"तात्या, पोष्टाजवळचा टकल्या सातपुते खपला रे. वेळ असेल तर ये!"
रात्री अकराच्या सुमारास जरा कुठे डोळा लागतो न लागतो तोच नान्याचा फोन!
शिवनाथ पांडुरंग नवाथे, ऊर्फ नाना नवाथे, ऊर्फ नान्या! हा प्राणी मला कधी भेटला, कधी आमची घट्ट दोस्ती जमली आणि कधी हा माझा झाला ते कळलंच नाही.
नान्याला मर्तिकं पोचवायची भारी हौस. छंदच म्हणा ना! जरा ओळखीपाळखीतलं कुणी मरायचा अवकाश, नान्या त्या घरात सर्वात पहिल्यांदा हजर! नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचा शो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो!
मग काय हो, ज्या घरी मयत झालेलं असेल त्या घरच्या मयताच्या तयारीचं पुढारीपण आपसुकच नान्याकडे येतं आणि नान्याच सगळी सूत्र हलवायला घेतो. कुठल्या स्मशानात जायचं, लाकडं की विद्युतदाहिनी, भटजी ठरवणे या सगळ्या गोष्टी नान्याच बघतो. हे नान्याला कुणी सांगायला लागत नाही आणि नान्या कुणी सांगण्याची वाटही पाहात नाही. एकतर त्या घरची मंडळी हे सगळं ठरवायच्या मनस्थितीत नसतात, बरं मर्तिकातलं सगळंच काही सगळ्यांना माहिती असतं असंही नव्हे. उलट कुठून सुरवात करायची, कुणी पुढाकार घ्यायचा हा जरा प्रश्नच असतो. आणि तिथे नेमका आमचा नान्या सगळी सूत्र हातात घेतो आणि मंडळी मनातल्या मनात हुश्श करतात!
"काय रे नान्या, तू एरवी जसा मोठमोठ्याने आणि भसाड्या आवजात बोलतोस तसाच मयताच्या घरीही बोलतोस का रे?" मी एकदा गंमतीत नान्याला विचारलं होतं!
"अर्रे! त्यावेळचा बोलण्याचा खास दबका आवाज आपण राखून ठेवला आहे!"
एखाद्या मुरब्बी नटाच्या थाटात नान्या उत्तरला!
नान्याचं बोलावणं आलं आणि मी चूपचाप टकल्या सातपुतेच्या घरी हजर झालो. टकल्या सातपुते त्याच्या नेहमीच्या खत्रूड चेहेर्यानिशीच घोंगडीवर विसावला होता.
"बरं झालं तू आलास!" नान्याने मला हळूच एका कोपर्यात घेऊन म्हटलं.
"आयला, हा टकल्या सातपुते म्हणजे एक नंबरचा भिकारचोट माणूस! आयुष्यभर सगळ्यांशी तुसडेपणाने वागला. लेकाच्या मर्तिकाला कोण आलंय का बघ! अरे चार डोकी तरी हवीत ना मयताला? म्हणून मुद्दामच तुला बोलावून घेतला. अरे चार माणसं जमवताना माझी कोण पंचाईत झाल्ये म्हणून सांगू! छ्य्या..!"
अर्थात, टकल्या सातपुतेच्या मयताला चार डोकी जमवायची जिम्मेदारी कुणीही नान्याकडे दिलेली नव्हती, तर हौशी नान्याने ती आपणहून अंगावर घेतली होती हे वेगळे सांगणे न लगे!
"काय करणार काकू? आता जे झालं त्याला काय इलाज आहे सांगा पाहू! तुम्ही धीर सोडू नका. अहो मरण काय कुणाच्या हातात असतं का? बरं, वसू निघाल्ये का पुण्याहून? तुम्ही काही काळजी करू नका. मी आलोय ना आता, मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"
नान्या टकल्या सातपुतेच्या बायकोला धीर देत होता. एकिकडे टकल्या सातपुतेला 'भिकारचोट' अशी माझ्याकडे खासगीत शिवी देणारा परंतु त्याच्या बायकोशी बोलताना मात्र, "काय करणार काकू, आता जे झालं त्याला कुणाचा काही इलाज आहे का? मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"असं बोलणार्या नान्याचं मला हसूही आलं आणि कौतुकही वाटलं! :)
वास्तविक टकल्या सातपुतेला रात्री मुद्दाम उठून अगदी हटकून पोचवायला वगैरे जावं इतकी काही त्याची आणि माझी घसट नव्हती. पण काय करणार, आमचे नान्यासाहेब पडले मर्तिकसम्राट! त्यांच्या दोस्तीखातर मला जावं लागलं होतं!
"अखेर टकल्या सातपुते अत्यंत गरीब परिस्थितीतच गेला रे!" नान्या पुन्हा एकदा दबक्या आवाजात हळहळला!
"गरीब परिस्थिती? अरे त्याचं हे घर तर चांगलं सधन दिसतंय. आणि मी तर अलिकडेच टकल्या सातपुतेला सॅन्ट्रो कारने जाताना-येताना पाहात होतो! मग टकल्या गरीब कसा काय? काय कर्जबिर्ज होतं की काय त्याच्या डोक्यावर?" मी.
"च्च! तसा गरीब नाही रे!" (बर्याचदा बोलण्याच्या सुरवातीला 'च्च' असा उच्चार करायची नान्याची खास ष्टाईल बरं का! :)
"पैशे खूप आहेत रे टकल्याकडे. पण आता तू बघतो आहेस ना? अरे चार डोकी तरी आपुलकीने, आस्थेने जमली आहेत का त्याच्या मयताला? तुला सांगतो तात्या, माणूस गरीब की श्रीमंत हे तो मेल्यावरच समजतं! तशी पैशेवाल्यांच्या मर्तिकाला काही मंडळी स्वार्थापोटी जमतात, किंवा एखाद्या राजकारण्याच्या मर्तिकाला पुढे पुढे करायला मिळावं म्हणून कार्यकर्तेही जमतात, तो भाग वेगळा! परंतु तुझ्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मयताला उत्स्फूर्तपणे चार माणसं जमतात आणि हळहळतात ना, ती खरी त्या माणसाची श्रीमंती समजावी!"
अच्छा! म्हणजे नान्या या अर्थाने टकल्या सातपुतेला गरीब ठरवत होता! माणसाला गरीब किंवा श्रीमंत ठरवायचा नान्याचा हा निकष काही औरच होता!
"आता तुझ्या त्या देशपांडेचंच उदाहरण घे. तो खरा श्रीमंत! अगदी सामान्यातला सामान्य माणूस त्याला आपुलकीने पोचवायला गेला होता!"
"कोण देशपांडे?" मी.
"अरे तुझा तो भाई देशपांडे रे!"
??
"अरे तुझा तो भाईकाका देशपांडे रे! टीव्हीवर शो करून सगळ्यांना हासवायचा ना? तो! काय गर्दी रे त्याच्या मयताला! टीव्हीवर दाखवत होते ना!"
मी मनातल्या मनात भाईकाकांची त्यांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागितली आणि म्हटलं, "भाईकाका, आमच्या नान्याला एकेरी उल्लेखाबद्दल मोठ्या मनाने क्षमा करा. मनानं तसा निर्मळ आहे तो. तुमच्या अंतयात्रेला झालेल्या उत्स्फूर्त गर्दीवरून तो तुम्हाला श्रीमंत ठरवतोय! तुमच्यातल्या माणूसवेडाला ही त्याची दाद समजा!"
एका बाबतीत मात्र नान्या खरंच सुखी होता. त्याला संगीत, कला, साहित्य वगैरे कश्शाकश्शात इंटरेस्ट नव्हता! पुलंनादेखील तो लेखक वगैरेच्या ऐवजी, 'टीव्हीवर ते कार्यक्रम करायचे' इतपतच ओळखत होता!
"हॅलो, कोण टिल्लूगुरुजी का? मी नाना नवाथे बोलतोय. पोष्टाजवळचे सातपुते वारले. तुम्ही अमूक अमूक वाजता डायरेक्ट स्मशानात पोहोचा. आम्ही त्याच सुमारास मयत घेऊन तिकडे येऊ!"
नान्या आता पुढच्या उद्योगाला लागला होता. नान्याची फोन डायरी जर तपासली असती तर त्यात मर्तिकाची कामं करणार्या किमान पाचपन्नास भटजींची नांवं तरी सहज सापडली असती! :)
"काय करणार तात्या, अरे ऐनवेळेस लोकांना भटजी कुठून बोलवायचा, कुणी बोलवायचा, कोण कोण भटजी अशी कामं करतात हे देखील माहीत नसतं! त्यामुळे साला मला या भटजी मंडळींशी कॉन्टॅक्टस् ठेवावे लागतात!"
एखाद्या गब्बर बिल्डरचे जसे महापालिका आयुक्त, नगरसेवक वगैरे मंडळींशी कॉन्टॅक्टस् असतात त्याच थाटात नान्या मर्तिकाच्या भटजींशी आपले कॉन्टॅक्टस् आहेत हे सांगत होता!
अंगापिंडाने काटक-सडपातळ, उभेल्या चेहेर्याचा, रंगाने सावळा, नाकीडोळी चांगला तरतरीत स्मार्ट, मध्यम उंचीचा, नेहमी साध्या शर्ट प्यँटीत असलेला नान्या गावात मुडदेफरास म्हणून प्रसिद्ध आहे. नान्या रेल्वेत इलेक्ट्रिकल कामगार या पदावर नोकरीला आहे. प्रसन्न चेहेर्याची, वृत्तीने अत्यंत समाधानी अशी पत्नी नान्याला लाभली आहे. तिचं नांव सुधा. नान्या तीन मुलींचा बाप आहे. सर्वात धाकटी स्नेहा आता ५-६ वर्षांची आहे. मी तिला चिऊ म्हणतो. कधीही नान्याच्या घरी जा, आमची चिऊ जिथे असेल तिथनं भुर्रकन येऊन तात्याकाकाला येऊन बिलगते!
"गधडे, तू तात्याकाकाकडेच राहिला जा! तोच तुझं कन्यादान करील!" असं नान्या चिऊला म्हणतो! :)
नान्याचं सगळं घरच अगदी प्रसन्न आणि हसतमुख चेहेर्याचं आहे. रेल्वेची नोकरी सांभाळून नान्या घरगुती इलेक्ट्रिक वायरींग दुरुस्तीची वगैरे कामही कामं घेतो. भरपूर कष्ट करतो. बायकोमुलींवर बाकी नान्याचा भलताच जीव! अत्यंत कुटुंबवत्सल स्वभाव आहे नान्याचा.
पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :) नान्या एकवेळ कुणाच्या लग्नामुंजीला जायचा नाही, पण ओळखीत कुठे मर्तिक असल्याचं कळलं की सर्वात पहिला नान्या हजर! मग अगदी शेवटपर्यंत तिथे थांबणार. अगदी सामान आणण्यापासून ते तिरडी बांधण्यापर्यंत, डॉक्टरचं सर्टिफिकेट, स्मशानात सुपूर्द करायची कागदपत्र, लाकडं रचणार्या इसमाशी "काय रे बाबा, लाकडं ओली नाहीत ना? मीठ आणि रॉकेल आहे ना?" इत्यादी गोष्टी कम्युनिकेट करणे, पळीपात्र, काळे तीळ, दर्भ, इथपासून भटजींच्या सामानाची अप्टुडेट तयारी करणे या सगळ्यात नान्याचं हात धरणारं गावात दुसरं कुणी नाही!
गणपतीच्या दिवसात नान्याकडे खरी धमाल असते. नान्याकडे पाच दिवसांचा गणपती बसतो.
"अरे तात्या, तुझं ते भजनीमंडळ घेऊन गणपतीत अमूक अमूक दिवशी माझ्या घरी ये रे. मस्तपैकी गाण्याचा कार्यक्रम करू!"
वास्तविक नान्याला संगीताचीही फारशी काही समज किंवा आवड नाही, पण गणपतीत घरी गाण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे ही हौस मात्र दांडगी! दरवर्षी नान्याच्या घरी माझं गाणं ठरलेलं, कारण मीच काय तो एकमेव गायक नान्याच्या ओळखीचा! पण मला खरंच कौतुक वाटतं नान्याचं. त्याच्या त्या दोन खोल्यांच्या रेल्वे क्वार्टर्समध्ये पाचपंचवीस माणसं गाणं एकायला अगदी दरवर्षी जमतात. ही सगळी नान्याच्या गणगोतातली माणसं! मला अभिमन वाटतो की मी देखील नान्याच्या गणगोतातीलच एक आहे!
गणपतीत दरवर्षी ठरल्याप्रमाणे मी माझा तब्बलजी आणि पेटीवाला घेऊन नान्याच्या घरी हजर होतो. नान्या तेव्हा कोण मुलखाच्या गडबडीत असतो! मग त्यानंतर अगदी यथास्थित, पाय दुखेस्तोवर अर्धापाऊण तास आरती! आरती झाली की गणपती बाप्पा मोरया या आरोळी पाठोपाठच, "देवा गणपतीराया सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा! कुणाचा जीव तरंगत रहायला नको!" हे देखील नान्या ओरडतो! :)
छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्या नकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवा गणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :))
"हं तात्या, इथे सतरंजी घातल्ये. तुम्ही मंडळी इथे बसा आणि सुरू करा गाणं! मंडळी, सर्वांनी बसून घ्या रे. आता गाणं ऐकायचंय! सुधा, खिचडीच्या प्लेटा भरल्यास का?" नान्याची तोंडपाटिलकी सुरूच असते!
"तात्या, काय सुपारी-तंबाखू, पानबिन हवं तर सांग रे. लेका मोठा गवई तू!" एवढं म्हणून नान्या पुन्हा इतर लोकांच्यात कुणाला काय हवं नको ते पाहायला मिसळतो! मग मी आणि माझी साथीदार त्या गर्दीतच स्थानापन्न होऊन वाद्यबिद्य जुळवू लागतो. कुठलीही औपचारिकता वगैरे न पाळता नान्या मला हुकून सोडतो,
"सुरू कर रे तात्या. तुझं ते 'जो भजे हरि को सदा' होऊन जाऊ दे जोरदार!"
मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :)
मग मी देखील नान्याच्या घरी अगदी मन लावून, यथेच्छ गातो. तसा काही मी कुणी मोठा गवई नव्हे. बाथरूम सिंगरच म्हणा ना! पण नान्याच्या घरी गायला जी मजा येते ती कुठेच येत नाही! देव आहे की नाही हे मला माहिती नाही, पण नान्याच्या घरी गाताना मात्र मला इश्वरी वास जाणवतो!
बरं एवढं करून देखील नान्या तिथे गाणं ऐकायला थोडाच थांबेल? ते नाही! तो लगेच आलेल्या मंडळींना गरमागरम साबुदाण्याची खिचडी आणि उत्तम मावा बर्फीचा तुकडा असलेली प्लेट द्यायला उठणार! नान्या, त्याची ती प्रसन्नमुखी बायको सुधा, आणि तीन निरागस मुली सगळ्यांच्या सरबराईत लागलेल्या असतात. गातांना मध्येच धाकटी चिऊ माझ्या मांडीवर येऊन बसणार! "तात्याकाका, मी पण गाणार!" असं मला म्हणणार! :)
"खरंच रे तात्या, चिऊला गाणं शिकवण्याकरता लेका मी तुझ्याचकडे पाठवणार आहे. तिला आपण मोठ्ठी गायिका करूया!" नान्या हे सांगत असताना सुधावहिनीही कौतुकाने चिऊकडे बघणार! मंडळी, खरंच किती साधी माणसं आहेत ही! नान्याच्या घरची गणपती मूर्ती जशी प्रसन्न दिसते तशी कुठलीच मूर्ती मला दिसत नाही! अहो देवसुद्धा शेवटी निरागसतेचा, साधेपणाचाच भुकेला आहे!
पण मंडळी, एका बाबतीत मात्र मी नान्याचा नेहमीच धसका घेतलेला आहे!
अहो काय सांगावं, रात्री अपरात्री कधीही नान्याचा फोन यायची भिती असते,
"तात्या अमका अमका खपला रे तिच्यायला! मोकळा असशील तर ये! अरे मयताला चार डोकी तरी जमवायला हवीत ना!"
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
11 Mar 2008 - 1:55 am | प्राजु
पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :)
काय पण छंद...! असतो एकेकाला.. काय करणार?
छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्या नकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवा गणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :))
हाहाहा.. तात्या, खरंच मलाही शंका आली ही जेव्हा मी पहिलं वाक्य वाचलं गणपती बसण्याचा उल्लेख आला लेखात तेव्हा...
मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :)
हे मात्र एकदम भारी... सह्हीच..
नाना नवाथे या व्यक्तिमत्त्वातील साधेपणाचे कंगोरे अतिशय सुंदर वर्णन केले आहेत तुम्ही. नेहमी प्रमाणेच.. सरस व्यक्तिचित्र..
- (सर्वव्यापी)प्राजु
11 Mar 2008 - 2:02 am | बेसनलाडू
खास तात्यांच्या शैलीतील उत्तम व्यक्तिचित्र. काही काही वाक्यं तर निव्वळ लाजवाब. जसे -
नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचा शो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो! :)
मर्तिकसम्राट हा शब्द तर भारीच आवडला.
हे व्यक्तिचित्र जरा आखडते घेतले आहे का? की मुळातच फक्त तोंडओळखच करून द्यायची होती?
(आस्वादक)बेसनलाडू
11 Mar 2008 - 2:19 am | सर्किट (not verified)
खल्लास. (मर्तिक सम्राटाचे व्यक्तिचित्र आवडले, म्हणून...)
बाकी बे.ला. शी सहमत, जरा आखडते घेतल्यासारखे वाटले आहे..
- सर्किट
11 Mar 2008 - 8:30 am | केशवसुमार
बे.ला. शी सहमत..
उत्तम लेख..
केशवसुमार.
11 Mar 2008 - 2:33 am | चतुरंग
तुमच्या व्यक्तिचित्र लिखाणावरची भाईकाकांची सावली अगदी जाणवते!
मर्तिकसम्राट नानूचे चित्रणही असेच हटके. (थोडा सफाईचा हात कमी पडला असे मला जाणवले, कुठे-कुठे तेच उल्लेख दोनवेळा आलेले दिसले...) पण एकून तुमचा ह्या लेखनप्रकारावर हात बसलेला आहे ह्यात शंका नाही.
जोरदार अभिनंदन!
चतुरंग
11 Mar 2008 - 2:39 am | मुक्तसुनीत
तात्यांना भाषेची उत्तम जाण असल्याने, थोडे कॅज्युअल असे वाटणारे त्यांचे लिखाणसुद्धा दर्जेदार बनते. माणसांचे बारकावे, त्यांच्या लकबी, त्यांच्यातल्या गमतीदार वाटतील अशा विसंगती आणि या सगळ्याला मैत्रीची , माणुसकीची किनार. अहो, बेत बिर्याणीचा असो की साध्या कोशींबीरीचा , ते करणे जाणत्याचे ....
पुलंचा बापू काणे आणि मिरासदारांचा कथानायक यांचा क्रॉस्-ब्रीड म्हणजे तात्यांचा नान्या ! :-)
11 Mar 2008 - 7:40 am | धनंजय
> पुलंचा बापू काणे आणि मिरासदारांचा कथानायक यांचा क्रॉस्-ब्रीड म्हणजे तात्यांचा नान्या ! :-)
एकेक वल्ली जमायला लागल्या आहेत.
11 Mar 2008 - 10:23 am | आनंदयात्री
लेख तात्या स्टाइल मधे आहे ... आवडला हे. सा. न लगे ..
आता आमची किरकिर :
बरे झाले यात क्रमशः नव्हते ! नाही आम्हा वाचक लोकांना अजुन एका लेखमालेचा ट्रॅक ठेवावा लागला असता.
11 Mar 2008 - 3:13 am | व्यंकट
सगळ्यात आधी क्रमशः आहे का ते पाहीलं, नव्हतं हे बरं आहे.
>> गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!"
हे आवडले.
" :) " जरा जास्ती वेळा पडलयं, सहज म्हणून मोजलं तर २२ वेळा भरलं. ऑल्मोस्ट पूर्णविरामाला स्बस्टीट्यूट. बाकी वल्ली उत्तमच रेखाटली गेलीये !
आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/
11 Mar 2008 - 5:01 am | कोलबेर
..आवडला!
11 Mar 2008 - 6:06 am | आपला आभि
तात्या एकदम 'काटा 'लेख लिहला आहे.. माझ्या डोळ्या समोर तर आमच्या गावात राहनारे शामादादा आले.. त्यांचा पण हाच छन्द होता... तिरडी कशी बाधावी ? खान्दा कसा आणि कुनी द्यावा ? झटपट अंघोळ कशी उरकावी ? .. लाकडावर झोपवल्यावर आग नीट लागन्यासाठी काय काय करावे ? या विषयात त्यांना आजच्या जमान्यात 'Ph D' सहज मिळाली असती..
स्मशानात भाषणे देण्याचा प्रकार तर औरच !!!!!.... त्यावर काहितरी येवूद्या.. (विनंती आहे हो .. आम्हाला काही उद्योगच नाहित ना लेख वाचन्याशिवाय..)
आपला
आआआभि
11 Mar 2008 - 7:20 am | सृष्टीलावण्या
"राजद्वारे श्मशाने च य: तिष्ठति स: बान्धव: ।" तोच खरा बान्धव जो राजाचे किंवा यमाचे बोलावणे आल्यावर आपल्याला दरवाजापर्यंत सोबत करतो.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
11 Mar 2008 - 7:25 am | व्यंकट
काय वाक्य आहे!
व्यंकट
11 Mar 2008 - 7:58 am | सुवर्णमयी
तात्या, व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी झाल आहे.
सोनाली
11 Mar 2008 - 8:20 am | सहज
तात्यांना भाषेची उत्तम जाण असल्याने, थोडे कॅज्युअल असे वाटणारे त्यांचे लिखाणसुद्धा दर्जेदार बनते. माणसांचे बारकावे, त्यांच्या लकबी, त्यांच्यातल्या गमतीदार वाटतील अशा विसंगती आणि या सगळ्याला मैत्रीची , माणुसकीची किनार. अहो, बेत बिर्याणीचा असो की साध्या कोशींबीरीचा , ते करणे जाणत्याचे ....
मुक्तसुनित यांच्याशी सहमत!
11 Mar 2008 - 8:32 am | प्रमोद देव
नान्या आवडला.
तरीही तात्या 'नान्या'कडे तू हवे तितके लक्ष दिलेले दिसत नाहीये असे राहून राहून वाटतेय. एखाद्या खमंग पदार्थात 'मीठ' घालायचे राहून गेले असावे तसे झालेय. शांतचित्ताने पुन्हा एकदा संपादनाचे सोपस्कार करून त्यात सुधारणा करावीस अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो.
11 Mar 2008 - 8:39 am | धोंडोपंत
तात्या,
अप्रतिम व्यक्तिचित्र. मजा आली वाचून. अत्यंत सुंदर. बोलकं, ओघवतं कथन.
क्या बात है!!
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
11 Mar 2008 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या, तुमच्या नान्या आवडला राव आपल्याला !!!
मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :)
हाहाहाहा, हे तर लै भारी !!! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
11 Mar 2008 - 10:35 am | सागर७८
वाचुन मजा आलि
11 Mar 2008 - 11:40 am | धमाल मुलगा
असा नान्या प्रत्येक गावात एक तरी असतोच का? आमच्या गावातही एक गृहस्थ असेच मर्तिकसम्राट आहेत.
बर॑, जे काही "मर्तिकसम्राट" पाहिलेत, ते सगळे असेच साधे सरळ, भोळे-भाबडे, आहे त्यात समाधानी असे असतात. खरी..अस्स्ल माणूसकी पहायची असेल तर एखाद्या 'नान्या' शी फक्त ओळख करुन घ्या...मैत्रीसुद्धा नाही म्हणत मी. ती आपोआप होऊन जाते.
बाकी, डोळ्यासमोर चित्र उभे करण्याची एकदम टिपिकल तात्या-इश्टाईल. खास करून गणपतीच्या आरतीचा आणि त्यान॑तरचा गाण्याचा किस्सा आवडला.
तरी पण तात्याबा, उरकल्यासारख॑ का वाटत॑य?
आपला,
एका 'नान्या'चा मित्र
-ध मा ल.
11 Mar 2008 - 12:52 pm | विसुनाना
चित्रण! तात्या, ज्याम आवडला तुमचा 'नाना नवाथे'.
(आता इतर लेखनही असेच एकटाकी किंवा एकटंकी संपवा, ही मल्लीनाथी)
11 Mar 2008 - 12:56 pm | शेखर
तात्यांचे लिखाण एकदम लाजबाब असते. प्रत्यक्ष नान्याला भेटल्या सारखे वाटले .....
शेखर
11 Mar 2008 - 12:56 pm | नंदन
सही :). नान्याचे चित्रण आवडले. 'नेहमीच्या गिर्हाईकाला फसवू नका, मिस्टर' आठवले :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Mar 2008 - 1:22 pm | विसोबा खेचर
'नेहमीच्या गिर्हाईकाला फसवू नका, मिस्टर' आठवले :)
धन्यवाद रे नंदनसायबा,
मी तर खूपच लहान आणि कडमड्या लेखक आहे, परंतु माझ्या मते आज परिस्थिती अशी आहे की लहानमोठ्या सर्वच लेखकांना व्यक्तिचित्रण करायचे असेल तर भाईकाकांचे बोट धरल्यशिवाय पुढे जाता येणार नाही!
मी फक्त त्यांचा वरदहस्त माझ्यावर रहावा एवढेच चिंतितो आणि माझ्या लेखनावर त्यांची सहज सावली तरी पडवी एवढेच पाहतो. कुठेही नक्कल होऊ न देण्याचा मात्र कसोशिने प्रयत्न करतो. तरीही खूप जड जातं आणि सांभाळावं लागतं! :)
आजदेखील माझा एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही! स्वप्नातही आंगठा न मागणार्या या प्रेमळ गुरूकडे मनोमन माझी एकलव्यासारखी तालिम सुरू आहे, कितपत यश येतं ते पाहायचं!
अवांतर - व्यंकटेशतात्या माडगुळकरांच्या व्यक्तिरेखाही मला अतिशय आवडतात. तात्या माडगुळकरांची 'माणदेशी माणसं' वाचून तर मी थक्कच झालो. फारच सुरेख!
एकंदरीतच 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात लाडका साहित्यप्रकार आहे!
असो,
आपला,
(भाईकाकांच्या व्यक्तिचित्रांनी सगळं आयुष्यच भारावून गेलेला!) तात्या.
--
मात्र जगाच्या दृष्टीने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्याइतकाच शुद्ध होता! -- (रावसाहेब!)
14 Mar 2008 - 7:22 am | संजय अभ्यंकर
फार सुंदर व्यक्तिचित्र! खास तात्या शैलीत!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
11 Mar 2008 - 2:56 pm | स्वाती राजेश
नान्या चे व्यक्तिचित्र मस्त लिहिले आहे.
वाचून मजा आली.
11 Mar 2008 - 3:08 pm | राजमुद्रा
तात्याबा नान्या आवडला!
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आता रौशनी कधी?
आमच्या धीर धरण्याला सीमा आहेत :) फार ताणल्याने तुटतील अशी (प्रेमळ) धमकी मी तुम्हाला देत आहे.
राजमुद्रा :)
11 Mar 2008 - 5:24 pm | सुमीत
तात्यांचा हातखंडाच आहे प्रभावी व्यक्ती चित्रण करण्याचा.
तात्यांना व्यक्तीचित्रण आवडते आणि ती आवड खरे तर त्यांच्या लोकसंग्रह जमवायच्या आवडी मुळेच आहे.
11 Mar 2008 - 5:58 pm | लिखाळ
तात्या,
नेहमी प्रमाणेच व्यक्तिचित्रण आवडले. खास.
सुरुवातीपासूनच नाना ही व्यक्ती अंगकाठीने कशी असेल याचे मनाशी चित्र रंगवले आणि ते आपण केलेल्या वर्णनाशी जुळले.
तुमचा व्यक्तिचित्रणात हातखंडाच आहे.
पण या पूर्ण लेखात एकदाही एखद्या पात्राबद्दल 'यावर सुद्धा एक स्वतंत्र लेख लिहावा' असे आपण लिहिले नसल्याने, हा लेख आखडल्यासारख झाला आहे की काय ? असे अनेकांना वाटले असेल :)
शिंत्रे गुरुजींची मालिका पूर्ण झाली का? त्याचा दुवा देता का?
पुलेशु.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
11 Mar 2008 - 6:32 pm | सन्जोप राव
(हे शीर्षकच गोळेकाकांसारखे पूर्ण वाक्यात झाले. आता प्रतिक्रिया काय लिहिणार कप्पाळ!)
सन्जोप राव
11 Mar 2008 - 6:40 pm | विसोबा खेचर
आपल्यासारख्या चोखंदळ वाचकाने सर्वांशी थोडी थोडी सहमती दाखवली हेच आमच्याकरता मोप आहे!
बाय द वे, गोळेकाकांचा संदर्भ आवडला. बाकी गोळेकाका तसा भला माणूस हो! :)
असो,
आपला,
(गोळेकाकांच्या संतुलीत आहारविषयक नियमांचा शिष्य!) तात्या.
11 Mar 2008 - 6:39 pm | किशोरी
नान्या तर आवडलेच पण लेख वाचुन त्यांच्या चिऊला पाहण्याची खूप इच्छा झाली
मजा आली वाचुन !!
11 Mar 2008 - 7:52 pm | सुधीर कांदळकर
मर्तिकसम्राट छानच. गणगोतापैकी असण्याचा अभिमान, चिऊचे भुर्रकन येऊन बिलगणे, पुलंचा एकेरी उल्लेख. वाह. .............. वा. वर्णनातील अनौपचारिकता व आपल्या मैत्रीतील जिव्हाळा ठाव घेणारा. अप्रतिम.
राजमुद्राताईंना रुसावे लागू देऊ नका. नाहीतर आम्ही लेखणीसंपावर जाऊ. 'पेन डाऊन' ऐवजी 'की बोर्ड ऑफ्फ'.
धन्यवाद. रोशनीची वाट पाहात आहे.
सुधीर कांदळकर
11 Mar 2008 - 8:36 pm | वरदा
खूप छान आहे हेही व्यक्तिचित्र
एकंदरीतच 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात लाडका साहित्यप्रकार आहे!
ते सा. न. ला. आम्हाला दिसतय ते तुमच्या सगळ्या व्यक्तीचित्रातून आणि ह्याचं कारण तुमचं सहज माणसं जोडणं आहे हेही नक्की..
सगळ्या व्यक्तीचित्रात एक सहजता असते तुमच्या सहज गप्पा मारताना, प्रतिसाद देताना तुम्ही जसं लिहिता तिच भाषा व्यक्तिचित्रात असते. त्यामुळे ते एकदम ओरिजिनल बनतं आणि वाचायला खूप मजा येते.
अभिनंदन ह्या उत्क्रुष्ठ व्यक्तिचित्राबद्दल!
11 Mar 2008 - 10:58 pm | सर्वसाक्षी
जोरदार!
खरेतर अंत्यविधीला जाणे ही एक सामाजिक गरज आहे. अनेकदा गेलेल्याच्या घरचे सगळे मोठ्या वयाचे असतात, मुलेबाळे जवळ नसतात मग धावपळ करायला कुणीतरी हव ना? मी देखिल एकवेळ लग्न चुकवतो पण ओळखीत कुणी गेले तर आवर्जुन जातो.
बाकी व्यक्तिचित्र तुझ्या खास शैलितलं, आवडल हो!
12 Mar 2008 - 12:06 pm | प्रसन्न
खरच मजा आली वाचताना, फक्त शेवट लवकर सम्पवल्यासारखा वाटला.
12 Mar 2008 - 5:36 pm | किशोरी
लेख तर छानच आहे ,आणी गुरुजीच नाव टिल्लू असत हे वाचुन
गुरुजी जीन्स मधे,केस रंगवलेले अस चित्र डोळ्यासमोर उभ राहील :))))
13 Mar 2008 - 7:59 am | विसोबा खेचर
आपुलकीने प्रतिसाद देणार्या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार मानतो...
प्रतिसाद न देणार्यांचेही अनेकानेक आभार! बघून घेईन तिच्यायला! ---- (स्वगत!) :)
काही मंडळींनी लेख संपवतांना जरा घाई झाली आहे किंवा लेख थोडा गुंडाळला गेला आहे असं मोकळेपणाने कळवलं त्यांचे आभार मानतो. परंतु लिहिताना मला तरी व्यक्तिश: तसं जाणवलं नाही. जसं जमेल तसं लिहीत गेलो. असो...
लिखाळराव, शिंत्रेगुरुजींची आठवण करून दिल्याबदल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो! साफ विसरूनच गेलो होतो. मनोगतावर शिंत्रेगुरुजींना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. तूर्तास त्याचे पहिले दोन भाग माझ्या ब्लॉगावर प्रसिद्ध करत आहे. ते आपल्याला इथे आणि इथे वाचता येतील. तिसरा भाग लवकरच लिहीन.
रौशनीबद्दलही काही मंडळींनी विचारलं आहे, तीही लौकरच पुरी करण्याचा प्रयत्न करतो. रोजच्या कामधंद्यातून थोडा निवांतपणा मिळायला हवा!
पुन्हा एकदा सर्वांचे आभार..
नान्याचं व्यक्तिचित्र मी आमच्या भाईकाकांची आयुष्यभर साथ करणार्या आणि त्यांना सांभाळणार्या सुनिताबाईंच्या चरणी अर्पण करतो...
तात्या.