आयुर्वेद

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in काथ्याकूट
5 Mar 2008 - 9:10 am
गाभा: 

पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. पूर्वी तिथे मोठी शेंडी कार्यरत होती पण आता तेथे बाळासाहेब नावाची छोटी शेंडी काम करते.

हे बाळासाहेब सुद्धा तेव्हढ्याच कमालीचे कुशल कारागिर आहेत. आजही ते काही नसा दाबून स्थानिक भूल न देता सहजतेने दात काढतात. पण त्यांचा भर दात न काढता शक्यतो ते टिकविण्यावर असतो. ते दर शनिवारी सकाळी १०.०० वाजता मुंबईत दादर स्थानकाबाहेर माधववाडीत येतात आणि आम्ही केवळ दातांवरच नव्हे तर सर्वच आजारांवर त्यांचा सल्ला घेतो. असो.

लेखाचा मुद्दा की आयुर्वेद हे एक अजब, गुढ, गहन ज्ञान आहे.

मी फार पूर्वी वाचले होते. एक सोनार असतो त्याला प्रचंड डोकेदुखीचा त्रास असतो, सगळे पाश्चिमात्य औषधोपचार, क्ष-किरण इ. तपासण्या होतात पण रामबाण उपाय होत नाही. मग त्या सोनाराला एका वैद्याची महती कळते आणि तो सोनार मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे येतो. ते वैद्य फक्त एका वैद्यकीय सुरीने कानाजवळ एक छेद देतात व वैद्यकीय चिमट्याने तिथून पाव ग्रॅम सोने काढतात. त्या सोनाराची डोकेदुखी कायमची थांबते.

झाले असे होते की सोने फुंकता फुंकता त्या सोनाराच्या नाकातून बारीक सोन्याचे कण जात राहायचे जे नासिकामार्गातून पुढे जाऊन एका विशिष्ट ठिकाणी साचत राहायचे व तिथे इतर श्लेष्म घटकांमुळे त्याचा गोळा बनलेला होता. ज्यामुळे त्या सोनाराला डोकेदुखी जडलेली होती.

गेल्या शतकात संगमनेरात बाजारपेठेत गुणे वैद्य राहायचे. त्यांच्याकडे अनेक क्लिष्ट आणि ज्यावर
इतर अभ्यासक्रमाच्या डॉक्टरांनी ह्यावर इलाज नाही असे सांगितले असायचे अश्या अनेक दुर्धर रोगांवर इलाज व्हायचा आणि अनेक केईएम च्या डॉक्टरांनी त्यांना ह्याबद्दल प्रशस्तिपत्रे लिहिली होती.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

5 Mar 2008 - 9:22 am | प्राजु

खरंतर हा काही चर्चा करण्यासारखा विषय नाही. कारण आयुर्वेदावर ८०% लोकांचा तरी विश्वास नक्की आहे. आणि त्यातून येणारे गुण हे वादातीत आहेत. मी माझ्या लहानपणापासून आयुर्वेदीक औषधेच घेत आले आहे. त्यामुळे मी तरी तुम्ही लिहिलेले खोटे असू शकेल असे म्हणणार नाही.
आयुर्वेदात ती ताकड आहेच हे जगन्मान्य सत्य आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु

सृष्टीलावण्या's picture

5 Mar 2008 - 12:54 pm | सृष्टीलावण्या

मुख्य आक्षेप तीन...

१) आयुर्वेदाला side effects असतात (मला तरी असा अनुभव नाही).
२) आयुर्वेद आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडू शकत नाही.
३) आयुर्वेदातील गुढ ज्ञान विद्वान् वैद्य मंडळी आपल्यासोबत वर घेऊन जातात, पुढील पिढीला देत नाहीत.

>
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 10:50 am | विसोबा खेचर

व्यक्तिश: माझ्याकरता तरी आजपर्यंत इतर कुठल्याही पथीपेक्षा ऍलोपथीच सर्वात जास्त गुणकारी ठरली आहे.

आज माणसाचे सरसरी आयुर्मान वाढले आहे आणि अनेक दुर्धर रोगांवर एका पेक्षा एक प्रभावशाली औषधे उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा जगभरातील लाख्खो लोक घेत आहेत याचे संपूर्ण श्रेय केवळ अन् केवळ ऍलोपथीला आहे....

आणि म्हणूनच ऍलोपथीबद्दल आणि ऍलोपथीचा अभ्यास करणार्‍या आणि संशोधन करणार्‍या जगभरातील सर्व डॉक्टर आणि संशोधक मंडळींबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे...

आपला,
(कट्टर ऍलोपथीवादी) तात्या.

मदनबाण's picture

5 Mar 2008 - 12:11 pm | मदनबाण

आयुर्वेद= रोगाचे मुळापासुन उच्चाट्न करणारी उपचार पद्दत.
ऍलोपथी== झटपट बरे करा (एक गोली तीन ईलाज)
आज माणसाचे सरसरी आयुर्मान वाढले आहे आणि अनेक दुर्धर रोगांवर एका पेक्षा एक प्रभावशाली औषधे उपलब्ध आहेत=== तात्या च्यवनप्राश रोज खाउन तर पहा....

(लहानपणी जनमघुट्टी प्यायलेला)
मदनबाण

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Mar 2008 - 12:27 pm | llपुण्याचे पेशवेll

पत्र्यामारुतीच्या बोळाजवळच मुंजाबाच्या बोळात वैद्य अशोक भट म्हणून होते.
त्यानी माझ्या दादाला(वय वर्षे ६ चा असताना) झालेली आव, जी ६-८ महीने पण ऍलोपथिक औषधाने बरी झालेली नव्हती , ती ३ दिवसात बरी केली.
तसेच काविळीवर औषध देणारे खुन्या मुरलीधराच्या देवळातले 'खरे वैद्य' ते पण काविळीवर उत्तम उपचार करतात.
पुण्याचे पेशवे

वरदा's picture

5 Mar 2008 - 7:22 pm | वरदा

तात्या मु़ळात ऍलोपथी आलीच आयुर्वेदातुन..आता माझे संशोधन आहे अस्थमा ह्या विषयावर म्हणून त्याचं उदाहरण लिहिते...जीएस्के चं सगळ्यात पॉप्युलर औषध Advair Diskus कुठुन आलं हे शोधताना सापडलं की भारतीय आणि चिनी लोक पुर्वी धोत्र्याची पानं जाळून त्याची वाफ घेत असत आणि खोकला बरा करत्..फयझर च्या संशोधकांनी त्यावर विशेष संशोधन करुन त्यातील Active Ingredient शोधला आणि पुढे त्यावर सुधारणा होत होत आजचे औषध तयार झाले....तेव्हा आधी आदर केलाच पाहीजे तो आपल्या ऋषीमुनींचा..त्यांची पुस्तकं वापरूनच ऍलोपथी तयार झाली...त्या औषधांची ताकद ऍलोपथीला नक्कीच नाही येणार्...ती औषधं जे समूळ रोग काढून टाकायला मदत करतात ती ऍलोपथी करत नाही..फक्त त्याची माहीती हवी...आणि अगदी हार्ट ऍटॅक आल्यावर ती वापरणं शक्य होत नाही हे नक्की खरं पण तो येऊ नये ह्याची खबरदारी घ्यायला सर्वात जास्तं उपयोग होतो तो ह्याच औषधांचा....

धनंजय's picture

5 Mar 2008 - 9:37 pm | धनंजय

तुमच्या म्हणण्यात तथ्य दडलेले आहे, पण ते नीट उघड होत नाही.

ऍलोपॅथी म्हणजे नेमके काय? मला वाटते की सर्वात प्रस्थापित अशा पाश्चिमात्य भाषांत शिकवल्या जाणार्‍या उपचारांना लोकांत ऍलोपॅथी म्हणतात. पण या पद्धतीस कुठले तात्त्विक नाव द्यायचे झाले "प्रयोगप्रमाण पद्धत" असेच द्यावे लागेल. या पद्धतीस कुठल्याच स्रोतातून आलेल्या औषधांबद्दल तात्विक स्पृश्यास्पृश्यता नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही नवीन औषधांमध्ये भारतात पूर्वी माहीत असलेल्या वनस्पतींमधील रासायनिक तत्त्वे आहेत. याबाबत चांगले उदाहरण सर्पगंधेचे देता आले असते. यातील "रेसेर्पीन" रसायन रक्तदाब आणि मनोविकारात वापरतात. (तुमच्या Advair Diskus उदाहरणाबद्दल पुढे...)

त्याच प्रकारे वेगवेगळ्या देशांतून अन्य वनस्पती मिळाल्या. दक्षिण अमेरिकेतून क्युरारे हे स्नायू शिथिल करणारे औषध. देवी रोगाची लस कळण्याचे दोन स्त्रोत : १. इंग्लंडमध्ये गवळणींना देवी रोग होत नाही हे लक्षात येणे (गावकर्‍यांना आधीपासून ठाऊक होते की, की गुरांचा सौम्य देवी-सदृश रोग ज्या गवळ्या-गवळणींना होतो, त्यांना माणसांचा घातक देवीरोग होत नाही.) २. तुर्कस्तानातील लोक एका देवी आलेल्या मुलाची वाळकी खपली दुसर्‍या मुलाला खरचटून लावत असत, बहुतेक वेळी दुसर्‍या मुलाला सौम्य देवी रोग होत असे. इ. इ.

अशा प्रकारे प्रयोगाने प्रमाणित झालेले जगभरातले कुठलेही औषध आधुनिक उपचारात वापरले जाते. शक्यतोवर त्यास थोडे अधिक सुरक्षित करून. देवीची खपली लावलेल्या मुलांना खूपदा जहाल देवी येते, पण देवीची लस त्या मानाने अत्यंत सुरक्षित असते. (देवीचे निर्मूलन झाल्यामुळे देवीची लस आज वापरात नाही, पण खपल्या लावण्यापेक्षा ती सुरक्षित होती म्हणूनच तिचा मोठ्या प्रमाणात वापर करून देवी रोग आटोक्यात आला.)

आधुनिक वैद्यकाची पाळेमुळे जगभर आहेत, एकट्या आयुर्वेदात नव्हेत. जगभरातील सर्व देशातील सर्व ऋषिमुनींना अर्थातच नम्र अभिवादन केले पाहिजे. तुमचे हे म्हणणे पटण्यासारखे आणि आचरण्यासारखे आहे.

पैकी तुम्ही उदाहरण दिलेत त्याबद्दल मला आश्चर्य वाटते.
१. Advair Diskus हे आस्थम्यावर सगळ्यात लोकप्रिय औषध नाही.
२. या Advair Diskus स्प्रे मध्ये एक नसून दोन औषधे आहेत. एक आहे फ्लुटिकासोन. हे स्टिरॉईड जातीचे आहे. अशा प्रकारची स्टिरॉइड रसायने मनुष्यांच्या/प्राण्यांच्या अड्रीनल ग्रंथीतून स्रवतात. त्यांच्या सारखे हे कृत्रिम रसायन आहे. धोत्र्याशी संबंध लागत नाही. दुसरे रसायन साल्मेटेरॉल. हेही एक कृत्रिम औषध आहे, ज्याचा धोत्र्याच्या पाल्याशी काय संबंध आहे ते कळून येत नाही. (धोत्र्याच्या अर्काने वेगळ्याच पेशीसंस्थेवर परिणाम होतो, आणि साल्मेटेरॉलने वेगळ्याच पेशीसंस्थेवर; म्हणजे येथे सैद्धांतिकही देवाणघेवाण दिसून येत नाही...)
३. तुम्हाला बहुधा "इप्राट्रोपियम" औषधाबद्दल बोलायचे आहे. यातील रासायनिक तत्त्व हे धोतर्‍यातल्या एका तत्त्वाच्या सारखे आहे. पण हे रसायन "बेलाडोना" या वनस्पतीतील "ऍट्रोपीन" रसायनाशी साम्य राखून आहे, आणि ही वनस्पतीही युरोप, आफ्रिकेत फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. आधी सांगितल्याप्रमाणे "प्रयोगप्रमाण" उपचार पद्धतीत उगाच चिनी-भारतीय-युरोपियन-आफ्रिकन-ऍमॅझॉन इथले नाही घेणार, प्रयोगशाळेतलेच घेऊ, अशी भाकड शिवाशीव नाही. योग्य संशोधनाची काळजी घेत, कोणतेही औषध रोग्यांना द्या, गुण आल्याचे दाखवा, प्रयोगप्रमाण उपचारपद्धती त्यास आत्मसात करण्यास तयार असते. योग्य संशोधन म्हणजे रोग्यास इजा होणार नाही अशी काळजी घेणारे, हे ओघाने आलेच.

तुमचे या विषयावर माझ्यापेक्षा अधिक वाचन आहे, तुम्ही आणखीही लिहावे, माझी माहिती चुकली असल्यास सांगावे.

सर्किट's picture

5 Mar 2008 - 11:21 pm | सर्किट (not verified)

उत्कृष्ह्ट प्रतिसाद.

आधुनिक वैद्यकाची पाळेमुळे जगभर आहेत, एकट्या आयुर्वेदात नव्हेत. जगभरातील सर्व देशातील सर्व ऋषिमुनींना अर्थातच नम्र अभिवादन केले पाहिजे. तुमचे हे म्हणणे पटण्यासारखे आणि आचरण्यासारखे आहे.

अगदी अचूक. पण त्याबरोबरच, फक्त नम्र अभिवादन करून भागणार नाही. प्रयोगप्रमाण करून नवनवीन औषधे शोधून काढणे हे महत्वाचे.

- सर्किट

कोलबेर's picture

6 Mar 2008 - 1:34 am | कोलबेर

माझी माहिती चुकली असल्यास सांगावे

योगायोगाने माझे काम देखिल दमा आणि उपचार ह्यांच्याशी निगडीतच आहे आणि त्यावर केलेल्या वाचनावर आधारीत तुम्ही दिलेली Advair Diskus माहिती मला तरी योग्य वाटते.

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 11:47 pm | विसोबा खेचर

वरदा,

१) तुझ्या म्हणण्याचा मी आदर करतो,

२) कोणत्याही पथीवर माझा व्यक्तिश: रागलोभ नाही,

३) मी वैद्यकीय क्षेत्रातला कुणी तज्ञही नाही,

४) ऍलोपथीचे साईड इफेक्ट्सही मी नाकारत नाही,

५) ऍलोपथीचे मूळ काय? व ती कुठून आली याच्याशीही माझं काही देणंघेणं नाही,

६) काही क्रॉनिक व्याधी जसे जुना मायग्रेन, स्पॉन्डिलायटिस, सायनसचा त्रास इत्यादी आजार ऍक्युप्रेशर किंवा ऍक्युपंक्चर या सारख्या उपायाने पूर्ण बरे होतात हेदेखील मी मानतो,

तरीही...

व्यक्तिश: माझा मात्र ऍलोपथीवरच जास्तत जास्त विश्वास आहे. उद्याचं माहीत नाही, परंतु आजपर्यंतच्या आयुष्यात मी जितक्या वेळा आजारी पडलो तितक्या वेळा मला ऍलोपथीच्या गोळ्या-इंजेक्शनस् मुळेच पूर्ण आणि लवकरात लवकर बरे वाटले आहे. ही सगळी औषधं आणि इंजेक्शनं जगभरातील तज्ञांनी अखंड प्रयोग आणि अभ्यास करून प्रयोगशाळेत सिद्ध करून प्रमाणित केली आहेत. आणि म्हणूनच व्यक्तिश: माझा तरी एलोपथीवरच ठाम विश्वास आणि नितांत श्रद्धा आहे...

आपला,
डॉ तात्या अभ्यंकर.
M. D.

:)

सुधीर कांदळकर's picture

5 Mar 2008 - 9:31 pm | सुधीर कांदळकर

प्रणालीचे कांही फायदे कांही तोटे अहेत. ऍलोपथी देखील आयुर्वेदासम प्राचीन औषधशास्त्राचे आधुनिक रूप आहे. उदा. हिवतापावर पुर्वी ते सिंकोनाचा काढा देत. विसाव्या शतकात त्या काढ्यापासून बनविलेलेले क्विनाईन वापरू लागले. नंतर आधुनिक रसायनशास्त्राचा आधार घेऊन प्रयोगशाळेत अतिशय शुद्ध स्वरूपात बनवू लागले. या प्रणालीचा मोठा तोटा म्हणजे व्यापारीकरण. डॉक्टर कारण नसतांना ढीगभर औषधे देऊन पेशंट आणि औषध कंपनी या दोघांच्याकडून पैसे कमावतात. उदा. साधा सर्दीताप असला तरी टायफॉईड व हिवताप दोन्हीवरील औषधे देतात.

आयुर्वेदाती अहंमन्य शास्त्रज्ञांनी आधुनिक विज्ञानाची मदत नाकारली. उदा. अडुळशाच्या पाल्यात व्हॅसिसीन हे औषधी द्रव्य असते. याचे १०० ग्रॅ. पानांतील प्रमाण पावसाळ्यात कमी व हिवाळ्यात जास्त असते. वातावरणातील व पानातील पाण्याच्या प्रमाणामुळे. परंतु प्रसिद्ध कंपन्या देखील अडुळसा औषधात (फॉर्म्युलेशनमध्ये) वापरतांना त्यातील व्हॅसिसीनचा ऍसे घेत नाहीत. आयुर्वेदतज्ञाने एक्स रे, सोनोग्राफी इ. चाचण्यांचा कधी आधार घेतला नाही. प्राणघातक अपघातात धावून येते ती ऍलोपथी.

आता साईड इफेक्ट्स. याचे बरेच प्रकार आहेत. आयुर्वेदाला ते नसतात हा शुद्ध गैरसमज आहे. सदाफुली ही कॅन्सरवर उपयोगी आहे. तिच्या रसात ६२ अल्कलॉईड्स आहेत. पैकी विनब्लास्टीन व विनीक्रेस्टीन ही दोनच उपयुक्त आहेत. आयुर्वेदात ही सगळी देतात. ऍलोपथीत फक्त दोन. आता बोला कोणाचे साईड इफेक्ट्स जास्त.

इनटॉलरन्स नावाचा एक साईड इफेक्ट अहे. म्हणजे औषध स्वीकारण्यास शरीराने दिलेला नकार व विरोधात्मक प्रतिसाद. हा एकच साईड इफेक्ट आयुर्वेदात कमी आढळतो कारण औषध बनविण्यास नैसर्गिक द्रव्ये वापरतात. उदा. रासायनिक प्रक्रियेने बनविलेले इन्शुलिन ब-याच गो-या लोकांना चालत नाही व त्यांना याचा फार त्रास होतो. परंतु प्राणिज इन्शुलिन त्यांना चालते.

कोणत्याहि पदार्थाचे शरीरावर अनेक परिणाम होतात. पैकी कांही आवश्यक असतात कांही अनावश्यक. अनावश्यक परिणामांना अनटोवर्ड इफेक्ट असे म्हणतात.म्हणूनच एकाच औषधाची अनेक वेगळ्या रोगावर उपाययोजना करतात. उदा. ऍस्पिरीन वेदनाशामक म्हणून वापरता येते तर रक्त पातळ करण्यास हृदयरोगावर देखील देतात.

परंतु कापणे, भाजणे , खरचटणे इ. वर होमिओपॅथीसारखा छान इलाज नाही. आमचा मुलगा आज २४ वर्षांचा आहे. पण त्याला आम्ही लहानपणापासून (त्याच्या) प्रथमोपचार म्हणून हायपेरिकम १०००, लेडम १०००, अर्टिका युरेन्स १०००, इ. योग्यतेव्हा योग्य ती औषधे आणि कॅलेंडुला क्रीमच वापरले.

संदर्भः
१. औषधि संग्रह: १९७५, डॉ. वामन गणेश देसाई. (आयुर्वेद)
२. सार्थ वाग्भट: मराठी भाषांतर.
३. एम बी बी एस चे 'प्री मेडिकल' चे 'फार्माएकोलॉजी आणि फार्माएकोथेराप्युटिक्स' या विषयाचे पाठ्यपुस्तक.

औषध अर्धवटाचार्य
सुधीर कांदळकर.

वरदा's picture

5 Mar 2008 - 11:08 pm | वरदा

तुमचं म्हणणं अगदी पटलं..मला फार मोठी हिस्ट्री न देता पॉईंट सांगायचा होता म्हणून मी अर्धे डीटेल्स दिले...मी एट्रोपीन बद्दलच बोलले..धोत्र्याच्या पानांपासूनच प्रथम एट्रोपिन सापडून muscarinic receptor antagonist चा उपयोग होतो हे समजलं असं माझ्या वाचनात आलं..माझा मुख्य विषय त्यातले केमिकल चंजेस हा असल्याने मी त्यावर खूप वाचन न करता त्यातला Active Ingredient वापरून त्यावर प्रयोग करायला सुरुवात केली...ह्या एट्रोपिनवरूनच पुर्वी quaternary ammonium derivatives मिळाले जे एट्रोपिनचे गुणधर्म तर ठेवतात पण side effects कमी करतात. हे नंतर वापरले गेले inhaled corticosteroid शोधण्यासाठी ज्याने side effects कमी होऊन एफिकसी वाढली. आता त्यात बरेच केमिकल चेंजेस तर झालेच अर्थात....(एवढ्यावर मी माझा पहीला प्रॉजेक्ट संपवला)
Advair Diskus हे आस्थम्यावर सगळ्यात लोकप्रिय औषध नाही.

मान्य पण जिएस्के च्या टॉप सेलिंग लिस्ट वर आहे आणि मी उदाहरण देण्यासाठी हे नाव सांगितलं कारण बर्‍याच लोकांना हे माहीत आहे. माझा मुद्दा हा होता की ही सगळी औषधं शोधताना मूळ सुरुवात आयुर्वेदातून झाली..

तुमची उदाहरणे आवडली.. सोपी उदाहरणं देऊन तुम्ही पटकन समजावलंत...ती मला आठवली नाहीत्..रोज हेच डोक्यात बसल्याने मी तेच छापलं...

अवांतर...तुमच्या कडून अजुन शिकायला आवडेल्..अस्थमा सोडून बाकीच्या बाबतीत माझं ज्ञान शून्य....

सुधीर तुम्हीही खूप छान समजावलंत्..पटंलं तुमचं म्हणणं...थँक्यू

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2008 - 12:37 am | पिवळा डांबिस

ऍलोपाथीचे आणिक एक उजवेपण म्हणजे सर्जरी!
सर्जरीतील प्रगतीमुळे ऍलोपाथी आज कुठच्याकुठे जाउन पोचली आहे. सर्जिकल रिमूव्हल किंवा इंप्लांटेशन/ट्रान्सप्लांटेशनचा असंख्य लोकांना लाभ झाला आहे.
खरेतर आयुर्वेदातही प्राचीन काळी सर्जरी होती. चरकाचा "शल्यचिकित्सा" ग्रंथ याचे उदाहरण आहे. पण कालांतराने का कुणास ठाऊक पण आयुर्वेदातून सर्जरीचा विचार कमी झाला. आज क्रिटिकल अवयवांवर (हॄदय, मेंदू वगैरे) आयुर्वेदिक तज्ञांनी सर्जरी केलेली माझ्यातरी पहाण्या-ऐकण्यात नाही.
असे का बरं असावे? जाणकारांनी कृपया खुलासा करावा.

चर्चा छान आहे, चालू द्या...
-पिवळा डांबिस

ह्या संपूर्ण मानवजातीला रोगांपासून मुक्त करण्यासाठी पूर्वापार झटत आहेत. कालपरत्वे त्यांच्यात वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. एक दुसर्‍यापेक्षा चांगला असे सरसकट म्हणणे विपर्यास ठरेल.

१ - अलोपॅथी - ह्याचा मुख्य उपयोग तातडीच्या इलाजांवरती निश्चितच होतो. साईड इफेकट्स असतात पण म्हणून औषधच योग्य नाही असे म्हणणे टोकाचे ठरेल. औषधांचा अतिरेकी आणि विनाकारण वापर हा एक मुद्दा आहे, पण तो त्या संपूर्ण व्यवसायाशी निगडित असा बरेच पैलू असलेला आहे, त्याचा औषधाशी थेट संबंध असण्यापेक्षा माणसाच्या वृत्तीशी आहे. औषधातील भेसळ, रोग्यांचे औषधे योग्य प्रकारे न घेणे (उदा. अँटीबायोटिक्सचा दिलेला कोर्स पूर्णपणे न घेणे इ.) त्या उपचारांना मारक ठरते. त्यात औषधाचा किंवा उपचाराचा दोष नसतो. डायग्नॉस्टिक मेडीसिन ह्या अंतर्गत एक्स्-रे, सोनोग्राफी इ. गोष्टी ह्या तर मानवाला वरदानच आहेत. आज शरीराच्या आत कुठे काय चालले आहे हे समजण्याचा इतका सोपा दुसरा मार्ग नाही.

२ - होमियोपॅथी - सूक्ष्मऔषधी च्या ह्या तंत्राने बर्‍याच चिवट आणि चिकट व्याधींवर रामबाण इलाज होतो. त्यातही दीर्घकाळ योग्यप्रकारे औषध घेणे गरजेचे असते. पी हळद अन हो गोरी असे नसते!

३ - आयुर्वेद - हा तुमच्या संपूर्ण जीवनशैलीवरच भाष्य करतो. तुमचा आहार, विहार, आचार, विचार, संचार, ऋतुमानाप्रमाणे, निसर्गचक्राप्रमाणे कसा असावा; तो तसा नसला तर रोग निर्मिती कशी होते आणि त्यावर उपचार कसे करावेत हे सांगतो. रोग बरा करताना लक्षणांवर उपचार नसून मूळ कारणावर आघात असतो. उपचार हे रोग्याच्या प्रकॄतीनुसार (कफ, वात, पित्त) असल्याने एकाच रोगावर सर्वांना सारख्याच प्रकारे औषधयोजना नसते (इथे अलोपॅथी कमी पडते असे मला वाटते - साईड इफेक्ट्स निर्माण होण्यामागे औषध तुमच्या प्रकृतीला ग्राह्य आहे की नाही ह्याचा सूक्ष्म विचार आयुर्वेदात आहे - जसे एकच औषध वेगवेगळ्या अनुपानाद्वारे दिले जाते पाण्यातून, मधातून, दुधातून इ. नाहीतर "रोग बरा पण साईड इफेक्ट्स आवर" असे होते :)) आणि त्याही पुढे जाऊन "रोग बरा करण्यापेक्षा होणारच कसा नाही" ह्याकडे त्याचा भर आहे.
ह्यातही औषधनिर्मिती करताना कच्चा माल कसा असावा, औषध कसे बनवावे इ. गोष्टींची योग्य पूर्तता झाली नाही तर ते औषध योग्य प्रकारे कम करत नाही. (उदा. बाजारात मिळणारे प्रसिध्द कंपन्यांचे घाऊक मालाप्रमाणे बनवलेले च्यवनप्राश आणि संहितेनुसार बनविलेले वैद्यांकडचे च्यवनप्राश ह्यांच्या गुणांत जमीन अस्मानाचा फरक असतो - हे माझे स्वानुभव सिध्द मत आहे.)

तेव्हा सर्व पॅथींची आपापली बलस्थाने आणि कच्चे दुवे आहेत. त्या त्या वेळेप्रमाणे योग्य उपचार घेऊन बरे होणे महत्वाचे.
सर्वे संतु निरामया!

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2008 - 1:10 am | पिवळा डांबिस

मी याच व्यवसायात अनेक वर्षे काढली असल्याने काही माहिती विनयपूर्वक देऊ शकेन.
सर्वप्रथम, डॉक्टरांनी कारण नसतांना उगाच भाराभार औषधे देणे (वा टक्केवारी करणे) वैद्यकीय दृष्ट्या अनैतिक आहे यांत शंका नाही. पण त्याचबरोबर काय आवश्यक व काय अनावश्यक हे ठरवण्याची क्षमता/ वैद्यकीय ज्ञान सर्वसामान्य पेशंटकडे असते का हा ही संशोधनाचा विषय आहे. ऍन्टीबायोटिक्सचा कोर्स घेतल्यानंतर "आता मला बरं वाटतयं" म्हणून त्यावरचा ऍन्टिडोट न घेणारे लोक आहेत...
आज एक औषध शोधून काढण्यासाठी सुमारे १०,००० संयुगांचे गुणधर्म तपासून पहावे लागतात. त्यातून एकदा ते 'औषध' (ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट) सापडल्यावर त्याची सुरक्षितता (सेफ्टी) आणि उपयुक्तता (एफिकसी) स्थपित करण्यासाठी प्राण्यांवर व माणसांवर विविध प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. या सर्व केल्याशिवाय एफ. डी. ए. (अन्न व औषध प्रसारण मंडळ) ते औषध बाजारात आणायला परवानगी देत नाही. या सर्व कामात आठ-दहा वर्षे आणि सुमारे साठ ते ऐशी कोटी डॉलर्स (रुपये नव्हे, डॉलर्स) खर्च होतात. औषध कंपन्या ह्या काही सेवाभावी संस्था नव्हेत, त्या बिझनेस करीत असतात. दुसरे नवीन औषध जर शोधून काढायचे असेल तर हि आधीची गुंतवणूक रिकव्हर करावीच लागते. तेंव्हा ही आधी केलेली प्रचंड गुंतवणूक वसूल करण्यासाठी त्यांच्याकडे सहा-सात वर्षेच असतात. कारण नवीन औषधांवर जरी त्याचं पेटंट असलं तरी ते फक्त १५ वर्षांसाठीच असतं आणि ते फाईल केल्यापासून ड्रग बाजारात आणे पर्यंत त्यातील सहा-सात वर्षे निघून गेलेली असतात. एकदा पेटंट चा कालावधी संपला की लगेच जेनेरिक्स बाजारात येतात आणि मग कवडी मोलाने औषध विकावं लागतं. म्हणूनच बाजारात येणारी नवीन औषधं नेहमीच अतिशय महाग असतात.
हे झालं ऍलोपाथिक औषधांच्या बाबतीत! आयुर्वेदिक व इतर औषधांना भारतात एफ. डी. ए. ऍप्रूव्हल लागतं की नाही हे ठाऊक नाही, स्थानिक तज्ञ मंडळी त्यावर अधिक माहिती देऊ शकतील.

सर्किट's picture

6 Mar 2008 - 1:20 am | सर्किट (not verified)

तुम्ही, आणि धनंजय मिळून औषध निर्मितीवर एक सुंदर माहितीपूर्णं लेख लिहावा अशी जाहीर विनंती.

- सर्किट

कोलबेर's picture

6 Mar 2008 - 1:46 am | कोलबेर

औषध कंपन्या ह्या काही सेवाभावी संस्था नव्हेत, त्या बिझनेस करीत असतात.

आपल्या प्रतिसादाशी सहमत असलो तरी बर्‍याचदा ह्या औषध कंपन्या कशी चापलुसी करतात हे बघीतले आहे. उदाहरणार्थ पेटंट ची सहा/सात वर्षे जेव्हा संपतात (पैसे मिळवायची) तेव्हा ह्या कंपन्या त्वरीत त्याच मूळ औषधाचे वेगळे वेगळे प्रकार बाजारात आणतात (उदा एक्स्टेंडेड रिलिज वगैरे) आणि कधी कधी मूळ औषधापेक्षा स्वस्तात ते विकतात. साहजीकच डॉक्टर लोकांना ते पटवून देतात की हे नविन औषध लिहावे (स्वस्त आणि अधिक प्रभावी) आणि दुसरीकडे लगेच ह्या नविन प्रकाराचे प्रोसेस पेटंट काढतात. इकडे मूळ औषधाचे पेटंट संपले असले तरी डॉक्टरांच्या लेखणीत आता एक्स्टेंडेद रिलिज व्हर्जन बसलेले असते आणि त्यामूळे मूळ औषधाला स्वस्त जेनेरिक पर्याय उपलब्ध असला तरी ह्या नविन प्रकाराला नसतो. त्यामूळे शेवटी ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असणारा पेशंट मात्र ही महागडी औषधे खात रहातो.

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2008 - 2:33 am | पिवळा डांबिस

उदाहरणार्थ पेटंट ची सहा/सात वर्षे जेव्हा संपतात (पैसे मिळवायची) तेव्हा ह्या कंपन्या त्वरीत त्याच मूळ औषधाचे वेगळे वेगळे प्रकार बाजारात आणतात (उदा एक्स्टेंडेड रिलिज वगैरे) आणि कधी कधी मूळ औषधापेक्षा स्वस्तात ते विकतात.
हे काही प्रमाणात खरं आहे, पण त्यामागचा हेतू हा नेहमीच 'चापलुसी' किंवा अतिरिक्त नफेखोरी हा नसतो. ड्रग जेंव्हा बाजारात पहिलं पदार्पण करतं तेंव्हा त्यावर कंपनीचे जास्तीत जास्त पैसे खर्च झालेले असतात पण अजून त्यापासून उत्पन्न शून्य असतं. अशा वेळी ते ड्रग स्वस्तातील स्वस्त फॉर्म्युलेशन मध्ये (इंजेक्शन असेल तर लिक्विड, गोळी असेल तर साधी टॅबलेट/ कॅपसूल) बाजारात आणून एकदा उत्पन्नाचा स्त्रोत चालू करायचा हाच उद्देश असतो. स्लो रिलिज किंवा एक्स्टेंडेड रिलिज फॉर्म्युलेशन्स बनवायला खर्चिक असतात. जेंव्हा या औषधापासून त्याचे स्वतःचे उत्पन्न मिळू लागते तेंव्हाच रिफॉर्म्युलेशन, एक्स्टेंडेड इफेक्ट, नेक्स्ट जनरेशन यासाठी पैसा उपलब्ध होतो. त्याला प्रॉडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट म्हणतात. हे सर्वच प्रकारच्या उत्पादनात चालू असतं. उदा. सॉफ्टवेअरची बाजारात येणारी नवी-नवी व्हर्शन्स!

साहजीकच डॉक्टर लोकांना ते पटवून देतात की हे नविन औषध लिहावे (स्वस्त आणि अधिक प्रभावी) आणि दुसरीकडे लगेच ह्या नविन प्रकाराचे प्रोसेस पेटंट काढतात. इकडे मूळ औषधाचे पेटंट संपले असले तरी डॉक्टरांच्या लेखणीत आता एक्स्टेंडेद रिलिज व्हर्जन बसलेले असते

नवीन औषध खरोखरच स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे की नुसतं औषध कंपनीचं मार्केटिंग आहे ते तज्ञ डॉक्टरांनी ठरवायचं असतं. प्रिस्क्रिप्शन करणं, न करणं हे त्यांच्या हातात असतं. त्यांनी या विषयावरचे विविध लेख वाचून, आपल्या इतर डॉक्टर सहकार्‍यांशी चर्चा करून ते ठरवावं अशी अपेक्षा असते. आता काही डॉक्टर जर ती मेहेनत न घेता जर फक्त कंपनीच्या मेड. रेप. वर भरोसा ठेवून औषध प्रिस्क्राईब करत असतील तर तो दोष त्या त्या डॉक्टरांचा नाही का? म्हणून आपला 'विश्वासाचा डॉक्टर" शोधा असे म्हणतात त्यात खूप तथ्य आहे.

कोलबेर's picture

6 Mar 2008 - 3:05 am | कोलबेर

हे काही प्रमाणात खरं आहे, पण त्यामागचा हेतू हा नेहमीच 'चापलुसी' किंवा अतिरिक्त नफेखोरी हा नसतो.

नेहमीच नसला तरी बर्‍याचदा असतो. अनेक औषधांची प्रॉडक्ट एक्स्टेंशन्स पेटंट संपायला आले की हजर होतात. बर्‍याचश्या जेनेरिक कंपन्यांना ही समस्या सध्या भेडसावत आहे. जेनेरिक प्रॉडक्ट बाजारात आणले तरी ते फरसे खपत नाही कारण मोठ्या कंपन्यांनी मेड्.रेप. ची यंत्रणा वापरुन ही एक्स्टेंशन्स डॉक्टरांच्या डोक्यात भरलेली असतात. दुसरे असे की ह्या नव्या औषधांची महती सांगणारे लेख देखिल विविध जर्नल आर्टिकल मध्ये छापून आणले जातात. (आणि त्यात तथ्यही असते कारण ही नविन एक्स्टेंशन्स अर्थातच अधिक प्रभावी असतात, जसेकी पूर्वी जर दिवसातून तिन तिनदा गोळी घ्यावी लागत असेल तर आता नविन गोळी दिवसातून एकदाच घ्या!) त्यामूळे डॉक्टरने अतिरिक्त वाचन वाढवले तरी त्यातून हीच माहिती मिळणार.

त्याला प्रॉडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट म्हणतात. हे सर्वच प्रकारच्या उत्पादनात चालू असतं. उदा. सॉफ्टवेअरची बाजारात येणारी नवी-नवी व्हर्शन्स!

बरोबर आहे. पण आरोग्य उत्पादने आणि इतर उत्पादने ह्यांमध्ये बाजाराच्या दृष्टिकोनातुन मूलभूत फरक आहेत आणि त्यामूळे त्यांची तुलना होऊ शकत नाही.
जसेकी असिमीट्री ऑफ इन्फरमेशन. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन काढते तेव्हा उपभोगता ह्या नात्याने मला त्याविषयी जुजबी माहिती असते/ मिळवता येते. उदा. मायक्रोसॉफ्टने विस्टा काढले तेव्हा ते बाजारात आल्यावर माझा मी निर्णय घेऊ शकलो की एक्स पी आवृत्ती काढून विस्टा घालण्याची मला जरूरी नाही! हेच औषधांच्याबाबतीत मात्र उलटे असते. उपभोगत्याला ह्या गोष्टींचा काहीच गंध नसल्याने निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग शून्य राहतो आणि ह्याच गोष्टीचे औषध कंपन्या काही प्रमाणात एक्सप्लॉयटेशन करतात ज्याला मी चापलूसी असे संबोधले.

याबद्दल हल्लीच एक नोबेल पारितोषिक दिले गेले नाही का?

आयुर्वेदाच्या बाबतीतही माहितीचा असमतोल आहे - चर्चा मूळ पदावर यावी म्हणून म्हणतो.

माझ्या आजीचा एक भाऊ एका वैद्याने आपल्या औषधाच्या कह्यात आणला होता, अशी आमच्या कुटुंबात कथा आहे. (म्हणजे त्याला त्या औषधाची सवय लागली, पण मुळात गरज नव्हती, असे काही.) ते मूल प्रौढ होण्यापूर्वी वारले - त्यामुळे आमच्या बघण्यातली कथा नाही. माहिती असमतोलामुळे बाजारातील वस्तू हवी ती मिळते आहे का याचा सारासार विवेक आरोग्याच्या बाबतीत करणे कठिण जाते. त्या वैद्याचे औषध आवश्यक होते की अनावश्यक होते, मूल मृतप्राय असून तो वैद्य प्रयत्नशील होता की तो विष पाजणारा लफंगा होता, काहीच कळायला मार्ग नाही (आणि तेव्हाही कुटुंबापाशी नव्हता).

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2008 - 5:26 am | पिवळा डांबिस

वा, वा कोलबेरसाहेब,
हा तर अगदी क्लासिक "पेटंटेड विरुद्ध जेनेरिक" वादविवाद रंगणारसं दिसतंय!! दोन्ही बाजूंकडे अगदी भरपूर व झकास मुद्दे आहेत!! :)))
पण वर धनंजय यांनी लिहिल्याप्रमाणे हे आयुर्वेदिक थेरेपीपासून जरासे विषयांतरच आहे. कारण आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत पेटंटेड/जेनेरिक वाद नाही. :))
आणि आपल्या चर्चेत बाकी मिसळपावकरांनाही फारसा इंटरेस्ट असेल असे वाटत नाही. तात्या म्हणतील, 'ते तुमचं पेटंटेड/ जेनेरिक जाऊन घाला रे ***त!!'. :)))
तेंव्हा आपल्याशी चर्चा करायला आनंदच होईल पण ती आपण वैयक्तिक पत्रव्यवहारातून करूयात.
चालेल?
आपला (जॉन स्टूअर्ट),
पिवळा डांबिस

कोलबेर's picture

6 Mar 2008 - 11:16 pm | कोलबेर

...इथे विषयांतर नको हे पटले!

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 11:35 am | विसोबा खेचर

आयुर्वेदिक व इतर औषधांना भारतात एफ. डी. ए. ऍप्रूव्हल लागतं की नाही हे ठाऊक नाही, स्थानिक तज्ञ मंडळी त्यावर अधिक माहिती देऊ शकतील.

हा हा हा! :)

आज क्रिटिकल अवयवांवर (हॄदय, मेंदू वगैरे) आयुर्वेदिक तज्ञांनी सर्जरी केलेली माझ्यातरी पहाण्या-ऐकण्यात नाही.
असे का बरं असावे? जाणकारांनी कृपया खुलासा करावा.

डांबिसाच्या आधीच्या एका प्रतिसादातील ही शंकाही आवडली! मीही खुल्याश्याच्या प्रतिक्षेत.. :)

आपला,
(जडीबुटीवाला सर्जन!) तात्या.

पिवळा डांबिस's picture

7 Mar 2008 - 5:02 am | पिवळा डांबिस

हा हा हा! :)

अहो तात्या, मी वरील वाक्ये खरंच गंभीरपणे म्हटली होती.
च्यायला, आम्ही तर कानफाटे झालो आहोत! आम्हाला सिरियसली कुणी घेतच नाही. :(((
आम्ही नाही जा....

हे नांव घेतल्याबद्द्ल पस्तावणारा,
पिवळा डांबिस
:))))))))))

प्लीज, इथेच चर्चा चालू ठेवा ना.... खूप माहिती मिळते आहे आम्हाला...ज्यांना इंटरेस्ट नाही ते नाही वाचणार! :)
@धनंजय - तुझा पंखा तर मी आहेच, आता आदर वाढतोय बस!!

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 10:51 am | विसोबा खेचर

लेको,

देव न करो, पण शेवटी कुठे आपटून धोपटून डोकं वगैरे फुटलं किंवा इमर्जन्सी छातीत वगैरे दुखायला लागलं की झक्कत याल आमच्याच ऍलोपथीकडे!!

त्याशिवाय जाल तरी कुठे? इमर्जन्सी सीटी स्कॅन, ई सी जी वगैरे करून योग्य ते इंन्ट्रा व्हेनस किंवा इंन्ट्रा मस्क्युलर सलाईनं, इंजेक्शनं, आणि लाईफ सेव्हिंग ड्रग्ज घ्यायला झक्कत ऍलोपथीच्याच दाराशी याल! :)

जीव वाचला तर इतर पथ्यांबद्दल देखील भसाभसा आणि भारंभार बोलू शकाल! :))

आपला,
(कट्टर ऍलोपथीवादी) तात्या.

आर्य's picture

6 Mar 2008 - 6:14 pm | आर्य

"देव न करो, पण शेवटी कुठे आपटून धोपटून डोकं वगैरे फुटलं किंवा इमर्जन्सी छातीत वगैरे दुखायला लागलं की झक्कत याल आमच्याच ऍलोपथीकडे!! "

आजार कोणताही असो, ती समजाऊन घेण्याची आणि बरं करण्याची पद्धत कोणतीही असो, (अलोपॅथी / होमियोपॅथी /आयुर्वेद ) पण आम्हाला यातून सुखरुप बाहेर कढा म्हणजे झालं......हो.
नुकताच ऐका दवाखान्यात जाण्याचा योग आला. तेव्हा हा श्लोक तिकडे वाचला. (योग अशा साठी की तिथे जाऊन बरच काही शिकता आलं.)

व्याधेसत्व परिज्ञानम् वेदनायाश्चनिग्रहः ।
ऐतत् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषः । ।

वरदा's picture

6 Mar 2008 - 7:05 pm | वरदा

ड्रग जेंव्हा बाजारात पहिलं पदार्पण करतं तेंव्हा त्यावर कंपनीचे जास्तीत जास्त पैसे खर्च झालेले असतात पण अजून त्यापासून उत्पन्न शून्य असतं.

क्लिनिकल ट्रायल करायला किती वर्ष जातात आणि पैसाही खूपच जातो मग एवढे प्रयत्न केल्यावर त्यावर थोडा नफा मिळवायचा प्रयत्न केला तर चुकलं कुठं? जेनेरीक कंपन्या तर वाटच पहात असतात कधी एकदा पेटंट संपतय्...त्यात कितीतरी वेळा एफ डी ए अप्रूव होऊन सुद्धा नंतर काही साईड एफेक्ट सापडून ड्रग मार्केट मधून काढावं लागतं तेव्हा कीती नुकसान होतं..मग ते नुकसान जे चांगलं ड्रग असेल त्यातुनच भरुन काढणार ना...
आपल्या खिशातून जातं ते खरं पण आमच्या खिशात येतंही त्यातूनच हो.....फार्मा कं नी ने नाही दिले पैसे तर आमचं कसं होईलः(

भडकमकर मास्तर's picture

6 Mar 2008 - 11:58 pm | भडकमकर मास्तर

क्लासिक "पेटंटेड विरुद्ध जेनेरिक" वादविवाद फार रंगलाय.... मी डेंटिस्ट आहे, मला अधिक माहिती हवी आहे....माझे काही प्रश्न आहेत आणि त्यावर सोपी उत्तरे सापडत नाहीत...
समजा इथे जर विषयांतरामुळे प्रॉब्लेम होणार असेल तर प्लीज दुसरा टोपिक काढता का? ..फ़ार्मा कंपन्या, औषधे आणि डॉक्टर असा काहीसा

कित्ती कित्ती ती सोज्वळ आणि सुंदर चर्चा व प्रतिसाद..! वाचून उपक्रमाची आठवण झाली. आणि आजकाल चालणार्‍या उथळ चर्चा पाहून खेद देखील वाटला.