निसर्गा सारखा चित्रकार नाही! रोज तेच आकाश पण नव्या रुपात, नव्या रंगात रंगलेले दिसते. अनेकदा बघता बघता आकाश आपले रंग बदलत जाते आणि ती आभाळमाया बघता बघता आपणही रंगुन जातो. असाच एकदा कठड्यावर हात टेकुन क्षितिजाकडे पाहत उभा होतो. सुर्यास्ताला वेळ होता, मात्र सूर्य डोंगरापलिकडे गेला होता आणि त्याची प्रभा आकाशाला प्रकाशमान करत होती. अचानक वार्याबरोबर ढग जमले. काही फिके तर काही गडद, काही विरळ तर काही दाट. बघता बघता आकाश ढगांनी व्यापले. मोठे विहंगम दृश्य दिसत होते. डोंगराच्या बरोबर वरच्या अंगाला स्वच्छ निळे आकाश, पलिकडे दडलेला सूर्य अलिकडच्या ढगांना प्रकाशमान करत होता. प्रत्येक ढगाला वेगळी छटा, वेगळा रंग.
कधी ढगांची रजई अलगद पसरते आणि मधेच कुठेतरी उसवते. त्या ढगांच्या कडा सोनेरी, रुपेरी रंगाने तळपत असतात. आणि उसवलेल्या ढगाच्या पुंजक्यातुन अलगद रुपेरी तेज पुसटसे डोकावते.
एखाददा रखरखीत उन्हाळ्यात सूर्य डोंगरापलिकडून आग ओकत असतो, आणि त्याच्या तावडीत सापडलेल्या ढगाला तो जणु भस्मसात करू पाहतो आणि आकाशात अग्निप्रलयाचा देखावा दिसतो.
कधी कधी जाता जाता सूर्य ढगांवर वणवा पेटवुन जातो. ढगांमध्ये एकिकडे जाळ तर एकीकडे झाकोळ पसरलेली असते.
कधी संधिप्रकाश, त्याचे ढगांवरचे अस्तित्व आणि पार्श्वभूमिला असलेले शांत आकाश एखाद्या अगम्य शिल्पासारखे भासतात.
ना पावसाळा, ना पाऊस पण तरीही एखाद्या संध्याकाळी प्रचंड ढगांचे नभावर आक्रमण होते आणि आसमंत झाकोळुन जाते
कधी असाच अनपेक्षितपणे एखाद्या देखाव्याचा योग येतो आणि प्रतिमा क्षणात चौकटबंद होते
प्रतिक्रिया
22 Mar 2008 - 5:54 pm | विसोबा खेचर
साक्षिदेवा, नहमीप्रमाणेच सर्व प्रकाशचित्रे सुरेख परंतु मला दुसरे आणि शेवटचे चित्र विशेष आवडले!
तुला आणि तुझ्या कॅमेर्याला आपला सलाम!
साक्षिदेवा,
निसर्गा सारखा चित्रकार नाही!
ही बाकी लाख मोलाची बात सांगितलीस!
आपला,
(आभाळवेडा) तात्या.
23 Mar 2008 - 7:50 am | सन्जोप राव
सुंदर छायाचित्रे. वॉलपेपर म्हणून लावावी अशी. 'आभाळमाया' हे शीर्षकही गमतीदार.
(अवांतरः 'आभाळमाया' या मालिकेवर लेख असावा या अपेक्षेने तलवार उपसली होती. चित्रे पाहून ती म्यान केली!)
सन्जोप राव
23 Mar 2008 - 7:52 am | विसोबा खेचर
अवांतरः 'आभाळमाया' या मालिकेवर लेख असावा या अपेक्षेने तलवार उपसली होती. चित्रे पाहून ती म्यान केली!)
सहमत आहे! ती एक अत्यंत फालतू मालिका होती!
तात्या.
23 Mar 2008 - 8:59 am | चतुरंग
नेहेमीप्रमाणेच तुमच्या अजब स्पर्शातून बोलणार्या कॅमेर्याची जादूमयी करामत मन सुखावून गेली!
उकळता लाव्हा असावा असे ३, एखादी सोन्याची लगड तापवून ठेवावी असे नं४ आणि कोणत्याशा दुसर्याच ग्रहावरचे वाटावेत असे अमोनिया किंवा तत्सम वायूचे वाटणारे ढग नं.५ मधे फारच छान!
चतुरंग
23 Mar 2008 - 4:22 pm | सर्वसाक्षी
हा सगळा तात्याचा चावटपणा! कुठल्यातरी दगडाला तात्या नामे चावट माणसाने शेंदूर फासला आणि त्याचा देव केला. बाकी तात्या पक्का कोकणी हो; कोकणात पट्टेवाल्याला आय. सी. एस. म्हणतात असे तात्याच्या भाईकाकांनी सांगितले आहे:)
23 Mar 2008 - 11:18 pm | सोम
निसर्गाची सुन्दर रुप दाखविल्याबद्दल धन्यवाद...
23 Mar 2008 - 11:48 pm | प्राजु
काय करू वर्णन याचं? २,३, ४ आणि ५ छायाचित्रे अतिशय उत्तम...
- (सर्वव्यापी)प्राजु
23 Mar 2008 - 11:52 pm | अभिज्ञ
अप्रतिम फोटोग्राफि.
24 Mar 2008 - 6:01 pm | सकेत विचारे
हे, मस्त पिक आहेत.
24 Mar 2008 - 8:40 pm | देवदत्त
सर्व छायाचित्रे छान आहेत :)
काही माझ्याकडूनही... २००६ मध्ये बंगळूर मध्ये काढले होते.
24 Mar 2008 - 8:48 pm | चतुरंग
विशेषतः दिव्यांचे गोल त्या सूर्यप्रकाशाच्या पार्श्वभूमीवर फारच मनोहारी दिसत आहेत!
चतुरंग
24 Mar 2008 - 8:48 pm | इनोबा म्हणे
सर्वच प्रकाशचित्रे उत्तम.
देवदत्तांचीही दोन्ही चित्रे अगदी मोहक आहेत.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
24 Mar 2008 - 9:31 pm | झकासराव
प्रकाश चित्रे अप्रतिमच आहेत :)
आवडली