"नको लाजवु बदकास राजहंसा
पुरे आता लटकी तुझी प्रशंसा
दैवयोगे तू हंस जाहलासी
मित्र बदकाला परी विसरलासी
लाभली तुजला मान डौलदार
मानसात तुझा त्यामुळे विहार
रसिकजन ते भाळले मानसाला
राजहंसाचा होय बोलबाला."
राजहंसाला बदक वदे ऐसे
हंसमन ते जाहले हरवलेसे
आठवे त्याते बाल्य लोपलेले
कुरूपाला तै लोक हासलेले
मित्र बदकाला राजहंस बोले
"स्मृती बाल्यातिल आठवू नको रे
जरी मैत्री दृढ आपुली असे रे
भेटता दोघां यातना किती रे!
कटू बाल्यावर सोडिले जळासी
रसिकजन मी रिझविले मानसासी
जाणतो मी, लटकी असे प्रशंसा
मानसास्तव पाहती राजहंसा
जोवरी माझी डौलदार मान
तोवरी माझा मानसात मान
लोपता हे सौंदर्य विसरतील
बदकरूपाते कोण भाळतील?
क्षणिक प्रेमाला मला चाखु दे रे
असे मिथ्या जरि, सौख्य भोगु दे रे
तयानंतर मानसास त्यागून
तुझ्या दारी शेवटी विसावेन."
मूळ प्रकाशन - माझा ब्लॉग - "लेखणीतली शाई"
प्रतिक्रिया
20 Dec 2009 - 8:30 pm | पाषाणभेद
अतिशय उत्तम काव्य.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
20 Dec 2009 - 8:48 pm | प्राजु
सुंदर!!
कवितेतून कथा छान गुंफली आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
8 Jan 2010 - 2:41 pm | पुष्कर
अतिशय सुंदर कविता. कल्पना खूप सुरेख आहे. राजहंसाने बदकाला "क्षणिक प्रेमाला मला चाखु दे रे" असं म्हणणं... ही कल्पना सुचणंच किती भारी आहे!!
13 Jan 2010 - 4:45 pm | प्रशांत उदय मनोहर
पाषाणभेद, प्राजक्ता आणि पुष्कर,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. बर्याच दिवसांनी निवांतपणे मिपावर आल्यामुळे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आजच पाहिल्या.
गदिमांची "एका तळ्यात होती" ह्या कवितेतल्या कुरूप वेड्या बदकाला आपल्या राजहंस असण्याची प्रचिती येते ही कल्पना सर्वांना माहिती आहेच. पण प्रत्येक कुरूप वेड्या बदकाला (तो राजहंस असला तरी) ही प्रचिती येतेच असं नाही. मग अशी प्रचिती न आलेला बदक सुखी असतो/होतो का? हा प्रश्न फार त्रास देत होता. आरतीप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे कलाकाराची प्रतिभा "ती येते आणिक जाते" अशीच असते.
अनुपमा चित्रपटातलं "कुछ दिल ने कहा, कुछ भी नही" असंच काहीसं सांगतं. (या गाण्याला अनेक पैलू आहेत त्यांच्या अनेक छटा आहेत. बदक-राजहंस छटा त्यातलीच एक.) "कलियों से कोई पूछता हसती है वो या रोती है" ही ओळ खूप बोलकी आहे.
प्रस्तुत कवितेत राजहंस हा कलाकार आहे. बदक हा त्याच्या आतला सामान्य माणूस आहे. आणि मानस सरोवर हे प्रसिद्धीचं, लोकप्रियतेचं वलय आहे. प्रथितयश कलाकाराच्या आत असलेल्या गुणदोषांनी युक्त अशा सामान्य माणसाची व्यथा कवितेत मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. तो तुम्हाला आवडला याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आपला,
(बदक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
26 Jul 2010 - 1:22 pm | दीपक साकुरे
फारच छान...
30 Jul 2010 - 11:29 am | जागु
छान.
13 Oct 2010 - 2:26 am | तर्री
फिट्ट झाली आहे . आशय / काव्य / शब्द / कल्पकता ......आवडली.
25 Oct 2010 - 9:51 pm | स्वानन्द
खूपच सुंदर!!