हा पदार्थ केवळ चांगली फोडणी करण्यावर अवलंबून असतो. फोडणी काजळीपूर्वक केली की पहिल्या घासातच मन तृप्त होते.
फोडणी करण्याची पद्धत - १) फोडणीचे साहित्य नेहेमी तयार ठेवावे मगच तेल गरम करायला घ्यावे. २) सुरवातीला पोह्याच्या हिशोबाने तेल घ्यावे (साधारण अर्ध्या किलो पातळ पोह्याला ३ टेबलस्पून तेल) आणि कढल्यात मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. ते जरा कोमट झाले की हाताने अर्धा चमचा मोहोरी घालावी. ३) ती तडतडायला लागली की हातात अर्धा चमचा उडिदाची डाळ तयार ठेवावी. वाट पाहावी. मोहोरीच्या तडतडण्याचा आवाज बंद झाल्याक्षणी उडिदाची डाळ घालावी. ४) ती जरा केशरी झाली की लगेच शेंगदाणे घालावेत. ५) २-४ क्षणांनंतर चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. ६) कांदा पारदर्शक झाला की हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. ७) ते तुकडे जरा मऊ झाले की थोडे हिंग शिंपडावे. ८) लगेचच अर्धा चमचा हळद घालावी आणि विस्तव बंद करावा. ९) मग अर्धा चमचा तीळ घालावे. (तीळ फोडणी विस्तवावर असताना घातले तर तडतडून भांड्याच्या बाहेर उडतात). फोडणी तयार.
(हिच फोडणीची कृति सर्वत्र वापरावी मात्र ज्या फोडणीत लसुण घालायची असते त्यात कांदा घालायचा नसतो आणि आमटी करताना फोडणीत मेथीचे दाणे पण घालतात. ह्यात नमूद केलेला चमचा हे माप मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्याचे आहे.).
आता पातळ पोहे घ्यावेत (भाजून घेतले तर छानच अथवा तसेच पण चालतात). त्यात फोडणी घालावे. पोहे न भाजता कच्चेच घेतले असतील तर हाताने यथेच्छ दडपावेत. मग त्यात वरून कच्चा चिरलेला कांदा, टोमटो, कोथिंबीर, खवलेले खोबरे (एकत्र) जरा हाताने चुरून घालावेत. मग फक्त झार्याने एक हात मारावा. दडपे पोहे तयार.
एकावेळी मस्त वाडगाभर किंवा त्यापेक्षा जास्त खावेत. एक घास ३२ वेळा चावून खायला हरकत नाही कारण प्रत्येक चावा वेगवेगळा स्वाद देतो. (ह्या पोह्यात फोडणी करताना मिरची ऐवजी सांडगी मिरची पण घालता येते.)
प्रतिक्रिया
6 Mar 2008 - 7:54 am | विसोबा खेचर
वा! दडप्या पोह्यांची पाकृ अगदी यथासांग दिली आहे. वाचूनच पोट भरले! :)
अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ येऊ द्यात...
आपला,
(पोहेप्रेमी) तात्या.
6 Mar 2008 - 9:20 am | चित्रा
पण आमच्याकडे थोडी वेगळी करत -म्हणजे कांदा, कोथिंबीर, इत्यादी बारीक चिरून खोबरे वगैरे घालून तसेच कच्चेच दडपून ठेवायचे, आणि मग वरून फक्त मोहरीची नेहमीची फोडणी शेंगदाणे घालून द्यायची. त्यात पोह्याचे (लाल) पापडही भाजून चुरा करून घालत.
6 Mar 2008 - 9:51 am | सृष्टीलावण्या
पोह्याचे पापड म्हटले की वडखळ नाका, पांढर्या कांद्याच्या माळा आठवतात.
कालच पोपा खमंग भाजून तांदळाच्या खिचडीबरोबर खाल्ले.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
6 Mar 2008 - 9:14 pm | सुवर्णमयी
मी पण चित्रा म्हणते तसे दडपे पोहे करते. ही पाककृती थोडी वेगळी आहे, करुन बघेन.
7 Mar 2008 - 1:24 am | केशवराव
चित्रा ,
तू सांगितलेस ते खरे दडपे पोहे.' त्यात पोह्याचे ( लाल ) पापडही --------- ' आता खरी मजा आली.
---------- केशवराव.
6 Mar 2008 - 9:24 am | सर्किट (not verified)
आमच्या विदर्भात दडप्या पोह्यांची वैदर्भिय आवृत्ती म्हणजे कच्चा चिवडा.. फोडणी वगैरे काही नाही.. विस्तवाशी संबंध नाही.. म्हणजे "ग्रीन रेसिपी" !!
पण जबरा !!!
- सर्किट
6 Mar 2008 - 9:13 pm | सुवर्णमयी
ह्म्म, आठवणी जाग्या झाल्या. मी घरी कधी हा चिवडा खाते तर प्रसन्न आणि मुले हे काय असा चेहरा करुन बघत असतात..
6 Mar 2008 - 10:13 am | विजुभाऊ
ही तर साध्या चिवड्यची पा क्रु.
दडपे पोहे म्हणजे कच्चे पोहे...त्याला नारळाच्या पाण्यात हलके भिज्वावे...त्यात भरपुर खोबरे ओले किसुन टाकावे.हिरव्यामिरचीचे तुकडे , लिंबु पिळावे,मीठ साखर
मग त्याला फोडणी द्यावी.....
पोहे नारळाच्या पाण्यात हलके भिजवुन ठेव्तात आणि ते नीट भिजावे म्हणून दडपुन ठेवतात्..म्हणुन याला दडपे पोहे म्हणतात.
6 Mar 2008 - 9:16 pm | चतुरंग
मी प्रतिसाद बघत बघत जात होतो की नारळाचे पाणी आणि दडपून ठेवणे ह्या दोन्ही गोष्टी नसताना हे पोहे 'दडपे' कसे?
आणि तुमचा प्रतिसाद भरुन पावला!
सृष्टीताई, नारळाच्या पाण्याशिवाय आणि दडपून ठेवल्याशिवाय ती चव येत नाही हो!
माझी बायको हे पोहे छान करते. (आईच्या हातचे तर खासच असतात पण अजून जवळजवळ १० महिने तरी वाट बघावी लागणारः(()
चतुरंग
16 Mar 2008 - 8:08 am | सृष्टीलावण्या
तुम्ही हे नारळाच्या पाण्यात दडपता हे जाड पोहे आणि मी लिहिलेय ते पातळ पोह्याविषयी. इथेच सर्व घोळ झाला आहे.
आम्ही कोकणातले असूनसुद्धा जेवणात फार नारळ वापरत नाही. म्हणून जाड पोह्यांऐवजी पातळ पोहे वापरतो. आता जर पातळ पोहे नारळाच्या पाण्यात दडपले तर लगदाच होईल.
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
6 Mar 2008 - 10:22 am | सृष्टीलावण्या
मंडळी, मीठ साखर मी पारच विसरले होते..
इजुभाव.. आम्ही करतो ते पोहे लांज्याकडचे.. तुम्ही म्हणताय ते अष्टागारातले... फरक असायचाच...
.
.
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
6 Mar 2008 - 10:29 am | सृष्टीलावण्या
कुलाबा जिल्ह्यात, चिंचेचे जास्त उत्पादन. म्हणून पोह्यात चिंच घालून कोळाचे पोहे करतात. हातखंबा, संगमेश्वर पर्यंत नारळाची झाडे जास्त म्हणून खोबरे जास्त वापरतात पण लांजा, राजापूरकडे सुपारीचे उत्पादन जास्त आणि नारळाची झाडे कमी म्हणून स्वैपाकात खोबरे कमी वापरतात.
.
.
.
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
6 Mar 2008 - 7:10 pm | वरदा
ही तर साध्या चिवड्यची पा क्रु.
दडपे पोहे म्हणजे कच्चे पोहे...त्याला नारळाच्या पाण्यात हलके भिज्वावे...त्यात भरपुर खोबरे ओले किसुन टाकावे.हिरव्यामिरचीचे तुकडे , लिंबु पिळावे,मीठ साखर
मग त्याला फोडणी द्यावी.....
अगदी खरं....आणि थोडी कोथिंबिर आणि आणखी आंबटपणा हवा असल्यास टॉमॅटो घालावा....
6 Mar 2008 - 10:36 pm | सुधीर कांदळकर
खाल्ले आहेत. पण फोडणी हाच प्रभावी घटक होता.
6 Mar 2008 - 11:53 pm | स्वाती राजेश
विजूभाऊ नी लिहिल्याप्रमाणे दडपे म्हणजे दडपून केलेले..
प्रथम १/२ तास पातळ पोहे नारळाचे पाणी शिंपडून दडपून ठेवावे.
नंतर खमंग फोडणी (मोहरी, जिरे, हिंग्,हळद) त्यात हिरव्या मिरच्या, कडिपत्ता, कांदे, भाजलेले शेंगदाणे घालून त्यावर घालावे.
नंतर मेतकूत, मीठ्,साखर,लिंबू घालून कालवावे.
सर्व्ह करताना वरील तयार पोहे, त्यावर ओले खोबरे आणिकोथिंबीर घालून द्यावे.
7 Mar 2008 - 9:37 pm | वरदा
माझ्या घरी कांदाही कच्चाच असतो..तो फोडणीत नसतो..बाकी क्रुती सेम्...आणि मेतकूट नाही खाल्ले त्यात घालून आता ६ महिने वाट पाहेन मेतकूट आणेपर्यंत...
16 Mar 2008 - 11:20 am | ॐकार
आमच्याकडे ताकातले दडपे पोहे असतात. ताकात दडपून त्यात मीठ, साखर, तीखट/मिरच्या; वरून फोडणी आणि पेण/पनवेल हून आणलेले पोह्याचे पापड भाजून वर कुस्करून टाकायचे. ह्यापेक्षा जास्त शब्द आणि जिन्नस याची गरजच नाही!
22 Apr 2008 - 4:09 pm | प्रमोद देव
साहित्य:- २ वाट्या पातळ पोहे, २ मध्यम आकाराचे कांदे, ३ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी खोवलेला नारळ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती:- प्रथम पोहे ओव्हन मध्ये किंवा गँसवर भाजून घ्यावेत, पोहे थंड झाल्यावर हाताने ते चुरुन ठेवावेत. एका वेगळ्या डिश मध्ये चिरलेला कांदा घ्यावा, त्यात मीठ व मिरची चुरडून घालावी, नारळ , कोथिंबीर घालावी, व सर्वात शेवटी चुरडलेले पोहे घालावेत व मिश्रण एकत्र करावे. हे पोहे लगेचच खावे म्हणजे मस्त कुरकुरीत लागतात.
हा प्रतिसाद मी माझ्या पुतणीच्या वतीने देतोय.
कारण, मला खाता येतं. बनवता येत नाही. :))))))))
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे