मराठी-अमराठी, मुम्बैचे तारणहार, थप्पड़-नाट्य ह्या सगळ्या शिमग्यानंतर आता कदाचित शांतपणे, विवेकीपणे महाराष्ट्राच्या सद्ध्याच्या स्थितीकडे पाहता येइल. दर पाच-दहा वर्षांनी फ्याशन बदलते आणि बर्याच वेळा जुनी फ्याशन रिसायकल होते. तितक्याच नकळत दर दहा-पाच वर्षांनी मराठी अस्मिता/हिन्दू धर्मावारचे संकट या सारख्या गोष्टी फ्याशन म्हणून सार्वजनिक पटलावर चमकतात. चार-दोन राडे होतात, गरीबांचे हाल होतात. दरम्यान साधे वाटणारे पण प्रचंड महत्वाचे प्रश्न तिथल्या तिथेच.
राज ठाकरे, मधू कोड़ा आणि मनू शर्मा यांच्या घटनाबाह्य वर्तनाचा दाखला देऊन डॉ आनंद तेलतुम्बडे यांनी लिहिलेला लेख विचार करायला लावणारा आहे. आजच्या सकाळमधे छापलेला हा लेख मी खाली डकवत आहे.
---------------
पोखरलेली राजकीय व्यवस्था
गेल्या काही दिवसांत घडलेल्या तीन घटना आपल्या राजकारणाचे अधःपतन कुठल्या थराला गेले आहे, हे दाखवितात. राज ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांनी समाजवादी पक्षाच्या आमदाराशी विधानसभेत हाणामारी केली. मराठीतूनच शपथ घेतली पाहिजे, असा फतवा राज ठाकरे यांनी काढला होता. तो जुमानला नाही, म्हणून सभागृहात हा प्रकार करण्यात आला. लोकप्रतिनिधींचे सभागृहातील गैरवर्तन हा काही नवा प्रकार नाही; परंतु या घटनेतील धक्कादायक बाब ही, की राज ठाकरे यांनी घटनेशी विसंगत असा हा फतवा जाहीरपणे काढला आणि थेट विधानसभेतच त्याची अंमलबजावणी केली.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी गोळा केलेली प्रचंड आणि बेहिशेबी संपत्ती ही दुसरी घटना. त्यांनी ४ हजार कोटी रुपयांची माया जमविली. देशात आणि परदेशातही मालमत्ता संपादन केल्या. राजकारणी व्यक्तीने भ्रष्टाचार करणे, यातही काही नवीन नाही; परंतु या भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड आहे. झारखंडसारख्या एका छोट्या राज्यातील अनुसूचित जमातीच्या राजकीय नेत्याने इतक्या कमी वेळात इतकी प्रचंड लूट करावी, हे धक्कादायक आहे. तिसरी घटना म्हणजे जेसिका लाल खून प्रकरणातील आरोपी मनू शर्मा याला देण्यात आलेला पॅरोल. राजकीय नेत्यांशी लागेबांधे असलेल्यांना तुरुंगातून सवलती आणि पंचतारांकित आदरातिथ्य मिळणे ही "बातमी' राहिलेली नाही; परंतु लोकभावना तीव्र असताना त्या धुडकावून मनू शर्माला तुरुंगातून सोडणे, यातून संबंधित अधिकाऱ्यांचे निर्ढावलेपण दिसून येते. लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर मलमपट्टी केल्याचा आव प्रशासन आणते; परंतु या तीनही घटनांमधून काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, त्यांचा मुळातून विचार केला पहिजे.
शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर अधिकाधिक आक्रमक भूमिका घेत आहेत. शिवसेनेवर राजकीय मात करण्यासाठी उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांनी रान उठविले. अमिताभ व जया बच्चन यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केला म्हणून करण जोहरच्या चित्रपटाचे खेळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पडले. जोहर यांनी माफी मागितली. चित्रपट अभिनेत्यांच्या बाबतीत असे प्रकार केले की भरपूर प्रसिद्धी मिळते, हे बाळासाहेब आणि राज या दोघांना चांगले ठाऊक आहे. राज यांनी "मराठीचे तारणहार' अशी आपली प्रतिमा पद्धतशीररीत्या तयार केली आणि पुणे-म्ुंबई-नाशिक या पट्ट्यात शिवसेनेच्या मतपेढीचा हिस्सा आपल्याकडे खेचला. त्यांना केवळ तीन वर्षांत हे साध्य झाले, त्यामागे केवळ त्यांचे राजकीय कर्तृत्व नाही, तर सत्तारूढ कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याकडून त्यांना मिळालेला छुपा पाठिंबा, हाही महत्त्वाचा घटक ठरला आहे. साठच्या दशकात वसंतराव नाईक यांनी डाव्या कामगार चळवळीला खच्ची करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना कसे पुढे आणले, त्याची या संदर्भात आठवण होते. ठाकरे यांनी मराठी अस्मितेचे राजकारण केले आणि "समाजवादी महाराष्ट्रा'चा कणाच मोडला.
राजचा ब्रॅंड
राज ठाकरे यांच्या बाबतीतही तेच घडले. राज यांच्या प्रत्येक राजकीय कृतीबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकली असती; परंतु कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांचा ब्रॅंड आणखी प्रस्थापित होईल, या दृष्टीनेच सरकारने पावले टाकली. अर्थात त्याचा राजकीय फायदाही कॉंग्रेसला झालाच. मराठीचे गोडवे ठाकरे काका-पुतणे कितीही गात असले तरी हा लोकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे. त्यांच्या घरातील मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. राज ठाकरे एकीकडे गरीब उत्तर भारतीयांना लक्ष्य करतात, मात्र हिंदीतील सेलिब्रिटी किंवा धनाढ्यांशी तडजोड केली जाते. झोपडपट्टीतील गरीब लोकांना हुसकावले जाते, त्याविरोधात ठाकरे यांनी कधीही आवाज उठविलेला नाही. गिरणी कामगारंच्या हक्कांसाठी भांडण्याऐवजी ४२१ कोटी रुपयांना कोहिनूर मिलची जमीन राज आणि मनोहर जोशी यांनी विकत घेतली. मुंबईचे सम्राट असल्याच्या थाटात फतवे काढले जातात; परंतु या पद्धतीच्या राजकारणाने मराठी माणसाच्या हितालाच बाधा पोचते, हे लक्षात घेतले जात नाही.
झारखंडच्या अर्थसंकल्पाच्या एक पंचमांश एवढी रक्कम म्हणजे चार हजार कोटी रुपये मधू कोडा यांनी लुटले. खाणीत एके काळी कामगार म्हणून काम करणारे कोडा संघाशी संबंधित होते. भाजपच्या तिकिटावर ते प्रथम आमदार झाले. नंतर पक्षाने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडून आले. पुढे अर्जुन मुंडा यांचे सरकार खाली खेचून मुख्यमंत्रीही झाले. या काळात त्यांनी खाणीचे परवाने देताना प्रचंड भ्रष्टाचार केला. २००५ मध्ये १३ लाखाची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करणारे कोडा यांची मालमत्ता २००९ मध्ये ९४ लाखांवर पोचली. मुळात ही माहिती खरी असते का याविषयी शंकाच आहे. परंतु तरीही हे आकडे खूपच बोलके आहेत. सार्वजनिक सेवक म्हणवून घेणाऱ्यांची मालमत्ता एवढ्या वेगाने कशी वाढते, हा प्रश्न विचारला पाहिजे. राजकारणी व्यक्ती मालमत्ता भूमिती श्रेणीने वाढविण्याची किमया करीत असताना प्राप्तिकर खाते डोळ्यांवर कातडे ओढून कसे बसते, हा प्रश्नच आहे. प्रसारमाध्यमेही नेमका हा टोकदार प्रश्न आपल्या यंत्रणांना विचारत नाहीत.
मधू कोडा यांच्या भ्रष्टाचाराची रीत म्हणजे त्यांनी बेकायदा खाणकामाला परवाने दिले व त्या बदल्यात पैसा मिळविला. पाचशे खाणमाफियांचे उखळ यात पांढरे झाले. हे परवाने देण्याच्या बदल्यात लाच म्हणून प्रचंड रक्क्म कोडा यांच्या साथीदारांकडे पोचती होत होती व हवाला व्यवहारामार्फत कोडा हा पैसा परदेशात गुंतवत होते. सीबीआयने चौकशी सुरू केल्यावर राजकीय हेतूंनी आपल्यावर आरोप होत असल्याचा कांगावा कोडा करीत आहेत. त्यांच्या या भ्रष्टाचारात काही बडे राजकीय नेते सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदेशीर असो वा बेकायदा; जवळजवळ सगळा खाण उद्योग राजकीय माफियांच्या हातात आहे. नवउदारमतवादी धोरणामुळेच खाणींतून लूट करण्याचा हा मार्ग मोकळा झाला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. देशाच्या विकासातील सगळी तूट भरून काढण्याइतकी रक्कम अशा रीतीने लुटली जात आहे.
मनू शर्माची बडदास्त
धनसत्तादांडगा वर्ग कायद्याच्या जाळ्यातून कसा सुटतो, याचे उदाहरण म्हणजे मनू शर्माची कहाणी. जेसिका लाल या बारमधील सेविकेने बिअर दिली नाही म्हणून गोळ्या झाडणारा मनू शर्मा हा हरियानातील राजकीय नेत्याचा मुलगा. खटला सात वर्षे चालला. या दरम्यान जवळजवळ सर्व साक्षीदार उलटले. न्यायालयाने मनू शर्मा याला दोषमुक्त ठरविले. जनमताच्या रेट्यामुळे उच्च न्यायालयात त्याला शिक्षा झाली. तिहार तुरुंगातून त्याने पॅरोलसाठी केलेला अर्ज ज्या वेगाने मंजूर झाला, ती गती थक्क करणारी आहे. आई आजारी असल्याचे कारण मनू शर्माने दिले होते. ज्या देशात हजारो कच्चे कैदी खटल्यांची वाट पाहत अक्षरशः तुरुंगात सडत आहेत, तेथे खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आरोपी खुशाल तुरुंगाबाहेर दोन महिने राहू शकतो. आई आजारी असल्याचे सांगून पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा करतो.
या तीनही प्रकरणांत धक्कादायक बाब ही, की या घटना समाजाने सामान्य म्हणून स्वीकारल्या. एकूणच नैतिक अधःपतन कुठल्या थरला गेले आहे, हे त्यावरून दिसते. सरंजामी व्यवस्थेतून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही, हे त्यावरून दिसते. सत्ताधारी वर्गाला जाब विचारू शकत नाही, अशी मानसिकता दृढमूल झालेली आहे. नवउदारमतवदी आर्थिक धोरणाने अभिजन वर्गाला एक क्षेत्र खुले केले असले तरी तळाच्या समाजघटकांचा जगण्याचा संघर्ष दुष्कर झालेला आहे. त्यांनी उठाव करायचा प्रयत्न जरी केला तरी राज्यसंस्था त्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवते. ही व्यवस्था एक दुष्टचक्रात अडकली आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या परिवर्तनाला ती विरोध करते आणि त्यातून निमंत्रण दिले जाते ते हिंसक उद्रेकांना. व्यवस्थेचे हे कुरूप दर्शन राज ठाकरे, मधू कोडा आणि मनू शर्मा यांच्यासंबंधीच्या घटनांतून घडते आहे.
डॉ. आनंद तेलतुंबडे
(लेखक मानवी हक्क चळवळीचे अभ्यासक आहेत.)
प्रतिक्रिया
5 Dec 2009 - 12:38 pm | श्रावण मोडक
लेख वाचला होता सकाळीच. फार चलाख लेखन आहे हे. मी काही शिवसेना, मनसे, भाजप किंवा संघ यांचा समर्थक नाही. आहे विरोधकच. तरीही या लेखनात मधू कोडा असोत किंवा मनू शर्मा - यांच्या पक्षाचा उल्लेख ज्या चलाखीने टाळला आहे ते पाहून हसू आले. कोडा यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाचा उल्लेख जरूर केला जातो, संघाचाही उल्लेख केला जातो. पण त्यांचे मुख्यमंत्रीपद हे नंतर कॉंग्रेसच्या जोरावर होते हे मात्र सांगितले जात नाही. आणि त्याच काळात हा भ्रष्टाचार झाला आहे. मनू शर्माचेही तेच. तो म्हणे राजकीय नेत्याचा मुलगा. कोण बॉ हा नेता? कॉंग्रेसचा विनोद शर्मा. कोण हा विनोद शर्मा? तो कसा मोठा झाला? पक्षातील त्याचे वजन का टिकून आहे? मनूचा पॅरोलचा अर्ज ज्या गतीने मंजूर झाला ते अचंबित करणारे आहे अशा आशयाची टिप्पणी केल्याने विषय संपतो का? तो अर्ज शीला दीक्षितांनी मंजूर केला आहे, ज्यांचा एरवी आपण दिल्लीतील समर्थ राज्यशासनाबद्दल गौरव करत असतो. इथं त्या गौरवाच्या प्रमाणात टीकाही झाली पाहिजे. नावं घेऊन. ते होत नाही. राज ठाकरे, मराठी हे मुद्दे तर अशा लेखनासाठी सोपेच. पुन्हा, राजबरोबरच आपण मनू शर्मा आणि कोडा यांनाही पिंजऱ्यात उभे केले असे चित्रही निर्माण करता येते. पण मग म्हणूनच दाखल्यांसाठी निवडलेल्या या प्रकरणांना मोठ्या संख्येतील लोकांनी सामान्य म्हणून स्वीकारले तर त्याचे वावगे वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. कारण या गोष्टी लोकांना कळत असतात. लोकांना कळत नाही हा आपला भ्रम असतो.
आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्यांनी अशी आगळीक करावी हे अधिक खटकणारे आहे.
राज, मधू, मनू या तिन्ही चुका, त्या चुका असे म्हणताना त्या चुकांचे माप योग्य पदरात न घालण्याचीही चूकच. विचारवंतांनी (हा शब्द मिपावर एरवी ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने वापरलेला नसून, प्रामाणीक अर्थाने वापरतो आहे) अशा चुका करायच्या आणि वर समाजावर दोष टाकून मोकळे व्हायचे हा कुठला न्याय?
5 Dec 2009 - 1:27 pm | बिपिन कार्यकर्ते
मी हा लेख सकाळमधे वाचलाच होता पण मगाशी इथेही परत वाचला होता. मनात अगदी असेच नाही पण काहीसे असेच आले होते. अर्थात, पक्षांची नावे घेतली नाहीत इतके लक्षात आले नाही पण काही शंका जरूर आल्या. मला वाटते, या प्रकारचे लेख कसे वाचावेत याचे हा प्रतिसाद उत्तम उदाहरण ठरावे. असो.
मोडकांनी पुढे आणलेले मुद्दे आहेतच. पण मला नेहमी पडणारा एक प्रश्न या निमित्ताने परत एकदा मनात आलाय.
विचारवंत, समाजशास्त्रज्ञ वगैरे लोकांनी समाजावर वचक ठेवून त्याला एक निश्चित दिशा देणे अपेक्षित आहे आणि या प्रकारचे लेख त्याच प्रकारचे असतात. पण विचारवंत दोष काढतात, पण उपाय मात्र क्वचितच सुचवतात. याच लेखाचे उदाहरण घेऊ.
पोखरलेली राजकिय व्यवस्था हा मूळ विषय गाभा आहे. आणि त्या अनुषंगाने राज ठाकरे इत्यादी विषयांची मदत घेतली आहे. पण याच लेखात डॉक्टर महोदयांनी काही उपाय योजना सुचवणे अपेक्षित. शिवाय, राज ठाकरेंच्या एकंदरीत वर्तनाला विरोध करताना, ते जे मुद्दे उपस्थित करत आहेत त्याबद्दल कधीच काही भाष्य अथवा उपाययोजना सुचवली जात नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या मनात पक्षपात होत असल्याची भावना आल्यास दोष त्यांचा नाही.
बिपिन कार्यकर्ते
5 Dec 2009 - 1:43 pm | श्रावण मोडक
अगदी शास्त्रशुद्ध नाही, पण वरवर सांगायचे झाले तरी -
उपाय सुचवायचे झाले की सगळ्यांचे पाप त्यांच्या-त्यांच्या मापात टाकावे लागते. तसे केले तरच उपायांची दिशा सापडू शकते. कारण उपाय त्याचवेळी समोर येऊ शकतो, जेव्हा तर्कसंगतीने चुका कळलेल्या असतात. इथं चुकाच कळून घ्यायच्या नाहीत. उपाय कसला मिळणार? या स्वरूपाच्या लेखनातून मिळणारा साधा उपाय म्हणजे - असे वागू नये बाबा!!!
पोखरलेली राजकीय व्यवस्था असा मुद्दा मांडताना, त्या पोखरणीला जबाबदार कोण, हे आधी ठरवावे लागेल. मग कॉंग्रेसचीही व्यवस्था पोखरलेली आहे हे सांगावे लागेल. मग होते काय, की सारेच चोर आहेत हे कळू लागते. मग त्यातल्या-त्यात सुधारू शकेल असा कोण हे हेरावे लागते, आणि सुधारणांचा उपाय मांडावा लागतो. आता इतके करायचे तर बऱ्याच इतर गोष्टींचा त्याग करावा लागतो.
मी तर नाही बुवा असं काही उपाय सांगणारं लिहिणार कधीही!!! :)
5 Dec 2009 - 3:24 pm | सुहास
पोखरलेली राजकीय व्यवस्था असा मुद्दा मांडताना, त्या पोखरणीला जबाबदार कोण, हे आधी ठरवावे लागेल. मग कॉंग्रेसचीही व्यवस्था पोखरलेली आहे हे सांगावे लागेल.
कदाचित लेखकाने हे सांगितलेही असेल.. आणि यावरचे उपायही सांगितले असतील.. पण "सकाळ" वाल्यांनी ते "नेहेमीप्रमाणे" संपादित केले असावे ;) (ते वाचकांचा पत्रव्यवहार मधील पत्रेही संपादित करतात म्हणे..!)
बाकी मला लेख अजिबात आवडला नाही.. :)
--सुहास
5 Dec 2009 - 7:06 pm | शैलेन्द्र
अतिशय सुन्दर प्रतिक्रिया
5 Dec 2009 - 10:25 pm | सुनील
लेखापेक्षा श्रामोंचे प्रतिसाद अधिक वाचनीय!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Dec 2009 - 10:44 pm | संदीप चित्रे
माझ्या मनातला प्रतिसाद दिलाय सुनील !
6 Dec 2009 - 1:02 am | स्वाती२
+१
5 Dec 2009 - 11:05 pm | कालिन्दि मुधोळ्कर
श्रावण मोडक: आपल्याशी अंशत: सहमत. मात्र राज ठाकरेन्बद्दल लिहिताना कोन्ग्रेसला दोषी धरले आहे ना?
लेखक तीनही व्यक्तींबद्दल (ठाकरे, कोडा, शर्मा) काहीसे आटोपते घेत लिहित आहेत. खरे तर या तीन घटना एकमेकांशी मुळीच निगडीत नाहीत. म्हणूनच कदाचित "ठप्प झालेले जनमत" ही पट्टी वापरून लेखक ह्या घटनांकडे पाहत असावेत.
बिपीन कार्यकर्ते: "पुढे काय करायचे?" याची रेडीमेड पाककृती अभ्यासकांनी द्यावी अशी अपेक्षा आपण का करतो? हे एका लेखात होणारे काम नक्कीच नाही.
6 Dec 2009 - 6:05 pm | श्रावण मोडक
राज ठाकरे यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचा उल्लेख आला आहे, हे बरोबर. पण तो कसा आला आहे? राज यांच्यासंदर्भात सरकारने उचललेल्या (किंवा न उचललेल्या) पावलांमुळे कॉंग्रेसला फायदा झाला असे तेलतुंबडे यांचे म्हणणे आहे (शिवसेना वाढीचा इतिहासही अशाच अंगाने जातो). हा फायदा नेमका काय आहे? असा फायदा करून घेणाऱ्या कॉंग्रेसला लेखकाने झोडलेले दिसत नाही. तिथं केवळ (आपल्या आकलनात बसलेली) तथ्यं मांडली गेली आहेत. राज यांच्यामुळे राजकीय व्यवस्था पोखरली असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे नाते कॉंग्रेसला झालेल्या फायद्याशीही आहे. म्हणजेच, कॉंग्रेसचा फायदा हाही राजकीय व्यवस्था पोखरण्यात हातभार लावणारा आहे हा अर्थही मांडला पाहिजे. तसे करायचे झाले तर कॉंग्रेसच्या नेतृत्त्वालाही पट्ट्यात घ्यावे लागेल. राजकीय व्यवस्था काही केवळ राज, कोडा, शर्मा यांच्यातून साकारतही नसते आणि म्हणून पोखरतही नसते, हे तुम्हालाही मान्य व्हावे.
6 Dec 2009 - 10:15 am | विकास
सर्वप्रथम श्रावण मोडकांचे आभार. संघ/शिवसेना/मनसे/भाजपा आदींच्या अप्रत्यक्ष बाजूने लिहील्याबद्दल अथवा त्यांच्या विरोधात असलेल्यांच्या विरोधात लिहीण्याबद्दलही नाही, तर नीरक्षिर विवेकाने लेखातील एकांगी विचारप्रदर्शन दाखवल्याबद्दल. उद्या असाच अर्धसत्य लेख एखाद्या कम्युनिस्टाच्या अथवा काँग्रेसमनच्या विरोधात आला तरी त्यातील मुद्दे जसेच्या तसे लागू होतील आणि तशा लेखावरपण असाच आक्षेप मी देखील करेन...
बाकी लेखाबद्दल - एकदम टुकार आहे. कारण तो वैचारीक नसून पक्षपाती आहे. बाकी त्यातील वास्तव नवीन नाही आहे तसेच लिहीण्याची समाजभेदी पद्धतपण नवीन नाही आहे.
मूळ लेखकाचे तसेच त्या निमित्ताने तो येथे प्रसिद्धीस देणार्या कालिन्दीताईंचे माओवाद्यांवरील विचार ऐकायला आवडतील. विशेष करून जेंव्हा महाराष्ट्र प्रांतातील माओवादी पक्षाचे प्रमुख ( जे २००७ मधे एटीएसला हवे होते) मिलिन्द तेलतुम्बडे हे डॉक्टर तेलतुम्बड्यांचे बंधू असताना... अर्थात मला माहीत आहे की स्वतः डॉक्टर हे स्वतःला माओवादी/साम्यवादी/आदी काही म्हणत नाहीत तर केवळ डाव्याचळवळीचे विद्यार्थी असे म्हणतात. असो, चालायचचं...
6 Dec 2009 - 12:13 pm | वेताळ
तसे मला मानवीहक्कवाले लोक ही खुप आवडतात. आड ना बुड कशाचाही कशाबरोबर संबध लावुन रिकामे होतात. मुंबई गिरणी कामगारानी सांमताच्या नेत्रुत्वाखाली संप करुन सर्व मिल बंद पाडल्या. पुढे मुंबईतल्या जमीनीचे भाव आकाशाला भिडल्यावर मालकानाही मिल चालवण्यापेक्षा कामगारांची देणी भागवुन गिरणीच्या जागा विकण्यात रस आला.कोहिनुर मिल ची जागा देखिल मालक व सरकारने लिलावात काढली. ती जागा राज ठाकरे व इतरांनी खरेदी केल्यामुळे तेलबुडवेंसारख्या लोकाच्या पोटात दुखु लागले.ती जागा जर मुकेश भाईनी आपल्या बायकोला २५ वाढदिवसाला भेट दिली असती तर ह्या लोकानी त्यावर कौतुकाने डझनभर लेख लिहले असते.
ठाकरे यांनी मराठी अस्मितेचे राजकारण केले आणि "समाजवादी महाराष्ट्रा'चा कणाच मोडला.
हा एक समाजवाद्याचा शिवसेनेवर लाडका आरोप आहे. खरतर समाजवाद्याच एक दुखणं आहे, त्याना स्वःताला मुल होत नाही आणि दुसर्याला मुल झालेले बघवत नाही.
पुढे तेलतुबंडे साहेब मधु कोडांच्या बाबत भाजपचे आमदार होते असा उल्लेख करतात ,परंतु नंतर त्यांनी कॉग्रेसचा पाठिंबा घेवुन सरकार बनवले व भष्टाचार केला हा उल्लेख करण्याची साधी तसदी घेतलेली दिसत नाही.पुढे निवडणुकीच्या काळात कोडा डोईजड ठरत आहेत हे कॉग्रेस नेत्यांच्या लक्षात आल्यावर त्यानी त्याचे भ्रष्टाचार प्रकरण उघडकिस आणले.
शेवटचे उदाहरण मनु शर्मा ह्याचे. त्याची पॅरोलवर सुटका करु नये असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे असताना देखिल कॉग्रेसच्या मुख्यमंत्री शिलाबाय दिक्षित ह्याच्या एका सहकार्याने त्याला पॅरोलवर बाहेर काढले. ह्याचा तेलतुंबड्यानी उल्लेख ही केला नाही.त्याचे वडील आज हरियानात कॉग्रेसचे आमदार आहेत. हे सगळे सोयिस्कररित्या लिहले गेले नाही असे दिसते.
असा हा दळभद्री विचाराचा लेख नक्कीच तेलतुबंडे साहेबाच्या वैचारिक दिवाळखोरीवर विचार करायला लावणारा आहे.
वेताळ
6 Dec 2009 - 7:57 pm | शैलेन्द्र
"खरतर समाजवाद्याच एक दुखणं आहे, त्याना स्वःताला मुल होत नाही आणि दुसर्याला मुल झालेले बघवत नाही."
भन्न्नाट