पहिल्या भागाचे प्रतिसाद ८० च्या आसपास गेल्याने व ते आता वाचण्यास अवघड पदत आहे ही सत्य परिस्थीती असल्याने "भाग-२" सुरु करणे अपरिहार्य झाले आहे.
बर्याच जणांचा सुर ही चर्चा महत्वाची आहे असा आहे व ह्या चर्चेत अनेक मतमतांतरे येत आहेत ...
सुरवातीच्या भागात ड्रुपलच्या मर्यादेमुळे दुसर्या पानावर गेलेले प्रतिसाद वाचणे व त्याचा ट्रॅक ठेवणे अवघड जात आहे ...
म्हणुन हा दुसर्या भागाचा प्रपंच ...
पहिला भाग आपल्याला संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे .... इथे वाचता येईल ...
आता चर्चेला वळण यावे म्हणुन मी काही प्रतिसादातले काही मुद्दे इथे फक्त कॉपी-पेस्ट करत आहे ...
चर्चेसाठी ह्याचा उपयोग झाला तर उत्तमच आहे :)
मेघना म्हणते :
’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्याचदा वापरत असतात.
माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.
कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.
श्रावण मोडक म्हणतात :
धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता यांचा विचार कशाला करायचा? या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवूया असे का म्हणतो? कारण, या साऱ्या चर्चेत कुठं तरी धर्म, परमेश्वर, नियती या तिन्ही गोष्टी अपौरूषेय ठरतात. त्या तिन्ही गोष्टी अपौरुषेय नाहीत, अशी धारणा झाली तर बरेच अवकाश खुले होते विचार करण्यासाठी. कारण या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.
एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.
घाटपांडेकाका म्हणतात :
अश्रद्धेच्या अतिरेकापेक्षा माणुस महत्वाचा म्हणुन मी जातो. माणसे जोडायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही.
भोचक म्हणतात :
माझा देवावर विश्वास, श्रद्धा होती का हा मलाही पडलेला प्रश्नच. पण देवावरचा विश्वास उडण्याऐवजी त्याच्यावर श्रद्धा का ठेवायची याची कारणं शोधण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला. या शोधातच मुळ विश्वासच डळमळीत झाला.
मी तेव्हा नास्तिक होतो का? हा मलाही आज प्रश्न पडतो. नास्तिकतेच्या जवळ कुठेतरी होतो, असं वाटतं, पण आस्तिक्यपण पूर्ण सुटलं होतं, असंही नाही.
केली ती साधी. सत्यनारायणाची. त्या पुजेवरही विश्वास होता असं नाही. कारण जहाजाच्या बिनडोक कथेवर काय विश्वास ठेवणार? पण पु्न्हा तीच भूमिका घरावर काही एक संस्कार व्हायला पाहिजे, म्हणून चार गोष्टी व्हाव्यात.
पण मी नास्तिक आहे का? की आस्तिक हा मलाही पडलेला प्रश्न. मधल्या काळात नास्तिकपणाच्या टोकाला गेलेला मी आता तिथून थोडा वळालो. विरोध कोणताच करत नाही, पण स्वतःहून कोणतीही धार्मिक गोष्ट करण्याकडे कल नसतो. त्यामुळे कुणाच्या चुकीच्या पद्धतीलाही विरोधही फारसा करत नाही. याचा अर्थ धार्मिक अकर्मता अंगी बाणलीय असंही नव्हे. पण बिनडोक न पटणार्या प्रथा, परंपरा नाही पाळायच्या हे मात्र ठरवलंय. ऐकणारं कुणी असेल तर त्यामागची भूमिका समजावूनही सांगतो. पण त्याला पटावीच हा आग्रह नसतो. तावातावाने भांडण्याची हौसही आता जिरलीय.
त्यामुळे स्वतःपुरतं जे चांगलं वाटलं ते करतो. जेथे चांगलं वाटतं,(भलेही ते मंदिर असो वा मशीद) त्यावेळी तिथं जातो. मन प्रसन्न करणारं ऐकावसं वाटलं तर ऐकतो. शंकराचार्यांच्या ओम पूर्णमिदं ची अध्यात्मिक अनुभूती छान वाटते. अथर्वशीर्षाची वर्णनं मी सृष्टीला लावतो. (या अर्थाने देवाच्या जागी मी निसर्ग रिप्लेस केलाय, असं म्हणता येईल.)
बाकी मी आस्तिक-नास्तिक, धार्मिक की अध्यात्मिक हा मलाही पडलेला गुंता आहेच. ही गुंतवळ सुटत नाही नि सोडवतही नाही.
खराटाशेठ म्हणतात :
नास्तिकपणा किंवा अधार्मिकपणाचे अनेक पैलू आहेत. एक पैलू धर्म आंणि कर्मकांडे यांना विरोध या अंगाने जाणारा असतो. या पैलूत आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बसू शकतात. म्हणजे देव आहे असे मनातून वाटणारे पण तो या दगडाच्या किंवा इतर मूर्तीत आणि कर्मकांडात नाही असे वाटणारे आस्तिकही यात येतात.
काही जण आस्तिक पण असतात आणि कर्मकांडांना ही हरकत नसते. पण या कर्मकांडांना पॉझिटिव्ह वळण द्यावे असे वाटणारे आणि तसा प्रयत्न करणारे असतात. वर कोणीतरी आश्रमाला दान देण्याविषयी लिहिले आहे.
काही जण खरोखरच नास्तिक म्हणजे देव नाहीच अशा मताचे असतात.
बहुधा 'माझा नास्तिकपणा या समोरच्या व्यक्तीला दु:ख देण्याइतका महत्त्वाचा आहे का?' हा दृष्टीकोन असतो.
देव या संकल्पनेचा काहीही अर्थ सांगितला तरी 'विश्वातील घटनांचे नियंत्रण करणारा आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम हव्या तशा प्रकारे घडवू/बदलू शकणारा' हा अर्थ देवाच्या संकल्पनेपासून कधीही दूर करता येण्यातला नाही. कारण हा अर्थ काढून टाकला तर देव असला काय आणि नसला काय? बहुतेक आस्तिकांनाही अशा देवाचे माहात्म्य वाटणार नाही. तर वरील प्रकारची क्षमता बाळगणारी कोणतीही शक्ती या विश्वात नाही असे मी मानतो.
पुण्याचे पेशवे म्हणतात :
डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नियम सर्वत्र लागू आहे असे मला वाटते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या आहेत त्या या उत्क्रांतीचे टप्पे पार करत आल्या आहेत असे मला वाटते.
स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. एखादी धार्मिक गोष्ट मला पटली नाही तरी मी ती पाळतो. त्यावर जास्तीत जास्त विचार करून ती का करावे असे म्हटले असेल याचा शोध घेतो. केवळ कोणीतरी लिहीले सांगितले म्हणून माझ्या संस्कृतीत सांगितलेली एखादी गोष्ट मी टाकाऊ मानत नाही.
तसेच जी जी संतचरित्रे मी आजवर वाचली त्यात त्या त्या संतानी परमेश्वराची भक्ती, नामस्मरण, उपासना श्रेष्ठ हेच सांगितले आहे. आणि तेवढे कारण मला''देव' मानायला पुरेसे आहे.
भाग्यश्री म्हणते :
मी जरा श्रद्धाळू आहे! पण त्यासाठी रोज देवळात गेलेच पाहीजे, देवाचे नाव घेतलेच पाहीजे, पन्नासदा येताजाता नमस्कार केला पाहीजे असं मला मुळीच वाटत नाही..
कुठल्याही मूर्तीसमोर गेल्यास मला केवळ शांत शांत वाटते! पण म्हणुन मी दिवसातून हजारवेळा नाही जात..
देवपूजा करताना, संस्कृत श्लोक, आरत्या, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणायला मला फार आवडते. पण एखाद दिवस नाही झाले यातले काही तरी बिघडत नाही..
मला असं वाटतं, आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीशी आपण कसे वागू तसं काहीसं माझं देवाबरोबर होते.. रोजचा कॉन्टॅक्ट नसला तरी काही बिघडत नाही.. पण कधीतरी तिथे जाऊन मन मोकळे केले, शांत केले की बरे वाटते.
नंदन म्हणतो :
आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे मान्य करण्यास खर्या विज्ञानवाद्याला अडचण नसावी. पण या अज्ञाताच्या नावाखाली धर्माच्या नावावर खपवल्या जाणार्या अनेक गोष्टींमुळे प्रतिक्रियात्मक म्हणून एक जवळजवळ तितकीच कट्टर मनोवृत्ती तयार होऊ शकते. या पार्श्वभूमीवर श्रावण यांनी स्पष्ट केलेली भूमिका संतुलित वाटते.
लिखा़ळ म्हणतात :
काळजीपूर्वक आपली मते तपासत राहणे हे चांगलेच असते. मते बदलतसुद्धा असतात. बदलाचे एकदा जसे स्वागत होते तसे पुन्हा सुद्धा व्हावे. तेव्हा संकोच होऊ न द्यावा.
मॄदुला म्हणतात :
कोणाच्या श्रद्धाविषयाच्या आड मी येत नाही आणि माझ्या मतांच्या आड कोणाच्या श्रद्धा येऊ देत नाही.
पण अश्या विषयात, एकदा एका दिशेने चालू पडल्यावर परतीची वाट नाही. कदाचित, सश्रद्धांचेही असेच होत असावे. जसे मला लोकांना देव आहे हे पटतेच कसे याचे मनोमन आश्चर्य वाटते, तसे त्यांना देव नाही वाटणारे लोक नीट विचार करत कसा नाहीत याचे आश्चर्य वाटत असावे.
यशोधरा म्हणते :
संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल?
देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का?
माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक.
....
धर्म आणि रुढी एकमेकांपासून अतिशय भिन्न अशा संकल्पना आहेत.
धर्मामध्ये एक विशिष्ट तत्वज्ञान सांगितलेले असते, जगण्याची, वागण्याची विशिष्ट अशी प्रणाली सांगितलेली असते. आपल्या मूळ रुपात कोणताही धर्म खूप व्यापक आणि सहिष्णू असतो.
मुळात हिंदू धर्म हा "धार्मिकता" ह्या अर्थी धर्म नव्हे. ती एक जीवन प्रणाली आहे. ह्यात प्रत्येक मताला स्थान आहे. आस्तिकता, नास्तिकता, सगुण, निर्गुण, निरीश्वरवाद... यादी वाढतच जाते, म्हणूनच हिंदू वेगवेगळे पंथ मानू शकतात, त्यांची दैवतंही वेगळी असू शकतात. एकच देवाला वा प्रेषिताला मानायला हवं अशी सक्ती इथे नाही. जन्माने वा कर्माने हिंदू असून, हिंदू धर्माविषयी माहिती न करुन घेता, काही अभ्यास न करता, धर्माला नावं ठेवायची मुभाही इथेच आहे, ह्याच धर्मात. आताआतापर्यंत असं कोणी केलं तर केवळ धर्मांधतेने कोणी अश्या टीकाकांराना त्रास पोहोचवल्याचं ऐकीवात नाही. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याची पूर्ण मुभा हे हिंदू धर्माचं अतिशय अभिमानस्पद वैशिष्ट्य आहे.
राहता राहिल्या रुढी. ह्या व्यक्ती निर्माण करतात आणि सामाजिक जीवनात रुढी जन्म घेतात आणि नष्टही होतात. रुढी निर्माण होण्याची कारणं बर्याचदा समाजावर मूठभर लोकांचा वरचष्मा रहावा म्हणून निर्माण केल्या जातात. त्या नाहीश्या व्हायलाही हव्यात, पण रुढी म्हणजे धर्म, असे गृहीतक धरुन, म्हणून धर्माला का झोडपावे? हे म्हणजे, हाताला घाण लागली तर, घाण साफ करण्याऐवजी हात कापून टाकूया म्हणण्याप्रमाणेच झाले ना?
पक्याशेठ म्हणतात :
सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना, कुठली तरी शक्ती असणारच. ही जी काय शक्ती आहे माझ्या मते तीच देव. तिची वेगवेगळी रुपे माणसाने निर्माण केली की खरोखरीच अशी रुपे आहेत ते मला माहित नाहि पण त्या शक्तीवर माझा विश्वास आहे.
ह्या शक्तीला / देवाला कर्मकांडाच्या बंधनात अडकवले माणसाने.
कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.
अदिती म्हणते :
जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही.
किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. अनेक आस्तिक मित्र-मैत्रिणीही जिवलग आहेत. पण माझ्यावर देवाचं अस्तित्व स्वीकारण्याची सक्ती मला चालत नाही.
आपण मारे मोठमोठ्या किचकट संकल्पना, जसं देव, शक्ती, इ. मांडतो. मोठ्या संकल्पना अशासाठी म्हणाते कारण हे देव, शक्ती, निसर्ग हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही कळत. (जे कळत नाही आणि कुठल्याही प्रकारे दिसतही नाही त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?) कदाचित हे सगळं किचकट करण्याची गरजच नसेल, आणि उत्तर असेल हे विश्व कोणीही निर्माण केलं नाही. जी काही भौतिक स्थिती होती, त्यातून हे विश्व असंच निर्माण झालं (असतं). आणि उत्तर सोपंच होतं/असतं, फक्त ते सापडण्यासाठी, दिसण्यासाठी, मान्य करण्यासाठी कोरी पाटी असावी.
माझ्यासाठी देव ही काही (बर्याचशा?) लोकांच्या डोक्यातली एक संकल्पना आहे. जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही.
सूहासशेठ म्हणतात :
आमच्या साठी दोन्ही सारखेच.
नास्तिक म्हणतो देव नाही ..सोडुन देतो..
आस्तिक म्हणतो देव आहे .मान्य करतो.सोडुन देतो...
देव आहे की नाही हे कोणी शोधत नाही...का ? का ? सा॑गा ना...लई जिकीरीच काम ना ??
कुठ आता तपश्चर्येला बसणार...
तात्या म्हणतात :
श्रद्धा असणे महत्वाचे ...
धमालशेठ जरा वेगळे म्हणणे मांडतात :
माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्यांना एक जाहीर आव्हान करतो,
असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात?
================================================
बाकी सविस्तर आपण वर दिलेल्या लिंकवर पाहु शकता ...
मंडळी, चर्चा उत्तम आणि बहुतेक मुद्देसुद चालु आहे, असेच चालु राहुद्यात. अजुन अनेक जणांना त्यांची मते मांडायची आहेत म्हणुन हा दुसर्या भागाचा अट्टाहास ...
एक निवेदन :
चर्चा करताना कॄपया वैयक्तीक विधाने, चिखलफेक, अक्कल वगैरे काढणे, नावे ठेवणे, टोमणे मारणे वगैरे जमले तर टाळा. एक तर त्याने चर्चेत "कन्ट्रस्क्टिव्ह" अशी भर पडत नाही पण उलट चर्चेचा तोल जातो, संपादकांना हातचे बाजुला ठेऊन हे सांभाळत बसावे लागते. तेव्हा कॄपया हे सिरीयसली घ्यावे अशी माझी आग्रहाची विनंती ...
धन्यवाद ..!!!
प्रतिक्रिया
1 Jul 2009 - 6:19 pm | श्रावण मोडक
हा प्रतिसाद तिकडे टाकला आणि तेवढ्यात हा धागा निघाला. म्हणून येथे पुन्हा देतोय.
बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्यांना एक जाहीर आव्हान करतो,
असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात?
आव्हान देताहात हे खरं, पण त्याची गरजच नाही. डॉन यांचा लेख, मेघना, मी किंवा भोचक यांची प्रतिक्रिया आणि नंतर त्यावर त्यांना पुष्टी देणारे प्रतिसाद यावरून ही चर्चा झाली आहे. एक गोष्ट पाहताहात का, या सगळ्यात प्रत्येकाने स्वतःचे विश्लेषण केले आहे. ते व्यक्तीगत विश्लेषण आहे. सश्रद्धांच्या संदर्भात केलेले आत्मविश्लेषण आहे. स्वतःला तपासण्याची ती कृती आहे. येथे हे सारे करताना या मंडळींसाठी सश्रद्धांमध्ये केवळ हिंदूच आहेत असे तुम्ही गृहीत धरता आहात, कारण त्यांनी लिहिताना त्यासंदर्भातील दाखले देत लिहिले आहे. पण तुम्ही हे विसरू नका, की त्यात केलेले भाष्य हे न पटणाऱ्या, तर्काच्या कसोटीला न उतरणाऱ्या गोष्टींवर (ही धारणा त्या-त्या लेखकाची आहे) आहे. आणि ही मंडळी त्या अर्थाने धर्म मानतच नसल्याने, पण त्यांची टीका धर्म (विशिष्ट धर्म नव्हे) ही संदर्भचौकट घेऊन येणाऱ्या गोष्टींवरच असल्याने, ती इतर धर्मांतील अशा गोष्टींना लागू होतेच. आम्ही अधार्मिक ठरतो ना ते सगळ्या धर्मांच्या लेखी. इस्लाम, ख्रिश्चन किंवा अन्य कोणताही. अगदी बौद्धांच्या लेखीही ठरूच.
आम्ही आमच्यावरच टीका केली ती तुम्ही अशी लावून घेऊ नका. आव्हानाच्या भाषेपेक्षा सरळसोट प्रश्न जरूर करा. ही तात्कालीक प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केलीतच कशी हे समजेनासे झाले आहे. :)
आता माझ्यापुरते बोलायचे तर...
ख्रिश्चन, इस्लाम, (तुम्ही म्हणता म्हणून) हिंदू (मी म्हणेन वैदिक धर्म), बौद्ध, जैन (इत्यादी, कुठला राहिला असल्यास त्यावरून पकडाल तुम्ही) या सगळ्या धर्मांमध्ये तर्कावर न उतरणाऱ्या, माणसाने आज जिथंपर्यंतची प्रगती साध्य केली आहे त्या प्रगतीतून आलेल्या अनुभवांती ज्ञानाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या गोष्टी आहेत. त्या त्याज्य आहेत. हे सगळे धर्म त्या - त्या रुढी-परंपरांपुरते भंपक आहेत.
विज्ञानाच्या अनुषंगाने मानवी बुद्धीच्या सध्याच्या क्षमतेतदेखील या विश्वाच्या काही रहस्यांची उत्तरे मिळत नाहीतच. त्यामुळे ती विज्ञानाची मर्यादा आहेच. विज्ञान हेही त्या अर्थाने धर्मासारखेच मर्यादित आहे. दोघांच्या मर्यादांचा आवाका वेगळा. पहिल्याने दुसऱ्याला, दुसऱ्याने पहिल्याला पवित्रेबाज आव्हान देण्यात अर्थ नाही. कारण अशा वेळी त्यांच्या-त्यांच्या बौद्धीक क्षमतांच्या पलीकडे असणारे प्रश्न सामान्य माणसाकडून आले की त्यांची पंचाईत होते. हे ध्यानी घ्या की असे प्रश्न तज्ज्ञांपेक्षा सामान्य माणसालाच अधिक पडतात. त्याच्याकडचा तो एरवी रेअर असलेला कॉमन सेन्स अशा वेळी पूर्ण जागा असतो. अशा प्रश्नांपुढे आपला विचार तर्काच्या कसोटीवर उतरवण्यात हे दोन्ही वादी कमीच पडतात. मग त्यांचे-त्यांचे क्षेत्र पार झूटच आहे असा भ्रम पसरण्यास वेळ लागत नाही.
आणि खरं सांगायचं तर या ज्या मर्यादा आहेत ना, धर्म किंवा विज्ञानाच्या नव्हेतच. त्या आहेत माणसाच्या मर्यादा. कारण धर्म असो वा विज्ञान, हे दोन्ही माणसाच्याच बुद्धीतून, कल्पनेतून जन्माला आले आहेत. त्याच्या बुद्धीच्या मर्यादांची चौकट त्या संकल्पनाला लागलेली आहेच. माणूसच ती आतून ढुशा मारून विस्तारत असतो. ही चर्चा किंवा अशा इतर चर्चा म्हणजेच या ढुशा आहेत. विचारविश्वाचीही उत्क्रांती होत असते. त्या उत्क्रांतीमध्ये या ढुशा देण्याच्या प्रक्रिया होतातच.
विठ्ठल, माणसाचा माणसाला नमस्कार वगैरे उल्लेख वर आले आहेत. एक गोष्ट मांडतो - सच्चा वारकरी जो असतो ना, तो एकादशीच्या दिवशी गाभाऱ्यातील विठ्ठलाचे दर्शन घेत नाही, तो त्या दिवशी खरं तर मंदिरात जातच नाही. मंदिराबाहेर राहून तो कळसाकडे पाहून नमस्कार करतो. त्या दिवशी विठ्ठलच वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी कळसावर आलेला असतो, असे मानले जाते. पुरेशी बोलकी आहे ही गोष्ट श्रद्धा आणि अश्रद्धा, देव असणे आणि देव नसणे आणि धर्म व अधर्म यासंदर्भात भाष्य करण्यासाठी. त्या वारकऱ्याची ही श्रद्धा आहे, विठ्ठल माझे दर्शन घेतोय, मी त्याचे घेतोय. कारण हा विठ्ठल लोकांच्या मनात आहे. तो त्या मूर्तीत नाही. मूर्ती ही केवळ प्रतिक आहे. त्या प्रतिकापाशी वारकरी लीन होतो हे ठीक. पण त्याचवेळी "कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी," हेदेखील आहेच. चोखा त्या पायरीशी गेला हे विसरता येत नाही. हे सारं व्यामिश्र आहे. त्याची आपल्या नेहमीच्या पद्धतीनं कृष्ण-धवल उत्तरं निघत नसतात. आजच्या बुद्धीची ती मर्यादा आहे.
आईनस्टाईनच ना, म्हणाला होता की, माणसाची बुद्धी ही केव्हाही त्याच्यापुढे असणाऱ्या समस्या सोडवण्याच्या गरजेपेक्षा थोडी मागेच असते. किंवा माणसापुढच्या समस्या या नेहमी त्या घडीच्या त्याच्या बुद्धीक्षमतेच्या थोड्या पुढेच असतात. हे विसरून कसं चालेल?
तारतम्य (म्हणजेच विवेक म्हणूया) ही माणसाची मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेच्या जोरावरच तो इतर जीवांपेक्षा वेगळा ठरत गेला आहे. तोच हरपला की काय होते त्याचे दाखले या चर्चेत काही प्रतिसादांतून दिसतात.
1 Jul 2009 - 8:34 pm | प्रकाश घाटपांडे
या विषयावर मी आणी माझा देव हे वि.शं चौगुले यांनी संपादित केलेले पुस्तक आठवते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
1 Jul 2009 - 6:29 pm | सहज
संकलन चांगले केले आहे. आवडले. "वाचनखुण साठवल्यागेलेली आहे."
संस्कार = आहेत, बर्यापैकी केले आहेत वडिलधार्यांनी, शिक्षकांनी, आयुष्यात आलेल्या बर्याच लहानथोरांनी इ इ.
धर्म = आहे की कागदोपत्री. पण जुन्या ग्रंथात सांगीतल्याप्रमाणे कर्मकांडे न करता जगायची संधी, जीवनशैली सध्या उपलब्ध आहे व त्याचा फायदा घेतो आहे.
वगैरे = छोटा डॉन यांचा लेख प्रातिनिधीक आहे असेच वाटते. पुजाअर्जा, गीतापठण, संस्कारवर्ग, सांस्कृतीक वर्ग, वेळोवेळच्या पुजा यात आपले बर्याच जणांचे बालपण गेले पण आजी आजोबा, आई बाबा यांनी देवघरव देवकार्यात जितका रस घेतला / श्रम केले तितके आमच्या पिढीने केले नाही किंबहुना आग्रह खूप झाला तर वादंग झाले आहेत.
आता आपल्या मुलांना त्यांची संस्कृती, हिंदु संस्कार याची ओळख तरी असावी असे मनापासुन वाटते त्यामुळे त्यातल्या त्यात देवाचे करतो. गणपतीउत्सव मात्र लहानपणापासुन आवडायचा याचे कारण मला वाटते की धार्मीक कारणांपेक्षा मुलांना बरेच काही करायला मिळायचे, समारंभ आयोजन, आरास, सगळ्यांनी एकत्र जमणे, एकामागे एक आरत्या म्हणणे, प्रसाद, विविधगुणदर्शन कार्यक्रम इ इ म्हणूनच त्याची गोडी लागली असावी. हा आनंद पुढच्या पिढीला मिळावा ही मनोमन इच्छा. आपले देव, ग्रंथ, भाषा ही माहीती असावी म्हणून मग पुरक गोष्टी जसे दिवाळी, दसरा, गुढीपाढवा इ इ. बाकी सध्या सार्वजनीक गणेशोत्सवाला, नवरात्रीला हे धंदेवाईक स्वरुप आले आहे ते अजिबात आवडत नाही आहे.
माझ्यामते पूर्ण नास्तीक होणे देखील प्रत्येकाला जमेलच असे नाही. अवघड गोष्ट आहे. हे जरुर मान्य करीन की आधीच्या पिढींनी जितके कर्मकांड केले तितके माझ्याच्याने जमणार नाही. एक काळ होता जेव्हा अनास्था व आळस दोन्ही गोष्टींमुळे अनेक धार्मीक गोष्टींकडे संपुर्ण दुर्लक्ष केले. तरी घरचे देव, त्यांची पुजा, दिवसातुन एक दोन वेळा उदबत्ती लावणे, मनोभावे नमस्कार हे सुटणार नाही जरी नवरात्र, गौरी बसवणे, अजुन काही काही गोष्टी ज्या श्रावणात, पितृपंधरवड्यात इ इ आई करायची त्या आमच्याने होत नाहीत. मनाची सोय म्हणून मी आई जे सण/विधी पाळायची त्या महत्वाच्या प्रसंगांना मी वेगवेगळ्या संस्थांना दान करतो जे मला पटते व सोयीस्कर वाटते.
अजुनही देवळात स्व:ताहून नियमीत जात नसलो तरी देवळासमोरुन जाताना हात जरी जोडले गेले नाही तरी क्षणभर डोळे बंद करुन नमस्कार होतो.
माझ्यासाठी देवाला नमस्कार करणे हे आयुष्यात मिळालेल्या सुखासाठी केवळ मी कारणीभूत नाही इतर इतर अनेक व्यक्ती, प्रकृती इत्यादी इत्यादी आहेत व त्या सर्वांना देव समजुन नतमस्तक होतो.
वगैरे = किती बरे आहे ना आपण २१व्या शतकात, शहरात रहातो. फाट्यावर मारायचे तंत्र अवगत करुन आहोत. मानवाधिकार, व्यक्तिस्वातंत्र, वगैरे वगैरे असलेल्या पुरोगामी लोकशाही समाजात रहातो.
आज आस्तीक-नास्तीक-निधर्मी असणे किंवा नसणे काही फारसा इश्यु नाही आहे असा आयुष्याचा एक कोपरा मिळाला आहे.
असो ह्या सनातन विवादात न पडण्याचे स्वातंत्र घेतो आहे त्यामुळे हेच म्हणतो की एकंदरीत मला देव पावला आहे.
:-)
1 Jul 2009 - 11:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही तक्रार किती जुनी आहे? याच संदर्भात एका ६५ वर्षांच्या सिनीयर कलीगशी बोलले, तर त्याचं म्हणणं पडलं की हीच तक्रार, अशीच आमच्या पिढीबद्दलही केली जायचीच.
असो. श्रावण मोडकांचा वरचा प्रतिसादही आवडला. ज्या धर्माबद्दल मला काहीच माहित नाही त्याबद्दल मी (मेघना, डॉनसुद्धा) काय बोलणार? हिंदू घरात, हिंदू शेजार्या-पाजार्यांमधे जन्माला आलो म्हणून हिंदू धर्माबद्दल माहिती आहे. मुद्दाम जाऊन वाचन करावं एवढं काही धर्म, थिऑसॉफी इ. विषयात गती नाही म्हणून इतर धर्मांबद्दल माहिती नाही. त्यातून इतर धर्मांचा अभ्यास केला, त्यांचे उणे-दुणे समजले आणि सांगितले म्हणून हिंदूमधली सती, बालविवाह इ. प्रथा थोडीच चांगल्या ठरतात? वाईट आहे त्याला वाईट म्हटलं आणि पुढे गेलं. पाहुणे आल्यावर घरातला पसारा कार्पेटखाली आणि कपाटामागे झाकला तरी पसारा पसाराच रहाणार ना?
धमालराव, तुम्ही तस्लिमाबद्दल बोलता. पण तिलाही भारत सोडून जाण्याची वेळ आलीच ना? तेव्हा कुठे कोणा सहिष्णू हिंदूंनी ब्र काढला का?
2 Jul 2009 - 12:24 am | llपुण्याचे पेशवेll
कदाचित अस्थायी असा प्रतिसाद पण बालविवाहासंबंधी.
आमच्या ओळखीच्या एका काकांकडे एक कामवाली बाई येत असे. रितीप्रमाणे घरच्या वापरलेल्या साड्या, मुलांचे कपडे जुने झाले की कामवालीला दिले जात. त्या कामवालीची मुलगी अभ्यासात हुषार होती. म्हणून ४थीची स्कॉलरशीप, ७वी ची स्कॉलरशीप इ. परिक्षा या काकांच्या आग्रहामुळे आणि आर्थिक मदतीमुळे त्या मुलीने दिल्या. त्यात तिला उत्तम यशही मिळाले. पण या मुलीच्या आईने मात्र मुलगी १०वीची परिक्षा पास झाल्याबरोबर म्हणजे (१५-१६ व्या वर्षी) हिचे लग्न करून टाकले. आमच्या काकानी तिला विचारले "लग्न कशाला लावून टाकलेस मुलीचे, मुलगी पुढे शिकली असती चांगली, हुशार आहे मुलगी." त्यावर त्यामुलीच्या आईने उत्तर दिले "मुलगी वयात आलेली आहे, अंगापिंडाने भरलेली आहे, आणि आमच्या झोपडपट्टीत याच कारणामुळे ४ नजरा वळून वळून बघत असतात तिच्याकडे. आता त्यांच्यापैकी कोणी काही केलं असतं जबरदस्तीने तिला तर मी काय करणार होते. पोलिसानी काय आमच्या कडून पैसे काढले असते फक्त आणि खटला वर्षानुवर्ष चालू राहीला असता, तुम्हाला नाही माहीत पोलिस कसे असतात ते. आणि त्यात आयुष्य बरबाद झाले असते ते फक्त माझ्या मुलीचे. तिला चांगला काम करणार नवरामुलगा मिळाला म्हणून लग्न लावून टाकले तिचे. आता तिच्याकडे कोणी तसे पाहणार नाही. आणि पाहीले तर तिचा नवरा ते बघून घेईल."
मी तर अजूनही त्या मुलीच्या आईने चूक केले का बरोबर केले हे ठरवू शकलो नाहीये.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
2 Jul 2009 - 12:34 am | चतुरंग
चूक आणि बरोबर हे बर्याचदा सापेक्ष असतं!
(सापेक्ष)चतुरंग
2 Jul 2009 - 8:30 am | नितिन थत्ते
कामवालीचे जे उदाहरण दिले आहे त्या उदाहरणात 'केवळ कामवाली आणि ती मुलगी यांच्या वैयक्तिक दृष्टीने' तिचे लवकर लग्न करून देणे कदाचित योग्य म्हणता येईल. सामाजिक दृष्ट्या ते अयोग्यच आहे. त्या ४ नजरांचा बंदोबस्त करणे हे समाजाचे (म्हणजे आपले सर्वांचे.... पोलीस आपल्यापेक्षा वेगळी एन्टिटी आहे हा विचार काढून टाका) काम आहे. ते काम करता येत नाही म्हणून लहान वयात लग्न करून देणे आणि ते धर्म म्हणून 'कोडिफाय' करणे हे चूकच आहे.
या चर्चेत बालविवाहादि रूढी विशिष्ट कालात योग्य होत्या असे विधान आले होते म्हणून त्यावर टीका झाली होती.
(अवांतरः त्या मुलीवर जबरदस्ती झाल्यावर त्या मुलीला समाज दोष देत नाही आणि तिच्याशी सामान्य व्यवहार करतो अशी परिस्थिती समाजात असती तर त्या कामवालीचा विचार वेगळा असता काय? तिला 'वापरलेली' असे समजून लग्नाच्या व्यवहारात ती 'नकोशी' समजली जाणे या दृष्टीकोनाचाही या लवकर लग्न करून देण्यामागे मोठा हात आहे.)
पेशवे अस्थायी प्रतिसाद म्हणतायत म्हणजे मत दुरुस्त करून घेण्याचा पॉझिटिव्ह विचार दिसतो. मी त्यांना प्रश्न बदलून घेण्याचा सल्ला देईन.
समाजाने त्या आईवर ही वेळ आणली ती चूक की बरोबर हा प्रश्न विचारायला सांगेन.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
2 Jul 2009 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण अवांतराशी असहमत. स्त्रिला, (किंवा कोणत्याही गटाला, एखाद्या माणसाला) काही अतिशय महत्त्वाच्या निर्णयांमधे नकाराधिकार नसणे हे असंस्कृतपणाचंच लक्षण आहे.
9 Jan 2012 - 2:23 pm | सुहास..
चर्चेला नव्याने उत आल्याने वर काढीत आहे
2 Jul 2009 - 1:30 am | विकास
>>>धमालराव, तुम्ही तस्लिमाबद्दल बोलता. पण तिलाही भारत सोडून जाण्याची वेळ आलीच ना? तेव्हा कुठे कोणा सहिष्णू हिंदूंनी ब्र काढला का?<<<
धमालरावांच्या प्रतिसादाबद्द्ल मला काय वाटले ते मी माझ्या प्रतिसादात लिहीले आहेच. फक्त तस्लीमा नसरीनच्या बाबतीत अनेक बातम्या मिळतील ज्यात आपल्या प्रश्नाला उत्तर आहे. यातील हे एक उदाहरणार्थ देत आहे. अर्थात यात भाजपाने तस्लीमाच्या बाजूने आवाज उठवलेला आहे. आता भाजपा म्हणजे "सहिष्णू हिंदू" का असे विचारलेत तर तो वेगळा मुद्दा होईल ;)
1 Jul 2009 - 9:30 pm | विकास
मूळ चर्चा जितकी चांगली चालली आहे तितकेच डॉन साहेबांनी त्याचे केलेले संकलन पण चांगले आहे. (असे वैचारीक लिहीणे, त्याचे संकलन करणे वगैरे...आता डॉनसाहेबांनी स्वतःला छोटा डॉन म्हणण्या ऐवजी नुसतेच डॉन अथवा मोठा डॉन म्हणावे. ;) ) बाकी मूळ "लेख" (जनातलं मनातलं) होता मात्र त्यावर आलेल्या प्रतिक्रीया पहाता त्याचा भाग दोन हा "काथ्याकूटा"त टाकणे स्वाभावीक वाटते!
वास्तवीक आता बरेच लिहून झालेले असल्याने लिहीण्यासारखे जास्त नाही असे वाटते. (तरी देखील.. :-) )
मथळ्यातील संस्कार, धर्म, श्रद्धा हे जे काही शब्द आहेत ते एक त्याचा राजकारणी उपयोग सोडल्यास जनसामान्यात जास्त वापरले जातात ते न मानणार्यांकडून. म्हणजे असे, जो संस्कारीत. श्रद्धावान, धार्मिक वगैरे असेल ("संस्कृती रक्षक" नाही कारण मग अर्थ वेगळा होतो), त्याला असले प्रश्न पडत नाहीत. तो आपले त्याच्या श्रद्धासंस्कारांप्रमाणे सहजच "सेकंड नेचर" म्हणून वागतो. त्याबद्दल प्रश्न विचारत नाही. उ.दा. मी बर्याचदा धर्म वगैरे न मानणारे भारतीय पाहीले आहेत त्याबद्दल ते अनेक उलटसुलट प्रश्न विचारतील जे लॉजिक म्हणून नक्कीच बरोबर असतात. पण अशा व्यक्तींचा जर इतर कुणाला अथवा एखाद्या पुस्तकास चुकून पाय लागला, तर आपोआप त्याला हात पुढे करून मग छातीला लावत एक प्रकारचा नमस्कार केला जातो. असे का होते? त्यात काय लॉजिक आहे अथवा देव आहे? पण त्यात संस्कार नक्की आहेत. एकदा का ते संस्कार पाळायचे "सेकंड नेचर" असले की मग त्यात लॉजिक विचारले जात नाही, वाद घातले जात नाहीत अथवा ते पाळताना (चांगल्या अर्थाने) लाजपण वाटत नाही.
मग इतका उहापोह सतत का होत असतो?
साधे जालावरील तीन संस्थळे पाहीलीत (मिपा, उपक्रम, मनोगत) तरी येथे अनेक चर्चा या संदर्भात झालेल्या आढळतील - झाल्याही बहु, होतील ही बहू... अशी अवस्था आहे. त्यात आश्चर्य नाही की गैर ही नाही. मला वाटते धर्म, श्रद्धा, संस्कृती, संस्कार वगैरेंवर टिका करणार्यांमधे वेगवेगळे प्रकार/विचार असतातः
अर्थात मला छोटा डॉनचे लिखाण आणि त्यातील बहुतांशी प्रतिक्रीया या पहील्या दोन प्रकारात बसणार्या वाटल्या. कुणाला दुखावणार्या वाटल्या नाही. धमाल शेठना वाटले तसे मला हा लेख हिंदू धर्म/धर्मियांना नावे ठेवणारा वगैरे वाटला नाही. (वाटला असता तर खात्री बाळगावी आधीच्या लेखात पहील्या दहात माझे बारा प्रतिसाद असते ;) ). तरी देखील मी धमालशेठना अपेक्षित असलेल्या सर्वधर्मांवरूनच थोडेसे जे वाटते ते लिहीतो:
जगातील प्रत्येक धर्मासंदर्भात, त्यांच्यातील धर्ममार्तंडांसंदर्भात रुढींबद्दल तसेच त्याच्या इतिहासाबद्दल भरपूर चांगले आणि वाईट लिहीता येईल. पण मूळ धर्म॑ आचरणे म्हणजे त्यातील व्रतवैकल्ये आणि संस्कारासंदर्भात चर्चा असल्याने त्याच्या संदर्भात विचार केल्यास काय जाणवते की जेंव्हा केंव्हा त्या प्रथा चालू झाल्या तेंव्हा त्याला समाजाला एकत्र ठेवणे, काही नैतिक बंधने (आता त्यातील आत्ता कोणची बरोबर आणि चूक हा मुद्दा येथे गैरलागू) आणणे, स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवायला आपसुक शिकणे वगैरे कारणे त्यात होती. म्हणूनच विचार केल्यास काय दिसते? तर ज्यांना आपण (भोंदू नसलेले पण) पुराणमतवादी म्हणू - मग ते कुठल्याही धर्मातील असोत - त्यांचे एकंदरीत वैयक्तिक आयुष्यात कुंटूंबव्यवस्थेवर जास्त भर होता. त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेत असताना एकत्र राहत असताना काही अडचणीपण पण अडचणी न वागता सुखात रहाता येत होते.
अर्थात मग पुण्याच्या पेशव्यांनी म्हणल्याप्रमाणे वानराचा नर झाला आणि जास्तच स्वतंत्र होऊ लागला. पुढे नराचा नारायण होण्याऐवजी नरात वानरच जास्त वास्तव्य करू लागला... त्यात विज्ञानामुळे जशी चांगली भर घातली गेली तशीच अधुनिकता होत होत कुटूंबव्यवस्था विरळ होऊ लागली, तथाकथीत स्वातंत्र्य वाढले. ज्या व्यक्तीस्वातंत्र्यापुढे आपण स्वतःच्या माणसांसाठीपण तडजोडी करणे विसरू लागलो तेथे व्रतवैकल्याचा, धर्म, संस्कारांचा काय संबंध?
आता थोडे संस्कृतीबद्दलः
मेघनांनी लिहीले आहे: "हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा?"
हा प्रतिसाद मला नक्कीच "गर्व से कहो.." मधून आला असे वाटते. मला "गर्वसे कहो" चा काही डिफेन्स करायचा नाही, कारण त्यातील ("गर्वसे कहो" मधील) "टोन" हा प्रतिक्रीयात्मक होता/आहे. माझा धर्म आणि माझे हिंदूपण हे इतरांना काय वाटते त्याला प्रतिक्रीया म्हणून नाही. मात्र मेघनांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात संदर्भात, ("अभिमान कसला" संदर्भात) लिहीत असताना मला काय वाटते आणि मी काय व्यवहारात पाळतो ते सांगणे इतकाच उद्देश आहे, तेच बरोबर आहे हे "पटवणे" नक्कीच नाही:
"अभिमान कसला" याचे उत्तर आपण शाळेत म्हणत असलेल्या प्रतिज्ञेत आहे:
माझ्या समजशक्तीप्रमाणे ही समृद्ध आणि विविधतेने नटलेली परंपरा म्हणजे हिंदू परंपरा आहे. कदाचीत तुम्हाला वाटेल की असे म्हणत असताना मी इतर धर्मियांना बाजूस सारले आहे. तर तसा उद्देश नाही. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणा अथवा नका म्हणू पण जग आपल्याकडे बघताना भारतीय आणि हिंदू संस्कृतीचे म्हणूनच बघतात... जे सद्यकाळात जन्माने हिंदू आहेत त्यांचे कशाला पण आज पाकीस्तानी अगदी मुस्लीम धर्मिय असून देखील इतर मुस्लीम राष्ट्रे त्यांना त्यांच्यातले थोडीच मानतात? केरळमधील ख्रिश्चन (आणि तीच अवस्था इतर विकसन्शील/अविकसीत देशातून आलेल्या आणि कृष्णवर्णीयांचीपण) धर्मियांची अमेरिकेत वेगळी चर्चेस असतात...सौदी अरेबीयात राहणार्या भारतीय मुसलमानांना कसे पाहीले जाते? इतकेच कशाला एकदा मी संयुक्त राष्ट्रसंघात एका कॉन्फरन्सनिमित्ताने हजर होतो. त्यात एका युरोपमधील बाईचे पाण्यावरून सादरीकरण चालू होते. त्यात भारतीयांचा ती अगदी इतके औपचारील सादरीकरण असूनदेखील उल्लेख ती हिंदू म्हणूनच करत होती. तीच अवस्था (कुठल्याही धर्माच्या) अनिवासी भारतीयांच्या पुढच्या पिढ्यांची त्या मुलांना "भारतीय" म्हणूनच बघितले जाते. फिजीमधे तर अनेक पिढ्या रहाणार्या भारतीयांवर हल्ले झाले ते, ते केवळ भारतीय म्हणूनच झाले...तसे बघण्यात केवळ त्वचेचा रंग नसतो तर आपले वेगळे संस्कार/संस्कृती हे देखील कारण असते...
थोडक्यात विषय न वाढवता इतकेच म्हणावेसे वाटते की तत्वज्ञान, आचार-विचार, आहार-विहार, संस्कृती वगैरे ज्याची कशाची पाळेमुळे भारतीय मातीत रुजली आहेत मग ती जगभर कुठे का असेनात, ते माझ्या लेखी हिंदूच आहे. त्यातील प्रत्येक गोष्ट मला पटेलच असे नाही. किंबहून न पटणेच जास्त असू शकेल आणि तसे म्हणायला (की मला पटत नाही) कुणी अडवू शकत नाही कारण तो भाग पण याच हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच विविधता ही केवळ खाण्यापिण्यातच नाही तर एकच अंतिम सत्य सांगताना विविध तत्वज्ञानात पण दिसून येते.
अभिमान हा दुसर्याचा हेवा, द्वेष वगैरे न करता बाळगता येतो - तो (अभिमान) जसा आपल्या संस्कृतीतील वाईटावर टिका करत त्यात बदल घडवून आणणार्या वैचारीक स्वातंतत्र्यावर असतो तसाच तो आपल्या संस्कृतीत जे काही चांगले आहे ते जगात पोचवत असताना पण असतो. नव्हे, तसा तो असावाच. कारण त्यातील जेंव्हा पहीलाच भाग (वैचारीक स्वातंत्र्याचा अभिमानाने उपयोग) असतो तेंव्हा तो अभिमान नसतो, असला तरी वृथा असतो पण वास्तवीक तो जास्त आंधळा गर्व अथवा अहंकारच असतो.
शेवटी या संदर्भात विवेकानंदांचेच उदाहरण आठवते... डोळस बुद्धीवादी असल्याने पाळेमुळे खणून अभ्यास करून ज्ञानप्राप्ती करून घेतली. आणि एकदाचे तत्वज्ञान पटल्यावर अमेरिकेत जाऊन त्याबद्दल अभिमानाने बोलून प्रतिनिधित्व केलेच पण इतरांना तुच्छ लेखून नाही तर "बंधु-भगिनिंनो" असे संबोधून.
असो.
1 Jul 2009 - 10:30 pm | ऍडीजोशी (not verified)
लेख आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रीया लेखकांच्या दॄष्टीकोनातून बरोबर असाव्यात.
हे सगळं वाचल्यानंतर एकच गोष्ट सांगाविशी वाटते कर्मकांडाच्या फोलपणाचा संबंध देवाच्या अस्तीत्वाशी लाऊ नका.
1 Jul 2009 - 10:44 pm | नितिन थत्ते
अॅडी जोशींशी सहमत.
कर्मकांडे आणि देव या वेगळ्या गोष्टी आहेत.
आमचा दोन्हीवर विश्वास नाही. पहिले लबाड माणसांच्या हातातले साधन आहे.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
1 Jul 2009 - 11:03 pm | छोटा डॉन
>>कर्मकांडे आणि देव या वेगळ्या गोष्टी आहेत.
असे फक्त म्हणतात.
मात्र बहुतांशी जनता आणि आम्हीसुद्धा "कर्मकांडे" ही "देव देव" करताना पुरक अशी श्रद्धायुक्त उपासनाप्रकारात वापरतो.
देवाची स्तुती करताना, त्याची पुजा करताना, तो प्रसन्न व्हावा व आपल्यावर कॄपा दॄष्टी ठेवावी ह्या हेतुसाठी बरीच "कर्मकांडे" आहेत असे आमचे (वैयक्तीक) मत आहे.
सो, आम्ही त्या "संपुर्ण" वेगळ्या गोष्टी मानत नाहीत ...
>>आमचा दोन्हीवर विश्वास नाही.
०.५+,
आमचा दोन्ही गोष्टींवर लिमीटेड आणि डोळस विश्वास आहे.
>>पहिले लबाड माणसांच्या हातातले साधन आहे.
ह्या "जनरलाईझ्ड विधानाशी" असहमत आहे.
"काही काही " कर्मकांडे ही "काही काही" अशा ठराविक लबाड माणसांच्या हातातली साधने आहेत असे आमचे मत आहे. अर्थात तुमच्या मताचा आदर आहेच.
मात्र आम्ही अॅड केलेले जास्तीचे शब्द जर वगळले तर प्रामाणीकपणे श्रद्धा ठेऊन कर्मकांडे ( आम्ही वर काही ओळीत व्याख्या केलेली ) करणार्या बर्याच श्रद्धाळु जनांचा अपमान होतो असे आमचे (पुन्हा एकदा वैयक्तीकच ) मत आहे ...
बाकी उरलेली लोकांचे श्रद्धा आहे हो , अर्थात तुम्ही लबाडी म्हणालात म्हणुन हे विवेचन ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
2 Jul 2009 - 8:36 am | नितिन थत्ते
तुमच्या प्रतिसादाने माझ्या लिहिण्यातील त्रुटी लक्षात आली.
सुधारित वाक्य 'कर्मकांडावर विश्वास' आणि 'देवावर विश्वास' या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
हे अशासाठी की धर्मविषयक कर्मकांडावर विश्वास असलेल्याचा देवावर विश्वास नाही असे होत नाही (वाढदिवसाला केक कापणे हेही एक कर्मकांडच आहे. पण अजून ते धार्मिक बनलेले नाही.). पण देवावर विश्वास असणार्याचा कर्मकांडावर विश्वास नाही अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील.
कुठलेही कर्मकांड हे लबाड (पाहिजे तर स्वार्थी म्हणा) लोकांच्या हातातील साधन असते. अगदी व्हॅलेंटाइन डे साजरा करणे हे आधुनिक कर्मकांड म्हटले तरी तेही त्या हाइपच्या आधारे आपल्या उत्पादनांचा (ग्रीटिंग कार्डस, परफ्यूम, गुलाबाची फुले वगैरे ) खप वाढवू पाहणार्या लोकांच्या हातातले साधन आहे.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
2 Jul 2009 - 12:08 am | ऍडीजोशी (not verified)
मुदद्द्यापासून भरकटतोयस. मी कर्मकांडाचं डेफिनीशन दिलेलं नाहिये. तर पूजा अर्चा, सणवार, रूढी, प्रथा इत्यादींच्या फोलपणाचा संबंध देवाच्या अस्तीत्वाशी लाऊ नका असं सांगितलंय. कारण एखादी परंपरागत गोष्ट चुकीची असल्यास 'असा कसा तुमचा देव' असं म्हणून लोक मोकळे होतात. पण देवाने मला बळी द्या अथवा अमुकच फूल द्या असं कुठेही सांगितलेलं नाहिये. हे मानवनिर्मीत आहे. त्यामुळे तुमची कर्मकांड खोटी म्हणून देवही खोटा (अस्तीत्व नसलेला) असा बादरायण संबंध जोडू नये अशी विनंती केली आहे.
समान उदाहरण - सरकारी नोकर पैसे खातात म्हणून सरकारच नको असं आपण म्हणू का?
2 Jul 2009 - 8:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
देव आणि धर्म (+कर्मकांड) या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मलाही पटतं.
विकासराव, भाजपचा तस्लिमाबद्दलचा मुद्दा मला माहित नव्हता. दुरूस्तीबद्दल धन्यवाद. अर्थात भाजपाला सहिष्णू म्हणावं का नाही याबद्दल ही चर्चा नाही. :-)
2 Jul 2009 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>देव आणि धर्म (+कर्मकांड) या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मलाही पटतं.
धर्माचा उल्लेख ब-याच संस्कृत लेखनात 'धर्मन्' असा दिसतो. धर्मन शब्दाचा अर्थ 'धर्मासंबधीचे नियम' किंवा 'धार्मिक विधी' असाही असावा. म्हणजे काय तर आचरणाचे काही नियम, तत्त्वे ,कर्तव्य. माणसाची काही कर्तव्य आणि त्याच्या काही जवाबदार्या अशा अर्थाने धर्माचा विचार असावा.
वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रम धर्म, नैमित्तिकधर्म, गुणधर्म, आणि सामान्य धर्म अशा सहा प्रक्राराच्या धर्माचा उल्लेख केला जातो. धर्माच्या विचारात तात्विक सिद्धांत, देवपूजा, पुनर्जन्म या सर्व गोष्टींचा समावेश होतो, असे वाटते....
धर्मात पुरुषार्थाची कल्पना आहे, धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष, मनुष्याचे अंतिम ध्येय मोक्ष मिळविणे आहे, आणि असा मोक्ष म्हणजे जीवाची बंधनातून मुक्ती करुन जीव आणि ईश्वर ह्यांचे ऐक्य साधणे. आणि असे कशाने करता येईल ते गुण धर्मात (नियम ) सांगितले असावे असे वाटते.
सारांश : देव आणि धर्म या वेगवेगळ्या गोष्टी नसाव्यात, त्यांचा एकमेकांशी संबध आहेच असे वाटते.
स्वगत : स्वत:ला मुर्ख म्हणवून घ्यावयाचे होते, म्हणून या चर्चेत सहभागी व्हावे वाटले. (बाण आला का ? )
-दिलीप बिरुटे
2 Jul 2009 - 8:20 pm | llपुण्याचे पेशवेll
बिरुटेसरांशी सहमत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
2 Jul 2009 - 10:24 pm | छोटा डॉन
>>सारांश : देव आणि धर्म या वेगवेगळ्या गोष्टी नसाव्यात, त्यांचा एकमेकांशी संबध आहेच असे वाटते.
+१, असेच म्हणतो.
इनफॅक्ट संस्कार आणि धर्म, धर्म आणि कर्मकांड, देव आणि कर्मकांड ह्या गोष्टीसुद्धा अगदीच वेगळ्या नसाव्यात असे माझे (वैयक्तीक) मत आहे.
थोडासा वेळ मिळाला की धर्म, संस्कार आणि कर्मकांडे ह्यांची ( माझ्या बुद्धीला पटेल अशी ) सांगड घालणारा विस्तृत प्रतिसाद लिहेन, आजच लिहायचा होता पण जमले नाही ...
तोवर चर्चा चालु द्यात, उत्तम चालु आहे, एवढ्या संयमीपणाने मुद्देसुदपणे चर्चा करत असलेल्या सर्व मिपाकरांचे मी इथे आभार मानु इच्छितो. एक मिपाकर ह्या नात्याने मला ह्याचा निश्चितच अभिमान आहे....
धन्यवाद ....!!!
------
(आनंदी ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
2 Jul 2009 - 8:35 pm | सूहास (not verified)
<<<देव आणि धर्म या वेगवेगळ्या गोष्टी नसाव्यात, त्यांचा एकमेकांशी संबध आहेच असे वाटते.>>>
देव : धर्माचे आचरण करुन नियमन घालुन देणारा..
धर्म : नियमन...
अवांतर : काल नाक खुपसले होते तेव्हढे बस झाले होते ना ..परत कडमडलास मान्यवरांमध्ये..
सुहास
3 Jul 2009 - 10:31 am | विजुभाऊ
प्रत्येक धर्माने आचरणावरच पाप आणि पुण्य हे ठरवले आहे.
समाजाने जी नैतीकता पाळायची त्या नियमाना कर्मकांड बनवले की ते धर्माधीष्ठीत होते.
धर्म हे त्या त्या काळानुरूप योग्य होते.
बहुतेक धर्म त्या अर्थाने आता कालबाह्य झाले आहेत. बहुतेक करून त्यात कर्मकांडांची फोलपटेच जास्त उरली आहेत.
देव ही एक शक्ती मानली गेली. त्या शक्तीचा धाक दाखवून तथाकथीत ज्ञानियानी सामान्य लोकाना आणि राजांना नाडवले आहे.
हातात बळ नसतानाही सत्ता हातात ठेवण्याचे धर्म हे एक मोठे साधन आहे.
1 Jul 2009 - 10:49 pm | विसोबा खेचर
हे काय? दुसरा धागा?
ओक्के!
चालू द्या..! आता हा धागा मात्र आम्ही हायजॅक करणार नाही! :)
आपला,
(भाग्यश्रीचा मित्र) तात्या.
1 Jul 2009 - 11:27 pm | संदीप चित्रे
असा विश्वास आहे. रोज पूजा करत नाही पण सकाळी घराबाहेर पडण्याआधी नमस्कार चुकवत नाही. बाकी जोपर्यंत मी कुणाला 'आस्तिक हो' सांगत नाही आणि कुणी मला 'नास्तिक हो' म्हणत नाही तोपर्यंत उत्तम आहे. 'जियो और जीने दो' ह्या सूत्रावर पूर्ण विश्वास आहे.
नॉन व्हेज खाणं आवडतं पण 'बळी' ह्या रूढीच्या विरूद्ध आहे. च्यायला खायचं तर सरळ खायचंय म्हणा की .. उगाच देव/धर्माचा मुलामा कशाला? तसंच 'अमक्या दिवशी खाऊ नये' वगैरे ह्यावरही विश्वास नाही. एक सवय म्हणून आठवड्यातला ठराविक वार पाळतो.
(अवांतरः सगळे प्रतिसाद वाचून (जवळ जवळ) खात्री झालीये की सगळ्यांना शाळेत निबंध लिहायला आवडायचे ! (ह. घ्या ! :)) मला स्वत:ला तरी खूप आवडायचं :)
2 Jul 2009 - 12:04 am | मृदुला
>जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर.
ख्रिश्चन धर्मातील जगाच्या उत्पत्तीविरुद्ध पर्यायाने बायबलच्या सत्यतेच्या विरुद्ध वाद गॅलिलिओच्या काळापासून सुरू आहे. जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स महर्षींनी यांनी मध्यंतरी नास्तिकांनी जाहीरपणे नास्तिकत्व दाखवावे, बायबलसारख्या पुस्तकांची खिल्ली उडवावी, एका अर्थाने मूलतत्ववादी (= वैचारिक दहशतवादी) व्हावे असे आव्हान केले होते. मला तर कायम असे वाटत असते, की जागतिक पातळीवर काय ती चर्चा सगळी ख्रिस्ती व मुस्लिम एव्हढे दोनच धर्म आहेत अशी होत असते. केवळ त्यांच्यावरच टीका होत असते. वैदिक / हिंदू, बौद्ध हे धर्म कुठेच चर्चेत नसतात.
भारतात हिंदू आहेत म्हणून त्यांच्यावर चर्चा होते. नाहीतर झाली नसती. इथे इंग्लंडात हिंदू धर्मावर, अनिष्ट प्रथांवर टीका करणारे कोणी भेटले नाही; पण ख्रिस्ती धर्मातल्या थोतांडांवर चर्चा नेहमीच होत असते.
>माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे
समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा जगातल्या सगळ्या भागात असाव्यात असे मला वाटते.
मला भारतीयत्वाविषयी अभिमान वाटत नाही; आपलेपणा वाटतो.
--
या एकाच चर्चाविषयात, देव, धर्म, परंपरा, संस्कार सगळेच मिसळले आहे. या गोष्टी रोजच्या आयुष्यातही अश्याच मिसळलेल्या असतात. त्यामुळे चर्चेला मजा येते आहे.
2 Jul 2009 - 12:19 am | ऍडीजोशी (not verified)
समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा जगातल्या सगळ्या भागात असाव्यात असे मला वाटते.
खरंय. पण आपल्या प्रतिज्ञेत समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा भारत सोडून जगात कुठेही म्हटलेलं नाहिये. तुमचा मुद्दा कळला नाही.
मला भारतीयत्वाविषयी अभिमान वाटत नाही; आपलेपणा वाटतो.
आपलेपणा भारतीयत्वाविषयी वाटतो की भारतात तुमचे जे आपले आहे त्या विषयी वाटतो हे समजले नाही. समजावून सांगितल्यास आनंद होईल.
2 Jul 2009 - 12:41 am | मृदुला
विकास यांच्या मूळ प्रतिसादात, अभिमान कसला तर समृद्ध परंपरांचा असे म्हटले आहे. मला याचा अर्थ असा लागला की परंपरा समृद्ध आहेत, म्हणून त्यांचा अभिमान आहे. समृद्धता विशेष असल्याने अभिमान. म्हणून मी म्हटले की तसा अभिमान जगातील सर्वच लोकांना असू शकतो. म्हणजे भारतीय असण्याचा अभिमान केवळ परंपरा समृद्ध म्हणून असणे पुरेसे नाही. त्या समजा जगातल्या कुठल्या भागापेक्षा कमी समृद्ध असल्या असत्या तर अभिमान वाटला नसता का? वाटणार्यांना वाटलाच असता.
आपलेपणा भारतीयत्वाविषयी वाटतो. म्हणजे अनोळखी (न-आपला) भारतीय माणूस देखील भारतीय म्हणून आपला वाटतो. काही खाताना, बरोबरच्यांसोबत वाटून घेण्याची पद्धत आपली वाटते. वगैरे.
अभिमान म्हटले की भारतीय खूप बुद्धिमान, शूर किंवा तत्सम प्रकारे, इतरांहून सद्गुणी आहेत असे म्हणायचे असते असे मला वाटते. (अभिमान म्हणजे नक्की काय असावे? तुमचे काय मत?) तर तसे काही मला वाटत नाही.
2 Jul 2009 - 1:11 am | ऍडीजोशी (not verified)
अभिमान म्हटले की भारतीय खूप बुद्धिमान, शूर किंवा तत्सम प्रकारे, इतरांहून सद्गुणी आहेत असे म्हणायचे असते असे मला वाटते.
अजीबात नाही. तसंच आपल्या कुठल्याही प्रार्थनेत / प्रतिज्ञेत दुसर्या देशाला अथवा त्याच्या संस्कृतीला हिणवलं नाहीये. भारत माझा देश आहे, वंदे मातरम् ते नमस्ते सदा वत्सले मातॄभूमे पर्यंत असं कुठेही म्हटलं नाहिये. अर्ध्या हळकूंडाने पिवळे होणार्या आणि दुसर्याला कमी दाखवण्यात स्वतःचं मोठेपण पहाआर्या लोकांकडे लक्ष देउ नका.
भारतीय परंपरांचा (श्रेष्ठत्वाचा नाही) अभिमान भारतीयांनाच असणार. तसा तो इतर देशवासीयांनाही असणार.
मला माझ्या भारतीय असल्याचा अभिमान वाटतो तो कशामुळे वाटतो ह्याचं उत्तर विविधांगी आहे.
मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो कारण माझ्या देशात लता मंगेशकर आहे, सचीन तेंडूलकर आहे, अब्दूल कलाम आहेत, आर्य चाणक्यांची शिकवण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, राम आहे, श्रीकॄष्ण आहे, बाबा आमटे आहेत, टाटा आहेत, नारायण मूर्ती आहेत, जगातल्या यच्चयावत अध्यात्मीक / तात्वीक / व्यवस्थापन कौशल्य / सेल्फ हेल्प पुस्तकांची माता असलेली भगवद् गीता आहे, मदर तेरेसा आणि ज्ञानेश्वरांची शिकवण आहे, उत्तूंग हिमालय आहे, मोदक आहेत, लाडू आहेत, अडीअडचणीला धावून येणारे मित्र आहेत (यादी संपणार नाही...) आणि हे सगळं म्हणजेच माझी संस्कॄती आहे. संस्कॄती म्हणजे ह्याहून वेगळं काय हे मला माहिती नाही. आणि हे सगळं माझ्यासोबत शेअर करणार्या दुसर्या व्यक्तीविषयी मलाही आपलेपणा आहे.
ह्या सगळ्या थोर व्यक्तींनी / विचारांनी ज्या मातीत जन्म घेतला ती माझीही मातॄभूमी आहे म्हणून मला तिचा अभिमान आहे.
2 Jul 2009 - 1:26 am | विकास
>>>अभिमान म्हटले की भारतीय खूप बुद्धिमान, शूर किंवा तत्सम प्रकारे, इतरांहून सद्गुणी आहेत असे म्हणायचे असते असे मला वाटते. (अभिमान म्हणजे नक्की काय असावे? तुमचे काय मत?) तर तसे काही मला वाटत नाही.<<
या संदर्भात माझ्याच वरील प्रतिसादात (ज्याचा आपण संदर्भ दिलात, त्यात) शेवटच्या दोन परीच्छेदात उत्तर आहे असे मला वाटते. त्यात अॅडीजोशींनी लिहीलेले पण योग्य वाटते.
2 Jul 2009 - 10:36 am | नितिन थत्ते
अभिमान (परंपरांचा किंवा कशाचाही) हा या धाग्याचा विषय नाही. तसेच हा प्रतिसाद विकास यांच्या प्रतिसादाला नाही.
पण परंपरांचा किंवा इतिहासाचा अभिमान म्हणजे काय? आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या चांगल्या गोष्टींचा अभिमान जरूर असावा. फक्त त्या अभिमानातून आपल्या सध्याच्या स्थितीकडे डोळेझाक होऊ नये. आणि ती स्थिती आहे असे कोणी म्हटले तर त्याला निषेधू नये. उदाहरण म्हणून आपले आवडते भारताचे न घेता भारतातल्या बिहारचे घेऊ.
बुद्ध धर्माचे उदयस्थान, नालंदा विद्यापीठ, भारतातल्या पहिल्या प्रबळ केंद्रीय सत्तेचे स्थान म्हणून बिहारी लोकांना अभिमान वाटायला काही हरकत नाही. पण एखादा बिहारी सध्याच्या बिहारच्या स्थितीबद्दल बोलू लागला आणि इतर बिहारी त्याला छिद्रान्वेषी आणि खराटा असे म्हणून तुला आपल्या थोर परंपरांचा अभिमानच नाही असे म्हणू लागले तर तो वृथा अभिमान असे म्हणावे लागेल.
तसेच त्या परंपरा अशा उच्च आहेत म्हणून आम्ही मुळातच श्रेष्ठ असा भाव निर्माण झाला तर ते फारच हानिकारक ठरेल. कारण मग कृती करण्याची आच नाहीशी होत जाईल.
(बिहारचे उदाहरण घेण्याचे कारण भारताचे उदाहरण घेतले तर येथे अनेक लोक माझ्यावर धावून येण्याची शक्यता आहे.)
अशाच प्रकारचा अभिमान ग्रीस, इजिप्त वगैरे देशही बाळगत असतील. त्यांचीही आजची स्थिती कदाचित भारतासारखीच असेल. त्यांनीही त्या जुन्या संस्कृतीचा आणि परंपरांचा वृथा अभिमान बाळगू नये.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
3 Jul 2009 - 9:06 am | विकास
अभिमान म्हणजे काय याचे साधे उत्तर आहे आपल्यामधील चांगल्या गोष्टींची जाणीव ज्याचा उपयोग आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यात होतो. हे जसे व्यक्तिगत संदर्भात असते तसेच कौटूंबिक आणि सामाजीक संदर्भात पण बरोबर असू शकते.
>>>आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या चांगल्या गोष्टींचा अभिमान जरूर असावा. फक्त त्या अभिमानातून आपल्या सध्याच्या स्थितीकडे डोळेझाक होऊ नये. आणि ती स्थिती आहे असे कोणी म्हटले तर त्याला निषेधू नये.<<<
अगदी बरोबर. इतकेच म्हणणे आहे. त्या संदर्भात मी जे काही म्हणले आहे ते वेगळे वाटत नाही:
तुमच्या वरच्या प्रतिक्रीयेस उत्तर देत असताना मराठीत नाही पण इंग्रजीत शोधू लागलो तर "प्राईड" या शब्दासाठी मला विकीवर थोडेमजेशीर वाचायला मिळाले:
मात्र त्यात हिंदू धर्मातील उदाहरण देताना म्हणले आहे की, "Ravana, an evil king who was killed by Rama, avatar of Vishnu, exhibited the sins of pride and lust." जे विकीच्या संपादकांना पूर्ण मान्य झालेले नाही. कारण ते वाल्मिकींचे लेखन आहे धार्मिकग्रंथातील नाही असे कारण असावे. रावणाला "प्राईड" असण्यापेक्षा "इगो" होता असे म्हणणे जास्त योग्य आहे.
इंग्रजीत जाउंदेत पण मराठीत अभिमानाच्या विविध छटा तयार केल्या गेल्या आहेत. एखाद्या योग्य गोष्टीचा "सार्थ अभिमान" असू शकतो, स्वतःबद्दलची चांगली गोष्ट असली तर "स्वाभिमान" असू शकतो आणि अहंकार मिश्रीत अथवा अज्ञानातून असली तर "दुराभिमान" असू शकतो.
थोडक्यात नीरक्षीर विवेकाने योग्य अभिमान बाळगणे हे चूक तर नाहीच पण योग्यच आहे असे म्हणावेसे वाटते आणि तसेच सारे जग वागत असते. आपण त्याला पाप म्हणायची गरज नाही अथवा त्यातून दुसर्याला दुखावतो असे वाटून घेणे अथवा त्याचा स्वतःच्या नकळत न्यूनगंड वाटून घेणे नक्कीच योग्य वाटत नाही.
विचार करा जिजाबाईला अभिमान नसता तर शिवाजी घडू शकला असता का? शिवाजीने अभिमान दाखवला नसता तर त्याचे औरंगजेबाच्या दरबारात काय झाले असते? संभाजीने हिंदू धर्माचा अभिमान, काय फरक पडतोय म्हणून दाखवला नसता, तर आज काय अवस्था असती? आणि अशा संभाजीचा तमाम मराठ्यांनी अभिमान दाखवला नसता तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात झाली असती का? टिळक, गांधीजी, सावरकर, भगतसिंग आदी तमाम देशभक्तांना जर देशाबद्दल त्यातील इतिहास-संस्कृतीतून अभिमान वाटला नसता तर ब्रिटीशांशी लढण्याचे विचार तरी येऊ शकले असते का? नेहरूंचे उदाहरण घ्या, त्यांना पण "डिसकव्हरी ऑफ इंडीया" लिहून स्वतःतील चांगल्याची जाणीव करून तीचे आत्मविश्वासात परीवर्तन करावेसे वाटलेच ना?
आता एक शेवटचे उदाहरण बघा: अलेक्झांडर ला पाश्चिमात्य देशांनी अभिमानाने "अलेक्झांडर द ग्रेट" असे संबोधन देऊन अगदी " जगजेत्ता" म्हणले. पण सावरकरांनी चपखल शब्दात म्हणले की, "अन्य कुणाचा असो सिकंदर परंतू भारत जेता ना, अंगण ही ना तये देखीले, कळलाही ना कुणा कुणा". जो माणूस भारत जिंकणे या इर्षेवर येत होता (बीबीसी डॉक्युमेंटरीत सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या जगाचा शेवट होता) त्याला गंगापण पार करता आला नाही... अलेक्झांडरने जिंकलेली जमीन आणि अशोकाने जिंकलेले साम्राज्य याची तुलना केली तर कदाचीत ते अशोकाचे जास्त असेल. स्वतःच्या इतिहासातील चांगल्या गोष्टीं जगाला सांगितल्या नाहीत तर जग त्यांच्यातल्या कुठल्याही गोष्टी चांगल्या करून आपल्याला सांगणार आपल्याला त्यांचे अनुयायी करणार... तसे होयचे का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
म्हणून परंपरा, इतिहास वगैरेंचा अभिमान म्हणजे सुरवातीस म्हणल्याप्रमाणे डोळस जाणीव.
अर्थात याचा अर्थ भुतकाळात रमायचे असा अजिबातच नाही. कारण तसे करणार्याला रामदासांचे चपखल शब्द आहेतच: "सांगे वडीलांची किर्ती तो एक मुर्ख"!
3 Jul 2009 - 10:55 am | विजुभाऊ
आपण भारतीय आहोत यात आपले कर्तृत्व काय.?
केवळ जन्म भारतात झाला म्हणून भारताबद्दल अभिमान वाटणे या पेक्षा मी ज्या देशात वाढलो ज्या समाजात वाढलो त्या समाजाउन्नत्तीसाठी मी काय करतो ते महत्वाचे.
मी भारातीय आहे याचा मला अभिमान आहे म्हणणारे किती तरीजण अमेरीकेचे नागरीकत्व मिळवण्यासाठी धडपडत असतात.
ऑस्ट्रेलियात स्थायीक झालेले तथाकथीत भारतीय जेंव्हा त्याना त्रास झाला तेंव्हा त्याना भारतीयत्व आठवते.
या देशात मी जन्मलो मला त्याचा अभिमान आहे असे म्हणताना आपण या देशासाठी काय करतो हा विचार किती जण करतात.
साधे कोठे राष्ट्रगीत सुरु असेल आणि तुम्हाला पहाणारे कोणी नसेल तर किती जण राष्ट्रगीताचा मान ठेवतात?
मी भारतीय आहे याची मला काहीवेळा लाज वाटते.
ज्या देशात स्त्रीयाना हिणकस वागणूक मिळते; जिथे सामान्याना शिक्षण नाकारले जाते. दुधाचा महापूर योजना राबवताना दूध रस्त्यावर ओतून देतानाचे फोटो पेप्रात झळकतात त्याच वेळेस त्याच शहरात दूधावाचून कोणी तान्हाजीव तळतळत असतो.
देवाच्या नावावर जिथे कोट्यावधी पैसे उधळले जातात त्याच गावात पाणीपुरवठा योजना पैशाअभावी रखडत असतात
ही म्झ्याच देशात होत असते आणि मी आणि माझ्या सारखे माझे अनेक भारतीय बांधव डोळ्यावर कातडी ओढून झोपल्याचे सोंग आणत असतो त्या वेळेस मी भारतीय आहे याची मला लाज वाटते.
अवांतरः माझ्या प्रतिसादाला कोणी बीनडोक प्रतिसाद म्हणेल कोणी त्याला +१ म्हणत सहमत होईल. वैयक्तीक ताशेरेही झाडेल.
मला जे वाटले ते मी लिहिले.
2 Jul 2009 - 7:38 pm | आनंदयात्री
>>मला भारतीयत्वाविषयी अभिमान वाटत नाही; आपलेपणा वाटतो.
या वाक्याबद्दल मृदुला यांच्याकडे निषेध व्यक्त करतो.
10 Jul 2009 - 4:31 pm | प्रअका१२३
निषेध करण्याबद्दल मी आपला निषेध करतो.
हा हा हा.... कृपया भावना समजून घ्या..... सर्वप्रथम, `अभिमान' चा अर्थ काय आहे, याबद्दल घोटाळा आहे. येथे आपण सार्थ अभिमान हाच अर्थ लक्षात घेऊया. तर आपल्या मनातली भावना काय आहे, हे प्रामाणिकपणे सांगणे याला मिपावर तरी निषेधाचे कारण होऊ देऊ नये. तुमचा निषेध केवळ एवढ्याच करता की मृदुलाच्या वाक्याला तुम्ही देशद्रोह समजला, जो केवळ तुमच्या वाचण्याच्या दृष्टीकोनामुळे तसा ग्रह झाला.
कोणाला कशाबद्दल कोणती भावना अधिक आहे, हा ज्याच्या त्याच्या भावनेचा भाग आहे. उदा. मला माझ्या पालकांबद्दल जेवढे प्रेम आहे, तितका आदराचा भाव नाही.... याचा अर्थ मी काहीतरी वाईट चिंततो आहे, अशातला भाग नाही.
तसेच धर्माच्या बाबतीत आहे. माझ्या धर्मावर माझे प्रचंड प्रेम आहे. (सावरकरांना अभिप्रेत असलेला अर्थः http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7...)
आणि ही प्रेमभावना, आदराच्या भावनेपेक्षा तसेच अभिमानापेक्षा अधिक आहे...... हे सत्य आहे. ही माझ्या मनातली भावना आहे, आणि याबद्दल मी स्वतःला किंवा इतरांना भलतेच सांगून फसवू शकत नाही.
तेव्हा निषेध करण्याआधी म्हणणे समजवून घ्या / द्या.
2 Jul 2009 - 9:40 am | ऋषिकेश
मुळ लेख आणि त्यावरच्या अनेकांच्या प्रतिक्रीया आवडल्या
प्रतिसाद द्यायला उशीर झाला आहे.. नेहेमीप्रमाणे अनेक मतं येऊन गेल्यानंतर माझे हे वरातीमागून दोन पैसे:
माझ्यामते कर्मकांडे ही अफूची गोळीसारखी आहेत. कराल तर तुमचे दु:ख तात्पुरते विसराल.. मात्र म्हणून त्या दु:खाचे निराकरण होईल असे नाहि.. माणसाने केलेले प्रयत्नच दु:ख कमी करू शकतो कोणताही देव वगैरे नाही.
मी स्वतः कर्मकांडे/जाचक प्रथा शक्यतो पाळात नाही. दर श्रावणात रक्षाबंधनाला माझ्या एका मानलेल्या बहिणीची आई फक्त माझ्यासाठी म्हणून माश्याचा बेत करते. तो मी यथेच्छ हादडतो. ऐन श्रावणात फक्त माझ्यासाठी तिने प्रेमाने केलेले मासे फक्त श्रावण आहे म्हणून न खाणे हा अतिरेक वाटतो. पण मग मी इथे अश्रद्ध ठरतो का? तर हो! समाजाच्या नजरेत हो! मात्र माझ्या नजरेत अन त्या माऊलीच्या नजरेत...
मागे माझ्यासाठी कोणीतरी नाशिकला जाऊन काहितरी करायला सांगितले होते..मला जायचे नव्हते. माझ्या नशिबाने आईला १-२ दिवसांत माझे म्हणणे पटले. पण ज्यांनी हे असले उद्योग सांगितले होते त्यांनी मला "नास्तिक" हा शिक्का मारलाच होता.
आमच्या न्हाव्याकडे सोमवारी गर्दी जवळ्जवळ नसतेच तर मी माझा वेळ का वाचवू नये? पण या साध्या घटनेतून लोकं 'नास्तिक' दिसतोय अश्या नजरेतून बघतात
देवावर माझी अपरंपार श्रद्धा वगैरे नाहि.. मात्र तरीही अजूनही मोठ्याने रामरक्षा, अथवशीर्ष म्हणताना; मोठ्यांच्या थरथरत्या हातांनी आशिर्वाद घेताना, कोल्हापूरच्या देवळातील काकड आरतीला, सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा खाताना, तीर्थाच्या थंडगार स्पर्शाने मनाला बरं वाटतं हे ही तितकंच खरं.. मग असं केलं/सांगितलं की लोक मला अस्तिकही ठरवू पहातात.
पण मग मी नास्तिक किंवा आस्तिक आहे का? तर नाही.. मी काहिसा आस्तिकत्वाकडे झुकणारा "अॅग्नॉस्टीक" आहे. देव आहे की नाही या वादात मला जराही इंटरेस्ट नाहि. तो असो वा नसो. मला ज्या गोष्टी करावाश्या वाटतात, त्या मी कोणत्याही लेबल शिवाय करू इच्छितो.
माझ्या क्रियांना ज्याला ज्या लेबलांत/कॅटेगरीत वर्गीकरण करायचं असेल त्यांनी करावं. आस्तिकत्त्वाकडे झुकणारा यासाठी की बुद्धीला पटो न पटो संस्कार असे काहि आहेत की देव नाहि हे ठामपणे म्हणणं जमलेलं नाही
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
2 Jul 2009 - 11:04 am | नितिन थत्ते
शिवाजी महाराज कोणाचे या धाग्यावर ज्या प्रकारची चर्चा झाली त्यानंतर आलेल्या चर्चात्मक धाग्यांमधून अत्यंत संयमित आणि न भरकटणारे प्रतिसाद येत आहेत.
मिपासाठी हे अत्यंत स्पृहणीय आहे.
मिपाकरांचे अभिनंदन. :) =D>
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
2 Jul 2009 - 3:12 pm | अभिज्ञ
एडीशी प्रचंड सहमत.
ह्या विषयावर पिवळा डांबिस ह्यांनी आधीच अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. वाचकांनी ते जरूर वाचावे.
http://www.misalpav.com/node/2522
अभि़ज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
2 Jul 2009 - 4:30 pm | बिपिन कार्यकर्ते
डॉनरावांचा हा लेख येऊन बरेच दिवस झाले. लेख आल्या आल्याच वाचला. पण हा विषय नीट वाचून प्रतिक्रिया देण्याचा असल्याने बाजूला ठेवला. आज थोडी सवड झाली. आत्ता पर्यंत बरीच चर्चा झाली. मी फक्त मूळ लेख वाचला आहे. बहुतेक प्रतिसाद वाचलेही नाहीत. मला माझा हा प्रतिसाद केवळ मूळ लेखावर माझे मत आणि त्या अनुषंगाने आलेले विचार एवढ्यावरच मर्यादित ठेवायचा आहे. (जे काही प्रतिसाद नुसते नजरेखालून घातले आहेत त्यावरून असे वाटले की चर्चा रूढार्थाने भरकटलेली आहे असे जरी म्हणता येणार नाही तरी बरेच मुद्दे जे विषयाला अगदी धरून नाहीत पण कुठे तरी दूरवर का होईना पण संबंधित आहेत. त्या सगळ्यावर भाष्य करणे / मत व्यक्त करणे अवघड आहे आत्ता.)
लेख वाचल्यावर सर्वप्रथम जाणवले ते हे की लेखकाची मानसिक वाढ होत असताना त्याला पूर्वसंस्कारांमुळे तयार झालेली जीवनपध्दती आणि नवीन विचार मिळत असताना त्यामुळे येणार्या नवीन दृष्टीमुळे जाणवणारे त्या जीवनपद्धतीतले (संस्कारातील नव्हे) फोलपण जाणवणे या नेहमीच्याच चक्रात तो अडकला होता / आहे. पण तो यातून सहज बाहेर येईल अशी खात्री आहे. यानिमित्ताने धर्म, अध्यात्म, कर्मकांड, श्रध्दा वगैरे संकल्पनांबद्दल माझे काही विचार.
श्रध्दा. म्हणजे काय? नक्की नाही सांगता येणार. पण ढोबळमानाने असे म्हणता येईल की, "एखाद्या वस्तूवर / संकल्पनेवर आणि त्या वस्तूचे / संकल्पनेचा मला काहीतरी सकारात्मक उपयोग होईल असा पूर्ण विश्वास असणे म्हणजे श्रध्दा." इथे 'पूर्ण' हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण श्रध्दा ही 'बाय डिफॉल्ट' पूर्ण असते. (इथे माझ्या एका बॉसची आठवण झाली. प्रोजेक्ट्स रिव्ह्यु करताना तो नेहमी म्हणायचा, "डोन्ट टेल मी दॅट अ प्रोजेक्ट इज ऑलमोस्ट क्लोज्ड. प्रोजेक्ट क्लोझर इज लाइक प्रेग्नंसी. अ वुमन इज आयदर प्रेग्नंट ऑर नॉट, देअर इज नो इन बिट्विन, यु कान्ट बी हाफ ओर पर्शल प्रेग्नंट, प्रोजेक्ट्स आर ऑल्सो आयदर क्लोझ्ड ऑर ओपन. देअर इज नो ऑलमोस्ट इन इट.) तसेच एकतर तुमची श्रध्दा आहे किंवा नाही. पण, माझ्या मते मनुष्यस्वभाव मूलतः सश्रध्दच असतो हे मला ठामपणे वाटते. हा 'च' पण महत्वाचा आहे. माणुस श्रध्देशिवाय जगूच शकत नाही. आपण सश्रध्द / अश्रध्द असे शब्द वापरतो खरे, पण ज्यांना आपण अश्रध्द आहोत असे वाटते त्यांचाही आपल्या अश्रध्देवर ठाम विश्वास आहेच. म्हणजे आलीच की श्रद्धा. जे लोक स्वतःला रॅशनलिस्ट किंवा बुध्दीप्रामाण्यवादी म्हणवतात त्यांची ही हीच गत दिसते. त्यांचीही आपल्या बुध्दीवर ठाम श्रध्दा असतेच. म्हणजे कुठेतरी श्रध्दा ठेवल्याशिवाय मानवी मनाचे भागत नसावे. आणि मानवी मनाला योग्य दिशा आणि बळ मिळाले तर तो माणूस अचाट कामे करून जातो. "फेथ मूव्हज माउंटन्स". कित्येक डॉक्टर या प्रकारचे वरवर अनाकलनिय पण केवळ रोग्याच्या इच्छाशक्तीमुळे सुधारणा झाल्याचे अनुभव सांगू शकतात. इथे कुठेतरी मानवी मनाचा तो श्रध्दा हा गुण कामास येतो. श्रध्दा ही पूर्ण आणि ठाम असते त्यामुळेच अंधश्रध्दा आणि डोळसश्रध्दा हे शब्द फिजूल आहेत. श्रध्दा ही अंधच असते. एका प्रतिसादात खराटा यांनी माझा देवावर किंवा तत्सम शक्तीवर विश्वास नाही असे प्रतिपादन केले आहे. म्हणजे जे काही करेन ते मीच करेन आणि ते करायला मी समर्थ आहे हा त्यांचा ठाम विश्वास आहे, म्हणजेच त्यांची श्रध्दा स्वतःवरच आहे, पण श्रध्दा आहेच. श्रध्दा ही मानवी मनात एखाद्या अँकरिंगचे काम करत असावी. आणि श्रध्दा हा मानवाचा (इतर प्राण्यांपासून वेगळा काढताना) एक डिफाइनिंग फॅक्टर आहे. अजून एक गंमत म्हणजे जगातील जितके लोक स्वत:ला आस्तिक म्हणवून घेतात ते जर का खरोखर 'श्रध्दावान' असते तर सुखीही झाले असते. कारण जर का ते ज्या कृपाळू परमेश्वराला मानतात तो जर का खरोखर कृपाळू आणि काळजी घेणारा असेल तर काळजी आणि त्यातून येणारे दु:ख / त्रास / मनःस्ताप वगैरे राहतातच कुठे. तर त्या दृष्टीने हे लोक अश्रध्दच म्हणले पाहिजेत.
(जे लोक बुध्दीप्रामाण्यवादी असतात किंवा अंनिस सारख्या विचारांचे असतात, ते पण बरेच वेळा एखाद्या गोष्टीबद्दल "हॅ:, असे कुठे असते काय?" असे सरसकट विधान करतात तेव्हा त्यांच्या विचारांवर किंवा वरिष्ठ समविचारी व्यक्तींवर असलेली श्रध्दाच बोलत असते.)
आता धर्म वगैरेकडे वळू. धर्माचा ढोबळमानाने अर्थ रिलिजन असा घेत आहे. खरे तर धर्म ही एक विचारधाराच आहे. विचारधारा म्हणले की त्याची तत्वे, मूलभूत पाया वगैरे (डिफाइनिंग प्रिन्सिपल्स) आलीच. तर तश्या त्या प्रत्येक धर्माला आहेतच. प्रत्येक धर्माची दोन प्रमुख अंग असतात. एक म्हणजे कर्मकांड आणि दुसरे म्हणजे अध्यात्मिक. इंग्रजी मधे याला रिच्युअलिस्टिक आणि स्पिरिच्युअलिस्टिक असे म्हणता येईल. यातला कर्मकांडाचा भाग हा बाह्य स्वरूपाचा असतो आणि अगदी आखीव असतो. सहसा हे अंग सामूहिक स्वरूपात आचरले जाते. आणि अध्यात्मिक अंग हे प्रत्येक माणसाच्या आंतरीक किंवा मानसिक उन्नतीसाठी असते. जर का प्रत्येक धर्माचा अभ्यास केला तर असे आढळून येते की अध्यात्मविचार हा थोड्याफार फरकाने सारखाच असतो. उदाहरणार्थ, भारतिय धर्मविचारात नामस्मरणाला फार मोठे स्थान आहे. का? तर केवळ एवढ्यासाठीच की मानवाला सतत इश्वराचे स्मरण रहावे. जेणेकरून त्याची श्रध्दा दृढ होऊन तो जीवनात येणार्या प्रत्येक संकटात त्या श्रध्देच्या बळावर कृतीशील राहून योग्य त्या प्रकारे सामना करू शकेल. (खरी श्रध्दा असेल तर मन शांत आणि मन शांत तर योग्य कृती). आता या 'सतत इश्वराचे स्मरण' प्रकाराला आपण अनुसंधान म्हणतो. जेव्हा मला १७व्या शतकात फ्रान्स मधे होऊन गेलेल्या 'ब्रदर लॉरेन्स' या ख्रिस्ती संताबद्दल वाचायची संधी मिळाली तेव्हा मी चक्रावूनच गेलो. त्याच्या संपूर्ण आयुष्याचे किंवा साधनेचे सार सांगायचे झाले तर तो त्याला 'प्रॅक्टिस ऑफ द प्रेझेन्स ऑफ गॉड' म्हणतो. अनुसंधानाचा अर्थ आजच्या पिढीला सांगायचा झाला तर याहून अधिक यथार्थ भाषांतर काय असू शकेल? आणि त्यासाठी त्याने सांगितलेले साधन म्हणजे सतत इश्वराचे स्मरण टिकवणे, त्याचे नाव जपणे. म्हणजेच नामस्मरण. अशी कित्येक उदाहरणं आहेत आणि शोधली तर अजून सापडतील.
जर का धर्माचे खरे सांगणे किंवा 'रिझन फॉर बिइंग' अध्यात्मिक स्वरूपाचे आहे तर मग हे कर्मकांड कशाला? काय गरज आहे त्याची? हे प्रश्न साहजिकच आहेत. पुरातन काळापासून धर्म आणि त्याअनुषंगाने येणारे कर्मकांड जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहेत. खरे तर कर्मकांड म्हणजे मानवी मन जे मूलतः चंचल आहे, सहजी भरकटते त्याला नियंत्रित करणे, त्याला इश्वराकडे वळवणे यासाठी आखून दिलेल्या काही क्रिया आणि काही प्रमाणात त्या समूहाचे / समाजाचे आपसातील वागणे सुरळित रहावे यासाठी केलेले 'रूल्स अँड रेग्युलेशन्स'. या 'रूल्स अँड रेग्युलेशन्सला' त्या त्या धर्माचे नितीशास्त्र असे म्हणता येईल. मानवी स्वभावाला बाह्यांगाचे आकलन जास्त सहज आणि स्वाभाविक वाटते आणि त्यामुळे मग जसेजसे दिवस / वर्ष / युगं जातात तसेतसे हे धर्माचे बाह्यांगच जास्त दृढ होत जाते आणि अध्यात्मिक जाणिव कमी होत जाते. दगडात देव बघण्यपेक्षा दगडालाच देव मानायची मानसिकता होते. कर्मकांडाची प्रतिकात्मकता लोप पावून ती कर्मकांडंच जणू काही इतिकर्तव्यता आहे हा समज बळावतो. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर सेंट पीटरने रोममधे चर्च स्थापन केले. कालांतराने (साधारण हजार वर्षांनी) या चर्च मधे फूट पडली. चर्चचे रोमन कॅथलिक आणि इस्टर्न ऑर्थोडॉक्स असे भाग पडले. यामागेही कर्मकांडाबाबतचे भिन्न विचारच प्रामुख्याने होते. असे म्हणले जाते की 'क्रॉसची खूण दोन बोटांनी करायची की तीन बोटांनी' हा एक प्रमुख वादाचा मुद्दा होता. अजूनही या दोन्ही पंथांचे लोक वेगवेगळ्या पध्दतीने उपासना करतात, अंतिम उद्देश ख्रिस्ताची उपासना हा असला तरी. नंतर युरोपात जेव्हा प्रॉटेस्टंट चळवळ सुरू झाली तेव्हा एक अगदी गंमतीशीर पण 'कान्ट बी पुट बेटर' अशी म्हण तयार झाली.... 'अवे फ्रॉम चर्च, निअरर टू गॉड'.
अजून एक... मुस्लिम धर्मात नमाज सुरू करताना दोन्ही हात वर उचलून कानाला स्पर्श करतात. त्यानंतर पुढची क्रिया करे पर्यंत हे हात घडी घालून छातीवर ठेवावेत की पोटावर ठेवावेत हा मुस्लिम धर्मकांडविचारात एक खूपच वादाचा मुद्दा आहे. माझा एक भारतिय मुस्लिम मित्र सौदी अरेबियामधे नवीन असताना एका मशिदीत नमाज पढत गेला तेव्हा तेथील इमामाने त्याला त्याची कृती कशी चूक आहे आणि त्यामुळे त्याची प्रार्थना अल्लापर्यंत पोचत नाही यावरून जवळजवळ अर्धा तास प्रवचन दिले. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा अतिशय अस्वस्थ होता.
डॉनरावांची अस्वस्थता मला अशाच प्रकारची वाटते. त्याचे कारण हेच... ज्याला आपण धर्म वगैरे म्हणतो त्या विचारांचे जो इच्छित उद्देश असतो त्याला आपण काहीच किंमत न देता कुठेतरी कर्मकांडाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त महव देतो. पण मी त्यांच्या लेखातील एकंदरीत म्हणणे लक्षात घेतले तर त्यांचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे म्हणून मी वर, ते यातून बाहेर येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की मला लहानपणापासूनच जे वातावरण लाभले ते धार्मिक तर होतेच पण ते कर्मकांडापेक्षा अध्यात्मिक जास्त होते. काही विशिष्ट कर्मकांड केली जात थोडाफार आग्रह असे, पण दुराग्रह कधीच नव्हता. जो काही आग्रह होता तो प्रामुख्याने मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या दृष्टीनेच होता. आजही माझ्या घरात कर्मकांड आहेत पण त्याचे प्रस्थ नाही. मी ज्यांना गुरू म्हणून स्वीकारले आहे त्यांनीही कधी मला किंवा कोणालाच कर्मकांडाबद्दल प्रवृत्त केले नाही. साधारण ज्या गोष्टींना आपण वाईट किंवा अनैतिक समजतो त्या खरंतर त्या त्या वयाला अनुसरून योग्यच असतात, त्याही गोष्टी मी त्यांना सांगून केलेल्या आहेत आणि त्यात मला त्यांनी कधी अडवले नाही. किंबहुना काही अकाली पराकोटीचे अध्यात्मिक (याचे पण मी चुकीच्या मार्गाला लागणे असेच वर्णन करेन ;) ) झालेल्या तरूणांना त्यांनी स्वत:हून सिनेमा बघा, खेळ खेळा असे सांगून त्यांना त्यांच्या सहजप्रवृत्तीप्रमाणे वागायला लावून त्यांना माणसात आणले (बोळा निघाला, पाणी वाहते झाले). तर अशा वातावरणात वाढल्याने डॉनरावांना जाणवलेल्या समस्या मला घरात जरी फारशा आल्या नाहीत तरी बाहेर कधी तरी जाणवायच्या. तेव्हा मी एकच पथ्य पाळतो. जर का फारसा तोटा / धोका नसेल तर देखल्या देवा दंडवत करून टाकतो. मला बोलणे शक्य असेल आणि समोरच्याला समजून घ्यायची इच्छा आणि कुवत असेल संवाद (टू वे) साधायचा प्रयत्न करतो. पण माझे मत बर्यापैकी ठाम आहे (श्रध्दाच ती ;) ) त्यामुळे मानसिक क्लेष फारसे होत नाहीत. डॉनरावांनाही हाच सल्ला देईन.
खरे तर हा विषय मोठा आहे, त्याचा आवाका खूपच म्हणजे खूपच मोठा आहे. माझी तेवढी योग्यता नाही, अभ्यास नाही. त्यामुळे विचार खूपसे विस्कळीत पणे आले आहेत आणि त्यात तृटीही आहेत. पण आज पर्यंत स्वतःशीच जे बोलत आलो ते डॉनरावांनी व्यक्त करायला लावले.
बिपिन कार्यकर्ते
2 Jul 2009 - 7:47 pm | नितिन थत्ते
प्रतिवाद करण्यासारखे काही नाही. जरी आम्हा लोकांना श्रद्धाळू म्हटलेले आवडले नाही तरी.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
3 Jul 2009 - 11:10 am | विजुभाऊ
कित्येक डॉक्टर या प्रकारचे वरवर अनाकलनिय पण केवळ रोग्याच्या इच्छाशक्तीमुळे सुधारणा झाल्याचे अनुभव सांगू शकतात. इथे कुठेतरी मानवी मनाचा तो श्रध्दा हा गुण कामास येतो.
यात मेंदुतील सिरोटोनीन / अॅड्रीनलीन वगैरे द्रव्यांचा मोठा वाटा असतो.
अर्था हे जोवर माहीत नव्हते तोवर त्याला श्रद्धा / फेथ हीलींग म्हणायचे.
प्रत्येक चमत्कारांमागे विज्ञान असते . चमत्कारांचे उगाच उदात्तीकरण करु नये.
बहुतेक श्रद्धा या गणपती दूध पितो अशापैकीच असतात
त्यामगचे शास्त्र कळे पर्यन्त शहरात दुधाचे भाव कडाडलेले असतात त्या श्रद्धेचा बळी एखादी गरीब माउली होत असते तिच्या तान्ह्या बाळासाठीदूध शोध शोधताना वणवण भट़कंतीने
5 Jul 2009 - 12:26 am | लिखाळ
वा छान.
प्रतिसाद आवडला :)
चर्चा सुद्धा छान चालू आहे. निरनिराळी मते वाचायला छान वाटते.
-- लिखाळ.
5 Jul 2009 - 12:55 am | टारझन
बापरे !! काय प्रतिसाद आहे ... आख्खाच्या आख्ख्या पटलाय !!
बिका आगे बढो !!
ह्या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे
-चप्लाळ
2 Jul 2009 - 6:20 pm | प्रकाश घाटपांडे
बरेच लोक आम्हाला म्हणतात अंधश्रद्धा निर्मुलनावर तुमची श्रद्धा आहे. परवा दाभोलकर-शंकर अभ्यंकर यांचा जाहीर वाद संवाद झाला. त्याचे रेकॉर्डिंग केले आहे पण ते इस्निपवर चढत नाही ब्वॉ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
2 Jul 2009 - 6:27 pm | बिपिन कार्यकर्ते
आपले भेटीदरम्यान या विषयावर बोलणे झाले होतेच. सहमती आहे बर्यापैकी.
बिपिन कार्यकर्ते
2 Jul 2009 - 7:52 pm | वेताळ
दोन्ही भाग हाउसफुल्ल झाले आहेत. डानरावाचे हार्दिक अभिनंदन. आता पर्यत फक्त डानरावाचा पहिला भाग वाचुन झाला आहे. डानराव खरोखरच मनकवडे आहेत ह्यात काही शंकाच नाही.
वेताळ
2 Jul 2009 - 7:52 pm | सूहास (not verified)
थोडस वेगळ मत(ह्याच नेहमीचच आहे...)
बाकी कोणाला कशाचा वाटो न वाटो..ज्या प्रकारे ही चर्चा चालु आहे त्याबद्दल एक "मिपाकर" असल्याचा मला अभिमान वाटतो...
सुहास
3 Jul 2009 - 12:49 pm | मैत्र
चर्चा उत्तम रंगली आहे. पण भर घालायचा मोह आवरत नाही.
मी सश्रद्धांच्या बाजूचा. मला विशेषतः मतं पटली ती यशोधरा, भाग्यश्री, आणि या धाग्यावर सहजरावांनी मांडलेली. विकासरावांनी बराच उत्तम आणि संयत उहापोह केला आहे. त्यात त्यांनी थोडं याला जेनेरिक रुप दिलं ते हिंदू धर्म संकल्पनेचं. खरं तर भारतीयत्वाचा अभिमान इ. जरा लांबचं आहे मूळ लेखापासून पण 'संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....' हे शीर्षक तेवढी मोकळीक देतं आहे.
सगळ्यात सर्वसमावेशक प्रतिक्रिया दिली श्रावण मोडकांनी..
आता इतक्या दीर्घ आणि व्यवस्थित प्रतिक्रियांनंतर खरं तर काथ्या कूटच होतो आहे असं वाटतंय.
पहिल्या धाग्यावर अश्रद्धांनी आपलं म्हणणंच खरं असं थोडंसं एकांगी लिहिलं आहे असं मला वाटतं.
आपण मारे मोठमोठ्या किचकट संकल्पना, जसं देव, शक्ती, इ. मांडतो. मोठ्या संकल्पना अशासाठी म्हणाते कारण हे देव, शक्ती, निसर्ग हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही कळत. (जे कळत नाही आणि कुठल्याही प्रकारे दिसतही नाही त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?) कदाचित हे सगळं किचकट करण्याची गरजच नसेल, आणि उत्तर असेल हे विश्व कोणीही निर्माण केलं नाही. जी काही भौतिक स्थिती होती, त्यातून हे विश्व असंच निर्माण झालं (असतं). आणि उत्तर सोपंच होतं/असतं, फक्त ते सापडण्यासाठी, दिसण्यासाठी, मान्य करण्यासाठी कोरी पाटी असावी.
माझ्यासाठी देव ही काही (बर्याचशा?) लोकांच्या डोक्यातली एक संकल्पना आहे. जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही.
अगदी हेच सश्रद्धांचेही मत आहे. घाटपांडे काकांनी म्हटल्या प्रमाणे अश्रद्धतेचा अतिरेक योग्य नाही. अनेकांसाठी विश्वविझान त्यामागचं अगदी सहज पटण्यासारखं असलेलं भौतिकशास्त्रीय / अणुविज्ञानाचं कारण हे अतिशय किचकट आणि न समजण्यासारखं आहे. हे उत्तर नक्कीच सोपं आहे असं वाटत नाही. बिग बँग, दूर जाणार्या दिर्घिका, तारका पुंजांची रचना हे सामान्य माणसासाठी - जगातल्या किमान ९५% लोकांसाठी अतिकिचकट आणि अनाकलनीय आहे. त्यापेक्षा विठोबा जास्त जवळचा आणि मनाला भावणारा आणि पटणारा आहे.
तसंच हिंदू धर्मातल्या (कारण आत्ता आपण त्याबद्दल बोलतो आहोत) सर्वच्या सर्व रुढी परंपराचं सरसकट समर्थन करणंही साफ चूकच आहे. देव आणि कर्मकांडं या संबंधित गोष्टी आहेत पण भिन्न आहेत.
बिकांनी नेमकेपणाने ही भिन्नता आणि सगळ्याच धर्मात असलेली थोतांडे मांडली आहेत.
बर्याच वर्षांपूर्वी पु. ग. सहस्रबुद्धे यांचा एक लेख वाचला होता - नरोटीची उपासना. हिंदू धर्माच्या, श्रद्धेच्या, तत्त्वांच्या श्रीफलाला, त्यातल्या विचारधारेच्या, ज्ञानाच्या खोबर्याला बाजूला सारुन कर्मकांडाच्या रुढी परंपरांच्या नरोटीची म्हणजे करवंटीची उपासना केली जाते. विरोध कर्मकांडाला करा, जहाज वर आणणार्या भोळ्या कल्पनांना करा, व्यक्तिला त्रास होणार्या सती, बालविवाह, अस्पृश्यता अशा रुढींना करा, धर्माला नाही.
कर्मकांडाची दुसरी बाजू आपण लक्षात का घेत नाही?
सर्वसामान्य जनतेला सगळे समजेल आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे पटेलच असे नाही. त्याला धर्माचे, श्रद्धेचे अधिष्ठान दिले तर मनुष्य विश्वासाने अशा गोष्टी करेल ज्या त्याला लाभदायक असतील.
हिंदू धर्मातले बहुसंख्य सण आणि त्या अनुषंगाने असलेले पदार्थ हे काही चांगल्या कल्पनेतून, त्या महिन्यातील हवामानाचा विचार करुन आलेले आहेत. बहुतेक गोष्टी या सहिष्णुतेच्या, परस्परसंबंधांच्या आणि निसर्गाधारित जीवन पद्धतीच्या संपन्नतेच्या दृष्टिने मांडल्या आहेत.
याचा गैरफायदा तथाकथित उच्चवर्णियांनी घेणे, देवदेवतांचा बाजार होणे हे तर मूळ धर्माचा भाग नाही ना? प्रत्येक सामाजिक संरचनेवर सत्ता आणि अधिकारासाठी त्याच्यात हवे तसे बदल करून उपभोग घेणे हे तर सर्वत्र सर्व बाबतीत आहे. धर्म असेच एक उदाहरण आहे.
त्यासाठी सश्रद्धांच्या विश्वासाला विरोध करण्यात काहीच हशील नाही.
अंनिस सुद्धा अंधश्रद्धा, बुवाबाजी, भोळ्या लोकांना फसवण्याला विरोध करते, देवतांना नाही असे मला वाटते. अंनिस वाल्यांनी खुलासा करावा.
श्रद्धा किंवा अश्रद्धा म्हणजे काय शेवटी वैयक्तिक मतच जे तुम्हाला पटते ते. (अति अति अवांतर - जो जवळ आलेला आवडतो तो हीरो आणि ज्या लगट ही वासना वाटते तो व्हिलन ... )
यशोधरा म्हणतात तसं संस्कार हा वेगळा भाग आहे त्याचा आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काय संबंध? दुसर्याशी आपण कसं वागतो, समाजाचा, जुन्या रुढी/ जातींप्रमाणे, किंवा आर्थिक परिस्थितीने मागे असलेल्यांना वेगळं वागवतो का सहजपणे आपल्या बरोबर ठेवतो हे संस्कार. यात अदिती / मेघना देव आणि त्यांच्या संकल्पना मानत नाहीत किंवा धमुला त्याबद्दल विलक्षण अभिमान आणि श्रद्धा आहे म्हणून या तत्वांमध्ये फरक असण्याचं कारण नाही.
पुन्हा एक मुद्दा येतो की हेच बरोबर कशावरून - सौदी सारख्या ठिकाणी किंवा इतर काही धर्मात, जातींमध्ये, आदिवासी टोळ्यांमध्ये स्त्रियांना अतिशय गौण स्थान आहे. त्यांना आपले विचार हे वाईट संस्कार वाटतील. आपण ज्याला चांगले संस्कार म्हणतो ते खरं तर चांगली विचारपद्धती आणि वागणूक याला. शाब्दिक अर्थाने हिंदू धर्माप्रमाणे सोळा संस्कार आहेत. त्यातले अगदी श्रद्धाळू हिंदू आता कितीसे पाळतात? पन्नास, शंभर वर्षांपूर्वीचे लेखन वाचले तर समाज परिस्थिती आणि कर्मकांडे प्रचंड कमी झाली आहेत असे जाणवेल. (वाचा - टिळकचरित्र, दुर्दम्य, स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक, आनंदीबाई जोशींचे चरित्र, किंवा त्या काळातली या धाटणीची चरित्र वजा पुस्तके, संदर्भग्रंथ, इ.). हिंदू धर्म त्या अर्थी प्रवाही आहे आणि काही प्रमाणात बदलला आहे. थोडे फार बदल सगळ्याच धर्मात झाले आहेत.
कट्टर पणा, भोळ्या समजूती, कर्मकांडे हे काही एका धर्मात नाहीत.
एकूणात आपली श्रद्धा, धर्म, किंवा निरीश्वरवाद दुसर्यावर न लादता दुसर्याच्या मताचा आदर करून आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहणे हेच खरे. यातही दुसरा विचार कुठेतरी मनाला पटला किंवा आपल्या मतांमधला फोलपणा स्पष्ट झाला तरी हेकटपणे जुन्या मतांशी चिकटून राहणे मूर्खपणाचेच. हे दोन्ही बाजूंना लागू होते.
सत्यनारायणाची साधू वाण्याच्या वर येणार्या जहाजाची कथा बाजूला ठेवली तर श्रावणातल्या वातावरणात केळीची पानं, फुलं, उदबत्ती आणि प्रसादाचा शिरा या गंधांमध्ये त्या देवापुढे भाग्यश्री म्हणते तसं शांत वाटतं ही श्रद्धा. अश्रद्धांनी मस्त लागतो म्हणून शिरा खाल्ला तर काय हरकत आहे?
4 Jul 2009 - 11:47 am | नितिन थत्ते
धर्म संस्कार आणि आस्तिकता नास्तिकता यांवर बरीच संकल्पनात्मक चर्चा झाली आहे. बर्याच जणांचा श्रद्धा / कर्मकांडे स्वत:पुरती ठेवावी असा दृष्टीकोन दिसतो. आता लोकांच्या तदनुषंगिक वागण्याविषयी थोडे.
१. देव/कर्मकांड स्वतःपुरते सीमित ठेवणारे, जमेल तेवढे करणारे न जमल्यास सोडून देणारे आणि इतरांना त्याचा त्रास होणार नाही हे पाहणारे. उदा. गुरुवारचा उपास असतो तरी कोणाघरी गेल्यास तो उपास न करणारे (थोडक्यात ज्याचे घरी गेला त्यांनी मुद्दाम उपासाचे जेवण एकट्यासाठी बनवावे अशी अपेक्षा सोडून देऊन त्यांनी जे बनवले असेल ते खाणारे).
२. कर्मकांडे स्वतःपुरती ठेवणारे, पण ती करायलाच हवीत असे वाटणारे आणि एखाद्या दिवशी जमली नाहीत तर मनातून अस्वस्थ होणारे आणि त्यामुळे कामाच्या दर्जावर परिणाम होणारे. अॅलन नॉट या इंग्लंडच्या विकेटकीपरला बॅटिंग करताना प्रत्येक चेंडू खेळण्यापूर्वी बेल्स ना हात लावून 'नमस्कार' करण्याची खोड होती एकदा आपले यष्टीरक्षक फरूक इंजिनिअर यांनी त्याला तसा नमस्कार करू दिला नाही. त्यानंतर तो लवकर बाद झाला अशी काहीशी गोष्ट वाचल्याचे आठवते.
३. कर्मकांडे इतर गोष्टींपेक्षा महत्वाची मानणारे. कर्मकांडांसाठी इतरांना त्रास होईल असे वागणारे.
उदा. दुकानात ग्राहक उभा असताना देवापुढे उदबत्ती फिरवत राहणारे आणि सर्व देवांपुढे उदबत्ती फिरवून होईपर्यंत ग्राहकाला ताटकळत ठेवणारे दुकानदार.
काही टेस्टिंग चालू आहे ते तसेच टाकून वेळ झाली म्हणून नमाज़ पढायला निघून जाणारे.
यात वरच्या उपासवाल्या माणसाचे उदाहरण घेता येईल आणि त्यात उपास आहे (आणि उपासाचे पदार्थ नाहीत) म्हणून काहीच न खाता तसेच राहून यजमानाला संकोच आणणार्या लोकांचा समावेश करता येईल का?
असे लोक तुम्ही पाहिलेच असतील.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
4 Jul 2009 - 1:07 pm | बिपिन कार्यकर्ते
अजून एक प्रकार आहे....
सर्व कर्मकांडं / संकल्पना यांच्या पलिकडे जाऊन शांतपणे केवळ आपल्या स्वतःच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी (जे धर्माचे खरे साध्य आहे) प्रयत्नशील असणारे. या लोकांची कर्मकांडाच्या बाबतीत स्थिती 'आहे आहे, नाही नाही' अशी असते.
अर्थात, खराटा यांनी सांगितलेल्या प्रकारची माणसे असतातच आणि बघितली पण आहेत. गंमत म्हणजे अशी माणसे ज्याला आपण सोयीसाठी अश्रध्द / नास्तिक किंवा बुध्दिवादी म्हणतो त्यांच्यातही किंवा इतर कोणत्याही इझमला घट्ट आणि आंधळेपणाने चिकटून बसलेल्या लोकांतही दिसतात. (इथे सुनिताबाई देशपांड्यांनी एका महान गांधीवाद्याचा आलेला अनुभव लिहिलाच आहे.)
कारण? तेच नेहमीचे... माणूस इथून तिथून सारखाच. आंधळेपणाने केलेले कोणतेही कृत्य हट्टीपणातच परिणत होते बहुधा.
इथे खराटा यांचे विचार वाचून मनात सहज आलेले विचार मांडले आहेत. कोणत्याही प्रकारची टिप्पणी किंवा नकारात्मक भाष्य करण्याचा हेतू नाही. गांधीवादांचे उदाहरण पटकन आठवले म्हणून दिले आहे. इथे गांधी, गांधीवाद, गांधीवादी इत्यादींवर चर्चा अपेक्षित नाही.
बिपिन कार्यकर्ते
4 Jul 2009 - 1:39 pm | नितिन थत्ते
पहिल्या परिच्छेदातल्या विषयातले 'अध्यात्मिक उन्नती वगैरे' काही कळत नाही त्यामुळे मत देत नाही.
दुसरा भाग बरोबर. 'माझी शेळीला खायला घालायची वेळ झाली' हा प्रसिद्ध उद्गार हे तसलेच उदाहरण आहे.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
10 Jul 2009 - 5:29 pm | प्रकाश घाटपांडे
https://download.yousendit.com/dVlvdFdaY3lwTVYzZUE9PQ इथे ऐका दाभोलकर- शंकर अभ्यंकर यांचा श्रद्धा -अंधश्रद्धा या विषयावरील वाद संवाद
स्थळ- एसेम जोशी सभागृह पुणे
दिनांक व वेळ-१८ जुन २००९ सायं ६.३०
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.