सलाम मुंबई!!!

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
12 Mar 2008 - 1:03 am

आज १२ मार्च, मुंबईच्या त्या काळ्याकुट्ट दिवसाला उद्या पंधरा वर्षे होतील.

पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही अगदी आठवणीत आहे. दुपारी दोनचा सुमार होता. मी त्यावेळच्या माझ्या वरळी येथील टि व्ही औद्योगिक संकुलातल्या कार्यालयातून नुकताच बाहेर पडलो होतो. दुपारी तीन वाजता कफ परेड येथे आय डी बी आय च्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायचे होते, तशी वेळ ठरली होती. मी इमारतीतुन बाहेर पडलो आणी समोरच उभ्या असलेल्या टॅक्सीत शिरणार इतक्यात एक दणद्णीत स्फोटाचा आवाज आला. मी आत शिरताना थबकलो आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडल्यागत आपोआप बाहेर आलो. उजवीकडे र्‍होन पॉलेंक च्या पलिकडे म्हणजे पारपत्र कार्यालय/ सत्यम-सचिनम च्या मागच्या झोपडपट्टीतुन आवाज आला असावा असे वाटले. आता मुंबईच्या दाटीवाटीच्या अश्या वस्त्यांमध्ये अनेक बेकायदेशीर कारखाने असतात; अगदी सुटे भाग बनविणार्‍या कारखान्यांपासून ते रसायनांपर्यंत. अशाच एखाद्या कारखान्यात स्फोट झाला असावा असे मला वाटले. मी आणि तो टॅक्सीवाला दोघेही उत्सुकतेने जरा पुढे गेलो तर त्या दिशेने आकाशात उठलेले वरवर जाणारे दाट पिवळे वलय मला दिसले. मी चक्रावलो. अर्थात बाँबस्फोट वगरे ध्यानीमनीही नव्हते, पण वायुगळती वगैरे ऐकुन होतो आणि बहुधा कसल्याश्या रसयनाच्या टाकीचा स्फोट झाला असावा असा माझा समज झाला. मी ताबडतोब त्या टॅक्सीवाल्याला गाडी हाणून लवकरात लवकर दूर जायचा आदेश दिला.

आम्ही डावीकडुन निघालो आणि उजवे वळण घेत पांडुरंग बुधकर मार्गावर आलो आणि ग्लॅक्सोला वळसा घेउन ऍनी बेजंट मार्गाला लागणार तोच कर्कश्शा कर्णे वाजवत आणि 'जाउद्या आम्हाला' असे आतल्या माणसांचे हात हालत असणार्‍या अनेक टॅक्सी सुसाट वेगाने पार झाल्या. काहींमध्ये अगदी पुढेच रक्ताने माखलेली माणसे दिसली, एका टॅक्सीच्या पुढच्या काचेचा चक्काचूर झालेला दिसला. बहुधा ते सगळे अगदी जवळच असलेल्या पोदार रुग्णालयाकडे दौडत असावेत. एकुण स्फोट फारच गंभीर स्वरुपाचा असावा. पाठोपाठ आम्हीही निघालो. अडीच वाजले होते, मला तीन च्या आय डी बी आय ला जागतिक व्यापार केंद्रापाशी जायचे होते. वरळी नाका पार झाला. हाजीअलीचे रिंगण गेले. ताडदेव चे गंगा जमुना मागे पडले, नाना चौक ओलांडला, एकीकडे मी आणि टॅक्सीवाला काय झाले असावे यावर गप्पा मारत होतो. आता आम्ही विल्सन महाविद्यालय डाव्या अंगाला टाकत चौपाटीवर आलो आणि मरीन ड्राईव्ह वरून निघालो होतो. अचानक मला समोर एअर ईंडिया इमारतीत्च्या दिशेने धूराचे लोट दिसले. अरेच्चा! आग लागली वाटते? जरा पुढे येतो तो काय? हुतात्मा चौकाच्या दिशेनेही धूर! म्हटले आज अग्निशमन दलाला एका दिवसात वर्षाचे काम करावे लागणार असे दिसते!

असो. आपण आपल्या कामाला लागलेले बरे! आम्ही कफ परेडच्या दिशेने सुसाट निघालो होतो. रोज ठायी ठायी अडवणारी मुंबापुरी आज अगदी शहाण्यासारखी दिसली. वाहतुक म्हणतात ती अजिबात दिसली नाही. असे रस्ते रोजच मोकळे मिळाले तर? असा विचार मनात आला. चर्चगेट, बेर्बोर्न क्रिडागार जवळ आले आणि अचानक माणसांचे लोंढे दिसु लागले. सगळी गर्दी चर्चगेट स्थानकाच्या दिशेने हालत होती. जरा पुढे जातो तो काय? रस्ता बंदचा फलक आणि शिट्टी वाजवुन माघारी फिरा असे सांगणारे वाहतुक पोलिस दिसले. विचारल्या प्रश्नाचे कसलेही उत्तर न देता 'रस्ता बंद केला आहे' एवढे मोघम वाक्य ऐकवुन ते आपल्या कामाला लागले. 'अहो, मला काम आहे, तातडीने नरिमन पॉईंटला जायचे आहे' असे मी संगताच चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहत हवालदार उत्तरला - 'मग चालत जा'. नाईलाज होता. खरेतर नरिमन पॉईंट ते कफ परेड हे अंतर बरेच होते, चालत जाण्यासारखे नक्कीच नव्हते. मी टॅक्सीचे पैसे चुकते केले आणि पुढे दुसरी टॅक्सी पकडायच्या ईराद्याने पुढे निघालो. जरा पुढे येतो तो काय? रस्ते बंद केलेले, सर्वत्र कोलाहल आणि पोलिस दिसत होते. मी मार्ग बदलुन नरिमन पॉईंटच्या दिशेने निघालो. काही क्षणातच लक्षात आले की सगळी दुनिया उलट प्रवास करत आहे, मी एकटाच नरिमन पॉईंटच्या दिशेने चालत होतो.

अखेर मंत्रालय, शिपिंग कॉर्पोरेशन, मित्तल असे करीत करीत मी आमच्या नरिमन पॉईंट कचेरीच्या इमारतीच्या जवळ येउन पोचलो. रस्त्यावर एकही टॅक्सी दिसत नव्हती. लोक बसला लोंबत होते, नाही ते लगबगीने पायी निघाले होते. मला समजेचना की काय प्रकार आहे. आज या मुंबईला झालय तरी काय? लोक का पळताहेत? सगळ्या कचेर्‍या लवकर का बरे सोडल्या असाव्यात? मी विचार करत करत आमच्या कचेरीत दाखल झालो. इथेही शुकशुकटच होता! नाही म्हणायला रवी भेटला. रविंद्रन नायर, त्याला सगळे रवी म्हणत. 'काय यार रवी, काय लोचा आहे? मला खरेतर तीनला आय डी बी आय ला पोचायचे होते, पण पोपट झाला. काय प्रकार काय आहे?" असे म्हणताच रवीने मला एखाद्या पिशाच्चाला पाहावे तसा चेहरा करत मला निरखुन बघत म्हणाला, 'म्हणजे? तुम्हाला माहित नाही? अहो मुंबईत बाँब स्फोट सुरु झाले आहेत!" आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आधी वरळी, मग हुतात्मा चौक, मग एअर इंडिया इमारत.. आता सगळी मालिका जुळत होती, रस्त्याला वाहने का नव्हती, लोक स्थानकाच्या दिशेने का धावत होते, सगळा उलगडा होउ लागला. रवी मला जवळच्या एका कचेरीत घेउन गेला, तिथेले लोक आमच्या अर्थातच परिच्याचे होते. त्यांच्या कचेरीत दुरचित्रवाणीसंच सुरु होता. बातम्या ऐकताच अक्षरशः धक्का बसला. प्रथम घरी दूरध्वनी केला आणि कळवले की सुखरुप आहे, काळजी नको! ती सेवा खंडीत होण्याआधी ते केलेले बरे. त्याकाळी दूरध्वनी प्रतिक्षेनंतर मिळत असे, भ्रमणध्वनी दूरच राहिला.

अफवांचे पीक तेजीत होते. कुणी म्हणे पाकिस्तानचे हेर विध्वंसक अस्त्रे घेउन आत शिरले आहेत. कुणी म्हणे हे हल्ले असेच सुरु राहणार आहेत, हल्लेखोरांची ताकद किती हे कुणालाच माहित नव्हते म्हणे. आणखी एक अफवा निघाली ती म्हणजे हाज समितीची रुळालगतची इमारत म्हणे कोसळली होती आणि त्यामुळे लोहमार्गाचे अनेक चाकोरे बंद झाले होते. कुणी काही तर कुणी काही. आम्ही दिघे घरी जावे हे बरे असे म्हणत निघालो खरे. पण सरळ घरी गेलो तर मुंबैकर कसला? अशा गोष्टी काय पुन्हा पुन्हा घडतात काय? आलोच आहोत तर बघून जाउ म्हणत आम्ही एअर इंडियाच्या दिशेने निघालो. तसा मी ८४ च्या दंगलीत देखिल भटकलो होतो. अशा प्रसंगी वातावरण काही वेगळेच असते. रस्त्यात भेटेल तो आपला दोस्त! मात्र इथे आमची निराशा झाली. पोलिसांनी प्रेमळ भाषेत परत फिरायला सांगितले आणि त्यांचा प्रेमळ आग्रह मोडणे शक्यच नव्हते त्यामुळे धुमसणारी आग, धूराचे लोट, मधेच येणारे दबके स्फोटाचे आवाज, सर्वत्र पसरलेली राह, उडणारी कागदपत्रे, रस्त्यावरच्या दगड-विटा, धावणार्‍या रुग्णवाहिका हे सगळे बघत आम्ही परत फिरलो. पायी चालत जाताना दलाल मार्गवरचे समभाग विनिमय कार्यालय भक्ष्यस्थानी पडल्याचे ऐकुन तेही पाहायचा प्रयत्न केला मात्र लोकांना दुरुनच हाकलले जात होते, बरोबरच आहे म्हणा. उगाच रिकामटेकडे आणि गावाला उपद्रव असे लोक अशा ठिकाणी कशाला?

रात्री घरी येताच दूरदर्शनच्या बातम्या आणि मित्रांना दूरध्वनी करुन आपापले अनुभव सांगणे, आपण काय पाहिले, कसे आलो, कसे पोचलो याच गप्पा. जे घरी आले नव्हते त्यांच्या घरी प्रचंड चिंतेचे वातावरण, धीर देणारे शेजारी, सर्वत्र संपर्काचा सपाटा. रात्री सगळे मित्र बाहेर पडलो आणि तळ्यावर जमलो. प्रत्येक जण तावातावाने बोलत होता. एव्हाना सगळी माहिती समजत होती. दिडच्या सुमारास पहिला स्फोट झाला होता आणि अनेक तास ती दुष्ट मालिका सुरुच होती. समभाग बाजार, एअर इंडिया इमारत, जवेरी बाजार, सेंचुरी बाजार, पारपत्र कार्यालय, सेना भवन, प्लाझा, विमानतळाचे सेंटॉर हॉटेल, जुहु सेंटॉर हॉटेल, वांद्र्याचे सी रॉक हॉटेल, सहार विमानतळ परिसर असे स्फोट घडले होते. सरकारी आकडा आला नसला तरी शेकडो बळी गेले आणि हजारो जखमी झाले आणि एकुणच अत्यंत भीष्ण घटना घडल्याचे सर्वत्र जाणवत होते. लोक संतापले होते. जे कुणी यामागे असतील त्यांना खेचुन फासावर दिले पाहिजे असे घरोघर बोलले जात होते. गेले ते सर्वच निष्पाप जीव होते यावर सर्वांचे एकमत होते आणि म्हणुनच सगळेजण पोटतिडकीने शिव्याशाप देत होते. पुढे सगले सत्य उघडकीस आले. ड कंपनीचे परक्रम जगजाहीर झाले कुणी व का व कसे केले ते सार्‍या जगाला समजले. तपासाची आठ लाख कागदपत्रे तयार झाली. हजारो आरोपी, हजारो साक्षिदार. कुणी परके आरोपी तर कुणी घरचे! आपल्याच सरकारी अधिकर्‍यांनी - पोलिस/ सीमाशुल्क अधिकार्‍यांनी गलथानपणा व भ्रष्टाचार यापायी स्फोटके आत आणुन दिली हे ऐकताच मन विषण्ण झाले होते. रेंगाललेले खटले. काही अपराधी निजधामास गेलेले काही गलितगात्र झालेले.

मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू!

काही दिवसातच मुंबईत प्रत्येक मोक्याच्या जागी भव्य जाहिरात फलक झळकले होते:

दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान
दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती

सलाम मुंबई!!

प्रतिक्रिया

प्राजु's picture

12 Mar 2008 - 1:18 am | प्राजु

मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू!

काय राव... छान गाणं ऐकत होते.. पण हे शिर्षक वाचून गाणं थांबवलं आणि वाचू लागले ते... डोळ्यांत पाणी आणलंत !

प्रत्येक मुंबईकराला.. चाकरमान्याला आणि चाकर मानीला माझा सलाम... प्रचंड धैर्य आहे तुमच्यात..!

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 1:39 am | विसोबा खेचर

अंगावर काटा आल रे! मी तेव्हा प्रभादेवीला नौकरी करत होतो. तिथून जवळच वरळीला स्फोट झाले होते. कसाबसा जीव मुठीत धरून तेव्हा आम्ही घरी आलो होतो!

तुझ्या या लेखाने त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या!

बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती.

अगदी खरं रे साक्षिदेवा! माझ्यामते दोनवेळची भूकच माणसाला सर्व काही शिकवते हेच खरं!

दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान
दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती

येस्स! एक हाडाचा मुंबईकर म्हणून अभिमानाने सांगू इच्छितो की मी देखील १३ तारखेला सकाळी माझी नेहमीची ८.३२ ची कसारा-व्हीटी डबलफास्ट लोकल पकडली होती. तिला नेहमीप्रमाणेच खच्चून गर्दी होती!

असो, लेख उत्तमच आहे रे साक्षिदेवा!

कुणी काही म्हटलं तरी मुंबईकरांचं स्पिरिटच वेगळं, उत्साहच वेगळा!!

बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!!

आपला,
(मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

मुक्तसुनीत's picture

12 Mar 2008 - 2:56 am | मुक्तसुनीत

सर्वप्रथम , सर्वसाक्षींचे लिखाण त्या दिवसाच्या आथवणी जाग्या करणारे , अगदी साक्षात्कारी स्वरूपाचे आहे हे नमूद करतो.

मला वाटते , बाँबस्फोटाच्या दुसर्‍या दिवशी कामावर जाण्यामागे असे दिसते की , धैर्य आणि अगतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुतांश मुंबईकर दुसर्‍या दिवशी कामावर गेले ; पण तसे करण्यावाचून त्यांना पर्याय होता का, हेदेखील तपासावे लागेलच.

मीदेखील मुंबईकरच आहे आणि मीसुद्धा दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो होतो. पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते.

चतुरंग's picture

12 Mar 2008 - 3:26 am | चतुरंग

चाकरमानी अशी मुंबई तालावर काट्यांच्या पळते
यंत्र असे की माणुस हा? प्रश्नच राहति येत मना ते

अतिवृष्टी थैमान असो वा, स्फोटहि अघटित होता ते
धावुन येई अशाच वेळी माणुसकीचे महावस्त्र ते

विजीगिषा ही बघून जेव्हा जगही सारे थक्कच होते!
"सलाम मुंबई!" वदण्यावाचुन शब्दच नाही ओठी ते!!

चतुरंग

वरदा's picture

12 Mar 2008 - 5:18 am | वरदा

आला..सगळं पुन्हा काल घडल्यासारखं डोळ्यासमोर आलं..माझे बाबा नरीमन पॉईंटला काम करायचे सकाळी स्टेशन्वर जाऊन आज नाहीच जावसं वाटत म्हणून घरी आले (एरवी संधीवाताने पाय सुजला तरी अंबरनाथहून व्हीटी ला जाणारे काय वाटंलं त्यांना कोण जाणे). ही बुद्धी त्यांना देणार्‍या गणेशाचे कीतीही वेळा आभार मानले तरी कमीच आहेत. खूप भयंकर होतं सगळंच....
बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!!


नक्कीच! पण देवा गणेशा खूप भोगलंय मुंबईने... नको रे अजुन संकटं! भिती वाटते विचाराने सुद्धा...

पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते.

हे खरं...... न जाऊन सांगतो कुणाला....

असो...चांगला लेख...

(आता कुठेही असले तरी मनाने कायम मुंबईकर) वरदा

बेसनलाडू's picture

12 Mar 2008 - 6:47 am | बेसनलाडू

सुन्न आठवणी.
मी त्यावेळेस इयत्ता चौथीत असेन. मित्राच्य आईने शाळेत येऊन आम्हाला दोघांना त्याच्या घरी नेले. दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली वगैरे म्हणजे काय ते त्यावेळी कळायचेही नाही. अशा वेळी शाळा लवकर सुटल्याच्या आनंदात त्याच्या घरी गेलो आणि मोठा माणसांचे चेहरे इतके चिन्ताक्रान्त का, याचा विचार. संध्याकाळी आईबाबा घरी आल्यावर काहीबाही गोष्टी ऐकायला मिळाल्या, मात्र त्यांचे संदर्भ नि अर्थ बरेच वर्षांनी कळले.
(स्मरणशील)बेसनलाडू

धनंजय's picture

12 Mar 2008 - 7:08 am | धनंजय

सर्व लोक हादरले होते.

बंद न पडणार्‍या मुंबईचे सर्वांना कौतूक वाटले. मुंबईतील आठवणी शब्दांकित करून आठवणींना उजाळा दिलात.

सृष्टीलावण्या's picture

12 Mar 2008 - 8:42 am | सृष्टीलावण्या

आठवण अगदी अलिकडची, म्हणजे ११ जुलैच्या बाँबस्फोटाची. त्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मी
कंपनीच्या बसमध्ये होते आणि अचानक माणसांचे लोंढे रस्त्यावरून चालताना दिसायला लागले. आम्हाला वाटले, रेल्वेची वीज गेली की काय. घरी आले तर कळले बाँबस्फोट झालेत.

माझा भाऊ म्हणाला, पटकन चल. टीव्हीवरून सारखे दाखवतात आहेत की रक्तदान करा. आपण हिंदुजाला (रुग्णालय) जाऊ.

हिंदुजाला जाताना जागोजागी लोक वाहतुक नियमन, घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोफत चहा-फराळ, मोफत मोबाईल वापरायला देत होती. काही ठिकाणी तर रिकाम्या जाणार्‍या खाजगी गाड्या जबरदस्तीने थांबवून जबरदस्तीने म्हातारे, स्त्रिया, मुले यांना जायची व्यवस्था करून देत होते.

रक्तदान करून येताना विचार केला की माटुंगा अभाविप कार्यालयात जाऊन विचारावे काही मदत हवी का..

हे कार्यालय माटुंगा स्थानकाच्या समोरच आहे. तिथे गेलो तर बघितले की बाँबस्फोटात छिन्नविच्छिन्न गाडीचे डबे बाजूला काढले होते आणि रेल्वे पूर्ववत चालू. हे सर्व अवघ्या २ तासांत.

एकच शब्द, "सलाम मुंबई".

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

नंदन's picture

12 Mar 2008 - 9:23 am | नंदन

आणि त्या आठवणींनी सुन्न करणारा लेख.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धमाल मुलगा's picture

12 Mar 2008 - 11:51 am | धमाल मुलगा

सलाम !

मी तसा बराच लहान होतो, आणि मु॑बईतही नव्हतो त्यामुळे ह्या प्रकाराच॑ गा॑भिर्य मी फक्त समजू शकतो, अनुभवाअभावी उमजू नाही शकत.

पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो.

क्या बात है! मु॑बैकरा॑च्या जि॑दादिलीपुढे तिच्याआयला कोहिनूर हिरासुद्धा फिका पडावा !

आम्हाला सवय 'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' अश्या अस्सल पेठी प्रेमाची सवय, आणि २६ जुलैच्या प्रलयात म्हणे, लोक दोरख॑ड घेऊन पाण्यात काय ऊतरले - का तर येणार्‍या जाणार्‍या॑ना पैल गाठता यावा म्हणून. अडकलेल्या लोका॑ना चहा-बिस्किटे काय वाटली - का तर बिचारे उपाशी असतील म्हणून....कोण कुठला,कोण कुठला...माझा जीव जाईल का..माझे पैसे खर्च होतात...कशाचा कशाचा विचार नाही.

म्हणूनच मु॑बै परत दुसर्‍या दिवशी उभी राहते..असा माझा कयास आहे.

सलाम मु॑बै !!!

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 12:59 pm | विसोबा खेचर

पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो.

खरं आहे रे धमाल्या! २६ जुलैला मुंबीत अक्षरश: प्रलयच आला होता. या त्याच्या काही भयानक आठवणी -

'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो'

आणिबाणीच्या प्रसंगी घराबाहेर पडुन गरजूंना मदत करण्यासाठी रोज दुपारी घरी जागावे लागत नाही.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती.
असू आम्ही तसे पण कुठल्याही सरकारी मदती शिवाय आम्ही संकटात एकत्र उभे राहतो.
उद्धट असू पण माणुसघाणे तरी नक्कीच नाही आहोत.

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 12:40 pm | विसोबा खेचर

तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती.

मुंबईकरांना कुठली उपाधी देणारे रीडर डायजेस्टवाले कोण लागून गेले आहेत? आम्ही त्यांना मानत नाही!!

गेले बाझवत तिच्यायला!! :)

आपला,
(सडेतोड मुंबईकर) तात्या.

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2008 - 12:49 pm | स्वाती दिनेश

तुमच्या लेखाने क्षणात त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि अंगावर काटा आला.
माझी बहिण तेव्हा रचना ऍकेडमी मध्ये होती.ती आणि तिच्या ४,५ मैत्रीणी कॉलेजच्या जवळच अडकल्या होत्या.एका भल्या टॅक्सीवाल्याने त्या सगळ्यांना आपल्या टॅक्सीतून त्यातील एक जण परळला राहत होती तिच्याकडे सुखरुप पोहोचवले.तिचा घरी फोन येईपर्यंतचा वेळ आम्ही कसा काढला होता आमचे आम्हालाच ठाऊक..
त्याकाळात आणि नंतरही अशा प्रत्येक अस्मानी ,सुलतानी संकटातून सावरून लवकरात लवकर मुंबई परत उभी राहिली..
खरच ,सलाम मुंबई!
स्वाती

प्रमोद देव's picture

12 Mar 2008 - 2:01 pm | प्रमोद देव

त्या दिवशी मी दुपारी दीडच्या सुमारास जिजीभॉय टॉवर्सजवळूनच(मुंशेबा) चर्चगेटला माझ्या कचेरीच्या इमार्तीपाशी आलो तर खालीच मला एकजण भेटला. म्हणाला, "देवसाहेब, कुठून येताय?"
मी म्हटले, "आत्ताच शेयरबाजारातून येतोय."
तो माझ्याकडे अविश्वासाने बघत म्हणाला, "म्हणजे तुम्ही घाबरला नाहीत?"
मला काहीच कळेना. हा असा का बोलतोय? आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली होती.
शेयर बाजारात,त्या पाठोपाठ एयर इंडिया इमारत ह्या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने 'बाँबस्फोट' झालेत हे त्याच्याकडून ऐकले आणि माझ्या लक्षात आले की केवळ काही मिनिटांच्या अंतराने मी मृत्युला हुलकावणी देऊन आलो होतो. शेयर बाजाराच्या इमारतीतल्या कार पार्किंगमध्ये बाँबस्फोट झाल्यामुळे मला तो ऐकू येऊ शकलेला नसावा(त्यावेळी मी तिथून बराच दूर असावा बहुदा).

माझी उत्सुकता चाळवली आणि मग मी त्याला बरोबर घेऊनच एयर-इंडिया इमारतीच्या दिशेने नरीमन पॉईंटच्या दिशेने कूच केले.
तिथे गेलो तर सगळी वाहतूक रोखलेली,पोलिसांनी चहूबाजूंनी कडे केलेले, अग्नीशमनदलाचे जवान देखिल त्यांच्या कामगिरीवर हजर असलेले..... हे सगळे पाहून मी खरोखरच अचंबित झालो. एयर-इंडिया इमारतीत असलेल्या 'बँक ऑफ दुबई' ची तर पार दूर्दशा झालेली होती. आजूबाजूच्या इमारतींच्या काचांचा खच पडलेला होता. पण कुठेही भितीचा लवलेश दिसला नाही. दुसर्‍या दिवसापासूनच मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली होती.

अवांतरः त्या अवस्थेतही कुतुहलाचा एक भाग म्हणून मी एक काचेचा मोठा तुकडा उचलला आणि एका हवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले. तो त्वरेने तिथे आला आणि मला त्यापासून परावृत्त करू लागला. माझ्या मित्राकडे(हा ही हवालदारच होता;पण साध्या कपड्यातला) लक्ष जाताच त्याने त्याला हटकले, " अरे तू इकडे कुठे?"
त्यावर त्याने त्या हवालदाराच्या कानात काही तरी सांगितले आणि मग तो हवालदार माझ्याकडे अविश्वासाने बघत बघत आपल्या नेमलेल्या जागी निघून गेला.(त्याने काय सांगितले ते मला नंतर कळले; पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत नाही ह्या बद्दल क्षमस्व)
असो. तर मुद्दा तो नाहीये.

इथे मी निव्वळ मुंबईकरांचे कौतुक करणार नाहीये. कारण साधारण सगळीकडे हे असेच असते. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी नाही काय म्हटलंय की "शो मस्ट गो ऑन" (कोण तो 'शेक्सपियर,शेक्सपियर' करतोय? अहो "नावात काय आहे?" असे खुद्द समर्थांनी म्हटलंय!!!!) त्याप्रमाणे जन्म-मृत्यु हे चक्र असेच चालत असते आणि अगदी बाबा आदम पासून आपण सगळे हे सगळे पचवलेले आहे. क्षणभर दु:ख/खेद/संताप/राग/लोभ वगैरे जे काही असेल ते व्यक्त करायचे आणि निमुटपणे आपल्या कामाला लागायचे. ह्यालाच म्हणतात 'जीवन'.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2008 - 2:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साक्षीसेठ,
आम्हाला मुंबईची ओळख होते ती दैनिकातून ,मासिके, विविध वाहिन्यांवरुन, आपल्या लेखाने बाँब स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या, त्याच बरोबर अशा घटनांनी मुंबई थबकते ती क्षणभर आणि निमुटपणे आपल्या कामाला लागते ही मुंबैची ओळख कोणाच्याही जगण्याची हिम्मत वाढवते हे मात्र खरे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

12 Mar 2008 - 9:40 pm | सुधीर कांदळकर

मी पण दुस-या दिवशी कामावर गेलो होतो. मुंबईकर पोट भरायला घाबरत नाही हो. एक नाही तर छप्पन नोक-या सोडतील. वडापावची गाडी चालवतील, काहिहि चांगले काम करतील व बक्कळ पैसा मिळवतील. पण कमिटमेंट पाळतोच पाळतो. जग उलटे झाले तरीहि. आम्ही दहशवाद इ. समाजविरोधी गोष्टीना कदापि शरण जाणार नाही. एखादा आमच्या हाती लागला तर त्याची धडगत नाही. हात पाय तोडून भीक मागायला बसवीन. किंबहुना दुस-या दिवशी त्याच तयारीने आम्ही कामावर जातो. कायदा काहीहि असो. नेव्हर से डाय. गर्जेल तो पडेल काय हे आमच्या बाबतीत खरे नाही. गर्जेल तो पडेलच.

मी २६ जूलै ला १८ कि.मी. चालत आलो. ५४व्या वर्षी. पाणी कापत चालणे सोपे नसते महाराजा.

असो. फार पिळले तुम्हाला. राहवले नाही म्हणून लिहिले. क्षमस्व.

सर्वसाक्षी's picture

12 Mar 2008 - 11:05 pm | सर्वसाक्षी

मुंबईचा चाकरमान्या अगतिक आहे पण असहाय्य व पराभूत नाही. अगतिक माणसापुढे दोन पर्याय असतात - एक तर हात पाय गाळणे, पळुन जाणे, जीव देणे वा दुसरा परिस्थितीशी आपल्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी दोन हात करणे.

मुंबईकरांवर अनेक संकटे आली आणि येतात पण त्याने कधी हात पाय गाळले नाहीत वा पळही काढला नाही. जगात अनेक ठिकाणी संकटाने लोक गर्भगळीत होउन पळत सुटल्याची अनेक उदाहरणे आहेत.
तेव्हा मुंबईकरापुढे धैर्याखेरीज पर्याय नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. अगदी या बाँब स्फोटांचेच उदाहरण घेतले तर सुखाने सगळे मुंबईकर दुसर्‍या दिवशी रजा घेऊन घरी बसले असते व सगळे सुरळीत होईपर्यंत घराबाहेर कशाला पडा असे म्हणत बसू शकले असते. पण तसे झाले नाही. उलट उद्या मरायचे तर आजच मरू असे म्हणत सगळे मुंबईकर बेधडक बाहेर पडले.

मी आधी लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या भुकेवर मात करण्यासाठी आणि आपले जीवन ताठ मानेने जगण्यासाठी मुंबईकर कायम धैर्याने वागत आला आहे आणि असाच हिमतीने वागत राहील.

स्वाती राजेश's picture

12 Mar 2008 - 11:56 pm | स्वाती राजेश

वरील लेख आणि प्रतिक्रिया वाचून मन सुन्नच होते.आणि म्हणावसे वाटते,
सलाम मुंबई
मुंबईच्या वरील घटनेच्या बातम्या आम्ही पेपरमधेच वाचल्या होत्या त्या आठवणी ताज्या झाल्या.

सहज's picture

13 Mar 2008 - 7:26 am | सहज

मुंबई, मुंबई आहे!!!

मुंबईवर ओढवलेल्या आपत्ती आणि मुंबईकरांनी चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते. अर्थात असे प्रसंग वरचेवर येण्याचे मुंबईवरचे दुष्टचक्र सुटत नाही , हा वेगळा विषय. अशा मुंबईकरांना (शक्यतोवर बाहेरुनच) सलाम करण्याआधी,अगदी त्रिवार वंदन वगैरे करून डोळ्यात पाणीबिणी आणण्याआधी मुंबईकर असा धैर्याबिर्याचा विचार करतो का हे खुद्द मुंबईकरांनाच विचारावे. मुंबईतल्या स्फोटांनंतर हे 'हॅटस ऑफ' वगैरे वाचून मुंबईतल्या काही लोकांशी मी याबाबत बोललो. त्यांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. एकजण म्हणाला, 'अरे, कसली दुर्दम्य आशाशक्ती आणि कसलं काय? इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.आणि मुंबईकरांना मरणाची भीती काय? जगणं आणि मरणं यात फार फरक असेल तर मरणाला भितो माणूस! इथे चालत्या रेल्वेतून पडून दर वर्षी शेकड्यांनी माणसं मरतात! एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे! मुंबईला आणि मुंबईकराला भूतकाळ नाही, आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही. आहे तो फक्त आज! आणि हा आज ओरबाडून घेताना शेजारी रक्ताचा सडा पडला असेल तर मुंबईकराला त्याचे काही देणेघेणे नाही, कारण कुणास ठाऊक, उद्याच्या सड्यातले रक्त कदाचित आपले असेल!"
आणि घरात मेतकूट भात खाताना चवीला जरा इतिहासाचे लोणचे घेतले की बरे असते. शेवटी माणसाला सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो स्वतःच, हे जरा पचवायला अवघड जाते. दुसऱ्या दिवशी निधड्या छातीने वगैरे लोकलची वाट पाहणाऱ्यांचा कुणीतरी सर्व्हेच करायला हवा होता. 'काय बुवा, काल इतके भयानक स्फोट झाले आणि तरीही आज तू कामावर चालला आहेस, तुला भीती वाटत नाही का?' असे विचारायला हवे होते. शंभरातल्या नव्वदांचे उत्तर पचवण्याची आपली मानसिक तयारीच नाही.

कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती.

हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहर्‍याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहर्‍याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते.

हीच प्रतिक्रिया इतरत्रही लिहिली आहे, क्षमस्व.

सन्जोप राव

लिखाळ's picture

13 Mar 2008 - 9:38 pm | लिखाळ

संजोप रावांचे हे म्हणणे विचार करायला लावणारे आहे. युद्ध प्रसंगी सामन्य नागरिकाने दाखवायचे धैर्य वेगळे आणि अश्या प्रसंगी. अश्या प्रसंगी मुंबई बंद पडली, लोकांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारवर दबाव आणला, दोषी लोकांना शोधायला मदत केली. सर्व वातावरण ढवळून निघाले असे होणे हे जास्त जीवंतपणाचे वाटते. असो.
जे लोक अश्या अडचणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करतात त्यांना सलाम.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

कोलबेर's picture

13 Mar 2008 - 11:45 pm | कोलबेर

एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे!

स्फोटांनतर मुंबई पुन्हा कशी कामाला लागली आणि ९/११ नंतर न्युयॉर्क कसे दुसर्‍या दिवशी कामाला लागले ह्याच्या उदत्तीकरणाचा कंटाळा आला आहे. जगात सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये (मेट्रो) हे चालते.. त्यात मुंबई काय आणि न्युयॉर्क काय!!

लेख/आठवणी आवडल्या हे वे सां न ल.

-कोलबेर

हजेरीची अगतिकता फार थोड्या जणांना होती असेल. महिलावर्ग पण कामावर उपस्थित होता. भीति प्रत्येकाच्या मनांत असते. पण कर्तव्य जेव्हा भीतीवर, दहशतीवर मात करते तेव्हा ते कौतुकाला पात्र होतेच. हे मान्य न करणे हा कोतेपणाच म्हणतायेईल.

कोलबेर's picture

14 Mar 2008 - 12:08 am | कोलबेर

आदल्याच दिवशी स्फोट झालेले असताना सलग दुसर्‍या दिवशी स्फोट व्हायची शक्यता आणि झालेच तर दिड कोटी लोकांच्यातील शे दोनशें मृतांमध्ये गणना व्हायचे ऑड्स विचारात घेतले तर एखाद्याची दगावण्याची शक्यता किती आहे? फारच कमी..इतकी कमी की त्यापेक्षा अधिक ऑड्स रस्ता क्रॉस करताना वाहनाने उडवल्याने/ वाहन अपघातात मृत्यू पावण्यामध्ये आहेत..जे की कोणत्याही दिवशी घडू शकते.. आणि जे टाळायला कुणीही काम सोडून घरी बसणार नाही..तेव्हा कामावर रुजु होणे ही आगतिकताही नव्हे की शौर्यही नव्हे..इतके कमी ऑड्स असताना विनाकारण एक रजा का वाया घालवा? हा सारासार हिशोब आहे..जो सगळ्याच्य मोठ्या शहरात केला जातो आणि त्यामूळे मुंबई असो वा न्युयॉर्क आपत्ती नंतर लगेच दुसर्‍या दिवशी काम चालू होते!

सर्वसाक्षी's picture

14 Mar 2008 - 12:43 am | सर्वसाक्षी

मुंबईकरांचे धैर्य मान्य करणे वा नाकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे/ अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते/ भूकंपानंतर अहमदाबादेत बहुमजली इमारतींमध्ये जागा कुणी घ्यायला तयार नव्हते.. यासारखी अनेक उदाहरणे आहेत.

असो, मुंबईकरांचे कौतुक सर्वांनीच करावे अशी अपेक्षा नाही.

कोलबेर's picture

14 Mar 2008 - 1:01 am | कोलबेर

मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे

ह्याची तुलना मुंबईतील बाँब स्फोटांशी होऊ शकत नाही. मला ह्या खून प्रकरणाची फारशी माहिती नाही... पण समजा एखादा सिरियल किलर दादर/मुलुंड/भांडुप अश्या भागात मुडदे पाडत फिरत असेल तर तो जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत तिथल्या राहिवाश्यांची साधारण प्रतिक्रिया पुण्यातील लोकांपेक्षा फारशी वेगळी असेल का?

अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते

अमेरिकेची (एक देश ह्या अर्थाने) तुलना मुंबई (शहराशी) होऊ शकत नाही. अतिरेकी हल्ले झालेल्या न्युयॉर्क शहराची तुलना मुंबईशी केली तर न्युयॉर्क पुन्हा कसे कामाला लागले ह्याचा उदो उदो सर्वत्र ऐकू येतो. ...तसेच लोकांनी विमानाने जाणे बंद केल होते ते अत्यंत अल्प काळासाठी जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती. काही काळानंतर अमेरिकेतली विमानसेवा आणि मुंबईतली लोकलसेवा दोन्हीही व्यवस्थीत सुरू झाले.

बाँबस्फोट हे अतिरेक्यांनी केलेले भ्याड हल्ले असतात. गेल्या काही वर्षात लंडन, माद्रिद, न्युयॉर्क अश्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हे हल्ले झालेले आहेत.. सगळीकडे साधारण समानच प्रतिक्रिया उमटली.. शॉक-भिती-अफवा-पुनश्च सुरळीत! कुठलेच शहर हात पाय गाळून बसले नाही. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच. शेवटी मानणे वा न मानणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य!

सर्वसाक्षी's picture

14 Mar 2008 - 9:04 pm | सर्वसाक्षी

<<जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>>

हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते.

<मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच.>

मी वास्तव काय ते सांगितले. बाकी हे 'प्रकटन' दिले नसते तरी चालले असते. असो.

कोलबेर's picture

14 Mar 2008 - 9:16 pm | कोलबेर

..आणि का दिले नसते तर चालले असते? ..समजले नाही... क्षमस्व!

देवदत्त's picture

15 Mar 2008 - 11:40 pm | देवदत्त

<<जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>>
हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते.

पूर्णतः सहमत.
माझे आणि माझ्या बहिणीचे तर म्हणणे आहे की ज्या लोकल मध्ये बॉम्ब स्फोट झालेत ती चालू ठेवली असती तर लोक त्यातूनही घरी परतले असते.
अर्थात ज्यांना घरी जाण्याची जास्त गरज/घाई आहेत ते. इतर मदत करणारे लोक भरपूर आहेत ते थांबतातच मदतीला.

मुम्बईचा मोठेपणा दाखविण्यासाठी नेहमी पुण्यालाच का टोचावे लागते ? पुणे इतके तुच्छ असेल तर शेकड्याने मुंबईकर पुण्याच्या डहाणूकर मधे फ्लॅट्स का घेत होते ?
दुर्दैवाने अशा मोठ्या घटना मुम्बईत घडल्या ,म्हणून त्यानंतरच्या जनसमान्यांच्या प्रतिक्रिया जगाला दिसून आल्या.
आणि त्यांना सर्वांना (आम्हीही) सलाम केला, करतो.
पुण्यात असे हल्ले झाले नाहीत हा काही पुणेकरांचा गुन्हा ?
पानशेतच्या पुराच्या वेळी माझ्या आत्याच्या संपूर्ण कुटुम्बाला शेजारच्यांनी त्यांच्या दुमजली घरातून दोर टाकून वाचविले होते.
(अशी अनेक उदाहरणे --पण पेपरात आली नव्हती)
रामन राघवन च्या वेळी मुंबईकर काय करीत असत ?
अभ्यंकर - जोशी खून प्रकरणाला सुमारे ३० वर्षे झाली...तेव्हा सन्ध्याकाळनंतर पुणे एरवीही शान्तच असे.
आणि, अलिकडे पुण्यातही एका बँकेवर अतिरेक्यांनी दरोडा घालायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध करतांना प्राण गमावले. नंतर बँकेतील कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्यांना पकडूनही दिले होते. आणि त्यानंतरच "साळुंके विहार" प्रकरण उजेडात आले होते.....असो
मुम्बई ईज ग्रेट, याबद्दल आमचेही दुमत नाहीच !!
(बाय द वे, लातूर सारख्या दुर्घटनांच्या वेळी लातूरकरांनीही तितकेच धैर्य दाखविले नाही का ?)

देवदत्त's picture

15 Mar 2008 - 11:35 pm | देवदत्त

मी त्यादिवशी घरातच होतो, पण तुमच्या लेखाने ते समोर पाहिले असे वाटतेय. माझी दहावीची परीक्षा सुरू होती. १२ मार्चला इतिहासाचा पेपर झाला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास झोपून उठल्यावर माझ्या बहिणीचे आणि भावाचे ऐकले की एवढे बॉंम्बस्फोट झालेत. ते नुकतेच बाहेरून परतले होते. संध्याकाळी सातच्या बातम्यात ( की साडेसात?) पूर्ण माहिती मिळाली. रात्रीच्या बातम्यांत सांगितले की दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलला आहे.
आधीच ३ महिन्यांपुर्वी(डिसे/जाने) झालेल्या दंगलींमुळे थोडीफार भीती होतीच मनात. पण पुढे सर्व सुरळीत चालले.

मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती.
सहमत.

आणि हो, काहीतरी आहेच मुंबईत म्हणूनच तर मी ही पुन्हा परत आलोय. :)

सुधीर कांदळकर's picture

16 Mar 2008 - 9:16 am | सुधीर कांदळकर

शेकडो लोक कामधंदा सोडून रस्त्यात भर पावसात गुढघाभर पाण्यात विनाछत्री उभे होते. येथे खड्डा आहे. तेथून जा. असे सांगत होते व रस्त्याने जाणाऱ्यांना धीर देऊन मार्गदर्शन करीत होते. सहाफूट पाण्यातील बसवर अडकलेल्यांना दोर लावून सोडविणारे मुंबईबाहेरील नव्हते. अडकलेल्यांना स्वखर्चाने जेवणे, बिस्किटे दिली. तोही सामान्य मुंबईकरच होता. तो कोणाच्याहि प्रेतावर पाय देऊन उभा नव्हता.

रेल्वेतील बॉंबस्फोटात जखमी झालेल्यांना प्रथम सर्वसामान्य माणसांनीच मदत केली. तेहि कोणाच्याच्याही प्रेतावर पाय देऊन गेले नव्हते.

मुंबईकराला पोटाची वा नोकरीची काळजी म्हणून तो दुसरे दिवशी कामावर जात नाही, तर ते त्याचे वर्क कल्चर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हातपाय गाळून स्वस्थ बसत नाही. तो भीतीवर वा दहशतीवर कमीत कमी वेळात स्वतःला सावरून मात करतो. हे सत्य पचविणे अनेकांना जड जाते. मी देखील १३ मार्च १९९३, १२ मार्च २००६ ला कामावर गेलो होतो. २६ जुलै २००५ ला ऑफिसात राहण्याची सोय असूनदेखील १८ सीप्झ्हून मालाड मार्वे रॉडला १८ किमी चालत गेलो. यापैकी ५ कि.मी. कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून होते. २७ जुलै ला कामावर गेलो नाही कारण तो लढा नव्हता.

शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.

विसोबा खेचर's picture

16 Mar 2008 - 10:36 am | विसोबा खेचर

शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.

हेच म्हणतो!

धन्यवाद कांदळकर साहेब!

आपला,
(मुंबईकर) तात्या.

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 5:05 pm | धर्मराजमुटके

यावर्षी काय होतय कोणास ठाऊक ? एकंदरीत व्यवस्था तर अशीच दिसतेय.