प्रविण भुवड हुतात्मा आहे

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
1 Sep 2009 - 10:01 am
गाभा: 

(सुचना हा लेख मी मटा मधुन सांभार घेतला आहे कारण ह्या विषयावर चर्चा होणे मला महत्वाचे वाटले जर मिपा प्रशासनाला संपादकांना ह्यात काहि वावगे वाटले किंवा जर हा लेख नियमाला धरुन नसेल तर खुशाल हा लेख ईकडुन उडवावा )

गणपती , गोविंदा आणि डबेवाले. या तीन गोष्टी सोडल्या , तर मुंबईवर सांस्कृतिक ठसा उमटवणारं अस्सल मराठी काहीही उरलेलं नाही. म्हणूनच दहिहंडीच्या पाचव्या थरावरून पडून मेलेला प्रवीण भुवड हा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी धारातीर्थी पडलेला हुतात्मा ठरतो.
...................

रफी अहमद किडवई रोडवरून परळ भोईवाड्याच्या दिशेने गेलो की बीएस्टी कॉलनी लागते. ती संपल्यावर रस्त्याच्या शेवटी बैठ्या चाळींची रांग. बाहेरून वाटत नाही , पण आत चाळीला चाळी लागून लांबवर पसरलेली घरांची वेटोळी. संख्येने शेकड्याच्या नाही तर हजाराच्या घरात. हेच मूळचं भोईवाडा गाव. झाडंपेरं , देवाची छोटी देवळं , बारके बोळ अशा गावाच्या खुणा आहेत अजुनही. पण या भागाला नाव आहे , एचएम कॉलनी. फूलफॉर्म हटमेण्ट कॉलनी. झोपडपट्टीचं सायबाच्या भाषेतलं सॉफिस्टिकेटेड भाषांतर.

गच्चं घरं. रिकामी जागा दिसेल तसे बांधत गेलेले. बरीचशी वन प्लस वन उंचावलेली. सार्वजनिक नळाच्या आसपासच्या मो-यांची जागा तेवढी रिकामी. काहीतरी करत असलेल्या नऊवारी साडीतल्या म्हाता-या. पांढ-या केसांचे शून्यात नजर लावलेले म्हातारे आणि पाण्याची निळी टिपं. हे मराठी चाळींमधलं टिपिकल दृश्य. एरियात शिरत असताना बाहेर सगळा गणपतीचा माहौल असतो. दणादणा वाजणारे स्पीकर. लायटिंग. मोठमोठे पोस्टर. पण इथे त्याचं नामोनिशाण नसतं. सगळं दिसताना नॉर्मल वाटतं. पण चालताना दुःखाचं वजन डोक्यावर जाणवत राहतं.

सचिन भुवड विचारलं की लगेच रस्ता दाखवतात. गल्ल्यांत वळून वळून आपण त्या घरी पोहोचतो. भुवडांचं घर. आजुबाजूच्या छोट्या घरांपेक्षाही छोटं. दोन घरांच्या बेचक्यातलं. शंभर स्क्वेअर फूटही नाही आणि नीट चौकोनीही नाही. आत दारिद्र्य गच्च भरलेलं. त्यात जागा काढून लोखंडी खाट कशीबशी बसवलेली. त्यावर भिंतीचा आधार घेऊन बसलेले कृष्णा पाटील. वय पन्नासच्या आसपास. केस तेल लावून नीट बसवलेले. शेकडो स्वप्नांचा चक्काचूर ठासून भरलेली , तरीही भेदक नजर.

बराच वेळ शांततेत जातो. काय बोलणार ? उगाच काहीतरी विचारायचं म्हणून विचारायचं , गाव कुठलं ? ‘ लांजा तालुका. पूर्वेला. सह्याद्रीच्या जवळ. ’ काय काम करायचात ? ‘ अंधेरीला कंपनी होती. कपडे बनवायची. प्रायव्हेट. शिवसेनेची युनियन होती. लोच्या झाला. बंद पडली. ’ पायाला काय झालं ? ‘ कमरेखाली सगळं अधूच आहे ’. तेवढ्यात ते जोरजोरात श्वास घ्यायला लागतात. खाटेवर कलंडतील की काय , असं वाटू लागतं. त्यांच्या पत्नी धावत येतात. सांभाळा सांभाळा सांगतात. भिंतीला टेकवून बसवलं जातं. त्या मुठीनं कांदा फोडतात. नाकाला लावतात. त्यांचा श्वास हळूहळू शांत होत जातो. ‘ आमचा पोरगा गेला , तेव्हापासून सारखं असं चालूय. ’ त्या सांगतात. शब्दाशब्दांतून ठिबकणारी व्यथा. परिस्थितीनं पिचून काढलेलं शरीर. खूप रडल्यात असं वाटणारा आवाज. त्यांचं रडणं थांबलंय खरं. पण प्रत्येक कृती हे रडणंच आहे , असं वाटणारी.

तिथे आणखी थांबणं अशक्य असतं. सचिन नाक्यावर असेल , असं त्या सांगतात. नाक्यावर कळतं तो झाडाखाली असेल. भलंमोठं झाड. कॅरम खेळणा-या मुलांमधला एकजण येतो. नाव गणेश गजमल. सचिनला फोन होतो. तो थोड्या वेळात येणार असतो. गणेश नवतरुण मित्र मंडळाचा अध्यक्ष. या मंडळाचंच गोविंदा पथक. तो कॅमेरा घेऊन यायला सांगतो. कॅमेरा येतो. रिवाइंड होऊन स्क्रीनवर थर लागताना दिसतात. एक. दोन. तीन. चार. भगवी गंजी घातलेला पाठमोरा प्रवीण वर जात असतो. अगदी सराईत. हंडीच्याही वर पोचतो. हंडी आता हातात घेणार इतक्यात एका बेसावध क्षणी त्याचा तोल जातो. कॅमेरा बंद. वरून पडलेला प्रवीण डोक्यावरच पालथा जमिनीवर आपटतो. बेशुद्धावस्थेत त्याला केईएममध्ये नेलं. डॉक्टर प्रयत्न केला. पण पाच दिवस कोमात काढल्यावर मंगळवारी अठरा तारखेला रात्री तो गेल्याचं सांगितलं गेलं.

खरं तर दरवर्षी मंडळाचा उपाध्यक्ष प्रवीण याच्याही वरच्या थरांवर चढायचा. यंदा त्यांच्या मंडळांनी सात थरांची तयारी केली होती. पण एरियात एक मयत झाल्याने फक्त मंडळाची एकच हंडी फोडणार होते. प्रवीण नेहमीप्रमाणे पुढे होता. गावातल्या बारा देवांना नारळ वाहण्याचं कामही त्यानंच केलं. पण विघ्न काही दूर झालं नव्हतं. प्रवीणविषयी सगळी पोरं भरभरून बोलत होती.

प्रवीण एकोणीस वर्षांचा. तरतरीत चेह-याचा. शिडशिडीत पण उंचीला कमी. उत्साही. आनंदी. हसतमुख. सगळ्यांशी बोलणारा. नाइट शाळेत होता. दहावीचे उरलेले दोन विषय या ऑक्टोबरला सोडवणार होता तो. चांगला वायरमन. छोटी छोटी इलेक्ट्रिकची कामं करणारा. इलेक्ट्रिशियनचं परमिट मिळवण्यासाठी मित्र त्याला पाच हजार रुपये गोळा करूनही देणार होते. राम्या इलेक्ट्रिशियनने गणपतीच्या ऑर्डर त्याला देण्याचं कबूल केलं होतं. मित्रांचं एक बेन्जो पथकही आहे. कॅशियो सोडून सगळं वाजवायचा. साईबाबांचा भक्त. झाडाखालच्या साईंच्या देवळात त्याने छान बल्ब वगैरे लावले होते. वर छप्परही केलं होतं. नरेपार्कच्या पायी पालखीबरोबर दोनदा शिर्डीला गेला होता. पुढच्या मार्चमध्ये पुन्हा
जाणार होता. शिर्डीला जशी होते , तशीच आरती घ्यायचा दर गुरुवारी. नंतर रात्री उशिरापर्यंत भजनही. पण आता यापैकी काहीच होणार नाही. पुढच्या वर्षी गोविंदा करायचीही इच्छा नाही कुणाची. गणेशचा चार पाच वर्षांचा छोटा प्रवीणच्याच खांद्यावर बसून दरवर्षी हंडी फोडायचा.

प्रवीणचा एखाद वर्षाने मोठा भाऊ सचिनही आला. बाराव्याची खरेदी करून परतला होता. तो एअरपोर्टवर प्रायव्हेट कॉण्ट्रॅक्टरकडे लोडर म्हणून काम करतो. प्रवीणपेक्षा छोटा चेतन धारावीत एका बॅग बनवणा-या कंपनीत कामाला. दोघांचाही पगार कसाबसा चार हजार. आई थोडंबहुत घरकाम करणारी. घरात कमावणारं असं कुणीच नाही. नाही म्हणायला बाळा नांदगावकर , दगडूदादा सकपाळ , सचिन अहिर अशा पुढा-यांनी औषधपाण्याला दहा बारा हजारांची मदत केली. मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर चारेक दिवस मदतीला हजर होते. आभाळ कोसळताना हे ठिगळही नाही. प्रताप सरनाईक आणि जीतेंद्र आव्हाड यांनी मदतीची घोषणा केली होती. पण अजून काही हालचाल नाही.

बाकी आपण सगळे गाढ झोपेत आहोत. काही अपवाद वगळता सगळं स्थिरस्थावर असलेल्या आपल्यासारख्या कुणाचेच भाऊ किंवा मुलं कधीच थरावर चढण्याची शक्यता नाहीत. म्हणून प्रवीणच्या कुटुंबाच्या दुःखाशी आपण स्वतःला जोडू शकत नाही बहुतेक. असं असेल , तर मग मुंबईतल्या मराठी संस्कृतीचं काहीच खरं नाही. आज कॉस्मोपोलिटन मुंबईवर सांस्कृतिक मराठी ठसा उमटवणा-या तीनच गोष्टी दिसतात. एक गणपती. दोन गोविंदा आणि तिसरे असलेच तर डबेवाले. म्हणूनच मुंबई महानगरीत मराठी संस्कृती टिकवण्याचं काम मराठीच्या प्राध्यापकांनी आणि लेखकांनी केलेलं नाही. तर घाम गाळणा-या कष्टक-यांचं आहे. दोन दोन महिने सुट्या घेऊन गणपतीच्या मंडपात राबणारे कार्यकर्ते आणि आपण कधीही पडून मरू शकतो , हे माहीत असूनही हसत हसत थरांवर चढणारे हजारो गोविंदा. या निम्नमध्यमवर्गीय माणसांनीच मराठी पताका मुंबईत फडकवत ठेवली आहे. हे करत असताना त्यांच्यातला एक देवाघरी गेला. आणि आपण मुंबईतली मराठी माणसं कोरडी हळहळ व्यक्त करून विसरून जातो. अशा आपणा मराठी माणसांची संस्कृती टिकवण्यासाठी गणपतीबाप्पाही काही करू शकत नाही.

दहीहंडी फोडणा-या गोविंदांना दरवर्षी काय मिळतं ? महिनाभर प्रॅक्टिस करताना मिळालाच तर वडापाव. गोकुळाष्टमीच्या दिवशी पुलाव आणि मसालादूध. एक टीशर्ट. आणि मोठमोठ्या हंड्या फोडणा-या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जणांना मिळालेच तर अवघे काहीशे रुपये. तरीही आपल्या बापजाद्यांची परंपरा टिकवायच्या म्हणून दरवर्षी ते जीव तळहातावर ठेवून सटासट थर लावतात. त्यांना माहितही नसतं की आपण मराठी संस्कृती रुजवायचं एवढं मोठं काम करतोय. म्हणूनच प्रवीण हा मराठी संस्कृतीसाठी लढता लढता धारातीर्थी पडलेला हुतात्मा आहे. कुणी मानो अगर न मानो तो शहीद आहे !

आता प्रश्न एवढाच आहे की कुणी प्रवीणच्या कुटुंबासाठी पुढे येणार आहे का ? गोविंदाच्या माजगावाशी नाळ जोडलेले छगन भुजबळ मुख्यमंत्री असणारं सरकार त्यांच्यासाठी काही करणार आहे की नाही ? उद्धव ठाकरे शेतक-यांचे अश्रू पुसतात , त्यांचं कौतूक आहेच. पण इथल्या अश्रूंचंही तुम्ही खूप देणं लागता हे त्यांनी विसरायला नको. परळ चेंबूरचे जीन्सच काहीतरी वेगळेच असतात , असं कौतूक करणा-या राज ठाकरेंना मराठीसाठी खरं काहीतरी करण्याची ही संधी आहे. आपल्या नेत्यावर जीव ओवाळून टाकण्याची हिंमत कुठून येते , हे समजून घ्यायचं असेल तर इथे या. मिलिंद देवरा इथले खासदार आहेत. त्यांचं प्रवीणविषयी काही कर्तव्य आहे की नाही ? दहिहंडीला ग्लॅमर देणा-या अहिर- आव्हाडांचीही ती जबाबदारी आहे. या म्हणून त्यांनी नोटांची पुडकी पाठवावीत , असं नाही. फक्त एकदा भेट द्यावी. आपला मुलगा फुकाची मौत मेलेला नाही , तो मराठी संस्कृतीचा हुतात्मा आहे , एवढं त्या अभागी आईबाबांना वाटावं , असं काहीतरी करावं.

हे राजकारणी काही करतील की नाही माहित नाही. पण खरी जबाबदारी आपण मराठी माणसांची आहे. गोविंदावाल्यांनी विमे काढायला पाहिजेत , सातच थर लावायला हवेत , हेल्मेट घालायला हवेत , अशा शाणपणा शिकवण्याचा अधिकार आपल्याला आहेच. पण जर आपण प्रवीणच्या कुटुंबाच्या काहीतरी करणार असू तरच. नाहीतर घरी बसून राहायचं चूपचाप.

सर्व लेख मटा मधुन सांभार
लेखाची लिन्क http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4949590.cms

प्रतिक्रिया

मदतीचा चेक कुठल्या पत्त्यावर पाठावयचा याबद्दल मी श्री. सचिन परब (sachin.parab@timesgroup.com ) याना लिहिले आहे व त्यांचे उत्तर येताच मी इथेही लिहीन.
पत्ता कळल्याबरोबर मी माझ्या आईतर्फे चेक पाठणार आहे. कालच तिचा ८९वा वाढदिवस झाला व तिने मला अशी देणगी द्यायला सुचवले आहे.
शिवाय मराठी मंडळी जकार्ता यानाही मी कळवले आहे. बघू त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येतो ते.
सुधीर
-----------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विंजिनेर's picture

1 Sep 2009 - 12:16 pm | विंजिनेर

घटना दुर्दैवी खरीच. पण एक-दोन मुद्दे मनात आले
१. मटा मधला लेख वाचून इथे तुम्हाला काय चर्चा अपेक्षित आहे हे लिहिले असते तर बरे झाले असते.

२. निव्वळ लेख वाचून हा केवळ अपघात आहे हेच जाणवते. त्याचे उद्दाती करण करण्याचा काय हेतू आहे?(म्हणजे "...तरीही आपल्या बापजाद्यांची परंपरा टिकवायच्या म्हणून दरवर्षी ते जीव तळहातावर ठेवून सटासट थर लावतात..." वगैरे)

३. लेखात जे कनिष्ठ मध्यमवर्गाचे चित्र उभे केले आहे ते कशासाठी? गोविंदा करणारे तरूण ह्या वर्गातून आले म्हणून थर रचण्याचे धोके वाढतात/कमी होतात ? आणखी काही?

४. "...पण खरी जबाबदारी आपण मराठी माणसांची आहे. ..." म्हणजे नक्की कोणाची आणि काय जबाबदारी आहे?
५. वर्षातून फक्त काही तास चालणार्‍या ह्या खेळात ज्यांना केवळ वडापावचा खर्च परवडतो त्यांना विमे/हेल्मेट परवडेल? स्वप्नाळू भावविश्वात रंगून जाण्यात काय हशील आहे?

सुधीर काळे's picture

1 Sep 2009 - 12:33 pm | सुधीर काळे

असे नुक्ताचीं नका हो बनू!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.