मराठीद्वेष्टय़ांची बनवाबनवी
लोकसत्ता- १७ जून २००९, विशेष लेख
गेले काही दिवस बीएमएमच्या (बॅचलर ऑफ मास मीडिया) मराठीकरणाने कार्यकर्त्यांना झपाटलंय. एका अभ्यासक्रमाचे मराठीकरण करण्यासाठी वर्षभर विविध पातळ्यांवर झगडावं लागतं, हे दु:खद तरीही अपरिहार्य आहे, याचं कारण विद्यापीठात आणि इतरत्र मुबलक आढळणारे झारीतले शुक्राचार्य. या सगळ्यांना सरळ करण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग वापरण्याचा पर्याय सुरुवातीपासूनच उपलब्ध होता. पण दोन कारणांनी तो नाकारणं श्रेयस्कर होतं. एक म्हणजे मराठी माणसाच्या आक्रमक, दहशतवादी चेहऱ्याबद्दल गळा काढणाऱ्या विचारवंतांना, माध्यमांना त्यामुळे आयतंच कोलीत मिळालं असतं. दुसरं म्हणजे एकदा दमबाजी करून सुटण्यातला हा प्रश्न नाही. त्यासाठी शासन- प्रशासनातल्या खाचाखोचा समजून घेऊन योग्य त्या ठिकाणी मराठीद्वेष्टय़ांना चाप लावण्यासाठी सतत अभ्यास लागतो, हस्तक्षेप करावा लागतो. त्यासाठी ज्या व्यवस्थेला बदलायचंय तिच्याशी संवादाचे दरवाजे खुले ठेवावे लागतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न जसा मराठी भाषेचा आहे तसा मराठी पत्रकारितेचाही आहे, त्यामुळे मराठी अभ्यास केंद्राने पत्रकारांच्या वतीने लढण्यापेक्षा पत्रकारांना हा लढा आपला वाटेल यासाठी प्रयत्न केले. हे करत असताना राजकीय, पक्षीय, अस्पृश्यता पाळली नाही. राज ठाकरेंनी गरज पडेल तिथे मदतीचं आश्वासन दिलं. भारतकुमार राऊत, संजय राऊत या शिवसेनेच्या खासदारांनी समर्थनांची पत्रं दिली. डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांनी पत्रकांद्वारे समर्थन दिलं. सुप्रिया सुळे आणि राजेश टोपेंनी मराठी बीएमएमच्या फायली वेगात हलतील हे पाहिलं. त्यामुळे सर्व छुपे, उघड डाव मोडून पुनर्रचित अभ्यासक्रमासह इंग्रजी आणि मराठी बीएमएमचा मार्ग मोकळा झाला आहे.
इथे या कथेने नवं वळण घेतलंय. वर्षांनुर्वष नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती, अंमलबजावणी, अभ्यासमंडळं, विद्वत-परिषद यांवर वर्णी याला सरावलेल्या दक्षिण मुंबईतल्या धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालयांना या वेगवान बदलांचा जाच झाला. त्यांची खरी आणि दाखवायची दु:खं वेगळी होती. खरं दु:ख इंग्रजी बीएमएमच्या मांडीला मांडी लावून मराठी बीएमएम सुरू झाल्याचं! आतापर्यंत मराठीतून उत्तरं लिहिण्याची सवलतही या अभ्यासक्रमात नव्हती. त्यामुळे मराठीचा अभ्यासक्रम ही कल्पनाच मानवणार नसल्यामुळे आधी तो येणं कसं अव्यवहार्य आहे हे पटवून देण्याचे प्रयत्न झाले. विविध माध्यमांतल्या मराठी पत्रकारांनी हे युक्तिवाद उधळून लावल्यावर मग नवा अभ्यासक्रम आखला गेला. त्यातही तो फक्त मराठीला लागू व्हावा आणि इंग्रजीसाठी मात्र जुनाच अभ्यासक्रम असावा असा प्रयत्न विद्वत-परिषदेच्या पातळीवरही झाला त्यामुळे ‘मराठी बीएमएम’ ही सामान्य वकुबाच्या मुलांसाठीची दुय्यम दर्जाची पदवी आहे, असा संदेश देण्याचा मार्ग मोकळा होणार होता. अभ्यास केंद्राने तोही हाणून पाडला. आता नवा अभ्यासक्रम लागू करण्यावाचून पर्याय नाही हे लक्षात आलेली दक्षिण मुंबईतली एच. आर., के. सी., जयहिंद, सोफिया आणि झेव्हियर्स ही महाविद्यालयं चिडली. कुणालाही न विचारता बीएमएम चालवणाऱ्या या महाविद्यालयांचं नेतृत्व प्रा. व्हिस्पी बालापोरिया, प्रा. वरलक्ष्मी, प्रा. मार्गारिटा कोलासो आणि प्रा. नंदिनी सरदेसाई या प्राध्यापकांनी स्वत:कडे घेतलं. झेव्हियर्स महाविद्यालयाचे फादर फ्रेझरही त्यात होते. पण नंतर ते बहुधा उघडपणे त्यात यायला बिचकले असावेत. या प्रत्येकाचं स्वत:चं दु:ख आहे. प्रा. बालापोरिया यांच्या मते त्यांनी हा अभ्यासक्रम सुरुवातीला तयार केलाय, त्यामुळे पुनर्रचनेत त्यांचं अमूल्य (! ) मत हवंच होतं. प्रा. वरलक्ष्मी आणि प्रा. कोलासो या आपापल्या महाविद्यालयात बीएमएमच्या समन्वयक आहेत. बरीच र्वष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मराठी आहेत. प्रा. नंदिनी सरदेसाई यांचं समाजशास्त्रातलं ज्ञान विद्यापीठाने वापरलं नाही म्हणून त्यांचा राग आहे. अशी या ‘माध्यम-विचारा’बाबत सुरुवातीपासूनच निवृत्त झालेल्या मंडळींची गट्टी जमली आहे, गेल्या दोन आठवडय़ात मूठभर मंडळींच्या दादागिरीचं अमर्याद दर्शन त्यांनी घडवलं आहे.
सुरुवातीला त्यांनी कुलगुरू डॉ. खोले यांना जाब विचारला. विद्यापीठांतर्गत विविध व्यासपीठांवर चर्चा होताना, मराठी वृत्तपत्रांतून चर्चा होताना तोंड का उघडलं नाही, असा प्रश्न त्यांना कुलगुरूंनी आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी विचारला तेव्हा ते निरुत्तर झाले. नंतर त्यांनी राज्यपाल व कुलपती एस. सी. जमीर यांच्याकडे या अन्यायाविरुद्ध धाव घेतली. राज्यपाल ईशान्य भारतातले, म्हणून ईशान्य भारतातून येणाऱ्या मुलांची नव्या अभ्यासक्रमाने होणारी गैरसोय हा मुद्दा तयार केला गेला. मराठीचं काही बरं झालं की ज्यांना खुपतं असे बरेच अमराठी सनदी अधिकारी महाराष्ट्र शासनाने पगार देऊन पोसले आहेत. माहिती तंत्रज्ञानात मराठीचा अजिबात शिरकाव होऊ न देणारे क्षत्रपती शिवाजी, भ. प्र. सिंह, मराठी शाळांचा बोजवारा उडवणारे संजयकुमार हे त्यापैकी काही. राजभवनातल्या अशाच अमराठी अधिकाऱ्यांना गाठून या प्रश्नाचं गांभीर्य वाढवलं. राज्यपालांनी सुज्ञपणाने या मंडळींना विद्यापीठाशी पुन्हा बोला असं सांगितलं.
सोमवार, ८ जून रोजी प्रकुलगुरू ए. डी. सावंत यांनी बैठक बोलावली तेव्हा या त्रस्त मंडळींनी त्यांना भंडावून सोडलं. त्यांच्या सुदैवाने अभ्यास मंडळाचे सदस्य, मराठी पत्रकार पुरेसे आक्रमक असल्याने त्यांना गप्प बसवणं शक्य झालं. संवादकौशल्यं आणि अनुवादकौशल्यं या दोन विषयांमध्ये इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीन भाषांचा अंतर्भाव केला होता. परराज्यांतून आलेल्या बापडय़ा मुलांना या तीन भाषांचं ओझं सोसणार नाही, शिवाय इथे ते शिकतील म्हणजे इथे नोकरी करतीलच असं नाही, असे युक्तिवाद करत इंग्रजीसोबत फक्त एकच भाषा द्या असा त्यांनी आग्रह धरला. अभ्यास केंद्राची भूमिका आधीही मराठी अनिवार्य असावी अशी होती, आजही आहे. पण बैठकीतल्या पत्रकारांचं असं म्हणणं पडलं की, किरकोळ दुरुस्त्यांसह पुनर्रचित अभ्यासक्रमाला मान्यता आणि मराठी बीएमएम यंदापासून सुरू होणं, असे दोन मोठे निर्णय झाल्याने आपण मोठी मजल मारली आहे. त्यामुळे काही महाविद्यालये पर्याय घेत असतील तर या खेपेला तडजोड म्हणून ते स्वीकारू. पण याच बैठकीत मी दक्षिण मुंबईतल्या या महाविद्यालयांच्या टीकेमागचे हेतू तपासले पाहिजेत, अशी भूमिका मांडली होती पण प्र-कुलगुरूंना सहमती घडवून आणायची असल्याने हा वाद नको होता. मुळात माध्यम अभ्यासाची पदवी किंवा प्रत्यक्ष माध्यमांमध्ये काम यातलं काहीही नसणाऱ्यांची दखल विद्यापीठाने घ्यायलाच नको होती. तशी ती घेतल्यावर विद्यापीठाने त्यांच्या काही सूचनांची दखल घेऊन इतिवृत्त बनवलं. त्यावर सही करायला या मंडळींनी नकार दिला. कारण त्यांना त्यात आता आणखी बदल हवे होते. ते होत नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी एका परंपरागत मराठीद्वेष्टय़ा इंग्रजी वृत्तपत्राकडे जाऊन एकांगी बातमी छापून आणली. अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे निमंत्रक प्रा. संजय रानडे यांना घेरण्याचे प्रयत्न त्यांनी नव्या दमाने सुरू केले. दरम्यान या मग्रुरांच्या तुष्टीकरणासाठी विद्यापीठाने इतिवृत्तांत ‘इंग्रजी किंवा हिंदी किंवा मराठी’ असा बदल केला. हे कळल्यावर आम्ही कुलगुरूंना सांगितलं की, हा बदल लागू झाला तर या महाविद्यालयांना त्याचे परिणाम वेगळ्या मार्गाने भोगावे लागतील. आम्ही यातून बाजूला झालो, तर हा प्रश्न संपूर्णत: राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना यांच्या आखाडय़ात जाईल. त्यानंतर त्याचे जे काही परिणाम होतील त्याची जबाबदारी आमची असणार नाही. कुलगुरूंनी तो बदल बाद केला. (इतिवृत्ताची प्रत आम्हाला मिळालेली नाही, पण कुलगुरू दिलेला शब्द पाळतात, असा बीएमएमच्या बाबतीत अनुभव आहे. )
आता या त्रस्त स्त्रियांनी कोर्टाची पायरी चढायची धमकी दिलीय. अभ्यास मंडळातले सहापैकी तीन सदस्य इंग्रजी वृत्तपत्रांशी संबंधित असतानाही मराठी वृत्तपत्रं आणि पत्रकार यांचं प्रभुत्व असल्याचा कांगावा केला जातोय. ‘घाईने, पुरेसा विचार न करता केलेला अभ्यासक्रम’ अशी टीका करत, अमराठी राजकीय प्रशासकीय ताकदींचा वापर करून सगळी प्रक्रिया रद्दबातल करायचा त्यांचा डाव आहे. डॉ. खोले आजवर तरी त्याला बधलेले नसले तरी गरज आहे ती विद्यापीठाने यांना धडा शिकवण्याची. त्यांच्या मराठीद्वेष्टेपणामागचं राजकीय अर्थकारण व त्याचे प्रणेते यांना समाजापुढे उघडं पाडण्याची. ते करण्याचं धाडस विद्यापीठात आहे का?
बीएमएमच्या या लढय़ात राममोहन खानापूरकर हे सोफिया महाविद्यालयातील बीएमएमचे शिक्षक धाडसाने उभे राहिले. त्यासाठी त्यांनी व्यवस्थापनाचा रोष पत्करला. ते पुन्हा तिथे नोकरीला जाऊ शकणार नाहीत हे उघड आहे. ‘भाषेचा प्रश्न’ हा नुसता चर्चेचा नाही तर स्वत:चं करिअर, सुखसोयी पणाला लावण्याचाही आहे, याची तटस्थपणाने या आणि अशा लढय़ांकडे पाहणाऱ्या मराठी समाजाला जाणीव व्हावी म्हणून हे सांगत आहे. आजही या आंदोलनाला रस्त्यावरच्या आंदोलनाचं रूप देणं सहजशक्य आहे. पण सनदशीर आंदोलनं करणाऱ्याच्या मागे समाज स्वत:हून उभा राहतो असं आतून वाटतं. समूहशक्ती काही वेळा दमबाजीसाठीही लागत असेल पण ती बहुतेकदा लागते ती रचनात्मक उभारणीसाठी. मराठी भाषा, आणि संस्कृतीच्या इतक्या लढाया लढायच्या आहेत की जितके हात सोबत येतील तितके हवेच आहेत.
राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना तो आपल्या आणि शासनाच्या असंवेदनशीलतेचा सुवर्णमहोत्सव आहे याची जाणीव स्वस्थ बसू देत नाही. बीएमएमचं आंदोलन हा त्या अस्वस्थतेचाच परिपाक आहे. अशा आंदोलनांना बळ द्यायचं की नाही याचा निर्णय समाजाने घ्यायचा आहे.
दीपक पवार
प्रतिक्रिया
19 Jun 2009 - 2:21 am | संदीप चित्रे
काय काय उद्योग चालू असतात मराठीच्या विरोधात. ह्यात 'सरदेसाई' हे मराठी आडनाव पण असावं हे दुर्दैव.
>> पण सनदशीर आंदोलनं करणाऱ्याच्या मागे समाज स्वत:हून उभा राहतो असं आतून वाटतं. समूहशक्ती काही वेळा दमबाजीसाठीही लागत असेल पण ती बहुतेकदा लागते ती रचनात्मक उभारणीसाठी. मराठी भाषा, आणि संस्कृतीच्या इतक्या लढाया लढायच्या आहेत की जितके हात सोबत येतील तितके हवेच आहेत.
ह्या वाक्यांसाठी लेखकाला बोनस मार्क्स :)
19 Jun 2009 - 2:34 am | llपुण्याचे पेशवेll
>>बीएमएमच्या या लढय़ात राममोहन खानापूरकर हे सोफिया महाविद्यालयातील बीएमएमचे शिक्षक धाडसाने उभे राहिले. त्यासाठी त्यांनी व्यवस्थापनाचा रोष पत्करला. ते पुन्हा तिथे नोकरीला जाऊ शकणार नाहीत हे उघड आहे. ‘भाषेचा प्रश्न’ हा नुसता चर्चेचा नाही तर स्वत:चं करिअर, सुखसोयी पणाला लावण्याचाही आहे, याची तटस्थपणाने या आणि अशा लढय़ांकडे पाहणाऱ्या मराठी समाजाला जाणीव व्हावी म्हणून हे सांगत आहे. आजही या आंदोलनाला रस्त्यावरच्या आंदोलनाचं रूप देणं सहजशक्य आहे. पण सनदशीर आंदोलनं करणाऱ्याच्या मागे समाज स्वत:हून उभा राहतो असं आतून वाटतं. समूहशक्ती काही वेळा दमबाजीसाठीही लागत असेल पण ती बहुतेकदा लागते ती रचनात्मक उभारणीसाठी. मराठी भाषा, आणि संस्कृतीच्या इतक्या लढाया लढायच्या आहेत की जितके हात सोबत येतील तितके हवेच आहेत.
खानापूरकर सरांचे हार्दिक अभिनंदन. कमीत कमी एखाद्या मराठी वृत्तपत्राने याची दखल घेऊन खानापूरकराना चांगली नोकरी दिली किंवा इतर मराठी कॉलेजने त्याना नोकरी देऊ केली तरी त्यांचे ऋणातून थोडेसे उतराई होता येईल.
अशाच एकीची आवश्यकता मराठी भाषेच्या उन्नयनासाठी आवश्यक आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
19 Jun 2009 - 2:34 am | धनंजय
पुणे विद्यापीठात एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्वी फक्त इंग्रजी माध्यमात उपलब्ध होता, हे स्वानुभवाने माहीत आहे. अजूनही बहुधा इंग्रजी माध्यमातच आहे.
अशाच अनेक इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमांपैकी हासुद्धा एक अभ्यासक्रम - की असे नाही? मराठी अभ्यास केंद्राने एम् बी बी एस् इंग्रजी अभ्यासक्रमाच्या जुन्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून बी एम् एम् च्या नव्या अभ्यासक्रमाकडे लक्ष केंद्रित का केले असावे, याबद्दल कुतूहल वाटते.
मला तरी असे वाटते, की उद्या जर पुणे विद्यापीठात एम बी बी एस चा अभ्यासक्रम मराठीत बनवण्यासाठी आंदोलन झाले, तर माझ्या आवडत्या प्राध्यापकांपैकी अनेक या विषयी आक्षेप घेतील. त्यांच्यापैकी अनेक अमराठी आहेत. (सैन्यातले अधिकारी असल्यामुळे देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत.) अशा परिस्थितीत त्यांच्या मराठीद्वेषाबद्दलही साधारणपणे असाच लेख लिहिला जाईल काय?
मागे साधारण असाच एक लेख अन्य एका संकेतस्थळावर आला होता :
अभ्यासक्रमांचे मराठीकरण...केल्याने होत आहे रे...
तेव्हापासून हे कुतूहल माझ्या मनात आहे. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी याच अभ्यासक्रमाबद्दल आंदोलन होण्यासारखी विशेष परिस्थिती काय आहे? माझ्या इंग्रजी माध्यमात शिकवणार्या वैद्यकीय प्राध्यापकांना तेवढ्यासाठी "मराठीद्वेष्टे" म्हटले जाऊ नये, अशी मनोमन इच्छा आहे. मग या बीएमएम प्राध्यापकांना मराठीद्वेष्टे म्हणण्यासाठी अन्य अभ्यासक्रमांपेक्षा वेगळी काय विशेष परिस्थिती आहे, ते जाणून घ्यायला आवडेल.
19 Jun 2009 - 9:50 am | शैलेन्द्र
वैद्यकीय किंवा तांत्रिक अभ्यास्क्रम व बॅच्लर ऑफ मास मीडीया यात फरक आहे. मास मीडियाचा अभ्यास्क्रम घ्यायचा पण "मास"ची भाषा बोलायची नाही या प्रवृत्तीमुळेच हिन्दाळलेले मराठी बोलणारे वार्ताहर मराठी वाहीन्यांवरुन लादले जातात. चॅनेलवरील मराठीची धाटणी/लकब सरळ हिंदी असते.
दुसरी गोष्ट म्हणजे द्वितिय अनिवार्य भाषा म्हणुन हिंदी आहे, मग मराठी का नको? मराठीमध्ये करिअर करु इच्छिनार्यांनी काय ते लखनौमधे शिकायचे? इथे येवुन, इथल्या सरकरच्या पैशावर, इथल्या सोयी वापरुन शिक्षन घ्यायचे घ्यायचे पण माज हिंदीचा करायचा याला काय अर्थ आहे?
19 Jun 2009 - 10:49 am | मराठी_माणूस
माझ्या इंग्रजी माध्यमात शिकवणार्या वैद्यकीय प्राध्यापकांना तेवढ्यासाठी "मराठीद्वेष्टे" म्हटले जाऊ नये
असे काहीच घडले नसताना असा आरोप कशाला ?
19 Jun 2009 - 12:34 pm | विसोबा खेचर
राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना तो आपल्या आणि शासनाच्या असंवेदनशीलतेचा सुवर्णमहोत्सव आहे याची जाणीव स्वस्थ बसू देत नाही.
खरे आहे! एकंदरीत फार संतापजनक प्रकार आहे!
अशा आंदोलनांना बळ द्यायचं की नाही याचा निर्णय समाजाने घ्यायचा आहे.
समाजाचे माहीत नाही परंतु मिपाचा या कार्यासाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा असे वाटते.
मुक्तराव, या प्रकरणाला मिपावर वाचा फोडल्याबद्दल मी आपला ऋणी आहे..
आपला,
(मराठी) तात्या.
19 Jun 2009 - 5:13 pm | भोचक
धनंजयराव, पत्रकारिता मराठीत करायची असेल तर मग इंग्रजीतून ती का शिकायची? इथल्या लोकांच्या सुखदुःखाशी निगडित काम करायचं असेल तर मग त्यासाठी इंग्रजी का मराठी का नाही? मुळात पुणे विद्यापीठाचा पत्रकारिता अभ्यासक्रम अतिशय चांगल्या दर्जाचा आहे. पण या मराठी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विद्यापीठात मात्र हाच अभ्यासक्रम मराठीत नाही हे दुर्देव. मग मुंबईतल्या मराठीत पत्रकारिता करू इच्छिणार्या मुलांनी काय करायचं?
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
19 Jun 2009 - 7:33 pm | धनंजय
पत्रकारिता मराठीत करणार्यांकरिता हा अभ्यासक्रम होता असे मात्र लेखातून स्पष्ट होत नव्हते. तसे असेल तर मराठी माध्यम अनिवार्य आहे.
असे दोन अभ्यासक्रम काढण्याचा वगैरे विचार होता ना? म्हणजे मराठी माध्यमातला आणि अन्य माध्यमांतला - असा काही प्रस्ताव लेखकाच्या बाजूने उधळून लावल्याचे लेखातून कळते. तसे दोन अभ्यासक्रम असते, तर मराठीतून पत्रकारिता करणार्यांकरिता, आणि अन्य भाषांमधून पत्रकारिता करणार्यांकरिता, दोघांकरिता सोय झाली असती.
19 Jun 2009 - 7:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभ्यासमंडळातील सदस्य, डीन, आणि कुलगुरु हेच अशा गोष्टींना जवाबदार असतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही (औरंगाबाद) पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकवतात मराठी माध्यमातून, प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून. कोणालाच कसले दु:ख नाही.
आमच्याकडे वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम इंग्रजीत आहे, शिकवतात मराठी माध्यमातून. पदव्युत्तर विविध शाखेचेही तस्सेच. मागे द्वितीय भाषा मराठीची अभ्यासपत्रिका वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातून काढून टाकली, त्यानंतर विद्यार्थ्यांची आंदोलने झाली, मराठी विषयाच्या प्राध्यापकांनीही माय मराठीसाठी लढा लढला. युजीसीचे निर्देश आहेत म्हणून आंदोलन ढिले पाडल्या गेले. जे दम धरुन होते त्यांना नीट महाविद्यालयात उपस्थित राहा, असा दम दिला गेला. मराठीविषयीचे आंदोलन संपले.
आता विज्ञान शाखेतून द्वितीय भाषा हद्दपार झाली. मराठी विषयाचे प्राध्यापक आपले वर्कलोड पूर्ण होते ना, असा स्वार्थी विचार करुन कशाला पडायचे या भानगडीत अशा निष्कर्षाला आले आहेत, आता बोला ?
-दिलीप बिरुटे
2 Jul 2009 - 8:25 am | मुक्तसुनीत
मिसळपाव वरील मित्रानो ,
“लोकसत्ता” तल्या माझ्या लेखाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद . मागच्या आठवड्यात शासनाची परवानगी मिळविण्यासाठी आणि मग त्याआधारे विद्यापीठातली कार्यवाही वेगात होईल यासाठी प्रयत्न झाले . आता यावर्षी थोडे उशिरा का होईना , पण मराठी बीएमएम सुरु होईल . याच काळात घरात लग्न असल्याने ईमेल पाहणं , उत्तर देणं हे करु शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व .
माझ्या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया या कामाचं स्वरुप समजून घेण्याची इच्छा व्यक्त करणार्या आहेत . काही या कामात कशी मदत करता येईल याची विचारणा करणार्या आहेत. तर काहींना या कामाबद्दल आक्षेप आहे . काही वेळा मूळ व्यक्तीच्या नावाने तर काही वेळा टोपण नावाने प्रतिक्रिया आल्या आहेत . शक्य तिथे वैयक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्वप्रथम पार्श्वभूमी :
गेली बरीच वर्षे बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) हा मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्णत: इंग्रजीतून सुरु होता. तो मराठीतून आणण्यासाठी मराठी पत्रकाराचं शिष्टमंडळ मराठी अभ्यास केंद्राने नेलं. त्यानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना व मराठीकरण सुरु झालं . मूळ इंग्रजी अभ्यासक्रमात मराठी , महाराष्ट्र यांना अजिबात स्थान नव्हतं . कारण तो जाहिरात कंपन्यांना बॅकऑफिसला लागणारी मुलं मिळावीत या उद्दिष्टाने बनवला होता. विद्यापीठात अनेक अडथळे पार करत तो मंजूर झाला. आता शासनानेही त्याला मंजूरी दिलीय. आता इंग्रजी , मराठी दोन्ही अभ्यासक्रम सारखेच आहेत .
ज्यांचा या प्रयत्नांना पाठिंबा आहे. त्याबद्दल त्यांचे आभार . अभ्यास केंद्राच्या विविध कृतिगटांची माहिती या पत्रासोबत दिली आहे. तसेच इतर काही उपयुक्त माहितीही दिली आहे. त्यावरुन आपण आमच्याशी कशा पद्धतीने जोडून घेऊ शकता याचा आपल्याला अंदाज येईल.
एमबीबीएस च्या अभ्यासक्रमाचं मराठीकरण का होऊ नये ? (संग्राहक यांच्या प्रतिक्रियेच्या संदर्भात ) एकेकाळी असे अनेक अभ्यासक्रम मराठी आणि उर्दूतूनही होते. उच्चशिक्षण आपल्या भाषेतून उपलब्ध होणे हा ती ज्ञानभाषा होण्याच्या मार्गातला महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या इंग्रजी माध्यमात शिकवणार्या आपल्या प्राध्यापकांना मराठीद्वेष्टे म्हणण्याचा प्रश्न नाही. पण सर्व प्रगत ज्ञानशाखांमधलं ज्ञान मराठीतून उपलब्ध व्हावं यासाठी आमचा आग्रह आहे.
माझ्या लेखाच्या संपादकीय किंवा वार्ताहारीय शैलीची चिकित्सा करणारी एक प्रतिक्रिया आहे. चळवळीची गरज म्हणून जेव्हा लेखन केलं जातं , तेव्हा त्याची शैली तपासायला वेळ नसतो. मात्र या लेखातलं प्रत्येक वाक्य तथ्यात्मक आहे हे मी मुद्दाम नमूद करु इच्छितो. काही तपशील लेख अधिक स्फोटक होऊ नये म्हणून दिलेला नाही. त्यात या मंडळींनी विद्यापीठ आणि इतर यंत्रणांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे.
या प्रकारच्या चळवळीला पोषक संदर्भसाहित्याचं विश्लेषण करणे , आवडलेल्या उपक्रमासाठी (महाराष्ट्रात असाल तर ) वेळ देणे किंवा याप्रकारच्या चळवळींना आर्थिक पाठिंबा देणे अशा विविध मार्गांनी आपण आमच्याशी जोडून घेऊ शकता. आपण ज्या राजकीय नेत्यांचा उल्लेख केलाय त्यातल्या अनेकांची मुलं मराठी माध्यमात शिकत नाहीत, शिकलेली नाहीत याची आम्हांला कल्पना आहे. पण कदाचित त्यामुळेच त्यांना मराठीची बाजू उघडपणाने घेणं भाग पडतं. समर्थनाच्या पत्रांनी त्याचं भाषेवरचं प्रेम सिद्ध होत नाही हे खरंच आहे. पण त्यांना पूर्ण डावलून सुद्धा पुढे जाता येणं कठीण आहे. त्यामुळे शक्य तिथे सहकार्य , आवश्यक तिथे विरोध असं करतंच पुढे जावं लागतं.
शिक्षणाच्या माध्यमाच्या निवडीसाठी भाषेविषयीचं प्रेम हा एक निकष आहेच . पण त्यामागे शिक्षणशास्त्र व मानसशास्त्राचा आधारही आहे. मराठी साहित्यावर इंग्रजीतून पीएच.डी. जरुर व्हावी . पण इंग्रजीतल्या मोठ्या लेखकांवर मराठीतून संशोधन झालं तर मराठी वाढेल. इंग्रजी भाषेत भर घालण्यासाठी जगभरातून लोक प्रयत्न करताहेत . मराठीसाठी मात्र आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत . भाषा – प्रेम मूलत: शिक्षणाने जगते. साहित्य – व्यवहार हा एकूण भाषा व्यवहारातला महत्त्वाचा पण छोटा भाग आहे. भाषा व्यवहारातून संपली तरी लोक त्यातून साहित्यनिर्मिती करु शकतात. (उदा० संस्कृत , पाली ) मराठीचं असं होऊ नये अशी आमची इच्छा आहे.
बदलत्या युगात प्रगती करण्यासाठी मराठीसह इंग्रजीचीही आवश्यकता आहे. मराठी टाळणं हे प्रगतीचं लक्षण आहे असं आम्ही मानत नाही. इंग्रजी शिकणं आणि इंग्रजीतून शिकणं या दोन पूर्णत: वेगळ्या गोष्टी आहेत . ( लेखकाने एनसीईआरटीने प्रकाशित केलेला प्रा०यशपाल समितीचा अहवाल पाहायला हरकत नाही .)
मुलांनी इंग्रजीतून शिक्षण घेऊ नये असं आमचं म्हणणं नव्हतं आणि नाही. मराठीतून बीएमएम शिकणार्या मुलांनाही अनिवार्यपणे इंग्रजी शिकायला लागावं अशी सोय मुद्दामच या अभ्यासक्रमात केली आहे. मराठीतून शिकणार्या मुलांनी इंग्रजीपासून दूर जाऊ नये असं हेतूत: केलं आहे. त्यामुळे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रश्नच नाही. पवार , ठाकरे कुलोत्पन्नांची प्रमाणपत्रं नसती तर यशस्वी व्हायला वेळ लागला असता ,पण यश मिळालंच असतं. ज्या अभ्यासक्रमाबद्दल फारशी कल्पनाच नाही तो फालतू आहे असं म्हणून त्याची हेटाळणी करणं हे पूर्वग्रहदूषित मानसिकतेचं लक्षण आहे. राज ठाकरेंच्या कार्यपध्दतीबद्दल प्रतिक्रिया-लेखकाला आक्षेप असतील तर त्याने त्यांच्या पक्षाच्या संकेतस्थळावर ते थेट नोंदवायला हरकत नाही . पण आमच्या कामातल्या यशाचा राज ठाकरेंच्या आंदोलनाशी बादरायण संबंध जोडण्यासाठी कल्पनाशक्तीला ताण देण्याचं कारण नाही. भौतिक प्रगतीसाठी स्वदेश सोडणार्यांनी ते जिथे आहेत तिथून भाषासंवर्धनाचं काम केलं तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे ? परदेशस्थ मराठी माणसांकडून अजूनही खूप अपेक्षा आहेत. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी साहित्य –विकास आणि भाषाविकास यातला फरक लक्षात घेणे.
संदीप चित्रे यांनी या लढ्यात “सरदेसाई” आडनावाची व्यक्ती मराठीविरोधात उभी राहिली याबाबत खंत व्यक्त केलीय ती रास्तच आहे. पण असे आडनावाने मराठी राहिलेले बरेच मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय आपल्यात आहेत , त्यात उच्चवर्णीय आहेतच, पण बहुजनसमाजातही हा रोग पसरतो आहे. अमराठी लोकांइतकंच अशा मराठी लोकांना तोंड देणं हे चळवळींपुढचं एक आव्हान आहे.
संदीप चित्रेंनी राममोहनच्या धाडसाचं कौतुक केलंय त्याबद्दल आभार . त्याच्या उपजीविकेसाठी एखाद्या पाठ्यवृत्तीच्या शोधात आम्ही आहोतच . आपल्या परिचयात यासाठी सहकार्य करणार्या व्यक्ती असतील तर जरुर कळवा. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू.
डॉ.दिलीप बुरुटे यांनी वाणिज्य आणि विज्ञान शाखांतून मराठी हद्दपार झाल्याबद्दल व्यक्त केलेली खंत रास्त आहे. त्यावेळी मराठी अन्याय निर्मूलन परिषदेच्या मार्फत काम करणारे डॉ.दत्ता पवार आमच्या सोबत काम करतात. मराठीच्या शिक्षकांचा साहित्यकेंद्री दृष्टिकोन आणि बदल स्वीकारण्यातली चालढकल यामुळे विषय आणि माध्यम म्हणून मराठीचा संकोच झाला आहे. ११ वी , १२ वीच्या पातळीवर व्यावहारिक मराठी आणि मराठी साहित्य अशा दोन विषयपत्रिका याव्यात यासाठी पाठयपुस्तक निर्मिती मंडळात आम्ही प्रयत्न करतोय. त्यात यश आलं तर बंद पडलेल्या काही वाटा पुन्हा सुरु होतील .
आपणां सर्वांशी संवाद साधून आनंद वाटला . आपल्या प्रतिसादाचे सातत्यपूर्ण सहकार्यात रुपांतर होईल असा विश्वास वाटतो. काहीजणांच्या प्रतिक्रियांवर उत्तर द्यायचं अनवधानाने राहून गेलं असेल तर क्षमस्व . आपण माझ्याशी deepak@marthivikas.org वर संपर्क साधू शकाल. आपण महाराष्ट्रात राहत असाल तर सक्रीय कार्यकर्ते म्हणून आमच्याशी जोडून घेऊ शकाल . आर्थिक सहकार्य शक्य असेल तर धनादेश “मराठी अभ्यास केंद्र्” या नावाने काढावा. आमचं काम निष्ठेने आणि पारदर्शकपणे चालते आणि चालेल याची हमी देतो.
आपला स्नेहांकित ,
दीपक पवार
अध्यक्ष , मराठी अभ्यास केंद्र
2 Jul 2009 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पवारांनी, वेळात वेळ काढून प्रतिक्रियांना पोच दिली, आपली भुमिका स्पष्टपणे मांडली, त्याबद्दल आभारी !!!
'संजयची' भुमिका पार पाडल्याबद्दल 'मुसुं'चेही आभार ! :)
-दिलीप बिरुटे
2 Jul 2009 - 1:25 pm | मोहन
प्रा. डॉ. सारखेच म्हणतो.
मोहन