लहरी राजा, प्रजा आंधळी...

विकास's picture
विकास in काथ्याकूट
14 Mar 2008 - 11:05 pm
गाभा: 

खालील बातमी वाचून वरील शिर्षक आठवले...

मुख्यमंत्री सहायता निधीचे तीन तेरा..!
14 Mar 2008, 1218 hrs IST

मुंबई
मटा ऑनलाइन प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधला पैसा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गरजू नागरिकांना दिला जात असावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा भ्रम आहे असेच समजा. २००३ ते २००५ या वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतले कोट्यवधी रूपये कबड्डी मॅच, महिला फुटबॉल मॅच, गझन संमेलन तसेच मराठी नटाच्या एका फॅन क्लबच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाटला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार चळवळीचे कार्यकर्ते शैलेश गांधी यांनी राइट टू इन्फॉर्मेशन अॅक्टखाली ही माहिती मिळवली आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात झाली. हा निधी फक्त नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठीच वापरण्यात येईल असा उद्येश जाहीर केलेला करण्यात आलेला आहे. मात्र २००३ ते २००५ या वर्षात ५० कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी भलतीकडे वळवल्या गेला असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख हे विराजमान होते.

विशेष म्हणजे एप्रिल २००३ ते मे २००४ या काळात महाराष्ट्रातल्या १५ जिल्ह्यांमध्ये सहा वर्षाखालील ९ हजार बालके कुपोषणाने ग्रस्त होती. तर एक हजार ४१ बालकांचा विविध आजाराने मृत्यू झाला होता.

राज्यातल्या जनतेला मदत म्हणून देशभरातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत येत असते. पूर, भूकंप, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना तात्काळ मदत देण्यासाठी हा निधी असतो. मात्र गेल्या काही वर्षात आर्थिक मदत दिल्या गेलेल्या ४०२ संस्थांच्या यादीवर नजर टाकल्यास या निधीचा निव्वळ दुरूपयोग झाला असल्याचे स्पष्ट होते. २००३-२००४ या वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून २८० संस्थांना २७.१३ कोटी रूपये तर २००४-२००५ या वर्षात २३१ संस्थांना २३.२४ कोटी रूपये देण्यात आल्याचे माहिती आयुक्तांनी सांगितले.

‘ नैसर्गिक आपत्ती आणि संकटात सापडलेल्या नागरिकांसाठीचा निधी अशाप्रकारे वाटण्यात येतो आहे, हे अतिशय धक्कादायक आहे. गरजूंना यातल्या एका पैशाचीही मदत करण्यात आलेली नाही. यापुढे मात्र हा निधी योग्य त्या लोकांना देण्यात यावा अशी अपेक्षा आहे, ’ अशी प्रतिक्रिया शैलेश गांधी यांनी दिली.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या ‘लाभधारकांची’ यादी
14 Mar 2008, 1306 hrs IST

मुंबई,
मटा ऑनलाइन प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत घेणा-या लाभार्थी संस्था खालील प्रमाणे-

१) वनराई, अध्यक्ष-मोहन धारीया (सॉफ्टवेअर डेवलपमेंटसाठी) - ९ लाख
२) भाई जगताप मित्र मंडळ, गिरगाव (धार्मिक आयोजनासाठी) - २ लाख
३) आंबा महोत्सव (आयोजक, आमदार सुधीर सावंत) - २ लाख
४) केंद्र सरकार (हिंदी साहित्य संमेलन,सुरीनाम) - ५ लाख
५) सुयोग नाट्यसंस्था, माहीम (परदेश दौरा) - ५ लाख
६) अखील भारतीय नाट्य परिषद, माहीम - १० लाख
७) डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती भवन, अमरावती, - ५ लाख
८) राज भवन क्लब, मुंबई (नुतनीकरण) - २५ लाख
९) महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी(न्यूयॉर्क संमेलनात सहभाग) - ४ लाख
१०)प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन (लहान मुलांची गायन स्पर्धा) - ५ लाख
११)महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद,यवतमाळ - २ लाख
१२)अखील भारतीय महिला फुटबॉल स्पर्धा,पुणे - १ लाख
१३)महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, शिवाजी पार्क - १० लाख
१४)नारायण ऑफसेट वर्क, नागपूर (पुस्तक प्रकाशनासाठी) - १ लाख ३० हजार
१५)गझल सागर प्रतिष्ठान, बोरिवली (गझल संमेलन) - २ लाख
१६)हिमालय क्लब, ग्रॅंट रोड - १० लाख
१७)गुलाबराव महाराज ज्ञान मंदिर(सभागृहाचे बांधकाम) - ५ लाख
१८)विदर्भ कॅरम असोसिएशन,(फेडरेशन कपचो आयोजन) - २ लाख
१९)आत्महत्याविरोधी जनजागृती प्रबोधन कार्यसमिती, सांगली - १ लाख
२०)कथी आर्ट,शॉप नंबर २, बाहुबली टॉवर,(प्रदर्शन) - ५ लाख
२१)साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब (जागतिक कबड्डी स्पर्धेचं आयोजन) - ५ लाख

प्रतिक्रिया

धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात झाली. >>>>>>>>
स्थापनेनंतर त्या निधीच्या रेकॉर्ड वर अजुन पर्यंत मुख्यमंत्री म्हणुन वसंतराव नाईक यांचेच नाव होते.
ह्याला म्हणतात सरकारी कारभार :)
बघा त्यानंतर किती मुख्यमंत्री झालेत ते मोजा आता.
संदर्भ : लोकसत्ता मध्ये आलेली बातमी.
आता बातमी महिन्याभरापुर्वी आली असल्याने लिन्क शोधता शोधता सापडेना.

प्रमोद देव's picture

15 Mar 2008 - 3:43 pm | प्रमोद देव

आणि कुत्रं पीठ खातंय! असला सगळा कारभार आहे. देणार्‍यांना तर लाज नाहीच आहे पण आपल्याच पोळीवर तुप ओढणारेही तितकेच निर्लज्ज आहेत.
काय बोलणार ह्यापेक्षा जास्त!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Mar 2008 - 5:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुख्यमंत्री सहायता निधीमधला पैसा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गरजू नागरिकांना दिला जात नाही, च्यायला अशा लोकांना भर चौकात जोडे मारले पाहिजे, बाकी काय !!!

देणार्‍यांना तर लाज नाहीच आहे पण आपल्याच पोळीवर तुप ओढणारेही तितकेच निर्लज्ज आहेत.
सही !!!

असाच एक निधी वीरगतीप्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाना मदत व्हावी म्हणुन वेगवेगळ्या संस्थेंच्या बरोबर, महाविद्यालयातही विद्यार्थ्यांकडून जमा केला जातो. तो निधी जरी सैनिक कार्यालयात जमा होत असला तरी , तो निधी तरी सैनिकाच्या कुटूंबापर्यंत पोहचत असेल की नाही याबाबत शंका येत आहे ?

पिवळा डांबिस's picture

16 Mar 2008 - 5:28 am | पिवळा डांबिस

विकासभाऊ,

चांगले आमचे डोळे उघडणारी बातमी दिलीत. तुमचं वाचून झाल्यावर म.टा. वर जाऊन मूळ बातमी सुद्धा वाचली.
वर लोकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्याशी आम्ही सहमत असलो तरी यावर काहीतरी ठोस उपाय करावा अशा विचाराचे आम्ही आहोत.
आज आम्ही निदान २० वर्षे तरी परदेशांत आहोत. अनेक (जवळजवळ सर्वच!) नैसर्गिक आपत्तींच्या वेळेस (आणि काही अनैसर्गिक आपत्तीच्या वेळेस, उदा. अणुस्फोट) आम्ही मदत केली आहे आणि इतरांकडून मदत जमा करण्यास हातभार लावला आहे. निदान आमचा कॉन्शन्स क्लिअर करण्यासाठी तरी त्या दात्यांना असे सांगणे भाग आहे की बाबांनो तुमच्याकडून आम्ही जी मदत गोळा केली होती, आणि जी तुम्ही मोकळ्या हाताने दिली होतीत ती सर्वच मदत आपत्तीग्रस्तांना पोचली असेल याची खात्री नाही. सबब, तुम्हाला गळ घातल्याबद्द्ल आम्ही तुमचे दिलगीर आहोत! आमच्या नेत्यांना लाज नाही पण आम्ही शरमिंदे आहोत!!

म्हणूनच आम्हाला माहिती असलेल्या यच्चयावत मराठी लोकांना व मुख्य करून यु.एस. ए. व यु. के. मधील सर्व मराठी मंडळांना ही बातमी पाठवण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे यापुढे मदत करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील. मदत जर सत्पात्री होत नसेल तर ती व्यर्थच आहे!!

-डांबिसकाका

सर्किट's picture

16 Mar 2008 - 6:48 am | सर्किट (not verified)

म्हणजे डांबिस काका, तुम्ही एकंदरीत परदेशातील मदत कमी करता आहात.

चूक चूक चूक..

भारतात भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील आमची मदत चालूच आहे..

तुम्ही देशद्रोही आहात, हे नक्कीच..

- सर्किट

पिवळा डांबिस's picture

16 Mar 2008 - 8:06 am | पिवळा डांबिस

म्हणजे डांबिस काका, तुम्ही एकंदरीत परदेशातील मदत कमी करता आहात.

ती शक्यता आम्हीही ध्यानात घेतली आहे. नाईलाज आहे.
इथे मदत करणारे लोकं मेहेनतीचे (व पांढरे) पैसे देतात, चिंचोके नव्हेत.

भारतात भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील आमची मदत चालूच आहे..

तुम्ही देशद्रोही आहात, हे नक्कीच..

हा भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील तुमची मदत चालू आहे म्हणता, म्हणजे भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष मान्यता देता नाही का!
मग खरे देशद्रोही आम्ही का तुम्ही?

आम्ही फक्त या मुख्यमंत्री फंडाबद्दल बोलत आहोत. महाराष्ट्रात समाजसेवा करणार्‍या इतर अनेक प्रामाणिक संस्था आहेत त्यांना मदत करायला कोणाची काही हरकत असायचं कारण नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2008 - 12:20 pm | प्रकाश घाटपांडे

परदेशस्थ भारतीयांनी केलेलि मदत ही लाभार्थींपर्यंत पोहोचते की नाही? पोहोचत असल्यास किती प्रमाणात? हा प्रश्न देशस्थ (ब्राह्मण नव्हे) भारतीयांच्याही मनात असतो. आपले दान सत्पात्री पडावे असे वाटणे स्वाभाविक आहे. एनजीओ तेच करतात. तसा दिलासा ते परदेशस्थ भारतीयांना देतात.
शासकीय कारभारात कागदावर दाखवलेला खर्च हा प्रत्यक्षात त्याच कामासाठी वापरला थोडाच जातो. कागदावर दाखवलेली वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती दर्शवणारा कागद यात १८० अंश आउट ऑफ फेज इतका फरक असू शकतो. सहानुभूतीच्या लाटेत अशा शंका मनात येणे हे स्वतःलाच अमानवी वाटतं. मग मदत दिली जाते ती स्वतःचा अपराधगंड दूर करण्यासाठी.
पाच टक्के कर्ज बुडवे लोक असतात म्हणुन बँकांनी कर्जे द्यायची थांबवावे काय? असाही प्रतिवाद केला जातो.
प्रकाश घाटपांडे

विकास's picture

16 Mar 2008 - 9:11 pm | विकास

परदेशस्थ भारतीयांनी केलेलि मदत ही लाभार्थींपर्यंत पोहोचते की नाही? पोहोचत असल्यास किती प्रमाणात? हा प्रश्न देशस्थ (ब्राह्मण नव्हे) भारतीयांच्याही मनात असतो.

होय पोचते. आता परदेशस्थांचा एक त्रागा (फ्रस्ट्रेशन) असतो की बर्‍याचदा रिपोर्टींग वगैरे आपल्याकडून (म्हणजे भारतातून) जसे होणे महत्वाचे आहे तसे होत नाही. मग कधी कधी जे कोणी भारतात जेथे जेथे जात असतील तेथे तेथे त्या प्रोजेक्ट्सना भेट देतात आणि माहीती घेतात.

अशा बर्‍याच भारतीय संस्था आहेत ज्यांचा व्यवस्थापकीय खर्च (ऑर्गनायझेशनल ओव्हरहेडस) हे अगदी २-४% असतात. (रेड क्रॉसचे ते ७५% वगैरे असतात!). आपली परदेशस्थ माणसे स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून फावल्या वेळात ही कामे तयार करतात आणि बर्‍यापैकी यशस्वीपण करतात. दुर्दैवाने कधी कधी त्यात आपलेच भारतीय त्यांच्या वैचारीक विरोधातील संस्थांच्या विरुद्ध जाऊन चांगल्या कामाचे "वाटोळे" करण्याचा प्रयत्न करतात. तसे करण्यात त्यांना यश जरी मिळत नसले तरी स्वतःच्या निगेटीव्ह एनर्जीबरोबर जी लोकं चांगल्या पद्धतीने (पॉझिटीव्ह) स्वतःची एनर्जी वापरत असतात त्यांना पण त्याचा त्रास होतो आणि वेळेचा आणि मनःस्थितीचा अपव्यय होतो.

या संदर्भात मला बरेच काही लिहीता येईल पण विषय भरकटू शकेल आणि तसले निगेटीव्ह मला वागायची इच्छा नाही. अनेक चांगल्या संस्था, अनेक चांगले कार्य माहीत आहे. यात जसे आमच्या सारखे स्थलांतरीत भारतीय आहेत, तसेच येथे जन्मलेले अथवा लहानाचे मोठे झालेली पुढची भारतीय पिढी देखील आहे. ज्याला "सामाजीक उद्यमशिलता" (social entrepreneurship) असे म्हणता येईल असे अनेक उपक्रम आहेत. त्यावर येथे वाचण्यास लोकांना आवडत असेल तर अवश्य लेख लिहीन.