गाभा:
सरणार कधी रण प्रभो तरी, हे कुठवर साहु घाव शिरी..
ह्या ओळी मला नेहमीच एक प्रश्न पाडतात, हे काव्य नक्की पावनखिंडीच्या लढाईबद्दल आहे की जीवनाबद्दल आहे? बाजीप्रभुसारखा वीर अशी कंटाळल्यासारखी भाषा करेल का?
'पावनखिंडीत पाऊल रोवून,
शरीर पिंजे तो केले रण...
शरणागतीचा अखेर ये क्षण,
बोलवशील का आता घरी!'
या ओळी लढाईपेक्षाही आयुष्याबद्दल काही सांगतात असे वाटते. मला वाटतं की पावनखिंडीची लढाई हे रुपक वापरुन कुसुमाग्रजांनी जीवनाची लढाई चितारली आहे.
मीपावरील जाणकारांनी क्रुपया प्रकाश टाकावा.
प्रतिक्रिया
3 Nov 2009 - 11:38 pm | विकास
बाजीप्रभू ज्याने जीवाची बाजी करून खिंड लढवली, त्याच्या तोंडात असे (रडके) गाणे हे परस्परविरोधी वाटते. अर्थात तरी मला हे गाणे आवडते आणि जाणत्या राजाच्या गाण्यांच्या ओघात ते चांगलेच वाटते.
तसेच "वेडात मराठे वीर दौडले सात" च्या बाबतीत.... मला एका ज्येष्ठ प्राध्यापकाने हा प्रश्न येथे विचारला होता: जे असे शत्रूच्या छावणीत कुठलाही प्लॅन न करता जोरात जातात त्या आधी शत्रूस चुकीच्या पद्धतीने, (राजाचे हक्क वापरून,) माफ करतात त्यांचे असे कौतूक करणारे गाणे का असावे? या प्रश्नाचे पण सरळ सरळ उत्तर देता येत नाही, जरी पुरंदर्यांनीच लिहील्याप्रमाणे, शिवाजीमहाराजांची आज्ञा ऐकल्यावर आणि नापसंती समजल्यावर प्रतापराव गुर्जराने एका अर्थी आत्ताच्या काळातील "सुसाईड मिशन" केले आणि शत्रूस समज दिली की परत हिंमत करू नकोस (आणि तसा त्याचा फायदा झाला). तरी देखील याबद्दल अजून काही उत्तर असल्यास समजून घेण्यास आवडेल.
4 Nov 2009 - 12:41 am | सनविवि
हेच म्हणतो. जाणकारांनी खुलासा करावा!
4 Nov 2009 - 10:22 am | गोगोल
पहा...उत्तर मिळेल.
4 Nov 2009 - 1:29 am | विसोबा खेचर
आम्हाला या गाण्याबाबत जे काही वाटते ते आम्ही मुखपृष्ठावर मांडले आहे. इतरांची मते वाचायला उत्सुक आहे..
तात्या.
4 Nov 2009 - 9:44 am | मिसळभोक्ता
काही काही गाणी अशी असतात की ती केवळ ऐकायची आणि नकळत डोळ्याच्या कडा पुसायच्या!
अगदी ! असेच ! म्हणतो !
उगाच विश्लेषण करत बसायचे नाही !
मुळात, बाजीप्रभू, त्याची स्वामी वरची निष्ठा, वरिष्ठांसाठी जीव देण्याची वृत्ती, ही इथल्या कुणाच्याही आवाक्यातली गोष्ट नव्हे. तेव्हा सगळ्यांनी गप्प बसा.
ही विनंती.
ह्यावर चर्चा हवी असेल, तर पुचक्रम नावाचे एक भांडणस्थळ उपलब्ध आहे.
कृपया, "कुसुमाग्रजांना बाजीप्रभू कळला, की नाही" आणि मनुस्मृतीत त्याबद्दल काय म्हटले आहे, वगैरे चर्चा तिकडे कराव्यात. इकडे नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
4 Nov 2009 - 4:12 pm | शैलेन्द्र
"मुळात, बाजीप्रभू, त्याची स्वामी वरची निष्ठा, वरिष्ठांसाठी जीव देण्याची वृत्ती, ही इथल्या कुणाच्याही आवाक्यातली गोष्ट नव्हे. तेव्हा सगळ्यांनी गप्प बसा."
मुळात या ओळी त्या विशिष्ट ऐतिहासीक प्रसंगाचे केवळ चित्रण आहे की त्या प्रसंगाचे रुपक वापरुन केलेली कविता आहे हा चर्चेचा विषय आहे. कुसुमाग्रज किंवा बाजीप्रभुंचे मोजमाप करणे हा नाही.
"या ओळी लढाईपेक्षाही आयुष्याबद्दल काही सांगतात असे वाटते. मला वाटतं की पावनखिंडीची लढाई हे रुपक वापरुन कुसुमाग्रजांनी जीवनाची लढाई चितारली आहे."
5 Nov 2009 - 2:48 am | निमीत्त मात्र
क्या बात है तात्या! लाख मोलाची बात...
4 Nov 2009 - 8:14 am | पाषाणभेद
पावनखिंड नक्की कोठे आहे ते सांगत का कुणी? भटक्या विमुक्त?
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
4 Nov 2009 - 11:47 am | प्रमोद्_पुणे
कराड जवळ आंबा नावाचे एक गाव आहे (पुणे कोल्हापूर हमरस्त्या पासून थोडे आत.. मलकापूरच्या जवळ)तेथून फारच जवळ आहे. पन्हाळ्या वरून सुद्धा जाता येते. खिंडीच्या परिसरात घनदाट झाडी आहे. केवळ अप्रतिम आहे. जरूर भेट द्या. हे गाणे अजून जास्त आवडू लागेल. त्या पावसाळ्या रात्री मावळ्यांनी खानाच्या सैन्याची कशी कोंडी केली असेल याची कल्पना येते.
सर्व मिपाकरांना नम्र निवेदन की त्यांनी ही खिंड जरूर पहावी..
4 Nov 2009 - 8:21 am | छोटा डॉन
माझ्या आठवणीप्रमाणे "झी मराठी" वरच्या सारेगमपा वरच्या गायकांच्या "आजचा आवाज" ह्या कार्यक्रमात एकदा हा विषय निघाला होता.
तेव्हा पंडित ह्रुदयनाथ मंगेशकरांनी ह्या गाण्यामागचा फार सुंदर अर्थ सांगितला होता, हे गाणे अर्थातच "रडके" वगैरे नाही जरी ते वरुन भासत असले तरी, त्यामागे फार मोठ्ठा सुचक अर्थ दडला आहे ...
इंटरनेटवर त्या गाण्याची व त्याबरोबर ह्रुदयनाथजींचे विवेचन असलेली क्लिप शोधतो आहे, सापडली की इथेच चढवतो ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
4 Nov 2009 - 9:27 am | एकलव्य
SRGMP-M LC R-Day Sp-2: Arya: sarnaar kadhi ran
या शोधामध्ये ह्रुदयनाथांचे विवेचन ऐकले होते... आता कोठे सापडत नाही.
4 Nov 2009 - 8:05 pm | सखी
दुर्देवाने तुनळीवरचे सगळे भाग काढुन टाकलेले दिसत आहेत. पण इथे आहे (भाग ४).
4 Nov 2009 - 9:35 am | sujay
" सरणार कधी रण प्रभो तरी" ह्यात ही लढाई कधी संपणार
ह्या पेक्षा महाराज विशाळगडावर कधी पोचणार? हि विचारणा अधीक आहे.
माझ्या मते हे काव्य बाजींची त्याना गोळी लागल्या नंतरची मनस्थिती व्यक्त करते (काव्या ची पहिली २ कडवी)
शरणागतीचा अखेर ये क्षण,
बोलवशील का आता तरी?
त्याना मरण जवळ आलय हे कळलय पण अजून तोफांचे आवाज कानी पडले नाहित. ह्या "बोलवशील का आता तरी"" मध्ये महाराज लवकरात लवकर गडावर पोचोत ही ईच्छा आहे (त्याना माहितेय की जोवर महाराज पोचत नाहीत तोवर प्राण जाणार नाहिये).
ही कवीता कुसुमग्रजांच्या "विशा़खा" काव्यसंग्रहातील आहे व कवितेचे नावच "पावनखिंडीत" आहे.
मी माझ्या कुवती नुसार अर्थ लावायचा प्रयत्न केलाय चु.भू.द्या.घ्या
सुजय
4 Nov 2009 - 9:01 pm | रेवती
ग्रेट गाणं आहे. शब्दच नाहीत. सारेगमप मध्ये ऐकलं होतं आता तू नळी वर पाहिले तर मनात एकही शंका आली नाही की हे शब्द असेच का किंवा इतर काही.
रेवती
4 Nov 2009 - 10:11 pm | चतुरंग
कुसुमाग्रजांचे एक अप्रतिम काव्य आहे.
हे रडके वगैरे अजिबात नाहीये गाणे आणि बाजीप्रभूंना कंटाळाही आलेला नाहीये. आपला राजा इच्छित स्थळी सुखरूप पोचावा ही मनीषा बाळगून ते खिंडीत उभे होते. घावामागून घाव झेलून देहाची चाळण झाल्यावर एका क्षणी सारे संपणार, मृत्यू समोर दिसू लागलेला आहे. ते आशा करताहेत की राजे पोचल्याची खबर म्हणून तोफांचे आवाज कानी यावेत म्हणजे मी मृत्यूच्या घरी जायला मोकळा.
हे वीराचेच गाणे आहे, तो मरणाला भीत नाहीये, रडत तर अजिबात नाहीये. त्याला काळजी एकच आहे की राजे पोचण्याआधी मी पडलो तर काय होईल? आणि त्या काळजीने त्याचा जीव ठरत नाहीये अशी कुसुमाग्रजांची कल्पना आहे.
इतिहास आणि कवीच्या प्रतिभेची उंची दोन्ही नीट माहीत करुन घेणे आपण सर्वांसाठी गरजेचे आहे.
चतुरंग
5 Nov 2009 - 4:05 am | पिवळा डांबिस
संपूर्णतः सहमत!
5 Nov 2009 - 10:34 am | मनीषा
खरय , बाजीप्रभुंसारखा वीर अशी भाषा करणार नाही
सरणार कधी रण प्रभो तरी .... यात हे रण लवकर संपु दे, म्हणजेच महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचु देत.. असे म्हणताना
कुठवर साहु घाव शिरी ? .. असे म्हणल्यावर हे घाव मी किती सोसु ? माझी ताकद संपत आली आहे असा अर्थ होतो .
म्हणजेच रण लवकर संपु दे कारण मला घाव सहन होत नाही असा अर्थ होतो .
'पावनखिंडीत पाऊल रोवून,
शरीर पिंजे तो केले रण...
शरणागतीचा अखेर ये क्षण,
येथ पर्यंत महाराज सुखरुप पोहोचले पाहिजेत त्या आधी मला मृत्यु येउ नये , ही काळजी आहे ,
पण मग ..
बोलवशील का आता घरी!' -- असं का? ही तर शरणागती आहे ना , कि आता हे रण सोसत नाही, मला तुझ्याकडे बोलाव , अशी विनंती करत आहेत , असाच अर्थ होतो ना?
पण इतर दोन कडव्यात मात्र बाजींची महाराज सुखरुप आहेत हे कळेपर्यंत झुंज द्यायची जिद्दच दिसते.
5 Nov 2009 - 10:27 am | सुनील
"शूर अम्ही सरदार अम्हाला...", हे हृदयनाथ मंगेशकरांचे एक गाजलेले गीत. ह्या गाण्याचे शब्द जितके वीरश्रीपूर्ण आहेत, तितकी चाल मात्र जोरकस वाटत नाही, किंचित मवाळ आहे, असे मला वाटते. म्हणजे, शब्द आणि चाल दोन्हीही उत्तम, पण एकमेकाला पूरक मात्र नाहीत, असे दिसते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Nov 2009 - 3:13 pm | JAGOMOHANPYARE
'शूर आम्ही ' बहुतेक लतादीदींचे आहे... आनंदघन या नावाने संगीत दिलेले..
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
11 Dec 2009 - 4:42 pm | मृत्युन्जय
चतुरंग ने केलेले विवेचन सर्वोत्तम आहे.
हे रदके गाणे अजिबात नाही.
बोलवशील का आता घरी! याचा अर्थ देवाघरी असा होतो. ते अंतिम विश्रांतिस्थळ असल्यामुळे असे लिहिले आहे