'सारे तुझ्यात आहे' या आल्बमच्या (ध्वनि तबकडीच्या - सीडी च्या) प्रकाशनाचा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक मंडळात काल दि. २०-०३-२००८ रोजी पार पडला. सहा ते आठ अशी वेळ दिली होती. ठीक साडेसहाला म्हणजे भारतीय वेळेप्रमाणे बरोबर सुरू झाला.
श्री. हेमंत बर्वे यांनी सुत्रसंचालनास सुरुवात केली. चुरचुरीत शैलीत मसुदा (स्क्रिप्ट) लिहिला होता. स्वागतकाचे काम तबकडीचे निर्माते आणि कवियित्री गीतकार जयश्रीताईचे पती श्री अविनाश अंबासकर यांनी भूषविले. गायक-गायिका देवकी पंडीत, वैशाली समंत, स्वप्निल बांदोडकर, संगीतकार अभिजित राणे, फ़ाउंटन म्यूझिकचे कांतिभाई ओसवाल आणि मान्यवर अतिथि सुप्रसिद्ध संगीतकार श्री अशोक पत्की यांचे त्यांनी स्वागत करून त्यांना स्थांनापन्न केले.
मग माईक जयश्रीताईच्या हातात गेला. त्यांनी कुवैतच्या मराठी मंडळासाठी रचलेले गीत म्हणून दाखवले. काही व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने एखाद्या समारंभावर ठसा उमटवून जातात. शब्द कसे उच्चारावेत, वाक्यात स्वराचा चढउतार कसा असावा हे खरे म्हणजे त्यांच्याकडून शिकावे. प्रत्येक शब्दाला त्या वाक्यात एक विशिष्ट नाद असतो, एक उच्चारसौंदर्य असते. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते. असे नादमय बोलणे असल्यावर कविता मीटरमध्येच जन्माला आल्या तर आश्चर्य नाही. असे नादमय पण हिंदी शब्द मी कलापिनी कोमकली यांच्या तोंडून ऐकले आहेत. ही एक निसर्गदत्त अशी दैवी देणगी आहे आणि फ़ार दुर्मिळ आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. यात एकहि अ़क्षर अवास्तव नाही. अजून ते उच्चार माझ्या कानांत आहेत. इथेच समारंभ वेगळ्या उंचीवर गेला आहे हे जाणवू लागले.
प्रास्ताविकानंतर त्यांनी स्वप्निलला कांही प्रश्न विचारले. अर्थातच स्वप्निलने त्यांना योग्यती उत्तरे दिली. स्वप्निलने नंतर याच आल्बममधील गजल म्हटली. साथीला त्याच गाण्याचा इंटरनशनल ट्रॅक म्हणतात तो वाजत होता. असे गाणे तेवढे सोपे नाही. स्वप्निलने त्याचे व्यावसायिक कौशल्य सिद्ध केले. सोहळा एका वेगळ्याच माहोलमध्ये गेला.
नंतर वैशाली. तिला देखील हेमंतने असेच काही प्रश्न विचारले. तिने व व स्वप्निलने अल्बममधील ओला वारा हे द्वंद्वगीत म्हटले. इंटरनॅशनल ट्रॅक च्या साथीने. ठीक झाले. या गाण्यामधील वैशिष्ट्यपूर्ण ठेका मात्र ठसा उमटवून गेला.
मग अभिजित राणेशी थोड्या गप्पा. अर्थात सुत्रसंचालक हेमंतच्या माध्यमातून. मग ओसवालजी बोलले. आणि पुन्हा एकदा जयश्रीताईंनी मनाचा ताबा घेतला आणि शब्दस्वर्गाची सफ़र घडवली
मग या सर्वावर कळस चढला. अर्थातच देवकी. देवकीने जाहीर केलं की ती इंटरनॆशनल ट्रॅकच्या साथीने न गाता नुसतीच दोन ओळी गाईल. मग हेमंतने संगीत संयोजक प्रशांत लळित यास पाचारण केले. ते संवादिनीवर बसले. आणि देवकीने बाजी मारली. दोन ओळीत तिने संपूर्ण सभागृह जिंकले. एका श्रोत्याने वन्स मोअर दिला. आपणा रसिकाचा आग्रह कोणी नाकारू शकतो काय? आणि पुन्हा दोन ओळी. दिव्यत्वाचा स्पर्श आणखी काय वेगळा असतो. याच्या रसग्रहणासाठी मात्र संगीतज्ञाचीच गरज आहे.
पत्कीजीना एखादी चाल सुचते तेव्हा त्यांना संवादिनी वा की बोर्डची गरज नसते. आवडली तर मग ते ती अनेकदा गुणगुणतात. ब-याच वेळा त्यांना ती नंतर खास वाटत नाही. पण स्वतःला जोपर्यंत एखादी चाल आवडत नाही तोपर्यंत ते ती दुस-या कुणालाहि म्हणून दाखवत नाहीत. मग दुसरी चाल. काही चाली मात्र अनेकदा गुणगुणून पण त्यांना चांगलीच वाटते. मगच ते ती इतरांपुढे मांडतात. हा त्यांचा सर्वोत्तमाचा ध्यास त्यांनी कथन केला. त्यांच्या या सर्वोत्तमाच्या ध्यासाला (पॅशन फॉर परफेक्शन) दंडवत.
नंतर सर्व लहानमोठ्या कलाकारांचा सत्कार. ओसवालजी इ.थोरांचे तसेच आल्बमच्या निर्मितीतील लहानमोठ्या कलाकारांचे सत्कार होऊन सोहळा सम्पन्न झाला.
कांही गोष्टी मात्र खटकल्या. एवढा छान चुरचुरीत मसुदा. पण हेमन्तचा स्वर "आकाशवाणीवरील हे मराठीतील बातमीपत्र दिल्लीवरून ध्वनिक्षेपित करण्यात येत असून ......" असा पन्नास वर्षांपूर्वीचा. नवीन पिढीचा जोश पूर्ण गायब. एखाद्या दिवशी एखादा आपला सूर गमावतो. तसेच एका छोट्या कलाकाराचा सत्कार करतांना "हा अंडर ग्रॅज्युएट आहे"असा उल्लेख केला होता.अशा गोष्टी टाळता येण्यासारख्या होत्या. असो. एक आनंददायी सोहळा अनुभवला.
सुधीर कांदळकर
प्रतिक्रिया
21 Mar 2008 - 6:25 am | प्राजु
वर्णन छान शब्दबद्ध केलं आहे.
कार्यक्रमाचा वृतांत इथे दिल्याबद्दल धन्यवाद..
- (सर्वव्यापी)प्राजु
21 Mar 2008 - 7:24 am | सर्किट (not verified)
मग माईक जयश्रीताईच्या हातात गेला. त्यांनी कुवैतच्या मराठी मंडळासाठी रचलेले गीत म्हणून दाखवले. काही व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने एखाद्या समारंभावर ठसा उमटवून जातात. शब्द कसे उच्चारावेत, वाक्यात स्वराचा चढउतार कसा असावा हे खरे म्हणजे त्यांच्याकडून शिकावे. प्रत्येक शब्दाला त्या वाक्यात एक विशिष्ट नाद असतो, एक उच्चारसौंदर्य असते. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते. असे नादमय बोलणे असल्यावर कविता मीटरमध्येच जन्माला आल्या तर आश्चर्य नाही. असे नादमय पण हिंदी शब्द मी कलापिनी कोमकली यांच्या तोंडून ऐकले आहेत. ही एक निसर्गत्त अशी दैवी देणगी आहे आणि फ़ार दुर्मिळ आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. यात एकहि अ़क्षर अवास्तव नाही. अजून ते उच्चार माझ्या कानांत आहेत. समारंभ वेगळ्या उंचीवर गेला आहे हे जाणवू लागले.
सुधीरराव,
प्रथम, आपण ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.
जयश्रीताई माझ्या ऑर्कुट मित्रमंडळात आहेत, ह्याचा अभिमान वाटतो.
(आणि त्या नागपूरकर आहेत, ह्याचाही. हल्ली पुणे-मुंबई येथील इनू-सॢला ह्यांच्यातील संवाद बघता, आम्ही नागपूरकर आहोत ह्याविषयी अचानक बरे वाटू लागले आहे.)
- सर्किट
21 Mar 2008 - 8:27 am | प्रमोद देव
अतिशय सुरेख,दिमाखदार अशा ह्या प्रकाशन सोहळ्याचे वर्णन सुधीररावांनी तितक्याच नेटकेपणाने केलेय.
सुदैवाने मी देखिल ह्या समारंभाला हजेरी लावू शकलो त्यामुळे सुधीररावांनी इथे केलेले वर्णन किती नेमके आहे ह्याचा मी साक्षीदार आहे.
सुधीरराव अभिनंदन आणि आभार.
आता थोडेशी माझ्याकडून भरः
जयश्रीने आपल्या मनोगतात सांगितले......
माझ्या कविता लेखनाला दिशा दिली ती सर्वप्रथम कुवेतमधील संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांनी. कवितेचे गीत होण्यासाठी त्यात हव्या असणार्या नेमक्या गोष्टी म्हणजे त्यातील मात्रा,वृत्त आणि मीटर सारख्या तांत्रिक गोष्टींबद्दल मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मला केलेलं आहे. त्यांच्याचबरोबर झालेल्या बोलण्यातून कुवेतमधील मराठी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रगीतासारखे म्हणता येईल असे मायमराठी बद्दलचे रुजवू मराठी, फूलवू मराठी हे गीत मी लिहू शकले.
माझ्या कविता लेखनाला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली ती मायबोली ह्या संकेतस्थळाने आणि त्यानंतर मनोगत ह्या संकेतस्थळाने.
इथे मला खूप मित्र-मैत्रिणी भेटल्या. त्यांच्याकडून नेहमीच मोलाचे मार्गदर्शन ,कौतुक आणि प्रोत्साहन मिळत आलेले आहे.
ह्या संग्रहाचे सारे तूझ्यात आहे हे शीर्षकही माझ्या एका कामिनी केंभावी नावाच्या मैत्रिणीने सुचवले आणि मलाही ते खूप आवडले.
ह्या बद्दल अजून बरेच लिहिण्यासारखे आहे पण ते आपल्याला खुद्द जयश्रीच्या समर्थ शब्दात थोड्याच दिवसात वाचायला मिळेल आणि तेच जास्त योग्य ठरेल. तेव्हा इथेच थांबतो.
21 Mar 2008 - 10:27 am | विसोबा खेचर
सुधीरराव,
उत्तम वृत्तांत!
मलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती परंतु काही घरगुती कारणांमुळे जमलं नाही.
या अल्बमकरता मी जयूचं मनापासून अभिनंदन करतो. जयूचं निवेदनही अतिशय रसाळ असतं यात काहीच वाद नाही.
असो, जयूला आणि ह्या अल्बममधील सर्व संबंधित कलाकारांना सुगमसंगीतातील पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
तात्या.
21 Mar 2008 - 10:58 am | इनोबा म्हणे
वृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद!
उत्तम वर्णन....
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
25 Mar 2008 - 1:45 pm | प्रमोद देव
इथे आणि इथेही पाहा
28 Mar 2008 - 8:22 pm | जयवी
सुधीरजी..... सगळ्यात पहिले...... तुमचे आभार..... इतक्या सुरेख वृत्तांताबद्दल !! मला इथे प्रतिक्रिया द्यायला खरं तर उशीरच झालाय पण आज कुवेतला परत आलेय आणि लग्गेच लेख वाचून आभार मानतेय.
तुम्ही माझी जरा जास्तंच तारीफ केलीये हो.....!! पण आपला कार्यक्रम इतका मनापासून कोणाला आवडला ह्याचा आनंद मात्र नक्कीच झाला. पण तुम्ही न भेटता गेलात...... ह्यांचं वाईटही वाटलं. आता पुढच्या वेळी मात्र नक्की भेटूयात
प्राजु, सर्कीट(नागपूरकर) :) , देवकाका, तात्या (तुमची वाट बघत होते हो), इनोबा........ सर्वांचेच आभार !!
आता सीडी विकत घेऊन त्याबद्दल अभिप्राय नक्की कळवावा.
देवकाका दूरदर्शनाचे दुवे दिल्याबद्दल खूप खूप आभार. आता कुणाकुणाचे किती किती आभार मानू असं झालंय..... इतकी सगळ्यांची मदत झालीये. असंच प्रेम असू द्या.