पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा....

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
12 Mar 2008 - 9:08 pm

गेल्या बर्‍याच दिवसापासून 'संपूर्ण गीतरामायण' आंतरजालावरून डाऊनलोड करत होतो. आज झाले पूर्ण. माझी काही अतिशय आवडीची गाणी आहेत त्या मधे 'पराधीन आहे जगति...' हे गाणे आहे. लगेच ते गाणे सुरू केले.

ह्या गाण्या बद्दल काय सांगू मंडळी... काही वेळा 'आधुनिक वाल्मिकी ग.दि.मा.' इतक्या सोप्या शब्दात इतके मोठे तत्वज्ञान सांगून जातात ना... असामान्य, केवळ असामान्य. आणि बाबूजींनी अशी काही म्हटली आहेत ही गाणी... सोने पे सुहागा. शब्द, सूर वेगळे राहतच नाहित.

अशीच एक ओळ आहे ह्या गाण्यात...

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ

मी तर ते गाणे बंदच केले, मला पुढे ऐकवलेच नाही... छे... असे शब्द, असे सूर, असा समसमा संयोग मला नाही वाटत परत कधी होईल.

बिपिन.

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Mar 2008 - 10:05 pm | llपुण्याचे पेशवेll

सगळीच गीत रामायणातील गाणी मला फार आवडतात.
"आज का लतिकावैभव सले,पाहूनि वेलीवरची फुले"
"स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची"
"सावधान राघवा"
"रामावीण राज्यपदी कोण बैसतो"
वेड लाऊन जातात या ओळी.
सर्वच फार फार सुंदर गाणी आहेत हो....गीत रामायण खरेच फार अजब आणि आनंददायी काव्य आहे..
अवांतरः शब्दप्रभू ग.दि.मा. यांच्या कवितेच्या ओळी कुठल्यातरी लेखकाने उधृत केल्या होत्या. फार छान होत्या त्या.
'जा एकली, सखी तू,दोघे सुखात भेटा,
मी पाहीजे कशाला,फुलत्या फुलात काटा'
संपूर्ण कविता कोणाला माहीत असेल तर कळवावी.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 6:40 am | विसोबा खेचर

... छे... असे शब्द, असे सूर, असा समसमा संयोग मला नाही वाटत परत कधी होईल.

सहमत आहे.. अशी गाणी पुन्हा होणार नाहीत..

आपला,
(गीतरामायणप्रेमी) तात्या.

चतुरंग's picture

13 Mar 2008 - 10:29 am | चतुरंग

गदिमांनी केवळ गीतरामायणच जरी लिहिले असते तरी ते अजरामर झालेच असते!

गीतरामायणा संदर्भात एक किस्सा आत्ताच्या गीत रामायणामध्ये जे क्रमांक एकचे गाणे आहे ते गाणे मूळ गाणे नव्हे.
त्याबाबतची श्टोरी अशी - गदिमांनी पहिले मूळ गाणे बाबूजींना दिले त्याला बाबूजींनी चाल लावली सगळे झाले.
रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी गाण्याचा कागदच हरवला!!
हवालदिल बाबूजी आण्णांकडे दाखल झाले, आण्णांनी विचारले काय झाले तर गाणे हरवल्याचे समजले.
सिध्दहस्त शब्दप्रभू म्हणाले "हात्तिच्या, एवढंच ना? हे घ्या दुसरं गाणं!" कागद-लेखणी घेऊन झटक्यास दुसरे गाणे तयार!
हेच ते "कुश-लव रामायण गाती स्वये श्री रामप्रभु ऐकती"!
त्याला बाबूजींनी लगेच स्वरबध्द केले आणि रेकॉर्डिंग सुरळित पार पडले!
प्रभु रामाची आणि सरस्वतीचीच कृपा!!

चतुरंग