मासोळीस पकडून पुन्हा पाण्यात सोडून देण्याची इच्छा
வானவில்லைக் கொஞ்சம் உடுத்திக்கொள்ள ஆசைवाऩविल्लैक् कॊञ्चम् उडुत्तिक्कॊळ्ळ आसैइंद्रधनु परिधान करण्याची इच्छा
பனித்துளிக்குள் நானும் படுத்துக்கொள்ள ஆசைपनित्तुळिक्कुळ् नाऩुम् पडुत्तुक्कॊळ्ळ आसैदवबिंदुंच्या आतमध्ये निजण्याची इच्छा
சித்திரத்தின் மேலே சேலை கட்ட ஆசை सित्तिरत्तिऩ् मेले सेलै कट्ट आसैभित्तिचित्रास साडी नेसविण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]]... [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...
---
तमिळभाषेमध्ये एक नियम. जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते.
उदा.
१. एन पेयर हैयो. - माझे नांव हैयो.
२. इदु तमिळमोळियिन नियमम. - हा तमिळभाषेचा नियम.
३. चिन्न चिन्न आसै. - छोटी छोटी इच्छा.
वरिल नियमानुसार प्रथम उदाहरणांत, जोपर्यंत एन पेयर हैयो ’इल्लै’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत माझे नांव हैयो ’आहे’ असेच समजले जाते. दुसया उदाहरणांत जोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’नाही’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’आहे’ असेच समजले जाते.
थोडक्यात कसे, की ’आहे’ असे निराळे सांगण्याची आवश्यकता शिल्लक नाही. हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. काही पाश्चिमात्य भाषाभ्यासकांनी ह्या वैशिष्ट्यास तमिळ समाजाच्या ’दुर्दम्य आशावादाचे मूळ’ असे म्हटले आहे. हे गीत चित्रपटाची नायिका रोजा हिच्या दुर्दम्य आशावादाचे एक काव्यात्मक चित्रण ह्या रूपांत येते. तिला हव्या असलेल्या जवळजवळ सार्याच गोष्टी तिला मिळणे केवळ अशक्यप्राय असूनही ती इच्छा करते. काहीशी स्वप्नाळू मागणी असली तरीही एका विलक्षण आत्मविश्वासाने ती त्या गोष्टी मागते. इच्छा म्हटले की मार्ग येणारच!
---
कुठल्याही काव्यांतील यमकपूर्ति ही एक आवर्तन पूर्ण होण्याचा आनंद देवून जाते. सहसा इतरभाषी काव्यांमध्ये यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येते. तमिळभाषेतही यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येतेच, परंतु त्याशिवाय तमिळभाषेत आणखीही एक वैशिष्ट्य आहे. वाचकांनी वरील कवितेचे निरिक्षण केल्यास असे लक्षात येईल, की प्रत्येक ओळीची दुसर्या ओळीशी यमकपूर्ति होते आहे. काव्यातील झाडून प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द तो एकच आहे, तो म्हणजे ’आसै’. ह्या शब्दयोजनेमागे एक मुद्दा असा, की वाक्याच्या शेवटल्या शब्दावर एक साहजिक जोर येवून त्याचे महत्त्व अधोरेखित करणे; त्यातील अर्थपूर्ण आशयाकडे लक्ष वेधणे. तमिळ ईळम ची अनेक वीररसपूर्ण काव्ये आहेत, ज्यामध्ये आपणांस ही शब्दयोजना आढळून येईल. खरे पाहता ही शब्दयोजना ही वीररसपूर्ण काव्यांत वापरावयाची, परंतु येथे ती भावनाप्रधान गीतामध्ये वापरली गेली आहे - म्हणूनही श्री. तात्या म्हणतांत तसा एक ’फ्रेश ढंग’ येथे अनुभवण्यास मिळतो. एका अर्थाने ही काव्ये प्रासादिक होवून जातात. चित्रपटांतील नायिकाही केवळ एका विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर शेवटी तिच्या नवर्यास परत मिळवितेच नां? असो.
---
तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
---
प्रतिक्रिया
6 Mar 2010 - 8:42 pm | शुचि
फारच सुंदर , अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. आनंद लुटला. . मला मराठीत अशी कविता सपडली नाही दुर्देवाने.
संस्कृतमधील "मधुराष्टक" याच धर्तीवर आहे.
http://www.stutimandal.com/gif_misc/madhurashtakam.htm
असे लेख येऊ अजून द्यात.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
6 Mar 2010 - 10:19 pm | वेताळ
आपले जाम आवडते गाणे आहे हे.
छोटी सी आशा
वेताळ
6 Mar 2010 - 10:33 pm | मदनबाण
वा...भाग २ आला याचा आनंद झाला... :)
असचं मराठी गाणं ह्म्म्म..शोधायला हवं खरं....
बाकी ए.आर म्हंटलं की मला हेच ऐकावेसे वाटते...
http://www.youtube.com/watch?v=7HVsGIj5fdY
हैयो महाशय हे जर तमिळ असेल तर ते मला आवडत...
http://www.youtube.com/watch?v=J_RKWIz5dyE
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
6 Mar 2010 - 11:17 pm | धनंजय
छान लेख. गाणेही आवडतेच.
- - -
येथे मी गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत मराठीतले उदाहरण म्हणून दिले होते. प्रतिसाद उडाल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे.
6 Mar 2010 - 11:24 pm | चित्रा
कुठचे तरी मराठी गाणे असे असणार असे वाटत होते, ते सांगितल्याबद्दल धन्यवाद.
गाण्याच्या अर्थाबद्दल हैय्यो हैय्यय्यो यांचे आभार.
**
इथे सध्या मी एकटीच संपादक (आणि तात्या) दिसत आहेत, म्हणून खुलासा - प्रतिसाद कधी लिहीला आणि कोणी काय उडवला/चुकून उडला हे मला माहिती नाही.
6 Mar 2010 - 11:31 pm | विसोबा खेचर
मलाही काहीच कल्पना नाही..
नक्कीच चौकशी करतो..
धनंजयराव, क्षमा असावी,
तात्या.
6 Mar 2010 - 11:29 pm | शुचि
छान उदाहरण दिलत
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
7 Mar 2010 - 12:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>येथे मी गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत मराठीतले उदाहरण म्हणून दिले होते. प्रतिसाद उडाल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे.
आपण उपक्रमवर गोविंदाग्रजांचे उदाहरण दिले आहे. आपण प्रतिसाद इथेच टंकला होता का ? कारण उपक्रमच्या त्या धाग्यावर आपला प्रतिसाद तिथे विनाकारण आला आहे, असे मला वाटते.
राहिले प्रतिसाद उडवण्याबद्दल, एकतर सध्या वाचायलाच वेळ मिळत नाही. आणि गेले महिनाभरात आम्हाला एकही प्रतिसाद संपादित किंवा डिलीट करण्याची संधी संपादक म्हणून मिळालेली नाही. :)
-दिलीप बिरुटे
6 Mar 2010 - 11:50 pm | ज्ञानेश...
हैयो चे आभार !
मराठीत असा 'काव्यप्रकार' बहुधा नाही, पण अशी कविता मात्र आहे.
सुरेश भटांची ही कविता पहा-
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी ||
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी ||
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी ||
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
आमुच्या फुलाफुलात हासते मराठी
आमुच्या दिशादिशात दाटते मराठी
आमुच्या नगानगात गर्जते मराठी ||
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरूलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी ||
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकामधून डोलते मराठी
येथल्या नद्यामधून वाहते मराठी
येथल्या चराचरांत राहते मराठी ||
पाहूणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे अनेक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ||
जय महाराष्ट्र !
7 Mar 2010 - 12:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तामिळ भाषेतील काव्य आणि त्याची वैशिष्टे समजून घेण्यात आनंद वाटत आहे.
अजून लिहित राहावे...!
-दिलीप बिरुटे
7 Mar 2010 - 3:40 am | धनंजय
बिरुटे सरांनी बघितले ते खरेच!
तात्या, चित्रा - माझी चूक - प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी टंकला...
- - -
महाराष्ट्र गीत
- गोविंदाग्रज
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।
अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।
भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।।
जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी
वैभवासी वैराग्यासी।।
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।1।।
- - -
(जवळजवळ प्रत्येक ओळीच्या शेवटी "देशा" आहे.)
7 Mar 2010 - 4:35 am | राजेश घासकडवी
मूळ कवितेचे शब्द व त्याशेजारी अर्थ वाचता आला तर कवीच्या प्रतिभेची थोडी का होईना कल्पना यायला मदत होते
मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै --सार्या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा
सोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै --सार्या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा
या दोन ओळीत नादसाम्य तर आहेच, पण सोडणे हा शब्द दोन वेगळ्या छटांनी आलेला दिसतो. मराठीत त्या दोन छटा आहेत, पण क्रम बदलावा लागतो.
प्रत्येक ओळीत आलेली शब्दचित्र सुंदरच. रोजा बघितला तेव्हा हिंदी गाण्यातून इतका अर्थ प्रतीत झाला नव्हता.
शेवटचे शब्द एकच ठेवून केलेल्या रचना आत्ता सुचत नाहीत. पण मोरोपंतांच्या काही होत्या असं वाटतं. अर्थात त्यांनी एकच शब्द - किंवा अक्षरमाला वेगवेगळ्या ठिकाणी तोडून अनेक अर्थ बनवले होते. त्यात एक यांत्रिकता, किंवा अतिरेकी कौशल्य येतं असं वाटतं. 'महाराष्ट्र देशा' किंवा 'मराठी' सारखी सहजता नव्हती. आसै मध्ये ती खूपच जाणवते.
धन्यवाद.
7 Mar 2010 - 5:45 am | चतुरंग
'रोजा'तलं हे दिल है छोटासा गाणं अफलातूनच आहे. हिंदी तर आवडतच पण आता तमिळ अर्थ माहीत झाल्यामुळे आधी नुसतीच आवडणारी चाल आता अर्थासहित आवडू शकेल ह्याचे अप्रूप आहे!
हैयोंना धन्यवाद.
वरती राजेशने म्हटले आहे तसे मोरोपंतांच्या काही चमत्कृतीपूर्ण रचना पूर्वी पाठ केल्या होत्या त्यातली एक अचानक आठवली -
देविदयावति दवडिसि दासाची दु:ख दुर्दशा दूर
पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पयःपूर
चतुरंग
7 Mar 2010 - 1:31 pm | उग्रसेन
वळीच्या शेवटी तेच तेच शब्द मराठी कवितेत हायेत
सुरेश भटायच्या 'कुत्रे' या हजलेतील चार वळी पाहा
एकमेकांना कसे हे चावती कुत्रे.
हाडकांसाठी कसे हे भांडती कुत्रे.
हालती या शेपट्याही नेमक्या वेळी
हे जरी संतापलेले वाटती कुत्रे.
हैयो हैयैयो साहेब मंगेश पाडगावकराच्या काय कवितेच्या सुरुवातीला
सारखे शब्द येतात तुमच्या तामिळी कवितेत हाय का तसं ?
बाबुराव :)
7 Mar 2010 - 5:45 pm | ज्ञानेश...
गझल (किंवा हजल)चा फॉर्म असाच असतो, की तिथे दर एका ओळीआड एकच शब्द (अंत्ययमक/रदीफ) येतो. आणि हे प्रत्येक गझलेत होते.
'हैयो' ला हे नक्कीच अभिप्रेत नसावे.
7 Mar 2010 - 3:07 pm | ऋषिकेश
सुंदर लेखमाला
पुढील भागासाठी उत्सूक
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
10 Mar 2010 - 12:23 am | शशिकांत ओक
श्री. हैयौ हैयैयो,
तमिळ काव्य, साहित्य, संगीत रसग्रहण करणाऱ्या नीरक्षीर विवेकी हैयोंना त्रिवार सलाम.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत