दोन वाटा

प्रशांत उदय मनोहर's picture
प्रशांत उदय मनोहर in विशेष
18 Jul 2009 - 12:05 am
छंदशास्त्र

वळणदार ही रम्य वाट, घनदाट तरू चहुकडे; दुभंगे जाता इथुनी पुढे
वाट एक त्यांतली ही, हिच्या दोबाजूंना लांब; पसरले पहा दिव्याचे खांब
दुसर्‍या वाटेवरी न पथिक न गाड्याही धावल्या; परि तिथे काटे आणिक कळ्या
दोन्ही वाटा अखेर मिळती एका रस्त्याला; जाई जो माझ्या गावाला

दुवा दिव्यांचा, ह्या वाटेवर पांथिक बहु चालले; धरावी ही हे मी ठरविले
प्रवास इथला सुलभ, फक्त चालणे अखंडितपणे; आणि निजधामाला पोचणे
धरली त्याने वाट, जी न वहिवाट, चालला पुढे; फुलांचे जेथे पडले सडे
पाचोळा अन् काटेही पण वाटेवर त्याच्या; आणि ना दिशा ओळखीच्या

गावी मी पोचलो, जणू मिळवले सर्व सर्व; मला जाहला असा गर्व
स्वतःभोवती फिरत राहिलो, विसरलो जगाला; येइ अंधारी नयनांना
"तो न पोचला गावी अजुनी? फसला काट्यांत!"; गर्जलो तदा मदासक्त
"वहिवाटेवर तो न चालला, पोचला न गावी; न झाले कार्यही वेळेवरी"

अवचित आला एके दिवशी माझ्या गावाला; तो मला सहज भेटण्याला,
तो येता मी कुत्सित वदलो, "उशीर बहु झाला; तुजला गावी पोचण्याला!"
आणिक वदलो काहीबाही टाकुनि त्यां अतिउणे; परी ना लक्ष्य दिले त्याने
प्रेमे मग पाहुनी तयाने मंदस्मित केले; आणि मज वदला शांतपणे

"उशीर झाला मला खरोखर तुला भेटण्याला; मागतो क्षमा तयाची तुला
वाटेवर काटे होते, होती पण तेथे फुले; ज्यांमध्ये मन हे माझे झुले
तिथे एक वठलेले होते वृक्ष, तयापासुन; शिल्प मी घडवियले तासुन
शिल्पाच्या भोवती पसरले वन्यफुलांचे सडे; गंध त्यांचा पसरे चहुकडे

मी न निवडल्या चालण्यास त्या वाटा नित्याच्या; नि धरिला रस्ता काट्यांचा
परि उभारला जीव ओतुनी स्वर्ग मन्मनीचा; न वर्णवे आनंद तयाचा"

टीप : मूळ प्रकाशन - 'लेखणीतली शाई' या ब्लॉगवर

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

18 Jul 2009 - 12:33 am | बहुगुणी

आवडलं! ('अद्भुतरस' हा प्रकार का निवडला कळलं नाही.)

प्रशांत उदय मनोहर's picture

18 Jul 2009 - 12:41 am | प्रशांत उदय मनोहर

बहुगुणी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

कुठला रस निवडावा हा प्रश्न पडला होता. तुम्हाला कुठला रस योग्य वाटतो या कवितेसाठी?

चतुरंग's picture

18 Jul 2009 - 12:57 am | चतुरंग

काही ठिकाणी जरा बोजड झाली आहे, कदाचित छोट्या ओळी केल्या असत्या तर आणखी सोपे झाले असते का असे वाटते. उत्तम प्रयत्न! :)

(प्रख्यात आंग्लकवी रॉबर्ट फ्रॉस्ट ह्याच्या 'द रोड नॉट टेकन' ह्या कवितेतून हे विचार स्फुरले असावेत असे पहिले कडवे वाचताना वाटले.)

चतुरंग

प्राजु's picture

18 Jul 2009 - 1:21 am | प्राजु

मिपावर स्वागत प्रशांत!!
कविता आवडली.
पण हे वृत्त कोणतं आहे?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

18 Jul 2009 - 3:41 am | धनंजय

विहिवाट नसलेल्या एकल्या रस्त्यावरून चालल्याचा आनंद छान वर्णन केलेला आहे.

यमकेही वेगळीच घेतली आहे या वृत्तात.**(पण इथे काय झाले?
स्वतःभोवती फिरत राहिलो, विसरलो जगाला; येइ अंधारी नयनांना)**

जर प्रत्येक ओळ तीन भागांत विभागली असती तर कदाचित वाचायला सोपी गेली असती - चतुरंग यांच्याशी सहमत. **पण मग दिसायला खूप लांब दिसली असती, हीसुद्धा गडबड होते.**

सुबक ठेंगणी's picture

18 Jul 2009 - 5:07 am | सुबक ठेंगणी

माझ्या मते ह्या कवितेला 'शांत"रस योग्य वाटतो.
बाकी...

धरली त्याने वाट, जी न वहिवाट, चालला पुढे; फुलांचे जेथे पडले सडे

ही ओळ विशेष आवडली.

सुवर्णमयी's picture

18 Jul 2009 - 5:53 am | सुवर्णमयी

प्रशांत,
कविता अतिशय आवडली. सुरेख झाली आहे.
पहिले कडवे रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेची आठवण करून देते तरी इतर कविता वेगळी आहे हे स्पष्टच आहे.
कविता अतिशय चित्रदर्शी आहे. प्रसंग डोळ्यासमोर सहज येतात.
या कवितेत मला एक विशिष्ट ठेका दडला आहे असे वाटले आणि तो वाचकाला सहज सापडतो हे तिचे शक्तीस्थान आहे.

शेवटच्या चार ओळी खूप आवडल्या.
शुभेच्छा
सोनाली

प्रशांत उदय मनोहर's picture

18 Jul 2009 - 8:36 am | प्रशांत उदय मनोहर

चतुरंग, धनंजय आणि प्राजु,
कुसुमाग्रजांची "कोलंबसाचे गर्वगीत" ही कविता साधारणपणे वर्ष-दीडवर्षांपूर्वी वाचली तेव्हापासून त्या वृत्तात कविता करून पहावी असं सारखं वाटायचं. तो प्रयोग करण्याचा योग या कवितेमुळे आला.

सुबक ठेंगणी,
तुम्ही सुचवल्याप्रमाणे बदल करणं शक्य असल्यास अवश्य करेन.

सुवर्णमयी,
"द रोड नॉट टेकन" ही रॉबर्ट फ़्रॉस्ट यांची कविता वाचून आयुष्याच्या प्रवासावर कविता करावीशी वाटली. सुरुवातीला वाटेचं दोन वाटांमध्ये दुभंगणे, इ. त्यावरूनच सुचलं. पण माझ्या कवितेचा आशय पूर्णतः भिन्न आहे. फ़्रॉस्ट यांच्या कवितेतल्या वाटा या मन आणि बुद्धी यांच्या अंमलाचं द्योतक आहेत. आणि तथाकथित वहिवाट न घेतल्यामुळे काही फरक पडला नाही असा ’सुस्कारा’ टाकलाय कवीने.
माझ्या कवितेत दोन वाटांवर दोन व्यक्ती चालत आहेत आणि दोघेही स्वतःच्या यशस्वी असण्याबद्दल confident आहेत.
असो. बाकी कवितेत सगळं आहेच. त्यामुळे इथे त्यावर प्रवचन नको. [:D]

प्रमोद देव's picture

18 Jul 2009 - 12:36 pm | प्रमोद देव

प्रशांत,मिपावर तुझे स्वागत आहे.
कविता जरा जडच गेली समजायला. पण थोडा प्रयत्न केल्यावर बहुतेक समजली असे म्हणू शकतो.
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

लिखाळ's picture

22 Jul 2009 - 9:40 pm | लिखाळ

वाहवा !
फार छान कविता. अजून लिहा. पुलेशु
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

प्रशांत उदय मनोहर's picture

11 Sep 2009 - 2:14 pm | प्रशांत उदय मनोहर

उगाच उवाच हा ब्लॉग चाळता चाळता कवी अनिल यांच्या "दोन वाटा" ही दशपदी सापडली.

वाटचुकार वासराशिवाय फिरकलेले कोणी नसते
अशा जागी गेली वाट सरत सरत आली असते
तिथे पुन्हा दोन वाटा फुटलेल्याच्या खुणा दिसतात
एक जरा सरावलेली दुसरीवरती ठसे नसतात
तिने चाहूल नाही म्हणून पाऊल पाऊल ओढून नेले
सोडून दिल्या वाटेकडे फिरून फिरून पाहू दिले
किती वेळ दिसत होती धरली नाही तीच वाट
तिची वळणे हेलकावे तिचे उतार तिचे घाट
तिनेच गेलो असतो तर ही कदाचित मिटली असती
तसे व्हावयाचे नव्हते - हीच माझी वाट होती!

रॉबर्ट फ़्रॉस्ट यांच्या या कवितेवरून कवि अनिल त्यांना स्फुरली असावी असं अजित ओक यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटलंय. मलाही असंच वाटतं.
रस्त्याच्या दुभंगण्यावरून मला ही कविता सुचणं आणि त्याला मी "दोन वाटा" हे(च) नाव देणं हा मात्र निव्वळ योगायोग आहे.

आपला,
(रसग्राहक) प्रशांत
---------
प्रशांत म्हणे, होता यमकांचे अतिसार
काव्यपंक्ती पडती एकावर एक टुकार
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई