प्रसारमाध्यम स्वरुप, कारणे आणि उपाय

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
29 Jan 2010 - 3:25 pm
गाभा: 

मिसळपाव वर सध्या राजु परुळेकर: राजकीय पत्रकार? या भडकमकर मास्तरांनी मांडलेल्या काथ्याकूट मधे अनेकांनी चर्चा केल्यात. ३ जानेवारी २०१० ला अंनिस द्विदशकपुर्ती समारंभात पुण्यातील एसेम जोशी सभागृहात प्रसार माध्यम हा विषय परिसंवादासाठी घेतला होता. संजय आवटे हे तरुण पत्रकार सध्या पुढारीचे निवासी संपादक व सकाळ टाईम्स चे श्री आनंद आगाशे हे पत्रकार यानिमित्ताने बोलत होते. प्रसारमाध्यमातील वृत्तपत्रे व दृकश्राव्य माध्यमे यांचे वेगाने बदलत जाणारे स्वरुप हा समाज बदलाशी निगडीत आहे. पत्रकार हे त्यांचे प्रतिनिधि. पोलिस म्हटल्यावर तंबाखु खाउन पचापचा थुंकणारा, ढेरपोट्या,चेहर्‍यावर ओतप्रोत बुद्धीमांद्य, पैशे खाण्यासाठी सावज हेरणारा असा एक सरकारी माणुस असे नजरेसमोर येते. तसे पत्रकार म्हटल्यावर आपल्याला शबनम झोळी खांद्यावर घेउन चाणाक्ष नजरेने समाजाचे वास्तव टिपणारा एक वृत्तपत्राचा एक प्रतिनिधी असे डोळ्यासमोर येते. आठवा सिंहासन मधला दिगु.
सकाळमधील परुळेकर ते पवार हा बदल पुणेकरांनी कसा पचवला? विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असलेली असलेली पत्रकारिता ही कशी बदलली? हे पहाताना मला संजोपरावांच्या या निर्बुद्ध 'सकाळ' चे काय करायचे? हा लेख आठवला.
निवडणुकीच्या काळात पेड न्युज प्रकरणामुळे लोकांचा झालेला भावनाकल्लोळ हा तात्कालीन असतो. पत्रकारांनी व न्यायाधिशांनी नि:स्पृह असावे ही समाजाची अपेक्षा असते. पोलिसांनी हप्ते खाण यात एक प्रकारची समाजमान्यता असते. पण पत्रकारांनी हप्ते खाण हे समाजाला पटत नाही. वृत्तपत्र/माध्यमसमूहाचे मालक हे कमोडिटि म्हणुन त्याकडे पहातात तर संपादक पत्रकारांनी त्याकडे विपणक म्हणुन पहावे अशी त्यांची अपेक्षा असते. वर्तमानपत्रात छापुन आलय म्हटल्यावर ती सत्य व काळ्या दगडावरची रेघ अस मानणारा समाज वर्तमानपत्रांकडे किती आदराने पहातो. लोकशाहीचे अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठी प्रसारमाध्यमांचा खुपच वाटा आहे. माध्यमांमधील सबसे तेज च्या अंतर्गत स्पर्धा ही विश्वासार्हता खरंच गमावुन बसतात का? मुंबईच्या बॉम्बस्फोट प्रकरणात प्रसारमाध्यमांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे हा मुद्दा अधोरेखीत झाला आहे.वृत्तपत्र. प्रसारमाध्यमांना काही मर्यादा असतात.कोणाकोणाची दखल घ्यायची हा प्रश्न त्यांच्यापुढेही आहेच. प्रसारमाध्यमांना ब्लॉगर्स ची दखल आता घ्यावी लागते. अनेक पत्रकार ब्लॉगर्स आहेतच.मराठी संकेतस्थळावंर लिहिणारे शोध/बोधपत्रकार आहेत. त्यातुन प्रसारमाध्यमांमधील अंतरंग उलगडण्यास मदत होते. मग ते एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराच्या डायरीच्या निमित्ताने लिहिणारे पुनेरी असोत वा राजे लिहिणारे श्रावण मोडक असोत किंवा सट्टाबाजार लिहिणारे दिनेश गुणे असोत. हे समाजातील लोकांचच प्रतिबिंब टिपणारे पत्रकार आहेत. अजुन ही खुप आहेत. कशासाठी लिहितात ही माणसं?
आम्ही कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण तुम्हाला ऐकण्यासाठी केले आहे. पहिल्या भागात संजय आवटे बोलताहेत तर दुसर्‍या भागात आनंद आगाशे बोलताहेत ऐका
Get this widget | Track details | eSnips Social DNA

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

29 Jan 2010 - 4:32 pm | प्रसन्न केसकर

दिल्याबद्दल धन्यवाद!

प्रसारमाध्यमातले वेगाने होणारे बदल ही मला तरी फॅसिनेटींग बाब वाटते. आधी आकाशवाणी, त्यानंतर दुरचित्रवाणी, त्यानंतर न्युज पोर्टल, त्यानंतर ब्लॉग्ज आणि आता ट्विटर... सगळेच जग आता अधिकाधिक वेगवान, आकर्षक होत चाललेय आणि त्याचा परिणाम मुद्रितमाध्यमांवर होणे अपरिहार्य आहे, नव्हे ती काळाची गरजच आहे. या मुळे अनेक नवनवीन व्यावसायिक आव्हाने उभी रहात आहेत.

पुर्वी वृत्तपत्रे मुळात घटना-घडामोडी छापत पण आता त्यांना या सर्व स्पर्धेमुळे ब्रेकिंग न्युज देणे जवळपास अशक्य झाले आहे. सविस्तर वृत्तांत देणेही एका अर्थाने निरर्थक ठरते कारण वृत्तपत्रे बाजारात येण्याआधी कित्येक तास घडलेल्या घटनांवर वृत्तवाहिन्या चर्चेचे दळण दळत रहातात. शिवाय नवीन माध्यमांच्या उदयाने न्युज ही ग्लॅमरस कमॉडिटी झालेली आहे. वाचकांनाही गंभीर विषय वाचण्यात फारसा रस नसतो. त्यांना चटपटीत बातम्याच हव्या असतात हे लक्षात यावे असे प्रसंग वृत्तपत्रात काम करणार्‍या जवळपास प्रत्येकजण रोज अनेकदा अनुभवतो. वाचकाला हवा असलेला मजकुर दिला नाही तर वृत्तपत्र विकले जात नाही हे तर आहेच.

प्रश्न फक्त मजकुर निर्मीतीपुरता मर्यादित राहिलेला नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे जी गुणवत्ता मिळु शकते तिच्याबाबत देखील आहे. आज वृत्तपत्रे, नियतकालिके यात आकर्षक डिझाईन व ले आऊट ला अनन्यसाधारण महत्व आले आहे. पण हे सर्व द्यायचे तर पैसे हवे, अन तिथेच मेख आहे.

पत्रकारांनी व न्यायाधिशांनी नि:स्पृह असावे ही समाजाची अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही, किंबहुना ती असावीच. पण बहुतेकदा पत्रकार, संपादक पगारी नोकर असतात. एखादे साप्ताहिक काढण्याला जो पैसा लागतो (महिन्याला किमान २-५ लाख) तो देणारा फायनान्सर ते पैसे दामदुपटीने वसुल करुन घेऊ इच्छितो अन त्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात.

पत्रकार बहुतेकदा उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित असतात पण ते कंत्राटी कामगार असतात. त्यामुळे कायम असुरक्षित. शिवाय पगार फारच कमी अन व्यवसायाला आवश्यक खर्च इतर व्यावसायिकांपेक्षा अनेक पटीने जास्त अन बहुतेक सर्व खर्च ते पगारातुन करतात. सामान्यतः पत्रकाराचा वर्किंग डे १२-१६ तासांचा असतो. त्यामुळे त्यांना सोशल्-पर्सनल लाईफ जवळपास नसते. पत्रकारितेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गळती होते अन तडजोडीही होतात. तात्विक भुमीकेशी ठाम असलेले काहीजण आपला बाणा जपतात पण वाचक, वृत्तपत्र मालक, संपादक यापैकी कुणालाच गंभीर विषयांवरची पत्रकारिता नको असते अन त्यातुन गुणवत्ता अजुनच ढासळते.

अनेकदा पत्रकारांचा गैरवापर हुश्यारीने करुन घेतला जातो. बातमीच्या भुकेल्या किंवा भारावलेल्या पत्रकारापुढे चुकीचे चित्र उभे करुन हव्या तश्या बातम्या छापवुन आणण्याचे प्रयत्न रोजच सुरु असतात अन काहीवेळा माहिती खरी की खोटी याचा अंदाज येणेही अशक्य व्हावे अशी परिस्थिती असते. पण ज्यांना वस्तुस्थिती माहिती आहे असे वाचक ओळखतात पण अनेकदा ते पत्रकार कसे नालायक याचे दाखले देण्याकरताच त्याचा वापर करतात. माझ्या अनुभवानुसार ही परिस्थिती मध्यमवर्गीयातील तरुण व मध्यमवयिन वाचकांबाबत अधिक खरी आहे. अश्या वाचकांकडुन वृत्तपत्राला सरळ (डायरेक्ट) फीडबॅक मिळणे दुर्मिळच असते.

वाचक आणि वृत्तपत्रांमधे अतुट संबंध असावेत, वृत्तपत्राची आणि वाचकांची नाळ जुळलेली असावी म्हणुन बहुतेक ठिकाणी सीटीझन जर्नॅलिस्ट, वाचक मेळावे वगैरे उपक्रम हाती घेतले जातात. परंतु, बहुसंख्य वाचक या उपक्रमांमधे सहभागी होत नाहीत.

पुनेरींनी व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत आहे. मात्र यामध्ये कुठेतरी असा सुर निघु नये की ढळढळीत चुकीची पत्रकारीता करणार्‍याला समाजाने मान्यता द्यावी.

भडकमकर मास्तरांच्या धाग्यात 'पत्रकार हा भ्रष्ट असला तर बिघडले कुठे?' किंवा 'भ्रष्ट पत्रकारीता मान्य का केली जाउ नये?' असा प्रश्न मांडला गेला आहे असे वाटते.

सगळ्यांचे माहित नाही, पण मला जर का अमुकअमुक व्यक्ती एखाद्या विषयावर पुर्वग्रह धरुन आहे व त्यायोगेच मत प्रदर्शन करते असे पटले तर त्याव्यक्तीच्या मताला मी फार महत्त्व देउ शकणार नाही. एखाद्या विषयी बातमी वाचण्याचा माझा उद्देश त्या विषयाबद्दल माहिती करुन घेणे असतो, त्यामुळे त्या विषयीच्या सर्वंकश माहितीची अपेक्षा अवास्तव धरली जाउ नये असे वाटते.

अवांतरः काही सुरेख लेखांची माहिती तुम्ही दिलेल्या दुव्यांमुळे झाली त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.

प्रसन्न केसकर's picture

31 Jan 2010 - 3:39 pm | प्रसन्न केसकर

ढळढळीत चुकीची पत्रकारीता करणार्‍याला समाजाने मान्यता द्यावी असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. चुक ती चुकच. तिला मान्यता कुणी मागुही नये अन कुणी देऊही नये. पण मुळात चुक काय, बरोबर काय हे ठरवताना त्यासंदर्भातले निकष नीट समजावुन घ्यावेत ही अपेक्षा नक्कीच गैर नाही. अन वृत्तपत्रांचे ग्राहक जाहिरातदार आहेत, वाचक नाहीत असे सार्वत्रिक विधान कुणी करत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे असे मला वाटते. वृत्तपत्रांचे ग्राहक जाहिरातदार बरेचसे ठरलेत ही परिस्थिती नाकारताच येत नाही अन ते का होते हे मी वर दिलेल्या प्रतिसादात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाच आहे. वृत्तपत्रसृष्टीचा दर्जा खालावला आहे, तो उंचावण्याची गरज आहे हे देखिल मी यापुर्वी सुद्धा प्रतिपादन केले आहे. किंबहुना त्यासाठीच तर डायरी लिहिली होती.

पण माझा विरोध आहे तो निकष न समजुन घेता सार्वत्रिक टीका करण्याला. माझ्या मते जेव्हा कुणीतरी परुळेकरांनी लेख लिहुन राणे किंवा ठाकरेंची भलावण केली तर त्याच्यावर टीका करतो आणि त्याचवेळी खालील एका प्रतिसादात प्रहारमधे बातमीच्या मथळ्यात पवारांना होराभुषण म्हणण्याचे कौतुक करतो तेव्हा ते निकषांबाबतची अनास्थाच दर्शवते.

अन दुसरा मुद्दा आहे तो वाचकाच्या रोलबाबत. माझ्या मते वाचक हे वृत्तपत्राचे प्रमुख ग्राहक आहेत आणि मालाचा दर्जा मिळवणे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु बहुतेकदा वाचकांकडुनही एकांगी भुमिका घेतली जाते, जसे न पटलेल्या गोष्टींबाबत सार्वत्रिक टीका करणे परंतु त्याच वेळी त्यांच्याच हिताच्या बातम्या लिहिताना असहकार करणे. इथे अनेक सदस्यांना अनेक बातम्या, लेख पटत नसतील हे मान्य परंतु त्याचवेळी अनेक लोकांना त्याच बातम्या अन तसेच लेख हवेही असतात. अनेकदा लोकहिताची बातमी कव्हर करणार्‍या बातमीदाराला लोकच सहकार्य करत नाहीत. त्यांना मुलाखती/ माहिती देण्यास नकार देणे, परिणामांच्या धमक्या देणे, त्यांचा व एकुणच मीडीयाचा अपमान करणे आणि वेळप्रसंगी शारीरीक इजा पोहोचवणे हे अनेकदा घडते. (हे मी राजकारण्यांबाबत, धनदांडग्या व्यावसायिकांबद्दल बोलत नाही तर मध्यमवर्गीय नोकरदार लोकांबाबत बोलत आहे.) पाण्याबाहेर राहुन पोहायला शिकवणे सोपे असते एव्हढेच याबाबत मी म्हणेन.

तिसरा मुद्दा म्हणजे अनेकदा बातम्या कोण काय म्हणले अश्या स्वरुपाच्या असतात. वाचकांना त्या व्यक्तीचे ते म्हणणे पटत नाही अन त्यातील काहींची अपेक्षा पत्रकाराने ते लिहुच नये किंवा त्या लिखाणावर बातमीत मतप्रदर्शन करावे अशी असते. ही अपेक्षा सर्वथैव गैर आहे एव्हढेच नव्हे तर अनैतिक देखिल आहे. अश्या प्रसंगी अन्यत्र टीका करण्याबरोबरच संबंधित माध्यमाकडे पत्रे पाठवुन विरोध करणे उचित आहे असे माझे मत आहे. गेल्या काही दिवसात ज्यांनी माध्यम किंवा त्यातील कंटेंट यावर टीका केली त्यांनी असे केले असल्यास मी यापुर्वी जे काही लिहिले ते सर्व मुद्दे मागे घेऊन त्या सदस्यांची माफी मागण्यास तयार आहे.

विंजिनेर's picture

31 Jan 2010 - 10:57 pm | विंजिनेर

केसकर साहेब आणि इतर पत्रकारितेशी संबंधितलोकहो:
मला वरील मुद्दे वाचून काही शंका आहेत कृपया त्या सोडवणेचे करावे.

१. माझ्या मते वाचक हे वृत्तपत्राचे प्रमुख ग्राहक आहेत आणि मालाचा दर्जा मिळवणे हा त्यांचा अधिकार आहे.
आता वाचकाने (वर्तमानपत्राच्या) हा अधिकार कसा बजावायचा? समजा एखाद्या बकवास किंवा चुकीचा बातमी/लेख वाचून तुम्ही वैतागला आणि "अधिकार बजावण्यासाठी" तुम्ही वाचकांच्या पत्रव्यहारात निषेधाची पत्रे लिहिली - पुढे त्या पेपरने ती छापली असं म्हणु (ती गॅरंटी नाहीच पण तरीही...) - लोकांनी ती पत्रे वाचली ... मग? त्यानं काय होईल?
का अजून कुठे तक्रार करता येते? त्या तक्रारीची दखल घेतली जाते? ग्राहकमंच वगैरे?
बरं पेपरवाल्या पोर्‍याला असं तर सांगता येत नाही की "कालचा पेपर आवडला नाही - सगळा बकवास निघाला(नारळ नासका निघालाच्या चालीवर...). परत घेऊन जा!"

२. माझ्या मते जेव्हा कुणीतरी परुळेकरांनी लेख लिहुन राणे किंवा ठाकरेंची भलावण केली तर त्याच्यावर टीका करतो आणि त्याचवेळी खालील एका प्रतिसादात प्रहारमधे बातमीच्या मथळ्यात पवारांना होराभुषण म्हणण्याचे कौतुक करतो तेव्हा ते निकषांबाबतची अनास्थाच दर्शवते.
एखाद्या राजकीय पक्ष किंवा गटाची उघड उघड बाजू घेऊन त्याच्या कलाने बातम्या दिल्या तर बिघडलं कुठे?
ह्याच प्रकाराला "व्यावसायिक पत्रकारिते"च्या गोंडस नावाखाली झाकता येत नाही काय? पाश्चात्य प्रसार माध्यमे - केवळ प्रिंट नाही तर टिव्ही/केबल आणि आता इंटरनेटवरचे ब्लॉग सुद्धा असं करतात उदा. सीएनएन, फॉक्स न्युज , ख्रिश्चन सायन्स मॉनिटर वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी इ. इ.
शिवाय "टॅब्लॉईड" मनोवृत्ती दाखवणारी इतरही अनेक वार्तापत्रे असतात(E!, National Enquirer etc.

मुद्दा हा की काय वाचायचं आणि काय नाही ह्याचं वाचक-राजाला पूर्ण स्वातंत्र्य असतं. आवडलं तर वाचा. नाहितर दुसरं वर्तमानपत्र घ्या/घेऊ नका. दमड्या मोजताय ना? सक्ति थोडीच आहे?

Nile's picture

1 Feb 2010 - 2:53 am | Nile

अन वृत्तपत्रांचे ग्राहक जाहिरातदार आहेत, वाचक नाहीत असे सार्वत्रिक विधान कुणी करत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे असे मला वाटते.

वृत्तपत्रांचे ग्राहक वाचक आहेत हे मान्य, त्यासह त्या जाहिरातदारांचे ग्राहकही वाचकच आहेत. त्यामुळे तुमच्या म्हणण्याला माझा आक्षेप नाही.

पण माझा विरोध आहे तो निकष न समजुन घेता सार्वत्रिक टीका करण्याला. माझ्या मते जेव्हा कुणीतरी परुळेकरांनी लेख लिहुन राणे किंवा ठाकरेंची भलावण केली तर त्याच्यावर टीका करतो आणि त्याचवेळी खालील एका प्रतिसादात प्रहारमधे बातमीच्या मथळ्यात पवारांना होराभुषण म्हणण्याचे कौतुक करतो तेव्हा ते निकषांबाबतची अनास्थाच दर्शवते.

मला प्रतिक्रीयांवरुन असे जाणवले होतेच की काही लोक जे राजकीय दृष्ट्या राज यांच्या विरोधात आहे त्यांनी त्याच कारणासाठी आक्षेप घेतला आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे, मत देताना सुद्धा नि:पक्षपातीच असलं पाहिजे, ज्याप्रमाणे पक्षपाती पत्रकार, त्याच प्रमाणे हे लोक, यांच्या मत तुम्हाला अपेक्षितच असते त्यामुळे त्याला फार महत्त्व नि:पक्षपाती मनुष्य देउच शकत नाही.

अश्या प्रसंगी अन्यत्र टीका करण्याबरोबरच संबंधित माध्यमाकडे पत्रे पाठवुन विरोध करणे उचित आहे असे माझे मत आहे.

मला वाटतं माध्यमांनी 'व्यावसायीक' होण्याच्या प्रकीयेतील ही एक महत्त्वाची बाब आहे, फक्त त्यांनाच येणार्‍या प्रतिक्रीयांवरुनच नव्हे तर इंटरनेटवर एखाद्या बातमीची दखल कशी घेतली जात आहे हे त्यांनी पाहणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात, आज आघाडीची माध्यमं त्यांच्या वाचकवर्गाच्या माग ठेवण्यासाठी, फेसबुक ट्वीटर इ. ठीकाणी उपस्थित आहेत. (असा 'ट्रेंड' चा माग ठेवणे हा खुप महत्त्वाचा व्यवसाय आहे) त्यामुळे मिसळपाव सारख्या ठिकाणी मत व्यक्त करणे ही त्यांना एक प्रकारे प्रतिक्रीयाच आहे असे मी समजतो.

त्याशिवाय,सामान्य वाचकाला (ज्याला पार्श्वभुमी माहित नाही) दोन्ही बाजु दिसाव्यात याकरीता इथे सर्वबाजुंनी प्रतिक्रीया याव्यात हे चांगलेच.

(जसे शक्य असेल तसे माध्यमाकडे पत्रे पाठवुन विरोध करणे उचित आहे ह्या म्हणण्याशी सहमत आहे. )

धन्यावाद. :)

विंजीनेर म्हणतातः

आता वाचकाने (वर्तमानपत्राच्या) हा अधिकार कसा बजावायचा? समजा एखाद्या बकवास किंवा चुकीचा बातमी/लेख वाचून तुम्ही वैतागला आणि "अधिकार बजावण्यासाठी" तुम्ही वाचकांच्या पत्रव्यहारात निषेधाची पत्रे लिहिली - पुढे त्या पेपरने ती छापली असं म्हणु (ती गॅरंटी नाहीच पण तरीही...) - लोकांनी ती पत्रे वाचली ... मग? त्यानं काय होईल?

आयडिअली, वाचकांच्या 'चवीला' न्याय न देणारे माध्यम बंद पडेल. सो प्रतिक्रीया छापणे, न छापणे महत्त्वाचे नाही तर त्याचे दखल घेणे (त्यांचा करताच) महत्त्वाचे आहे. :)

प्रिसाईजली......

नव्हे तशी ती पडतातही. मोठ्या माध्यम कंपन्यांनी सुरु केलेली अनेक माध्यमे अशी बंद पडली आहेत. तात्वीक दृष्ट्या वाचक हाच वृत्तपत्राचा ग्राहक आहे. त्या ग्राहकाचे आपल्याशी माध्यम प्रतारणा करते हे सार्वत्रिक मत असेल तर ते माध्यम एकतर बंद पडले पाहिजे, किंवा त्या वाचकाने अश्या माध्यमाला समर्थ पर्याय शोधला पाहिजे. हा वाचकांचा दबावच बदल घडवुन आणु शकतो पण हा दबाव आणताना त्यामागेही सारासार विचार हवा, आपली नक्की गरज काय आहे हे स्वतःला स्पष्ट हवे आणि ती पुरवणार्‍यालाही स्पष्ट केले पाहिजे. त्याशिवाय ती गरज पुर्ण करण्यासारखी देखील हवी. अपेक्षा ठेवताना माध्यमात काम करणारे, अन्य लेखक, मालक यांनाही मतस्वातंत्र्य आहे हे वाचकांनी मान्य केले पाहिजे. आणि या समन्वयाचाच आज अभाव आहे. माझ्या डायरीतही मी हाच मुद्दा मांडला आहे.

हे माध्यमांनाच का कळवायला हवे, अन्यत्र चर्चा करावी का नको यावर मला वाटते अन्यत्र टीका करावी पण ती सकारात्मक, संतुलीत आणि सखोल असावी, उगीचच भडक सार्वत्रिक विधाने नसावीत किंवा पुर्वग्रहदुषित टिपण्ण्या नसाव्यात ही साधी अपेक्षा आहे.

आज आघाडीची माध्यमं त्यांच्या वाचकवर्गाच्या माग ठेवण्यासाठी, फेसबुक ट्वीटर इ. ठीकाणी उपस्थित आहेत जे बरोबर आहे आणि विरोध, टीका, सुचना तेथे देखील करता येतील परंतु त्या माध्यमापर्यंत ती पोहोचवण्यासाठी प्रयत्न न करता ती अन्य संस्थळे, ब्लॉग्ज किंवा कम्युनिटीवर करणे हे वंध्यामैथुनच ठरेल. सर्व माध्यमे व त्यांच्यावर सुरु असलेली प्रत्येक चर्चा अथवा होत असलेले विचारप्रदर्शन संबंधित माध्यमाने मॉनिटर करावे ही अपेक्षा अवाजवी आहे आणि त्यामुळे काहीही फरक पडणार नाही.

दादा कोंडके's picture

29 Jan 2010 - 9:43 pm | दादा कोंडके

परवाच ई सकाळमध्ये एक बातमी वाचली की ,

"मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान"-शाहरुख
आयपीएल मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना न घेता आल्याबद्दल तो नाराज होता. माझे वडिल पाकिस्तानी होते आणि मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान असेही तो पुढे म्हणाला.

काही वेळाने बघितल्या नंतर ती बातमी बदलली गेली होती आणि,
"मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान" काढून त्या ठिकाणी,"मला पकिस्तान बद्दल आपुलकी आहे" असं होतं.

आणि नंतर तर ती बातमीच काढून टाकली होती! :O

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jan 2010 - 10:07 pm | प्रकाश घाटपांडे

एखादी बातमी वास्तव असली तरी जनमानसाला न रुचणारी,जनक्षोभ वाढवणारी , खर तर याच राजकीय भांडवल करुन कायदा व सुव्यवस्थेला वेठीस धरणारी परिस्थिती उदभवु नये म्हणुन कधी कध्धी अशा क्लुप्त्या केल्या जातात. प्रार्थना स्थळ, अल्पसंख्यांक असे पर्याय सुचक शब्द वापरुन माहिती दिली जाते
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद's picture

30 Jan 2010 - 5:42 am | पाषाणभेद

दै. सकाळ मध्ये कितीतरी विनोदी बातम्या असतात.
मागे त्याने लालूने काहीतरी डिश खाली त्याची दोन कॉलमी बातमी ३ र्‍या पेज वर होती.
त्यानंतर काही दिवसांनी नितिशकुमारनी मांसाहार परत सुरू केला त्याची बातमी परत दोन कॉलमातच होती.

अरे येड्यांनो, बिहारातले कोणते पेपर 'राज ठाकरे अमुक अमुक जेवले', 'शरद पवार यांनी कोट घालणे चालू केले' अशा फालतू बातम्या देतात ते सांगा अन मगच त्या लाल्या अन नित्या च्या असल्या फालतू बातम्या छापा अन आम्हाला डोकं तडकण्यासाठी वाचायला द्या.

मागे त्या सकाळने 'राहूल गांधीने संसद भवनातील कँन्टीनमध्ये ईडली सांबार याचा आस्वाद घेतला' याची बातमी दिली अन मी लगेचच दुसर्‍या दिवशीपासून सकाळ घेणे बंद केला. च्यामारी कोण राहूल अन तो काय खातो याच्याशी आम्हाला काय घेणे? तो पंतप्रधान झाला तर मग आम्ही त्याच्या बातम्या वाचू. तरीही तो काय जेवला ही बातमी म्हणजे तेव्हाही फारच होईल.

आजकाल वृत्तपत्रे त्यांच्या त्यांच्या समुहाच्या उद्योगधंद्यांच्या जाहिराती दररोज रतिबाप्रमाणे देतात. जसे: सकाळ: अ‍ॅग्रोवन, त्यांची COEP मैदानावरील प्रदर्शने, केसरीच्या पानभर जाहिराती, मधूरांगणच्या जाहिराती अन त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या साम वाहिनीवरील कार्यक्रम कोणते त्याची जंत्री अन जाहिरात.

काय योगायोग(!) पहा, आजच्याच सकाळमध्ये वरील त्यांच्या सगळ्या संस्थांच्या जाहिराती आलेल्या आहेत. (एक बालाजी तांब्यांची सोडून!)

लोकमत: त्यांची प्रिव्हीलेज कार्डे, त्यांचे महिलामंडळाच्या, बाल, युवा मंडळाच्या जाहिराती अन कार्यक्रम, टिव्ही शॉप १८ च्या जाहिराती

सकाळमध्ये साहेबांच्या गोडगोड बातम्या नेहमी असतात अन लोकमत मध्ये दर्डाजींच्या समाजसेवेच्या बातम्या नेहमी (त्यातल्या त्यात कमी प्रमाण) असतात.

येथे सकाळ अन लोकमत केवळ उदाहरणदाखल नावे आहेत. बाकीचे वृत्तपत्रेही काही धुतल्या तांदळाची नाहीत.

त्यांना निट बातम्या तयार करता येत नसतील तर मिपावरचा मजकूर रॉयल्टी न देता फॉरवर्ड करत चला म्हणावं. येथे बरीच मंडळी हुरहून्नरी आहेत. अन त्यांच्या पेक्षा हुशार आहेत.

कमीतकमी जाहीर तर करा की आम्ही व्यावसाईक आहोत ते. उगाच पेंढा भरलेला वाघ.

गेल्या आठवड्याच्या रविवारच्या लोकमतने तर 'पेड न्युज' चे समर्थन करण्यासाठी आख्खे पान वाया घालवलेले होते.

बाकी आपले पुलंचे अन्तू बर्वा म्हणाला तेच खरे: वर्तमानपत्रे काय हो, द्याल ते छापतील. (भाई खरेच द्रष्टा म्हणायचे.)
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

समंजस's picture

30 Jan 2010 - 1:44 pm | समंजस

पाषाणभाऊ ह्यालाच म्हणतात, 'ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे'

वरील पैकी कुठल्याही (मराठी/ईंग्रजी) वर्तमानपत्राच्या किंवा वाहिनीच्या मालकाला/संपादकाला विचारा, त्यांचं प्रयोजन काय वर्तमानपत्र/वाहिनी चालवण्यामागे??
आणि बघा कितीजणांकडनं खरं उत्तर येतं की, 'पैसे/राजकीय फायदा मिळवण्याचा उद्देश म्हणून'

पाषाणभेद's picture

30 Jan 2010 - 6:57 pm | पाषाणभेद

* याचसाठी मी काही मला काही आगामी वृत्तपत्रांचे नावे नेहमी असे दिसतातः जसे: दै. दुष्काळ (मला हा दै. नेहमी कै. सारखा दिसतो!), फोखसत्ता, फुटा, चोखमत किंवा फेकमत.

ही नावे आत्ताच्या एकही वृत्तपत्राशी संबंधीत नाही. कोणाला राग येत असेल तर इनो आमच्याकडे मिळेल. फुकट. फक्त ट्रान्सपोर्ट चार्जेस लागतील.

* सुचना: वरील विघानांशी प्रतिसादलेखक जबाबदार असेलच असे नाही.
पि.बी.आर. च्या कायद्यानुसार संपादकिय जबाबदारी प्रतिसादलेखाची/ धागालेखकाची असेलच असे नाही. जाहिरातींच्या मजकुरचा शहनिशा वाचकांनी स्वत: करावा.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

पाषाणभेद's picture

30 Jan 2010 - 5:26 am | पाषाणभेद

हा शाहरुख एक नंबरचा लुभ्रा आहे. (आपला मिपावरचा नव्हे हं. तो फारच शज्जन, शोज्वळ, शुलक्षणी, शुंदर, शांत असा शारुक आहे. )
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

शुचि's picture

30 Jan 2010 - 5:54 am | शुचि

असे वैचारीक लेख वाचले की वेळेचं सार्थक झल्यासारखं वाटतं. मिपा वर आल्यापासून बौद्धिक उन्चीची पातळी वर गेलेली जाणवते. बाकी इथे आमची नाळच तुटलीये माय मराठीपासून.

>>हे समाजातील लोकांचच प्रतिबिंब टिपणारे पत्रकार आहेत. ..... बरोबर आहे.मिपावर सम्पूर्ण साग्रसंगीत नसेल पण महाराष्ट्रीअन सामाजीक अंतरंग दिसतं खरं. माझ्या मते सोशल स्ट्डीस सुद्धा आधुनीक काळात अवघड होणार. त्या लोकाना देखील अशा विखुरलेल्या सहित्यामधून विश्लेषण करावं लागणार.

मला मिपावर सर्वात रोमान्चक हे वाटलं की अरे अशा प्रतिभावान लोकांच्या आपण इतके जवळ जाऊ शकतो. .... लिखणातून. जे पूर्वी शक्य नव्ह्तं ते व्हर्ट्युअल रिअलिटी मुळे शक्य झालं आहे.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो

पाषाणभेद's picture

30 Jan 2010 - 6:03 am | पाषाणभेद

आग शुचि ताय, आमी व्हर्चूअल नाय काय. आमी खरखुर मानुस हाय हत. म्हूनशान आमी ज्ये बोल्तो त्ये समजतं. बाकी तुमी लिवा आन बोळा आपसुकच निघल.

पाषाणभेद's picture

30 Jan 2010 - 6:24 am | पाषाणभेद
शुचि's picture

30 Jan 2010 - 8:14 am | शुचि

असं काय करता राव - पवार येवढे भविष्य सांगतायत - एकदा म्हणतायत महागाई वाढेल / एकदा म्हणतायत वाढणार नाई/वाढेल / वाढणार नाई ........ त्यांना "होराभूषण" म्हनायलाच हवं की.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

हरकाम्या's picture

1 Feb 2010 - 10:00 pm | हरकाम्या

पवारांना " होराभूषण " म्हणाल्याबद्दल "प्रहार "चे जाहीर कौतुक करावयास हवे.

नावातकायआहे's picture

30 Jan 2010 - 12:07 pm | नावातकायआहे

>> आजकाल वृत्तपत्रे त्यांच्या त्यांच्या समुहाच्या उद्योगधंद्यांच्या जाहिराती दररोज रतिबाप्रमाणे देतात. जसे: सकाळ: अ‍ॅग्रोवन, त्यांची COEP मैदानावरील प्रदर्शने, केसरीच्या पानभर जाहिराती, मधूरांगणच्या जाहिराती अन त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या साम वाहिनीवरील कार्यक्रम कोणते त्याची जंत्री अन जाहिरात.

समर्थ पर्याय उपलब्ध नसल्याने सहन करत रहाणे हाच पर्याय

+१
सहमत.

चिरोटा's picture

30 Jan 2010 - 4:15 pm | चिरोटा

आवटे आणि आगाशे ह्यांचे विवेचन आवडले.जागतिकीकरणाच्या काळात प्रसारमाध्यमांनी पत्रकारितेवर अतिक्रमण केले आहे हे पटले.तंत्रज्ञान्,स्पर्धा आणि व्यवस्थापन हे तीन घटकांचा पत्रकारितेवर परिणाम होतो हे नक्की.
वर्तमानपत्रांचा खरा ग्राहक जाहिरातदार आहे. वाचक नाही हे आगाशे ह्यांचे प्रतिपादन पटते.
भेंडी
P = NP