चॅलेंज खेळ मस्तच. योग्यवेळी चॅलेंज म्हणायचे, योग्यवेळी पास म्हणायचे आणि निरागस चेहरा ठेऊन बिनचूक खोटी पाने घुसडायची.
तसे आम्ही बदाम ७, गुलामचोर, ५-३-२, रमी, ७-८, छब्बु, ३०४, लॅडिस सुद्धा खेळतो. पण खरी मजा मेंढीकोट आणि कॅनवेस्टा खेळताना येते ती.
एका पावसाळ्यात गाड्या बंद पडल्याने २५-३० जण आमच्याकडे अडकली होती. २ रात्रंदिवस मेंढीकोट. सोबत डबेभरून चिवडा आणि चकल्या.
आजही आम्ही कोकणात गेलो की चांदण्यात रात्र रात्र पत्ते खेळतो. १५-१६ जण, ३ कॅट घेऊन मेंढीकोट आणि जर तरुण पिढीतील खेळाडू जास्त असतील तर कॅनवेस्टा. मग भिडू पाडताना शक्यतो नवरे आणि त्यांच्या बायका एकाच गटात येईल असे पाहायचे म्हणजे भांडणाची खुमारीच वेगळी.
तसे आमच्यात कोणी लबाडी करतच नाहीत असे नाही पण सगळा भर शक्यतो पडलेली पाने लक्षात ठेवणे
आणि अंदाज बांधणे (जे हमखास चुकतात. मग आरडाओरडा, एकमेकांना टोमणे मारणे...).
मात्र एक आहे की पत्ते खेळताना भले एकमेकांच्या छाताडावर बसू, एकमेकांच्या झिंजा उपटू पण पत्ते खेळणे संपले की भांडणे पण संपतात.
प्रतिक्रिया
16 Mar 2008 - 11:13 am | ॐकार
माझ्या ऐकण्यात कॅनेस्ट्रा हे नाव आले आहे. चूक/बरोबर काय ते ठाऊक नाही. राणी डाव (hearts), लॅडिज, मेंढीकोट, नॉट-ऍट-होम, ३०४, झब्बू (एकेरी, गड्डेरी, इलेक्ट्रीक, बेरीज), कॅनेस्ट्रा/कॅनवेस्टा, गटारउपशी (मुंगूस), च्यॅलेंज(!), गुलामचोर,५-३-२, ७-८, बदाम-७ असे बरेच खेळ खेळत कित्येक मे महिन्यांच्या सुट्ट्या घालवल्या आहेत.
16 Mar 2008 - 12:18 pm | विसोबा खेचर
च्यॅलेंज आणि झब्बू हे आमचे अतिशय आवडते खेळ!
परंतु आमचं खरं मन रमतं ते तीन पत्तीत! बुद्धीला चालना देणारा खेळ आहे हा! त्या खेळाची मजा काही औरच, तशीच सजाही काही औरच! :)
आपला,
(जुगारी) तात्या.
16 Mar 2008 - 1:19 pm | सृष्टीलावण्या
जजमेंटला विसरून चालायचेच नाही (मुंगुस तर आता कसे खेळतात ते विसरायलाच झाले). खरी
गम्मत येते ती लहान मुलांशी भिकार सावकार खेळताना. त्यांना जिंकायला देताना धमाल वाटते.
पत्त्यांची नशीली,
सृला.
मेंढीकोट रमवानुं, ज्युस पिवानुं, शुं मज्जानी लाईफ...
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
16 Mar 2008 - 2:30 pm | पुष्कर
हा एक नव्यानेच कळलेला खेळ. ७-८-९ आणि ७-८ ह्या खेळांचा काही संबंध नाही. ७-८-९ हा थोडा रम्मी सारखा आणि फार 'उनो' सारखा आहे. ७--८--९ ही पत्त्यांमधली जणू ट्वेंटी-ट्वेंटी आहे. खेळताना खूप मजा येते.
ह्याला कोणतीही पाने वर्ज्य नाहीत. पाच-पाच पाने वाटून डाव सुरू होतो. हातातले गुण कमित कमी ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट. रम्मी प्रमाणे मध्ये उरलेल्या पानांचा गठ्ठा ठेवायचा. रम्मीच्या उलट खेळायचे, म्हणजे आधी हाततले पान टाकायचे आणि मग गठ्ठ्यातून उचलायचे.पानांच्या जोड्या टाकायला परवानगी आहे. (२ एक्के, २ गुलाम इ. ; राजा-राणी ही जोडी नाही). तसेच ३ किंवा जास्त पानांचा सिक्वेंस टाकू शकतो. घेताना मात्र एकच पान उचलायचे.
सत्ती, आठ्ठी, नश्शी ही ह्या खेळाची मुख्य हत्यारं. समजा एखाद्याने सत्ती टाकली, तर त्याच्या पुढच्या भिडूने काहीही न खेळता समोरच्या गठ्ठ्यातून २ पाने उचलायची आणि त्याच्याही पुढच्या भिडूने नेहमीप्रमाणे खेळ चालू ठेवावा. एखाद्याने आठ्ठी टाकली, तर ज्या क्रमाने खेळ चालत आला, त्याच्या उलट सुरु करावा (क्लॉकवाईज खेळत असाल तर अँटीक्लॉकवाईज). एखाद्याने नश्शी टाकली, तर त्याच्या पुढचा भिडू एकावेळेसाठी स्किप (थोडक्यात, त्याची एक उतारी चुकते).
एक्क्याला १, दुर्रीला२, अश्या क्रमाने दश्शीला १० गुण. सर्व चित्रांना १०-१० गुण असतात.
डावाचा शेवट हा खेळाडूंच्या मनावर असतो. जर एखाद्याला असे वाटले की आपल्या हातात सर्वांपेक्षा कमी गुण आहेत, तर त्याने त्याची उतारी आल्यावर उतारी करण्यापूर्वी "शो" करावा. तो जर बरोबर निघाला, तर त्याला ० गुण आणि इतरांचे जे झाले असतील तेगुण लिहावेत. प्रत्येक डावात गुणांची बेरीज करत रहावे. जो २५० चा टप्पा पार करेल, तो खेळातून बाहेर. उरलेले भिडू खेळ चालू ठेवतील. अश्या रितीने एक एक गडी कमी होत शेवटी जो एक राहील तो जिंकला.
मुख्य लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हातात कमी पाने ठेवणे हे उद्दिष्ट नसून कमी गुण ठेवणे हे आहे.
ह खेळ १ पेक्षा जास्त कितीही जणांत खेळता येतो. ४ पेक्षा जास्त जण असतील तर जास्त कॅट घ्यावेत.
एकदा हा खेळ जमू लागला, की तो व्यसन लावतो. वर्षानुवर्षे मेंढीकोट खेळणार्यांचा सवयी ह्याने मोडल्या आहेत.कोणाला अधिक माहिती हवी असेल ह्या खेळाबद्दल तर मला कळवा.
17 Mar 2008 - 12:13 am | प्राजु
डाँकी-मंकी, बेरीज झब्बू आणि ३०४....
खूप मजा येते.
- (सर्वव्यापी)प्राजु
17 Mar 2008 - 12:34 am | व्यंकट
मला लहान मुलांबरोबर भिकार सावकार खेळायला आवडतं. ते जिंकायला लागले की फार भारी एक्स्प्रेशन्स देतात.
व्यंकट