मुक्तचिंतन

राघव's picture
राघव in काथ्याकूट
12 Aug 2009 - 12:52 pm
गाभा: 

डिस्क्लेमर:
धर्म या संकल्पनेबद्दल, मी, माझ्या अल्पमतीने, केलेला हा विचार आहे. एकामागून दुसरा विचार निघत जातो, प्रश्न पडत जातात अन त्यांचे उत्तर शोधण्याचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे कदाचित थोडा विस्कळीतही वाटेल.
मला गद्य लिहिणे काही तितकेसे सहज जमत नाही. मांडायचा प्रयत्न करतोय. चु.भु.द्या.घ्या.
----------------------------------------------------------------

धर्म. काय शब्द आहे हा नाही? जबर. काय व्युत्पत्ती याची तेही नक्की माहीत नाही. पण हा शब्द, त्यामागची संकल्पना अस्तित्वात यायचे मुळात कारणच काय असावे? जर धर्म या संकल्पनेशिवाय माणसे जगली असती तर कशी जगली असती? (किंबहुना ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या आधी तसे जगत असतीलच की.. पण निश्चित ऐतिहासिक संदर्भ माहित नसल्यामुळे मला त्याबद्दल मत व्यक्त करता येत नाही.)

मला वाटतं धर्म ही संकल्पना अनिर्बंध जमावाला एका ठिकाणी बांधण्यासाठी वापरण्यात आली असावी. त्यामुळे प्रत्येक धर्मात काही ना काही नियम,अनुशासन पद्धती आहेत. अन त्यायोगे पुष्कळ मोठ्या समाजाला एकविचार-एकाआचाराने बांधण्याचे काम केले जाते.
पण फक्त तोच एक दृष्टीकोन असावा असे मात्र वाटत नाही. सर्व धर्मातली एक समान गोष्ट बघीतली तर ती म्हणजे सर्व धर्म माणसाला ईश्वराभिमुख होण्यास सांगतात. प्रत्येक धर्माच्या संकल्पने प्रमाणे ही ईश्वर संकल्पना मांडलेली आहे. जर केवळ समाज अनिर्बंध होऊ न देणे हे मूळ कार्य असते तर ईश्वर संकल्पना रुजवण्याचे काय कारण असेल? एकवेळ असेही धरून चालू की काही लोकांना समाजावर सत्ता गाजवायची असणार अन त्यांनी अशी संकल्पना मांडून स्वत:ला त्याचा प्रेषीत, दूत असे म्हटले असावे. पण असेही लोक होऊन गेलेत ज्यांनी समाजवृत्ती सुधारण्यासाठी ईश्वर या संकल्पनेचा वापर केला.

आता प्रश्न उठतो तो समाज सुधारणे साठी ईश्वर संकल्पनेची मुळात गरजच काय? नाही? या संकल्पनेशिवाय कुणाची वृत्ती सुधारू शकत नाही काय? नक्कीच सुधारू शकते. जे इतरांसाठी, कोणतीही अपेक्षा न ठेवता पुत्रवत प्रेमाने, कार्य करू शकतात त्यांची वृत्ती नक्कीच सुधारणार. किंबहुना ते इतरांची वृत्ती सुधारण्यास मदतही करू शकणार.

आता समजा, अशी मदत करणार्‍याने असा अभिमान धरला की माझ्याचमुळे या इतरांची वृत्ती सुधारते आहे. मी आहे म्हणूनच हे सर्व होतंय, मी नसतो तर हे झाले नसते.. तर त्यात गैर काय? त्याच्याच प्रयत्नांमुळे इतरांची वृत्ती सुधारते हे तर खरेच कि नाही? पण तसे करताना नकळत तो स्वत:ची वृत्ती बिघडवत तर नाही ना?

खरेच अशी वृत्ती सुधारण्याची गरज आहे काय? समाजमन कलुषित झाले तर परिणाम आणखी वाईट होतील काय? जसे उदा.- गुन्हा घडू नये यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते - १.शिक्षेचा धाक २.मूळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे उच्चाटन. यापैकी केवळ एक असून चालत नाही.
कायदा, गुन्हा घडल्यावर शिक्षा देवू शकतो. गुन्हा पुन्हा घडू नये यासाठी कठोर शिक्षा देवून धाक बसवू शकतो. पण मूळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे उच्चाटन तो करू शकत नाही. किंबहुना तसे उच्चाटन करण्याचे कायद्याचे कार्यच नाही. असे कार्य करण्यासाठीच वर उल्लेख केल्याप्रमाणे समाज वृत्ती बदलण्यास मदत करणारे पुढे येतात. ते सेवाभावाने हे कार्य करत असतात.
जे परार्थी भावनेने (इतरांचे दु:ख न बघवल्यामुळे स्वत:चे नुकसान सोसून इतरांस मदत करणेच आपले जीवनकर्तव्य असे मानणे) समाजोन्नतीस मदत करतात त्यांना समाजसुधारक म्हणतात. अन जे नि:स्वार्थी - भगवदार्थी भावनेने (हे जग भगवंताचे असून सर्व कार्याचा कर्ता तोच आहे असे काया-वाचा-मने मानणे) या बाबतीत समाजोन्न्तीसाठी मदत करताना लोकांस ईश्वराभिमुख करतात त्यांना संत म्हणतात.

रूढी,परंपरा या पुर्वापार चालत आल्यात म्हणून पाळणे सर्वथा अयोग्य. त्या तशा का पाळल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे असतेच. बयाचदा प्राप्त परिस्थितीत केलेली एखादी गोष्ट रूढी,परंपरा म्हणून धर्माला चिकटते. धर्मावर चढलेली अनावश्यक जळमटे "अलगद" दूर करणेच योग्य. पण रूढी योग्य नाही म्हणून धर्मच चुकीचा असा सरसकट अर्थ काढणे म्हणजे काही वैद्न्यानिक दृष्टीकोन नाही.

आपण अगदी साध्या साध्या गोष्टी सवय म्हणूनही सांभाळतो. अगदी सहज केल्याप्रमाणे. त्यामागची कारणमिमांसा जाणून मग ते करणे जास्त योग्य असे मला वाटते. जसे-
आपण देवळात जातो. बाहेर चपला काढतो अन मग भगवंताच्या भेटीला जातो. का? आपण चपला घालून देवळात का नाही जायचे? काय हरकत आहे?
यामागची मूळ संकल्पना अशी असावी:
एक म्हणजे आपल्या चपलांना लागलेली घाण आत मंदिरात येऊ नये म्हणून. शिवाय, आपण भगवंताच्या दर्शनाला त्याच्याविषयीचे प्रेम, कृतद्न्यता याशिवाय कसलीही कामना न करता जाणे सगळ्यात योग्य. किंबहुना आपण आपल्या आईच्या भेटीला जसे प्रेमाशिवाय काहीही मनात न ठेवता जाऊ, अगदी तसेच जाणे योग्य. पण होते मुळात भलतेच. आपण भगवंताकडे जातो अन कळत-नकळत काही तरी सहज मागून जातो. म्हणून, बाहेर चपला काढतांना, बाहेरचे सर्व जग विसरून;चपलांसोबतच बाहेरच ठेवून, मग भगवंताची भेट घ्यायची असते. जेणेकरून मागण्यासाठी काही शिल्लकच राहणार नाही. याविचाराला अमलात आणण्यासाठीचे ते एक प्रतीक आहे.

विवेकविचाराने स्वत:मधे बदल घडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समाजमन सुधारण्याचे पहिले पाऊल नाही काय? तसे करत असतांना आणखीही काही गुण आपल्यात आलेत तर ते चांगलेच असणार.
जसे - यम, नियम

मूळात संतांची शिकवणच मोठी सुंदर आहे. ते प्रयत्नांना नेहमीच प्राधान्य देतात. पण १००% प्रयत्नानंतर मिळालेले फळ हे जसे असेल तसे हसतमुखाने स्विकारावे सांगतात. त्यात स्वत:ला सुधारण्याचेच मूळ सामावलेले आहे. नाही?

शुभम

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

12 Aug 2009 - 1:40 pm | विसोबा खेचर

मुक्तचिंतन आवडले...

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2009 - 1:44 pm | प्रकाश घाटपांडे

बाहेर चपला काढतांना, बाहेरचे सर्व जग विसरून;चपलांसोबतच बाहेरच ठेवून, मग भगवंताची भेट घ्यायची असते.

अहो मंदिरा बाहेर चपला काढुन ठेवल्या कि निम्मे लक्ष चपलांकडे. कवा चपलाचोर चपला उचलतील काय सांगता येत नाही ब्वॉ! काही लोक डावी चप्पल मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात व उजवी उजव्या कोपर्‍यात ठेउन पहातात. हल्ली काही लोक फ्लोटर्स वापरतात पटकन बाहेर घालुन पडायला सोपे जातात म्हणे! हल्ली मिपावर पण बर्‍याच चपलांची अदलाबदल होते म्हणे ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

शैलेन्द्र's picture

13 Aug 2009 - 11:11 pm | शैलेन्द्र

म्हणुनच आम्ही देवळात जातं नाही, मीपावर पडीक असतो...

इथे अनवाणी यायच.. तुमच वागण ट्रस्टींच्या पसंतीस ऊतरल्यास चपलांची सोय केली जाते.

अवलिया's picture

12 Aug 2009 - 1:48 pm | अवलिया

छान मुक्त चिंतन.... :)

--अवलिया

यशोधरा's picture

12 Aug 2009 - 4:09 pm | यशोधरा

सुरेख!

प्रशांत उदय मनोहर's picture

12 Aug 2009 - 5:28 pm | प्रशांत उदय मनोहर

> आता प्रश्न उठतो तो समाज सुधारणे साठी ईश्वर संकल्पनेची मुळात गरजच काय? नाही? या
> संकल्पनेशिवाय कुणाची वृत्ती सुधारू शकत नाही काय? नक्कीच सुधारू शकते. जे इतरांसाठी,
> कोणतीही अपेक्षा न ठेवता पुत्रवत प्रेमाने, कार्य करू शकतात त्यांची वृत्ती नक्कीच सुधारणार. किंबहुना
> ते इतरांची वृत्ती सुधारण्यास मदतही करू शकणार.>
>
> आता समजा, अशी मदत करणार्‍याने असा अभिमान धरला की माझ्याचमुळे या इतरांची वृत्ती सुधारते
> आहे. मी आहे म्हणूनच हे सर्व होतंय, मी नसतो तर हे झाले नसते.. तर त्यात गैर काय? त्याच्याच
> प्रयत्नांमुळे इतरांची वृत्ती सुधारते हे तर खरेच कि नाही? पण तसे करताना नकळत तो स्वत:ची वृत्ती
> बिघडवत तर नाही ना?
>
धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. एक अर्थ जो आज प्रचलित आहे (सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष, इ.) त्यात सामाजिक चालीरीतींनुसार होणारे व्यवहार, ईशोपासना, कर्मकांड यांना महत्त्व आलंय.
भगवद्गीतेत 'धर्म' हा शब्द वापरलाय त्याचा आस्तिक-नास्तिक असण्याशी संबंध नसून तो थेट अध्यात्माशी निगडित आहे. "आपण एक व्यक्ती" पासून "आपण समाजाचा एक घटक" या प्रवासाला "स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे" असं अध्यात्मात म्हटलं आहे. इथे कुठेही देव देव नाही. रामायण-महाभारतामधून ह्याच प्रवासाला लागण्यासाठीचं मार्गदर्शन होतं. त्यामुळे राम आणि कृष्ण यांना देव मानलं गेलं.
देवांच्या कथांमधून आदर्श "सामाजिक" जीवन जगण्याचं मर्म समजून घेणे हीच खरी देवपूजा.

ब्रह्मांड व्यापलेला, असंख्य हात, पाय, नाक, डोळे, तोंडं, कान असलेला देव दुसरा तिसरा कोणी नसून समाजच आहे. या समाजाचं आरोग्य चांगलं असेल तर वैयक्तिक जीवनही सुखी होईल.
नियम पाळणार्‍यांच्या देशांमध्ये ज्या सुविधा आहेत, त्या नियम मोडणार्‍यांच्या देशांमध्ये दिसत नाहीत हे याचं एक उदाहरण.

रामायण आणि महाभारतातलं एक एक उदाहरण पाहू.

रामायणात सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली यावरून स्त्रीमुक्तीवादी मंडळी ओरडतात. पण इथे खोलवर जाऊन रामायण समजून घेण्याची गरज आहे.
"अंश विष्णुचा राम" असं वर्णन असलेल्या रामाला सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका नव्हती. सीतासुद्धा साक्षात लक्ष्मीचं रूप. विष्णु आणि लक्ष्मी हे इहलोकांचं पालन करणार्‍या देवदेवता. त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तो संसार करण्यासाठी निश्चितच नव्हता. असो.
धोबी हे समाजातल्या सामान्य व्यक्तीचं प्रतीक आहे. सीता ही अयोध्येची राणी म्हणजे आजच्या काळातल्यानुसार राजकारणातली उच्चपदस्थ व्यक्ती. राम हा राजा आहे, म्हणजे आजच्या काळात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्य न्यायाधीशही. राजकारणातल्या उच्चपदस्थ व्यक्ती असलेल्या सीतेचं चारित्र्य स्वच्छ असण्याचा आग्रह धरण्याचा धोब्याला संपूर्ण अधिकार आहे आणि त्याच्या शंकेचं समाधान होण्यासाठी परीक्षेला उतरणं सीतेचं कर्तव्य आहे आणि तसं तिने करावं ह्याकडे आग्रहाने लक्ष्य घालणं हे रामाचं कर्तव्य आहे. ते त्यांनी पार पाडलं. अग्निपरीक्षेनंतरही धोब्याचं समाधान न झाल्यामुळे "राणी"पदावरून सीतेला काढण्यात आलं. हेच "रामराज्य" (आजच्या काळात मात्र राजकीय पक्षांमधले चारित्र्यहीन/गुन्हेगार नेते मात्र खुशाल निवडणुका लढवतात आणि राज्यही करतात!) त्याकाळी राजाची पत्नीच राणी होऊ शकत असल्यामुळे सीतेचा रामाला त्याग करावा लागला. सीतेचं आणि रामाचं कार्य अयोध्येत "रामराज्य" स्थापन करणे. ते सोपवता यावं यासाठीच लवांकुशांच्या जन्माची योजना आहे. तो सुखरूप व्हावा म्हणून सीतेची वाल्मिकी आश्रमात सोय आहे. लवकुशांना रामाकडे सुपूर्त केल्यावर सीतेचं कार्य पूर्ण होतं म्हणून ती विलीन होते. (धोब्याने पूर्वी शंका घेतली असते त्यामुळे या ठिकाणी राम स्वत:हूनच सीतेला ती सीता आहे हे सिद्ध करण्याचा आग्रह धरतो - त्याला स्वतःला सर्व माहिती असूनसुद्धा.) सीता धरणीत विलीन झाल्यावर लवकुश मोठे होईपर्यंत अयोध्येचं राज्य करण्याचं कर्तव्य राम करतो व योग्य वेळ आल्यावर काळाशी चर्चा करतो. पुढे दुर्वासांचं आगमनापासून शरयु नदीत राम व लक्ष्मणांच्या जलसमाधीपर्यंतचा भाग वाचल्यावर ते सहज लक्ष्यात येईल.

असो.
महाभारतात धर्मयुद्ध होतं तेव्हा न्यायदानाच्या वेळी आप्तस्वकीयांना त्रयस्थपणे शासन करावं हाच संदेश भगवद्गीतेतून दिला आहे. पांडवांच्या अज्ञातवासानंतर शांतिदूत म्हणून स्वत: श्रीकृष्ण पांडवांचा दूत म्हणून हस्तिनापुरात जातो हे विसरून चालणार नाही. (रामानेसुद्धा रावणाला "शेवटचा करी विचार फिरुन एकदा" म्हटलं होतंच.) शांततेचा मार्ग त्यागून कौरवांनी युद्धाचा मार्ग स्वीकारला. युद्धापूर्वी धर्म आणि अधर्म यांपैकी कुठलीतरी एक बाजू निवडण्याची संधी दोन्ही गटातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाली होती. अधर्माच्या बाजूने लढण्याचा भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला होता. अर्जुनाला विशाद झाला कारण त्याचे लाडके अजोबा, गुरू शत्रुपक्षात होते. "अधर्म केला असला तरी ती आपली मंडळी आहेत. त्यांच्याशी युद्ध कसं करू?" असा त्याला प्रश्न पडला. आणि "त्यांना संधी दिली असतानासुद्धा ते विचारपूर्वक अधर्माच्या बाजूने उभे आहेत तेव्हा त्यांना शासन करणं (त्यांच्याशी युद्ध करणं) हे तुझं कर्तव्य आहे." हे भगवद्गीतेतून त्याला श्रीकृष्णाने पटवून दिलं.

तात्पर्य, वैयक्तिक भावनांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व आहे हेच धार्मिक ग्रंथांमधून सांगण्यात आलंय. आणि समाजाचा घटक म्हणून स्वतःकडे पाहिल्यास व्यक्तिगत स्वार्थ गौण होत जातात.

आपला,
(सविस्तर) प्रशांत

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 6:11 pm | लिखाळ

इथे कुठेही देव देव नाही. रामायण-महाभारतामधून ह्याच प्रवासाला लागण्यासाठीचं मार्गदर्शन होतं. त्यामुळे राम आणि कृष्ण यांना देव मानलं गेलं.

आपल्या म्हणण्याप्रमाणे ते देव नव्हते तर त्यांना पुढे देव मानण्यात आले. आपण पुढे असे लिहिता की,

पण इथे खोलवर जाऊन रामायण समजून घेण्याची गरज आहे."अंश विष्णुचा राम" असं वर्णन असलेल्या रामाला सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका नव्हती. सीतासुद्धा साक्षात लक्ष्मीचं रूप. विष्णु आणि लक्ष्मी हे इहलोकांचं पालन करणार्‍या देवदेवता. त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तो संसार करण्यासाठी निश्चितच नव्हता. असो.

यामध्ये मला थोडा विरोधाभास वाटला.असो.
आपण दिलेल्या उदाहरणावरती मराठी संकेतस्थळांवर याही पूर्वी अनेकदा वाचले आहे. बहुधा मूळ लेखातल्या विषयापेक्षा या एकाच उदाहरणावर जास्त चर्चा होईल असा अंदाज.

राघव,
चिंतनात्मक लेख आवडला. चांगला आहे.
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक-आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

राघव's picture

13 Aug 2009 - 4:42 pm | राघव

प्रशांत,

तुझे म्हणणे अंशत: मान्य. :)
अर्थात एवढी पुस्तके वाचून आपल्यात किती फरक पडतो ते जास्त महत्त्वाचे. नव्हे?

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

प्राजु's picture

12 Aug 2009 - 10:41 pm | प्राजु

खूप आवडलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

13 Aug 2009 - 2:15 am | विकास

मुक्तचिंतन आवडले. धर्म हा कुणालाच सोडता येत नाही असे मला वाटते :-) काही जण धर्म पाळण्यासाठी जपतात तर काही धर्म सोडण्यासाठी एका अर्थी धरूनच ठेवतात! पण या ना त्या प्रकारे तो प्रत्येकाच्या मनात असतोच.

बाकी धर्माच्या बाबतीत सतत सांगितले गेलेले एक संस्कृत वाक्य म्हणजे: "धारयती इति धर्मः" अर्थात धर्म हा म्हणून इंग्रजी "रिलीजन" शब्दापेक्षा वेगळा वाटतो.

वर प्रशांत उदय मनोहरनी म्हणले आहे: "भगवद्गीतेत 'धर्म' हा शब्द वापरलाय त्याचा आस्तिक-नास्तिक असण्याशी संबंध नसून तो थेट अध्यात्माशी निगडित आहे." ते अंशतः योग्य वाटले. आस्तिक-नास्तिकतेशी संबंध नाही हे नक्की. पण अध्यात्मापेक्षा व्यक्तीच्या स्वभावाशी गीतेतल्या धर्माचा संबंध आहे असे वाटते. उदाहरणार्थ त्यातील एकच श्लोक (मराठीतून) सांगतो:
उणाही आपुला धर्म, परधर्माहुनी भला |
स्वधर्मात भला मृत्यू, परधर्म भयंकर||

साध्या गुजराथी व्यावहारीक वचनात सांगायचे तर, "जेणो काम तेणो ठाय, बीजा करेसो गोता खाय!"

अवांतरः म्हणूनच अनिसचे काम करणारे त्यांचा धर्मच पाळत असतात आणि त्यांना ठोकणारे त्यांचा ;)

असो. बाकी सुचले तर नंतर लिहीन...

राघव's picture

13 Aug 2009 - 2:57 pm | राघव

खरंय. धर्माचा संबंध वृत्ती बदलण्याशी असल्यामुळे आपसुकच स्वभावात बदल होणार. अन ते तसे झालेत तर धर्म बदलण्याचा संबंध येतोच कुठे? :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

धनंजय's picture

13 Aug 2009 - 4:37 am | धनंजय

मुक्तचिंतन प्रामाणिक वाटले.

प्रस्तावनेत लेखक म्हणतात की विचार थोडे विस्कळित आहेत. मुक्तचिंतनात ते चालायचेच.

ती म्हणजे सर्व धर्म माणसाला ईश्वराभिमुख होण्यास सांगतात.

जैन आणि थेरवाद-बौद्ध धर्म सोडून. हे धर्म भारतीय आहेत म्हणून चटकन आठवलेत, मागे बरेच लोकप्रियही होते. (अजून अन्य देशांत थेरवाद लोकप्रिय आहे, पण भारतात नाही, हे मात्र खरे. महायानात ईश्वर संकल्पना नाही, पण जे काय आहे, ते "धावून-येऊन-मदत-करणारे-देव" संकल्पनेच्या अगदी जवळ जाते.) हे दोन धर्म अगदीच विसरून चालणार नाहीत.

असो. मला वाटते "धर्म" हा शब्द नानार्थी असावा. म्हणजे संवादात अनर्थ होऊ नये म्हणून संवादकांनी एकमेकांचा अर्थ पडताळून मग संवाद करावा. त्या दृष्टीने मुक्तचिंतनात अगदी सगळे तपशीलवार मुद्दे असायला पाहिजेत असे नाही. तुमचे प्रामाणिक जे काय ते मत म्हणजे तुम्ही मानता तो अर्थ - हा सांगण्यात काही चांगला आणि उपयोगी विचार सांगत आहात. मग व्युत्पत्ती, सर्व धर्मातील सामान्य सूत्र वगैरे, तपशील गौण ठरतात.

मला गद्य लिहिणे काही तितकेसे सहज जमत नाही.

!! :-) असेच लिहीत राहावे, अशी विनंती.

राघव's picture

13 Aug 2009 - 4:39 pm | राघव

धन्यवाद धनंजय.

थेरवादाबद्दल जरा वाचावे लागेल. :)

संवाद होण्यास मूळ धारणा माहित असणे गरजेचे आहे. नाहीतर तो वाद होण्याची शक्यता जास्त!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

स्वाती दिनेश's picture

13 Aug 2009 - 6:59 pm | स्वाती दिनेश

मुक्तचिंतन आवडले,
स्वाती