ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांत भारताच्या विजयापेक्षा अधिक प्रकर्षाने जी बातमी झळकली ती म्हणजे एक प्रेक्षक नग्नावस्थेत मैदानावर ऍन्ड्रू सायमंड्स च्या दिशेने धावत गेला आणि सायमंड्सने त्याला धक्का मारून पाडल्याची. अश्या नागव्याने धावण्याच्या कृत्यास पश्चिमी सभ्यतेत (?) 'स्ट्रिकींग' असे संबोधतात. विकीपिडीयानुसार स्ट्रिकींगचा शब्दशः अर्थ वेगाने जाणे असा होतो. स्ट्रिकींगचा अर्थ रहदारीच्या ठिकाणी नागव्याने ( धावत ) जाणे असा कधी झाला ते विकीपिडीयावरच वाचता येईल. अर्थात धावत जाणं महत्त्वाच नाही. काही संथपणे निर्विकार चेहर्यानी चालणारे सुद्धा असतात. मराठीत किंवा हिंदीत ह्याकरता काही विशेष असा शब्द अस्तित्वात असल्याचे आमच्या माहितीत नाही.
स्ट्रिकर्स नेहेमीच गर्दीच्या ठिकाणी स्ट्रिकींग करतात. परंतु गर्दी असतांनाच करतात असे नाही. उदा. काही स्ट्रेकर्स भल्या पहाटे रहदारीच्या ठिकाणी फार कोणी नसतांना स्ट्रिकींग करतात. काही वृत्तवाहिन्यांचं 'सिधा प्रसारण' सुरु असतांना साळसूद पणे रिपोर्टरच्या मागे स्ट्रिकींग करतात. स्ट्रिकींग करणारे लोक तसे का करतात ह्याची काही कारणे म्हणजे त्यांना चार चौघात काही तरी 'डेअरिंग' वाले काम करायचे असते किंवा प्रसिद्ध व्हायचे असते किंवा तसे फिरण्याची त्यांची फँटसी असते. ज्यांना डेअरींग म्हणून करायचे असते ते शक्यतो मैदानी खेळाची ठिकाणे निवडतात. ज्यांची नुसतीच इच्छा असते ते भल्यापहाटे फारशी गर्दी नसतांना हा प्रकार करतात. मैदानी खेळाच्या ठिकाणी हा प्रकार वाढल्याने बर्याच देशांत ह्या लोकांना आर्थिक दंडाच्या स्वरूपात शिक्षा करण्याचे प्रावधान करण्यात आले. परवाच्या क्रिकेट मॅचच्या वेळी अवतीर्ण झालेल्या नग्नधूमकेतूस जवळजवळ दीड लाख रुपयांचा दंड करण्यात आल्याचे वाचनात आले. ह्या लोकांना असे नुकसान होत असले तरी क्वचित फायदा सुद्धा होतो, टि.व्ही., वर्तमान पत्रांत फोटो बातम्या येतात, प्रसिद्धी मिळते, काही मॉडेल झाले, काहीनी गाण्याचे अल्बम काढले, अमेरिकेतला पहिला स्ट्रिकर तर सिनेटर झाला असे विकीपिडीया सांगतो.
जेव्हा गांधारीने आपल्या दृष्टीच्या शक्तिने दुर्योधनाचे शरीर वज्राचे करायचे ठरवले तेव्हा तिने त्याला अंघोळ करून "जन्माच्यावेळीच्या अवस्थेत" ये असा आदेश दिला. कृष्णानी जेव्हा हा प्रकार जाणला तेव्हा गांधारीचा तो प्रयोग फसावा म्हणून तो दुर्योधनाला सामोरा गेला आणि अश्या 'निसर्गावस्थेत' ह्यावेळी कुठे निघालास? केळीची पाने तरी बांध असा सल्ला दिला. त्यामुळे दुर्योधनाचा 'तो' भाग वज्राचा झाला नाही (केळीची पाने वज्राची झाली की नाही त्याबद्दल माहिती नाही) आणि शेवटी भिमाशी केलेल्या युद्धात त्याचा जीव गेला. स्ट्रिकींग नीट न केल्याने जीवानिशी जाणारा दुर्योधन हा एकटाच असावा.
शरिराचा केवळ उत्तरार्ध उघडा करून फिरणार्यांना हाफ स्ट्रिकर्स म्हणतात तर पुन्हा पुन्हा स्ट्रिकींग करतांना पकडल्या गेलेल्यांना सिरियल स्ट्रिकर्स म्हणतात. भारतीय पौराणीक कथांमधले अजूनही काही नग्नधूमकेतू आम्हास ठाऊक आहेत, परंतू ते खलपुरूष नसल्याने त्यांचा उल्लेख टाळणे योग्यच.
आमच्या महाविद्यालयीन कालातील काही नग्नधुमकेतू आठवतात, परंतू ते हा प्रकार होस्टेलवर करीत असत रस्त्यावर नाही. आम्ही स्वतः कधी होस्टेलवर राहीलो नाही पण जेव्हा अभ्यास वा इतर कारणांनी होस्टेलवर जाण व्हायचं तेव्हा होस्टेलभर 'मुक्त' संचार करतांना हे लोक आमच्या दृष्टीस पडत. दुर्दैवानी आम्हास केवळ जेन्ट्स होस्टेल मध्येच प्रवेशाची अनुमती होती.
स्ट्रिकर्स जर मैदानात धावत आले तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी त्याच्या अंगचटी न जाता, त्यांना पकडण्याची जबाबदारी सुरक्षारक्षकांवर सोडून द्यावी असा संकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेला असतांना सायमंड्सनी त्याला पाडला. ऑस्ट्रेलियन मिडीयाने सायमंड्सवर केलेल्या टिकेत एका टिकाकारने म्हटलं आहे की 'सायमंड्स असल्या माकडचेष्टा करित असल्यानेच भारतातल्या आय. पी. एल. क्रिकेट संघटनेने दामदुप्पट पैसे देऊन ह्याला करमणूक करून घेण्याकरिता भारतात बोलवलं आहे.'
राजा बडे ह्यांच्या ' चांदणे शिंपीत जाशी ' ह्या गाण्यातील ' गे निळावंती कशाला झाकिसी काया तुझी? पाहूदे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे' ह्या ओळी चंद्राला उद्देशून आहेत. परंतू कुठल्यातरी चावट पुणेकराने ह्या ओळी पश्चीमेतील काही ललनांना अनुवादीत करून त्या स्त्रियांबद्दल आहेत असे सांगितले असावे. म्हणूनच की काय स्ट्रिकींगच्या इतिहासात काही स्त्रियांनी सुद्धा बढचढके सहभाग घेतलेला आहे. एका संकेत स्थळाने ह्याबद्दल सगळी माहिती एकत्र करून ठेवली आहे.
वर वृत्तवाहिन्यांच्या रिपोर्टरच्या मागे स्ट्रिकींग करणार्यांबद्दल मी लिहीले आहे, तेव्हा काही रिपोर्टर्सच स्ट्रिकींग करतात असे जे आम्ही ऐकून पाहून आहोत त्याबद्दल लिहीण्याचा मोह आवरत नाहीये. रसिकांनी अश्या रिपोर्टर्सच्या बातम्याचा आंतरजालावर शोध घेऊन लाभ घ्यावा.
ह्या विषयावर अजूनही काही (फाजील) लिहीता येईल परंतू येथेच आमुचा हा शोधनिबंध आम्ही संपवितो. सामाजीक जबाबदारीच भान ठेवून आम्ही ह्या लेखात आम्ही कोणतेही प्रकाशचित्र वा चित्रफीत टाकलेली नाही.
हा लेख आम्ही पूर्वी आमच्या अनुदिनीवर प्रसिद्ध केलेला आहे. ( http://baglya.blogspot.com/2008/03/blog-post_06.html )
प्रतिक्रिया
9 Mar 2008 - 10:51 pm | विसोबा खेचर
वा व्यंकटराव,
एका वेग़ळा विषयावरील लेख फार आवडला.
त्यामुळे दुर्योधनाचा 'तो' भाग वज्राचा झाला नाही (केळीची पाने वज्राची झाली की नाही त्याबद्दल माहिती नाही)
हा हा हा! :)
ह्या विषयावर अजूनही काही (फाजील) लिहीता येईल परंतू येथेच आमुचा हा शोधनिबंध आम्ही संपवितो.
अजूनही काही नवे शोध लागले तर तुमचा शोधनिबंध पुढे अवश्य सुरू ठेवावा! :)
सामाजीक जबाबदारीच भान ठेवून आम्ही ह्या लेखात आम्ही कोणतेही प्रकाशचित्र वा चित्रफीत टाकलेली नाही.
बरं केलंत! :))
असो, असेच वेगवेगळ्या विषयावरील उत्तमोतम लेख येऊ द्या..
आपला,
(हाफ चड्डी आणि बनियानमधला मुंबईकर) तात्या.
9 Mar 2008 - 10:52 pm | डॉ.प्रसाद दाढे
माझ्या आठवणीनुसार भारतात 'स्ट्रिकी॑ग' (कै) प्रोतिमा बेदीने (नृत्या॑गना, कबीर बेदीची पत्नी व पूजा बेदीची आई) केले होते मु॑बईत..
10 Mar 2008 - 12:13 am | व्यंकट
प्रोतिमा बेदींचे ते धाडस काळाच्या पडद्याआड गेलेले, पण आता त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि गूगलकडे वळलो. हिंदूस्थानटाईम्सच्या - बेअरडेअर इंडियन्स टॅबलॉईडवर त्या घटनेचा प्रोतिमा ह्यांनी केलेला खुलासा आणि तिच्या प्रेम संबंधातून उलगडणारे तिचे व्यक्तिमत्व ह्या बद्दलचा लेख उपलब्ध आहे. स्वैर अनुवाद करावासा वाटला, पण ते पुन्हा कधीतरी.
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/
9 Mar 2008 - 11:32 pm | प्राजु
त्या प्रोतिमा बेदीच होत्या. पण भारतात बाकी कुठे असे स्ट्रिकिंग चे प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही. लेख चांगला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
9 Mar 2008 - 11:47 pm | लिखाळ
हे स्ट्रिकिंग वगैरे भानगड इतकी नेहमीची असेल असे वाटलेच नव्हते. यावर कधी विचारच केला नव्हता.
लेख आवडला.
नग्नधूमकेतू हा शब्द मस्तच योजला आहे.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
9 Mar 2008 - 11:54 pm | भडकमकर मास्तर
पीयुष चावला सारखी बालगोपाल मंडळी तो साय्मण्ड्स चा स्ट्रीकर ला पाडण्याचा रानटी प्रकार पाहून भांबावून गेल्यासारखी वाटली... ( किंवा त्यांनी तशी ऍक्टिंग केली असेल्)...
अं अं ..लब्बाड....:))
10 Mar 2008 - 12:24 am | धनंजय
मजा वाटली.
अवांतर :
"चांदणे शिंपीत जाशी" मधील ढगांबद्दलच्या ओळी स्त्रीला उद्देशूनच आहेत अशी मला चुलत-चुलत-माहिती आहे. (स्वतः मिळवलेली माहिती ही सख्खी, ऐकीव-ऐकीव ती चुलत-चुलत माहिती.)
दूरदर्शनवर आशाताईंच्या एका मुलाखतीत असा प्रश्न आला की हृदयनाथ हा धाकटा भाऊ असल्यामुळे ताईशी काम करणे, कधी कठिण गेले का? गाताना अर्थ, गूढार्थ माहीत असला पाहिजे म्हणून आशाताईंनी हृदयनाथांना "चांदणे शिंपीत जाशी" चा अर्थ विचारून घेतला. हृदयनाथांना तो कवीशी चर्चेतून माहीत होता. पण "बाईला वस्त्रे काढायला सांगणे" हा अर्थ ताईला सांगताना धाकटा भाऊ म्हणून हृदयनाथांची त्रेधा झाली, अशी गमतीदार कथा त्यांनी सांगितली.
अशा प्रकारची मुलाखत दूरदर्शनवर प्रत्यक्ष कोणी ऐकल्यास त्यांनी दुजोरा द्यावा. नाहीतर वाचकांसाठी ही चुलत-चुलत-चुलत-माहिती होईल.
10 Mar 2008 - 5:21 am | विकास
मला आठवते त्याप्रमाणे आशाताईंना सुधीर गाडगीळ अथवा तत्सम मुलाखतकाराशी बोलताना, त्यांनी आठवण सांगीतली होती (अशा काही शब्दात, अगदी हेच शब्द नाहीत!)की: "चांदणे शिंपित जाशीच्या रेकॉर्डींगच्या वेळेस, गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी म्हणताना, बाळ जरा लाजला (ऑकवर्ड झाला या अर्थी). नंतर तरूण आहे रात्र अजूनीचे रेकॉर्डींग करताना मग मी त्याला गमतीत म्हणाले की बाळ आता तुझे कसे होणार! :-)"
10 Mar 2008 - 4:07 pm | लिखाळ
अगदी बरोबर. शब्दांच्या पलिकडे (?) या कार्यक्रमात सुधीर गाडगीळांनी आशा भोसलेंची मुलाखत घेतली होती. त्यात हा संवाद आहे. त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली. कार्यक्रम बराच जूना असावा. ८० च्या दशकातला असेल.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
10 Mar 2008 - 4:24 pm | विकास
ती जालावर आहे का? मी काल बघायचा प्रयत्न केला पण पटकन दिसली नाही. दुवा माहीत असल्यास कळवावात.
धन्यवाद
10 Mar 2008 - 2:35 am | बेसनलाडू
आवडला.
(वाचक)बेसनलाडू
10 Mar 2008 - 6:53 am | सन्जोप राव
लेख आवडला. 'नग्नधूमकेतू' हा शब्द तर फारच.
प्रोतिमा बेदीचे आत्मचरित्र मी वाचले होते. विविध पुरुषांशी आपण कधी व कसा शरीरसंबंध केला याची जंत्रीच वाचल्यासारखे वाटले. देवयानी चौबळ आणि तिला सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीकिंग करायला लावणारा राजकपूर यांच्या संदर्भातली अशीच बातमी कोणे एके काळी 'श्री', 'स्क्रीन' अशा प्रकाशनांनी फोडणीला टाकली होती. असो, याबाबतचा तपशील 'तबीयतदार तज्ञ' शोधून काढतीलच.
सार्वजनिक ठिकाणी नग्नावस्थेत वावरणे यामागे प्रसिद्धीचा हव्यास एवढे एकच कारण असेल असे वाटत नाही. काही काही वेळा मानसिक विकृती, लैंगिक कुचंबणा असे काही त्यामागे असू शकेल. अशा कृत्याबद्दल दंड ठीक आहे, पण सदर व्यक्तीला मनोविकारतज्ञांची मदत घ्यायला लावणे, हे केले की नाही ते कळाले नाही.
महाविद्यालयात असताना विज्ञानाची प्रात्यक्षिके करताना सूक्ष्मजीवशास्त्रातील एका प्रयोगाला स्ट्रीकिंग असे नाव होते - अजूनही आहे. त्या वेळी स्ट्रीकिंग हा शब्दच माहिती नसल्यामुळे काही फारच भाबडे विनोद होत असत, ते आठवले.
सन्जोप राव
10 Mar 2008 - 2:19 pm | सृष्टीलावण्या
TV-5Monde ही फ्रेंच वाहिनी पाहते. त्यावर अनेक अभिजात फ्रेंच चित्रपट इंग्रजी भाषांतरासह दाखविले जातात. त्यात फ्रान्समध्ये कला स्वातंत्र्य असल्याने बरेचदा स्त्री-पुरुषांचे संपूर्ण नग्नदर्शन घडते मात्र ही नग्नता सहजतेने येते. तो त्या कथानकाचाच भाग असल्यासारखे सादर केले जाते.
भारतीय चित्रसृष्टीसारखा त्यात ओढून ताणून आणलेला भडक नागवेपणा नसतो.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
10 Mar 2008 - 2:28 pm | विवेकवि
नविन विषय मा॑डलात
अतिषय छान वाटले.
पर॑तु त्यामुळे आपल्या वरच ते शेकले...
असो असेच लेखन करत रहा..
विवेक वि.
10 Mar 2008 - 8:52 pm | सुधीर कांदळकर
विषय. 'नग्नधूमकेतू' हा शब्द चपखल. विकृत धाडसाची हौस आणखी काय? मनोविकारतज्यांनी या विषयावर लिहिले नसावे.
असो. चर्चा चांगली रंगली.