होय. 'आपण काय करू शकतो?' असे न लिहीता 'मी काय करू शकतो?' असे शीर्षक मुद्दामच दिले आहे. याचे कारण मी वाचलेली एक जुनी गोष्ट. या गोष्टीत एक राजा त्याच्या जनतेला एक दिवसात एक मोठा हौद दुधाने भरण्यास सांगतो. यासाठी सर्वांनी फक्त एक, एक हंडाभर दूध त्या हौदात टाकायचे असे ठरते. प्रत्येक जण असा विचार करतो की बाकीचे सर्वच जर एक, एक हंडाभर दूध टाकणार आहेत तर त्या हौदात मी एकट्याने एक हंडाभर दुधाऐवजी एक हंडाभर पाणी टाकल्याने असा कितीसा मोठा फरक पडणार आहे? अशा पद्धतीने सर्वांनीच विचार केल्याने संध्याकाळपर्यंत तो हौद दुधाऐवजी पाण्यानेच भरून जातो. तेव्हा एखाद्या समुहाला एखाद्या कार्याचे आवाहन केल्यास त्या कार्याचा कसा विचका होतो हे जाणून मी समूहातील प्रत्येक व्यक्तिला व्यक्तिश: आवाहन करीत आहे.
बरेचदा आपल्याला गैर व्यवहार रोखण्याचे उपाय माहित असतात कारण ते अतिशय साधे आणि सोपे असतात. अर्थात कळायला सोपे असले तरी अंमलात आणायला ते अनेकांना कठीणच नव्हे तर अगदी अशक्य सुद्धा वाटतात. उदाहरणार्थ भ्रष्टाचार रोखण्याचा अगदी साधा आणि सोपा मार्ग म्हणजे आपण त्यात सामील न होणे. पण हेच अनेकांना जमत नाही ते म्हणतात 'आम्हालाही काही लाच द्यायची हौस नाही पण क्षुल्लक रकमेकरीता भांडत बसायला कोणाला इथे वेळ आहे आणि शिवाय त्यापायी आपली महत्वाची कामे अडून राहतात ते निराळेच'. थोडक्यात काय तर उपाय नुसता माहिती असून काही फायदा नाही तो अंमलात आणायलाही तितकाच सोपा असायला हवा. आज मी तुम्हाला अशाच एका अंमलात आणायला सोप्या असणार्या उपायाची माहिती देणार आहे. अर्थात या उपायाने गुन्हेगारी पुर्णत: रोखली जाणार नसली तरीही निदान 'गुन्हेगारी रोखण्यातील पहिली पायरी' एवढे महत्व तरी या उपायाला निश्चितच आहे. तेव्हा हा उपाय अंमलात आणून तुम्ही गुन्हेगारी रोखण्यातला खारीचा वाटा नक्कीच उचलु शकता.
हा साधा सोपा उपाय मला सापडला तो भारताची आर्थिकच नव्हे तर गुन्हेगारी राजधानीदेखील असलेल्या मुंबई शहरात. पुर्वी ह्या शहरात आपले सार्यांचे आवडते श्री. प्रमोद नवलकर हे त्यांच्या हयातीत वेळी अवेळी फेरफटका मारून टेहळणी करीत आणि शहरातील समस्यांचा आढावा घेऊन त्यांना जाणवलेल्या अडचणी व त्यावर सापडलेले उपाय वाचकांपुढे समर्थपणे मांडत. त्यांच्या जाण्याने ही प्रथा जणु खंडितच झाली. पण त्यांच्या लेखांपासून प्रेरित होऊन हाती काही लागते का? याचा शोध घ्यावा म्हणून मीही मुंबईत असा फेरफटका मारला आणि काय आश्चर्य अगदी युरेका, युरेका ओरडावे अशा काही नवीन गोष्टी समोर आल्या. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईतील भिकार्यांची समस्या.
आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्यापैकी सर्वांनीच जर ह्या भिकार्यांना भीक घालणे बंद केले तरी गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. लोकल ट्रेन, बस, रस्ते, फुटपाथ, दुकाने व चौपाटीसारख्या ठिकाणी लोकांकडून रोज भिकार्यांना दिल्या जाणार्या रकमेचा एकूण ताळेबंद हा काही कोटींच्या घरात जातो हे अविश्वसनीय असले तरी सत्य आहे. आताच्या जमान्यात लोक भिकार्यांच्या थाळीत पुर्वीसारखे चार - आठ आणे न टाकता एक, दोन अथवा पाच रुपयांची नाणी सर्रास टाकतात. काही दुकानदारांच्याकडे तर येणार्या प्रत्येक भिकार्याला पाचचे नाणे अथवा दहाची नोट दिली जाते. दिवसभरात हे दुकानदार सरासरी पाचशे ते हजार रुपये भिकार्यांवर खर्च करतात. परदेशी पर्यटक व उच्चभ्रू यांचे कडे तर लहान नोटा व नाणी नसल्यामुळे त्यांच्याकडून अनेकदा भिकार्यांना शंभराच्या नोटांचादेखील लाभ होतो. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भीक घालणार्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. या संख्येने मिळणार्या रकमेला गुणल्यास प्रत्येक भिकारी सरासरी वीस ते तीस हजार रुपये महिना कमवितो. अर्थात हा सारा पैसा त्या भिकार्याचा राहत नाही. यातला किरकोळ भाग वजा जाता बाकी सारा मलिदा हा अंडरवर्ल्ड अर्थात गुन्हेगारी क्षेत्राला जाऊन मिळतो. (आणि यामुळेच इतकी सारी कमाई होऊनही भिकार्यांना पुन्हा भीकच मागावी लागते.)
भिकार्यांकडून गुन्हेगारांपर्यंत पैसा पोचण्याची काही कारणे खालीलप्रमाणे:-
भिकार्यांना बसण्यासाठी ज्या मोक्याच्या जागा हव्या असतात त्यांच्यावर 'दादा' लोकांचे राज्य असते त्यामुळे या दादांना त्यांचा वाटा देण्याशिवाय भिकार्यांना गत्यंतर नसते.
याशिवाय कुणालाही जन्मजात भीक मागण्याची आवड नसते. त्यांना तसे करण्यास लाचार बनविते त्यांची हतबल परिस्थिती. त्यामुळे आपण भीकेवर जगतो आहोत ही भावना त्यांना मनातून कुरतडत असते. यावर मात करण्यासाठी व निगरगट्ट बनण्यासाठी अनेक भिकारी अफू, चरस, गांजा आदी अंमली पदार्थांचे सेवन करतात. हे पदार्थ त्यांना गुन्हेगारांकडून अव्वाच्या सव्वा दराने विकले जातात.
अनेक लहान मुलांना गुन्हेगारी टोळ्यांमार्फतच जबरदस्तीने भीक मागण्यास लावले जाते. यासाठी त्यांना अंध, अपंगही बनविले जाते. साहजिकच त्यांना भीक म्हणुन मिळणारी रक्कम ह्या गुन्हेगारांच्याच ताब्यात जाते. त्याशिवाय यातील काही बालकांना त्यांचे वय वाढल्यावर गुन्हेगारी क्षेत्रात सामावुन घेतले जाते आणि भुरट्या चोर्या व खिसे कापण्यासारखे काही गुन्हे त्यांच्यामार्फत करुन घेतले जातात.
तेव्हा 'मी कुणालाही भीक देणार नाही' एवढा साधा नियम आपल्यापैकी प्रत्येकाने पाळला तरी गुन्हेगारांना मिळणारी मोठी रसद तोडली जाईल यात शंकाच नाही. याउप्परही आपल्याला एखाद्या भिकार्याची खुपच दया आल्यास त्याला आपल्यासोबत घेऊन काही अन्न खावयांस लावणे. भिकारी वयाने प्रौढ असल्यास त्याला एखादे काम द्यावे वा तो बालक असल्यास त्यास एखाद्या चांगल्या संस्थेत भरती करावे अथवा आपली ऐपत असल्यास रीतसर कायदेशीर सोपस्कार करून त्यास दत्तक घेऊन स्वत: सांभाळावे. परंतू हे शक्य नसल्यास औटघटकेचे औदार्य दाखवून त्यास भीक म्हणून रोख रक्कम कदापि देऊ नये. लक्षात ठेवा भिकार्याला भिकारी राहू न देणे हीच त्याच्यावर खर्या अर्थाने दया दाखवणे ठरते. याशिवाय आपण आजच्या एका बालकाला भीक मागण्यापासून परावृत्त करतो त्याचवेळी आपण उद्याचा एक गुन्हेगार घडण्यापासूनही थांबवित असतो.
अर्थात, ही एक छोटीशी पायरी आहे पण ज्यांना ही देखील ओलांडता येत नसेल ते पुढच्या पायर्या कशा ओलांडणार? ज्यांना यापुढे जाऊन काही करायचे असेल त्यांच्यासाठी:-
मी अजून काय करू शकतो?
मी कुठल्याही संघटनेशी संबंधित असेल, अंगी थोडेसे धाडस व सोबत इतरांचे पाठबळ असेल तर ह्या भिकार्यांवर गुपचूप नजर ठेऊन त्यांचे कुणाशी संबंध आहेत? ते कुणाशी आर्थिक व्यवहार करतात? या गोष्टींचा छडा लावून ही माहिती पोलिसांपर्यंत, माध्यमांपर्यंत पोचवू शकतो.
मी कुठल्याही माध्यमाशी (द्रुक / श्राव्य / मुद्रित, इत्यादी) संबंधित असेल तर या विचारांचा शक्य तितकी प्रसिद्धी देऊन जनजागृती करु शकतो.
वरील पैकी काहीच शक्य नसले तरी निदान माझ्या संपर्कातील इतरांना ही माहिती पुढे पाठवू शकतो.
"मग मी आता यापैकी काय करणार आहे?' हे ज्याचे त्याने ठरवावे.
धन्यवाद.
चेतन सुभाष गुगळे
CHETAN SUBHASH GUGALE
भूखंड क्र.८६, पेठ क्र.२५,
Plot # 86, Sector # 25, Nigdi,
पिंपरी-चिंचवड नवनगर, निगडी,
Pimpri - Chinchwad New Town,
पुणे - ४११ ०४४. महाराष्ट्र
PUNE - 411 044. MAHARASHTRA
दूरध्वनी +९१२०२७६५०७२८ / +९१९९२१३३७१९७
Telephone +912027650728 / +919921337197
भ्रमणध्वनी (थेट) +९१९५५२०७७६१५
Mobile (Direct) +919552077615
Read my blog:-
http://www.blogger.com/profile/11964142182953111712
________________________________
Behind Every Fortune There is a Crime.
प्रतिक्रिया
10 Nov 2009 - 6:47 pm | सूहास (not verified)
बेगर्स असोसिएशन , नागपुर आणी चेन्नईविषयी कधी एकले आहेत का ??
आणखी एक ..१० % भिकारी टिपर असतात ..
सू हा स...
10 Nov 2009 - 6:16 pm | जे.पी.मॉर्गन
चेतन, तुझं म्हणणं पटलं. त्यानंतरचा लगेच लक्षात येणारा मुद्दा म्हणजे व्हिडियो - ऑडियो पायरसीचा. माझ्या माहितीप्रमाणे बॉलिवुडपटांची पहिली सीडी / डीव्हीडी पाकिस्तानात करोडो रुपयांना विकली जाते. पुढे त्याच्या डुप्लिकेट्स निघून त्यांचं काय होत असेल ह्याची आपल्याला कल्पना येईलच. त्यामुळे आपण पायरेटेड सीडी / डीव्हीडी घेऊ नयेत.
परदेशी चलन बदलून घेताना आपण बर्याचदा बँकांकडे न जाता २ रुपये जास्त देणार्या "ओळखीच्या" लोकांकडे जातो. त्यांच्याही कळत नकळत त्यांचे लागेबांधे दुबईतल्या दहशतवाद-पुरस्कारकर्त्यांपर्यंत असतात. वरील मुद्द्याव्यतिरिक्त ह्या दोन मुद्द्यांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर आपण गुन्हेगारीला काही प्रमाणात तरी आळा नक्कीच घालू शकू !
10 Nov 2009 - 6:32 pm | टारझन
"धन्यवाद" च्या वरच्या लेखापेक्षा , खालचा लेख आवडला !
- चेतना गायब करणे
CHETANAA GAYAB KARANE
फांदी क्र. १२, झाड क्र १२२०२ , नदीकाठ ,
BRANCH # 86, TREE # 25, RIVERSIDE
चिंपाझीनगर , गोरील्लापुर
CHIMPANZEE NAGAR , GORILLAPUR
बुंगाबुगांगा - ४२० ४२० अफ्रिका
BUNGABUGANGA - 411 044. AFRICA
दूरध्वनी +२५६२२१११८ / +२२५११२१७१९७
Telephone +256221118 / +22511217197
भ्रमणध्वनी (थेट) +२५६ ९११० ६१६२ ६१६२
Mobile (Direct) +256 9910 6162 6162
10 Nov 2009 - 6:58 pm | दिलीप वसंत सामंत
आपण कोणी प्रत्यक्ष काहीच करू शकत नाही. परंतू आपल्या रोजच्या जीवनात कायदे पाळून सारे व्यवहार करावे. वर दिल्याप्रमाणे पायरेटेड सीडी विकत घेणे, बेकादेशीर व्यक्तीं बरोबर परकीय चलनाचे व्यवहार करणे, टॅक्स चुकवून ऑक्ट्रॉय चुकवून वस्तू विकत घेणे वा आणणे, बिला शिवाय खरेदी करणे इ. गोष्टी करू नयेत. मुळात पैसा निर्माण कोण करतो सामान्य माणूस त्याने तो पैसा शक्यतो कायदेशीर व्यवहारात खर्च करावा. आपण एवढेच करू शकतो. गुन्हेगारी नष्ट करायला हवेत लेनिन, टिटो, माओ किंवा कॅस्ट्रो यांसारखी बलदंड माणसे.
10 Nov 2009 - 7:00 pm | चेतन सुभाष गुगळे
"आणखी एक ..१० % भिकारी टिपर असतात .."
हे सुहासचे मत एकदम मान्य. पण मग गुन्हेगारांमध्येदेखील काही टक्के पोलिसांचे खबरी असतात, पोलिसांमध्येही काही टक्के गुन्हेगारांचे हस्तक असतात, राजकीय नेत्यांमध्ये देखील काही टक्के देशद्रोही असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या लेखावर अभ्यासू प्रतिक्रिया देणार्या माणसांबरोबरच टारगट लि़खाण करणारे 'टारझन'ही असतात.
'काही टक्के' भेसळ सर्वच ठिकाणी आढळते.
10 Nov 2009 - 7:02 pm | चेतन सुभाष गुगळे
दिलीप वसंत सामंत आणि जे.पी.मॉर्गन यांच्या व्यवहार्य प्रतिक्रिया पटल्या.
10 Nov 2009 - 7:12 pm | योगी९००
मलाही हे पटलं..तसेच पासपोर्ट्/रेशनकार्ड/ ट्रॅफिक पोलिस या लोकांना चिरीमिरी न देता आपले काम करून घेणं..
माझा अनुभव असा की जर आपण चिरीमिरी दिली नाही तरी आपले काम होते. फक्त थोडा जास्त वेळ लागतो.
खादाडमाऊ
12 Nov 2009 - 1:25 pm | jaypal
खादाडमाऊंशी एकदम सहमत. माझा अनुभवही असाच आहे.
बहुतेक लोक सुचना पाट्या नीट वाचत नाहीत म्हणुन त्यांना त्रास होतो.
साधं उदा.
१. रेल्वे पास / तिकीट काढताना लाइनीत उभे राहते वेळी कीती जणं कामकाजाची वेळ वाचतात? कितीतरी वेळा भोजन/हीसाब का समय होउन गेल्यावरही खिड्कीबंदच असते. अश्या वेळी खिड्की का बंद आहे? हे विचारण्या पेक्षा लोकं चालु असलेल्या खिड्की समोर उभे राह्तात.( मी खड्सावुन वीचारतो आणि खिड्की उघड्ते मग मी पहीला आणि माझ्या मागे मेढरांची रांग)
२. रेशन कार्ड कामाकाजाविषयी सुस्पष्ट सुचना आहेत. चौकशी खिड्की वर तुमचे कामचे स्वरुप सांगा. त्यानुसार आपणास कोणता अर्ज करायला हवा ते सांगुन अल्प दरात अर्ज दिला जातो.(अशीक्षित वर्गासाठि मोफत अर्ज भरुन देखिल दिला जातो.)
३.रेल्वे तक्रारी साठी स्टेशन मास्तरांना भेटुन तक्रार पुस्तक मागुन पहा. (complaint book) आपल्याला सौजन्यपुर्ण व्यवहाराचा अनुभव येइल अशी मला खात्री आहे.(आपले काम देखिल होइलच)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
15 Nov 2011 - 8:35 pm | अविनाशकुलकर्णी
गुन्हेगारी न करणे जनतेच्या हातात अहे..
पण रोखणे हे पोलिचाचे कायद्याचे काम आहे..
त्यांना ८ व्या वेतन आयोगा प्रमाणे भरपुर तनखा मिळतो...
ह्यांचे व राजकारणी लोकांचे साटेलोटे आहे हि गोष्ट लपुन राहिली नाहि..
इतर देशात गुन्हेगारी का कमी आहे?
28 Nov 2011 - 5:33 pm | अन्या दातार
आमचे अकुकाका काळाच्या फारच पुढे ब्वा! अर्थात त्याचे कौतुक आहेच हो सर्वांना.
आम्ही अजुन ६ वा वेतन आयोग आल्यामुळे स्टायपेंड वाढेल का हो आमचा? अशी चौकशी करतोय, तिथे काकांनी पोलिसांना ८वा वेतन आयोग देऊनही टाकला.
रा.रा. चेसुगु, आपले विचार खरोखरच चांगले आहेत. मीही कधी कुणा भिकार्याला भीक देत नाही. आणि एजंटना सुद्धा माझा विरोध असतो.
28 Nov 2011 - 12:05 am | आनंदी गोपाळ
स्वतः नाही करता आली तर कुणाकडून करवून घेता येईल का? पुण्यात काहीही रेडिमेड करून मिळते म्हणे आजकाल?
28 Nov 2011 - 5:18 pm | किचेन
१. मी गाडीचा परवाना स्वतः काढणार,एजन्तकडे जाणार नाही असे जवळ जवळ ४ वर्षे आई-बाबांना सांगत होते.लर्निंग परवान्याची मुदत संपली कि नवीन काढत होते.आई वडील दोघेही मला अजंत शिवाय काम होणार नाही असे सांगत होते आणि झालेही तसेच.एजान्तामार्फात गेल्यावर मी गाडीमध्ये बसून पाहिया गियर टाकला, बास एवढीच माझी परीक्षा! परवाना मला अगदी घरपोच मिळाला!
२. पासपोर्ट काढताना मात्र मी सगळी कमी स्वतःची स्वतः केली. अजन्त्ला मध्ये घेलते नाही.मी सादर केलेल्या एका कागदपत्राची मुल प्रत जवळ नसल्याने मला दुसर्यादिवशी परत यावे लागले.तेव्हा बाहेरचा एजंट 'माझ्याकडून करून घेतलं असत तर झाल असत' अस बोलला.पण मी दुर्लश केल. स्वतःचा पास्स्पोर्त स्वतः काढला याचे समाधान लाभले.
३.मला शोप अक्ट चा परवाना काढायचा आहे.पण कसा काढायचा याची काहीही माहिती नसल्यामुळे एजंटला पर्याय नाही! :(
४. काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी गाडीवर सामोसे खाताना २ लहन मुले आली आणि भिक मागू लागली.त्यांना पैसे देणे योग्य वाटेना म्हणून आम्ही त्यांना आम्ही दोघात मिळून एक असा सामोसा दिला.सोमोसेवाला त्यांना सामोसा देऊ नका अस सांगत होता,पण आम्ही दिला.थोड्यावेळाने तीच मुले परत आली.तेव्हा सामोसावाल्याने संगीन्तले ह्यांना हा शेंगदाण्याचा लाडू द्या.आम्ही लाडू दिल्यावर ती मुले थोड्या अंतरावर असलेल्या एका बाईकडे लाडू देऊन परत दुसर्यांकडे पैसे मागू लागली.
मध्ये आण्णा फार जोरात चालले होते.पण आता परत पहिले पाध्ये पंचावन्न.त्यांना सपोर्ट करणारी मीच आणि भ्रष्टाचाराला खात पाणी घाल्नारीही मीच! ;(
28 Nov 2011 - 11:25 pm | आशु जोग
आपला जीमेल दिसत नाहीये
स्वाक्षरीमधे