आपल्याकडे बरेच जणांना वाटते की एकतर आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे किंवा इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे ज्याचा त्या मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदा. आपल्याला आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्या मुलाने डॉक्टर अथवा काँप्युटर इंजिनीयर व्हावे म्हणून प्रयत्न करतो आणि जर आपल्याला आपले मूल इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्याच्यावर अभ्यासाचे अवाजवी दडपण आणतो, त्याला वेगवेगळी टॉनिके पाजतो. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो.
पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे.
मुलांच्या बुद्धिमत्तेला ओळखा.
थोर शिक्षण मानसशास्त्रज्ञ हॉवेल गार्डनरच्या मते मुलांच्यात एकूण आठ प्रकारची बुद्धिमत्ता असते आणि प्रत्येक पालकाने / शिक्षकाने मुलाच्यातील विविक्षित बुद्धिमत्ता ओळखून त्याला योग्य ते प्रोत्साहन दिले पाहिजे.
१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, कोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात.
२) तार्किक-गणिती = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले नमुने, प्रतवार्या, परस्पर संबंध,
गणिती समस्या, व्युहरचनात्मक खेळ आणि विविध प्रयोग ह्यात रमतात.
३) शारीरिक हालचाल = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले शारीरिक संवेदनांनी ज्ञान ग्रहण करतात. ही मुले नृत्य, खेळ, विणकाम, भरतकाम, रांगोळी, हस्तकला, काष्ठकाम, शिल्पकला इ. प्रकारात रमतात.
४) अवकाशीय = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले जिगसॉ पझल, भुलभुलैय्या, लेगो खेळ (मेकॅनो), रेखाटणे किंवा दिवास्वप्नांत रमतात.
५) सांगीतिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले सतत ताल धरतात, गुणगुणतात. त्यांना इतरांना न ऐकू येणारे नाद आपल्या आजूबाजूच्या वातावरणात ऐकू येत असतात उदा. पाणी ठिबकणे, पाखरांचे कूजन. ही मुले उत्तम श्रोता असतात.
६) अंतर व्यक्तिगत = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले जन्मजात नेते असतात. त्यांच्याकडे उत्तम संवादकौशल्य असते, ते दुसर्यांचे अंतस्थ हेतू, भावना जाणतात. बरेचदा ही मुले दुसर्यांचे गुणदोष ओळखून त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात.
७) स्वाधीन व्यक्तिगत = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले बरेचदा लाजाळू असतात. पण
त्यांना स्वत:च्या भावनांची, मर्यादांची / वकूबाची जाणीव असते. ही मुले स्व-प्रेरित असतात.
जाता जाता : जिज्ञासूंनी ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी इथे भेट द्यावी.
प्रतिक्रिया
25 Mar 2008 - 8:50 am | विसोबा खेचर
थोडक्यात परंतु चांगला लेख..
थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो.
सहमत आहे....
पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे.
मला व्यक्तिश: हे पटत नाही परंतु आता आधुनिक शिक्षणशास्त्र तसं म्हणते आहे तर असेलही तसं!
हॉवेल गार्डनरने केलेले वर्गीकरण व त्या प्रत्येकाचे थोडक्यात विवेचन पटले/पटण्याजोगे आहे..
आपला,
(बुद्धीमान) तात्या.
25 Mar 2008 - 9:08 am | सृष्टीलावण्या
१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, कोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात.
हे वाक्य "१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, शब्दकोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात." असे वाचावे.
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
25 Mar 2008 - 11:38 am | बेसनलाडू
लेख. अधिक माहितीच्या शोधात आहे.
(जिज्ञासू)बेसनलाडू
25 Mar 2008 - 2:03 pm | सकेत विचारे
खुप छान........मला एक सुचले यावर.................
"Who wants to know price of everything and value of nothing ! "
मुलान चे पुर्न विकास साथि कोन विचार कर् तो आज काल .....
25 Mar 2008 - 2:21 pm | नीलकांत
हे आमच्या मास्तरांना सांगायला हवे... खरं तर त्यांना किंवा मला हे आधीच ठाऊक असतं तर माझ्यात टवाळक्या करणे, शाळा बुडवणे, वर्गात मारठोक, दंगा आदी करण्याची बुध्दीमत्ता (!) आहे असं निदान काढलं असतं , किमान वर्गाबाहेर उभं राहणे, भरलेल्या वर्गासमोर आम्ही कसे कांदे बटाटे खाऊन नावालाच मोठे झालो चे गजर रोज ऐकायला आले नसते. ; )
हे असे शोध उशीरा लागतात या बद्दल वाईट वाटून घेणारा...
नीलकांत
25 Mar 2008 - 5:28 pm | विसुनाना
आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत
असेल. तसेही असेल.
पण मग हॉवेल गार्डनरच्या एकाहून अधिक (किंवा सर्व) प्रकारात एकाचवेळी प्राविण्य मिळवणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाहीत का?
अवांतर :
गार्डनरने आठ प्रकार सांगितले असे म्हटले आहे पण लेखात सातच दिसले. हे कसे? आठवा कुठे गेला?
की प्रकार क्र. २ मध्ये मी कच्चा आहे? :)
25 Mar 2008 - 6:25 pm | सृष्टीलावण्या
गार्डनरने आठ प्रकार सांगितले असे म्हटले आहे पण लेखात सातच दिसले. हे कसे? आठवा कुठे गेला?की प्रकार क्र. २ मध्ये मी कच्चा आहे? :)
उलट तार्किक-गणिती ह्या प्रकारची बुद्धिमत्ता तुमच्यात ठासून भरलेली दिसते कारण आजपर्यंत हा लेख २-३ मंचावर छापल्यापासून गेले २ वर्षात हा प्रश्न विचारणारे तुम्ही दुसरे. इथेच पहा ना अनेकांनी हा लेख वाचला असेल पण हा प्रश्न तुम्हालाच पडला.
आठवा बुद्धिमत्तेचा प्रकार आहे निसर्गविज्ञ बुद्धिमत्ता.
ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले वनस्पती, खनिजे, पशु, पक्षी, दगड, गवत व इतर निसर्ग घटक फार लवकर ओळखतात आणि त्यांचे वर्गीकरण करू शकतात. उपजतच त्यांना निसर्गाची ओढ असते, जाण असते. उदा. चार्ल्स डार्वीन, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर इ.इ.
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
26 Mar 2008 - 6:29 am | सृष्टीलावण्या
आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत असेल. तसेही असेल. पण मग हॉवेल गार्डनरच्या एकाहून अधिक (किंवा सर्व) प्रकारात एकाचवेळी प्राविण्य मिळवणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाहीत का?
जे एकाहून अधिक विषयात प्रावीण्य मिळवतात ते ज्ञानी होय. बुद्धिमत्ता ही उपजत असते आणि ज्ञान हे कष्टार्जित असते. प्रत्येकाकडे समान बुद्धिमत्ता असते पण त्याचे संमिश्रण वेगवेगळे असते.
उदा. माझ्या घरात सर्व भौतिकशास्त्र पदवीधर, माझेपण गणित बरे होते म्हणून मी पण १० वी नंतर पहिली २ वर्षे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पण भाषेची आवड स्वस्थ बसू देईना. मग माझा कल लक्षात घेऊन मला आई म्हणाली तू कला शाखेतच जा (असे समजूया की माझ्याकडे ४०% भाषिक बुद्धिमत्ता आहे, १०% तार्किक, १५% सांगीतिक, ५% शारीरिक हालचाल आणि इतर बुद्धिमत्ताचे मिश्रण ३०% आहे).
सानिया कडे ८०% शारीरिक हालचाल बुद्धिमत्ता असेल पण सांगीतिक, भाषिक व इतर बुद्धिमत्ता २०% असतील. कदाचित् तिच्या आई वडिलांनी तिची खेळातील आवड जोखली असेल आणि त्या विषयाला प्रोत्साहन दिले असेल. पण उद्या मनांत आणले तर सानिया संगीतातसुद्धा ठसा उमटवून ज्ञानी होऊ शकते. कारण ज्ञानाला वयाचे बंधन नसते.
ह्या उलट जे गतिमंद असतात ते सुद्धा तेव्हढेच बुद्धिमान असतात दुर्दैवाने त्याची अभिव्यक्ती क्षमता ability to express कमी पडते पण एखादा आईनस्टाईन अभिव्यक्ती क्षमता शालेय अभ्यासात दाखवू शकत नाही पण संशोधनात दाखवू शकतो.
चतुरंगकाका म्हणतात त्याप्रमाणे हा विषय गहन आहे मात्र आपल्यासारख्यांकडून (तार्किक बुद्धिमत्ता जास्त असणार्यांकडून) दिलेल्या दुव्याला भेट देऊन आणि तिथल्या इतर दुव्यांना भेट देऊन अधिक अभ्यासपूर्ण प्रश्न अपेक्षित आहेत.
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
26 Mar 2008 - 11:12 am | विसुनाना
माझ्या दोन्ही शंकांचे निरसन केल्याबद्दल आभारी आहे.
माझे मत -
हे खरेच की मुलांची बुद्धीमत्ता आणि त्यांचा नैसर्गिक कल यांच्याकडे पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याला खतपाणी घातले पाहिजे. आणि डोळस पालकांना गार्डनर यांनी प्रतिपादित केलेल्या आठ प्रकारांमध्ये ढोबळ मानाने मुलांच्या बुद्धीमत्तेचे वर्गीकरण करता येईल.
परंतु आपणच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे (निदान भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या अविकसित देशामध्ये) केवळ जगण्यासाठी किमान मिळकत करणे हे अत्यंतिक महत्वाचे आहे. त्यामुळे येथे सर्वच क्षेत्रात गळेकापू (कट-थ्रोट) स्पर्धा आहे. तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या आणि विकसित देशांमध्ये उत्तम रहाणीमानात जगणे हे त्यामानाने सोपे काम आहे.
"आता आमचा मुलगाच पहा... गणितात त्याला कमी मार्क मिळतात. पण तो पियानो ठीक वाजवतो. कदाचित त्याला वादक म्हणून प्रसिद्धी मिळणार नाही. त्याला फारसे पैसे मिळाले नाहीत तरी चालेल. पण त्याला आम्ही पियानो वादक करू."असे म्हणण्याचे धाडस भारतातले किती पालक करू धजतील?(शिवाय पियानो वादक मुलाचे लग्न करणे ही डोकेदुखी होईल ती वेगळीच.;))
त्याऐवजी "त्याला गणित येत नाही ना? मग शिकवणी लावू. पण निदान पोटापुरता पैसा कमावला पाहिजे त्याने. बी.ई. झाला तर बरंय. निदान डिप्लोमा तरी करावा.पियानो काय नंतरही वाजवता येईल!" ही वास्तववादी भूमिका घेणे त्यांना श्रेयस्कर वाटेल.
गार्डनरचे विचार आदर्शवत समाजसंस्थेत (मॉडेल सोशल सिस्टिम) लागू करण्यासाठी योग्यच आहेत. पण भारतासारख्या देशात आदर्शवत समाजसंस्था अस्तित्वात आहे का? आणि नसेल तर ती कधी निर्माण होणार? हा मूळ प्रश्न आहे.
अवांतर -
शिवाय आजकाल भारतातील शास्त्रीय शिक्षण घेणार्यांची आणि अभियांत्रिकी पदवीधरांची अफाट संख्या पाहून अमेरिकेसारख्या 'सर्वगुणग्राहक' देशातही भारतासारखी शिक्षणप्रणाली (म्हणजे आय.आय.टी. , जे.ई.ई. , कोचिंग क्लासेस,???) आणण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.
25 Mar 2008 - 5:33 pm | झकासराव
माझी सांगितीक बुद्धिमत्ता आणि चित्रकलेतली बुद्धिमता अत्यल्प आहे. (ना के बराबर)
हे कुठेतरी शिक्षण पद्धतीत सामावुन गेले पाहिजे.
आधीच झाले असते तर मी खाल्लेला ड्रॉइंगच्या मास्तराचा मार चुकला असता की. :)
25 Mar 2008 - 5:58 pm | अनिकेत
ह्यातून काय ध्वनित होते ते पहा....
प्रत्येक व्यक्ती वरील आठ पैकी एका तरी प्रकारात निपुण आहे.
आता वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांची तुलना चूक आहे- एक शास्त्रज्ञ आणि कवी या दोघांत अधिक कोण बुद्धिमान कसे ठरवणार?
परंतु, पुढे जाऊन आपण म्हणता की सर्वजण सारखेच बुद्धिमान आहेत.
तर, ज्या सार्यांनी योग्य क्षेत्र निवडले, तर ते सारे सारखेच बुद्धिमान असतील?
सानिया मिर्झा बापजन्मात शारापोवाला हरवेल का?
प्रत्येकाची विविध क्षेत्रांतील बुद्धिमत्ता वेगळी असेल, पण तरीही प्रत्येक क्षेत्रातही डावे-उजवे असणारच.
बुद्धिमत्तेत अनुभवाचा वाटा किती आणि अनुभवाचा किती यावर वाद असू शकेल. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्ती वरील आठ पैकी एका तरी प्रकारात निपुण असते म्हणता तेव्हा तुम्ही अनुवांशिक फरक मान्य करताच आहात. प्रत्येकाची लायकी सारखी नसते, हे मान्य करायला एवढे जड का जावे?
अनिकेत
25 Mar 2008 - 9:13 pm | चतुरंग
वर उल्लेख केलेले ७ प्रकार आणि नंतरचा आठवा प्रकार हे बुध्दिमत्तेचे रंजक प्रकार समजले.
पण ही खूपच ढोबळ वर्गवारी आहे असे वाटते. कोणतीही व्यक्ती ह्यातल्या बर्याच प्रकारांची सरमिसळ असलेली असते/असावी असे वाटते.
आणि त्यातही एक, दोन किंवा क्वचित अधिक प्रकारात त्या व्यक्तीचे प्राविण्य असू शकते.
बुध्दिमान मुले ही डॉ. किंवा इंजीनियरच होतात/झाली पाहिजेत असा हट्टाग्रह चुकीचाच आहे.
>>थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो.
ह्याच्याशी मी सहमत आहे.
(माझ्या मागील भारत फेरीत एका नातेवाइकांशी बोलणे झाले आणि समजले की इ. ८ वी पासूनच त्यांच्या मुलाची आय्.आय्.टी.ची तयारी करून घेण्यात येत आहे!?)
(त्या मुलाबद्दल मला फार वाईट वाटले पण मी काही बोललो नाही. ४ - ५ वर्षांनंतर त्याने जी परीक्षा द्यावी असे पालकांना वाटते आहे त्याची अशी तयारी - आणि जर काही कारणाने तो इच्छित ठिकाणी प्रवेश मिळवू शकला नाही तर? त्याला येणार्या नैराश्याची कल्पना करू शकता? फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही!)
उत्तम स्वयंपाक करता येणे ही एक प्रकारची बुध्दिमत्ताच आहे - शेफ संजीव कपूर, संजय टुम्मा इतरही अनेक जण हे व्यावसायिक यशाच्या शिखरावर आहेत.
उत्तम गाणे, उत्तम अभिनय, उत्तम वादन, उत्तम खेळ, उत्तम लेखन, उत्तम कविता (आणि उत्तम विडंबनसुध्दा;), उत्तम प्रकारे खोड्या काढणे;० ही सगळी बुध्दिमत्ता असल्याचीच लक्षणे आहेत!
बुध्दीमत्ता कशी विकसित होईल, कुठे आणि कशी प्रकट होईल हे सांगणे अवघड आहे.
बोर्डात आलेली सगळीच मुले ही हुषार असतात का? का विषयाची मूलभूत तत्वे न समजताही ती पाठांतराने, परीक्षेचे तंत्र समजल्याने मार्क्स मिळवतात/मिळवू शकतात? बोर्डात न येणार्यांचे काय?
किंबहुना हुषारी सिध्द व्हायला शाळेत जायलाच पाहिजे का? (इथे मला बर्नार्ड शॉचे एक वाक्य आठवते. तो म्हणाला होता "मी आणि माझे शिक्षण ह्यात माझी शाळा आली!")
माझ्या बरोबरचा एक विद्यार्थी मला आठवतोय की जो नववी-दहावीत असताना बीजगणित आणि भूमिती मधील प्रश्न सोडविताना स्वतःच्या पध्द्ती शोधून काढून सोडवीत असे.
अत्यंत थोडक्यात, कमी पायर्यांमधे तो ते गणित सोडवी पण त्याला मार्क्स दिले जायचे नाहीत कारण त्याने सोडविलेले बहुतेकदा शिक्षकांनाच समजायचे नाही;)! तो बोर्डात आला नाही!
त्यामुळे तो हुषार नाही असे होते का?
अभियांत्रिकीला असताना माझा एक मित्र हा पेपर थोडाच सोडवून वर्गाबाहेर पडत असे. पेपरची वेळ संपल्यावर बाहेर गेल्यावर त्याच्याशी बोलताना विचारले की पेपर अवघड होता का?
तर म्हणे "प्रश्न बिंडोक आहेत, आवडले नाहीत! पासिंग पुरता सोडवला आहे!!" तो जेवढे मार्क्स अपेक्षित करीत असे बरोबर तेवढेच मिळत. इतर मुलांना अडलेले सर्व प्रश्न तो सोडवून देई! ती मुले वर्गात पहिली दुसरी असत पण हा जेमतेम फर्स्टक्लास (आता हुषार कोण?)!
एकूणच तुलना ही दरवेळी योग्य निर्णय देऊ शकेलच असे वाटत नाही. सर्व विषयांची सक्ती ही सुध्दा नक्कीच नसावी.
नवीन पर्याय असतात/असू शकतात हा सिध्दांत जोपर्यंत शिक्षणपध्दतीला मान्य होत नाही आणि आपल्या मुलांच्या/मुलींच्या क्षमतेवर जोपर्यंत पालकांचाच विश्वास असत नाही तोपर्यंत मुलांची ससेहोलपट होत राहणार आणि कित्येक बुध्दिमान मुले/मुली ही 'ढ' ठरणार! हा फार खोल आणि गहन विषय आहे.
चतुरंग
25 Mar 2008 - 11:53 pm | संजय अभ्यंकर
आपल्या मुलाने अनेक क्षेत्रात पारंगत व्हावे म्हणुन त्यांना छळणार्या-
पालकांना माझी विनंति आहे कि हा विषय कृपया समजुन घ्यावा.
संस्कारां व्यतिरिक्त, आपल्या मुलांसमोर विविध विषय मांडणे व त्यांना केवळ दिशादर्शन करणे हे पालकां कडुन अपेक्षीत आहे.
आपले अभ्यास व कार्यक्षेत्र निवडण्याचे स्वतंत्र पाल्यास असावे.
पिताजी डॉ. अथवा वकील आहेत म्हणुन पाल्यासही त्या क्षेत्राकडे ढकलणारे धन्य ते पालक!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
26 Mar 2008 - 12:11 am | चतुरंग
'भावनिक बुध्दिमत्ता' (इमोशनल इंटेलिजन्स) असाही एक प्रकार आहे. त्या साठी इथे बघा.
"स्वतःच्या आणि इतरांच्या जाणिवा आणि भावना ह्यांना योग्य प्रकारे जोखून, त्यात योग्य तो फरक करुन, त्या माहितीद्वारे स्वतःच्या विचारांना अणि कृतींना योग्य वळण देणे" अशी काहीशी ह्याची व्याख्या आहे.
चतुरंग
26 Mar 2008 - 2:40 am | प्राजु
माझ्याही बघण्यात अशी कित्येक मुले आहेत जी शाळेत जेमतेम पास होत पण त्यांना कोणत्याही प्रश्नाची उत्तरे माहीती असत.
मुलांवर त्यांच्या वयाच्या मानाने किती ओझे टाकावे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. माझ्या मुलाच्या(वय वर्ष ४) वर्गात माझ्याच मैत्रिणिची मुलगी आहे. मैत्रिणीने तिच्या मुलीला, स्वतःचा पत्ता इंग्रजी मध्ये लिहायला शिकवला. आणि तो पेपर घेऊन ती तिच्या शिक्षिकेला दाखवायला गेली. शिक्षिकेने बरेच झापले. ज्या वयात कॅट, मॅट - रॅट अशी स्पेलिंग्ज अपेक्षित आहेत तिथे हिने पूर्ण पत्ता लिहिणे अपेक्षित नाही असे खडसावले. घोकमपट्टी करून घेऊन काहिही उपयोग नाही, तिने आपणहून स्पेलिंग्ज बनवून पत्ता लिहायला हवा असेही सांगितले. सुरूवातीला तिने लिहिलेला पत्ता पाहून मला उगाच वाटून गेले की मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठे कमी पडते आहे का.. हे मी इथे प्रामाणिकपणे मान्य करते. पण नंतर माझा हा समज दूर झाला...
सृ.ला. ताई, छान माहिती आहे.. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
26 Mar 2008 - 8:03 am | सृष्टीलावण्या
मला उगाच वाटून गेले की मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठे कमी पडते आहे का..
मूळात हा प्रश्न मनात येतो याचाच अर्थ तुम्ही मुलांच्या बाबतीत जागरूक आहात आणि बरे झाले त्या शिक्षिकेने पालकांना झापले.
माझा स्वत:चा अनुभव सांगते. मराठी माध्यमात शिकूनसुद्धा मला स्वत:लाच अजून नीट मराठी लिहिता येत नाही. झ, छ, ट, ठ, ड, ढ अजून ही बंभेरी उडवतात (आठवा : पत्त्याचा खेळ छब्बु लिहिले होते ते, नंतर कोणीतरी त्याचे झब्बु केले).
अर्थात हा डिस्ग्राफिया नावाचा शैक्षणिक आजार आहे हे मला माहितच नव्हते. शाळेत तर मी मराठीत जेमतेम पास होत असे. पण त्या काळात पास होणे हेच महत्वाचे मानले जाई (आजच्या सारखी गुणांसाठी गळाकापू स्पर्धा नव्हती).
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
26 Mar 2008 - 7:01 am | संजीव नाईक
सृ.ला शुभ सकाळ
लेख ऊत्तम आहे. पण आपणास ठाऊक आहे काय? मुले जन्मता ध्वनी च्या शोधात असतात.
ती जर मातेच्या कुशित गेली तर आनंदि होतात
कारण मातेच्या ह्रदयातुन निघनारा ध्वनी त्याची चेतना संस्था जागवतो. असो. लेख उत्त्तम आहे.
संर्दभ चांगला. ज्ञान प्रप्त करण्याचे सामर्थ वाचकात येवो. उकृष्ट माहिती आहे.. धन्यवाद.
संजिव
27 Mar 2008 - 8:59 pm | प्रभाकर पेठकर
बुद्धीमत्तेचे जे आठ भागात वर्गीकरण केले आहे ते योग्यच असावेसे वाटते. ह्यालाच आपण 'कल' कुठल्या क्षेत्राकडे आहे हे तपासणे म्हणतो. गणितात मागे राहणारी माणसे चित्रकलेत हुषार असतात असे ऐकले आहे. माझे स्वतःचे कौशल्य (शालेयजीवनात...) दोन्ही विषयात ५०-५० टक्के होते. तसेच विज्ञान विषयांची आवड असून भाषेवर प्रेम आहे. व्यावसायिक गरज म्हणून कॉमर्स केले पण त्यात मन कधीच रमले नाही. सृजनशीलतेच्या ओढ स्वस्थ बसू देईना आणि पाकशास्त्रात नैपुण्य मिळविण्यात मग्न झालो.
आपल्याकडे बुद्धीमत्तेचे प्रमाण म्हणून डॉक्टर, वकिल, इंजिनिअर इत्यादी प्रभॄतींकडे आदराने बघितले जाते. ते योग्यच असते. पण म्हणून इतर 'कौशल्ये' संपादन करणार्यांकडे बुद्धीमत्ता नसते किंवा कमी असते असे समजणे अन्यायकारक आहे. कुठलेही कौशल्य आत्मसात करण्यासही बुद्धीमत्ता लागतेच लागते. ते कौशल्य कुठले आणि त्यात किती प्रगती केली हे त्या त्या व्यक्तिंच्या बुद्धीमत्तेच्या प्रखरतेवर अवलंबून असावे असे दिसते.
27 Mar 2008 - 10:08 pm | सुधीर कांदळकर
कल किंवा ऍप्टिट्यूड असेहि म्हणतात.
आमच्या कॉलेजात एक मुलगा होता. याचा भाऊ डॉक्टर. म्हणून याच्या बाबांनी याला शास्त्र शाखेत घातला. दोन वर्षे फुकट गेली. पण ढ नक्कीच नव्हता.
मग हा कॉमर्सला गेला. डिस्टिंक्शन सोडले नाही. पहिल्या प्रयत्नात सी. ए. आता उत्तम व्यवसाय आहे.
असे असते.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.