एकदा मी एका कार्यक्रमासाठी गावाला गेलो होतो. कार्यक्रम संपायला रात्रीचे 12 वाजले. मी मित्राला, मला स्टेशनवर सोडायची विनंती केली.
तो म्हणाला, एक दिवस कामाला नाही गेलास तर काय होईल? तू उद्या सकाळी पुण्याला जा. मी क्षणभर विचार केला व त्याला एक गोष्ट सांगितली,
कोणे एके काळी पृथ्वीवर फक्त एकपेशीय जीव (अमिबा) होते. त्यांना अन्न मिळवण्या शिवाय दुसरे काही करण्यास वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी एकत्र राहून काम वाटून घेण्याचे ठरवले. असा त्यांचा बहुपेशीय जीव तयार झाला. नंतर त्याची वाढ होत गेली व कामेही वाढत गेली. मग आळशी, कामचुकार पेशींची केस, नखे झाली, ताकदवान पेशींचे स्नायू झाले. ज्या वाहतूक करण्यात कुशल होत्या त्यांचे रक्त झाले. ज्यांची दुसऱ्यांसाठी बलीदान करण्याची तयारी होती त्यांची त्वचा झाली. ज्यांची दुसऱ्यांसाठी कष्ट करण्याची तयारी होती त्या पेशींचे हृदय झाले. ज्या पेशीं हुशार, तत्परतेने व वेळेवर काम करणाऱ्या होत्या त्यांचा मेंदू तयार झाला. या जीवात उत्क्रांती होत होत आजचे सर्व प्राणी व माणूस झाला.
आता माणसा बाबत पण हीच गोष्ट घडत आहे. पूर्वी माणूस एकटा राहायचा, आता समूहाने राहतो. कामे वाटून घेतली आहेत. एकमेकांच्या गरजा भागवत आहे. शेतकरी, सैनिक, डॉक्टर, शास्त्रज्ञ हे सर्व वेगवेगळी कामे करत आहेत. वाहतुकदार म्हणजे रक्त, (रस्ते म्हणजे रक्तवाहीन्या, रस्त्यात गप्पामारत उभे राहणारी माणसे म्हणजे कोलेस्टरॉल.) हे त्याचाच भाग आहेत. कालांतराने सगळयांचा मिळून एक विश्वामानव होणार आहे.
मग मित्राला म्हणालो -- त्या विश्वमानवातील हाडाची पेशी होण्यापेक्षा हृदयाची किंवा मेंदूची पेशी होणे मला जास्त आवडेल. तुझ्या हृदयाच्या पेशी एखादा ठोका उशीरा पडला तर काय होतय? असे म्हणल्या किंवा मेंदूच्या पेशी निर्णय उद्या घेतला तर काय होतय? असे म्हटले तर ते तुला चालेल का?
म्हणून मला कामाला वेळेवर गेले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीने शरीरातील पेशीप्रमाणे आपले काम जबाबदारीने केले, नियम पाळले तरच समाज निरोगी व सुदृठ राहील. तसेच समाजातील प्रत्येक घटक सारखाच महत्वाचा आहे याची जाणिव ठेवली पाहीजे.
केवळ आपल्या पूरते पाहणे (कॅन्सरच्या पेशी प्रमाणे) म्हणजे समाजाचा पर्यायाने आपलाच नाश करण्यासारखे आहे.
प्रतिक्रिया
29 Mar 2008 - 10:08 am | नीलकांत
रूपक आवडले. छान कल्पना .
नीलकांत
29 Mar 2008 - 10:21 am | मदनबाण
केवळ आपल्या पूरते पाहणे (कॅन्सरच्या पेशी प्रमाणे) म्हणजे समाजाचा पर्यायाने आपलाच नाश करण्यासारखे आहे.:--
एकदम बरोबर.....
(आटी मधे काम करत असुन सुद्धा तिन्ही शिफ्ट करणारा )
मदनबाण
29 Mar 2008 - 3:57 pm | धनंजय
आवडले.
मलाही हृदयातील किंवा मेंदूतील पेशी व्हायला आवडेल.
(अवांतर : पण तुमच्यापैकी कोणीतरी हाडाची पेशी व्हायचे ठरवा ना... आपण सगळेच मेंदूच्या पेशी झालोत, तर विश्वमानव हाडांआभावी कोलमडेल. तरी प्लीज, प्लीज, प्लीज... मला मेंदू/हृदयाचीच पेशी होऊ दे, हाडाची नको.)
30 Mar 2008 - 12:23 am | पिवळा डांबिस
मला ना, मला मानवी आंत्रपुच्छाची (ऍपेन्डिक्सची) पेशी व्हायला आवडेल! काही काम नाही, फक्त आराम करायचा!!:))
पण उपद्रवमूल्य इतकं की जरा रुसुन फुगलो तर अख्खं शरीर मेटाकुटीला आणू शकतो!!:)))
ही, ही, ही!!:))
30 Mar 2008 - 12:30 am | कोलबेर
पण शेवटी अर्ध्या-एक तासाच्या शस्त्रक्रियेत तुमचे राम नाम सत्य होणार त्याचे काय?
मिनासो, तुमचा हा छोटेखानी लेख आवडाला.
30 Mar 2008 - 12:34 am | पिवळा डांबिस
"जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात?"
पण जगीन तेव्हढे आयुष्य तरी टेचात जगीन!!!:))
बाकी शरिरातली कुठ्ली पेशी शस्त्रक्रियेच्या शक्यतेपासून वाचली आहे?
30 Mar 2008 - 12:43 am | कोलबेर
हा हा हा.. मस्त! अगदी भरपूर जगाल हो फक्त कधी रुसुन फुगुन वगैरे बसु नका म्हणजे झालं! ;)
30 Mar 2008 - 1:14 pm | विसोबा खेचर
हा हा.. मस्त! अगदी भरपूर जगाल हो फक्त कधी रुसुन फुगुन वगैरे बसु नका म्हणजे झालं! ;)
हा हा हा! डांबिसाचा आणि कोलबेरदेवाचा संवाद आवडला! आंत्रपुच्छ हा शब्द साला क्लासच आहे! :)
मिनासो,
तुमचा हा छोटेखानी लेख आवडाला.
असे कोलबेरसारखेच म्हणतो...
अजूनही येऊ द्या...
तात्या.
1 Apr 2008 - 12:14 am | सर्किट (not verified)
मला ना, मला मानवी आंत्रपुच्छाची (ऍपेन्डिक्सची) पेशी व्हायला आवडेल! काही काम नाही, फक्त आराम करायचा!!:))
मला ना, काही सदस्यांच्या मेंदूची पेशी व्हायला आवडेल. कारण तेच :-)
पण उपद्रवमूल्य इतकं की जरा रुसुन फुगलो तर अख्खं शरीर मेटाकुटीला आणू शकतो!!:)))
तेच ते, फक्त "शरीर" ऐवजी संकेतस्थळ असे वाचावे.
हघ्याहेसांनल.
- सर्किट
30 Mar 2008 - 1:05 am | देवदत्त
रूपक/कल्पना छान आहे.
तरीही एक सुचवावेसे वाटते. एका दिवशी आराम करण्यास सांगणे किंवा खरोखर एवढी गरज नसल्यास सुट्टी घेणे हे बरोबरच आहे. आणि कार्यालयातही सुट्ट्या घेणे सांगितले असतेच.
कुठेतरी वाचल्याप्रमाणे (अर्थातच जीवशास्त्राच्या पुस्तकातच) शरीरालाही आरामाची गरज असते. म्हणूनच आपण नियमित झोप घ्यावी. (तेवढाच मेंदूलाही आराम मिळतो, बहुधा हॄदयालाही).
अर्थात हृदयाच्या पेशी एखादा ठोका उशीरा पडला तर काय होतय? असे म्हणल्या किंवा मेंदूच्या पेशी निर्णय उद्या घेतला तर काय होतय? असे म्हटले तर ते तुला चालेल का?
हे ही तितकेच खरे म्हणा....
प्रत्येक व्यक्तीने शरीरातील पेशीप्रमाणे आपले काम जबाबदारीने केले, नियम पाळले तरच समाज निरोगी व सुदृठ राहील. तसेच समाजातील प्रत्येक घटक सारखाच महत्वाचा आहे याची जाणिव ठेवली पाहीजे.
हे फक्त कामच नव्हे तर इतर सर्व गोष्टींमध्येही आचरणात आणण्याचा समाजाने प्रयत्न करावा अशा विचारात.
अवांतरः (स्वगत) च्यायला... आपण अमीबापासून बनलो ?
अवांतर २: अमीबावरील लेख वाचताना बारावीचा अभ्यास आठवला.