स्थलांतरीतांच्या प्रश्नाला प्रांतिक किंवा भाषक संदर्भच नसतात. त्याला धार्मिक संदर्भही बराच आहे. आपल्या देशात बांगलादेशातून होणारे स्थलांतरही याच सदरात मोडते. बांगलादेशीय मुस्लिमांच्या आसाममधील वाढत्या संख्येने तिथे जातीय दंगली पेटल्याचा इतिहासही ताजाच आहे. अधून मधून ही धुसफुस पुन्हा डोके वर काढते. पण त्यापलीकडे जाऊनही भारतात धार्मिक स्थलांतराचा प्रश्न अजूनही म्हणावा तितका गंभीर नाही. (किंवा आपण तो घेतला नाही, असंही असू शकेल.)
पण युरोपात मात्र या धार्मिक आणि स्पष्टपणे सांगायचे तर मुस्लिमांच्या स्थलांतराने मोठीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. भारतात मुस्लिम आले त्याला हजार वर्षे झाली. राज्यकर्ता बनलेली ही जमात भारतात मोठ्या प्रमाणात रूजली. फळली. वाढली. बर्यापैकी मुरलीही. तरीही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक अदृश्य तणाव राहिलेलाच आहे. अधून मधून तो दिसूनही येतो. पण तरीही मुस्लिमांचा निःसंशय प्रभाव इथल्याही जनजीवनावरही पडला आहे. भांडणं, दंगली होत असल्या तरी दोन्ही धर्मियांचे प्रमाण पाहता परिस्थिती हाताबाहेर गेलेली दिसत नाही. 'यादवी' माजणे काही घडले नाही. सांस्कृतिक बाबतीत तर उभय धर्मियांनी बरेच मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेही असेल कदाचित संबंध फार काही ताणले गेलेले नाहीत.
मुस्लिमांच्या शांततामय आणि आक्रमक अशा विस्तारातूनही पूर्ण भारत मुस्लिम झाला नाही. पण तरीही फाळणीतून पाकिस्तान आणि पुन्हा बांगलादेश असे दोन 'मुस्लिम' देश निर्माण झाले खरे. त्यानंतर राहिलेल्या भारतातही मोठ्या प्रमाणात मुस्लिम जनसंख्या राहिली. पण त्यातून त्यांचे वेगळे राज्य, देश अशी मागणी आकाराला आली नाही. राहिलेल्या मुस्लिमांनी कदाचित ही भूमी आपली मानली असावी आणि मुस्लिमांचे आपल्यात असणे हिंदूंनीही मान्य केले असावेत. पण विसाव्या शतकापूर्वी मुस्लिमांचे अस्तित्वही फारसे नसलेल्या युरोपात मात्र त्या शतकात आलेल्या मुस्लिमांमुळे बरीच अस्वस्थता पसरली आहे.
ख्रिस्तोफर काल्डवेल नावाच्या एका अमेरिकन पत्रकाराने याच विषयावर आधारीत 'रिफ्लेक्शन्स ऑफ द रिव्होल्युशन इन युरोपः इमिग्रेशन, इस्लाम अँड द वेस्ट' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. इकॉनॉमिस्टमध्ये त्याचे परिक्षणही आले आहे. त्यावरून या अस्वस्थतेचा अंदाज येतो. मुस्लिमांच्या युरोपात येण्याने काय घडलंय आणि का घडलंय याची मीमांसा त्याने केली आहे.
युरोपात छोट्या छोट्या नोकर्यांची गरज होती, म्हणून दरवाजे उघडे ठेवले गेले. त्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत गेले. पुढे नोकर्या संपल्या तरीही लोकांचे येणे काही थांबले नाही आणि आलेले लोक काही परत गेले नाही. उलट त्यांच्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढली. म्हणूनच युरोपातील देशांत स्थलांतरीतांची संख्या किमान दहा टक्के तरी आहे. त्यातही मुस्लिमांची जास्तच. त्यातही मोठ्या शहरांत हे प्रमाण ३० टक्के आहे. हे मुस्लिम या देशांत आले ते प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिकेतून. पण ते भारतात जसे मिसळले तसे तिकडे मिसळले गेले नाहीत. (भारतात स्थानिकांमध्ये झालेल्या धर्मप्रसारामुळे कदाचित स्थानिकांपेक्षा ते वेगळे वाटतही नसतील.) त्यांच्या न मिसळण्याला 'इस्लाम' हा शब्द कारणीभूत असावा असा काल्डवेलचा तर्क आहे. इस्लामची शिकवण, राहणीमान इतर धर्मांपेक्षा त्यांना वेगळे रहाण्यास, वागण्यास भाग पाडत असल्याने ते स्थानिकांत मिसळत नाहीत. परिणामी त्यांची स्वतंत्र ओळख तयार होते. अस्मिता निर्माण होते.
त्यांच्यासाठी आता युरोपीय देशांना वेगळे कायदे करावे लागत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या धर्मांतर्गत असलेल्या न्यायनिवाड्याचा आधार त्यांना घेऊन द्यावा यासाठी तिथल्या न्यायव्यवस्थांवर दबाव वाढत आहे. फ्रान्समध्ये दाढी आणि पगडी ठेवण्यास सरकारचा प्रतिबंध हे त्याचे उदाहरण. पण आणखी एका उदाहरणात लग्नावेळी आपली बायको कुमारी नव्हती, म्हणून एका मुस्लिम व्यक्तीने विवाह रद्द ठरवावा असा अर्ज न्यायालयात दिला. यावर फ्रान्सच्या कायद्यात काहीही तरतूद नाही. तिथे काय करणार? इतकंच नव्हे तर ब्रिटनमध्ये पेन्शनविषयक लाभ नवर्याच्या 'इतरही बायकांना' मिळावेत यासाठी विशेष व्यवस्था करावी लागली आहे. याशिवायही अनेक कायदे नव्याने करावे लागत आहेत किंवा आहे त्यात दुरूस्ती करावी लागत आहेत. या सगळ्या गोष्टी पहाता, स्थलांतरीत मुस्लिमांसाठी आपल्या देशाने झुकणे हे स्थानिकांना त्रासदायक वाटत आहे.
स्थलांतरीतांविरूद्धच्या युरोपातील भावना आता इतक्या तीव्र झाल्या आहेत की फक्त १९ टक्के लोकांना स्थलांतर हे आपल्या देशाच्या हिताचे वाटते आहे, तर ५७ टक्के लोकांना आपल्या देशात उपर्यांची संख्या वाढली आहे असे वाटते. युरोपातल्या नोकर्यांमध्येही ही मंडळी शिरली आहेत. त्यामुळे स्थानिक विरूद्ध उपरे हा संघर्षही तीव्र झाला आहे. तिकडेही 'राज ठाकरे' उभे ठाकू लागले आहेत. टोनी ब्लेयर आणि जॅक स्ट्रॉ यांनी तर बुरखा हा फुटिरवादी मानसिकतेचे प्रतिक असल्याचे म्हटले होते. या स्थलांतराला आणखी एक मुद्दा आहे. युरोपातील लोकसंख्या अधिकाधिक वृद्द होत चालली आहेत. पण स्थलांतरीत मुस्लिमांची कुटुंबे मोठी असल्याने युवा भरपूर आहेत. त्यामुळे उद्या युरोपात मुस्लिमांचे वर्चस्व निर्माण झाले तर आश्चर्य वाटायला नको ही भीतीही या मुळाशी आहे.
काल्वडेलने त्याच्या पुस्तकात हे सगळे मुद्दे मांडले आहेत. पुस्तक नक्कीच वादग्रस्त आहे. ते मीही वाचलेले नाही. पण त्याच्या इकॉनॉमिस्टवरील परिक्षणावरून आणि त्याखाली आलेल्या प्रतिक्रियातूनही त्याची झलक मिळतेच. तुम्हाला या सगळ्यविषयी काय वाटते. तुम्ही कुणी हे पुस्तक वाचलेय काय? किंवा तुम्ही युरोपात किंवा इतरत्र रहात असलात तर तुमचा अनुभव काय आहे?
इकॉनॉमिस्टमधील मूळ परिक्षण-
http://www.economist.com/books/displaystory.cfm?story_id=14302290
प्रतिक्रिया
31 Aug 2009 - 1:56 pm | नंदन
विषय आणि मांडणी. युरोपात सध्या ह्या कारणावरून तणाव आहे हे खरं, पण यामागच्या कारण आणि परिणामांची जोडी ही एकच एक (धर्म आणि अशांतता अशी) नसावी. त्याउलटही असू शकते. एनपीआरवर उडतउडत ऐकलेल्या एका कार्यक्रमात ब्रिटन आणि फ्रान्सच्या अल्पसंख्याक समुदायांची तुलना केली होती. स्थलांतरितांना आपल्या संस्कृतीत सामावून घेण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न फ्रान्समध्ये गेली दोन-तीन दशके करण्यात आले, त्या स्वरूपाचे प्रयत्न इंग्लंडमध्ये झाले नाहीत असं त्या कार्यक्रमात ज्याची मुलाखत घेतली जात होती त्या समाजशास्त्रज्ञाचं म्हणणं होतं. परिणामी फ्रान्सने इराक व अफगाणिस्तानात सैन्य पाठवले तरी लंडन बॉम्बस्फोटांसारखी प्रतिक्रिया तिथे उमटली नाही. (अर्थात आता सारकोझींनी बुरख्यावर बंदी घातल्यावर मात्र वेगळे सूर उमटले आहेत.) दोन-तीन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या बेरोजगार युवकांच्या दंगलींनाही (बहुसंख्य अल्जिरियन मुस्लिमांचा सहभाग असूनही) धार्मिक परिमाण मिळाले नाही. याउलट इंग्लंडमध्ये मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीय/गरीब घरांतील तरूणांना दैनदिन वैफल्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून धर्माचा आसरा मिळाला असं त्यांचं प्रतिपादन होतं.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
31 Aug 2009 - 2:37 pm | ऋषिकेश
चांगला विषय आणि मांडणी.
स्थलांतरांच्या मागे धर्म हे कारण असणे जरी कमी असले तरी स्थलांतर केल्यानंतर निर्माण होणार्या नव्या धार्मिक डेमोग्राफीमुळे विविध प्रश्न उभे रहातात. अश्या प्रश्नांना स्थलांतारीतांचा प्रश्न म्हणून तो सोडवावा का? यावर अनेक ठिकाणी स्थानिक निर्णय करू शकत नाहित. धर्म म्हटला की वस्त्र, खाणे, घरे राखणे अश्या ऐहिक बाबींतील फरक व्यतिरिक्त, धर्माशी निगडीत एक प्रकारचे रहाणीमान येते, सवयी येतात, मान्यता येतात आणि शिष्टाचाराच्या-नैतिकतेच्या स्वतंत्र कल्पनाही येतात.
स्थानिक लोकांच्यापेक्षा स्थलांतरीतांचे रहाणीमान सारखे किंवा वेगळे तरीही समांतर असल्यास प्रश्न कमी येतात मात्र जर ते पूर्णपणे विरोधी असेल तर मात्र आपण लेखात म्हटलेले प्रश्न जाणवू लागतात, व ते हळूहळू बिकट होत जातात.
आपल्या ह्या लेखानंतर काल्डवेलचे पुस्तक वाचावेसे वाटु लागले आहे. बघु कधी योग येतो ते.
जाता जाता जाहिरातः स्थलांतरीतांच्या प्रश्नावर मी इथे मुक्तक लिहिले होते.. ते मटामधे ही आले होते. हे आठवले
ऋषिकेश
------------------
दूपारचे २ वाजून ३० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "दुनिया मायाजाऽऽल मनवा देख जरा...."
31 Aug 2009 - 2:46 pm | प्रकाश घाटपांडे
स्थलांतरितांच्या धार्मिक, प्रांतिक, भाषिक अस्मिता या टोकदार बनल्या तर त्यांना सामावुन घेणे जड जाते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
31 Aug 2009 - 2:52 pm | अभिज्ञ
चांगला विषय व सुंदर विवेचन.
हे पुस्तक निश्चितच वाचायला आवडेल.
पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद.
अभिज्ञ.
31 Aug 2009 - 2:53 pm | अभिज्ञ
चांगला विषय व सुंदर विवेचन.
हे पुस्तक निश्चितच वाचायला आवडेल.
पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद.
अभिज्ञ.
31 Aug 2009 - 2:57 pm | श्रावण मोडक
अगदी योग्यवेळी लिहिले आहे. 'आपण सारे...', 'हिंदू म्हणजे कोण' या दोन धाग्यांच्या पाठोपाठ या अर्थाने योग्यवेळी. पुस्तक वाचावे लागेल किंवा किमान वाचलेल्याकडून काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील हे नक्की. धर्म हा संदर्भ असलेल्या या तिन्ही धाग्यांच्या जोडीने जीवनशैली (वे ऑफ लाईफ) या अर्थाने असा एक धागा आला तर या सगळ्या चर्चांना एक 'चौकट' लाभेल. त्या सगळ्यातून मग मानवाची संस्कृती असा पाचवा धागा सुरू होऊ शकेल. आणि मग किमान काही गोष्टींमध्ये वैयक्तिक स्तरावर अनेकांना एकेक पाऊल पुढे किंवा मागे टाकणे सोपे जाईलही.
हे हलके घेऊ नये. उपरोधीक किंवा उपहासात्मक नसून गंभीरच आहे.
31 Aug 2009 - 5:48 pm | जीएस
उत्तम विषय व परिचय.
इस्लामची स्वतःची न्याय व शासनप्रणाली आहे. ती प्रणाली आणि ज्या देशात रहातात तिथली प्रणाली यात तो देश इस्लामिक नसेल तर नेहेमीच संघर्ष होतो.
मुसलमान कुठल्याच देशात शांततेने नांदत नाहीत असे एक विधान आपण ऐकतो, त्याची ही पार्श्वभूमी असावी..
'व्हाईल युरोप स्लेप्ट : हाउ रॅडिकल इस्लाम इज डिस्ट्रॉयिंग युरोप फ्रॉम विदिन'
हेहि एक चांगले पुस्तक आहे. मला थोडे अमेरिकेच्या बाजूने पक्षपाती वाटले पण तरीही चांगली माहिती आहे.
31 Aug 2009 - 9:20 pm | नितिन थत्ते
चांगला लेख विषय.
काही मते मांडतो.
बांगला देशासारखे स्थलांतरित सोडले तर भारतातील बहुसंख्य मुसलमान हे मुसलमान म्हणून स्थलांतरित झालेले नाहीत. ते त्या त्या ठिकाणचे स्थानिक धर्मांतरित मुसलमान आहेत. आज उत्तरप्रदेशातून किंवा बिहारमधून मुंबईला आलेले मुसलमान स्थलांतरित आहेत (तरीही ते मूळचे भारतातलेच आहेत). तसेच कोकणातले, नगर औरंगाबादचे मुसलमान हेही स्थानिक आहेत. कदाचित त्यामुळे तितका संघर्ष उद्भवला नसावा. (तसेच भारतातले ख्रिश्चनही आहेत).
स्थलांतरित नाहीत याचा अर्थ ते स्थलांतरित राज्यकर्त्या तुर्की, इराणी, मंगोल यांचे वंशज नाहीत. उलट हे ब्रिटनमधील / फ्रान्समधील मुसलमान हे तेथील हिंदूंप्रमाणेच खरोखरचे स्थलांतरित आहेत. ते मुसलमान किंवा हिंदू संस्कृती आपल्याबरोबर घेऊन तेथे गेले आहेत. त्यामुळे कदाचित संघर्ष उद्भवत असावा.
>>त्यामुळे स्थानिक विरूद्ध उपरे हा संघर्षही तीव्र झाला आहे. तिकडेही 'राज ठाकरे' उभे ठाकू लागले आहेत
याच्याशी मुसलमान असण्याचा काही संबंध नसावा. उपरे ख्रिश्चन असते तरी संघर्ष उद्भवला असता.
नितिन थत्ते